‘हैदराबाद संस्थानातील पोलीस अॅक्शननंतरच्या हिंसाचारावरील दोन दस्तऐवज’ हे प्रमोद मंदाडे यांनी अनुवादित व संपादित केलेले पुस्तक नुकतेच हरिती पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले आहे. हैदराबाद विलीनीकरणानंतर या संस्थानांत मुस्लिमांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या झाल्या, त्यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक प्रथमच मराठीमध्ये प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला संपादक मंदाडे यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
................................................................................................................................................................
भारतीय ‘संस्थानी प्रदेश’ हा एक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा पण पूर्णपणे दुर्लक्षित केलेला विषय आहे. या गुंतागुंतीच्या इतिहासाकडे एकांगी नजरेने आणि पूर्वग्रहीत दृष्टीकोनातून पाहिले गेले आहे. मागच्या काही वर्षांत ‘संस्थानी प्रदेशाच्या’ विषयाकडे अनेक अभ्यासक आकर्षिले गेले आहेत आणि नव्या
दृष्टीकोनातून अभ्यासाचे प्रयत्न होत आहेत. हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणानंतर झालेल्या हिंसाचाराबाबतचे हे दोन दस्तऐवज प्रथमच मराठी भाषेत येत आहेत.
ब्रिटिशांच्या प्रत्यक्ष राज्यकारभाराखाली असणारे प्रदेश आणि अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली असणारी संस्थाने, असे वसाहतकालीन भारताचे प्रशासकीयदृष्ट्या दोन भाग पडतात. प्रशासनातील स्वायतत्ता, लोकसंख्या, क्षेत्रफळ, उत्पन्न, दर्जा इ. कसोट्यांवर या संस्थानामध्ये प्रचंड वैविध्य असल्याचे आपल्याला दिसून येते. संस्थानी प्रदेशात एकुण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक राहत होते. तर त्यांनी एकुण क्षेत्रफळाच्या ४० टक्के भूभाग व्यापला होता. संस्थानी प्रदेश आणि ब्रिटिश प्रदेश यांच्यात फक्त प्रशासकीय फरक नव्हता, तर त्यांच्यात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असे व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे मूलभूत फरक होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
राजे राजवाडे, संस्थानातील प्रशासन संस्थानातील विकास इ. विषयावर आपल्याला थोड्याफार प्रमाणात पुस्तके मिळतात, पण ‘संस्थानी जनता’ याच्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झालं आहे. बारबरा रामसॅक यांच्या मते संस्थानी प्रजेच्या या सामाजिक बदलावरच्या अभ्यासाच्या अभावामुळे संस्थाने स्थिर, अचल आणि मागास होती, या धारणेला बळकटी मिळते. संस्थानी प्रजेच्या वेगवेगळ्या जाती आणि धार्मिक समुदायांच्या संबंधातील बदलांचा आढावा रॉबीन जाफरी यांचे पुस्तक आणि वाल्टरूड अर्नस्ट व बिस्वमय पती यांनी संपादित केलेली पुस्तके खूप महत्त्वाची आहेत आहेत. जिज्ञासूंनी ती मुळापासून वाचली पाहिजेत.
मराठवाड्यात त्या काळात मुस्लिमांवर झालेल्या हिंसेबाबत अत्याचाराबाबत आणि हत्याकांडाबाबत पूर्णपणे शांतता बाळगली जाते. फ.म. शहाजिंदेंचा आत्मकथनात्मक लेख वगळता मराठीत याबाबत कोणी लिहिलेले मला आढळले नाही. मुस्लीम समाजात याबाबत उघडपणे बोलायला कोणी धजावत नाही. कारण याबाबत प्रचंड भीती आहे.
सुंदरलाल समितीच्या अंदाजानुसार हैदराबाद राज्यात पोलीस अॅक्शननंतर २७००० ते ४०००० हजार मुस्लीम मारले गेले असावेत. सुंदरलाल समितीने हा आकडा सांगण्याअगोदर ‘conservative estimate’ या शब्दाचा वापर केला आहे. म्हणजेच कमीत कमी झालेली हानी/नुकसान लक्षात घेऊन ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. आपण येथे कोणत्या हिंदू-मुस्लीम तणावाबाबत किंवा लहानसहान दंगलीबाबत बोलत नसून एका हत्याकांडाबाबत बोलत आहोत. त्यामुळे यावर समाजाने धारण केलेल्या मौनाला प्रचंड अर्थ. त्याचे गांभीर्य आपण लक्षात घेतले पाहिजे.
या पुस्तिकेत पोलीस अॅक्शननंतर झालेल्या हिंसाचाराबाबतचे तीन दस्तावेज मराठीत उपलब्ध करून देत आहोत. सुंदरलाल समितीच्या अहवालाचा सारांश आणि त्यासोबत जोडलेलं एक गोपनीय टिपण- जे राष्ट्रीय अभिलेखागारात (National Archives) उपलब्ध आहे. या दोन दस्तावेजांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद केला आहे. पोलीस अॅक्शननंतर झालेल्या पुनर्वसनाच्या प्रयत्नात अत्यंत सक्रीय सहभाग नोंदवणारे मोहम्मद अली खान यांच्या ‘भारतीय स्वातंत्र्याची देणगी’ (आझादी-ए-हिंद का तोहफा) या आत्मकथनात्मक पुस्तिकेचे उर्दूतून मराठीत भाषांतर करून त्याचा या पुस्तिकेत समावेश केला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
सुंदरलाल समितीचा अहवाल
हैदराबाद विलीनीकरणाच्या काळात आणि त्यानंतर पद्मजा नायडू हैदराबादमध्येच होत्या. पोलीस अॅक्शननंतर उसळलेल्या हाहाकारामुळे जिल्ह्याजिल्ह्यांतून, खेड्यापाड्यांतून जिवाच्या भीतीने उपाशी आणि आपले सर्वस्व गमावून मुस्लिमांच्या झुंडीच्या झुंडी हैदराबादमध्ये धडकत होत्या. त्या वेळी हैदराबाद शहरातदेखील हिंदू गटागटांनी मुस्लीम वस्तीवर हल्ले करत त्यांची घरेदारे जाळत फिरत होते. पद्मजा नायडू आणि त्यांच्या काही स्थानिक सहकाऱ्यांनी हैदराबाद शहरात १५०पेक्षा जास्त शांतता समित्या स्थापन केल्या, तसेच बाहेरून शहरात येणाऱ्या निर्वासितांसाठी छावण्या उभारल्या.
या सर्व गोष्टींबाबत ४ ऑक्टोबर १९४८ रोजी सरोजनी नायडू त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्रात याबाबत विस्ताराने वर्णन करतात. त्या लिहितात, ‘त्यांच्या राहत्या घराला एखाद्या प्रचंड गर्दीच्या रेल्वेस्थानकाचे स्वरूप आले आहे.’ त्या पुढे पत्रात नोंदवतात, ‘फक्त आदिलाबाद या एका जिल्ह्यातून १०,०००पेक्षा जास्त मुस्लीम निर्वासित हैदराबादला आले आहेत.’ त्या पुढे लिहितात, ‘हैदराबादमधील हिंदू येणाऱ्या हिंदू राजबाबत अरेरावीने बोलत सत्तेची नशा चढल्यासारखे वागत होते. तसेच या उसळलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी एकसुद्धा स्टेट काँग्रेसचा नेता पुढे आला नाही किंवा कोणी नावालादेखील याचा निषेध केला नाही.’ याउलट त्यांनी पद्मजा नायडू व त्यांच्या वडिलांना जे या निर्वासितांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना ‘देशद्रोही’ म्हणून जाहीर केले.
हे पत्र ‘राष्ट्रीय अभिलेखागा’रात उपलब्ध आहे. पद्मजा नायडूंनी केलेले वर्णन मुस्लिमांविरोधात उसळलेल्या हिंसाचाराचा अंदाज द्यायला पुरेसे आहे. या हिंसाचाराच्या अनेक बातम्या वर्तमानपत्रांत येत होत्या. त्यामुळे मोहम्मद युनूस सलीम, काझी अब्दुल गफ्फार यांनी मौलाना आझादांशी संपर्क साधला, तर पद्मजा नायडूंनी नेहरूंना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारी माहिती दिली. पद्मजा नायडू आणि मौलाना आझादांच्या विनंतीवरून नेहरूंनी एक समिती हैदराबादला प्रत्यक्ष परिस्थिती पाहून अहवाल देण्यासाठी पाठवली. ही समिती ‘सुंदरलाल समिती’ म्हणून ओळखली जाते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अहवाल तयार करणाऱ्या सुंदरलाल समितीच्या काही सदस्यांबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे. पंडित सुंदरलाल हे काँग्रेसचे उत्तर भारतातील महत्त्वाचे गांधीवादी नेते होते. ‘How India Lost Her Freedom’ या अत्यंत महत्त्वाच्या पण प्रसिद्ध होताच ब्रिटिशांनी बंदी घातलेल्या पुस्तकाचे लेखक सुंदरलाल होते. १९३१च्या कानपूर दंग्याची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने नेमलेल्या चौकशी आयोगाचे सुंदरलाल हे एक सदस्य होते. या आयोगाचा अहवाल ‘नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया’तर्फे ‘The Commun of Problem’ या नावाने पुन्हा २००५ साली प्रकाशित करण्यात आला. तसेच ते स्वातंत्र्यानंतर ‘ऑल इंडिया पिस कौन्सिल’चे १९५९-६३ या कालावधीत अध्यक्षही राहिले आहेत.
काझी अब्दुल गफ्फार हे सुंदरलाल समितीचे सदस्य होते. ते रझाकार आणि ‘मजलिस’चे अत्यंत कडवे टीकाकार म्हणून ओळखले जात असत. ते ‘पयाम’ (१९३४-४६) या हैदराबादच्या उर्दू वर्तमानपत्राचे संपादक आणि स्टेट काँग्रेसचे सक्रीय नेते होते. त्याचप्रमाणे अन्य सदस्यदेखील त्यांच्याइतकेच लायक आणि प्रामाणिक व्यक्ती होते. सुंदरलाल समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला, पण सरकारने हा अहवाल जाहीर केला नाही.
सुंदरलाल अहवाल विस्मृतीत जाणार नाही, यासाठी अनेक प्रयत्न झाल्याचे आपल्याला दिसतात. उर्दूत या अहवालाचा संदर्भ असणारे, तसेच पोलीस अॅक्शननंतरच्या हिंसेबाबत बऱ्याच आत्मकथा आपल्याला दिसतात, पण उर्दूत. दुर्दैवाने उर्दू ‘मुस्लिमां’चीच भाषा बनल्यामुळे सर्वसामान्य मुस्लिमेतरांना हे साहित्य उपलब्ध नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे फरिद मिर्झा, जे लोह्याचे (नांदेडमधील एक तालुका) तहसीलदार होते. त्यांनी रझाकारांच्या हिंसेला जाहीररित्या विरोध करत आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. पोलीस अॅक्शननंतरच्या काळात त्यांनी पुनर्वसनाच्या कामात, तसेच सुंदरलाल समिती हैदराबाद येथे आल्यानंतर तिच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला होता. १९७६मध्ये इंग्रजीत या काळाचे दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने एक छोटी पुस्तिका लिहून स्वतः प्रकाशित केली होती. या पुस्तिकेत मराठवाड्यात उसळलेल्या हिंसेबाबत आणि सुंदरलाल समितीबाबत अनेक संदर्भ मिळतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
हैदराबाद आणि मुस्लीम प्रश्नांवर काम करणाऱ्या विचारवंतांत उमर खालिदी हे खूप मोठे नाव आहे. हैदराबाद पोलीस अॅक्शननंतर झालेली हिंसा आणि राजकीय बदल यांचा मुस्लीम समूहावर झालेला परिणाम, यावर आयुष्यभर अथकपणे त्यांनी काम केलं आहे. १९८८मध्ये त्यांनी संपादित केलेलं ‘हैदराबाद आफ्टर द फॉल’ हे १९४८-६० या कालखंडातील मुस्लिमांच्या जगण्याच्या संघर्षाचे दस्तऐवजीकरण करणारे खूप महत्त्वाचे पुस्तक आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी लिहिलेले एकुण १२ लेख या पुस्तकात आहेत. सुंदरलाल समितीबाबत काम केलेल्या अनेक व्यक्तींच्या प्रदीर्घ मुलाखती घेऊन सुंदरलाल अहवाल ‘Retrive’ (पुनरुलिखित) करण्याचा प्रयत्न एका लेखात केला आहे.
या पुस्तकावर अनेक चर्चा झाल्याचे आपल्याला आढळतात. ए.जी. नुरानीदेखील याच परंपरेतील पुढचे नाव आहे. २००१मध्ये त्यांनी ‘सांगितलं न गेलेलं हत्याकांड’ (Untold Story Of Massacare) हा लेख ‘फ्रंटलाईन’ या मासिकात प्रसिद्ध केला. या विषयावर अत्यंत सखोल अभ्यास करत २०१३ साली ‘हैदराबादचे विध्वंस’ (Destruction Of Hydrabad) नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. इतकेच नव्हे, तर औसा शहरातील काही नागरिक एकत्र येऊन मागच्या अनेक वर्षांपासून दरवर्षी सुंदरलाल समितीचा अहवाल लागू करावा, अशी निवेदने १७ सप्टेंबरला देतात.
सुंदरलाल समितीचा अहवाल आणि हैदराबादच्या विलीनीकरणानंतर झालेलं हत्याकांड लोकांच्या आठवणीतून विस्मृतीत जाऊ नये, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले. हैदराबाद संस्थानमधील जवळपास सर्वच मुस्लिमांना प्रभावित करणारा आणि त्यांच्या जगण्याला निर्णायक प्रकारे वळण लावणारा क्षण, हा पोलीस अॅक्शन आणि त्यानंतरच्या हिंसाचाराचा काळ होता, हे आपण म्हणून समजून घेतले पाहिजे.
या पुस्तिकेत सुंदरलाल अहवालाचा सारांश आणि त्यासोबत असलेलं टाचण भाषांतरित केलं आहे. दोन्हीत पुनरावृत्ती मोठ्या प्रमाणात आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तरीदेखील भाषांतर करत असताना कोणतीही काटछाट न करता मूळ मजकुराच्या प्रमाणे अनुवादाचा प्रयत्न आम्ही येथे केला आहे. तसेच ए.जी. नुरानी यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात हे दोन दस्तऐवज परिशिष्टे म्हणून जोडली आहेत. ही परिशिष्टे भाषांतरासाठी प्रमाण मानली आहेत. गोपनीय टाचणात घडलेल्या घटनांची तार्किक कारणमीमांसा, तसेच अत्याचाराबाबतच्या वेगवेगळ्या घटनांचे उदाहरणे देऊन तपशीलवार वर्णन केले आहे. तर सुंदरलाल अहवालात परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सुचवल्याचे दिसते. सुंदरलाल आयोगाच्या दोन्ही दस्तऐवजांबाबत काढलेल्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी जे तार्किक पद्धतीशास्त्र (Methodology) वापरले आहे, ते वाचकाला अत्यंत पारदर्शी पद्धतीने सांगतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
दरम्यान केलेल्या प्रवासादरम्यान भेटलेल्या विविध शिष्टमंडळाच्या तसेच लोकांच्या नोंदी आपल्यासमोर ठेवतात. घडलेल्या अत्याचाराच्या घटना पीडित सांगतात. यावरच अवलंबून न राहता त्याच्या पडताळणीबाबतचे पूर्ण वर्णन केले आहे. उस्मानाबाद शहराच्या पडताळणीचे उदाहरण महत्त्वाचे आहे. निझामाविरुद्ध केलेल्या संघर्षामुळे ज्याला आठ महिन्यांची शिक्षा झाली होती. अशा सद्गृहस्थांना शहरातील प्रत्येक घरात जाऊन मारल्या गेलेल्या व्यक्तींची प्रत्यक्ष गणती करूनच ते निष्कर्षापर्यंत येतात.
सुंदरलाल समितीने हा अहवाल अत्यंत गांभीर्याने लिहिला आहे, याची वाचकाला ते वेळोवेळी जाणीव करून देतात. ‘आमचे कर्तव्य म्हणून’, ‘कोणतीही अतिशयोक्ती न करता’, ‘आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी जे काही पाहिले आहे’, ‘नाकारता न येणारे पुरावे’, ‘आम्ही पूर्ण जबाबदारीने विधान करत’ यासारखे वाक्ये अनेकदा वाचताना आढळतात. जर सरकारला आवश्यक वाटले, तर त्यांनी गोळा केलेले पुरावेदेखील सादर करण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे.
झालेले अत्याचार, घडलेल्या घटना इतक्या भयंकर आहेत की, विवेकी माणूसदेखील क्षणभर शंका व्यक्त करील, याची जाणीव सुंदरलाल समितीला असल्याचे जाणवते. त्यामुळे वाचणाऱ्याच्या मनात कोणतीही शंका राहू नये, त्याच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी पुरावेदेखील देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच निष्कर्ष कसे काढले, हेदेखील तितक्याच पारदर्शीपणे सांगितले आहे. त्यामुळे या अहवालात कमीत कमी उणिवा असल्याचे दिसून येते.
मोहम्मदअली खान यांची पुस्तिका
सुंदरलाल अहवाल अत्याचाराच्या घटनांबाबत अहवाल देतो, पण त्यानंतर काय, हा प्रश्न उरतो. मोहम्मदअली खान यांची पुस्तिका याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. ही पुस्तिका एका जमिनीवर अथकपणे काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याने लिहिली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बाबरी पाडल्याच्या कालखंडात (१९९०) ही पुस्तिका जशी आठवली तशी लिहून काढली आहे. त्यामुळे त्यात थोडासा मोकळेढाकळेपणा आहे. ती आखीव, बांधीवरित्या संपादित करता येऊ शकते, पण उर्दूतील कोणताही भाग संपादित न करता त्याच्या मूळ पुस्तकाशी शक्य तितके प्रामाणिक राहत मराठीत सरफराज अहमद यांनी अनुवाद केला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
ही आत्मकथा आठवणी स्वरूपात मोडणारी पुस्तिका असली, तरी स्वतःबद्दलचे अत्यंत कमी संदर्भ मोहम्मद अली खान देतात. लेखक स्वतः पोलीस अॅक्शनच्या हिंसेचे बळी आहेत. तरीदेखील त्याचा बाऊ न करता विधवा आणि अनाथाच्या मदतीसाठी आकाश-पाताळ एक करण्याचा प्रयत्न करतात. १९४८ साली पोलीस अॅक्शन झाली. १९६०लादेखील लेखक महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची भेट घेत, काही मदत मिळवण्याचा प्रयत्न करतात. पोलीस अॅक्शनच्या भयानकतेने आयुष्यावर एक गडद सावली टाकली आहे. त्यातून मुस्लीम समाजाची मुक्तता व्हावी, यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे. पुनर्वसनाचे काम करण्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यासाठी खोट्या आरोपाखाली जेलची हवादेखील खाल्ली आहे, पण प्रयत्न सोडला नाही. या छोटेखानी पुस्तिकेत अनेक व्यक्तींची नावे आढळतात आणि मदत केलेल्यांबद्दल कृतज्ञताही आहे.
प्रत्येक मंचावर जनतेच्या व्यथांना वाचा फोडण्याचा प्रयत्न मोहम्मद अली खान यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उस्मानाबाद येथे आले असता, त्यांना भेटून विधवा आणि अनाथ मुलांच्या समस्यांचे निवेदन देण्याची घटना अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वपूर्ण आहे. १९५२ साली नेहरू आणि मौलाना आझादांनी एकत्रितपणे हैदराबाद राज्याचा एकत्रितपणे दौरा केला होता. तसेच बिदर येथे एक जाहीर सभादेखील एकत्रितपणे संबोधित केली होती.
याबाबत काही संदर्भ मिळतात का ते पाहिले असता, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्रात आलेल्या काही बातम्या मला मिळाल्या. २७ सप्टेंबर १९५२च्या बातमीचा मथळा आहे- ‘पोलीस अॅक्शनच्या काळात घडलेल्या कटू आठवणी विसरून जाण्याचे आवाहन नेहरूंनी केले.’ उस्मानाबादच्या सभेचे ‘टाईम्स’मध्ये २८ सप्टेंबर १९५२ रोजी केलेल्या वार्तांकनाचा मथळा आहे- ‘‘हैदराबादवर केलेली पोलीस अॅक्शन ही विजय मिळवण्यासाठी केली नव्हती.’’ असे नेहरू म्हणतात. या बातमीत असंही लिहिलं आहे की, महिलांनी नेहरूंना भेटून त्यांच्या नवऱ्यांना आणि मुलांना मारल्याचे सांगितले.
३० सप्टेंबर १९५२च्या टाईम्समध्ये या नेहरूंच्या दौऱ्याबाबत टिप्पणी करणारी एक बातमी छापली होती. या बातमीचा मथळा होता- ‘‘नेहरूंच्या भेटीमुळे लोकांचे मनोबल वाढले.’’ पोलीस अॅक्शननंतर बिदर आणि उस्मानाबाद येथे झालेल्या अप्रिय/कटू घटनेबाबत अल्पसंख्याक समुदायाने दिलेल्या निवेदनाच्या संदर्भात ही भेट होती. आणि या दोन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, हे आता गुपित राहिले नाही, असेही या बातमीत लिहिले गेले आहे. इतर साधने उपलब्ध नसल्यामुळे १९४८नंतरच्या मराठवाड्याचा इतिहास समजून घेण्यासाठी मोहम्मदअली खान यांच्या दस्तऐवजाला मूल्य प्राप्त होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आपण एका सामाजिक द्वेषाच्या कालखंडात जगत आहोत. हिंदू–मुस्लीम सहजीवनाच्या सांस्कृतिक इतिहासावर प्रखर घाले घातले जात आहेत. याबाबत नेहरूंनी पोलीस अॅक्शननंतर मिल्ट्री गव्हर्नर असलेल्या जे.एन. चौधरींना पत्र लिहिले होते. विलीनीकरणानंतर नेहरूंनी हैदराबादला भेट दिली. या भेटीत फतेह मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित केले होते. ८ जानेवारी १९४९ रोजी लिहिलेलं पत्र या भेटीबाबत आहे. नेहरूंच्या भेटीची स्मृती चिरकाल ठेवण्यासाठी म्हणून लष्करी प्रशासन फतेह मैदानाचे नाव बदलून ‘नेहरू मैदान’ ठेवणार असल्याची माहिती नेहरूंना मिळाली, तेव्हा ते जे. एम. चौधरींना लिहितात, ‘‘फतेह मैदान हे एक ऐतिहासिक नाव आहे. त्या मैदानाशी जोडलेला इतिहास विसरून नाव बदलणे हा मूर्खपणा आहे. त्यामुळे ही गोष्ट होणार नाही, याची दक्षता घ्या.’’
मुस्लिमांच्या सांस्कृतिक इतिहासाची आणि त्यांच्या योगदानाची नेहरूंना जाणीव होती. सामाजिक चुकांची आठवण ही मूल्यावर आधारित समाज घडवण्याची पहिली पायरी असते. आणि हा प्रयत्न त्या सजग दृष्टीने केलेला आहे.
‘हैदराबाद संस्थानातील पोलीस अॅक्शननंतरच्या हिंसाचारावरील दोन दस्तऐवज’ – संपादक प्रमोद मंदाडे | हरिती पब्लिकेशन्स, पुणे | मूल्य – १५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment