मर्यादा मान्य करूनही प्रा. अ. का. प्रियोळकर ‘थोर वाङ्मय संशोधक’ ठरतात, ते त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे…
ग्रंथनामा - झलक
नीतीन रिंढे
  • ‘प्रा. अ. का. प्रियोळकर लेखसंग्रह खंड १ व २’
  • Fri , 19 May 2023
  • ग्रंथनामा झलक अ. का. प्रियोळकर A.K.Priyolkar प्रा. अ. का. प्रियोळकर लेखसंग्रह खंड १ व २ A.K.Priyolkar Lekhsangrah Vol 1 and 2 नीतीन रिंढे Neeteen Rindhe

‘मध्ययुगीन मराठी साहित्याचे संशोधक’ आणि ‘साहित्य संशोधनातला दीपस्तंभ’ म्हणून प्रा. अ. का. प्रियोळकर यांना ओळखले जाते. त्यांच्या निवडक लेखांचा समावेश असलेला ‘प्रा. अ. का. प्रियोळकर लेखसंग्रह खंड १ व २’ हे प्रा. नीतीन रिंढे यांनी संपादित केलेला ग्रंथ नुकताच एशियाटिक सोसायटी, मुंबईतर्फे प्रकाशित झाला आहे. त्याला रिंढे यांनी दीर्घ आणि सविस्तर अशी प्रस्तावना लिहून प्रियोळकरांच्या एकंदर लेखन-संशोधन कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. तिचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

प्रा. अ. का. प्रियोळकर (१८९५-१९७३) यांची ओळख प्रामुख्याने ‘मध्ययुगीन मराठी साहित्याचे संशोधक’ अशी आहे. मराठी पंडिती परंपरेतले मुक्तेश्वरासारखे कवी आणि गोव्यातल्या जेजुइट परंपरेतले मिशनरी मराठी कवी यांच्या साहित्याचे संशोधन-संपादन हे प्रियोळकरांचे मराठी साहित्याला भरीव योगदान आहे. पण प्रियोळकरांच्या अभ्यासाचे क्षेत्र केवळ मध्ययुगीन मराठी साहित्यापुरते मर्यादित नव्हते. ऐतिहासिक दृष्टीने त्यांनी जसा मध्ययुगीन ग्रंथांच्या संहितांचा शोध घेतला, त्यांच्या मूळ पाठाची चिकित्सक दृष्टीने निश्चिती केली, त्याचप्रमाणे आधुनिक काळातल्या छापील ग्रंथांच्या संहितांचेही पाठसंशोधन त्यांनी केले (‘नवनीत’, ‘लोकहितवादीकृत निबंधसंग्रह’, ‘दादोबा पांडुरंग यांचे आत्मचरित्र’); भारतीय मुद्रणाच्या उदयाचा इतिहास लिहिला (‘The Printing Press in India’ आणि मराठीतले या विषयावरचे अनेक लेख); हे मुद्रणयुग ज्या आधुनिकीकरणाच्या सामाजिक प्रक्रियेचा भाग होते, त्या प्रबोधनाच्या दिशेने झालेल्या समाजपरिवर्तनाच्या चळवळींचा धांडोळाही त्यांनी तत्कालीन समाजपुरुषांची चरित्रे लिहून घेतला. भाऊ दाजी लाड, दादोबा पांडुरंग यांची स्वतंत्र चरित्रे लिहिली; तर माधव चंद्रोबा डुकले, लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर, रा. भि. गुंजीकर इतर अनेकांविषयी त्यांनी चरित्र-लेख लिहिले.

प्रियोळकरांच्या लेखनाचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी ग्रंथ-इतिहास, ग्रंथ-संस्कृती याविषयी केलेले लेखन. मध्ययुगातली आणि मुद्रणयुगाच्या आरंभीच्या काळातही पुस्तके जमवताना, त्यांचे संगोपन करताना त्यांना महाराष्ट्रीय समाजात ग्रंथांविषयी असलेली अनास्था, ग्रंथसंग्रह आणि संगोपन यांविषयीचे अज्ञान आणि उदासीनता जाणवली, खटकली. म्हणून सातत्याने ते त्याविषयी लिहीत राहिले. ग्रंथांचे, नियतकालिकांचे इतिहास लिहिले; हस्तलिखितांचे संगोपन आणि संपादन, ग्रंथसूची, दुर्मीळ ग्रंथांची वर्गवारी इत्यादी कसे करावे याविषयी लिहिले; दोलामुद्रिते, शंकास्पद वाङ्मय अशा नव्या कल्पना मांडून त्या मराठी संशोधनात रुजवण्याचा प्रयत्न केला. मराठीत ग्रंथ-इतिहास लेखनाचा पाया प्रियोळकरांनीच घातला.

प्रियोळकरांच्या संशोधनपर लेखनाचा पैस किती व्यापक होता, यावरून लक्षात येईल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रियोळकर जन्माने गोव्याचे, पण त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र. बहुभाषिक गोव्याने त्यांना इंग्रजी, कोकणी, पोर्तुगीज, या भाषांचे ज्ञान दिले आणि पुढील काळात मध्ययुगातल्या जेजुईट मराठी साहित्याचा खजिना त्यांच्यापुढे खुला केला. तर महाराष्ट्रातल्या अ. बा. गजेंद्रगडकर, पां. दा. गुणे, दत्तो वामन पोतदार, रा. गो. भांडारकर यांसारख्या विद्वानांकडून प्रियोळकरांना भाषा व वाङ्मय संशोधनाची प्रेरणा मिळाली, चिकित्सक इतिहासकाराची डोळस दृष्टी प्राप्त झाली. आधी धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमध्ये आणि नंतर सांगली येथील विलिंग्डन कॉलेजमध्ये प्रियोळकर शिकत असताना रावसाहेब मोरमकर यांनी त्या काळातल्या प्रतिष्ठित अशा ‘विविधज्ञानविस्तार’ मासिकात प्रियोळकरांना लिहिते केले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर १९२३मध्ये प्रियोळकर कायमचे मुंबईला राहायला आले आणि ते महाराष्ट्राचे व मराठीचे झाले.

मुंबईमध्ये सुरुवातीला ‘विविधज्ञानविस्तार’ आणि ‘विविधवृत्त’ या नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी निभावताना त्यांनी भरपूर लेखन केले. त्यात पुस्तक परीक्षणे, भाषा व व्याकरणाविषयीचे निबंध, व्यक्तीचरित्रपर लेख यासोबत कादंबरीसारखे ललितलेखनही होते. परंतु लवकरच ऐतिहासिक दृष्टीने मध्ययुगीन काळातल्या ग्रंथसंहितांचे संशोधन तसेच आधुनिक काळातले ग्रंथ, ग्रंथकार, नियतकालिके यांच्याविषयी संशोधन करण्याचे एक नवे पद्धतीशास्त्र त्यांनी विकसित केले.

पुढे त्यांच्या इतिहासदृष्टीचा पैस विस्तारत गेला. एकोणिसाव्या शतकातल्या ग्रंथ व ग्रंथकार यांविषयी लिहिता लिहिता तत्कालीन समाजपरिवर्तनाचा, सामाजिक चळवळींचा मागोवा घेणारे लेखनही त्यांनी केले. प्रियोळकरांच्या लेखनाचा हा विस्तीर्ण पैस ध्यानात घेऊन त्यांच्या मराठी साहित्य संशोधनातील योगदानाचा परामर्श पुढे घेतला आहे.

मराठीत पाठचिकित्साशास्त्राचे प्रवर्तन

प्रा. प्रियोळकरांच्या मध्ययुगीन मराठी काव्याच्या संशोधनाची सुरुवात १९३५मध्ये प्रसिद्ध झालेल्या दमयंती-स्वयंवराच्या संपादित आवृत्तीने झाली. महाराष्ट्रात मुद्रणतंत्राचे आगमन झाल्यावर, विशेषतः १८४० नंतर मध्ययुगातील मराठी संत व पंडित कवींची हस्तलिखिते मिळवून छापण्याची मोठी लाट आली. पण बहुतेकदा असे जुने हस्तलिखित काव्यग्रंथ मिळतील तसे छापले जात. त्यावर संपादकीय संस्कार गंभीरपणे व शिस्तशीरपणे करण्याविषयीची जाण तेव्हाच्या संपादक-प्रकाशकांमध्ये नव्हती. काळाच्या ओघात हस्तलिखितांच्या नकला करताना झालेले बदल, घुसवलेले प्रक्षिप्त भाग, चुका इत्यादींचा शोध घेतला जात नसे. मूळ संहिता शोधणे हा उद्देश नसे. इंग्रजीत मात्र ‘भारतविद्या’ बहरली होती. अनेक युरोपीय अभ्यासक प्राचीन भारतीय हस्तलिखितांचे जुने पाठ मिळवून त्यांची चिकित्सक संशोधित आवृत्ती छापण्यात गुंतले होते. मराठीतही अशा चिकित्सक दृष्टीने पाठसंशोधन करून जुने ग्रंथ छापले पाहिजेत असे प्रियोळकरांना वाटे. विलिंग्डन महाविद्यालयातले प्रियोळकरांचे गुरू, भाषातज्ज्ञ पां. दा. गुणे यांच्याकडून प्रियोळकरांना पाठसंशोधनाची ही दृष्टी मिळाली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पुरेशा साधनांचा अभाव असतानाही मध्ययुगीन मराठी कवींच्या चरित्राचे संशोधन कसे केले जाऊ शकते, याचा वस्तुपाठ प्रियोळकरांनी ‘रघुनाथ पंडित : चरित्र व काव्यविवेचन’ या चरित्रपर निबंधातून घालून दिला. तर ‘साधनचिकित्सा व पाठचिकित्सा’ या निबंधातून मुद्रणपूर्व काळातील संहितेचे संपादन करताना येणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्यात, पाठ निश्चित करताना निकष कोणते वापरावे याचे सिद्धान्तन त्यांनी केले.  

पाठचिकित्सेचा आदर्श नमुना म्हणून महत्त्व पावलेले प्रा. प्रियोळकरांचे आणखी एक संशोधन म्हणजे मुक्तेश्वरकृत महाभारताचे ‘आदिपर्व’. १९२२ मध्ये पां. दा. गुण्यांसोबत या काव्याचे संपादन करण्याची प्रियोळकरांची इच्छा अपुरी राहिली. पुढे मराठी संशोधन मंडळाचा संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर, १९५० मध्ये त्यांनी हे काम हाती घेतले.

या कामासाठी प्रियोळकरांनी मुक्तेश्वरी महाभारताच्या २९ प्रती गोवा, तंजावर, नागपूर, सोलापूर, धुळे, औंध, नांदेड, परभणी, उज्जैन, कोल्हापूर इत्यादी ठिकाणांहून मिळवल्या. त्यांपैकी निर्णयसागर प्रेसची १८९३सालची ‘काव्यसंग्रहप्रत’ ही सर्वसंमत संहिता (Vulgate) मूळ धरून इतर हस्तलिखितांतील पाठांशी तुलना करत अंतिम पाठनिश्चिती केली. १९५१ पासून १९५९पर्यंत आदिपर्वाचे चार खंड (एकूण पृष्ठे १०७२) संपादित करून प्रसिद्ध केले. या ग्रंथाच्या पहिल्या खंडात प्रियोळकरांनी ‘मुक्तेश्वराचा शोध’ हा चरित्र-निबंध लिहिला.

एकीकडे दमयंती-स्वयंवर, मुक्तेश्वरी महाभारत अशा जुन्या हस्तलिखित ग्रंथांची पाठनिश्चिती करत असताना, मुद्रणयुगातल्या छापील पुस्तकांच्या पाठांचेही संशोधन करण्याची आवश्यकता असते, हे प्रियोळकरांनी दाखवून दिले. या दृष्टीने एकोणिसाव्या शतकात छापलेला लोकहितवादीकृत ‘निबंध संग्रह’ (१९६७) आणि परशुराम तात्या गोडबोले यांचा ‘नवनीत’ (१९५७) या पुस्तकांची प्रियोळकरांनी केलेली संपादने संशोधनाच्या नव्या वाटा दाखवणारी आहेत.

ब्रिटीश वसाहतकाळात महाराष्ट्रातील शिक्षित कुटुंबांत सर्वाधिक वाचले गेलेले कवितेचे पुस्तक म्हणजे ‘नवनीत’. मध्ययुगीन कवींच्या मराठी कवितांचा हा संग्रह परशुराम बल्लाळ गोडबोले यांनी १८५४मध्ये सर्वप्रथम प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या सहा-सात दशकांत ‘नवनीत’ अतिशय लोकप्रिय राहिले. अनेक वर्षे त्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होता. त्यामुळे १९२३पर्यंत या पुस्तकाच्या एकंदर सतरा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. या काळातील महाराष्ट्रीय शिक्षितांना पारंपरिक मराठी काव्याची गोडी लावण्याचे कार्य ‘नवनीत’ने केले असे म्हटले जाते. अशा काव्यग्रंथाची १९५४मध्ये होणाऱ्या शतकपूर्तीनिमित्त विशेष दखल घेतली जावी, अशी कल्पना प्रियोळकरांनी मांडली. या निमित्ताने नवनीताची नवी संशोधित आवृत्ती प्रसिद्ध व्हावी, यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने होकार देऊन हे काम प्रियोळकरांवरच सोपवले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

याशिवाय प्रियोळकरांनी मध्ययुगामधल्या महाराष्ट्रीय व जेजुईट कवींच्या काव्यांची संपादने केली.  जेजुईट कवींच्या ग्रंथांसाठी त्यांनी लंडन, लिस्बन इत्यादी ठिकाणच्या ग्रंथालयांचा धांडोळा घेतला. ‘क्रिस्ताचे यातनागीत’ (१९५९), ‘सांतु आंतोनिची जीवित्वकथा’ (१९६३), ‘थॉमस स्टीफन्स याचे दौत्रिन क्रिस्तां’ (१९६५) हे ग्रंथ त्यांनी कष्टपूर्वक मिळवले आणि त्यांच्या संशोधित-संपादित आवृत्त्या प्रसिद्ध केल्या. ‘मोरोपंतांची स्फुट कविता’ (१९६१), ‘अमृतानंदाचे योगराज टिळक’ (१९५६), ‘यदुमणीचे गणेश पुराण’ (१९५९), ‘गंगा माहात्म्य (१९६४),“महानुभावांचे इतिहास प्रकर्ण’ (१९६५) याही काव्यांची संपादने प्रियोळकरांनी प्रसिद्ध केली.

संहिता मुद्रणपूर्व काळातील असो किंवा मुद्रणयुगातील, तिचा ‘खरा पाठ’ सिद्ध करण्यासाठी किती वेगवेगळ्या कसोट्या आणि पद्धती वापरल्या पाहिजेत, हे प्रियोळकरांनी आपल्या मुद्रणपूर्व व मुद्रणयुगातील संहितांच्या संशोधन-संपादनाद्वारे दाखवून दिले आहे. म्हणूनच वि. भि. कोलते यांनी प्रा. प्रियोळकर यांना ‘मराठी पाठचिकित्साशास्त्राचे प्रवर्तक’ म्हणून गौरवले आहे (भेण्डे, १९७४ [संपा.] : २१५).

जेजुइट मराठी साहित्याचे नवे दालन शोधले

प्रा. प्रियोळकरांनी मध्ययुगीन मराठी साहित्याच्या इतिहासात घातलेली अतिशय मोलाची भर म्हणजे, त्यांनी शोधून काढलेले गोव्यातील जेजुइट कवींचे मराठी ग्रंथ. विसाव्या शतकात महानुभाव वाङ्मय आणि जेजुइत मराठी वाङ्मय या दोन साहित्य प्रवाहांचा इतिहास नव्याने गवसल्यामुळे मध्ययुगीन मराठी साहित्याचा इतिहास अधिक समृद्ध झाला. त्यापैकी जेजुइट मराठी साहित्य उजेडात आणण्याचे काम प्रियोळकरांनी जवळजवळ एकहाती केले, असे म्हटले पाहिजे.

या वाङ्मयाचे ऐतिहासिक मोल जाणून प्रियोळकरांनी पुढील आयुष्यात जेजुइट कवींच्या मराठी ग्रंथांचा शोध घेऊन त्यांच्या संहिता संपादित करून छापण्याचा उपक्रम केला.

‘जेजुइट’ किंवा ‘सोसायटी ऑफ जीजस’ ही युरोपातील ख्रिस्ती धर्मियांची कॅथलिक चर्चशी निगडित संघटना होती. सेंट इग्नेशस लॉयॉल या स्पॅनिश धर्मगुरूने या संघटनेची स्थापना १५३९मध्ये केली. या संघटनेचा फ्रांसिस झेवियर हा पोर्तुगाली धर्मगुरू १५४२मध्ये गोव्यात दाखल झाला. झेवियरने गोव्यातील मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराच्या कार्याला जोराची चालना दिली. लॉयॉल याने जेजुइट पंथाच्या आचारसंहितेत दिलेले एका कलम असे होते की, ज्या लोकांमध्ये मिसळून धर्मप्रसाराचे काम करायचे त्यांची भाषा प्रत्येक धर्मप्रसारकाने आत्मसात केलीच पाहिजे. यामुळे गोव्यातील जेजुइट पंथाच्या धर्मप्रसारकांनी गोव्यातील मराठी भाषेचा अभ्यास करून त्या भाषेत मोठ्या प्रमाणावर ग्रंथलेखन केले.

प्रियोळकरांच्या गोमंतकीय पार्श्वभूमीमुळे त्यांना या मराठी साहित्याचा परिचय होता. त्यांच्यातल्या संशोधकाने या साहित्याचे महत्त्व जाणले. जेजुइट मिशनऱ्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी कोकणी बोलीत आणि शिक्षित लोकांसाठी प्रमाण, नागर मराठीत – अशा दोन्ही भाषांत गद्य-पद्य लेखन केले होते. सोळा-सतराव्या शतकातील कोकणी-मराठी भाषांचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी गेली तीन-चारशे वर्षे या रोमन लिपीत बंदिस्त असलेल्या साहित्याच्या भाषिक अभ्यासाचा फायदा होणार होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

शिवाय तत्कालीन सामाजिक व धार्मिक-सांस्कृतिक स्थितीचा इतिहास लिहिता येणार होता. या हेतूने प्रियोळकरांनी जेजुइटांच्या पद्य वाङ्मयापैकी ‘सांतु आंतोनिची जीवित्वकथा’ (१९६४), ‘क्रिस्ताचे वधस्तंभारोहण’ (१९४०) आणि ‘क्रिस्ताचे यातनागीत’ (१९५९) या संहिता स्वतंत्रपणे संपादित करून विवेचक प्रस्तावनांसह प्रकाशात आणल्या. फादर थॉमस स्टीफन्स याच्या ‘दौत्रिन क्रिस्तां’ (ख्रिस्ती धर्मतत्त्व) या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना, विवेचनात्मक टिपा, सविस्तर शब्दसूची आणि कोश जोडून प्रसिद्ध केले (१९६५). याही संपादनात पाठचिकित्सेचा आधार घेतलेला दिसतो.

प्रियोळकरांनी शोधलेल्या या जेजुइट मराठी साहित्याला भाषिक आणि सामाजिक इतिहास दृष्टीतून महत्त्व फार आहे. हे साहित्य रोमन लिपीत असल्यामुळे त्याची मराठी भाषिक रूपे अविकृत राहिली. तत्कालीन मराठी व कोकणी भाषांच्या अभ्यासासाठी या ग्रंथांच्या संहिता विशेष उपयुक्त आहेत, हे प्रियोळकरांनी जाणले. बोलींचा अभ्यास केवळ वर्तमानकाळातील प्रत्यक्ष भाषिक आविष्काराच्या साहाय्याने होत असतो. प्रियोळकरांनी शोधून काढलेल्या बहुतेक जेजुइट ग्रंथांमध्ये कोकणी बोलीचाच वापर केलेला असल्यामुळे त्या नमुन्यांवरून चारशे वर्षांपूर्वीच्या गोमंतकीय समाजाच्या भाषिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे शक्य झाले.

चरित्रकार, अर्थात् सामाजिक इतिहासकार

प्रा. प्रियोळकर यांच्या संशोधनपर लेखनातील मोठा हिस्सा चरित्रलेखनाचा आहे. त्यांनी तीन प्रकारे चरित्रे लिहिली : मध्ययुगीन/आधुनिक ग्रंथकारांच्या ग्रंथांचे संपादन करताना त्या त्या ग्रंथकारांच्या चरित्राची त्या ग्रंथांना दिलेली जोड हा पहिला प्रकार. स्वतः संपादित केलेल्या ग्रंथांना प्रस्तावनारूपाने त्यांनी या चरित्रांची जोड दिली; रघुनाथ पंडित, मुक्तेश्वर, म्हैसूरचा तिसरा कृष्णराज, पूर्णप्रकाशानंद, उद्धवचिद्घन या मध्ययुगीन आणि गो. ना. माडगांवकर, लोकहितवादी, रा. भि. गुंजीकर, परशुराम तात्या गोडबोले या आधुनिक ग्रंथकारांची चरित्रे अशा प्रकारची आहेत. चरित्रलेखनाचा दुसरा प्रकार म्हणजे, स्वतंत्रपणे लिहिलेला संपूर्ण चरित्रग्रंथ. पु. बा. कुलकर्णी लिखित जगन्नाथ शंकरशेट यांच्या चरित्राला प्रियोळकरांची प्रस्तावना आहे. त्यात ते लिहितात, “सुमारे पंधरा वर्षांमागें रा. ब. दादोबा पांडुरंग यांचें अपूर्ण आत्मचरित्र संपवून चरित्ररूपानें पूर्ण करण्याच्या खटपटींत असतांना मुंबई सरकारचें दप्तर आणि गेल्या शतकांतील वृत्तपत्रें, रिपोर्ट व इतर ग्रंथ काळजीपूर्वक अवलोकन करण्याची मला संधि मिळाली. त्या वेळीं दादोबांच्या समकालीन अशा अनेक पुरुषांच्या चरित्रांचीं महत्त्वाचीं असंख्य साधनें माझ्या नजरेखालून गेलीं. दादोबांचा चरित्रग्रंथ छापून झाल्यावर जर सवड मिळाली, तर या अस्सल साधनांचा उपयोग करून त्यांचे उपेक्षित समकालीन असे बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेट, नवरोजी फर्दुनजी, भाऊ दाजी, महमद इब्राहम मकबा, टी. फ्रेंच...अशा कांहीं पुरुषांचीं लहानमोठीं चरित्रें लिहून काढण्याचा मीं मनाशीं संकल्प केला होता.” (पु. बा. कुलकर्णी १९५९ : प्रस्तावना).

पण तेवढी सवड प्रियोळकरांना मिळालेली दिसत नाही. वरीलपैकी काही व्यक्तींविषयी त्यांनी चरित्रलेख लिहिल्याचा उल्लेख वर आलाच आहे. केवळ भाऊ दाजी लाड यांचे चरित्र मात्र आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी जिद्दीने पूर्ण केले. ते ‘मुंबई मराठी साहित्य संघा’ने १९७१मध्ये प्रसिद्ध केले. या चरित्रातून त्यांनी डॉ. भाऊ दाजींनी केलेल्या कुष्ठरोगावरील संशोधनापासून इतिहास संशोधनापर्यंत कितीतरी नवी माहिती उजेडात आणली. महाराष्ट्रात नव्याने उदय पावलेल्या आधुनिक ज्ञानयुगाचा इतिहास या चरित्रातून उलगडत जातो. या दोन रूढ चरित्रलेखन प्रकारांशिवाय प्रियोळकरांनी लिहिलेले अनोखे चरित्र म्हणजे दादोबा पांडुरंग यांचे चरित्र (१९४७). आत्मचरित्राला चरित्राची जोड देण्याचा हा प्रयोग पुढे ज. स. सुंठणकर (धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र व चरित्र, १९७६), धनंजय कीर (कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचे आत्मचरित्र व चरित्र, १९७७) आणि सरोजिनी वैद्य (काशीबाई कानिटकर यांचे आत्मचरित्र व चरित्र, १९८०) यांनीही केला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘नवनीत’ या ग्रंथाच्या शतसांवत्सरिक आवृत्तीत प्रियोळकरांनी परशुराम बल्लाळ गोडबोले यांच्या चरित्राविषयीचे टिपण लिहिले. लोकहितवादी यांच्या ‘निबंधसंग्रहा’च्या शताब्दीनिमित्त या पुस्तकाची विशेष आवृत्ती त्यांनी संपादित केली आणि त्याला लोकहितवादींचे चरित्र जोडले. गो. ना. माडगांवकर यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या लेखसंग्रहाचे संपादन केले व त्याला चरित्ररूप प्रस्तावना लिहिली. परमहंस सभेचे रामचंद्र बाळकृष्ण यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त छापलेल्या ‘धर्मविवेचन’ या पुस्तिकेत त्यांचे चरित्र लिहिले. भाऊ दाजी लाड यांचे चरित्र प्रियोळकरांनी भाऊ दाजींच्या १९७४मध्ये येणाऱ्या शतसांवत्सरिक पुण्यतिथी वर्षानिमित्त लिहिले.

एकोणिसाव्या शतकातले ग्रंथकार/समाजपुरुष हे प्रियोळकरांच्या चरित्रलेखनाचे विषय बनले. ब्रिटीश वसाहतवादी सत्तेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भौतिक जीवनापासून सामाजिक, धार्मिक व नैतिक मूल्यांपर्यंत सर्वच पातळ्यांवर मोठे परिवर्तन झाले. दळणवळणाची वेगवान साधने, मुद्रणयुगाला प्रारंभ, भाषेचे आधुनिकीकरण, इहवादी साहित्याची निर्मिती, कालबाह्य सामाजिक-धार्मिक रूढी व मूल्यांविरुद्धच्या चळवळी, स्वतंत्रतावादी राजकीय जाणिवांचा उदय इत्यादी वैशिष्ट्यांमुळे हा काळ भारतासह महाराष्ट्राचेही प्रबोधनपर्व ठरला होता.

प्रियोळकरांनी चरित्रलेखनासाठी निवडलेल्या गो. ना. माडगांवकर, दादोबा पांडुरंग, रा. भि. गुंजीकर, लोकहितवादी, रामचंद्र बाळकृष्ण जयकर, डॉ. भाऊ दाजी लाड या सर्वच व्यक्ती या प्रबोधनपर्वात मोलाची भूमिका बजावणाऱ्या होत्या. त्यांच्या जीवनचरित्राचे संशोधन करणे म्हणजे एकप्रकारे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास शोधणेच होते. प्रियोळकरांनी या कालखंडातील व्यक्तींचे चरित्रलेखन त्या दृष्टिकोनातूनच केले. त्यामुळे ही चरित्रे व्यक्तिकेंद्री राहिली नाहीत. त्या व्यक्तींचे कर्तृत्व ज्या क्षेत्रांत होते, त्या क्षेत्रांचा आणि त्याभोवतीच्या महाराष्ट्रातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरणातील स्थित्यंतरांचा इतिहास त्यांच्या चरित्रांमधून प्रियोळकरांनी मांडण्याचा प्रयत्न केला.

‘लिखाणाचा अस्सलपणा’ हे प्रियोळकरांसाठी अत्यावश्यक मूल्य होते. मूळ लेखन आहे तसे छापावे असा त्यांचा आग्रह सर्व प्रकारच्या साहित्याबाबत असे. जुन्या हस्तलिखित वा मुद्रित संहिता छापताना त्या मूळ रूपात छापणे ऐतिहासिकदृष्ट्या आवश्यकच असते, असे त्यांचे रास्त म्हणणे असे. म्हणूनच, पहिल्यांदा शिळाप्रेसवर छापला गेलेला लोकहितवादींचा निबंधसंग्रह शंभर वर्षांनी पुनर्प्रकाशित करताना मूळ शिळाप्रेसच्याच स्वरूपात प्रसिद्ध व्हावा, असा त्यांचा आग्रह होता.

आपल्या लेखनातील प्रतिपादनाच्या आधारासाठी तळटीपेत दिलेल्या मजकुरातही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, ही त्यांची भूमिका होती. अगदी त्यांचे भाषांतर करणे म्हणजे देखील हस्तक्षेपच होय, असे ते मानीत. अशा मजकुरात मूळचा शब्द चुकला असेल तरी तो आहे तसाच ठेवावा, अशी त्यांची भूमिका होती. या भूमिकेतून प्रियोळकरांनी लोकहितवादींच्या शतपत्रांची शताब्दी आवृत्ती संपादित केली. श्री. रा. टिकेकर यांनी ‘नवभारत’मध्ये या आवृत्तीचे परीक्षण लिहिले (टिकेकर १९६८ : ५६).  त्यात मूळ मजकुरातील मुद्रितांच्या चुकाही जशाच्या तशा ठेवण्याच्या प्रियोळकरांच्या संपादकीय भूमिकेवर त्यांनी टीका केली. परंतु प्रियोळकरांनी टिकेकरांच्या परीक्षणावर उत्तर लिहून त्यात आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

प्रियोळकर जुन्या ग्रंथांचे, संदर्भ साधनांचे संवर्धक होते. संवर्धकाची ही भूमिका ते चरित्र लेखनातही विसरत नसत. म्हणूनच, चरित्रलेखनात आधाराला घेतलेल्या साधनांचा केवळ संदर्भ न देता जमेल तेवढा मूळ मजकूर संदर्भासाठी देण्यावर त्यांचा भर होता. ग्रंथसंवर्धनासाठी त्यांनी प्रयत्न केले, तसाच हा जुन्या ग्रंथांतील, नियतकालिकांतील, पत्रव्यवहारातील मजकुराच्या संवर्धनाचा प्रयत्न होता.

मूळ अस्सल साधनांचा अधिकाधिक वापर करत प्रियोळकरांनी लिहिलेली ही चरित्रे केवळ एका व्यक्तीचे चरित्र न राहता इतिहासग्रंथाचे रूप धारण करतात. या इतिहासात प्रियोळकरांनी एकोणिसाव्या शतकातील संस्था व संघटना, नियतकालिके व सामाजिक चळवळी, सामाजिक-धार्मिक प्रश्नांवरून झालेले वादविवाद, सामाजिक जीवनात झालेले बदल यांचा मागोवा घेतला आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वाचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास उलगडणारी, इतिहासकाराच्या भूमिकेतून लिहिलेली ही चरित्रे आहेत, असे म्हणता येते.

स्थानीय इतिहास लेखनाची नवी दृष्टी

प्रियोळकरांच्या चरित्रलेखनाकडे सामाजिक इतिहास म्हणून पाहता येते, तसेच ‘स्थानीय इतिहासा’चे (Local History) एक उदाहरण म्हणूनही त्याचा विचार करता येतो. ‘स्थानीय इतिहास’ हा प्रकार इतिहासशास्त्रात अलीकडे विकसित झाला आहे. परंतु त्याचे सिद्धान्तन करण्याचा प्रयत्न प्रा. प्रियोळकर यांनी केला होता. मुंबई आणि गोवा ही प्रियोळकरांच्या अभ्यासाची प्रमुख ‘भौगोलिक क्षेत्रे’ होती. प्रियोळकरांनी ज्यांची चरित्रे लिहिली, त्या व्यक्ती याच क्षेत्रांमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या काळाविषयी संशोधन करताना प्रियोळकरांना या दोन भौगोलिक प्रदेशांतल्या समकालीन अनेक लहान-मोठ्या घटना, संस्था, चळवळी यांचा परामर्श घ्यावा लागला. इतिहासाच्या पटावर त्यांची मांडणी करून त्यांचा अन्वय लावावा लागला. हा इतिहास मांडताना त्यांनी काही ठिकाणी स्थानीय इतिहास संशोधनाची दृष्टी वापरलेली दिसते.

प्रा. प्रियोळकराचे ‘हिंदुस्थानचे दोन दरवाजे’ (१९७४) हे पुस्तक त्यांच्या निधनानंतर एका वर्षाने प्रसिद्ध झाले. मात्र या पुस्तकाची रचना त्यांनी हयात असताना स्वतःच केली होती. या पुस्तकाचे संपादक प्रस्तावनेत लिहितात : “‘हिंदुस्थानचे दोन दरवाजे’ हें ग्रंथाचें नांव प्रियोळकरांनी स्वतःच सुचविलें होतें. हिंदुस्थानचा पाश्चात्य संस्कृतीशीं संबंध प्रथम गोमंतकामार्गें आणि नंतर मुम्बईमार्गें आला. पाश्चात्यांच्या आगमनाची खूण एका जुन्या दरवाज्याच्या स्वरूपानें जुने-गोवें येथें अजूनही आहे. तसेंच मुंबईचा ‘गेटवे ऑफ इंडिया’ हा दरवाजा, नंतरचें प्रवेशद्वार म्हणता येईल. ‘हिंदुस्थानचे दोन दरवाजे’ हे नांव ठरवतांना वरील लाक्षणिक खुणा प्रियोळकरांना अभिप्रेत होत्या.” (प्रियोळकर १९७४ [अ] : प्रस्तावना). या पुस्तकातील सर्व लेख हे पाश्चात्य संस्कृती-संपर्काची गोवा आणि मुंबई ही दोन केंद्रे कल्पून या ‘स्थानां’शी संबंधित विविध ऐतिहासिक व्यक्ती, घटना, ग्रंथ यांचा इतिहास मांडणारे आहेत.

प्रियोळकरांच्या चरित्रलेखनात सामाजिक इतिहास लेखन दृष्टी आहे, तशीच स्थानीय इतिहास-लेखनाचीही दृष्टी प्रियोळकरांनी वापरली आहे. मराठीत तोवर ही इतिहास शाखा परिचित नसताना प्रियोळकरांनी त्याविषयी आपले भान प्रकट केले होते, एवढे खात्रीपूर्वक म्हणता येते.

ग्रंथइतिहासकार व ग्रंथसंस्कृतीचे भाष्यकार

प्रियोळकरांनी जुन्या ग्रंथांचे संपादन जीवनभर केले. अशा ग्रंथांचे संपादन, पाठचिकित्सा करायची म्हणजे त्यांची हस्तलिखिते किंवा मुद्रित दुर्मिळ प्रती शोधणे आलेच. गावोगावच्या मठा-मंदिरांमध्ये ही हस्तलिखिते जतन करून ठेवलेली असत. एकोणिसाव्या शतकातील ब्रिटीश राजवटीत आधुनिक शिक्षणाद्वारे तयार झालेल्या नवशिक्षित पिढीचे या पारंपरिक मराठी हस्तलिखितांच्या वारशाकडे दुर्लक्ष झाले. महाराष्ट्रीय समाजात ग्रंथवाचन व संवर्धन यांविषयी पूर्वीपासूनच दिसणारे चित्र उदासीनतेचे आहे. त्यामुळे येथे दुर्मीळ पुस्तके शोधणे, सांभाळणे अधिक जिकिरीचे व कष्टदायक काम आहे. प्रियोळकर जीव ओतून हे काम करत राहिले. अनेक दुर्मिळ हस्तलिखितांचा आणि मुद्रित ग्रंथांचा त्यांनी संग्रह केला. एकोणिसाव्या शतकातील गुजराती पुस्तके (मोडी लिपीचेच एक रूप असलेल्या) महाजन लिपीत छापलेली असत. या महाजन लिपीतल्या पुस्तकांसह १८६७पूर्वी छापलेली सुमारे दोनशे गुजराती पुस्तके प्रियोळकरांकडे होती. गणपत कृष्णाजी यांनी मराठीतले पहिले पंचांग छापले, अशी समजूत आहे. या पंचांगासह त्याहीपूर्वी छापलेली पंचांगे प्रियोळकरांच्या संग्रही होती. दमयंती-स्वयंवर काव्याच्या संपादनासाठी त्यांनी या काव्याची मुद्रणपूर्व काळातली हस्तलिखिते तर गोळा केलीच, परंतु मुद्रणतंत्राच्या आगमनानंतर दमयंती-स्वयंवर हे काव्य अंशतः किंवा पूर्णतः ज्या ज्या ग्रंथांमध्ये छापले गेले, त्याच्याही प्रती त्यांनी जमवल्या. यापैकी एक ग्रंथ म्हणजे परशुराम तात्या गोडबोले यांचा ‘नवनीत’ हा होय. प्रियोळकरांनी नवनीतच्या सर्व आवृत्त्या जमवल्या. कारण या संग्रहाच्या प्रत्येक आवृत्तीत काव्यनिवडीत फेरफार झालेले होते. पुढे १९५४नंतर ‘नवनीत’चा शंभर वर्षांचा इतिहास लिहिण्यासाठी या आवृत्त्या प्रियोळकरांच्या उपयोगात आल्या.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रा. प्रियोळकर यांच्या ग्रंथप्रेमाविषयी त्यांच्या पत्नी लिहितात, “मी त्यांच्याबरोबर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रवास केला आहे. पण कुठेही गेले की तेथली सौंदर्यस्थळं पहाण्यापेक्षा लायब्रऱ्या, संस्था, चर्च वगैरे पहाण्यात त्यांचा अधिक वेळ खर्च होई. आणि परत येताना जुन्या पोथ्या, पुस्तके यांचे भारे बरोबर आणीत!” (सुभाष भेण्डे १९७४ [संपा.] : ६९). मराठी संशोधन मंडळाचे संचालक म्हणून काम करताना प्रियोळकरांनी मुद्रणपूर्व काळातील ग्रंथांच्या संशोधनावर अधिक भर दिला. याचा एक भाग म्हणून हस्तलिखित पोथ्यांचा मोठा संग्रह करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. भारत व भारताबाहेरही प्राचीन मराठी हस्तलिखितांचा संग्रह असल्यास अशा हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची सूची तयार करणे, हा उपक्रम मराठी संशोधन मंडळातर्फे सुरू केला. कोल्हापूर, पंढरपूर, नाशिक, विदर्भ, मराठवाडा, तंजावर, उज्जैन, बनारस अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः प्रवास करून प्रियोळकरांनी हस्तलिखिते मिळवली. मुक्तेश्वराचे महाभारत, मोरोपंतांचे काव्य, ज्ञानेश्वरीची पाठशुद्ध आवृत्ती, अशा संपादनांच्या योजना प्रियोळकरांनी मंडळातर्फे आखल्या. यासाठी या ग्रंथांच्या हस्तलिखितांचा सर्वत्र शोध घेतला. या सर्व प्रयत्नांतून सुमारे ४७५ हस्तलिखिते मंडळाच्या संग्रहालयात जमा झाली (प्रदीप कर्णिक २०२२ : २६९).

स्वतःप्रमाणे इतर अभ्यासक-वाचकांनीही डोळसपणे ग्रंथसंग्रह करावा, यासाठी प्रियोळकर पाठपुरावा करत. आपल्या हाती लागलेले ग्रंथ योग्य त्या ग्रंथालयात, ग्रंथसंग्रहात पोहोचावेत यासाठी प्रयत्न करत. वि. भि. कोलते यांची आठवण पुढीलप्रमाणे आहे – “आमच्या प्रत्येक भेटीच्या वेळी आपण गोळा केलेल्या अशा अनेक दुर्मिळ ग्रंथांचे दर्शन ते मला घडवीत. ‘अमुक पुस्तक तुमच्याजवळ आहे काय? तमुक पुस्तक तुमच्याजवळ आहे काय?’ असे जेव्हा ते विचारीत तेव्हा मला अवघडल्यासारखे होई. मी एक वेळ त्यांना म्हणालोही की “काकासाहेब, अशी पुस्तके आम्हांला नागपूरकडे कुठून मिळणार? नागपूर प्रांतात इंग्रजांचे राज्यच मुळी १८५३नंतर झाले. त्यानंतर नवीन विद्येचा संस्कार तेथे झाला. अशा स्थितीत आरंभीची छापलेली पुस्तके तिकडे येणार कुठून आणि आता ती आम्हांला मोडक्या बाजारात मिळणार तरी कशी?” त्यांना माझे म्हणणे पटले. ते म्हणाले, “ते खरे आहे. पण त्या भागातील ग्रंथालयात आता तरी अशी पुस्तके मिळवून ठेवणे अवश्य आहे. तुम्ही तसा प्रयत्न करा. मी तुम्हाला अशी पुस्तके मिळवून देईन.” ....पुढे एकदा ते नागपूरला आले तेव्हा त्यांनी आपल्याजवळील काही दुर्मिळ पुस्तके नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयाला दिली. आणि अगदी अलीकडे पुन्हा बरीच पुस्तके दिली.” (सुभाष भेण्डे १९७४ [संपा.] : ८७-८८).

ग्रंथ मिळवण्यासंबंधी, त्यांच्या संग्रहासंबंधी आपल्या आठवणी ‘प्रिय आणि अप्रिय’ या पुस्तकातील काही लेखांमध्ये प्रियोळकरांनी सांगितल्या आहेत. त्यावरून त्यांचे ग्रंथप्रेम ग्रंथवेडाकडे झुकले होते, असे म्हणता येते. एकेकाळी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील त्यांचे सहकारी असलेले बा. द. सातोस्कर यांनीही याला पुष्टी दिली आहे : “ग्रंथ व ग्रंथालये यांच्यासंबंधीचे वेड म्हणण्याइतके त्यांचे प्रेम तीव्र होते.” (सुभाष भेण्डे १९७४ [संपा.] : १७५). एक अभ्यासक म्हणून ग्रंथांचा संग्रह आणि संवर्धन हे प्रियोळकरांचे कायमचे ध्यासविषय बनले होते. या विषयावर त्यांनी सातत्याने लेखनही केले.

हस्तलिखितांच्या किंवा जुन्या ग्रंथांच्या संवर्धनासाठी त्यांच्या सूची, नामावली तयार होणे गरजेचे असते. पाठचिकित्साशास्त्रीय मीमांसा, जुन्या ग्रंथांचे संशोधन यासाठीही ग्रंथांच्या सूची असणे अत्यावश्यक असते. या संदर्भात मराठी ग्रंथव्यवहारात फार बेशिस्त होती. या सूची काटेकोरपणे कशा तयार कराव्यात, यांविषयी प्रियोळकरांनी विस्ताराने लिहिले आहे. मराठीत ‘आद्यमुद्रितां’ची (incunabula) कल्पना सर्वप्रथम प्रियोळकरांनीच मांडली. युरोपमध्ये मुद्रणयुगाच्या प्रारंभीच्या काळात छापल्या गेलेल्या पुस्तकांना ‘incunabula’ असे म्हणतात. प्रारंभापासून इ. स. १५००पर्यंत – ही त्याची कालमर्यादा आहे. मराठीत एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून ग्रंथमुद्रण सुरू झाले. इ. स. १८६७मध्ये ग्रंथमुद्रणविषयक पहिला कायदा झाला. त्यामुळे त्या आधी छापली गेलेली मराठी पुस्तके आद्यमुद्रिते समजावीत, अशी कल्पना प्रियोळकरांनी मांडली. ‘cunae’ या शब्दाचा लॅटिन भाषेत अर्थ पाळणा असा होतो. त्यावरून मराठीत प्रियोळकरांनी आद्यमुद्रितांसाठी ‘दोलामुद्रिते’ हा सुंदर शब्द सुचवला. ही संज्ञा आता ग्रंथव्यवहारात रूढ झाली आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे केवळ मराठी ग्रंथांचा संग्रह करणारे महाराष्ट्रातले मोठे ग्रंथसंग्रहालय आहे. त्यामुळे या ग्रंथालयात मराठी दोलामुद्रितांचा संग्रह व्हावा, यासाठी प्रियोळकरांनी पुढाकार घेतला. दोलामुद्रितांची ही सूची तयार झाल्यानंतर तिला त्यांनी प्रस्तावना लिहिली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पाश्चात्य समाजात ग्रंथांविषयी मोठी आस्था असते. त्यामुळे तिथे ग्रंथसंस्कृतीची भरभराट झाली आहे. खाजगी ग्रंथसंग्राहक, सार्वजनिक व शैक्षणिक संस्थांची मोठमोठी ग्रंथालये, जुन्या व दुर्मीळ पुस्तकांची चालणारी पाश्चात्य देशांत चालणारी खरेदी-विक्री, प्रदर्शने याचे प्रियोळकरांना कौतुक होते. अशी प्रगल्भ ग्रंथसंस्कृती आपल्याकडे नाही, याची त्यांना खंत होती. त्यांच्या व्याख्यानांमध्ये, लेखांमध्ये ही खंत सातत्याने डोकावताना दिसते. १९४५मध्ये मुंबईच्या नेटिव्ह जनरल लायब्ररीतर्फे दुर्मिळ ग्रंथांचे एक प्रदर्शन भरवले गेले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रियोळकरांनी दिलेले ‘मराठी ग्रंथसंग्रहशास्त्राची ओळख’ या विषयावर प्रियोळकरांनी व्याख्यान दिले. तर १९४८मध्ये पुणे नगरवाचनालयात भरलेल्या दुर्मीळ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रियोळकरांनी ‘महाराष्ट्रांतील ग्रंथालय चळवळीचा इतिहास’ या विषयावर व्याख्यान दिले.

१९६७ हे मराठी ग्रंथसंरक्षण कायद्याचे शताब्दी वर्ष होते. त्यानिमित्ताने प्रियोळकरांनी या विषयावर संधी मिळेल तिथे व्याख्याने दिली आणि लेखही लिहिले. ‘मराठी ग्रंथांची आदर्श संग्रहालये’ या मालिकेत त्यांनी १९६८मध्ये ‘मुंबई मराठी साहित्य संघा’तर्फे दिलेली तीन व्याख्याने यापैकीच आहेत. या व्याख्यानांमध्ये त्यांनी ग्रंथसंस्कृतीविषयी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. मराठी ग्रंथालयांचे स्वरूप कसे असावे, ग्रंथालय चळवळीची दिशा कोणती असावी, ग्रंथांच्या संवर्धन-कार्यात ग्रंथालयांची कर्तव्ये काय असावीत, नियतकालिकांचे व वृत्तपत्रांच्या जुन्या अंकांचेही संवर्धन करणे आवश्यक का आहे, खाजगी ग्रंथसंग्राहकांचे ग्रंथसंस्कृतीमध्ये महत्त्व का असते, इत्यादी विषयांवर अतिशय मूलगामी मार्गदर्शन प्रियोळकरांनी केले आहे. ग्रंथसंग्रह कसा करावा, हे सांगताना ते ग्रंथांची वर्गवारी करतात. हस्तलिखिते, व्यक्तिविशिष्टसंग्रह, स्वाक्षरीची पुस्तके, प्रसिद्ध पुरुषांचा पत्रव्यवहार, छोटी चोपडी, चित्रपट पुस्तिका, बंदिवासातील पुस्तके, रद्द मजकुराची पुस्तके इत्यादी अनेक प्रकार त्यांनी सांगितले आहेत. दुर्मीळ पुस्तकांचे निकष अतिशय बारकाईने सांगितले आहेत.

मराठी मुद्रणयुगाच्या प्रारंभापासूनच्या जमवलेल्या अशा ग्रंथांच्या निर्मितीचा इतिहास शोधता शोधता भारतीय ग्रंथमुद्रणाचा इतिहास लिहिण्याची कल्पना प्रियोळकरांना सुचली असावी. प्रियोळकरांचे एक जवळचे स्नेही आणि महाराष्ट्रातले मोठे मुद्रणतज्ज्ञ बापूराव नाईक यांच्या समजुतीप्रमाणे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील प्रमुख कार्यकर्ते सुंदरराव भास्कर वैद्य यांच्या सहवासात प्रियोळकरांना या विषयाच्या संशोधनाची प्रेरणा मिळाली असावी (प्रियोळकर २०१८ : १३१). स्वतः सुंदरराव वैद्य यांना या विषयात रस होता. त्यांनी या विषयी काही लेखनही केले होते. ‘टॉमस ग्रॅहॅम’ (एकोणिसाव्या शतकातला देवनागरी टंक तयार करणारा कारागीर) ‘आणि ‘मराठी मुद्रणकलेचा संशोधक कोण?’ हे त्यांचे लेख ‘नवयुग’च्या जुलै १९१४ आणि जून १९१६ या अंकांमध्ये प्रसिद्ध झाले होते. प्रियोळकरांना वैद्यांच्या सहवासात मुद्रणकलेच्या इतिहासात रुची निर्माण होणे अगदीच शक्य होते. परंतु मुळात पोर्तुगीज गोव्यातील सतराव्या शतकापासून छापल्या गेलेल्या मराठी ग्रंथांचा, तसेच एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच्या मुद्रित ग्रंथांचा अभ्यास आधीपासून करत असल्याने प्रियोळकरांना भारतीय ग्रंथमुद्रणाच्या उदयाचा इतिहास लिहिण्याची प्रेरणा मिळाली असावी.

मुद्रणतंत्र ही पाश्चात्य संस्कृती-संपर्कातून भारतीयांना मिळालेली देणगी होती. मुंबई, कलकत्ता, गोवा, ट्रांकोबार ही भारतातील मुद्रणाची आद्य केंद्रे होती. प्रियोळकरांनी या शहरांमध्ये मुद्रणाचा उदय कसा झाला, याचा सखोल इतिहास ‘द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया’ (१९५८) या ग्रंथात लिहिला. भारतीय ग्रंथमुद्रणाचा इतिहास सांगणारा हा ग्रंथ भारतात व भारताबाहेरही अतिशय नावाजला गेला. कलकत्ता येथील नॅशनल लायब्ररीचे माजी ग्रंथपाल आणि ग्रंथालयशास्त्राचे तज्ज्ञ बी. एस. केसवन् यांनी, ‘भारतात तोवर प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी भाषेतील सर्वांत उल्लेखनीय वीस ग्रंथांपैकी एक ग्रंथ’ अशा शब्दांत ‘द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया’ या ग्रंथाचा गौरव केला होता (सुभाष भेण्डे १९७४ [संपा.] : ९९).  

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठी ग्रंथसंस्कृती व भारतीय ग्रंथ-इतिहास याविषयी प्रियोळकरांनी केलेल्या या सर्व लेखनाचे वेगळेपण इथे मुद्दाम अधोरेखित केले पाहिजे. ‘ग्रंथ-इतिहास’ (Book History) ही अभ्यासशाखा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात विकसित झाली. ग्रंथ इतिहास म्हणजे ग्रंथ या ‘वस्तू’चा इतिहास. ग्रंथांची निर्मिती, त्यांचा आकार व मांडणी, त्यांचे मुद्रण व वितरण, त्याचा अभिरुचीवर झालेला परिणाम यांचा सांस्कृतिक अंगाने केलेला विचार म्हणजे ग्रंथ-इतिहास होय. यात ग्रंथातील आशय नव्हे, तर ग्रंथ ही वस्तूच विवेचनाचा विषय असते. पाठचिकित्सा, म्हणजे पुस्तकातील संहितेचे मूळ स्वरूप संशोधित करणे, सूची तयार करणे इत्यादी पूर्वीपासून चालत आलेल्या अभ्यास पद्धती देखील ग्रंथ इतिहासांतर्गतच येतात. युरोपमध्ये ल्युसिएन फेव्र आणि हेन्री जॉ मार्टिन यांचे ‘द कमिंग ऑफ बुक’ हा फ्रेंच ग्रंथ १९७६मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथामुळे युरोपात ग्रंथ इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी निर्माण झाल्याचे मानले जाते.

मात्र मुंबई शहर हे भारतीय ग्रंथमुद्रणाच्या आद्य केंद्रांपैकी असूनही; गुजराती, मराठी, इंग्रजी व काही प्रमाणात पोर्तुगीज अशा चार भाषांतील ग्रंथ मुद्रणाची मुंबई ही गंगोत्री असूनही मुंबई व महाराष्ट्रातील ग्रंथ-इतिहास, मुद्रण इतिहास यांवर संशोधन जवळजवळ झालेले नाही. मराठी साहित्याचे इतिहास आणि अलीकडे लिहिले गेलेले मराठी नियतकालिकांचे तुरळक इतिहास हे साहित्यकेंद्री आहेत. अशा इतिहासांमध्ये ग्रंथांमधील आशयाच्या विवेचनावर भर दिलेला असतो. नियतकालिके किंवा ग्रंथ यांच्याकडे एक ‘सांस्कृतिक वस्तू’ म्हणून पाहण्याची जी दृष्टी ग्रंथ-इतिहासात दिसते, तिचा या इतिहासलेखनात अभाव आहे.

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये व संशोधकांमध्ये या विषयाबद्दल अद्यापही अनास्था आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांचे मराठी विभाग तर या अभ्यासशाखेविषयी पूर्ण अनभिज्ञ आहेत. आज ग्रंथ-इतिहास ही अभ्यासशाखा नव्याने उदयास येत असताना तिच्याविषयी एवढी अनास्था आणि उदासीनता असेल, तर प्रा. प्रियोळकरांनी सुमारे अर्ध्या-पाऊण शतकापूर्वी मुद्रणसंस्कृती, ग्रंथसंस्कृती आणि ग्रंथ व नियतकालिकांचा इतिहास यांविषयी केलेल्या लेखनाचे वेगळेपण आणि मोल मराठी वाङ्मयविश्वाला जाणवणे अवघडच आहे. या लेखनातून ग्रंथालयशास्त्राची नवी परिभाषा प्रियोळकरांनी घडवली. ‘दोलामुद्रिते’ (Incunabula), ‘क्रमपुस्तक’ (Catalouge), ‘मुद्रणातीत’ (Out of Print), ‘दर्शिका’ (Index), ‘पाने’ (Folios), ‘प्रसिद्धीकरणे’ (Issues), ‘स्वरूपे’ (States) असे नवे शब्द त्यांनी दिले.

वाङ्मय-संशोधक प्रियोळकरांची गुणवैशिष्ट्ये

ग्रंथ असो किंवा ग्रंथकार, भाषा असो किंवा समाज – प्रियोळकरांनी त्याकडे ऐतिहासिक दृष्टीने पाहिले. ग्रंथांचा, नियतकालिकांचा इतिहास लिहिताना ते ‘ग्रंथ-इतिहास’कार असतात; व्यक्तींची चरित्रे लिहिताना ते सामाजिक इतिहासकाराच्या भूमिकेत शिरतात; तर विशिष्ट भौगोलिक प्रदेश व त्याची सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांची व्यक्ती व वाङ्मय यांच्याशी सांगड घालणारे त्यांचे लेखन ‘स्थानिय-इतिहास’लेखनाशी नाते सांगते. थोडक्यात, व्यक्ती, समाज, चळवळी, ग्रंथ, नियतकालिके यापैकी विषय कोणताही असो – ‘इतिहासकथन’ हे प्रियोळकरांच्या लेखनाचे मध्यवर्ती सूत्र होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अशा इतिहासकथनात आधारासाठी वापरायच्या साधनांच्या बाबतीत काटेकोर असणे, वस्तुनिष्ठ दृष्टीतून निघणाऱ्या निष्कर्षांनाच महत्त्व देणे गरजेचे असते. प्रियोळकर आपण स्वीकारलेल्या विषयावर संशोधन करताना आधारभूत साधने मिळवण्यासाठी अपार कष्ट घेत. त्यासाठी कितीही वर्षे वाट पाहण्याची त्यांची तयारी असे. जेजुइट साहित्याच्या अभ्यासातून गोवा इंक्विझिशनचा इतिहास लिहिण्याचा संकल्प प्रियोळकरांनी तारुण्यातच सोडला होता. १९३५मध्ये दमयंती-स्वयंवराचे संपादन प्रसिद्ध झाले, त्याच्या आधीपासून ते या विषयावर काम करत होते, परंतु प्रत्यक्षात ‘गोवा इंक्विझिशन’वरचा त्यांचा ग्रंथ लिहून पूर्ण झाला १९६१मध्ये. ख्रिस्तपुराण व त्याचा कर्ता फादर स्टिफन्स याविषयी संशोधन करताना त्यांनी फादर स्टीफन्स याच्या हातचा पत्रव्यवहार मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्याची पत्रे कुठे ना कुठे मिळतील, असा त्यांना विश्वास होता. अखेर रोमच्या जेजुइट दफ्तरखान्यात स्टीफन्सची दोन पत्रे असल्याची खबर रोम येथील जेजुइट पंथाचे संशोधक फादर विकी यांच्यामार्फत प्रियोळकरांना लागली आणि त्यांनी या पत्रांच्या मायक्रोफिल्म्स मागवून घेतल्या. या पत्रांवरूनच, फादर स्टिफन्सला ‘ख्रिस्तपुराण’ देवनागरी लिपीत प्रसिद्ध करायचे होते; परंतु मिशनरी व्यवस्थेने त्याला सहकार्य न केल्याने त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती प्रियोळकरांनी सर्वप्रथम उजेडात आणली.

दादोबा पांडुरंग यांच्या चरित्रात प्रियोळकरांनी एकोणिसाव्या शतकातील काही गोष्टींवर प्रथमच प्रकाश टाकला आहे. उदाहरणार्थ, परमहंस सभेचा संपूर्ण इतिहास व दादोबांचा या संस्थेशी असलेला संबंध सर्वप्रथम प्रियोळकरांनीच उजेडात आणला. दादोबांचे धाकटे बंधू भास्कर तर्खडकर यांनी वर्तमानपत्रांत ‘A Hindoo’ या टोपणनावाने इंग्रज सरकारविरुद्ध पत्रे लिहिली होती व त्या काळातील तरुण लोक उत्कंठेने ती वाचत असत. दादोबांनी याचा उल्लेख आत्मचरित्रात करताना, ही पत्रे आता आपल्यापाशी उपलब्ध नाहीत, याविषयी दुःख व्यक्त केले होते. दादोबांना न सापडलेली ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची पत्रे प्रियोळकरांनी मुंबई सरकारच्या दफ्तरातून शोधून काढली. नमुना म्हणून या पत्रातील मजकूरही त्यांनी आपल्या दादोबा-चरित्रात छापला.

प्रियोळकरांनी मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना, व्याकरणाचा इतिहासही लिहून काढला (‘मराठी व्याकरणाची कुलकथा’, लोकशिक्षण, जुलै व ऑगस्ट १९३६). बाळशास्त्री घगवे, गंगाधरशास्त्री फडके आणि जगन्नाथशास्त्री क्रमवंत या पंडितांनी सन १८२४मध्ये मराठी भाषेचे व्याकरण लिहिले होते. पण ते प्रसिद्ध मात्र झाले नव्हते. या व्याकरणाच्या हस्तलिखिताची भारतात उपलब्ध नसलेली प्रत प्रियोळकरांनी लंडनच्या ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’तून मिळवली व ‘मराठी संशोधन मंडळा’तर्फे १९५४मध्ये छापून प्रसिद्ध केले. प्रतिपाद्य विषयाच्या अधिकाधिक मुळाशी जात, नवनवे आधार शोधून नवी तथ्ये उजेडात आणण्याचे प्रयत्न प्रियोळकरांनी आपल्या संशोधनात सातत्याने केले.

एखाद्या विषयावर असे झपाटून जाऊन संशोधन करणाऱ्या प्रियोळकरांचा संशोधनातील शिस्तीवरही कटाक्ष असे. वाङ्मयीन संशोधन आणि इतिहास यांच्या लेखनाचे पद्धतिशास्त्र प्रा. प्रियोळकरांनी मराठीत रूढ केले. संदर्भसाधनांचा वापर कसा करावा याचा आदर्श तर त्यांनी घालून दिलाच, पण त्याचबरोबर संदर्भ, तळटीपा कशा द्याव्यात, आधार म्हणून मूळचा मजकूर कुठे आणि कसा उद्धृत करावा, अभ्यास करताना उतारे कसे घ्यावेत, सूची कशी तयार करावी याच्या रीती त्यांनी घालून दिल्या.

त्यांचे पीएच. डी.चे विद्यार्थी श्री. म. पिंगे म्हणतात, “एखाद्या पुस्तकाचा संदर्भ दिल्यानंतर त्याच पुस्तकातील संदर्भ पुन्हा आला. तर त्या पुस्तकाचे पुन्हा नाव लिहायला नको, तर Ibid हा शब्द व त्याच अर्थाचा मराठीत “तत्रैव” हा शब्द वापरण्यास त्यांनीच प्रथम सुरुवात केली. उताऱ्यातील मूळचा शब्द जर चुकलेला असेल तर तो दुरुस्त न करता तसाच ठेवून त्यापुढे (Sic) लिहावे, अशा या संशोधनातील महत्त्वाच्या गोष्टी त्यांनीच प्रथम आणल्या.” (सुभाष भेण्डे १९७४ [संपा.] : १९७).

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठीसारख्या दीर्घ वाङ्मयीन परंपरा असलेल्या भाषेतल्या हस्तलिखितांच्या संशोधनातल्या अनेक समस्या पाठचिकित्सेद्वारे प्रियोळकरांनी हाताळल्या. यासाठी काही नव्या कल्पनाही त्यांनी सुचवल्या. उदाहरणार्थ, ‘शंकास्पद वाङ्मय’. मुद्रणपूर्व काळातल्या अनेक ग्रंथांसंदर्भात त्यांच्या ग्रंथकर्त्याच्या खरेपणाविषयीच्या शंका उपस्थित होतात. एखाद्या ग्रंथकर्त्याच्या नावावर परंपरेने मान्य केलेल्या ग्रंथांव्यतिरिक्त आणखी काही ग्रंथ त्याच्या नावावर सापडतात, तेव्हा त्याचे ग्रंथकर्तृत्व सिद्ध करणे ही समस्या बनते. अशा रीतीने ज्ञानेश्वरांसारख्या सर्वज्ञात कवीच्या नावावर असलेले ‘शंकास्पद ग्रंथ’ प्रियोळकरांनी उजेडात आणले. प्रस्तुत खंडात समाविष्ट केलेल्या ज्ञानेश्वरांच्या द्रोणपर्वाविषयीच्या लेखावरून प्रियोळकर अशा साहित्याकडे कोणत्या दृष्टीने पाहात होते, हे स्पष्ट होते. वाङ्मयेतिहासाच्या दृष्टीकोनातून अशा ग्रंथांचा अभ्यास होणे गरजेचे असते, ही प्रियोळकरांची भूमिका होती. अशा शंकास्पद ग्रंथांवरील शोधनिबंध मराठी संशोधन मंडळाच्या ‘मराठी संशोधन पत्रिका’ या पत्रिकेतून छापायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे हा नवा अभ्यास विषय मराठीत रूढ झाला.

प्रियोळकरांच्या संशोधनदृष्टीचे ताटस्थ्य आणि मर्यादा

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात धर्मकेंद्री राष्ट्रवादी इतिहासाची चौकट अधिक प्रभावी होती. इंग्रज वसाहतवादाविरुद्ध लोकमानसात संताप चेतवण्यासाठी राष्ट्रवादी विचाराची उभारणी करताना परंपरा-गौरवाचा आधार घेतला गेला. मराठीत चिपळूणकरांच्या निबंधांनी परंपरेकडे आदराने, गौरवाने पाहण्याची ही भावना रुजवली. त्याचा प्रभाव इतिहासलेखनावरही पडला. वि. का. राजवाड्यांपासून हा परंपरा-गौरव दिसतो. त्यात मध्ययुगातील राजकीय संघर्षाची धर्मकेंद्री मांडणी याच प्रेरणेतून झाली. मध्ययुगीन सत्तांनी केलेल्या अत्याचारांकडे केवळ ‘धार्मिक अत्याचार’ म्हणून पाहिले गेले. त्यामुळे या काळातील सत्तासंघर्षाचा इतिहास ‘मुस्लीम (आक्रमक, अत्याचारी) विरुद्ध हिंदू (अत्याचारग्रस्त)’ अशा द्विध्रुवात्मक चौकटीतून पाहिला जाऊ लागला. आधुनिक इतिहासात ‘मुस्लिमां’ची जागा वसाहतवादी आणि ख्रिस्ती धर्मप्रसारक ख्रिस्ती समुदायाने घेतली. ‘ख्रिस्ती विरुद्ध हिंदू’ अशा चौकटीतून या इतिहासाकडे पाहिले जाऊ लागले.

प्रियोळकरांचे एकंदरीतच मध्ययुगीन सामाजिक इतिहासलेखन या चौकटीने प्रभावित झाले आहे. प्रियोळकरांनी मध्ययुगीन इतिहासाकडे ‘मुस्लिम विरुद्ध हिंदू’ या चौकटीतून पाहिले. तर कॅथॉलिकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चालवलेल्या इंक्विजिशनसंदर्भात गोव्याचा इतिहास लिहिताना त्यांनी फक्त ‘ख्रिस्ती विरुद्ध हिंदू’ अशी मांडणी केली आहे. याचा अर्थ, एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रभावी असलेल्या धर्मकेंद्री राष्ट्रवादी इतिहासदृष्टीची चौकट प्रियोळकरांना छेदता आली नाही. प्रियोळकरांच्या सामाजिक इतिहासलेखनाची ही मर्यादा आहे.    

मात्र एकोणिसाव्या शतकातील कर्तृत्ववान व्यक्तींची चरित्रे लिहिताना किंवा ग्रंथमुद्रणाचा इतिहास लिहिताना प्रियोळकरांनी आधुनिक मूल्यचौकट स्वीकारलेली दिसते. ते स्वतःला चिपळूणकर पंथाचे नव्हे, तर आगरकर पंथाचे मानतात. मुंबईची सामाजिक-सांस्कृतिक उभारणी करणाऱ्या आधुनिक इहवादी साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांची चरित्रे त्यांनी लिहिली. आधुनिक, प्रबोधनवादी विचारांच्या प्रसाराचे साधन म्हणून प्रियोळकरांनी मुद्रणतंत्राकडे पाहिले आणि त्या दृष्टीने त्यांनी मुद्रणक्रांतीचा इतिहास लिहिला.

मध्ययुगीन सामाजिक इतिहासाविषयी लिहिताना धर्मकेंद्री राष्ट्रवादी दृष्टीत अडकणाऱ्या प्रियोळकरांनी त्याच मध्ययुगातील ख्रिस्ती, मुस्लीम कवींच्या अज्ञात ग्रंथांचा आयुष्यभर झपाटलेपणाने शोध घेतला. सापडलेल्या संहिता काटेकोरपणे संपादित करून प्रसिद्ध केल्या. संशोधक प्रियोळकरांमध्ये दडलेली मानवतावादी दृष्टी त्यांच्या पुढील विधानात दिसून येते. फादर स्टीफन्स याच्या ख्रिस्तपुराणाच्या देवनागरी लिप्यंतराला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे :

“देवनागरी लिपीचा अभ्यास केल्याने ख्रिस्ती धर्म बुडेल ही कल्पना जितकी खोटी आहे तितकीच ख्रिस्तपुराण किंवा मूळ बायबल वाचल्याने हिंदु धर्म गोत्यात येईल असे मानणे वेडेपणाचे आहे.…एकमेकांची धर्मपुस्तके सहानुभूतिपूर्वक वाचल्याने केवळ धर्मद्वेष व चुकीचे पूर्वग्रह यांना धक्का बसेल व परस्परांमध्ये प्रेम व बंधुभाव उत्पन्न होईल. प्रेम म्हणजेच बंधुभाव हे कोणत्याही धर्माचे अधिष्ठान आहे. मध्ययुगीन धार्मिक असहिष्णुतेच्या कल्पना आम्ही जितक्या सोडून देऊ तितकी आमची लवकर आध्यात्मिक उन्नती होईल, असा माझा ठाम विश्वास आहे.”

प्रियोळकरांच्या सामाजिक इतिहासलेखनाला तत्कालीन विचारव्यूहातील प्रस्थापित दृष्टीची मर्यादा होती, हे मान्य करूनही ते थोर वाङ्मय संशोधक ठरतात, ते त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......