अजूनकाही
सायंकाळी पाय मोकळे करायला बाहेर पडावं तर लपंडाव खेळावा लागतो. ‘वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटला तरी खातो’ अशी अवस्था. समारे पाहिलं, तर जाहिरातीचा मोठा फलक अंगावर येतोय, असं वाटलं. एक जण शिडीवर चढून त्याला आच्छादणाऱ्या झाडाच्या फांद्या सराईतपणे छाटत होता. खाली उभा असलेला माणूस वरच्याला सूचना देत होता. फलकावर मोठ्या ठळक अक्षरांत लिहिलेलं होतं - ‘झाडे वाचवा, झाडे जगवा, प्रदूषणाला पळवून लावा!’
मी उभा राहून फलक पाहत होतो. हमरस्त्यावर बऱ्यापैकी फूटपाथ होता. पहाटेपासून रात्रसंपेपर्यंत रस्त्यावरील वाहनं स्पर्धेत भाग घेतल्याप्रमाणे पळत होती.
चालता चालता एक आठवण मनात तरंगू लागली. माझं माध्यमिक शिक्षण सावंतवाडीच्या ‘कळसूलकर इंग्लिश स्कूल’मध्ये झालं. पाचवी-सहावीत असेन. शाळेला वनखात्याकडून ‘वनमहोत्सव साजरा करावा’ असं पत्रक आलं होतं. तो साजरा करायचं ठरलं. वनखात्यानं रोपटी पुरवली होती, शाळेनं त्यांची काळजी घ्यायची होती. रांगणेकर सरांनी रोपटी लावण्यासाठी शाळेच्या मागच्या बाजूला असलेली जागा निवडली. खड्डा कसा खणायचा, कोणत्या मातीनं भरायचा आणि कोवळ्या मुळांची काळजी घेत, ते रोपट लावायचं कसं, हे प्रत्यक्ष दाखवत आम्हाला समजावून सांगितलं. ज्यांची रोपटी वाढतील, जगतील त्यांना वार्षिक समारंभाच्या वेळी बक्षिसं दिली जातील, असंही जाहीर केलं. त्याप्रमाणे ‘वनमहोत्सव’ साजरा झाला.
नंतर महाविद्यालयात शिकत असताना एकदा वाडीला जायचा योग आला. रांगणेकर सरांबरोबर रोपटी लावलेल्या जागी गेलो. मला वाटलं होतं, रोपं तरारून वाढली असतील, एव्हाना त्यांची छोटी झाडं झाली असतील, ती वाऱ्यावर डोलत असतील. पण आमचं दुर्दैव असं की, आम्ही मुलांनी त्या वेळी लावलेल्या रोपट्यांपैकी केवळ सहा-सातच बाळसेदार झाली होती. सर म्हणाले, ‘रमेश, रोपटी वाढवणं हे लहान मुलाला मोठं करण्यासारखंच असतं.’ आम्ही परस्परांकडे पाहून हसलो. रांगणेकर सर शिकवत असताना निसर्ग, मूल यांची उदाहरणं देत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अनेक वर्षं मी चित्रांची प्रदर्शनं पाहायला अधूनमधून जहांगीर आर्ट गॅलरीत जायचो. गॅलरीजवळ एका चबुतऱ्याजवळ जॉर्ज एडवर्डचा काळ्या घोड्यावर मांड ठोकून बसलेला पुतळा होता. १८७५ साली इंग्लंडचा - आणि तेव्हाच्या भारताचाही - राजा किंग एडवर्ड सातवा (प्रिन्स ऑफ वेल्स) याने मुंबईस भेट दिली, तेव्हा त्याच्या स्मरणार्थ त्याचा हा भव्य १२ फूट ९ इंच अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला होता. हा काळा टणक उठावदार घोडा नजरेत भरायचा. सार्वजनिक शिल्पकलेचा हा पुतळा एक नमुना होता.
त्या पुतळ्यापासून जवळच उघडलेल्या छत्रीसारख्या फांद्या असलेलं एक उंच झाड होतं. त्याच्या खाली उन्हाळ्यात सावल्यांबरोबर प्रकाशाचे ठिपके चांदण्यांसारखे पसरलेले असायचे. त्यांच्याकडे पाहताना वाटायचं - जणू काही इथं एखादी परी नुकतंच चांदणं शिंपून गेली असावी.
पुढे ब्रिटिशांच्या राजवटीतील पुतळे हे गुलामगिरीची प्रतीकं आहेत, म्हणून ‘पुतळे हटाव’ची मोहीम गाजू लागली होती. एका रात्री काळा घोडा ‘छू मंतर’ झाला.
त्याच्याजवळचं बऱ्याच फांद्या असलेलं झाड वठू लागलं होतं. त्याचं एकेक पान गळू लागलं. थोड्याच दिवसांत ते ‘एक्स-रे’सारखं दिसू लागलं. हळूहळू त्याचं अस्तित्वच गायब झालं.
एक दिवस चित्रकार आरा यांच्या चित्रांचं प्रदर्शन पाहण्यासाठी जहांगीरला गेलो. समोर पाहतो तर काय… क्षणभर चमकलोच. समोरचं ते चमचमत होतं. हरवलेल्या झाडाला काजव्यासारखा मोहर आला होता. त्याच्या फांद्यांवर लहान-मोठ्या आकारातील जाहिराती फळासारख्या लोंबकळत होत्या. हे एक मांडणी शिल्प (installation)च म्हणायला हवं. प्रदर्शन पाहून मित्रांशी गप्पा मारायला बाहेर पडलो. अंधाराचं धुकं चोहोबाजूला पसरलं होतं. जाहिरातींच्या डोळ्यांची चाललेली उघडझाप माझ्या श्वासोश्वासाच्या मंद लयीत स्वप्नाचा झोका घेत होती.
कसली तरी सुट्टी होती. दुसऱ्या दिवशी कामावर जायची घाई नव्हती. मित्राला म्हटलं, ‘बऱ्याच दिवसांत चौपाटीवर जाऊन भेळ खाल्ली नाही. जायचं?’ त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. आम्ही झपझप चालत चौपाटीवर आलो.
समोर एक अदभुत दृश्य दिसत होतं. एका मोठ्या झगमगत्या प्रकाशाच्या पेटीत झळकणारं दृश्य. समाधी लागल्यासारखे काठावरचे चिनारचे वृक्ष आणि खळखळणाऱ्या पाण्यात वल्ही मारत होड्या पळवणारे नाविक. रंगीबेरंगी पोशाखातील पर्यटक.
कुठल्या तरी पर्यटन कंपनीची ही जाहिरात होडीत भक्कमपणे उभी केलेली होती. तिची पाण्यातील तरंगती प्रतिबिंबं आम्हाला इंद्राच्या नगरीत घेऊन जात होती...
.................................................................................................................................................................
लेखक रमेशचंद्र पाटकर कलासमीक्षक आहेत.
annapatkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment