भाऊ तोरसेकरांची विसंगतीपूर्ण विधानं, सोयीस्कर सत्य आणि पक्षपाती ‘प्रतिपक्ष’!
पडघम - राज्यकारण
महेंद्र तेरेदेसाई  
  • भाऊ तोरसेकर
  • Tue , 02 May 2023
  • पडघम राज्यकारण भाऊ तोरसेकर Bhau Torsekar महात्मा गांधी Mahatma Gandhi रामदेव बाबा Ramdeo Baba नोटबंदी Notebandi गांधी-नेहरू Gandhi-Nehru

काल, १ मे २०२३ रोजी मुंबईत मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भाऊ तोरसेकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण केलं. त्यात त्यांनी आधी कधीतरी केलेली दोन विधानं पुन्हा केली –

पहिलं – ‘मोदींना जितके गांधी कळले, तितके ते गांधीवाद्यांनाही कळले नाहीत.’

दुसरं – ‘मोदी, गांधी-नेहरूंची नावं पुसणार, हे मी २०१९ सालीच म्हटलं होतं. तेव्हा ह्याला विरोध करणारे आज तीच तक्रार करताहेत.’

पहिल्या विधानाच्या स्पष्टीकरणासाठी भाऊ दोन उदाहरणं देतात.

आधी ते नोटबंदीची तुलना गांधींच्या स्वातंत्र्यआंदोलनाशी करतात. इंग्रजांविरुद्ध लढताना गांधींनी सामान्य माणसाला अंगावर लाठ्या-काठ्या झेलायला लावल्या. स्वातंत्र्यासाठी त्या त्यांनी झेलल्या. तोच सामान्य माणूस मोदींनी काळ्या पैशाविरुद्ध लढण्यासाठी वापरला. तर हे पुरोगामी गांधीवादी तक्रार करतात की, ‘नोटबंदीमुळे सामान्य माणूस उन्हातान्हात उभा राहून मेला’.

मात्र नोटबंदीमुळे सामान्य माणसाची काळ्या पैशांपासून किती व कशी सुटका झाली, हे भाऊ सांगत नाहीत. किती काळा पैसा उघड झाला, याची आकडेवारी देत नाहीत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दुसऱ्या उदाहरणात, गांधींच्या ‘स्वदेशी चळवळी’ची तुलना ते रामदेवबाबाच्या ‘पातंजली’शी करतात. म्हणतात, गांधींच्या स्वदेशी चळवळीचे उदात्तीकरण करणारे पुरोगामी समाजवादी, रामदेवबाबाच्या पातंजलीने  ‘मल्टी-नॅशनल’ला दिलेल्या लढ्यावर मात्र टीका करतात. 

पण भाऊ याचा खुलासा करत नाहीत की, हा लढा (?) देताना पातंजली विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत होती का? पतंजलीने या क्षेत्रात डाबर व इतर स्वदेशी कंपन्यांची कशी गळचेपी केली? स्वत:ची मक्तेदारी कशी प्रस्थापित केली? पातंजलीने इतक्या कमी वेळात इतका मोठा पल्ला कसा गाठला?

खरं तर वरील दोन विधानांतील विरोधाभास कुणालाही अगदी सहज कळण्यासारखा आहे. पण भाऊच म्हणतात तसं ‘आपण बोललेलं ऐकत नाही, तर जे आपल्याला हवं आहे तेच ऐकतो’. काही मिनिटांच्या अंतरावर केलेली ही विधानं आपण तपासत नाही. आधी ते म्हणतात की, मोदींना जितके गांधी कळले तितके ते गांधीवाद्यांनाही कळले नाहीत आणि लगेच काही वेळाने ते विधान करतात, ज्याचा अर्थ असा होतो की, गांधी ज्यांना कळले (म्हणजे मोदी) तेच त्यांचं नाव भारताच्या इतिहासातून पुसून टाकताहेत.

बरं मोदींच्या ‘स्वदेशी चळवळी’ची महती सांगणाऱ्या भाऊंना आपल्या भाषणात उदधृत करायला प्लेटो व आईन्स्टाईन हे परदेशी तत्त्ववेत्तेच लागतात. त्यांना तेव्हा तुकाराम वा तुकडोजी महाराज नाही सुचत. बहुधा त्यांना ते तत्त्ववेत्ते नाही, तर फक्त ‘संत’ समजत असावेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

प्रकाशित झालेल्या पुस्तकातील कायद्याच्या उल्लेखांबद्दल संबंधित लेखकाला सुनावताना ते प्लेटोला उदधृत करतात- ‘सभ्य समाजाला कायद्याची गरज नसते आणि भामटे तो कधीच पाळत नाहीत’. भाऊ पुढे तक्रार करतात की, ‘कायद्याचं राज्य म्हणजे सक्तीचं राज्य. तसं राज्य आज प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असताना, ते आजच्या ‘बुद्धिवंतांना’ नकोय.’

भाऊंना असं सुचवायचं आहे का, की आणीबाणीच्या वेळेस ‘राष्ट्रीय संत’ ज्याला ‘अनुशासन पर्व’ म्हणाले होते, तेच आज सुरू आहे का? अन्यथा प्लेटोच्या विधानाचा संदर्भ लागत नाही.  

आपल्या भाषणात भाऊंनी बुद्धिवंतांची व्याख्याही केली. ते म्हणाले, ‘जो बुद्धिभेद करतो, तो आज बुद्धिवंत समजला जातो.’ त्यांची ही व्याख्या कोणाला लागू होते, हे सुज्ञांना सांगणे न लगे. 

‘आज पत्रकारिता संपली आहे’ असं एक वापरून गुळगुळीत झालेलं विधानही भाऊ आपल्या भाषणात करतात. आजच्या पत्रकारांची तुलना ते कालच्या संपादक-मालक असलेल्या अत्रे-खाडिलकरांशी करतात. ‘आज पत्रकारिता राहिलेली नसून ‘मीडिया हाउसेस’ झाली आहेत आणि तीवर कॉर्पोरेट कब्जा करून बसले आहेत’ असं ते म्हणतात. पण त्या कॉर्पोरेटवर कोणाचा अंकुश आहे, हे भाऊ सांगत नाहीत. संपादक-मालक असलेलं शेवटचं मीडिया हाऊस ‘एनडीटीव्ही’ हे कोणी, कोणाच्या, भल्यासाठी गिळंकृत केलं, हे भाऊ सांगत नाहीत. बहुधा त्यांच्या काकदृष्टीला ते दिसत नसावं.

भाऊंना काल त्यांच्या शेजारी बसलेले सोमय्याही दिसले नाहीत. नाहीतर पत्रकार म्हणून त्यांनी त्यांना नक्कीच विचारलं असतं की, ‘नारायण राणेंसकट भाजपत आलेल्या नेत्यांच्या भ्रष्टाचारांसाठी उघडलेल्या फाइली नंतर बंद का करता?’ (हा प्रश्न त्यांनी दुसरीकडे कुठे विचारला असेल, तर माहीत नाही. पण कालही तो पुन्हा विचारता आला असता. अर्थात त्यावर त्यांना हुकमी हशा मिळाला नसता!) 

काल खास भाऊ तोरसेकरांना ऐकायला आलेल्या त्यांच्या चाहत्यांना प्रकाशन समारंभ खूप लांबतोय असं वाटू लागताच, त्यांनी मध्येच उठून भाऊंना बोलू देण्याची मागणी केली. तेव्हा त्या पुस्तकाच्या लेखकाने ‘बेधडक’पणे त्यांना योग्य शब्दांत समज देऊन गप्प केलं. पण नंतर भाऊंनी मात्र भाषणासाठी आपल्याला दोन तास वाट बघावी लागली, याचा राग आपल्या खास मिश्किल शैलीत व्यक्त केलाच.

कार्यक्रमाच्या आधी खाजगीत पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना भाऊ उद्विग्न होऊन म्हणाले होते, ‘आज लोकांना काही माहीतच नसतं’. मी तेव्हा त्यांना म्हटलं, ‘म्हणूनच तर आजच्या ‘हुशार’ वक्त्यांचं फावतं’.

एकदा य. दि. फडके तुमच्यापेक्षा प्रबोधनकार कसे श्रेष्ठ वक्ते होते, हे पटवून देताना बाळ ठाकऱ्यांना म्हणाले होते, ‘तुम्ही तुमच्या विचारांच्याच लोकांसमोर बोलणं फार कठीण नसतं. जो आपल्या विचारांविरुद्ध असलेल्या लोकांसमोर बोलून त्यांना जे नकोय ते ऐकवतो, तो खरा उत्तम वक्ता’.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आज प्रत्येकाने स्वत:चे असे ‘एको चेंबर’ बनवले आहेत. कोणीही विरोधी विचार ऐकायला जात नाही आणि वक्तेही आपल्या श्रोत्यांना जे हवं आहे तेच बोलून ‘वाहव्वा’ मिळवत असतात. भाऊंनी काल जमलेल्या श्रोत्यांसामोर ‘मी गांधी नाही, तेव्हा मी माफी मागतो’, हे हशा पिकवणारं वाक्य बादरायण संबंध जोडून आणलं, तेव्हा त्यांचा ‘playing for gallery’ला विरोध नाहीय, हे कळतं. 

भाषणाच्या शेवटी भाऊंनी गंमत म्हणून काही आकडेवारी पेश केली. ती त्यांच्या ‘प्रतिपक्ष’ या यू-ट्यूब चॅनेलची होती. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांना सहा लाख (601k subscriber) सभासद कसे मिळाले... किती कोटी तास लोकांनी त्यांना ऐकलं… त्यामुळे ते ७५ वर्षांच्या आयुष्यात ऐंशीपट आयुष्य कसं जगले वगैरे वगैरे…

एनडीटीव्हीतून बाहेर पडल्यावर पत्रकार रवीश कुमार यांच्या ‘रवीश कुमार official’ या यू-ट्युब चॅनेलला काही तासांत पन्नास लाख (5.72M subscriber) सभासद मिळाले होते. त्यामुळे आजपर्यंत किती कोटी लोकांनी त्यांचं किती कोटी तास ऐकलं असेल!

आकडेवारीवरूनच वक्त्याचं मोल ठरवायचं, तर ही आकडेवारी समोर दिसते आणि य.दि. फडक्यांच्या, ‘उत्तम वक्ता कोण?’ याचे मापदंड मानायचे झाले, तर सत्तेला प्रश्न विचारणारे कोण आणि लोकांना जे आवडतंय ते बोलणारे कोण, हेही ओळखता येतं.

‘मेन स्ट्रीम मीडियापासून वेगळा’ अशी नुसती टॅगलाइन लावून आपण वेगळे होत नसतो. त्यासाठी ‘अलग सोच’ आणि ते मांडण्याचं धैर्य लागतं. सहज म्हणून एकदा रवीश कुमार, अभिसार शर्मा, सुजीत नायर, परंकला प्रभाकर (निर्मला सीतारामन यांचा नवरा), पुण्यप्रसून वाजपेयी, ध्रुव राठी यांचे यू-ट्यूब चॅनेल बघा. एखाद्या घटनेकडे बघण्याचा त्यांचा आवाका, समज आणि दृष्टीकोन बघा.

एखादी जीवघेणी साथ संपवायची असेल, तर आपल्या शरीरात अँटी-बॉडीज टोचून घ्याव्या लागतात. तसंच ऐकलेले विरोधी विचार, तुमचे स्वतःचे विचार निर्दोष करायला मदत करतात. मग तुम्ही कुठल्याही वा कोणाच्याही बाजूचे असाल. कारण विचार महत्त्वाचे, ते सांगणारा माणूस नाही.  

.................................................................................................................................................................

लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाट्यदिग्दर्शक आणि लेखक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......