नारायण राणे भाजपमध्ये जात आहेत म्हणे!
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • नारायण राणे यांची एक भावमुद्रा
  • Wed , 29 March 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress नारायण राणे बाळासाहेब ठाकरे शिवसेना

शिवसेनेला आवाज देत नारायण काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी त्यांना हिंमतबाज पुढारी असं संबोधलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सेनेवर पकड घट्ट असतानाचा तो काळ होता. राणे आणि सेनेत, विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या तेव्हा बाळासाहेब राणेंना उद्देशून म्हणत, ‘नारूला काय कमी केलं मी? तो असं का करतो?’ शिवाजी पार्कच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

शिवसेनेतल्यांना आणि बाहरेच्यांनाही बाळासाहेबांचं हे म्हणणं पटायचं. राणेंना सेनेनं नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री अशी महत्त्वाची सर्व पदं दिली. या पदांमधून त्यांच्याभोवती राज्यातला शक्तिमान नेता असं वलंय उभं राहिलं. त्या बळावर सेनेत राणेंनी स्वत:चा गट तयार केला. राज्यभर कार्यकर्ते तयार केले.

सेनेतून बाहेर पडताना जे अडलेपण राणेंच्या समोर आ वासून उभं होतं, ते आता पुन्हा उदभवलं आहे. राणे भारतीय जनता पक्षात जाणार अशा बातम्या पसरत आहेत. राणेंही दिल्ली-मुंबईत जुळवाजुळव करत आहेत. अंदाज घेत फिरत आहेत. प्रसारमाध्यमांशी दिलखुलास बोलत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करत आहेत.

राज्यात विधानमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. त्या दरम्यान एक विनोद ऐकायला मिळाला-. ‘राणेंना भाजप घ्यायला तयार आहे. पण उपदव्यापी मुलं वगळून हा सौदा होईन.’ आहे की नाही फिदीफिदी हसण्यासारखा मामला? राणेंना मुलाबाळांचं पडलंय आणि हा विनोद पेरणारे नेमके त्यांच्याच राजकीय करिअरवर उठलेत. यातला विनोदाचा भाग सोडला तरी राणेंच्या दोन्ही मुलांना इतर लोक किती टरकून आहेत हे दिसून येतंय. विनोदात भयानक वास्तव असतं.

राणेंच्या मुलांचा हा जाच काँग्रेसवाल्यांनीही सतत अनुभवला. कोकणात राणे समर्थकांव्यतिरिक्त इतर कार्यकर्ते राणेंच्या मुलांना अक्षरक्ष: वैतागलेत. ही नाराजी काँग्रेसजन जाहीरपणे व्यक्त करताना दिसतात.

राणेंच्या काँग्रेस सोडण्याच्या बातम्यांना ताजी फोडणी त्यांचा मोठा मुलगा, निलेश राणे यांनी काँग्रेस पक्षाच्या राज्य सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर मिळाली. निलेश राणे २०१४ची खासदारकीची निवडणूक हरले. त्यानंतर विधानसभांच्या निवडणुकीत नारायण राणेंचा धक्कादायक पराभव झाला. त्यावेळी राणे एकदम हादरूनच गेले होते. पुढे बांद्रा पोटनिवडणुकीतही राणेंनी हात दाखवून अवलक्षण ओढवून घेतले. ही हार तर खूपच दारुण झाली. राज्याचा नेता एका साध्या सेनेच्या उमेदवाराकडून हरला गेला ही राणेंची खूप मोठी राजकीय शोकांतिका ठरली. त्यानंतर राणे हतबल झालेले दिसले. लोकांची सेवा करायची की नाही हे आम्हाला आता ठरवावं लागेल असं ते बोलले होते.

राणेंची ही शोकांतिका का झाली?

सर्व यशस्वी माणसांचा अंत त्यांच्या शोकांतिकेनं होतो, असं म्हणतात. राजकारणात तर ते खूपच खरं आहे असं दिसतं. राणे एक काळ यशाच्या शिखरावर होते. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना त्यांचा रुबाब, दरारा काय दर्जाचा होता हे सांगणारे आजही अनेक जण भेटतात. पण हे फक्त राणेंच्या बाबतीतच केवळ नाही. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. शरद पवारांना त्यांच्या पंचाहत्तरीत पक्षाची वाताहत पाहावी लागतेय. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा यांचे शेवटचे दिवस करुणामय होते. लोक आपल्याबरोबर नाहीत ही त्यांना बोच होती.

यशस्वितांची अपयशी होऊन शोकांतिका होणार हा लोकव्यवहार असला तरी तो टाळता येऊ शकतो. त्यासाठी यशाच्या कोणत्या थांब्यावर थांबायचं याची हुशारी अंगी हवी. छान चाललेलं असताना वेळीच थांबून अपयश, शोकांतिका टाळता येऊ शकतात. हे शहाणपण यशस्वितांना सांगणारं कुणीतरी भेटत असेल काय? अशा शहाण्यांचं जर या जेत्यांनी ऐकलं तर त्यांच्या शोकांतिका थांबू शकतील. पण ते घडताना दिसत नाही.

राणेंची वाटचाल तर अपयशाची गाठ पडावी अशीच सुरू आहे. सेनेचे मुख्यमंत्री झाले तो काळ राणेंचा यशाचा सर्वोच्च बिंदू होता. पण त्यांना अल्प काळ मुख्यमंत्री होता आलं. पुढे सेना-भाजपची हार झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली. सेनेची पडझड सुरू झाली. ती पाहून राणे काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्या स्वभावाच्या विपरीत ते होतं.

काँग्रेसमध्ये मला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, असं राणे जाहीर मुलाखतीत सांगतात. खरं म्हणजे राणेंसारख्या चतुर राजकीय नेत्याला काँग्रेसचं स्वरूप वेळीच कळायला हवं होतं. काँग्रेसी रचना, कार्यपद्धती, हायकमांड संस्कृती ही खूप विचित्र व्यूहरचना आहे. तिथं कशाचाच काही भरोसा नसतो. सर्वत्र अनिश्चितता आणि सतत शह-काटशह, टाळाटाळ, ढकलाढकली हेच ज्या संघटनेचं वैशिष्ट्य आहे तिथं राणेंना कुणी शब्द दिले? ते पाळणार कोण? हे सगळे बेभरवशाचे होते.

काँग्रेसमध्ये मोठमोठ्या दिग्गजांचं जे होतं ते राणेंचं झालं असणार. राणेंना मुख्यमंत्री होता आलं नाही, पण उद्योगासारख्या चांगल्या खात्याचं मंत्री राहता आलं यापेक्षा जादा काही मिळणार नाही हे वास्तव राणेंनाही लवकर कळलं असणार. म्हणून ते मन मारून काँग्रेसमध्ये राहिले. राणेंना दररोज आक्रमकपणा लपवून वागावं लागलं. किती भयानक ना हे?

सध्या काँग्रेसवर कधी नव्हे ते वाईट दिवस आहेत. राज्यात काँग्रेसचे ४१ आमदार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते आहेत. दररोज बातम्या येतात की, काँग्रेसचे बरेच आमदार भाजपच्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. राणेही संपर्कात आहेत हेही बातम्यांत म्हटलं जातं. विखेंनाही भाजपचं निमंत्रण आहे म्हणतात. खरं काय खोटं काय? कोण जाणे!

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सिंधुदुर्ग आणि अहमदनगर हे दोन जिल्हे सोडले तरी कुठेही काँग्रेसला अच्छे दिन नाहीत. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता येऊ शकलेली नाही. साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण असताना जिल्हा परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी वरचढ आहे.

माणिकराव ठाकरेंच्या जिल्ह्यात काँग्रेस शेवटची घटका मोजतेय. पुणे जिल्ह्यात हर्षवर्धन पाटील काँग्रेसला बरे दिवस आणू शकत नाहीत. लातूर हा विलासराव देशमुखांच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला. आता अमित देशमुख तिथं आमदार आहेतत, पण जिल्हा परिषद भाजपने दिमाखदार विजय मिळवत देशमुखांच्या हातातून हिसकावून घेतली. लातूरचा काँग्रेसी गड कोसळलाय.

या पडझडीची डागडुजी करायला राज्याचं नेतृत्व काही करत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसची दारुण पडझड होतेय. तिथं जिल्ह्याला ऐन निवडणुकीत अध्यक्षच नाही. हा काँग्रेसचा करंटेपणा आहे असा आरोप खुद्द नारायण राणेंनी केला आहे. निलेश राणेंनी राजीनामा देण्याचं ते एक प्रमुख कारण आहे. रत्नागिरीत अध्यक्ष कुणाच्या गटाचा करायचा यावरून वाद आहे. राणे कुटुंबाला त्यांच्या मर्जीचा अध्यक्ष हवाय, तर आमदार भाई जगताप यांचा सूर वेगळा आहे. भाई राणे कुटुंबाचं सर्व खपवून घ्यायला तयार नाहीत. अशा वादात एक घाव दोन तुकडे करायचे नाहीत. नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घ्यायची ही खास काँग्रेसी संस्कृती आहे. दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत काँग्रेस अशा चालीने चालण्याची पद्धत पडल्याने या पक्षाला खूपदा घाटा होतो. अशा भिजत घोंगडे ठेवण्याच्या पद्धतीमुळे गोवा आणि मणिपुरात काँग्रेस पक्षाला सत्तेचा  घास हाता-तोंडाजवळ येऊन सोडून द्यावा लागला. भाजपने तो हिसकावून घेतला. सोनिया गांधी आजारी, राहुल पराभवाच्या छायेत आहेत.

या सर्व काँग्रेस संस्कृतीत राणे रमणं शक्य नाही. त्यांचा स्वभाव तडकाफडकी काही करण्याचा आहे. खरं म्हणजे राणें यांच्या व्यक्तिमत्त्वातला शिवसैनिक इतकी वर्षं काँग्रेसमध्ये टिकला कसा याबद्दल अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात. राणे आता पासष्टीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना स्वत:पेक्षा मुलांच्या राजकीय पुनर्वसनाची काळजी असणार. त्या काळजीपोटी ते सत्तेच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करत असणार, हे उघड आहे. भाजपमध्ये जाण्याची धडपड हा त्या अटीतटीच्या खेळाचा एक भाग आहे.

राणेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची खटपट चालू असताना अशोक चव्हाण गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राणे अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करताहेत. काँग्रेसचं प्रतिमाहनन करताहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी निष्ठावंत काँग्रेसनेत्यांची भूमिका पुढे येत आहे. राणेही काँग्रेसने आपल्यावर कारवाई करावी, अशी वाट पाहत आहेत की काय? असं वाटावं इतपत राणेंचं प्रसारमाध्यमांशी बोलणं आणि वर्तन आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘राणे सर्वांना हवेहवेसे आहेत’ असं म्हणून भाजप काय करू शकतो याचं सूचन केलं आहे. आता राणे आणि काँग्रेस काय करतात हे बघणं क्रमप्राप्त आहे.

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

Post Comment

Nivedita Deo

Wed , 29 March 2017

उत्तम आढावा


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......