‘स्टोरीटेलर’ लिहून गजेंद्र अहिरेने स्वतःविरुद्ध भरभक्कम सज्जड पुरावा आपल्या हाती दिलाय- तुम्ही काय बोलताय माझ्याबद्दल, हे घ्या माझंच माझ्याविषयीचं निरीक्षण!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अशोक राणे
  • दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि त्यांच्या ‘स्टोरीटेलर’चं मुखपृष्ठ
  • Tue , 02 May 2023
  • ग्रंथनामा शिफारस गजेंद्र अहिरे Gajendra Ahire स्टोरीटेलर Storyteller

गजेंद्र अहिरे हे एक अजब रसायन आहे. अनेक ऐकीव खऱ्या-खोट्या कथा-किश्यांची या विधानासाठी सहज साक्ष काढता येईल. पण आता त्याचीही गरज नाही. ‘स्टोरीटेलर’ नावाचं पुस्तक लिहून त्यानेच आता भरभक्कम सज्जड पुरावाच आपल्या हाती दिला आहे- तुम्ही काय बोलताय माझ्याबद्दल, हे घ्या माझंच माझ्याविषयीचं निरीक्षण!

हॉलिवुडची अभिजात अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमनने ‘माय स्टोरी’ या आपल्या आत्मचरित्राच्या मनोगतात असं लिहिलंय की, ती कधीच आत्मचरित्र लिहिणार नव्हती. पण मग तिची मुलं तिला म्हणाली, उद्या अन्य कुणी उठून तुझ्या जगण्यातल्या गोष्टी मालमसाला लावून त्याला / तिला हवं तसं चरित्र लिहील, त्यापेक्षा तूच का नाही, जे जसं तुझ्या आयुष्यात घडलं ते खरंखुरं सांगून टाकत नाहीस? मग तिने ‘माय स्टोरी’ लिहिलं.

गजेंद्र नामी एडझवट दिग्दर्शक आहे, म्हणत ज्या काही खऱ्याखोट्या कथा रचल्या गेल्या, अजूनही रचल्या जात आहेत आणि रचल्या जातील, त्या तशाच आहेत, हे आपणच का सांगून टाकू नये, असं त्याला वाटलं की काय माहीत नाही. पण ‘स्टोरीटेलर’ची प्रेरणा तीच असावी, असा भक्कम संशय आहे.

गजेंद्र ही एक साक्षात जितीजागती दंतकथा आहे. ते खरं तर एक गूढदेखील आहे. त्याचं हे पुस्तक वाचून त्या साऱ्या अनेकदा ऐकलेल्या किश्यांचा अनेकांना पुनःप्रत्यय येईल, तर काहींना निश्चितच या दंतकथेचा, या गूढाचा शोध घ्यावासा वाटेल. १९८५पासून ते या क्षणापर्यंतच्या जगभरच्या सिनेमाच्या १२८ वर्षांच्या इतिहासात हा केवळ महाराष्ट्रातला - देशातलाच नव्हे, तर जगातला एकमेव दिग्दर्शक असेल की, ज्याने २१ वर्षांत ६२ चित्रपट केले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्याच्या ५०व्या वाढदिवसाला त्याने ५०वा चित्रपट पूर्ण केला, तेव्हा किशोर कदम त्याला म्हणाला, ‘गज्या १००व्या वर्षी १००वा चित्रपट करशील.’ गजेंद्रने त्याच्या शैलीत उत्तर दिलं,“१००वा चित्रपट ७५व्या वर्षी आणि मग निवृत्ती.’ मला हे खरं वाटत नाही. म्हणजे हे आकडे तो गाठेल, किंवा तो १२५ चित्रपटदेखील करेल. कारण अजून ५३ पूर्ण व्हायच्या आत त्याने १२ चित्रपट करून एकूण संख्या ६२वर आणलीय. मला खरं वाटत नाही ते हे की, तो ७५नंतर निवृत्त होऊच शकणार नाही. म्हातारा झालेला गजेंद्र चित्रपट न करता देवादिकाच्या पोथ्या वाचत बसलाय, असं चित्रच माझ्या नजरेसमोर येऊ शकत नाही.

...तर असा हा अवलिया! हा माणूस फक्त चित्रपट करत सुटतो. क्षणभर कुठे थांबत नाही. जे चित्रपट करतो, त्याबद्दल त्या त्या वेळी तर विचार वगैरे करत नाहीच, पण पुढच्या चित्रपटात गुंतण्यापूर्वी आधीच्याच, त्याच्या निर्मात्याचं काय झालं, याचाही विचार करण्यात तो वेळ घालवत नाही. त्याला फक्त एकामागोमाग एक चित्रपट करत सुटायचंय. कमीत कमी बजेटमध्ये चित्रपट करून तो त्याच्या परीने निर्मात्याला आर्थिकदृष्ट्या एका मर्यादेपर्यंत सुरक्षित करून ठेवतो. आणि मग लगेचच घौडदौडीने पुढल्या चित्रपटात घुसतो.

बरं तिथं घुसतो तेव्हाही तिथला असतोच असंही नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘कलाकृती गर्भार असायला हवी. तिने पुढच्या कृतींना जन्म द्यावा.’ या न्यायानं तो एक चित्रपट करत असताना त्याच्या डोक्यात दुसरा, तिसरा किंवा कितवाही चित्रपट सुरू होतो. कधी कधी तर तो एकाच वेळी दोन दोन चित्रपटांचं शूटिंग करत असतो, आधीच्या चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शन करत असतो…

म्हणजे हे न संपणाऱ्या गोष्टीसारखंच झालं. गोष्टीतून गोष्ट किंवा गोष्टीला लागून गोष्ट... रतीब सुरूच. त्याच्याबरोबर काम केलेल्या सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, मिलिंद शिंदे, नागराज मंजुळे, किशोर कदम, नीना कुळकर्णी या कलाकारांनी, तसंच त्याच्याबरोबर अनेक चित्रपट केलेले निर्माते सुनील फडतरे यांनी या पुस्तकातच त्याच्या या चित्रपट करत सुटण्याच्या अजब व्यसनाबद्दल लिहिलंय.

सर्वांनी पुढे असंही लिहिलंय की, गजेंद्रने प्रत्येक चित्रपटाला थोडा अधिक वेळ द्यावा, विचार करावा. आणि गंमत म्हणजे गजेंद्रने हेही सारं जसंच्या तसं या पुस्तकात छापलंय. कुणी म्हणेल काय टोकाचा माणूस आहे हा. पण कदाचित हे त्यालाही माहीत असावं. आत कुठे तरी जाणवत असावं. पण एखादं भूत एखाद्या झाडाला असं काही झपाटतं की, अगदी खतरनाक मांत्रिकदेखील सपशेल पराभूत होतो. गजेंद्र हे चित्रपट करत सुटण्याच्या इराद्यानं झपाटलेलं झाड आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

तो आपल्या मुलाला - गोदाला घेऊन विक्रम गोखलेंना ‘अनुमती’ची कथा ऐकवतो. तेव्हा ती संपल्यावर गोखले गोदाला म्हणतात, ‘या तुझ्या बापाला झाडाला उलटा टांगून फोडून काढला पाहिजे. भोसडीचा चांगल्या कथेची माती करतो.’ पण हीच गोष्ट ऐकवायला आल्या आल्या गजेंद्र गोखलेंना सांगतो, ‘तुमच्यासाठी नॅशनल अॅवार्ड घेऊन आलोय.’ आणि पुढे घडतंही तसंच.

पण म्हणून गजेंद्रवर होत असलेले आरोप खोटे ठरत नाहीत, ते मागेही घेता येत नाहीत. कारण तो स्वतःच या पुस्तकात स्वतःविरुद्ध साक्ष देत राहतो. अमूक एक चित्रपट मी थोडा सबुरीने करायला हवा होता. मीच माती खाल्ली. असं खुलेआम सांगत तो काही चित्रपटांच्या निर्मितीच्या कथा सांगताना असंही सांगतो की, पहिला रफकट पाहिला आणि मग एडिटर बदलला. कधी कधी तीन तीन एडिटर्स. तर कधी एकाच चित्रपटाच्या अगदी २१ एडिटिंगच्या व्हर्जन्स. याला चित्रपट करणं नाही रे म्हणत, असं पुस्तक वाचताना आपल्या मनाशी येतंच. पण मनातच राहतं. वर उल्लेख केलेल्यांनी नाही का सांगितलं?

रामदास फुटाणे एकदा त्याला म्हणाले होते, ‘अरे लेका, एक तरी पोर ९ महिने ९ दिवसांचं होऊ दे की. सारखी काय सिझरीन करतोस?’ पण हा भाऊ आपल्याच नादात.

मला एकदा ‘कलावैभव’ या नाट्यसंस्थेचे मोहन तोंडवळकर यांचा फोन आला. त्यांनी एका सिरियलची निर्मिती केली होती. ती पहायला त्यांनी मला बोलावलं. दोन एपिसोड दाखवून झाले. मी तोंडवळकरांच्या दिशेने निघालो. ते तिथूनच मला म्हणाले, आता याच्यावर तू काही बोलू नको. मग त्यांनी काही अंतरावर असलेल्या गजेंद्रला बोलावलं. त्याची दिग्दर्शक म्हणून ती पहिली सिरियल होती. तोंडवळकर माझी ओळख करून देत म्हणाले, ‘याच्याकडे जा. आणि चार गोष्टी शिकून घे.’ मी लगेचच म्हटलं, ‘अहो नको. आणि तूसुद्धा माझ्याकडे तेवढ्यासाठी येऊ नकोस.’ आणि बरंच झालं तो आला नाही.

आणि खरं सांगायचं तर तो येणारच नव्हता. नाहीच आला. कारण थांबून विचार करणं हा त्याचा स्वभावच नाही आणि हे तेव्हाही जाणवलं होतं. अन्यथा हा एवढा ६२ चित्रपट, केवढ्या तरी मालिका, नाटकं, आणखी बरंच काही शक्यच नव्हतं. त्याच्या प्रकृतीला ते परवडणारंच नाही. तो जसा आहे तसाच त्याला समजून घेतला पाहिजे. हा ‘या सम हा’ प्रकारचा दिग्दर्शक अभ्यासला पाहिजे. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अनेकांनी गजेंद्रवर विनोद केले. मीही एक केला. लोकांना तो आवडतो. तर मी रस्त्यानं जात असताना समोरून गजेंद्र आला. मला पाहून म्हणाला, ‘सर, अस्वस्थ दिसताय. काय झालं?’ मी म्हणतो, ‘तसं विशेष नाही. कालची पॅण्ट न घालता दुसरीच घातली. पाकिट त्यातच राहिलं. आता या पॅण्टीच्या खिश्यात फक्त साडेतीन रुपये आहेत.’ त्यावर गजेंद्र चटकन म्हणतो, ‘सर, तेवढ्या पैशात होईल चित्रपट...’

...पण इथून पुढे मी हा विनोद कधीच कोणाला सांगणार नाही. तो आता कायमचा डिलिट करतोय. कारण बजेट आणि कमालीच्या घाईघाईत चित्रपट करत सुटण्याची त्याची जगावेगळी रीत, या असल्या असंख्य विनोदांना पुरून उरलेली आहे. त्याच्या अनेक चित्रपटांचे निर्माते सुनील फडतरे म्हणतात की, गजेंद्र सरांना कमी बजेट दिलं, तरच ते चांगला चित्रपट करतात. जास्त बजेट चित्रपट बिघडवतं. आता एवढे चित्रपट करून, अनेक मानसन्मान मिळवून एखाद्या दिग्दर्शकाने चित्रपटाचं आणि स्वतःचंही बजेट वारेमाप वाढवलं असतं. ते सोडाच, हा बहाद्दर कधी कधी नगण्य पैसे स्वतःसाठी घेतो, पण चित्रपट हातचा सोडत नाही. कारण सतत चित्रपट करत राहणं, ही त्याची गरज आहे.

शिवाय हातातला अजून सुरू नाही केला, तर पुढच्या कथा आणि त्यातल्या व्यक्तिरेखा त्याच्या अंगभर पसरत जातात. मग आपल्या पुढे एकच पर्याय उरतो. या त्याच्या भस्म्या वृत्तीचा शोध घ्यावा. थोडं वाईट उदाहरण घेतो. गजेंद्रसकट सर्वांनी माफ करावं आणि मुद्दा तेवढा लक्षात घ्यावा. गटाराशेजारी रात्रभर गाढ झोपलेल्या बेवड्याला जेव्हा सकाळी जाग येते, तेव्हा त्यालाही वाटत असेल की, ‘काय हे! छे!! दारू वाईट.’ परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्याच ठिकाणी तेच स्वतःशी बोलतो.

...तर या अशा नाठाळ दिग्दर्शकाच्या नाठाळपणामागे आहे त्याचा जन्मजात मनस्वीपणा. तो भावूक आहे. त्याच्या एकूणएक कथांच्या केंद्रस्थानी वैयक्तिक आणि नातेसंबंधातले भावनिक पेच आहेत. तेच त्याच्या कथांचे प्रेरणास्रोत आहेत. त्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखाही थेट भिडतात. प्रथम त्याच्या निर्मात्यांना आणि मग त्याच्या कलाकारांना. ते उड्याच मारतात. प्रत्यक्ष शूटिंगमध्ये कधी कधी भलतंच काही तरी घडू लागतं. कलाकार वैतागतात. हे काय भलतंच, इतकंच न म्हणता ते चक्रावून जातात की, मग आता गोष्ट बदलली त्याचं काय? केवळ वादच नाही तर भांडणं, हाणामारीपर्यंत प्रकरण जातं, पण पठ्ठ्या शांत. कारण बदललेल्या कथेचं ओझं त्याला एकट्यालाच वाहायचं असतं. मग एडिटिंगमध्ये राडे. ते निस्तरायचे. चित्रपट पूर्ण करायचा.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

दरम्यान इतर चित्रपट डोक्यात आणि प्रत्यक्षात चालूच असतात. चित्रपट सुरू करण्यापूर्वी संपूर्ण पटकथा हाताशी असावी आणि ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या बदलांसाठी तीत थोडा वाव असावा, असं म्हटलं जातं, मानलं जातं. गजेंद्रचं नेमकं उलटं. सतत इम्प्रोव्हायेझेशन! एकदा मी बासु भट्टाचार्य यांना म्हटलं होतं की, तुमची एखादी पटकथा वाचायला द्याल? ते म्हणाले, ‘ऐसा कोई बाऊंड स्क्रिप्ट हमारे पास होता नहीं हैं. फिल्म दिमाग मे होती हैं और बनती जाती हैं.’ दादा, हमारा गजेंद्र भी कुछ इसी तरह काम करता हैं. मनस्वीपणा आणि विलक्षण उस्फूर्तता हेच त्याचं भांडवल! त्याचा प्रवाह सतत खळाळून वाहणारा.

त्याचा आणखी एक गुण म्हणजे तो कंटाळत नाही, निराश होत नाही. आणि सर्वांत मोठा दुर्गुण म्हणजे तो कसलीही चिकित्सा करत नाही. ती जी काही आतल्या आत आपसूक होत असेल तेवढीच. कारण चिकित्सा, विचार करत सुटला तर धो धो वाहत सुटलेल्या कथांचं काय? त्यांची उस्तवार कोण लावणार?

ग.दि. माडगूळकर पटकथा लिहिता लिहिता गाण्यांच्या जागा आल्या की, त्याच ओघात गाणीही लिहायचे. गजेंद्रचं गीतलेखनही अभ्यासण्यासारखं आहे. बसल्याजागी हा क्षणात गाणं लिहून देतो. बरं ते करताना पडद्यावर, गीतलेखन : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, गजेंद्र अहिरे असंही बिनदिक्कत टायटल देऊन टाकतो. दिसायला धसमुसळा, पण हा असा निरागस. हळवा तर इतका की, कथा सांगता सांगता किंवा शूटिंग चालू असताना चक्क ढसाढसा रडतो.

गजेंद्र त्याचे चित्रपट करताना नाना प्रकार करतो. क्षणात त्याच्या मनात काहीतरी येतं आणि तो त्याप्रमाणे त्वरीत बदल करायला घेतो. निर्माता, कलाकार नव्हे अख्खी टीमच बुचकळ्यात पडते. पण हा भौ शांत. निवांत. मुख्य म्हणजे त्याने ऐनवेळी केलेल्या बदलानुरूप साऱ्या गोष्टी त्याचं अख्खं युनिट पुरवतं. आई-वडील पुरवणार नाहीत इतके लाड त्याचे निर्माते पुरवतात. ऐनवेळच्या या बदलांमुळे चित्रपटाचं काय होईल, याची क्षिती न बाळगता. वाद, भांडण गृहीत धरलेलंच असतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पण एक गोष्ट, हा माणूस एकही चित्रपट स्वतःहून अर्धवट सोडत नाही. त्याचं पुढे काय व्हायचं ते होवो. तो पुरा करणं, ही त्याची गरज असते आणि हे त्याचं वेगळेपण आहे. आजवर ६२ आणि इथून पुढे तो जेवढे काही करणार आहे, ते सर्व चित्रपट नव्या पिढीनं अभ्यासले पाहिजेत. म्हणजे चित्रपट कसा करू नये, इथपासून कुठल्याही परिस्थितीत तो कसा मनस्वीपणे करावा, याचं शिक्षण गजेंद्रची कारकीर्द शिकवते.

गजेंद्र एकामागोमाग एक कथा आणि त्यावरचे चित्रपट करताना त्यात इतका गुंतलेला असतो की, त्याशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही की काय असं वाटत राहतं. २६ जुलै २००३चा तो राक्षसी पाऊस आणि त्याने घातलेलं थैमान एवढी एकच गोष्ट वगळता या सर्व कथनात ना तो कुठल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा उल्लेख करतो, ना कुठल्या साहित्यकृतीचा, चित्रपटाचा किंवा नाटकाचा उल्लेख करतो. तो आणि त्याचे चित्रपट. बस्स!

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याच्या ‘पिंपळ’ या नव्या चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनासाठी त्याला महाराष्ट्र शासनाच्या ‘कान मार्केटमध्ये तीन मराठी चित्रपट’ या उपक्रमाचं (त्याचा समन्वयक मीच होतो) व्यासपीठ लाभलं. पण, मराठी चित्रपटांसाठी इथवरच्या अनेक गोष्टी करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा तो या पुस्तकात दोन वेळा संधी येऊनसुद्धा उल्लेख करत नाही. कौतुक दूरच राहिलं. कारण त्याच्या ध्यानीमनी सदासर्वकाळ तो आणि त्याचे चित्रपट!

सोनाली कुलकर्णीच्या याच पुस्तकातील लेखात ती म्हणते, गजेंद्रबद्दल जे चेष्टेखोर बोललं जातं, त्याचा तिला राग आहे. कारण त्याच्याबद्दल असं बोलणाऱ्यांना त्याच्याबरोबर कामही करायचं असतं. त्याचे चित्रपट दुर्लक्षितही करता येत नाहीत. कारण त्यांना पुरस्कार मिळतात. तो निर्मात्यांच्या पैशांना पूरेपूर न्याय देतो. तो शिस्त पाळतो.

गजेंद्र आणि त्याचे चित्रपट ही एक वेगळीच ‘स्कूल’ आहे. तिचा नीटपणे अभ्यास होणं गरजेचं आहे. याला आता तरी सिरियसली घेतलं पाहिजे. त्याचे अनेक चित्रपट पाहून असं वाटतं की, छ्या एक थोर सिनेमा होता होता राहून गेला. गजेंद्रलाही तसं अधूनमधून वाटतं. त्यामुळे कधी तरी त्याचा तो निवांतपणे एखादा असा चित्रपट करेल की, त्याचं खूप मोठं नाव होईल.

जाता या या पुस्तकाला लाभलेल्या देखण्या रूपड्याबद्दल. रोहन प्रकाशनच्या प्रदीप चंपानेरकर यांनी चित्रपटविषयक पुस्तक आहे, याचं उत्तम भान ठेवून मांडणी आणि निर्मिती केली आहे. असं देखणं, दिमाखदार आणि सौंदर्यलक्षी पुस्तक हाती पडलं की, कुणीही लगेचच वाचायला घेईल… आणि ‘सोने पे सुहागा’ म्हणतात तसा आतला ऐवज!

‘स्टोरी टेलर’ - गजेंद्र अहिरे

रोहन प्रकाशन, पुणे | पाने – ३१४ | मूल्य – ५९५ रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक अशोक राणे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सिनेअभ्यासक आहेत.

ashma1895@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......