अजूनकाही
१. उत्तर प्रदेशात भाजप सरकारने अवैध कत्तलखान्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असताना आणि आपली सत्ता असलेल्या बहुतेक राज्यांमध्ये गोहत्येविरोधात मनुष्यवधाच्या गुन्ह्यापेक्षाही कठोर भूमिका घेतलेली असताना ईशान्य भारतात सत्तेत आल्यास गोहत्याबंदीसारखे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. मेघालय, मिझोरम, नागालँड या राज्यांमध्ये ख्रिस्तीधर्मीयांची संख्या लक्षणीय आहे. उत्तर प्रदेशाप्रमाणेच भाजप ईशान्य भारतातदेखील गोहत्याविरोधी उद्योग सुरू करील, अशी तेथील मतदारांना भीती आहे.
प्रत्येक राज्यात, प्रत्येक कानाकोपऱ्यात तिकडच्या जनतेला काय हवं आहे, याचा कानोसा घेऊन पुडी बांधायची आणि येनकेनप्रकारेण सत्तेत यायचं. एकदा निरंकुश सत्ता आली की, आपले संस्कारी दात बाहेर काढायचे, असा या पक्षाचा फंडा आहे. ते सत्तेत आल्यावर या ना त्या प्रकारे ख्रिस्तीधर्मीयांनाही गोमातेचं महत्त्व पटवून देण्याचे उद्योग सुरू करणार नाहीत, याची काही खात्री नाही. आताही तिकडच्या आदिवासींना आधी ‘वनवासी’ ठरवून नंतर त्यांचं हिंदूकरण करण्याचा उद्योग जोरात सुरू आहेच. तोही अजेंडा तात्पुरताच म्यान होईल.
---------------------------------------------------------------------------------------
२. उत्तर प्रदेशातल्या अवैध कत्तलखान्यांना नियमनासाठी मुदत देण्याची आवश्यकता होती. अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करताना सरकारने घाई केली. सरकारने या कत्तलखान्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना नियमनसाठी वेळ द्यायला हवा होता,’ असे एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.
ओवैसीभाऊ, देशभरात असंख्य बेकायदा उद्योग चालत असतात. त्यातले तातडीने कारवाई करण्याचे उद्योग कोणते आहेत, हे सरकार आपापल्या प्राधान्यक्रमानुसार ठरवतं. जिथे आदित्यनाथांसारखा मुख्यमंत्री बसवला गेला आहे, तिथले प्राधान्यक्रम तुम्ही कसे ठरवू शकाल? ते त्यांच्या मतपेढीला बांधील आहेत, तुम्ही तुमची मेंढरं हाका. त्यांच्या प्रत्येक कृतीतून तुम्हाला आणि तुमच्या प्रत्येक वक्तव्यातून त्यांना फायदा होणार, हे स्पष्टच आहे... तेव्हा आगीत तेल घालणं चालू ठेवा.
---------------------------------------------------------------------------------------
३. ‘मी राष्ट्रवादी आहे. जर एखाद्या राष्ट्रवादी व्यक्तीसमोर कोणी भारताचे तुकडे-तुकडे होतील, अशी भाषा केली, तर त्या व्यक्तीला आपटून आपटून मारले जाईल,’ असे खासदार आर. के. सिंग यांनी म्हटले. ‘मी माझ्या देशावर प्रेम करतो. त्यामुळे माझ्या देशाविरोधातील कोणत्याही घोषणा मी ऐकू शकत नाही,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
हे गृहस्थ एकेकाळी केंद्रीय गृहसचिव होते, यावर विश्वास बसत नाही. देश आपल्या नावावरच कोणीतरी लिहून दिला आहे, अशी अनेक अज्ञजनांची समजूत झालेली आहेच. पण, भारतासारख्या देशाची व्यामिश्रता आणि जटीलता गृहसचिवपदावरच्या माणसाला समजू नये, हे आश्चर्य. पण, सत्ता भल्याभल्यांची बुद्धी भ्रष्ट करते, हेच खरं. या देशाच्या कायद्यात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांसाठीच्या शिक्षेच्या तरतुदी आहेत. देशाच्या सर्वोच्च सदनात गेलेल्यांनी तरी त्याची बूज राखली पाहिजे.
---------------------------------------------------------------------------------------
४. मशीद हे निव्वळ प्रार्थनास्थळ आहे, त्यामुळे ती पाडली जाऊ शकते. मात्र मंदिर पाडले जाऊ शकत नाही. कारण तिथे देवाचे वास्तव्य असते, असे विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केले. नमाज मशिदीविना इतरत्र कुठेही अदा केला जाऊ शकतो. मात्र मंदिराचे तसे नाही. मंदिरात देव प्रवेश करतो आणि तेथील मूर्तीमध्ये त्याचे अस्तित्व असते, अशी आमची श्रद्धा आहे. मंदिरावर फक्त भगवान रामाची मालकी आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. आपल्यासारखा तर्कसंगत मुद्दा अद्याप कोणीही मांडला नसल्याचा दावादेखील स्वामी यांनी केला.
कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
आजवर कोणीही मांडला नव्हता असा तर्कसंगत मुद्दा (अशी आमची श्रद्धा आहे) मांडल्याबद्दल मा. स्वामी यांना एका सुप्रसिद्ध बालगीताच्या या ओळी समर्पित करीत आहोत.
---------------------------------------------------------------------------------------
५. उत्तर प्रदेशात रोडरोमिओंविरोधात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी अँटी रोमिओ पथक सुरू केलं असतानाच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘नशीब, माझे लग्न झाले, नाही तर योगी आदित्यनाथांनी माझे लग्नही होऊ दिले नसते’ असा टोला लगावला आहे. महिलांची छेडखानी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या नावाखाली सुरू केलेल्या या पथकांनी प्रत्यक्षात प्रेमी युगुलांना धाकदपटशा दाखवायला सुरुवात केली आहे. अखिलेश आणि त्यांची पत्नी डिंपल यांनी प्रेमविवाह केला आहे.
अखिलेश भैया, लग्न झाल्यामुळे तुम्ही सुटलात, अशी तुमची गैरसमजूत आहे. हे नव-तालिबानी संस्कृतिरक्षक पती-पत्नी आणि भाऊ-बहिणीलाही सोडत नाहीत, याच्या बातम्या तुम्ही पाहिल्या नाहीत का? लवकरच सगळ्या उत्तर प्रदेशातल्या स्त्रियांना हे भगव्या बुरख्यात लोटतील, अशी शक्यता आहे. आताच वहिनींसाठी दोन-चार डिझायनर बुरखे पसंत करून ठेवा.
---------------------------------------------------------------------------------------
६. भारताला हिंदूराष्ट्र बनवायचं असेल तर मोहन भागवत हेच राष्ट्रपतीपदासाठी उत्तम पर्याय असू शकतात, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
भाजपच्या तंगड्या गळ्यात अडकवण्याची ही चतुर खेळी आहे. शिवसेनेची एकंदर बौद्धिक पातळी लक्षात घेता, हे कलम बारामतीतून संजयहस्ते ‘मातोश्री’त आलेले दिसते. पण, मौज उडवून देणारी सूचना आहे, यात शंका नाही.
---------------------------------------------------------------------------------------
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment