अजूनकाही
नवी दिल्ली हे देशातल्या सर्व राजकीय चर्चा आणि गावगप्पांचं (Gossip) प्रमुख केंद्र आहे. अनेक चर्चा लगेच खऱ्या ठरतात असं नाही, तर अनेक चर्चा पुढे गावगप्पांत रूपांतरित होतात. दिल्लीतल्या काही चर्चा आणि गावगप्पा कधी कधी सत्यातही उतरल्याची अनेक उदाहरणं आहेत. हे आठवायचं कारण म्हणजे महाराष्ट्रातले एक संसद-सदस्य नुकतेच भेटले. दिल्लीतल्या एका चर्चेबाबत ते म्हणाले, ‘भाजप आणि राष्ट्रवादी ही युती नजीकच्या भविष्यात अगदीच काही अशक्य नाही, पण त्यात देवेंद्र फडणवीस एक प्रमुख अडसर आहेत. (महा)राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीस नको असल्यानं कदाचित भविष्यातल्या राष्ट्रवादी-भाजप युतीचे नेते म्हणून नितीन गडकरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येऊ शकतात.’
या चर्चेकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. कारण कर्नाटकातल्या विजयामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे यांची शिवसेना या महाविकास आघाडीत एकीकडे सध्या फारच उत्साह आहे; तर दुसरीकडे, लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपांवरून जोरदार खडाखडी सुरू आहे. नितीन गडकरी खरंच महाराष्ट्रात आले, तर महाविकास आघाडीत पसरलेलं चैतन्य आणि या आघाडीच्या एकीच्या वज्रमुठीची चर्चा ‘बाजारात तुरी…’ ठरू शकते. (ही म्हण अर्धीच वापरली आहे. कारण पूर्ण उदधृत केली, तर जातीयवादाची राळ उडवली जाईल.)
या महाविकास आघाडीत तशीही एकजूट कधीच नव्हती. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसला तसंही वळचणीलाच टांगून ठेवलेलं होतं... आणि आहेही. एक लक्षात घेतलं पाहिजे, या आघाडीची मोट बांधण्याचं सर्व श्रेय शरद पवार यांना दिलं जातं. ते दीर्घदृष्टीचे नेते, कुशल प्रशासक आणि सर्व क्षेत्रात वैपुल्यानं संचार असलेले नेते असले, तरी राजकारणी म्हणून भरवशाचे नाहीत. भाजपशी या आधी अनेकदा त्यांनी कशी हातमिळवणी केली आहे, त्यांच्या हालचाली भाजपला कसकशा अनुकूल राहिल्या आहेत, याची असंख्य उदाहरणं गेल्या तीन-साडेतीन दशकांत महाराष्ट्रानं अनुभवलेली आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आघाडीत असतानादेखील शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खूप सारं शरसंधान केलेलं आहे. ठाकरे मुख्यमंत्री म्हणून मुळात किमान क्षमतेचेही नव्हते, हेच पवार यांनी या पुस्तकात सुचित केलेलं आहे. एवढंच नाही, तर राजकीयदृष्ट्याही ठाकरे पुरेसे ‘मॅच्युअर्ड’ नव्हते, हेही त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे.
दुसरीकडे शिवसेनेतून एकनाथ शिंदे फुटल्यानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेवरून जो काही पेच निर्माण झाला, त्याला नाना पटोले जबाबदार असल्याचा ठपका राष्ट्रवादीचे नंबर दोनचे नेते अजित पवार यांनी ठेवला आहे.
पवार यांच्या पुस्तकात व्यक्त करण्यात आलेल्या मतांचा उद्धव ठाकरे यांनी अजून तरी इन्कार केलेला नाही. संजय राऊत यांनी दुबळासा इन्कार केलेला आहे. पण पवार यांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील शेरेबाजीमुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे, हे नक्की. नाना पटोले यांनी मात्र अजित पवारांना थेट शिंगावर घेतलंय, हे खरं आहे. पण या सर्व वादावादीतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: पवार एकाच वेळेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत, हेच दिसतं.
नितीन गडकरी यांच्या संदर्भातली चर्चा खरी का खोटी, हे कळायला मार्ग नाही. पण काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पकडलेल्या कोंडीतून राष्ट्रवादीनं बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे, याचे संकेत देणारी ही चर्चा आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे आणि भाजपच्या झालेल्या सणसणीत पराभवामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला नवसंजीवनी प्राप्त झाल्याच्या चर्चा खऱ्या ठरणं, हे केवळ शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याच हाती आहे. पण आता तर पवार यांच्या तोडीचा नेता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाही आणि उद्धव ठाकरे हे सक्षम नेते नाहीत, हे पवार यांनीच जाहीर केलं आहे. त्यामुळे पवार यांच्या मागे फरपटत जायचं नसेल, तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे राष्ट्रवादीची साथ सोडणं.
राजधानीतील नितीन गडकरी यांच्याबाबतची चर्चा जर किंचितदेखील खरी असेल, तर शरद पवार आणि अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यातून भविष्यात महाराष्ट्रात कोणते राजकीय दिवे उजळणार आहेत, हे स्पष्ट होतं.
महायुतीत परस्परांविषयी असलेल्या संशयाला आणखी एक पैलू आहे, आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची सेना व नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस यांच्यातही सारं काही सुरळीत नाही. त्याच्या तपशीलात जाण्यात अर्थ नाही, पण काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या सेनेबद्दल खात्री वाटत नाही, याचा अनुभव नुकताच आला.
राज्यातले काँग्रेसचे एक बडे नेते खाजगीत सुरू असलेल्या चर्चेत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या गटाची यानंतरही अशीच कोंडी होत राहिली, तर भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आमचा काही या सेनेवर भरवसा नाही.’ शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे, हाही महाविकास आघाडीच्या तथाकथित वज्रमुठीला तडा देणारा आणखी एक मुद्दा असेल.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या सर्व पार्श्वभूमीवर ‘बाजारात तुरी…’ ठरणाऱ्या महाविकास आघाडीतील लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या खडाखडीकडे बघायला हवं. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती केलेल्या शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाले. त्यापैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तरी त्या १८ जागा शिवसेनेला मिळायला हव्यात, असा संजय राऊत यांचा आग्रह आहे. तो अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुळीच मान्य नाही. म्हणजे जागा वाटपाची चर्चा ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात...’ अशी झालेली आहे.
शिवाय २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात काय घडलं, याचा विसर पडू देता कामा नये. कर्नाटक विधानसभ निवडणुकीत सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष ठरूनही भाजप नव्हे, तर काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या युतीचं सरकार आलं होतं. त्या सरकारच्या शपथविधीला देशभरातल्या भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती. त्या व्यासपीठावरून विरोधी पक्षांच्या भाजपविरोधी ऐक्याची ग्वाही देण्यात आलेली होती. गेल्या पाच वर्षांत ती ग्वाही कशी विरत गेली, हे जनतेला बघायला मिळालेलं आहे. तसंच याही वेळी घडणारच नाही, याची खात्री कोण देणार?
कर्नाटकातील विजयाचा भावनिक आधार महाविकास आघाडीला नक्कीच मिळू शकतो, तरी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे, याचं भान सुटू देता कामा नये. कर्नाटकात लिंगायत जसे एकगठ्ठा काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले, तसं महाराष्ट्रातील मराठा मतदारांच्या संदर्भात घडण्याची शक्यता येत्या कोणत्याही निवडणुकीत मुळीच नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
महाराष्ट्रातील मराठा मतदार काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे आणि भाजप अशा पाच पक्षांत विभागलेला आहे. प्रकाश आंबेडकरांकडे बहुजन आणि वंचितांचा मोठा मतदार आहे. तोही काही महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे भागांत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचा चांगला बोलबाला आहे. मराठवाडा आणि मुंबईत एमआयएमनं पुरेसे पाय रोवले आहेत.
त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ (बीआरएस)नं जोरदार जुळवणी सुरू केलेली आहे. या पक्षात जाणारे सध्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच माजी का असेना पदाधिकारी, आमदार आहेत. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष निवडणुकीत यश मिळवेल किंवा नाही हा मुद्दा नाही, पण हा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाणार हे नक्की.
अशा परिस्थितीत महाराष्ट्रातही कर्नाटकप्रमाणे भाजपच्या विरोधात मतदारांचा निर्णायक कौल मिळेल असे दावे म्हणा की, आतापासून सुरू झालेलं स्वप्नरंजन ‘बाजारात तुरी…’ याच सदरात मोडणारं आहे.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment