‘दहा महिन्यांचा संसार’ : करोना महामारीत सर्वस्व गमावलेल्या एकल महिलांच्या मूक वेदनेला हुंकार देणाऱ्या वास्तवकथा
ग्रंथनामा - झलक
हेरंब कुलकर्णी
  • ‘दहा महिन्यांचा संसार’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Wed , 10 May 2023
  • ग्रंथनामा झलक दहा महिन्यांचा संसार Daha Mahinyancha Sansar प्रतिभा जाधव Pratibha Jadhav करोना Corona विधवा Widow

‘करोना महामारीत सर्वस्व गमावलेल्या एकल महिलांच्या वेदनांना शब्दबद्ध करणारा ‘दहा महिन्यांचा संसार’ हा डॉ. प्रतिभा जाधव यांचा कथासंग्रह नुकताच संवेदना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ‘करोना एकल महिला पुनर्वसन समिती’चे राज्य निमंत्रक, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

साहित्यिक, कलावंत असलेल्या डॉ. प्रतिभा जाधव यांचे विपुल लेखन, कविता, सामाजिक विषयांवर एकपात्री सादरीकरण हे आता सर्वदूर परिचित आहे. त्यांचा ‘दहा महिन्याचा संसार’ हा कथासंग्रहदेखील त्याच सामाजिक संवेदनशीलतेतून आला आहे. ‘करोना महामारीत सर्वस्व गमावलेल्या एकल महिलांच्या वेदनांना शब्दबद्ध करणारा हा वेगळ्या विषयावरचा महत्त्वपूर्ण संग्रह आहे.  

खरे तर करोनानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांना साहित्यातून फार प्रतिसाद अजून दिला गेलेला नाही. या पार्श्वभूमीवर या महिलांच्या वेदनेला उजागर करत, त्यांचा आकांत संवेदनशील वाचकांपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न खूप मानवी आहे.

एकाच वेळी करोना महामारीचा समाजावर झालेले परिणाम, त्यातून उदध्वस्त झालेल्या कुटुंबांची करुण कहाणी आणि एकूणच समाजात एकल महिला कशा जगतात, याचे सुन्न करणारे वास्तव चित्रण अधिक व्यापक स्तरावर डॉ. प्रतिभा मांडतात. या कथांचा विशेष म्हणजे या छोट्या कहाण्यांचा परिघ मात्र मोठा आहे. 

याच करोना महामारीत एकल झालेल्या महिलांसाठी आम्ही राज्यभर काम करत आहोत. राज्यातील २० जिल्ह्यातील ८१ तालुक्यांतल्या ४००० महिलांच्या पुनर्वसनासाठी आमचे काम सुरू असताना डॉ.प्रतिभा जोडल्या गेल्या. या महिलांच्या वेदनेला तुम्ही शब्दरूप द्या, असे त्यांना सहज सुचवले. मग त्यांनी अतिशय चिकाटीने राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील महिला शोधून या कथा लिहिल्या.  

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

करोनामुळे देशात ४ लाख ५० हजार मृत्यू झाले, तर महाराष्ट्रात १ लाख ४० हजार. यातील ६० टक्के मृत्यू हे पुरुषांचे असल्याने किमान ७० हजार महिला महाराष्ट्रात विधवा झाल्या आहेत. वयोगटानुसार २१ ते ५० वयोगटातील मृत्यू २२ टक्के आहेत. त्यामुळे राज्यातील मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले, तर २० ते ३० हजार गरजू कुटुंबांच्या पुनर्वसनाचा आणि विधवांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एखाद्या शहरी भागातील सुशिक्षित नोकरी करणाऱ्या महिलेचे विधवा होणे आणि फारसे शिक्षण नसताना फार घराबाहेर न पडलेल्या व कोणतेही विशेष कौशल्य हाती नसलेल्या कमी वयाच्या ग्रामीण भागातील विधवेचे जगणे, यात निश्चितच खूप अंतर असते. करोनात वैधव्य आलेल्या महिलांच्या जगण्याची दोन व्यवच्छेदक लक्षणे प्रत्यक्ष अभ्यास करताना दिसली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत जे मृत्यू झाले, ते तुलनेत कमी वयाच्या व्यक्तींचेच अधिक प्रमाणात होते. त्यामुळे तरुण विधवांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या लाटेत वेगाने संसर्ग पसरला, त्यात असंघटित क्षेत्रातील लोक जास्त बळी पडले. त्यात ग्रामीण भागातील संख्याही लक्षणीय होती.

या दुसऱ्या लाटेत सरकार ‘घरी राहा!’ असे आवाहन करत होते, परंतु ज्यांना उत्पन्नाचे स्थायी स्त्रोत असतात किंवा पगार सुरू असतो, असेच लोक घरात बसू शकतात. ज्यांचा जगण्याचा संघर्ष तीव्र असतो, असे भाजीवाले, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, ड्रायव्हर असे असंघटित कष्टकरी विशेष काही काळजी घेऊ शकले नाहीत. त्यांना जगण्याची, जीवाची भीती असूनसुद्धा रस्त्यावर जावे लागले. त्यातून संसर्ग होऊन अनेकांचा मृत्यू झाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

त्याचबरोबर ‘दवाखान्याने केलेली लूटमार’ हे करोनाचे एक वेगळेच वैशिष्ट्य समोर आले. ही लूट आपण सर्वांनीच थोड्याफार फरकाने अनुभवली आहे. हॉस्पिटल, डॉक्टर, मेडिकल, लॅब, शववाहिका या सर्वांनी जमेल तशी लूट केली. याचा परिणाम असा झाला की, या महिला आज मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाल्या. त्यांनी बँकांची, पतसंस्थांची कर्ज तर घेतलीच, परंतु नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक उचल घेतली आहे. या महिलांची आर्थिक स्थिती खूप ढासळली. हातात कौशल्य नाही, घराचा कर्तापुरुष गेलेला, घराबाहेर कधी पडलेल्या नाहीत आणि त्याच वेळी घरही चालवायचे आहे, कर्जही फेडायचे आहे, अशा स्थितीत या महिला आज जगत आहेत. या प्रश्नाचे अनेक पैलू लक्षात घेतल्यानंतर ‘करोनातल्या विधवा महिला’ हा प्रश्न स्वतंत्रपणे बघायला हवा, असे वाटते.

याच महिलांच्या वेदनेचा आकांत या कथासंग्रहातील पानापानांवर वाचायला मिळतो. या सर्व वास्तव कथांतील दु:ख जरी एकसारखे असले, तरीसुद्धा त्या वेदनेच्या विविधांगी छटा आपल्याला प्रत्येक कथेत दिसतील. या करोना एकल महिलांसाठी काम करताना आम्हाला जे जाणवले, त्याचाच पडताळा या कथा वाचताना येतो.

पूर्वी एखादी महिला विधवा झाली की, लाजेकाजेस्तव सासरचे लोक किमान तीन-चार वर्षे वाद न करता तिला सांभाळायचे. माहेरचे लोक तिला जमेल तशी मदत करायचे, पण करोनात असे जाणवले की, सासरच्या लोकांनी अगदी तेरव्याच्या अगोदरच भांडणे सुरू केली. तिला घर सोडायला भाग पाडले आणि माहेरचे लोकही इतके आत्मकेंद्रित की, त्यांनीही तिला आधार दिला नाही.

सासरचे लोक वाईट वागताना पूर्वी जातीतले लोक, नातेवाईक आणि गावातील लोक त्या शोषित स्त्रीसाथी भूमिका घ्यायचे. करोनानंतर हे लक्षात येते आहे की, तिला मालमत्तेच्या अधिकारापासून बेदखल करताना कोणीही मध्ये पडत नाही. गाव, जात, नातेवाईक हे सारे प्रेक्षकाच्या भूमिकेत गेले आहेत. त्यातून या महिलांची वेदना, एकटेपण अधिकच गहिरे झाले आहे. करोना एकल महिलांसाठी काम करताना आम्हाला रखरखीत वास्तव दिसले. या महिलांसोबत आम्ही काम करत राहिलो. त्यांचे भौतिक प्रश्न सोडवत राहिलो, पण या महिलांच्या मनाचा तळ डॉ. प्रतिभा यांनी ढवळून बघितला आणि या महिलांच्या अश्रुंना आपल्या शब्दांमधून वाट करून दिली आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वास्तव जगण्यावर असा कथासंग्रह लिहिणे हे खूप कठीण काम होते. कारण या महिलांची मुलाखत घेऊन शब्दांकन करणे सहजसोपे नसायचे. या एकल महिला म्हणजे काही तथाकथित ‘सेलिब्रिटी’ नव्हेत की, लगेच त्या सारे काही सहज सांगतील-बोलतील. या साऱ्या महिला दु:खी होत्या, त्यापेक्षा ‘शॉक’मध्ये होत्या, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. काही महिलांच्या मनावर परिणाम  झाला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा महिलांना बोलते करणे, हेच मोठे आव्हान होते. नेमकेपणाने न बोलणाऱ्या, रडणाऱ्या, बोलता बोलता मध्येच हुंडके देणाऱ्या, हंबरडा फोडणाऱ्या या महिलांना बोलते करणे कठीण होते, पण लेखिका डॉ.प्रतिभा यांनी ते अतिशय प्रभावीपणे केले आहे.

या कथासंग्रहातील प्रत्येक कथेत येणारा मृत्यूचा प्रसंग वाचवत नाही, इतके त्यातील कारुण्य हलवून टाकते. या महिलांच्या प्रेमाचा, भावनेचा आवेग अंगावर येतो. एकीकडे प्रेमाची व्यक्ती आयुष्यात नसताना, कोलमडलेले असताना; दुसरीकडे मात्र त्या अवस्थेत क्रूर व्यवहाराचे आघात करणारे सासरचे लोक, घर सोडायला भाग पाडणारे मानवी आयुष्यातील हे सैतानी चेहरे लेखिका खूप आर्त, प्रत्ययकारी लेखनशैलीत उलगडून दाखवतात. या महिलांचे आक्रंदन, मुलांमध्ये त्यांची तीव्रतम भावनिक गुंतवणूक, कर्जबाजारीपणा आणि जगण्याचा संघर्ष म्हणजे एखाद्या पक्षिणीची अतिशय करुण तडफड आहे.

या कथासंग्रहाच्या निमित्ताने एक वेगळा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे, एकल महिलांचे विश्व अजून आपल्या साहित्याचा भाग होत नाही. काही चित्रपट, कथा यांत ते आले आहे. वृंदावन येथील विधवांच्या जगण्याला धार्मिक संदर्भ व प्रचंड संख्या, यामुळे त्याची विशेष दखल घेतली जात आहे, पण खेड्यापाड्यांत जगणाऱ्या एकल महिलांची वेदना आणि त्यांचे मन अजूनही साहित्याचा प्राधान्यक्रम होत नाही.

या महिलांचे मन उमजायला हवे. ग्रामीण भागात महिलांचे लग्न खूप लवकर होते, लवकर मुले होतात. ३० वर्षाच्या महिलेला १३-१४ वर्षांची मुले असतात. वास्तविक या वयात शहरातील मुली लग्नही करत नाहीत, पण मोठी मुले असल्याने या एकल महिला पुन्हा लग्न करू शकत नाहीत. म्हणजे ‘पतीसोबत घालवलेली वर्षे अवघी १५ आणि त्याच्याशिवाय जगण्याची वर्षे किमान ५०’, हा हिशोब समाज समजून घेत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

केवळ ‘मुले मोठी आहेत’ या नावाखाली तिला जगण्याची पुन्हा सुरुवात करता येत नाही. हे तिच्या मनाने स्वीकारले तरी शरीर स्वीकारत नाही. एकदा दु:खाचा आवेग ओसरला की, शारीरिक गरज, साथीदाराची मानसिक-भावनिक गरज तीव्रतेने जागी होते. घरात भाऊ-वहिनीचे नाते, आजूबाजूच्या घरातील असेच नाते ती बघत असते; त्यातून ती अधिकच अस्वस्थ होते.

दुसरीकडे नात्यातील काही पुरुष वा परिसरातील अनेक जण मदतीच्या नावाखाली जवळीक करत राहतात. ही तिची सारी मानसिक घुसमट हा या कथांचा विषय आहे. महिलांचे हे जग अजूनही मराठी साहित्यात पुरेसे उमटलेले नाही. हा संग्रह म्हणजे त्या दिशेने केलेला एक महत्त्वाचा प्रयत्न आहे, हे आवर्जून नोंदवायला हवे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शेवटी एखादा प्रश्न सुटायचा असेल किंवा विचारी वर्गाच्या लक्षात आणून द्यायचा असेल, तर त्या प्रश्नाची साहित्यनिर्मिती व्हायला हवी असते. दलित साहित्य जन्मास आले आणि दलितांचे प्रश्न समोर आले. भटक्यांची आत्मकथने आली आणि भटक्यांचे विदारक आयुष्य समाजासमोर आले. शेतकरी आत्महत्येवर ‘बारोमास’सारखी कादंबरी, नाना कविता आल्या आणि तो प्रश्न समाजाच्या चिंतेचा झाला. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्या प्रश्नाचे साहित्य निर्माण होणे, ही महत्त्वाची गरज असते. त्यामुळे आता एकल महिलांच्या प्रश्नावर साहित्य निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. महिलांच्या लोकसंख्येत जर एक दशांश एकल महिला असतील, तर त्यांचे जग उलगडून दाखवणे ही साहित्याची जबाबदारी आहे. त्यासाठी या महिलांच्या वेदनेवरचा हा कथासंग्रह मला अतिशय मोलाचा वाटतो

‘दहा महिन्यांचा संसार’ - डॉ.प्रतिभा जाधव

संवेदना प्रकाशन, पुणे | पाने – १५२ | मूल्य - २२५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......