काही अद्वितीय माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्य उजळून टाकतात. डॉ. राम ताकवले यांच्या रूपानं एक अत्यंत प्रसन्न व उमदं व्यक्तिमत्त्व १९८० साली पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आलं आणि २०२३पर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सरांनी माझं भावविश्व पूर्णपणे व्यापून टाकलं. त्यांच्या समवेत घालवलेला प्रत्येक क्षण, त्यांच्याशी झालेल्या गप्पा आणि विचारविनिमय मला सर्वार्थानं अधिकाधिक समृद्ध करून गेला.
१९७८ ते १९८६ या काळात सर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. नेमक्या याच काळात म्हणजे १९८० ते १९८२ या वर्षात मी विद्यापीठात ‘तत्त्वज्ञान’ या विषयात एम.ए. करण्यासाठी प्रवेश घेतला होता. ती दोन वर्षं माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाची ठरली. त्यातील सर्वांत मोलाची बाब ठरली, ती सरांशी झालेला परिचय.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाचा जनरल सेक्रेटरी म्हणून मी व माझ्या सहकाऱ्यांनी अनेक वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं. त्याची सुरुवात आम्ही रक्तदान शिबिरानं केली. बरोबर सकाळी ९ वाजता मा. कुलगुरूंची गाडी शिबिराच्या ठिकाणी आली. सरांनी स्वतः रक्तदान करून उद्घाटन केल्यामुळे आमचा उत्साह दुणावला.
त्यानंतर आम्ही केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात सर आवर्जून उपस्थित रहायचे. आम्ही आयोजित केलेला एक कार्यक्रम खूपच गाजला. ‘शेतकरी संघटने’चे नेते शरद जोशी यांचं चाकणचं कांदा आंदोलन नुकतंच संपलं होतं. तेव्हा ते ‘शेतकरी नेते’ म्हणून उदयाला आलेले नव्हते. आम्ही विद्यापीठात त्यांचं पुण्यातील पहिलंवहिलं जाहीर व्याख्यान आयोजित केलं. या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या व्याख्यानात जोशींनी स्वतःचे अनुभव आणि शेतकरी आंदोलनाचं तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र अत्यंत प्रभावीपणे मांडलं होतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना ताकवले सरांनी शेतकऱ्यांच्या व्यथांवर नेमकं बोट ठेवलं होतं. याच कार्यक्रमात आम्ही काढलेल्या ‘रचना’ या अनियतकालिकाचं प्रकाशनही ताकवले सरांनी केलं. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, त्या वेळचे मुख्यमंत्री बॅ. अंतुले आणि त्यांच्या मंत्रीमंडळाला विद्यापीठात स्नेहभोजनासाठी निमंत्रित केल्याबद्दल, या नियतकालिकात मी सरांवर टीका केली होती. मात्र त्याबाबत त्यांनी साधी नापसंतीही व्यक्त केली नाही.
मला आठवतं, आम्ही पुण्यातील विविध पक्ष व संघटनेच्या युवानेत्यांचा एकत्रित संवाद विद्यापीठात आयोजित केला होता. त्यामध्ये काँग्रेसचे सुरेश सोनावणे, ‘पतित पावन’चे प्रदीप रावत, रिपब्लिकन चळवळीतील जयदेव गायकवाड आणि कम्युनिस्ट पक्षाचे रमण देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केलं. त्या वेळच्या सुदृढ राजकीय वातावरणात या युवानेत्यांनी हसतखेळत व एकमेकांना कोपरखळ्या मारत आपल्या पक्ष वा संघटनांची भूमिका आग्रहानं मांडली होती.
विद्यापीठाचे कुलगुरू असूनही कोणतेही आढेवेढे न घेता या कार्यक्रमास ताकवले सर पूर्णवेळ उपस्थित राहिलेच, पण विशेष म्हणजे या सर्व युवानेत्यांची भाषणं त्यांनी मन लावून ऐकली. नवी पिढी काय व कशा प्रकारे विचार करते, हे जाणून घेण्यात त्यांना नेहमीच औत्सुक्य असायचं.
विद्यार्थ्यांबाबत सर खूपच संवेदनशील असायचे. शिक्षण विद्यार्थीकेंद्री असलं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, याबाबत सर सदैव सतर्क असायचे. या संदर्भातील दोन-तीन ठळक उदाहरणं सांगण्यासारखी आहेत. पुरेसं मनुष्यबळ नसल्यानं तेव्हा विद्यापीठातील बॅ. जयकर ग्रंथालय रात्री आठ वाजता बंद व्हायचं. आम्ही काही सहकाऱ्यांनी ‘ग्रंथालय रात्री अकरापर्यंत सुरू ठेवावं, अन्यथा आम्ही ग्रंथालयातून हलणार नाही’ असं पत्रक काढलं. ते दहा मिनिटांत कुलगुरूंच्या कार्यालयातही पोहोचलं. त्यानंतरच्या दहा मिनिटांत ताकवले सरांनी ग्रंथपालांना फोन करून आजपासून ग्रंथालय रात्री अकरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
पदव्युत्तर जिमखान्याचा जी.एस. झाल्यानंतर मी आणि इतर सदस्यांनी सरांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला अधूनमधून वेळ द्यावा, अशी विनंती केली. त्यावर तत्काळ निर्णय घेत सरांनी प्रत्येक बुधवारी दुपारी ४ ते ५ ही वेळ खास आमच्यासाठी राखून ठेवत असल्याचे जाहीर केलं. एखाद्या बुधवारी सरांना बाहेरगावी जावं लागलं, तर त्यांच्या कार्यालयातून तसा निरोप देण्याचीही व्यवस्था त्यांनी केली होती.
त्यानुसार गीताराम गायकवाड, संजय संगवई, प्रकाश पगारिया, अजेय लिमये, संभाजी जाधव, विजय चव्हाण, चंद्रकांत सरदेशमुख, मंजू रंगाराव, साधना हिरेमठ (जाधव), नीलिमा मोने (क्षीरसागर), अझीज तांबोळी, शांताराम कुलकर्णी, श्रीरंग सुपणेकर, उद्धव कपिल (कांबळे), सिकंदर जमादार, विजय चव्हाण, संजय देवडीकर, विलास खाजेकर, आदी सहकारी मित्रांचं शिष्टमंडळ घेऊन जवळपास वर्षभर दर बुधवारी सरांना नियमितपणे भेटायचो. त्यामुळे एकही आंदोलन न करता विद्यार्थ्यांचं असंख्य प्रश्न सोडवता आले. आणखी एक प्रसंग आठवतोय. १९८२मध्ये आमच्या पदव्युत्तर समितीनं तब्बल पाच दिवसांचं गॅदरिंग आयोजित केलं होतं. पहिले चार दिवस गॅदरिंग चांगल्या प्रकारे पार पडलं, पाचव्या दिवशी रात्री ११ वाजता गॅदरिंग संपलं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की, निरोपाचा काहीतरी घोळ झाल्यामुळे पीएमटी बसेस आलेल्या नव्हत्या. त्यामुळे शहरातील मध्य भागात राहणाऱ्या सुमारे ८० ते १०० विद्यार्थ्यांना विद्यापीठातून घरी जाणं अवघड झालं होतं. आम्ही तडक ताकवले सरांच्या बंगल्यावर गेलो. सरांनीच दार उघडलं. त्यांना अडचण सांगितल्यावर त्यांनी लगेचच विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना फोन केले. परिणामी पुढील दहा मिनिटांत विद्यापीठातील बसेस, जीप्स व गाड्या कार्यक्रमस्थळी हजर झाल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना डेक्कन जिमखाना बसस्टॅंडपर्यंत सोडण्याची व्यवस्था झाली. यातील लक्षणीय बाब अशी की, आम्ही सरांच्या घरी गेलो, तेव्हा ते फाईली वाचत होते, हे आमच्या नजरेतून सुटलं नव्हतं!
१९८२ साली भारतीय महिला हॉकी संघाने नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये, फर्ग्युसन कॉलेजमधील नाझलीन मद्रासवाला (शहा) या विद्यार्थिनीच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक जिंकलं होतं. मात्र त्यामुळे तिला विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेस बसता आलं नव्हतं. मी नाझलीन आणि तिचे पती केतन शहा यांची ताकवले सरांशी भेट घालून दिली. सरांनी नाझलीनची अडचण समजून घेतली आणि तत्काळ तिच्या एकटीकरता परीक्षा घेण्याची सोय केली. त्यामुळे नाझलीनचं वर्ष बुडालं नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
सरांच्या प्रतिसादक्षम कार्यपद्धतीचा आम्हा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे संस्कारही आमच्यावरही काही प्रमाणात झाले. एरवी कोणत्याही स्वरूपात अगदी टुरकी सत्ता मिळाली, तरी ती अनेकांच्या किती डोक्यात जाते, हे आपण सर्वत्र अनुभवतो. पण कुलगुरूपदावरील व्यक्ती किती सौम्य, सभ्य, शालीन आणि जमिनीवर राहून काम करू शकते, याचा ताकवले सर हा लखलखीत वस्तुपाठ होता.
१९८५मध्ये महाराष्ट्र शासनाने सरांची ‘महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कक्षा’चे प्रमुख म्हणून नेमणूक केली. भारतातील आणि जगभरातील मोजक्या ‘मुक्त विद्यापीठां’चा सांगोपांग अभ्यास करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठीतून शिक्षण देणाऱ्या ‘मुक्त विद्यापीठा’चं विधेयक तयार करण्याची जबाबदारी ताकवले सरांवर सोपवण्यात आली होती. या कामात सरांना मदत करण्यासाठी एका साहाय्यकाची गरज होती. सरांनी मला विचारणा केली आणि अर्थातच मी लगेचच होकार दिला. त्यामुळे १९८५–८६ हे माझ्या आयुष्यातलं संस्मरणीय आणि मंतरलेलं वर्ष ठरलं.
मंत्रालयासमोरच्या ‘नव्या प्रशासकीय इमारती’च्या १८व्या मजल्यावर आम्हाला कार्यालय देण्यात आलं होतं. शासकीय यंत्रणेकडून जर काम करून घ्यायचं असेल, तर आपल्याला किती संयम, सहनशीलता आणि चिकाटी हवी, याबाबत मला रोजच धडा मिळत होता. त्याचबरोबर या काळात एकूणच जीवनलक्षी शिक्षण, विद्यार्थीकेंद्री उच्चशिक्षणात विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका, माहिती तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या सोयींचा व नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या विविधांगी आव्हानांचा वेध घेण्याची ताकवले सरांची समग्र दृष्टीही जवळून अनुभवता आली.
त्या वेळी शंकरराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री, तर शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. या दोन्ही मातब्बर नेत्यांची विचार व काम करण्याची दृष्टी व पद्धत किती वेगळी होती, हेदेखील पहायला मिळालं. मुक्त विद्यापीठाचं विधेयक तयार करण्याच्या कामाची एकूण प्रक्रिया व त्यादरम्यान आलेल्या विविध अनुभवांबद्दल स्वतंत्रपणे लिहावं लागेल. मात्र वर्षभर सरांबरोबर सोमवारी सकाळी पुणे–मुंबई, तर शुक्रवारी संध्याकाळी मुंबई–पुणे असा डेक्कन क्वीनने प्रवास घडायचा. या प्रवासात काय किंवा सोमवार ते गुरूवार ऑफिस सुटल्यानंतर सरांच्या ‘न्यू शेल्टर’ या चर्चगेटजवळील शासकीय इमारतीतील सदनिकेत सरांच्या हातचा चहा घेत, अनेकविध विषयांवर तासन्तास मारलेल्या गप्पांच्या आठवणी हा माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या काळात मुक्त विद्यापीठ काही सुरू होऊ शकलं नाही. पवारांचा मात्र ‘मुक्त विद्यापीठ’ सुरू करण्याला भक्कम पाठिंबा होता. परिणामी, अडीच-तीन वर्षांनंतर जेव्हा पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी लगेचच १९८९मध्ये नाशिकमध्ये ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’ची घोषणा केली आणि डॉ. राम ताकवले यांची पहिले कुलगुरू म्हणून नियुक्तीही जाहीर केली.
पवारांनी ताकवले सरांवर दाखवलेला विश्वास सरांनी सार्थ ठरवला आणि आपल्या समाजाचं वास्तव लक्षात घेऊन भरभक्कम पायावर उभारणी केली. या मुक्त विद्यापीठाचा पुणे विभागाचा संचालक म्हणून सरांच्या हाताखाली काम करण्याची मला काही काळ संधी लाभली. परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आलं नाही, अशा महाराष्ट्रातील लाखो अल्पशिक्षित विद्यार्थ्यांना ‘मुक्त विद्यापीठा’च्या माध्यमातून उच्चशिक्षण घेणं सुकर झाले आणि नोकरीमध्ये या मंडळींना बढती मिळणं शक्य झालं.
कला व वाणिज्य क्षेत्राबरोबरच, संगणकशास्त्र, शेती व्यवसाय, अभियांत्रिकी, अध्यापनशास्त्र, आदी अनेक क्षेत्रांत ‘मुक्त विद्यापीठा’मुळे अगणित विद्यार्थी, प्रोफेशनल्स, समाजसेवक, शिक्षक, शेतकरी, उद्योजकांना पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकली. पुढे १९९५मध्ये सरांची ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’चे कुलगुरू म्हणून निवड झाली. त्यामुळे सरांना आंतरराष्ष्ट्रीय शिक्षणक्षेत्र जवळून समजून घेणं शक्य होऊ शकलं.
माननीय मोहन धारिया यांनी १९८५–८६ साली स्थापन केलेल्या ‘वनराई’ संस्थेचा संस्थापक सचिव म्हणून काम करत असताना ताकवले सर आणि त्यांचे धाकटे बंधू डॉ. एम. जी. ताकवले मला हरगुडे (ता. पुरंदर, जि. पुणे) या त्यांच्या जन्मगावी ग्रामीण विकासाच्या संदर्भातील एका बैठकीस घेऊन गेले आणि ‘वनराई’च्या कामाबद्दल उपस्थितांना माहिती देण्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या गावातील घरटी किमान एक जण शिक्षक आहे. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिक्षक व गावकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी लाभली. ग्रामीण विकासाच्या कार्यात मोठी आस्था असलेल्या ताकवले सरांना आपण ‘वनराई’चे विश्वस्त म्हणून सहभागी करून घ्यावं, असं मी जेव्हा धारियाअण्णांना सुचवलं, तेव्हा त्यांनीही लगेचच ते मान्य केलं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
सरांशी बोलताना ग्रामीण भागाशी कायम राहिलेली त्यांची नाळ सतत डोकवत राहायची. महात्मा गांधींच्या ‘नई तलीम’ या श्रमावर आधारित जीवनलक्षी शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा गाभा कायम ठेवत आणि महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांची सांगड घालत, आजच्या शिक्षणपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल, याबद्दल ते सतत वाचन व चिंतन करायचे. समताधिष्ठित लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्थेविषयी सर विविध व्यासपीठांवरून मांडणी करायचे. शिक्षणक्षेत्रातील विषमता कमी करण्याची, तसंच शैक्षणिक व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवण्याची नव्या माहिती तंत्रज्ञानामध्ये विपुल क्षमता आहे, अशी त्यांची भक्कम धारणा होती.
‘आयटी’ क्षेत्र उद्याच्या पिढीचा ‘कानमंत्र’ ठरणार आहे, हे ज्या मोजक्या शिक्षणतज्ज्ञांनी ओळखलं होतं, त्यामध्ये ताकवले सरांची अग्रक्रमानं गणना होणं स्वाभाविकच होतं. म्हणूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलेले ताकवले सर हे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्त्व आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. नंतरच्या काळात त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
अधिकृत पदांवरून निवृत्ती घेतल्यानंतर २००१मध्ये स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’चे (एमकेसीएल) संस्थापक संचालक म्हणून ताकवले सरांसारख्या शिक्षणाची समग्र दृष्टी असणाऱ्या कर्तृत्ववान तज्ज्ञाला जोडून घेण्याची दूरदृष्टी त्या वेळचे उच्चशिक्षण व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री दिलीप वळसे पाटील आणि ‘एमकेसीएल’चे तेव्हाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत दाखवून, सरांच्या कार्याचा मोठाच गौरव केला होता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
विशेषतः आयुष्यात शीतल छाया म्हणून सदैव साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रभावती ताकवले यांच्या निधनामुळे, सरांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली, त्या सर्व काळात सरांनी आधुनिक शिक्षणव्यवस्थेमध्ये परिवर्तन आणण्याच्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं.
सरांच्या संपन्न अशा जीवनप्रवासातील १९८५ ते २०२३ या काळात विद्यार्थी व सहकारी म्हणून प्रवास करता येणे, वेगवेगळ्या व्यासपीठांवरून त्यांच्याशी सतत संपर्कात राहण्याची संधी मिळणं आणि वेळोवेळी त्यांचं प्रेम व मार्गदर्शन मिळणं, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम योग होता. ताकवले सर आमच्या ‘सृष्टी’ सांस्कृतिक व सामाजिक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष म्हणूनही पहिली पाच वर्षं जोडले गेले होते.
सरांनी जेव्हा औंधमध्ये स्वतःच्या ‘नवेली’ या टुमदार बंगल्याचं बांधकाम सुरू केले, तेव्हा ते ‘कल्पक’ या माझ्या भावाच्या रंगाच्या दुकानात आले आणि विविध रंगांची निवड करून आवश्यक तो माल विकत घेतला. इतकी वेगवेगळी उच्च पदं भूषवणाऱ्या व्यक्तीनं अक्षरशः घाम गाळून, पै पै चा हिशोब करून स्वतःचं घर उभं केलं, ही नक्कीच खूप प्रेरणादायी बाब होती.
‘राष्ट्र सेवा दला’चे संस्कार झालेल्या ताकवले सरांना एस. एम. जोशीअण्णा, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, सदानंद वर्दे, निळू फुले आदी प्रभुतींचा सहवास लाभला होता. यातील प्रत्येकाशी त्यांचा वैयक्तिक स्नेह होता. त्यामुळे विधायक कार्य करणाऱ्या कोणत्याही युवक-युवतींबद्दल सरांना प्रचंड कौतुक व प्रेम असायचं. समाजसेवी युवकांबद्दल सर नेहमीच भरभरून बोलायचे. समोरील व्यक्ती कितीही अनोळखी असो, कोणत्याही स्तरातील असो, सर प्रत्येकाचं हसतमुखानं स्वागत करायचे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
सर इतके मोठे पण समोरच्याचं विचार लक्षपूर्वक ऐकायचे, त्यांच्यातील चांगल्या गुणांवर अधिक लक्ष केंद्रित करायचे, मोठ्या आस्थेने त्याची परिस्थिती समजावून घेऊन सर्वोतपरी सहकार्य व मार्गदर्शन करण्याचा त्यांचा अंगभूत स्वभाव होता. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या ताकवले सरांना थोडा वेळ भेटलं, तरी कुठलीही व्यक्ती प्रेरित व प्रोत्साहित होऊन जायची. वयाच्या नव्वदाव्या वर्षीसुद्धा भेटणाऱ्यांशी सर नेहमीच्याच उत्साह, उमेद आणि आशेनं नवनवीन शैक्षणिक प्रयोगांबद्दल माहिती द्यायचे.
शेवटचे काही आठवडे सरांना जणू मृत्यूची चाहूल लागली असावी. क्वचित आजारी पडलेल्या सरांनी शेवटच्या दिवसांतही मनाची शांतता टिकवून ठेवली होती. कार्यकर्तृत्वाचा आणि कृतार्थ जीवनाचा भला मोठा पट आपल्यासमोर मांडून ताकवले सर अतिशय समाधानानं व प्रसन्न चित्तानं मृत्यूला सामोरे गेले.
विद्यापीठीय शिक्षणव्यवस्थेतील ‘दि लास्ट रोमन’ असं डॉ. राम ताकवले सरांचं वर्णन केल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
.................................................................................................................................................................
prashant.kothadiya@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment