‘एका पुनर्विवाहाची कहाणी’ अर्थात ‘शेठ माधवदास रघुनाथदास यांच्या आत्मलिखित पुनर्विवाहाच्या चरित्राची कहाणी’
ग्रंथनामा - झलक
प्रदीप कर्णिक
  • ‘एका पुनर्विवाहाची कहाणी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 17 May 2023
  • ग्रंथनामा झलक एका पुनर्विवाहाची कहाणी शेठ माधवदास रघुनाथदास

‘एका पुनर्विवाहाची कहाणी’ या शेठ माधवदास रघुनाथदास यांच्या दुर्मीळ पुस्तकाची नवी संशोधनपूर्ण आवृत्ती नुकतीच मराठी संशोधन मंडळाने प्रकाशित केली आहे. या पुस्तकाचा मूळ गुजरातीतून अनुवाद  आणि संपादन केले आहे प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी. या पुस्तकाला मंडळाचे माजी संचालक प्रदीप कर्णिक यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

................................................................................................................................................................

१.

१९व्या शतकाचे अभ्यासक आणि विशेषतः महाराष्ट्रातील विधवाविवाह चळवळीचे इतिहासकार म्हणून विख्यात असणाऱ्या डॉ. स. गं. मालशे यांनी ‘मराठी संशोधन मंडळ’ आणि ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या प्रकाशन विभागासाठी अनेक दुर्मीळ मराठी-इंग्रजी पुस्तिका मिळवून त्यांचे संपादन-प्रकाशन केले. त्या पुस्तकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या आवृत्त्या प्रकाशित करून त्यांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या. (पहा, ‘डॉ. स. गं. मालशे यांचे मराठी संशोधन मंडळ आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील योगदान’, म. सं. पत्रिका जुलै-सप्टेंबर २०२१, वर्ष ६८, अंक ४)

याच दुर्मीळ पुस्तिकांमध्ये त्यांनी एक पुस्तिका त्या वेळचे मराठी संशोधन मंडळाचे संचालक प्रा. रमेश तेंडुलकर यांच्याकडे प्रकाशनार्थ आणून दिली. ती पुस्तिका होती ‘शेठ माधवदास रघुनाथदास यांच्या आत्मलिखित पुनर्विवाहाच्या चरित्राची कहाणी’. प्रा. तेंडुलकरांनी ती कहाणी ‘मराठी संशोधन पत्रिके’तून क्रमशः प्रकाशित केली. (वर्ष २७, अंक १ ते ४ ऑक्टोबर १९७९ ते सप्टेंबर, १९८०)

पुढे याचे पुस्तक मराठी संशोधन मंडळाने १९८१ साली प्रकाशित केले. त्या पुस्तिकेला मालशे यांनी ‘एकोणिसाव्या शतकातील गुजराती-मराठी समाज आणि शेठ माधवदास रघुनाथदास’ अशी एक अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली. या पुस्तकाचे चांगले स्वागत झाले, कारण या मूळ पुस्तकाचा अनुवाद प्रख्यात समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांचे सहकारी सी. ग. देवधर यांनी केला होता. आणि तो अनुवाद आगरकरांनी ‘सुधारक’मधून १८९२ साली क्रमशः प्रकाशित केला होता, त्याचे पुस्तक १९०७ साली प्रकाशितही झाले होते व ते दुर्मीळ होते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

डॉ. मालशे ‘विधवाविवाह चळवळ : १८०० ते १९००’ या ग्रंथासाठी सामग्री गोळा करीत असताना दिल्लीच्या नेहरू म्युझियममधील 'सुधारका'च्या संचिका पाहाव्या लागल्या. त्या चाळीत असताना ही कहाणी प्रथम त्यांच्या नजरेस पडली, असे त्यांनी या पुस्तकाला जोडलेल्या ‘दोन शब्द’ या प्रास्ताविकात म्हटले आहे. पुढे त्यांना शंकर गणेश दाते यांच्या ‘मराठी ग्रंथसूची’त या 'सुधारक'मधील अनुवादाची पुस्तिका १९०७ साली प्रकाशित झाली होती, हाही शोध लागला, पण ती पुस्तिका त्यांना मिळाली नाही. पुढे ही दुर्मीळ पुस्तिका डॉ. भीमराव कुळकर्णी यांच्या व्यक्तिगत संग्रहात सापडली. त्यावरून ‘मराठी संशोधन पत्रिके’तून ती प्रकाशित झाली आणि नंतर १९८९ साली मंडळाने दुसरी आवृत्ती म्हणून ती पुस्तिका मालशे यांच्या प्रस्तावनेसह प्रकाशित केली.

मंडळाने प्रकाशित केलेल्या आगरकर-देवधर यांच्या अनुवादित पुस्तकावर गुजराती भाषेतील ‘ग्रंथ’ या नियतकालिकात (मे १९८२, पृ. ३५-३६ व ४२) भारती वैद्य यांनी अभिप्राय लिहिला होता, तो ‘एका वाचका’च्या वाचनात आला. त्या गुजराती लेखाच्या कात्रणासह त्या ‘एका वाचका’ने सोबत आपले टिपण जोडून पत्रिकेकडे पाठवले. ते टिपण प्रा. रमेश तेंडुलकर यांनी ‘मराठी संशोधन पत्रिके’त प्रकाशित केले. ते पत्र वाचल्यावर कोणाचेही कुतुहल जागे होण्यासारखे असल्याने ते मूळ पत्र देत आहे.

“स.न.वि.वि.

एक वाचक

‘मराठी संशोधन पत्रिके’तून क्रमशः प्रसिद्ध झालेले मराठी संशोधन मंडळाचे ‘शेट माधवदास रघुनाथदास यांचे आत्मलिखित पुनर्विवाह चरित्र’ या अनुवादित पुस्तकावर भारती वैद्य यांनी गुजरातीत लिहिलेला अभिप्राय (‘ग्रंथ’, मे १९८२, पृ.३५-३६ व ४२) वाचण्यात आला. मूळ पुस्तक गुजराती असल्यामुळे गुजरातीतील अभिप्रायाविषयी कुतूहल निर्माण झाले. भारती वैद्य यांनी या मराठी अनुवादाचे महत्त्व मान्य केले आहे, तथापि काही तपशील वगळले गेले आहेत व त्यामुळे रसपरिपोषाच्या दृष्टीने या अनुवादात काही अंशी उणेपणा राहतो असे सूचित केले आहे. धनकुंवरचा पहिला पती नादान होता, त्याला चोऱ्या करण्याची खोडी होती. एकदा तो पकडला गेला असताना त्याच्या नातेवाईकांनी धनकुंवरला फिर्यादीकडे जाऊन नवऱ्याच्या वतीने अजीजी करावया लावले. पुढे अशा व्यसनांपायीच तो मृत्यू पावला इत्यादि हकिकत मराठी अनुवादात वगळण्यात आली आहे. मुळात ही हकिकत धनकुंवरविषयी कारुण्याची भावना निर्माण करणारी आहे. पुढे माधवदासाशी तिचे लग्न होते, त्या प्रसंगावर गाणी रचली गेल्याचा निर्देश मराठी अनुवादात आहे, पण माधवाने पांडवाप्रमाणे मत्स्यभेद करून धनकुंवररूपी पांचाली मिळविली किंवा माधव या नावावर कोट्या करून त्यांनी रुक्मिणीहरण केले, अशा तऱ्हेचे त्या वेळेच्या वातावरणावर प्रकाश टाकणारे तपशील त्या गाण्यांत आहेत, याचा उल्लेख मराठी अनुवादात नाही. धनकुंवरचे पत्र किंवा इतरत्र नात्यांसंबंधी निर्देश करणाऱ्या मराठी शब्दांतून मराठी वाचकाचा नाही, तरी मराठी वाचणाऱ्या गुजराती वाचकाच्या मनाचा गोंधळ उडण्याचा संभव आहे, असे भारती वैद्य यांनी दाखविले आहे.

भारती वैद्य यांनी प्रस्तुत पुस्तकावर टीका करण्याच्या दृष्टीने हे लिहिलेले नाही. उलट त्यांनी या अनुवादाचे आणि संपादनाचे कौतुकच केले आहे. ते करताना मराठीमध्ये या अनुवादाचे पुनर्मुद्रण व्हावे, अभ्यासपूर्ण नवी आवृत्ती निघावी आणि गुजरातीत मात्र आज हा ग्रंथ दुर्लक्षित राहावा, याची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत केवळ अनुवादाच्या दृष्टीने मूळ गुजराती पुस्तक आणि आज उपलब्ध स्वरूपातही आपणास चटकदार वाटणारा मराठी अनुवाद यांचा तौलनिक विचार कोणी केल्यास भाषांतरकारांची दृष्टी आणि मूळ ग्रंथाचे स्वरूप या दृष्टीने विचारांना चालना मिळेल.” (म. स. पत्रिका - जाने. -मार्च १९८२, वर्ष २९, अंक २, पृ. ७६)

हे पत्र वाचल्यापासून मी मूळ गुजराती पुस्तकाच्या शोधात होतो, पण प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो हेच खरे! सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ हे डॉ. स. गं. मालशे यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्या निमित्ताने मराठी संशोधन पत्रिकेने ‘डॉ. स. गं. मालशे जन्मशताब्दी विशेषांक’ (वर्ष ६८, अंक ४) प्रकाशित करण्याचे ठरवले आणि त्या अंकात ‘ग्रंथ’ या गुजराती नियतकालिकात आलेल्या परीक्षणांचा मराठी अनुवाद छापायचे ठरवले. तो अनुवाद मंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भोंजाळ यांच्या ओळखीमुळे श्री. शशिकांत जोशी यांनी करून दिला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पुढे असे लक्षात आले की, पत्रिकेचे लेखक प्राचार्य विश्वास पाटील हेसुद्धा गुजराती-मराठी अनुवाद उत्तम करतात, हे समजल्यावर मूळ गुजराती पुस्तक कसे मिळवता येईल, याची चर्चा सुरू झाली आणि चंद्रकांत भोंजाळ यांनी दीपकभाई मेहता यांना गाठले. १९व्या शतकाचा अभ्यास असणाऱ्या आणि १९व्या शतकातील अत्यंत दुर्मीळ ग्रंथ/नियतकालिकांचा संग्रह जतन करणाऱ्या दिपकभाई मेहतांनी लगेच मूळ गुजराती पुस्तक उपलब्ध करून दिले.

पुस्तक हाती पडल्यावर झपाटल्यागत प्राचार्य विश्वास पाटील यांनी पुस्तकाचा मराठी अनुवाद करून ई-मेल केला. अत्यंत समर्पक शब्दांत अनुवादाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून दिली. आज ते पुस्तक मराठी संशोधन मंडळातर्फे प्रकाशित करताना आम्हाला एक वर्तुळ पूर्ण केल्याचा आनंद होतोय. आगरकर-देवधर यांचे पुस्तक तर आहेच, परंतु मूळ गुजराती पुस्तकाचाही अनुवाद प्रकाशित केल्याने भारती वैद्य (आणि ‘एक वाचक’) यांनी ज्या त्रुटी नमूद केल्या होत्या, त्या या अनुवादामुळे भरून निघत आहेत. संशोधन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत कसे झिरपत जाते व त्याला पूर्णत्व कसे येत जाते, याचा हा एक नमुना म्हणता येईल.

२.

गोपाळ गणेश आगरकर आणि सी. ग. देवधर यांनी मराठीत अनुवाद करण्यासाठी मूळचे पुस्तक कुठले घेतले होते, इंग्रजी की गुजराती, याविषयी मला खूप कुतूहल होते. त्याचाच शोध घेत असताना मला डॉ. मालशे यांच्या प्रस्तावनेतील एका वाक्याने चांगलेच संभ्रमात टाकले. प्रस्तावनेच्या तेरा क्रमांकाच्या पानावर मालशे असे लिहितात की, “ही कहाणी प्रथम इंग्रजीत लिहून मग तिचे गुजरातीत भाषांतर करण्यात आले, असे इंग्रजी आवृत्तीच्या प्रस्तावनेत श्री. काब्राजी यांनी म्हटले आहे; पण ते बरोबर नाही. गुजरातीवरूनच ती इंग्रजी भाषांतरित झालेली आहे.” हा ठाम पुरावा निराधार नाही. यासाठी मालशे ‘बुद्धिप्रकाश’, ५० ४० अंक ७ (जुलै १८९३) पृ.१६० हा संदर्भ देतात. मात्र लेख/पत्र/परीक्षण की ग्रंथाची जाहिरात या विषयी त्यात अधिक तपशील नसल्याने नेमका अंदाज लागत नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रस्तुत पुस्तकाचा अनुवाद गुजरातीतून मराठी भाषेत झालेला आहे. आगरकरांचे भाषांतर आणि हे आता प्रकाशित होऊ घातलेले भाषांतर यांचा तौलनिक अभ्यास करणे शक्य असल्याने काही उलगडा होऊ शकतो. डॉ. मालशे इंग्रजी पुस्तकाला असणाऱ्या काब्राजींच्या प्रस्तावनेचा उल्लेख करतात, याचा अर्थ त्यांनी इंग्रजी पुस्तक नक्की पाहिले होते. गुजराती पुस्तक त्यांच्या पाहण्यात आले नसावे, असे वाटते. नाहीतर डॉ. मालशे यांच्यासारख्या साक्षेपी संशोधकाने असे विधान केले असते का? मूळ इंग्रजी पुस्तक हाताशी नसल्याने डॉ. मालशे यांच्या विधानाचा उलगडा होणे शक्य नाही.

तसेच ‘सुधारक’मधील क्रमशः प्रकाशित झालेली कहाणी १९०७ साली प्रकाशित झालेली पहिली आवृत्तीही हाताशी नसल्याने त्या मूळ प्रती तपासता आलेल्या नाहीत. ‘मराठी ग्रंथसूची’त शंकर गणेश दाते काटेकोरपणे तपशील देतात, पण १९०७ सालच्या पहिल्या आवृत्तीच्या नोंदीत त्यांनी मूळ ग्रंथाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आगरकर यांनी कोणता मूळ ग्रंथ समोर ठेवला असेल, याची उत्सुकता ताणली गेल्यास नवल नाही. त्याचा काही उलगडा गुजराती पुस्तकाचा प्राचार्य विश्वास पाटील यांनी हा जो प्रस्तुत अनुवाद केला आहे, त्यावरून होतोय असे वाटते.

प्राचार्य विश्वास पाटील यांनी वापरलेल्या मूळ गुजराती प्रतीतील पहिली चार पाने गहाळ आहेत. तरीही त्यांनी प्रस्तावनेतील पाच व सहा या दोन पानांचाही अनुवाद दिला आहे. ती दोन पानेही अत्यंत महत्त्वाची ठरतात. अर्थात इंग्रजी आणि गुजराती पुस्तकात काब्राजींच्याच प्रस्तावना आहेत, असे मालशे/पाटील यांच्या तपशिलांवरून दिसते, मात्र त्या भाषांतरित आहेत की दोन्ही ग्रंथांसाठी स्वतंत्रपणे लिहिल्या आहेत, हे तपासायला मूळ इंग्रजी प्रत हवी होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

गुजराती पुस्तकातील प्रस्तावनेच्या शेवटच्या परिच्छेदात काब्राजी (‘रास्त गोफ्तार’चे संपादक) असे लिहितात की, “हा ग्रंथ आधी इंग्रजीत लिहिता गेला होता. आज काही अंशी विधवांच्या प्रश्नाने इंग्रज सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे... पुनर्विवाह करणाऱ्या हिंदू विधवांना आपला वारसा हक्क गमवावा लागू नये म्हणून प्रथम कायदा करून नामदार सरकारने कायदेशीर उत्तेजन अप्रत्यक्षपणे दिले. या घटनेला आज पस्तीस वर्षांचा काळ लोटला (हा १८५६चा कायदा असावा) असला तरीही विधवाविवाह कार्याला गती लाभली नाही. यामुळे नामदार सरकारला आपला दृष्टिकोन पार पाडण्यासाठी पुढचे कायदेशीर पाऊल काय उचलायचे याविषयी चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा पुढे चालावी, आणि नामदार सरकारवर काही प्रभाव पडावा या भावनेने हा ग्रंथ इंग्रजीतून छापला गेला होता. इंग्रजीनंतर अगदी स्वाभाविकपणे या ग्रंथाचे गुजराती भाषांतर आले आहे. इंग्रजी वाचणारे हिंदू बंधू संख्येने अल्प असल्यामुळे वाचकांसमोर त्यांच्याच भाषेत हा लघुग्रंथ सादर करायची परवानगी घेत आहोत.”

या प्रस्तावनेच्या तळाशी ‘मुंबई, २५ जून १८९१’ अशी तारीखही दिली आहे. प्रस्तावनाकाराने हे स्पष्ट केले आहे की, इंग्रजीत प्रथमतः ग्रंथ प्रकाशित झाला नंतर गुजरातीत झाला.

प्राचार्य विश्वास पाटील यांनी या गुजराती पुस्तकावर शेठ वल्लभदास पोपट यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रकाश’ या गुजराती नियतकालिकात (फेब्रुवारी, मार्च, मे, जून, जुलै १८९३) प्रकाशित झालेल्या दीर्घ परीक्षणाचा संक्षिप्त, संपादित, अनुवाद दिला आहे.

परीक्षणकर्ते गुजराती भाषेतील ग्रंथाचेच परीक्षण करत आहेत, याची खात्री करणारे त्यांचे एक वाक्य असे आहे की, “गुजराती भाषेतील चरित्र ग्रंथांच्या संपदेत या ग्रंथाने मोलाची भर घातली आहे.”

‘बुद्धिप्रकाश’चा जो संदर्भ डॉ. मालशे देतात (जुलै १८९३, पृ.१६०) तो आणि या परीक्षणाचा संदर्भ एकच आहे असे दिसते, तरीही मालशे यांनी पृ. १६० वर काय पाहिले, वाचले आहे ते तपासता येईल. कारण ‘बुद्धिप्रकाश’चे सर्व अंक प्राचार्य विश्वास पाटील यांनी मिळवले आहेत. परंतु ते तपासण्याची आवश्यकता उरत नाही, असे पुरावे शेठ माधवदास रघुनाथदास यांनीच नमूद करून ठेवले आहेत. गुजराती पुस्तकामुळे ते पूर्णतः स्पष्ट झाले आहेत. मालशे यांनी गुजराती पुस्तक जर पाहिले असते किंवा त्यांना उपलब्ध झाले असते तर त्यांनाही हा उलगडा सहज झाला असता. शेठ माधवदास रघुनाथदास यांनी काय नमूद केले आहे ते आपण पाहू या.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या गुजराती पुस्तकाला लेखक शेठ माधवदास रघुनाथदास यांनी चार परिशिष्टे जोडली आहेत. त्यापैकी चौथे परिशिष्ट ‘जनमताचा कौल’ हे आहे. यात लेखकाला आलेल्या अनेक प्रतिक्रियांपैकी निवडक तीन प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया देण्यापूर्वी शेठ माधवदास यांनी एक टीप दिली आहे. ती अशी -

“आमच्या पुनर्विवाहाच्या कहाणीचा हा ग्रंथ प्रकाशित करण्यापूर्वीच मागील वर्षी मी याच विषयावरचा एक इंग्रजी ग्रंथ प्रकाशित करून त्याचे खाजगी वितरण केले होते. सदर ग्रंथाची एकेक प्रत मी मुंबई व मुंबईबाहेरच्या सद्गृहस्थांना व सुधारणाप्रिय मान्यवरांना पाठवली होती. त्यांच्याकडून मोठ्या संख्येने प्रतिक्रिया मला मिळाल्या आहेत...”

हा उल्लेख लेखकाचाच असल्याने संभ्रम दूर व्हायला हरकत नाही. परिशिष्ट चारमध्ये माधवदास यांनी ज्या तीन प्रतिक्रिया दिल्यात, त्या सर्व ‘मे १८९०’मधल्या आहेत. ‘मागील वर्षी’ हा जो टिपेतील संदर्भ आहे, तो पाहता १८८९ साली इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले व दोन वर्षांनी गुजराती पुस्तक प्रकाशित झाले हे स्पष्ट होते.

मुंबई व मुंबईबाहेरच्या सुधारणाप्रिय व्यक्तींना माधवदासांनी हे पुस्तक पाठवले, त्यात गोपाळ गणेश आगरकर असणार यात शंका नाही.

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या भाषांतराचे पहिलेच वाक्य असे आहे की, “मी हिंदू असून अठरा वर्षापूर्वी एका विधवेशी विवाह केला.”

प्राचार्य विश्वास पाटील यांनी केलेल्या अनुवादित पुस्तकातील प्रकरण पहिल्यातील वाक्य असे आहे की, “ही घटना आजपासून वीस वर्षापूर्वी घडली.” या दोन्ही वाक्यातून पहिले पुस्तक कोणते व दुसरे पुस्तक कोणते हे पूर्णपणे स्पष्ट होत आहे.

आता प्रश्न असा उरतो की, गुजराती पुस्तक हा इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद /भाषांतर आहे का?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

३.

दोन्ही पुस्तकांचा आशय, घटना, पात्रे, स्थळ, कहाणी एकच असली तरी कोणतेही पुस्तक एकमेकांचा अनुवाद नाही वा भाषांतरित नाही. मालशे ठामपणे सांगतात की, गुजरातीवरून ती इंग्रजीत भाषांतरित झाली आहे, याचा एक अर्थ असा असू शकतो की, इंग्रजी अनुवाद वा लेखन शेठ माधवदास यांनी केले नसावे, ते त्यांनी कोणाकडून तरी करवून घेतले असावे, आणि ते करणाऱ्या गृहस्थासाठी कदाचित गुजरातीत प्रथम छोटेखानी कहानी लिहून दिली असेल व त्यावर त्या शेठ माधवदासांनी अनेकांना पाठवल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आणि स्वसमाजातील लोकांसाठी म्हणून शेठ माधवदासांनी मूळ गुजराती छोटेखानी कहाणीचा विस्तार करून प्रस्तुत गुजराती ग्रंथ लिहिला असणार. अर्थात हा अंदाजच आहे.

मालशे ‘बुद्धिप्रकाश’चा जो पुरावा देतात तो पोपट यांच्या परीक्षणातीलच आहे, त्या दाखल्यावरून वर नमूद केलेला क्रम जाणवतो. अर्थात मूळ पुरावा अजूनही अपुराच म्हणायला हवा. वर नमूद केलेला भाषांतराचा क्रम असेल तर नवे प्रश्न निर्माण होतात. एक, मूळ गुजरातीत लिहिलेली कहाणी कुठे आहे? तिचे इंग्रजी भाषांतर कोणी केले? इंग्रजी पुस्तकात त्याचे दाखले असतील का? या व अशा प्रश्नांचा शोध अजूनही घेता येण्यासारखा आहे.

आगरकर-देवधर यांनी केलेला अनुवाद आणि प्रस्तुत पुस्तकाचा प्राचार्य विश्वास पाटील यांनी केलेला अनुवाद तौलनिकदृष्ट्या अभ्यासण्यासारखा विषय आहे. तौलनिक साहित्याभ्यासाच्या एखाद्या मान्यवर अभ्यासकाने हा अभ्यास हाती घ्यायला हरकत नाही. प्राचार्य विश्वास पाटील यांनी या अभ्यासाचे दिशादिग्दर्शन आपल्या प्रस्तावनेत करून ठेवले आहेच, शिवाय त्यांना जितक्या काही त्रुटी, दोष, गफलती विशेषतः नात्यातील गफलती ज्या मूळ इंग्रजीवरून केलेल्या मराठी भाषांतरात झाल्या आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न उत्तम केला आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्राचार्य विश्वास पाटील यांनी केलेला अनुवादही सकस झाला आहे. शिवाय त्यांनी मालशे यांची प्रस्तावना, ‘बुद्धिप्रकाश’मधील लेख, परीक्षणे यांचाही अतिशय चपखल वापर केला आहे. तळटिपा न देता मजकुरातच कसात संदर्भ देऊन वाचकांना अधिक तपशील पुरवला आहे. यावरून त्यांनी घेतलेले परिश्रम सहज लक्षात येतील. (मूळ गुजराती ‘ग्रंथात बोल्ड व इटालिक फॉन्टमध्ये शीर्षके व उपशीर्षके असल्याने’, पहा पृ. ४६-४७- विश्वास पाटील यांच्या कंसातील संपादकीय भर साध्या फॉन्टमध्येच ठेवली आहे, वाचकांनी ते कृपया लक्षात घ्यावे.) गुजरातीतून मराठीत केलेला अनुवाद ओघवता तर आहेच, पण तो कुठेही अनुवाद आहे, असे वाटू न देणारा उतरला आहे.

मालशे यांनी त्यांच्या पुस्तकाला ‘एकोणिसाव्या शतकातील गुजराती-मराठी समाज आणि शेठ माधवदास रघुनाथदास’ अशी एक दीर्घ प्रस्तावना जोडली आहे. प्रा. अ. का. प्रियोळकर यांनी ‘विविधवृत्ता’च्या १९४७च्या दिवाळी अंकात लिहिलेला ‘मुंबईतील मराठी आणि गुजराती’ असा एक लेख लिहिला होता. तो मला खुणावत होता. तो मिळवला आणि तो लेख या पुस्तकात पुनर्मुद्रित केला आहे. यामुळे मराठी-गुजराती ऋणानुबंधावर वेगळे भाष्य करण्याची काहीच आवश्यकता उरली नाही. प्रियोळकरांच्या लेखामुळे ही उणीव दूर झाली आहे.

या लेखात प्रियोळकरांनी ‘एल्फिन्स्टन नेटिव एज्युकेशन इन्स्टिट्यूशन’च्या इंग्रजी शाळेतील उच्च वर्गातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिली आहे. मराठी संशोधन मंडळाने गणपत लक्ष्मण यांचा इंग्रजी निबंध मराठीत अनुवाद करून घेऊन मूळ इंग्रजीसह पुस्तकरूपाने प्रकाशित केला आहे. (६ जुलै २०१९) त्यात गणपत लक्ष्मण यांचा शोध घेताना मी प्रियोळकरांच्या गोविंद नारायण माडगांवकरांच्या एका चरित्रात्मक लेखाचा वापर केला होता. त्या लेखातही प्रियोळकरांनी वर नमूद केलेल्या यादीचा संदर्भ दिला आहे. परंतु त्यात मला गणपत लक्ष्मण यांचा उल्लेख सापडला नाही. प्रियोळकरांच्या प्रस्तुत लेखात ती यादी पूर्ण दिली असून, त्यात १८४२ सालात गणपत लक्ष्मण यांचा निर्देश आहे. ते परभु समाजातील होते आणि शाळा सोडून ते नंतर ठाण्याच्या कलेक्टर कचेरीत नोकर असल्याचा उल्लेख आहे. हा किंचित तपशीलही गणपत लक्ष्मण यांच्या शोधकार्यात अधिक माहिती पुरवतो, म्हणूनही याचे मोल मला विशेष वाटले. तसेच ही यादी पाहून/वाचून आणखी कोणा व्यक्तीचे अधिक तपशील प्राप्त झाले तर ते उत्तमच ठरेल.

‘एका पुनर्विवाहाची कहाणी’ - शेठ माधवदास रघुनाथदास,

मराठी अनुवाद आणि संपादन - प्राचार्य डॉ. विश्वास पाटील,

मराठी संशोधन मंडळ, मुंबई | मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......