२००९ साली ८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वरला २०, २१ आणि २२ मार्च रोजी अध्यक्षाशिवाय पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण कथा-कादंबरीकार आनंद यादव यांची निवड झाली होती. पण दुर्दैवाने यादवांना या संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा तुकोबा चरणी वाहावा लागला. तेव्हापासून हे भाषण अप्रकाशितच राहिले. ते यादवांची मुलगी, कीर्ती मुळीक आणि मसाप, पुणे यांच्या सहकार्याने आठ वर्षांनी उपलब्ध होत आहे. त्याचा हा उत्तरार्ध.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आदरणीय साहित्यप्रेमी बंधुभगिनींनो,
महाबळेश्वरसारख्या निसर्ग-समृद्ध रम्य आणि सुंदर नगरीत होत असलेल्या ८२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी जी बहुमतांनी निवड झाली, तो मी आजवर केलेल्या साहित्यशारदा देवीच्या सेवेचा कृपाप्रसाद समजतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीची मधुर साखर त्यात मिसळल्याने मला त्याचा अधिक आनंद झालेला आहे. विशेषत: आपले हे साहित्य-संमेलन शेकडो रसिक-वाचक, कवी, लेखक, समीक्षक, उपासक यांनी मंडित झालेले मला दिसते आहे.
गेली पन्नासएक वर्षे मी सरस्वतीमातेची मनोभावे उपासना आणि आराधना केली, तिच्यात मला उत्कट आनंद तर मिळत होताच; पण प्रसिद्धी आणि काहीशी प्रतिष्ठाही मिळत होती. त्या उत्कट आनंदाला या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामुळे कांती प्राप्त झाली आहे, असे मला वाटते.
आपल्यासारख्या जाणकारांच्या समोर मी काही मार्गदर्शक विचार मांडावेत, अशी माझी योग्यता नाही. कारण मी काही विद्वान, विचारवंत, मार्गदर्शक वगैरे नाही.
रसिक मित्रहो, मी प्रामुख्याने ललित लेखक आहे. वयाच्या १०व्या वर्षापासून वाचनाचा छंद मला लागला. ११-१२व्या वर्षी शब्दाला शब्द जुळवण्याचा नाद लागला. त्यातूनच ग्रामीण कविता लिहू लागलो. २५-२६व्या वर्षी एम.ए. होऊन नोकरी लागल्यावर कथा लिहू लागलो. हळूहळू प्रौढ वयात प्रामुख्याने गद्य लेखनाकडे वळलो. विविध साहित्य प्रकारांचा अभ्यास करू लागलो आणि कालौघात कादंबरी, ललित लेख, नाटिका, नाटक, क्वचित परीक्षणे आणि नंतर वाङ्मयविषयक वैचारिक लेख व ग्रंथही लिहू लागलो. वैचारिक लेखनाला शिस्त लागावी म्हणून पीएच.डी. झालो. आजवर माझ्या साहित्यकृतींना चाळीस लहानमोठे पुरस्कार मिळाले आहेत. त्यात भारत सरकारचा साहित्य अकादमी, मध्य प्रदेश सरकारचा प्रियदर्शनी, लाभशेटवार इत्यादी महत्त्वाचे पुरस्कार आहेत.
मी सामाजिक जाणिवेने प्रभावित होऊन ग्रामीण साहित्याची चळवळ ग्रामीण विभागात उभी केली आणि दहा-बारा वर्षे यशस्वीपणे चालवली. आज तिची फलनिष्पत्ती ग्रामीण समाजातील तरुण ग्रामीण लेखकांच्या लेखनातून दिसते आहे. ग्रामीण विभागातून आज पुरेसे ग्रामीण साहित्य लिहिले जात आहे, याचा मला आनंद होतो.
माझा जन्म १९३५ साली कागलसारख्या त्या वेळच्या खेड्यात झाला. १९४०-४२ साली कागलची लोकसंख्या साडेचार हजार होती. प्रामुख्याने तिथे शेती व्यवसाय चालत असे. कागलच्या दक्षिणेस दूधगंगा नदी पूर्व पश्चिम दिशेने वाहते. या नदीच्या पलीकडच्या काठापासूनच कर्नाटकची सरहद्द सुरू होते. त्यामुळे कर्नाटक राज्यात गेलेल्या अनेक मराठी खेड्यांचा व गावांचा परिचय व संबंध कागल गावाशी घनिष्टपणे पूर्वीपासूनच होता.
या पार्श्वभूमीवर मी आज आपल्यापुढे माझे काही सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यविषयक विचार मांडणार आहे.
१) मराठी माणसाच्या मनाला सदैव डाचणारा आणि अस्वस्थ करणारा नेहमीचा एक सामाजिक राजकीय प्रश्न म्हणजे महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या वेळी महाराष्ट्रापासून अलग झालेला मराठी भाषिकांचा चिकोडी, निपाणी, संकेश्वर, बेळगाव, कारवारचा मराठी प्रदेश. त्या वेळच्या भाषिक राज्यनिर्मिती करणार्या समितीच्या धोरणाचा हा परिणाम होय. या समितीने सामान्यत: तालुका हा मूल घटक मानून राज्यनिर्मिती केली आहे. त्याची कटू फळे आजही महाराष्ट्राला भोगावी लागत आहेत. कारण तथाकथित नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे असलेल्या कन्नड भाषिक कर्नाटक राज्यात मराठी बोलणारी अनेक खेडी, गावे आणि शहरे गेलेली आहेत. उदाहरणार्थ, चिकोडी, निपाणी, संकेश्वर, बेळगाव, कारवार ही नगरे आणि त्यांच्या भोवतालची अनेक खेडी ही मराठी भाषिकांची आहेत. तालुका हा मूलघटक मानून भाषिक राज्यनिर्मिती केली गेली आहे. त्यामुळे त्याचा तोटा फक्त महाराष्ट्र राज्याला सोसावा लागत आहे आणि फायदा मात्र कर्नाटक राज्याला झालेला आहे. मराठी भाषिकांचा आत्ताच उदधृत केलेला कर्नाटक राज्यातील भाग महाराष्ट्राला परत मिळावा, यासाठी तेथील आणि महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेने खूप वेळा आणि दीर्घ काल आंदोलने यापूर्वी केलेली आहेत. पण अजून तरी त्यांचा काहीही परिणाम झालेला नाही.
उलट कर्नाटक राज्यातील या मराठी भाषिकांवर प्रचंड अन्याय होतो आहे. त्या ठिकाणी मराठी भाषा शिक्षण व्यवस्थेतून काढून टाकण्यात आलेली आहे आणि कानडी भाषेतून सक्तीचे शिक्षण सुरू केले आहे. असहाय झालेला मराठी भाषिक माणूस नाइलाजाने कानडी भाषा शिकतो आहे. जगण्याचे, चरितार्थाचे, सक्तीचे साधन म्हणून ती भाषा त्याला शिकावी लागत आहे. परिणामी तेथील मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी जीवन नष्ट होऊ घातलेली आहेत. मराठी माणसाला तिथे अत्यंत नगण्य अशा गौण स्थानी राहून जगावे लागत आहे. अन्याय सहन करावा लागत आहे. त्याला सरकारी नोकरीत स्थानच मिळू शकत नाही, अशी त्याची दयनीय अवस्था झालेली आहे.
अशा या कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकांची गावे कर्नाटक राज्यातून मुक्त करून ती महाराष्ट्र राज्याला जोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य बहुजन मराठी माणसांनी एक गठ्ठा एकत्र येऊन दिल्लीस्थित भारत सरकारला सविस्तर लेखी विनंती करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, तरच कर्नाटकस्थित मराठी मुलखाला योग्य तो न्याय मिळू शकेल असे वाटते.
२) मराठी माणसाने उद्योग, नोकरी, आवड, अभ्यास इत्यादीसाठी शास्त्रीय ग्रंथ, संबंधित अभ्यासाचे ग्रंथ जरूर वाचले पाहिजेत, अभ्यासले पाहिजेत. त्यासाठी आपणांस इंग्रजी भाषेचे ज्ञान उत्तमच असले पाहिजे, यात तीळमात्र शंका नाही. पण ही इंग्रजी भाषा आपल्याबरोबरच आपल्या मुलालाही उत्तम रीतीने येण्यासाठी त्याला कायमचा अगदी माँटेसरी म्हणजे बालवर्गापासूनच मातृभाषेपासून वंचित करून केवळ इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी इंग्रजी हेच माध्यम असलेल्या शाळांत घालण्याची गरज नाही. त्याला निदान एसएससीपर्यंत तरी मातृभाषेच्या म्हणजे मराठी हे शिक्षणाचे माध्यम असलेल्या शाळेतच घातले पाहिजे, तरच त्याला मराठी मातृभाषा नीटपणे अवगत होऊ शकेल.
मातृभाषा ही केवळ बोलण्यासाठी वापरण्याची भाषा नसते. ती तुम्हाला तिच्यात अवगुंठित असलेल्या मराठी समाजाची ओळख कळत नकळत करून देत असते. एवढेच नव्हे; तर मराठी संस्कृती, मराठी परंपरा, मराठी मन आणि त्याची मानसिकता, मराठी समाजाचा इतिहास, वारसा, ज्ञान-विज्ञान, मराठी व्यक्तिमत्त्व इत्यादी सर्व काही कळत-नकळत सहजपणे देत असते आणि तुमचे मराठी व्यक्तिमत्त्व घडवत असते.... म्हणून कोणत्याही सुसंस्कृत माणसाने किंवा सुसंस्कृत होऊ पाहणार्या तरुणाने मातृभाषेपासून वंचित होऊन स्वत:ला पोरके करून घेऊ नये, असे वाटते.
हे सर्व आपणास सांगण्याचे कारण की अनेक शहरांतून काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून इयत्ता पहिलीपासूनच केवळ इंग्रजी माध्यमांतूनच शिकवले जाते आणि त्या खर्चिक शाळांत उच्च मध्यमवर्गीय पालक आपल्या बालबच्च्यांना इयत्ता पहिलीपासून घालतात. आपला मुलगा त्या शाळेत घातला असल्याचे अभिमानाने सांगणारे पालक भेटतात.... हे सांगतानासुद्धा मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द पेरत ते बोलत असतात... आपण कसे ‘हाय फाय’ संस्कृतीतील उच्चभ्रू लोक आहोत, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मुलांनी आत्तापासूनच इंग्रजीतून बोलावे, असा त्यांचा अट्टहास असतो. परिणामी या मुलांना धड इंग्रजीही येत नाही आणि धड मराठीही येत नाही. ती मराठीत इंग्रजी शब्द मिसळून धेडगुजरी भाषेत बोलू लागतात.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहरांतून आजची तरुण पिढी अशाच प्रकारची भाषा बोलताना दिसते. या पिढीच्या मराठी भाषेत इंग्रजी शब्द अकारण पेरलेले असतात. असे केल्याने आपणही एक उच्च विद्याविभूषित घराण्यातील आहोत, असे त्यांना वाटते. त्यांच्या मनाची ही चुकीची समजूत दूर झाली पाहिजे.
सारांश मराठी माणसाने अत्यावश्यक असलेले उच्च शिक्षण जरूर घेतले पाहिजे. उद्योग, नोकरी, माहिती, आवड, अभ्यास, पदवी इत्यादींसाठी इंग्रजीतील शास्त्रीय ग्रंथ जरूर वाचले पाहिजेत; पण त्यासाठी मातृभाषेपासून पारखे होण्याची गरज नाही. निखळ मराठी मातृभाषा ही लिहिता, वाचता आणि बोलता, अनुभवता आलीच पाहिजे. कारण मातृभाषा ही माउलीच्या दुधासारखी असते. आपल्या बालकाचे पोषण आई जसे आपल्या दुधावर करते आणि सर्वांगांनी वाढवते तेच कार्य मातृभाषा बालकाच्या बौद्धिक, सांस्कृतिक, भावनात्मक शक्ती वाढवण्याच्या बाबतीत करत असते... मातृभाषेचे हे जीवनव्यापी कार्य समाजाने ओळखून तिचे भरण-पोषण केले पाहिजे. तरुण पिढीला ती अभिमानाने शिकवली पाहिजे; तरच मराठी माणूस हा खर्या अर्थाने ‘मराठी’ राहू शकेल.
३) मित्रहो, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या गेल्या पन्नास-साठ वर्षांत लोकसंख्या खूपच वाढली. इ.स. १९४२च्या आसपास अखंड हिंदुस्थानची लोकसंख्या तीस-पस्तीस कोटी होती. त्या काळात महात्मा गांधी कोणाचे ‘पस्तीस कोटी जनतेचे!’ असा जयघोष करत आम्ही बालपणी प्रभातफेर्या काढल्याचे आठवते. पारतंत्र्याचा तो काळ होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची निर्मिती झाली. छोटी-मोठी राष्ट्रे देशाच्या सीमा भागांवर निर्माण झाली. तरीही आजघडीला स्वतंत्र भारताची लोकसंख्या एकशेदहा कोटींच्याही पुढे गेलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगण्याचे प्रश्न बिकट होत गेले आहेत.
देश स्वतंत्र झाल्यावर सर्वसामान्य माणसामधील ध्येयवाद कमी झाला. हळूहळू त्याच्या जगण्यात ढिलेपणा आला. भोगवृत्ती, मौजमजा वाढत गेली. ‘आदर्श’ संपुष्टात आले. ध्येयवादाचे सपाटीकरण झाले. तरीही लोकसंख्या वाढतच होती. तरुण पिढीसमोर हळूहळू नोकर्यांचे प्रश्न उभे राहिले. पूर्वीसारख्या त्या झटपट मिळेनाशा झाल्या. हळूहळू बेकारी निर्माण होऊ लागली. ती वाढत गेली. परिणामी अवैध धंदे सुरू झाले. समाज जीवनात लाचलुचपती वाढत गेल्या. गेल्या वीस वर्षांत तरुण पिढीचे जगण्याचे प्रश्न अति बिकट होत गेले. सर्वच पातळ्यांवर मूल्याचा र्हास होत गेला. जीवनादर्श, संस्कृतीची उपासना, मूल्यनिष्ठा, सचोटी इत्यादी मूल्ये नष्ट होऊन स्वार्थी वृत्ती आणि चंगळवाद वाढत गेला. नोकरीची शाश्वती नष्ट होत गेली. भांडवलशाही निरंकुशपणे वाढत गेली.
याचा परिणाम सर्वसामान्य माणसावर झाला. नोकरीच्या क्षेत्रात त्याला शाश्वती मिळेनाशी झाली. त्यातूनच कामगार-संघटना वाढत गेल्या. परिणामी संप-मोर्चेही वाढत गेले. परस्परांविषयीची आस्था-आपुलकी संपुष्टात येऊन विविध सामाजिक स्तरांत विविध प्रकारचे तणाव आणि संघर्ष निर्माण होऊ लागले. एकमेकांविषयीचा विश्वास संपुष्टात येत चालला. जागतिक मंदीचा परिणाम कामगार विश्वावर झाला. अनेकांच्या नोकर्या गेल्या. अशा वेळी वैयक्तिक पातळीवर सर्वसामान्य माणसाने फार विचारपूर्वक वागले पाहिजे आणि एकूण जीवनाविषयीचे निर्णय घेतले पाहिजेत. जीवनाविषयीची गतानुगतिकता सोडून त्याची नवी मांडणी केली पाहिजे. या नव्या मांडणीचा एक भाग म्हणून स्वयंरोजगार निर्माण करण्याची गरज आहे. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करून हा स्वयंरोजगार निर्माण करता येणे शक्य असते. सध्याच्या स्पर्धायुगात हा एक बेकारीवरील उपाय होऊ शकतो.
स्वयंरोजगार किंवा स्वतंत्रपणे उद्योग-व्यवसाय निर्माण करून तो चालवणे हे काम काहीसे चिकाटीचे, जिद्दीचे आहे. अशा कामात अडथळे येणे शक्य असते आणि भवितव्यही अंधारात असते; म्हणून असे कष्टाचे उद्योग, व्यवसाय निर्माण करून चालविण्यापेक्षा एखादी उपयुक्ततावादी पदवी मिळवून कुठल्या तरी उद्योगसंस्थेत, कारखान्यात किंवा परदेशी जाऊन नोकरी करणे मध्यमवर्गीय पांढरपेशा तरुणाला सोयीचे वाटते. त्यामुळे तो उपयुक्त पदव्यांचे शिक्षण घेतो, त्यांचे कोर्सेस पुरे करतो आणि परदेशी नोकरीसाठी जाऊन सुखाने राहतो. पण त्यामुळे आपल्या देशाला, संस्कृतीला, कौटुंबिक संबंधांना आणि मराठीपणालाही अंतर्बाह्य मुकतो.
४) नागर समाजातील पांढरपेशा, मध्यमवर्गीय, सुशिक्षित तरुणाची ही अशी अवस्था झाल्याने उद्याचा नागर मराठी समाज हा केवळ पेन्शनरांचा असेल की काय, अशी काळजी वाटते. नागर समाजाची अशी स्थिती १९९० सालानंतरच्या दशकात विशेषत्वाने जाणवू लागली.
५) नागर मराठी समाजाने ब्रिटिश अमदानीच्या उत्तरार्धात म्हणजे सामान्यत: १८८० सालाच्या आसपास आधुनिक मराठी साहित्याचा पाया भक्कमपणे घातला आणि त्याचा विकास विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे १९०० ते १९६० पर्यंत झपाट्याने केला. आधुनिक मराठी साहित्य विविध अंगांनी समृद्ध केले. १९६०च्या आसपास या समाजात साहित्याला वाहिलेली ६० ते ७० नियतकालिके निघत होती. या काळातच साहित्याचे प्रकाशन अनेक अंगांनी करणार्या अनेक प्रकाशन संस्थाही जन्माला येत होत्या आणि जोमाने कार्य करत होत्या. सामान्यत: ही स्थिती १९८०-८५ पर्यंत होती.
तेथून पुढे मात्र नागर मराठी साहित्यात स्थिरता निर्माण झाली. मराठी साहित्यात दहा-दहा वर्षांनी नवी पिढी निर्माण होत होती; ती प्रक्रियाही थांबत गेली. हळूहळू नागर मराठी साहित्याचा विकास आणि विस्तार थांबत गेला. याचे महत्त्वाचे कारण असे की लोकसंख्या भरपूर वाढत गेली. स्थानिक पातळीवर नोकर्या मिळेनाशा झाल्या. त्यामुळे तरुण पिढ्या इंग्रजी माध्यमातून वेगवेगळ्या औद्योगिक आणि उपयुक्ततावादी विषयांचा अभ्यास करून पदव्या मिळवू लागल्या. इंग्रजी ही जागतिक पातळीवरची भाषा आहे. त्यामुळे त्या माध्यमातून पदवी घेतलेल्या तरुणाला जगात कुठेही नोकरी मिळू शकेल. या जाणिवेने नागर समाजातील तरुण पिढी इंग्रजी भाषेच्या माध्यमाकडे अगदी आरंभापासून वळू लागली. स्वाभाविकच त्यांची मातृभाषा असलेल्या मराठीकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले. परिणामी मराठी भाषा आणि तिच्यातून होणारी सकस साहित्याची निर्मितीही कमी कमी होत गेली. मराठी नागर समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा हा विशेष टप्पा होता.
याचा परिणाम मराठी नियतकालिकांवरही झाला. ही नियतकालिके बंद पडत गेली. आज फार थोडी मराठी नियतकालिके कशीबशी तग धरून आहेत. एक व्यवसाय म्हणून दिवाळी अंक मराठीतून (वर्षातून एकदा) निघताना अजून तरी दिसतात.
६) साहित्यविषयक निर्मितीची संस्कृती जशी कळत-नकळत नागर समाजातून हळूहळू ढासळत चालली आहे; तशी आपली शहरी कुटुंबव्यवस्थाही नकळत ढासळत चालली आहे. कुटुंबव्यवस्था ही सांस्कृतिक समाजव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक असते. त्यामुळे संस्कृती आणि समाजव्यवस्था बदलू लागली की कुटुंबव्यवस्थाही बदलू लागते.
भारतीय समाजव्यवस्था ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिच्यात वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था अजूनही कळत-नकळत टिकून आहे. ती हजारो वर्षे चालत आलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ती भक्कमपणे चालू होती. स्वातंत्र्योत्तर काळात तिच्यातील कर्मठपणा, श्रेष्ठ-कनिष्ठता वाद काही प्रमाणात शिक्षणाच्या प्रभावामुळे कमी होत गेला, तरी वर्ण-जाती पूर्ण नष्ट होऊ शकल्या नाहीत. त्या पूर्णपणे नष्ट होतील असेही वाटत नाही.
मात्र भारतीय समाजव्यवस्थेचे पारंपरिक कौटुंबिक नातेसंबंध जे एकेकाळी दृढ स्वरूपाचे होते; ते मात्र आजच्या शहरी कुटुंब व्यवस्थेतून नष्ट होऊ लागले आहेत. एकेकाळी चुलते, पुतणे, भाऊ भाऊ एकत्र राहून एकमेकांना शिक्षणासाठी मदत करीत असत. सर्व मिळून व्यवसाय, स्वत:चा हक्काचा उद्योगधंदा करत असत. कौटुंबिक सुखदु:खात सर्व मिळून सहभागी होत असत. मोठ्या शहरातून ही संस्कृती नष्ट होऊ लागली आहे; तशीच ती खेड्यापाड्यातूनही शहरी संपर्कामुळे नष्ट होताना दिसते आहे. प्रामुख्याने हा यंत्रयुगाचा परिणाम मानला जातो. भौतिकवादी, भोगवादी वृत्तीचा, संस्कृतीचाही हा परिणाम मानला जातो.
ते काहीही असले तरी शहरातील आणि आजच्या खेड्यांतीलही संयुक्त कुटुंबव्यवस्था बहुअंशी नष्ट होत गेलेली दिसते आणि त्याजागी ‘पति-पत्नी आणि मुले’ अशी एकेरी, व्यक्तिवादी, व्यक्तिकेंद्रित कुटुंबव्यवस्था निर्माण झालेली दिसते. मुलेही लग्न झाल्यावर पटकन अलग होतात. बाहेरगावच्या नोकर्यांचाही हा परिणाम असला तरी व्यक्तिकेंद्रित, आत्मकेंद्रित वृत्तीचा हा प्रभाव मानावा लागतो. यातूनच स्वत:पुरते पाहण्याची, विचार करण्याची, अलग राहण्याची व्यक्तीची वृत्ती वाढत गेली. शहरातील, नगरातील सुशिक्षित वर्गात याचे प्रमाण वाढत गेले. परिणामी तेथील माणूस एकटा पडत गेला. त्याच्या सुखदु:खांत इतर कोणी सामील होईनासे झाले. त्याच्याही व्यक्तिकेंद्रित, आत्मकेंद्रित वृत्तीमुळे कुणापाशी आपली सुखदु:खे सांगण्याची त्याची वृत्ती आणि सवय नष्ट झाली. तिचा परिणाम चंगळवाद, भोगवाद निर्माण होण्यात झालेला दिसतो. आजची तरुण पिढी यात जास्त वाहवत गेलेली दिसते.
याचा दुसराही एक परिणाम असा झालेला दिसतो की वयस्क, वृद्ध, पेन्शनर पतिपत्नी आपल्या तरुण मुलाबाळांपासून अलग पडत गेली. एकाकी राहू लागली. नात्यागोत्यांना काही अर्थ राहिनासा झाला. माणूस एकाकी, एकटा, आत्मकेंद्रित आणि मोठ्या प्रमाणात व्यसनी, आत्मनिष्ठ होत गेला... समाजव्यवस्थेचे हे विघटन एकूण भारतीय समाजव्यवस्थेलाच उद्या धोक्यात आणल्यास नवल वाटणार नाही.
७) शहरी माणसाच्या या एकाकी पडणार्या मनाचा परिणाम साहित्य निर्मितीवर झालेला दिसतो. काही नवकवी, अतिनवकवी, नवकथाकार यांचे साहित्य याच शहरी वस्तुस्थितीतून निर्माण झालेले दिसते. सामाजिक स्थितीचा परिणाम साहित्यावर कसा होतो, त्याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. मराठी नवकथा, नवकविता, संज्ञाप्रवाही साहित्य हे यांचाच परिपाक असलेले दिसते. १९८०-८५ नंतरच्या काळात हेही साहित्य कोमेजत जाऊन शहरकेंद्री जीवनावरील नागरसाहित्य व त्याची निर्मिती जवळजवळ नामशेष झाल्यासारखी आज वाटते आहे.
८) याच्या नेमके उलट महाराष्ट्राच्या ग्रामीण विभागात घडताना दिसते. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि ग्रामीण मराठी समाजाच्या इतिहासाचे एक नवे पान उलगडले गेले. ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाणांनी आपल्या सहकार्यांना महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतून नवनव्या शिक्षणसंस्था स्थापण्यास सांगितले. त्याचा परिणाम होऊन खेड्यापाड्यांतून प्राथमिक शाळा, तालुक्याच्या गावी हायस्कूल, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा केंद्रस्थानी असलेल्या शहरांतून महाविद्यालये स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. याचा हळूहळू परिणाम असा झाला की, बहुजन समाजात शिक्षणविषयक जागृती निर्माण झाली आणि शिक्षणाचे प्रमाण वाढले. नवसाक्षर तरुण पिढीला विकसनशील काळ असल्यामुळे नवनव्या नोकर्या मिळू लागल्या आणि ग्रामीण समाजाचा कायापालट होऊ लागला.
९) १९६० पूर्वी ग्रामीण महाराष्ट्राची स्थिती शैक्षणिकदृष्ट्या केविलवाणी होती. शिक्षणाचा प्रसार काहीही झालेला नव्हता. सर्वसाधारण कुणबी समाज गतानुगतिक पद्धतीने शेतावर राबून पोटापुरते धान्य पिकवत होता. मोलमजुरी करत होता. बलुतेदार मंडळी आपापली बलुत्याची पारंपरिक कामे करत होती आणि चरितार्थ चालवत होती. मात्र या ग्रामीण समाजातील पाटील, वतनदार, इनामदार व ब्राह्मणवर्ग आपल्या आर्थिक बळावर खेड्यातून शहरात जाऊन शिक्षण घेऊ शकत असे आणि शहरात विविध प्रकारच्या लहान-मोठ्या नोकर्या मिळवू शकत असे. ते ग्रामीण कथा-कवितांची, कादंबर्यांची निर्मिती करत असत. या व्यक्तींना त्यांच्या बालजीवनात खेड्यातील अनेक अनुभव आलेले असत. शिक्षणाच्या काळातही ते सुट्या पडल्यावर तीन-तीन, चार-चार महिने आपल्या गावी जात असत. मुक्तपणाने जगत असत... त्यातून त्यांना अनेक ग्रामीण अनुभव येत असत. या अनुभवांना ते कल्पकतेची, प्रतिभेची, संवेदनशीलतेची जोड देऊन त्यांचे कथारूप, कादंबरीरूप, कवितारूप करत असत. यातून प्रारंभीचे ग्रामीण साहित्य निर्माण झाले.
पण या वर्गाच्या ग्रामजीवनातील अनुभवांना मर्यादा पडलेल्या होत्या. कारण ग्रामीण जीवनातील सर्वसाधारण अनुभवच त्यांना माहीत असत. हा वर्ग स्वत: शेती कसत नसे. स्वत:ची शेती कुणब्यांना फाळ्याने, बटईने किंवा खंडाने कसायला देत असे. अधूनमधून सुगीसराई आली की ऊस, हुरडा खाण्यास, हरभरा खाण्यास शेतावर जात असे. कधी आंबे, पेरू, रामफळे, सीताफळे खाण्यास किंवा ती घरी आणण्यास शेतावर जात असे. या पलीकडचे शेतीचे अनुभव
किंवा तेथील कुणब्यांचे, कष्टकर्यांचे अनुभव त्यांना माहीत नसत किंवा ऐकून माहीत असत... त्यामुळे त्यांच्या ग्रामीण साहित्यावर मर्यादा पडलेल्या होत्या. ग्रामीण साहित्याची १९६०पर्यंत सर्वसाधारणपणे अशी स्थिती होती. त्या ग्रामीण साहित्याचे प्रतिनिधी म्हणून प्रामुख्याने व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, अॅड. शंकरराव खरात, वि. शं. पारगावकर यांचा उल्लेख करावा लागेल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nivedita Deo
Wed , 29 March 2017
भाषण वाईट आहे