अजूनकाही
मुंबईच्या नरिमन पॉइंट भागात अगदी एका टोकाला ‘एनसीपीए, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट’ (स्थापना १९६९) हे टाटा उद्योगसमूहाचं बहुआयामी कलाकेंद्र आहे. इथं संगीत (अभिजात पाश्चात्य आणि पौर्वात्य), नाटक (भारतीय आणि जागतिक), सिनेमा (भारतीय आणि जागतिक), फोटोग्राफी, नृत्यं आणि चित्रप्रदर्शनं (भारतीय आणि जागतिक) अशा जवळपास सर्व कलाप्रकारांना उत्तेजन दिलं जातं. या भव्य संकुलात कलांच्या आविष्काराचे विविध कार्यक्रम सतत सुरू असतात.
कोविडनंतरचा मराठी रंगभूमीच्या संदर्भातील एनसीपीएचा महत्त्वाचा उपक्रम म्हणून ‘दर्पण’ या संहितालेखनाच्या स्पर्धेचा उल्लेख करता येईल. गेली जवळपास दहा वर्षं एनसीपीएतर्फे दरवर्षी ‘प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव’ सादर केला जात आहे. या वर्षी ५, ६ आणि ७ मे या दरम्यान उत्तम नाटकं सादर झाली. या वर्षीचा ‘प्रतिबिंब’ अनेक अर्थांनी संस्मरणीय झाला. याचं श्रेय एनसीपीएच्या नाट्य आणि चित्रपट विभागाचे संचालक ब्रूस गथरी आणि या उपक्रमाच्या निर्मात्या राजेश्री शिंदे यांना दिलं पाहिजे. शिवाय ‘दर्पण’ या संहितेच्या स्पर्धेत नाशिकचे नाटककार दत्ता पाटील यांचं ‘कलगीतुरा’ हे नाटक विजेते ठरलं. त्याचा प्रिमियर शो सादर झाला. त्याचबरोबर तीन दिवस ‘नाटक’ या विषयावर विविध तज्ज्ञांशी गप्पा, रंगकर्मींसाठी अभिनय, आवाज आणि सादरीकरण वगैरे विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. आणखी एक म्हणजे सादर करण्यात आलेल्या ‘कलगीतुरा’ या मराठी नाटकाला इंग्रजी सबटायटल्स देण्यात आली होती. याचा मोठा फायदा अ-मराठी नाट्यरसिकांना झाला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या ग्रामीण भागात अनेक लोककला आजही तग धरून आहेत. त्यातल्या काही कालौघात लुप्त झाल्या, तर काहींचं पुनरुज्जीवन झालं. ‘कलगीतुरा’मध्ये अशाच एका पुनरुज्जीवित झालेल्या लोककलेची कथा आहे. महाराष्ट्रातील परसुल या गावी कलगीतुरा ही सुमारे सातशे वर्षं जुनी परंपरा अचानक लोप पावू लागली. तेव्हा गावातील एका समूहाने ही परंपरा सुरू ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले. ‘कलगी’ (शक्ती) आणि ‘तुरा’ (शिव) हा सुंदर अर्थ समोर ठेवत हे नाटक सादर करण्यात आलं.
याचं दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केलं आहे. ‘कलगीतुरा’च्या पहिल्या प्रयोगानंतर त्याच्या संहितेचंही प्रकाशन झालं. मराठी रंगभूमीच्या इतिहासात कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा, जिथं नाटकाच्या पहिल्या प्रयोगानंतर लगोलग संहितेचं प्रकाशन झालं. ‘कलगीतुरा’ हा शब्द तसा बऱ्यापैकी वापरात असलेला शब्द. ‘कलगीतुरा रंगला’ हा शब्दप्रयोग तर अनेकदा कानावर पडतो. याचा ढोबळ अर्थसुद्धा शहरी समाजाला माहिती असतो. या नाटकात त्याचा गाभा उलगडला आहे.
दोन गटांतील शाब्दिक भांडणं, विचारविनिमय, सवाल-जवाब म्हणजे कलगीतुरा. एक गट म्हणजे ‘कलगी’ (शिव) आणि दुसरा गट म्हणजे ‘तुरा’ (शक्ती). एकमेकांना पूरक, तसंच एकमेकांशिवाय अपूर्ण. भारूड, कीर्तन वगैरे प्रकारातून केलेल्या समाजप्रबोधनाची महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठी परंपरा आहे. यात करमणुकीच्या जोडीला पुरोगामी विचारांचा प्रचार असतोच. डफ आणि तुणतुणे या वाद्यांनिशी सादर होणाऱ्या स्थानिक लावण्या, सवाल-जवाब, कूटप्रश्नांची जुगलबंदी असं एकंदरीत कलगीतुऱ्याचं स्वरूप असतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
अनेक लोककलांत असते, तसं इथंसुद्धा स्थानिक आणि समकालीन समस्यांवर भाष्य असतं. मुख्य स्थानिक लोकवस्तीतील सर्व जाती आणि धर्माचे लोक या सादरीकरणात सहभागी झालेले असतात. त्यामुळे सामाजिक सलोख्याचा संदेश वेगळा द्यावा लागत नाही. समाजाने या लोककला शेकडो वर्षं जतन केलेल्या आहेत. यामागे कुटुंबात होत असलेलं या कलांचं हस्तांतरण, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सोनार, लोहार, चांभार जसं ही कला-कौशल्यं आपल्या मुलांना शिकवतो, तशीच ‘कलगीतुरा’ची कला बाप लेकाला शिकवतो. या जनरितीसमोर १९९०च्या दशकात आलेल्या जागतिकीकरणानं जबरदस्त आव्हान उभं केलं. या आव्हानासमोर परसूल गावातील ‘कलगीतुरा’ ही परंपरा मोडून पडण्याच्या बेतात होती, पण गावकऱ्यांनी जोर करून ही परंपरा जतन केली. त्याची कहाणी म्हणजे ‘कलगीतुरा’.
या नाटकात कथानकाने गती घेण्यासाठी नाटककाराने कलगीतुरा’चं संशोधन करण्यासाठी एक शहरी तरुणी गावात येते असं दाखवलं आहे. ही तरुणी म्हणजे शहरी प्रेक्षकांची एका प्रकारे प्रतिनिधी. तिने विचारलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तरं, यातून ‘कलगीतुरा’चा इतिहास उलगडतो.
भारतातच नव्हे तर जगभरच्या ग्रामीण भागात जगण्याची एक पद्धत वर्षानुवर्षं स्थिर झालेली असते. तेव्हा जगण्याला दुसऱ्या महायुद्धानंतर आलेला अमानुष वेग आलेला नव्हता. शिवाय ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ हे मूल्य फारसं लोकप्रिय झालेलं नव्हतं. ग्रामीण भागातील जगणं तसं सामूहिक असायचं. कोणाच्या घरी मृत्यू झाला, तरी सर्व गाव धावून जात असे. कोणाच्या घरी लग्न असेल, तर सर्व गाव त्यात ओढलेलं असे. ही जगण्याची पद्धत आता एकविसाव्या शतकात बरीच विस्मृतीत गेली आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘कलगीतुरा’मध्ये सवाल-जवाब असतात, स्पर्धा असते. यात कधी कलगी जिंकते, तर कधी तुरा.
“पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून
मेरू मंदार सात समुद्र आधी अवसान
नदी, पर्वत, ध्रुव स्वर्ग कोनापासून
किती लांबीरूंदी याची संख्या सांगन
सप्त समुद्र, मेरू पर्वत, पृथ्वी मध्यान
मेरू भवती दीप सांगतो जमाव झाडून
जणू दीपांची संख्या सांगतो लक्ष योजन
बत्तीस शिखर मेरू वरती देवाच ठान”
अशा असंख्य कलदार रचना नाटकात येत राहतात. यातून शहरी प्रेक्षकांना आपल्या लोककलांचं वैभव जाणवतं. मात्र ‘कलगीतुरा’ हे नाटक म्हणजे फक्त परंपरेचे पुनरुज्जीवन, एवढंच नाही. आजच्या माणसाला परंपरा का हव्याशा वाटतात, लोप पावलेल्या परंपरांचं तो का पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न करतो, याचा नाटककार दत्ता पाटीलने नेणिवेच्या पातळीवर शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या नाटकाचे दिग्दर्शक सचिन शिंदेने हा प्रयोग कमालीचा दर्जेदार सादर केला आहे. यात जरी संगीत या घटकाला महत्त्वाचं स्थान असले तरी हे नाटक ‘संगीत नाटक’ नाही. ते लक्षात घेऊन ऋषिकेश शेलारने संगीत बसवलं आहे. यातील अनेक कलाकारांचं हे पहिलंच नाटक आहे. मात्र ज्या सफाईने ही सर्व मंडळी रंगमंचावर वावरली आहेत, त्याचं श्रेय दिग्दर्शक सचिन शिंदे यांचं. सुमारे दोन डझन गावकरी प्रसंगानुसार रंगमंचावर येत-जात असतात. त्या सर्वांचा उल्लेख करणं अवघड आहे. शाहीर सखारामनाना (हेमंत महाजन), शाहीर सीतारामतात्या (विक्रम नन्नावरे), सर्जेराव (निलेश सूर्यवंशी), यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. शिवाय किरण रावबच्चे, कविता देसाई, प्रवीण जाधव वगैरेंची अदाकारी लक्षात राहते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
मात्र संहितेबद्दल बारिकसं असमाधान आहे. या नाटकातून असं वाटतं की, १९९०च्या जागतिकीकरणानंतर सर्वत्र अंधार पसयायला लागला. तसं पाहिलं तर, गेली अनेक वर्षं ‘लोककला मृत्यूपंथाला लागल्या आहेत’, अशी चर्चा सुरू आहे. जागतिकीकरण्याच्या आधीसुद्धा परिस्थिती चिंताजनक होती. फक्त जागतिकीकरणाला खलनायक ठरवणं कितपत योग्य आहे?
तरीही हे अतिशय महत्त्वाचं नाटक आहे. आनंदाची बाब म्हणजे एनसीपीएतर्फे या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर वगैरे आणि दिल्ली, बंगलोर, कोलकोता वगैरे ठिकाणीही करण्यात येणार आहेत. एनसीपीएसारखी संस्था अशा नाटकांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली, तर मराठी नाटक जागतिक पातळीवर जायला वेळ लागणार नाही. या नाटकाची निर्मितीमूल्यं उच्च दर्जाची आहेत. याबद्दल राजेश्री शिंदे यांचं खास कौतुक केलं पाहिजे.
हे नाटक पाहताना १६ डिसेंबर १९७२ रोजी मंचित झालेल्या विजय तेंडुलकर लिखित आणि डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाची सारखी आठवण येत होती. दोन्ही नाटकांच्या सादरीकरणातील समान सूत्र म्हणजे लोककलांचा कल्पक वापर आणि जोडीला योग्य संगीत. ‘घाशीराम कोतवाल’चा प्रभाव जसा दीर्घ काळ मनात टिकून होता, तसाच ‘कलगीतुरा’चाही राहील, राहावा.
.................................................................................................................................................................
लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment