२.
एमील बर्न्स यांच्या ‘मार्क्सवाद म्हणजे काय?’च्या मराठी आवृत्तीच्या प्रस्तावनेत कॉ. प्रभाकर वैद्य म्हणतात, “मार्क्सवाद म्हणजे केवळ आंधळा पोथीवाद नव्हे. परंपरागत किंवा वचनांची पोपटपंची नव्हे; तें एक जिवंत व विकसनशील तत्वज्ञान आहे… गेल्या शंभर वर्षांत बदलत्या परिस्थितीस अनुसरून मार्क्सवादाचा विकास कसा कसा होत गेला याचा चलत चित्रपट येथें थोडक्यांत बघावयास मिळतो… मूलभूत तात्त्विक बैठक व दृष्टी कायम ठेवून देश काल परिस्थितीप्रमाणें मार्क्सवाद विकास पावतो.”५
१८८३च्या जोतीराव फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथाच्या ८९ पानांत १३९ वर्षांपूर्वीच्या शेतकऱ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती काय होती, याचे चित्रण जोतीरावांनी केले आहे. इंग्रज राजवट स्थिर व्हायच्या थोडेसे आधीच कशी स्थिती होती, यातून ठळकपणे दिसते. ते एकांगी वाटत नाही. किंबहुना आजच्या भाषेत सामाजिक, आर्थिक आणि स्त्री-पुरुष विषमता-शोषणाचे प्रश्न कसे एकमेकात गुंफले आहेत, कसे जटील आहेत, हेच जाणवत राहते. त्यांकडे सुटे सुटे पाहून चालत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध, कबीर आणि जोतीरावांना गुरू मानत. जागतिक परिस्थिती आणि भारतीय वास्तवाचे कमालीचे भान ठेवत असतानाच बाबासाहेब त्यांचे व्यक्तिगत दाहक अनुभव व अस्पृश्य समाजाचा विचार करताना कधीच भावनेच्या आहारी गेलेले दिसत नाहीत. १९३६च्या ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या न झालेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात- “जातिव्यवस्था हे फक्त श्रमविभाजन नाही. ते श्रमिकांचेही विभाजन आहे.”६ हे भाषण ‘Annihilation of Caste’ (‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’) या नावाने पुस्तकरूपाने आले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्यानंतर त्यांनी खूप उशिरा काठमांडू येथे जागतिक बौद्ध परिषदेत केलेले ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ हे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक भाषण अभ्यासले पाहिजे. या दोन्ही भाषणांचा परस्परसंबंध आहे. दुसऱ्या भाषणात बाबासाहेबांनी मार्क्सवादाचे मूलभूत असे दहा सिद्धान्त सांगितले आहेत.७ बुद्ध तत्त्वे व मार्क्सवाद अशी चर्चा करून झाल्यावर त्यांनी अत्यंत महत्त्वाचे असे चार सिद्धान्त सांगितले. ते असे-
१) तत्त्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे. विश्वाच्या उगमाचे स्पष्टीकरण देत वेळ वाया घालवणे नाही.
२) वर्गावर्गांत हितसंबंधांचा संघर्ष आहे.
३) खाजगी संपतीच्या मालकीमुळे एक वर्ग सत्ताधारी बनतो आणि दुसऱ्याचे शोषण केल्यामुळे दु:ख वाट्याला येते. आणि
४) चांगल्या समाजासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून दु:ख दूर करणे आवश्यक आहे.
या चार सिद्धान्तांबाबत बाबासाहेबांनी मार्क्सशी पूर्ण सहमती दर्शवली आहे. बुद्ध आणि मार्क्सशी तुलना करताना त्यांनी हेच बुद्धाच्या भाषेत दाखले देत सांगितले आहे. शेवटी बाबासाहेब म्हणतात, “the differences are about the means. The end is common to both.” (‘मतभेद साधनांबाबत आहे. बुद्ध आणि मार्क्स दोघांमध्ये साध्य-ध्येय समान आहे.’)
‘कायमची हुकूमशाही’ हा राज्यासंदर्भातील राजकीय तत्त्वज्ञानातील एक कमकुवत भाग आहे, हे साम्यवादीच मान्य करतात. आणि ‘राज्यसंस्था विरून जाईल’ या युक्तिवादाचा ते आधार घेतात… पहिल्या प्रश्नाला ते निश्चित उत्तर देत नाहीत. बाबासाहेब पुढे अत्यंत महत्त्वाचे विधान करतात, “लोकशाही सुरक्षित व स्थिर करण्यासाठी थोड्या कालावधीसाठी हुकूमशाही चांगली व स्वागतार्ह असेलही. लोकशाहीच्या मार्गातील सर्व अडथळे नष्ट करून लोकशाही स्थिर व सुरक्षित झाल्यावर ती स्वत:ला नष्ट कां करायची नाही?”
त्यासाठी बाबासाहेब सम्राट अशोकाचे उदाहरण देतात. एवढेच नाहीतर जगात शांतता प्रस्थापित करायचा मार्गही दाखवत आहेत. १९३८ साली बाबासाहेब मनमाड येथील कामगारांसमोर बोलताना म्हणाले होते— “ ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही’ हे कामगारांचे दोन शत्रू आहेत.” आजवरचा अनुभव पहाता असे खेदाने म्हणावे लागते, भांडवलशाहीविरोधी लढे चालूच आहेत. परंतु अजून तरी स्त्री-पुरुष विषमतेबरोबर ब्राह्मणशाही विरोधातील लढे कसे, कुठे घ्यायचे, यावर युनियन्स वा राजकीय पक्षांमध्ये गांभीर्याने विचारविनिमय झाला आहे, असे फारसे दिसत नाही. फुले-आंबेडकरवादी काही चळवळी समूहाच्या जमीन हक्क, आदी प्रश्नांवर काम करत आहेत. पण ‘जात-वर्ग-स्त्री-पुरुष विषमता अंत’ याचा एकत्रित विचार करतात, असेही फारसे दिसत नाही. यात नेमके अडथळे कोणते आहेत, यावर सामूहिकपणे गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे.
याच संदर्भात यावर आजवर कुणी फारसे लक्ष न दिलेले वा तसे कार्यक्रम-उपक्रम न घेतलेल्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांनाच बाबासाहेब हात घालतात. शेवटी आपल्या विचारात अधिक समृद्ध होत गेलेल्या महात्मा गांधींची साथ सत्ता येताच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सोडून दिली. अशा काँग्रेस सरकारकडून या बाबतीत कोणत्याही धोरणांची अपेक्षा करणे चूकच!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लाहोर येथील भाषणाआधी चाललेल्या चर्चेदरम्यान एक आयोजक श्री. हर भगवान यांना त्यांनी १९३६मध्ये लिहिले होते. त्याला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात- “…the real method of breaking up the Caste System was not to bring about inter-caste dinners and inter-caste marriges but to destroy the religious notions on which Caste was founded.”८ (“आंतरजातीय सहभोजन किंवा आंतरजातीय विवाह नव्हे, तर ज्यावर जातिव्यवस्था उभारलेली आहे त्या धार्मिक कल्पनांचा विनाश करणे ही जातिव्यवस्था उध्वस्त करण्याची खरी पध्दत आहे.”)
या पार्श्वभूमीवर एक मोठी परंपरा आजही सुरू आहे. २०२१ला विधानसभांच्या निवडणुका आणि त्यानंतरचे तामिळनाडू राज्य सरकार! डीएमकेचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन सरकारने १०० दिवसांत २०० ब्राह्मणेतर पुजारी नियुक्तीची घोषणा केली. लवकरच ‘शैव अर्चक’ कोर्स सुरू केला जाईल. तो पूर्ण केल्यानंतर कोणीही पुजारी होऊ शकतो. ‘तामिळनाडू हिंदू रिलीजियस अँड चॅरिटेबल इंडॉमेंट डिपार्टमेंट’ (एचआर अँड सीई) नुसार ३६००० मंदिरांत नियुक्त्या होतील. लवकरच ७० ते १०० ब्राह्मणेतर पुजार्यांची पहिली यादी होईल. यावर मद्रास विद्यापीठाचे प्रा. मणिवन्नन म्हणाले, ब्राह्मणेतर पुजार्यांची लढाई जुनी आहे. १९७०मध्ये पेरियार यांचा हा मुद्दा; तेव्हा द्रमुक सरकारने नियुक्तीचे आदेश दिले. १९७२मध्ये सुप्रीम कोर्टाची स्थगिती. १९८२मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री रामचंद्रन यांनी आयोग स्थापन केला होता. आयोगाचे सर्व जातीच्या व्यक्तींना प्रशिक्षण दिल्यानंतर पुजारी नियुक्ती करण्याचे आदेश होते. नुकतीच यासंदर्भात काही पावलं एम.के. स्टॅलिन सरकारने उचलली असल्याची दिसतात.
या वेळी संघ-भाजपच्या भूमिका पाहून जोतीराव, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या भूमिकांची आठवण झाली. १८७३ साली जोतीराव फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केल्यानंतर ‘असंमत वैधव्य’ यात ते म्हणतात, “ब्राह्मण विधवांना इतक्या दयनीय निर्लज्ज मार्गावर खेचून नेणारी आर्यसंस्था इतकी शिसारी आणणारी आणि नीच आहे… दुर्दैवी ब्राह्मण विधवांचे केशवपन करण्यास कोणत्याही न्हाव्याला परवानगी देण्यात येऊ नये…. गरीब विधवांनाही पुनर्विवाहाची परवानगी मिळाली पाहिजे. स्त्री जीवनाकडे पहाण्याच्या दुष्ट बुद्धीमुळेच लबाड, विकृत शास्त्रकारांनी अशा अन्याय्य आणि बाष्कळ अटी त्यांच्या शास्त्रात घुसडल्या असल्या पाहिजेत.”
कोल्हापूरचे डॉ. जयसिंगराव पवार ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथा’त म्हणतात, “वेदोक्तांच्या संघर्षात करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी कर्मठ ब्राह्मणांची बाजू घेतल्यामुळे शाहू महाराजांनी पीठाचे उत्पन्न सरकार जमा केले होते. शेवटी संघर्षात शंकराचार्य विद्यानरसिंह भारती यांना हतबल व्हावे लागले. त्यांना १९०५ साली महाराजांसमोर शरणागती स्वीकारावी लागून कोल्हापुरातील ब्राह्मवृंदांनाही शरण जाण्याचा आदेश द्यावा लागला. राजवाड्यातील देवदेवतांच्या व पूर्वजांच्या समाधींच्या पूजा तोवर ब्राह्मण पुरोहितांकडून होत होत्या. .. १९२० साली शाहू महाराजांनी त्या बंद करून मराठा पुरोहितांकडून सुरू करण्याचा हुकूम दिला. दुसऱ्या एका हुकमाने महाराजांनी क्षात्रजगद्गुरूंच्या पाटगांव संस्थानातील आणि वाडी रत्नागिरी येथील जोतीबाच्या देवस्थानातील ब्राह्मण पुजारी यांना काढून टाकून त्या जागी मराठे पुजारी नेमले. त्याचबरोबर ‘मराठा पुरोहित’ तयार करण्यासाठी खास प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचाही निर्णय घेतला.”
त्या वेळची धार्मिक-सामाजिक स्थिती पहाता एकापरीने त्यांनी हे धाडसच दाखवले होते. संस्थानातील सर्व सत्ता वर्चस्ववादी ब्राह्मणी धर्म परंपरा व सत्तेला आव्हान देवून खिळखिळी करण्यास न्यायपूर्वक वापरली. एवढे धाडस येथील सत्ताधारी मूठभर मराठा घराण्यांनी कधीच दाखवले नाही. उलट सत्ता अबाधित असतानाही भारतीय राज्यघटना धुडकावत मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या संघ साहित्य, इतिहास, प्रशासनातील ‘शाश्वत ब्राह्मणी सत्ते’ला ते अजिबात हात लावू शकले नाहीत. उलट त्यांच्या पुरोहितशाहीला कायम सत्तेचे अभय देतच राहिले. घरीदारी, सहकारी चळवळ, शासन-प्रशासनापर्यंत तिला हुकमी उत्पन्नाचे स्रोत देत राहिले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
घटनेप्रमाणे अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी जातीजमातींच्या राखीव जागांची प्रामाणिकपणे अंमलबजावणीही केली नाही. किंबहुना ती कशी होणार नाही, हेच पाहिले जात आहे. त्यांच्या दूषित दृष्टीकोनातून ब्राह्मणी अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका-तोंडी परीक्षा-सीईटी आदी बाबी आणल्या. ज्यांच्यामुळे या विद्वेषी-विषमावादी शक्ती आज सत्तेवर आहेत. त्या बहुसंख्य वंचितांसोबतच अर्धशिक्षित, गरीब मराठा शेतकरी-शेतमजूर तरुण-तरुणींना गरिबीच्या दरीत ढकलत आहेत. त्यासाठी मूठभर मराठा घराणी आज सत्तेवरील संघ-भाजपबरोबर हात मिळवणी करत आहेत. त्यांनी स्वत:च्या हितसंबंधांसाठी राजकीय युती आहे. गरीब मराठ्यांना सत्ता दूरच पण त्यांना समदु:खी मुस्लीम, बौद्ध आदी हिंदू-ओबीसी-स्त्री-शूद्रातिशूद्र समूहांविरोधी उभे केले. राजकीय पातळीवर त्यांना एकत्र येऊच देत नाहीत. जोतीराव फुले यांचा ‘कुणबी राजा शिवाजी’ऐवजी संघाच्या ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ शिवाजीला लादले. नाटककार गडकरी यांचे पुतळे बसवले, पाडलेही. सोयीचे असेल तेव्हा पुण्याची ऐतिहासिक भांडारकर संशोधन संस्था जाळली. या साऱ्या बाबी गनिमी काव्याने करायला लावल्या. त्यांच्याच सत्ताउबेत वाढलेला संघ-भाजप २०१४ साली सत्तेवर आला.
स्त्रीशूद्रातिशूद्र संदर्भात ‘सॉफ्ट हिंदुत्व, कट्टर हिंदुत्व’ : काय फरक?
नुकतीच एक बातमी वाचली. इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) बावडा गावातील पाटील घराण्यातील एक बडे नेते काँग्रेसच्या एका गटातून आधीच भाजपबरोबर आणि त्यांच्या नातेवाईकाने नुकताच राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. अशी सत्ताधारी मूठभर घराणी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आलटून-पालटून जात आहेत. काँग्रेसचे ‘सॉफ्ट हिंदुत्व’ आणि संघ-भाजपचे ‘कट्टर हिंदुत्व’ म्हणजेच ‘कट्टर ब्राह्म-क्षत्रीय युतीचे तत्त्व’ आहे.
याच बावडा गावात १९७२मध्ये काँग्रेस मंत्री शिवाजीराव पाटील यांचे भाऊ शहाजीराव पाटील यांनी बौद्ध, दलित वस्तीवर ‘सामाजिक बहिष्कार’ टाकला होता. त्या विरोधात ‘युक्रांद, दलित पॅंथरपूर्व दलित आघाडी’ मिळून राजाभाऊ ढालेंच्या नेतृत्वाखाली आम्ही विद्यार्थी-तरुण तिथे गेलो होतो. पाटलांच्या वाड्यासमोरूनच गावात ‘हल्ला बोल’च्या घोषणा देत मोर्चा काढला होता. त्या आधीपासूनच बावडा गावावर धर्मनिरपेक्ष काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी-भाजपची सत्ता आहे!
हर्षवर्धन पाटील आमदार-मंत्री याच इंदापूर तालुक्याचे. महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसमधील सत्ताधारी मराठा घराण्यांचे क्षत्रियत्व संघाला शरण गेलेले आहे! शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय व त्यांची रोखठोक अंमलबजावणी पाहता म्हणावे लागते, त्यांचे संस्थानाधिश म्हणून असलेले क्षत्रियत्व तत्कालीन सर्व वर्ण-जाती-जमाती, स्त्रियांच्या सर्वंकष उन्नतीचे क्षत्रियत्व!! तमाम-वंचित-बहुजन समूहांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ऊन्नतीसाठी स्वत:कडील राजसत्ता कशी राबवायची, याचा शाहू महाराज आदर्श होते. म्हणून सत्ताधारी मूठभर घराणी व संघ-भाजप सत्तेच्या संदर्भात शाहू महाराज यांचा आदर्श गरीब मराठा शेतकरी-शेतमजूरांसह स्त्री-शूद्रातिशूद्रांसमोर आजही घेऊन जात नाहीत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
जटील, गंभीर ‘नोशन’ आणि नष्ट करण्याची प्रदीर्घ परंपरा!
१९३६च्या ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणी-हिंदू धर्मसुधारणेसाठी ठोस रूपरेषा मांडतात -“…पुरोहितपद वंशपरंपरागत नसावे. स्वत:ला हिंदू म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला पुरोहितपदासाठी पात्र मानले पाहिजे. सरकारने ठरवून दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आणि त्याला तो व्यवसाय करण्याची सनद असल्याशिवाय पौराहित्य करता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद करावी…. सनद नसलेल्या पुरोहिताने केलेला कोणताही समारंभ विधिसंमत मानण्यात येऊ नये. तसेच सनद नसताना पौराहित्य करणे शिक्षापात्र गुन्हा ठरविण्यात यावा…”.
यासंदर्भात एका पत्रकाराने पेरियार यांना विचारले होते, “पेरियार साहब, आप भगवान वगैरे नहीं मानते I फिर भी आप चाहतें हैं की सभी जातियोंके लोग मंदिरों में पुजारी बनें I ऐसा क्यों?” यावर पेरियारांनी उत्तर दिले, “जिस दिन हर जातिके लोग पुजारी बनने लगेंगे, उस दिन ब्राह्मण भी ये कहने लगेंगे की मंदिर के अंदर जो है वह पत्थर है, भगवान नहीं I इस तरह मेरा काम आसान हो जाएगा I इसलिए मैं चाहता हूं सभी जातियोंके लोग पुजारी बनें I”
परंपरेने लादलेले, खोटे ब्राह्मणी पावित्र्य व त्याविषयीची जनसामान्यांची समज-भावना व त्यांची लुटारू व्यवस्था नष्ट करण्यासाठी या अंमलात आणलेल्या विविध पद्धती व मार्ग आहेत.
१९९३ बहुजन महासंघ स्थापनेच्या वेळी एक प्रमुख ठराव होता- “रा.स्व.संघ व त्याच्या इतर संघटनांकडे आणि त्यांच्या हिंदू धर्मातील शंकराचार्यांच्या पीठांकडे अशी मागणी करत आहे की, जर ते सर्व हिंदूंना समान मानत असतील व हिंदू एकतेची त्यांची भूमिका प्रामाणिक असेल, तर शंकराचार्यांच्या चार धर्मपीठांपैकी किमान दोन धर्मपीठांवर बहुजन समाजातील भक्तिमार्ग परंपरेतील दोन व्यक्तींची शंकराचार्य म्हणून नेमणूक करावी. ही नेमणूक कधी करतात, त्याची तारिख जाहीर करावी. जर अशी नेमणूक करायची त्यांची तयारी नसेल तर हिंदू धर्माच्या नावाखाली बहुजन समाजाचा बुद्धिभेद करण्याचे त्वरीत बंद करावे.”
असाच ठराव २१ मार्च १९९३ रोजी शेगांव (जि.बुलढाणा) येथे बहुजन महासंघाच्या पहिल्या अधिवेशनात पार पडला. तेथे दुष्काळ, बहुजन सत्ता, आदींसह अनेक ठरावांसोबत हाही एक ठराव होता. या मागील मूळ हेतू प्रस्थापित विषमतावादी, विद्वेषी, अतिरेकी ब्राह्मणी परंपरेला आव्हान देण्याचा होता. खऱ्या वारकरी परंपरेचा उघड स्वीकार बहुजन महासंघाने केला. आणि ‘बहुजन-वारकऱ्याला शंकराचार्य करा’, ही भूमिका घेतली होती. यावर संघाची अजूनपर्यंत चिडीचूप! याची आमच्या पुरोगामी मित्रांनी दखलही घेतली नाही. काहींनी घेतली; ते तोंडीच ‘हे कसले आंबेडकरवादी’ असे सुनवायला लागले. भूमिकेवर संवाद साधून टोकाची टीका करायला हरकत नाही. यामागे वंचितांचेही एक समांतर राजकारण असू शकते, हे ध्यानात घेतले जात नाही!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
याचा अर्थ जोतीराव फुले, पेरियार, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा आणि आता वंचित बहुजन आघाडी यांची एकच दिशा आहे. ब्राह्मणी धर्म संस्कृती-व्यवस्था आणि तिची ‘नोशन’ आधारित व्यवस्थेच्या पातळीवरील दृश्य-अदृश्य सारे आधार उदध्वस्त करणे, त्याला पर्याय देणे. आंतरधर्मीय-आंतरजातीय लग्नांच्या पुढचे हे मूलभूत पाऊल आहे. पण त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.
स्वातंत्र्यानंतर संसदीय लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आलेली मूठभर मराठा घराणी येथील बहुसंख्य वंचित बहुजनांना ठगवणारी टोळी ठरली आहे. म्हणूनच वंचित बहुजनांचा सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय-आर्थिक लढा हा वर्ण-जाती-स्त्रीपुरुष विषमतावादी व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याच्या प्रक्रियेतील एक पाऊल आहे. त्यासाठीच वर्चस्ववादी ‘ब्राह्मण-क्षत्रियत्व’ युती विरुद्ध बहुसंख्य वंचित बहुजनांची सामाजिक-राजकीय एकजूट आवश्यक आहे!
एकदा का शाहू महाराजांची परंपरा मानली, तर त्या मागची भव्य परंपरा बुद्ध, सूफी संत-तुकारामादी वारकरी संप्रदाय, जोतीराव-सावित्री फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत येऊन पोचते. आणि नेमके हेच संघ आणि सत्ताधारी घराण्यांना नको आहे. संघाच्या विद्वेषी ब्राह्मणी धर्म संस्कृतीचे कट्टर वाहक संभाजी भिडे यांचे ते खंबीर पाठीराखे आहेत. म्हणून आज सत्तेवर येऊनही भिडेंची पाळेमुळे खणून काढायला संघ-भाजप-काँग्रेसी गट तयार नाहीत. सत्ता असूनही मोदींचे गुरू भिडेंची तपशिलात चौकशी करायला तयार नाहीत. आंबेडकर भवन व भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणात साधी अभ्यास समितीही नियुक्त करत नाहीत. कारण मराठा घराण्यांच्या ताब्यातील सहकार चळवळीतले मराठा नेते दिल्लीला पंतप्रधान मोदींना वारंवार भेटतात, यात सर्वच आले. राज्यकर्त्यांना भेटायला अजिबात विरोध नाही, पण ते का उघड करत नाहीत? नेहमीच गूढ का? उद्देश जाहीर करून भेटायला का जात नाहीत?
वरील सर्व आणि अन्य व्यवस्थाविरोधी क्रांतिकारक विचारसरणींतून जिथे माझी प्रारंभीची वैचारिक जडण-घडण; सामाजिक-राजकीय विचार स्पष्ट होत गेले. ज्या चळवळीतून उभा राहिलो, त्या ‘युक्रांद’ची मूलभूत भूमिका- विकसित होत गेली. अखेर ती १९७३ सालात लिखित स्वरूपात आली.९ तिलाही आता पन्नास वर्षे होत आली.
या भूमिकेचा गाभा आहे- “समाजवादी क्रांती साकार होण्याच्या दृष्टीने भारतातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य सत्ता व सत्तास्थाने दलित जातींच्या हाती ताबडतोब जाणे, ही क्रांतीची सर्वप्रथम गरज व कसोटी आहे. जातिविहीन समाज निर्माण करण्याच्या ध्येयाला बांधलेल्या दलित जातीच भारतीय चातुर्वण्याधिष्ठित शोषणव्यवस्थेतून मुक्त करतील. आदिवासी, शेतमजूर, कामगार, गरीब शेतकरी या श्रमजीवी जनतेचा कणा म्हणजे दलित जाती! …भारतीय जनता ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचा नाश करून स्वत:ला संसदीय लोकशाही अधिकार व संसदीय लोकशाहीची निर्णय प्रक्रिया प्रत्यक्षात प्राप्त करून घेणार आहे. जातिविहीन, वर्गविहीन, गतिशील निर्भय समाज निर्माण करण्याकरिता समाजवादी क्रांतीचाच आश्रय भारताला घ्यावा लागणार आहे.”
.................................................................................................................................................................
लेखक शांताराम पंदेरे सामाजिक कार्यकर्ते आहेत.
shantarampc2020@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment