आधी जैतापूर, मग नाणार आणि आता बारसू सोलगाव... कोकणातला राजापूरजवळचा हा निसर्गरम्य परिसर गेल्या दहा वर्षांपेक्षाही अधिक काळ सतत आंदोलनांनी धुमसतो आहे. इथल्या आंदोलनांची बातमी वाचली की, माझ्या डोळ्यासमोर येतो तो जैतापूर प्रकल्पाच्या जागेवरून दिसणारा अथांग समुद्र आणि देखणा विजयदुर्ग! माडबनचा निळाशार किनारा, साखरीनाटेची मच्छिमारांनी गजबजलेली खाडी, नाणार आणि बारसू सोलगावच्या मधली खाडी, तिच्या दुतर्फा हिरव्याशार गर्दीत लपलेली गावं, आंबोळगडचा किनारा आणि या ना त्या प्रकल्पाच्या विरोधात कातळावर रखरखीत उन्हात एकवटलेले गावकरी... !
आधी नाणारला आणि आता बारसू सोलगावला जे चित्र आहे, अगदी तसंच जैतापूरही आंदोलनांनी धुमसत होतं. सध्या जैतापूरचा आण्विक प्रकल्प थंडावला आहे आणि त्याच परिसरात रिफायनरीची धग जाणवते आहे. बारसू सोलगावला अजून या प्रकल्पाचा ‘फिजिबिलिटी रिपोर्ट’ही बनलेला नाही. त्यासाठी माती परीक्षण, ड्रिलिंग आणि सर्व्हे सुरू आहे आणि या सर्व्हेच्या निमित्ताने वातावरण पुन्हा तापलं आहे.
‘आर या पार’ची लढाई
बारसू सोलगावमध्ये रिफायनरी करण्याच्या सरकारच्या निर्णयाला बारसू सोलगावसह पाच गावांचा मात्र विरोध आहे.
‘सरकार जो सर्व्हे करतं आहे त्या सर्व्हेला ग्रामसभेने परवानगी दिलेली नाही. याआधी झालेल्याही सर्व्हेंना ग्रामसभेची परवानगी नव्हती’, असं या आंदोलनाचे प्रमुख सत्यजित चव्हाण सांगत होते. आंदोलनाच्या आधी काही दिवस मी त्यांची मुलाखत घेतली होती.
बारसू सोलगावचा हा सर्व्हे २४ एप्रिलपासून सुरू होणार होता. त्याआधीच आंदोलनाची तयारी सुरू होती. सत्यजित चव्हाण यांचा सूर अजिबात आक्रमक नव्हता पण ठाम होता. त्यामुळे काही दिवसांतच बारसू सोलगावच्या सड्याचं रणांगण होणार आहे याची कल्पना आली होती.
२३ एप्रिलला सत्यजित चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. तरीही गावकरी आणि खास करून गावांतल्या महिला रिफायनरीच्या विरोधात सड्यावर एकवटल्या.
‘आता काहीही होऊदे, गावकऱ्यांनी मागे हटू नये, जमीन सोडू नका, आर या पार’ असा संदेश सत्यजित चव्हाण यांनी न्यायालयीन कोठडीतून दिला. सत्यजित चव्हाण आणि आणखी काही आंदोलकांना आधीच तडीपारीच्या नोटिसाही दिल्या आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
रिफायनरीवर सरकार ठाम
हे आंदोलन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही ढवळून निघालं. विरोधी पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या. यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीने बारसू सोलगाव रिफायनरीबद्दल अधिकृत माहिती दिली. हा प्रकल्प झाला, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल. त्यामुळे लोकांनी विरोधासाठी विरोध करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
रिफायनरी की पर्यावरण?
‘सरकारने गावकऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याची तयारी दाखवली आहे. या आंदोलनामध्ये व्यक्त केल्या जाणाऱ्या काही चिंता खरंच Genuine आहेत, त्यावर आम्ही विचार करू’, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
रिफायनरीबद्दल सध्या सरकारची एक बाजू आहे आणि आंदोलकांची एक बाजू आहे. यावर चर्चा होतच राहतील, पण रिफायनरी की पर्यावरण, या वादात तिथे प्रत्यक्ष काय घडतं आहे याचे मुद्दे हरवून जातायत.
यासाठी नाणार आणि बारसू सोलगावच्या परिसरात आतापर्यंत काय घडलं, हे पाहावं लागेल.
नाणार ते बारसू सोलगाव
नाणारमध्ये होणाऱ्या रिफायनरीला १७ गावांनी विरोध केल्यानंतर ही रिफायनरी खाडीच्या दुसऱ्या बाजूला बारसू-सोलगावला हलवण्यात आली. प्रकल्पाची ही जागा नाणारपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. बारसू ही धोपेश्वर ग्रामपंचायतीमधली एक वाडी आहे. हे धोपेश्वरचं मंदिर निसर्गसुंदर आणि प्राचीन आहे. राजापूरहून धोपेश्वरच्या मंदिरापर्यंत चालत जाण्यासाठी जंगलातून जाणारी एक वाट होती. धोपेश्वरला जोडून सोलगाव, गोवळ, शिवणे खुर्द आणि देवाचे गोठणे, अशा पाच ग्रामपंचायतींची जागा या प्रकल्पामध्ये येते.
काय आहे हा प्रकल्प?
बारसू सोलगाव आणि जवळची जागा मिळून १३ हजार एकर जागा रिफायनरीसाठी प्रस्तावित आहे. शिवाय साखरीनाटे, आंबोळगड आणि राजावाडी इथे कच्चं तेल साठवण्यासाठीच्या टाक्या म्हणजे क्रूड ऑइल टर्मिनल आणि बंदरांच्या सोयीसुविधा असणार आहेत. त्यासाठी २८०० एकर जागा प्रस्तावित आहे. रिफायनरीचा प्रकल्प विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असेल असंही नियोजन आहे. त्यासाठी औष्णिक प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.
ही रिफायनरी ६० दशलक्ष टन क्षमतेची आहे आणि प्रकल्प २०२५पर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. प्रकल्पाची एकूण किंमत तीन लाख कोटींपर्यंत जाते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
कोकणात ही रिफायनरी उभारण्यासाठी सौदी अरेबिया आणि भारत यांच्यामध्ये २०१८मध्ये MOU झाला. त्यासाठी RRPCL म्हणजेच रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. यामध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्या आहेत.
एमआयडीसीची जागा रिफायनरीसाठी
नाणारमध्ये रद्द केलेला प्रकल्प बारसू सोलगावच्या सड्यावर करता येईल, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनेच केंद्राला दिला होता. इथे एमआयडीसीसाठी २३०० एकर जमीन आधीच घेण्यात आली होती. ही जागा सड्याची असल्याने प्रकल्पासाठी चांगली आहे आणि गावकऱ्यांना इथून दुसरीकडे हलवावंही लागणार नाही, असं सरकारचं म्हणणं होतं. पण नेमक्या याच गोष्टीला बारसू सोलगावच्या गावकऱ्यांचा विरोध आहे.
एमआयडीसीसाठी घेतलेली जागा आम्ही प्रदूषणकारी रिफायनरीसाठी देणार नाही, असं बारसू सोलगावचे आंदोलक नरेंद्र जोशी सांगतात. मुंबईत झालेल्या शाश्वत कोकण परिषदेमध्ये त्यांनी गावकऱ्यांची भावना बोलून दाखवली होती. या एमआयडीसीमध्ये प्रदूषणकारी उद्योगांपेक्षा वेगळे उद्योग असते तर आमची त्याला काहीच हरकत नव्हती, असंही त्यांचं म्हणणं होतं.
रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग
बारसू सोलगावच्या रिफायनरीमध्ये फक्त कच्च्या तेलाचं शुद्धीकरण होणार नाही, तर त्याबरोबरच इथे पेट्रोकेमिकल उत्पादनांचा व्यापक उद्योग उभा राहील. पेट्रोकेमिकल उद्योगांमध्ये प्लॅस्टिक, रबर, सिंथेटिक फायबर, रंग, सौंदर्य प्रसाधनं अशी हजारो उत्पादनं घेतली जातात. आपण जो हेअरडाय वापरतो, त्यातही पेट्रोकेमिकल असतात.
रिफारयनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योगामुळे फक्त बारसू सोलगावच नव्हे, तर या संपूर्ण प्रदेशात एक मोठी पुरवठा साखळी तयार होईल आणि रोजगार उपलब्ध होतील, असं सरकारने म्हटलं आहे.
एक लाख रोजगारांचा सरकारचा दावा
गुजरातमध्ये जामनगरला रिलायन्सची जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी आहे. तिथेही ऑइल रिफायनरीसोबत पेट्रोकेमिकल उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.
इथे इंजिनिअर्स, तंत्रज्ञ आणि रिफायनरीचं व्यवस्थापन हे पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतच हजारो कंत्राटी कामगारही काम करतात.
त्याचप्रमाणे कोकणात ही रिफायनरी झाली, तर सुमारे एक लाख रोजगार निर्माण होतील, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
‘असं असलं तरी रोजगार की कोकणचं आतापर्यंत जपलेलं पर्यावरण यामध्ये पर्याय निवडायचा झाला तर आम्ही पर्यावरणासाठी लढू’, असं आंदोलकांचं थेट म्हणणं आहे.
या संघर्षामध्ये काही मध्यबिंदू असू शकतो का, काही उपाय काढता येईल का? या प्रश्नावर, ‘मध्यबिंदू, उपाय वगैरे काही नाही, आम्हाला हा प्रकल्पच नको आहे’, असं उत्तर सत्यजित चव्हाण यांनी दिलं होतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आंबा, काजू बागायत आणि मच्छिमारीचं काय?
रिफायनरीचा कोकणातल्या आंबा, काजूच्या बागायतीवर आणि मच्छिमारीवर विपरित परिणाम होईल. निसर्गच राहिला नाही, तर कोकणच्या पर्यटन उद्योगाचं भवितव्यही धोक्यात येईल, अशी भीतीही चव्हाण यांनी व्यक्त केली होती. मंगलोर आणि कोचीमधल्या रिफायनरीमुळे तिथल्या मच्छिमारी व्यवसाय धोक्यात आला आहे हे उदाहरण त्यांनी दिलं.
आंदोलकांच्या या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. जामनगरमध्ये जगातली सर्वात मोठी ऑइल रिफायनरी असूनही तिथे आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. त्यामुळे याचा आंब्यावर काहीही परिणाम होणार नाही, असा त्यांचा दावा आहे. पण कोकणात हवामान बदलामुळे आणि काही प्रदूषणकारी प्रकल्पांमुळे आंब्याचं उत्पादन आधीच कमी झालं आहे. त्यातच रिफायनरीचं प्रदूषण झालं, तर त्याचा आंबा उत्पादनावर परिणाम होणार, हे स्पष्टच आहे.
रिफायनरीच्या याच प्रस्तावित जागेमध्ये जागतिक वारशाच्या दर्जाची कातळशिल्पं आहेत. हा भाग आम्ही सोडून देऊ, असं फडणवीस यांनी सांगितलं.
जमिनी हडपल्याचा आरोप
‘आधी नाणार आणि आता बारसू सोलगाव इथे रिफायनरी प्रकल्पासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या. नाणारला या प्रकल्पासाठी सरकारने १० हजार एकर जागा घेतली होती. आता बारसू सोलगाव आणि जवळच्या गावांमध्ये जमिनींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. इथली सगळी उलाढाल काही कोटींमध्ये जाते. ही जमीन सरकारच्या प्रकल्पासाठी घेतली असली तरी त्यात मोठमोठे दलाल सामील आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या नावाखाली इथल्या जमिनी हडपण्याचा डाव आहे’, असा आरोपही सत्यजित चव्हाण यांनी केला आहे.
रिफायनरीबद्दल वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारिशे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर खटला सुरू आहे याचीही आठवण त्यांनी करून दिली.
‘बारसू सोलगावचे गावकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. इथल्या ग्रामसभांनी प्रकल्पाला विरोध करण्याचे ठराव केले आहेत. देवाचे गोठणे, राजावाडी इथे रिफायनरीविरोधी पॅनल उभे करून गावकऱ्यांनी ते जिंकूनही आणले आहेत’, असं ते म्हणाले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
प्रदूषण कसं रोखणार?
रिफायनरीमुळे हवा आणि पाणी यांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. रिफायनरीमधून निघणारे घातक वायू हवा आणि पाणी हे दोन्ही प्रदूषित करतात. तेलाचं शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या प्रक्रियेतून घातक रासायनिक द्रव्यं बाहेर पडतात.
हे प्रदूषण कमीत कमी कसं होईल याची खबरदारी आम्ही घेऊ, असं RRPCLच्या वेबसाइटवर म्हटलं आहे. ‘ही रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ असेल, झीरो डिस्सार्ज असेल. म्हणजे पर्यावरणासाठी घातक असं काहीही या प्रकल्पातून तयार होणार नाही, असं सरकार सांगतं आहे. पण कोणतीही रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ असूच शकत नाही,’ असं पर्यावरण तज्ज्ञ देबी गोएंका यांनी म्हटलं आहे.
प्रदूषण रोखण्याचे कितीही नियम पाळले, तरी रिफायनरीमुळे प्रदूषण होणारच आणि कोकणच्या पर्यावरणाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
‘रिफायनरीचा पर्यावरण अहवाल जाहीर करा’
रिफायनरीचा प्रकल्प इथे आणण्याआधी या परिसराचा सविस्तर पर्यावरण अहवाल झाला आहे का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. कायद्यानुसार ‘पर्यावरण परिणाम अहवाल’ (EIA) तयार करण्यासाठी एक वर्षाचा तरी कालावधी लागतो. त्यात प्रकल्पाचे तिथल्या पर्यावरणावर होणारे परिणाम, प्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो.
सरकारने असा पर्यावरण अहवाल तयार केला असेल, तर तो जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रिफायनरी प्रकल्पासोबत बंदरांची उभारणी, तेल वाहून नेण्यासाठीच्या अवाढव्य पाईपलाईन, औष्णिक प्रकल्प या सगळ्यामुळे कोकणच्या पर्यावरणाची कधीही न भरून निघणारी हानी होणार आहे, असा इशारा देबी गोएंका यांनी दिला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पश्चिम घाटाच्या लगतचा प्रदेश
जैतापूर आण्विक प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू झालं. पण जैतापूरच्या पर्यावरण अहवालात इथल्या खाड्यांचाच उल्लेख नव्हता. मग त्याचा मच्छिमारीवर होणार परिणाम कसा तपासणार? हे पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी लक्षात आणून दिलं होतं. कोकणाची समुद्रालगतची चिंचोळी पट्टी पश्चिम घाटाच्या लगत आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यामुळे इथे प्रदूषणकारी प्रकल्प आणू नयेत, असं त्यांनी पश्चिम घाट अहवालामध्ये नमूद केलं आहे.
घातक वायूंमुळे कर्करोगाचा धोका?
अमेरिकेसारख्या प्रगत देशातही रिफायनरीचं प्रदूषण रोखता आलेलं नाही. रिफायनरीतून निघणाऱ्या बेंझीनमुळे तिथल्या लोकांमध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे, असा रिपोर्ट ‘गार्डियन’ या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला आहे. अशा प्रकारच्या प्रदूषणामुळेच फ्रान्स, जर्मनी यासारख्या प्रगत देशांनी त्यांच्या रिफायनरीज टप्प्याटप्प्याने बंद करत आणल्या आहेत.
रिफायनरीसाठी कोयनेचं पाणी?
तेलशुद्धीकरण प्रकल्प समुद्रकिनाऱ्यावर उभारला तर प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध होतं. शिवाय कच्चं तेल आणून ते शुद्ध करून निर्यात करण्यासाठी बंदर उभं करावं लागतं. त्यामुळे बारसू सोलगावची जागा प्रकल्पासाठी आदर्श आहे, असं रिफायनरी उभारणाऱ्या कंपन्यांना वाटतं.
बारसूच्या रिफायनरीसाठी आधी समुद्राचं खारं पाणी गोडं करून वापरण्याचा प्रस्ताव होता. पण आता यासाठी कोयनेचं पाणी आणण्याचीही योजना आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर पुन्हा ते पाणी नदीमध्ये सोडलं जातं. हे कोयनेचं अवजल प्रकल्पासाठी आणायचं असेल, तर त्याची व्यवहार्यता तपासावी लागेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
कोयनेचं अवजल सध्या वासिष्ठी नदीमध्ये सोडलं जातं. ही वासिष्ठी नदी समुद्राला मिळते तिथे लोटे परशुराम एमआयडीसीचं प्रदूषित पाणी या नदीत मिसळतं आणि समुद्राला मिळतं. म्हणजे कोयनेचं पाणी आधीत प्रदूषित झालं आहे. त्यात आता रिफायनरीसाठी हे पाणी वापरलं तर स्वच्छ पाण्याचं रूपांतर प्रदूषित पाण्यात होणार आहे!
भारतामध्ये २३ रिफायनरी
भारतामध्ये एकूण २३ रिफायनरी आहेत. त्यातल्या जामनगर, कोची यासारख्या रिफायनरी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहेत तर मथुरा, पानिपत यासारख्या इनलँड म्हणजे किनाऱ्यांवर नसलेल्या रिफायनरीही आहेत.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिशामध्ये पारादीपच्या रिफायनरीचा विस्तार करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानच्या बारमेरमधला रिफायनरी प्रकल्प २०२४पर्यंत पूर्ण होईल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
बारसू सोलगावला एकाच ठिकाणी ही रिफायनरी करण्याच्या ऐवजी तीन ठिकाणी करावी का, या मुद्द्यावरही आम्ही विचार केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पण एकाच ठिकाणी प्रकल्प करणं योग्य राहील या निष्कर्षावर आम्ही आलो, असं ते म्हणाले.
सौदी अरेबियाचा पर्यटन आराखडा
रिफायनरीच्या प्रकल्पासाठी ज्या सौदी अराम्को कंपनीशी करार करण्यात आलाय, ती कंपनी जगातली सर्वात जास्त नफा कमावणारी कंपनी आहे. भारतासारख्या देशात रिफायनरी उभारून या कंपनीला आपल्या उद्योगाचा आणखी विस्तार करायचा आहे.
हवामान बदलाच्या या युगात पर्यायी ऊर्जेमध्ये गुंतवणूक करण्याकडे सगळ्यांचा कल आहे पण तेलउद्योगातली गुंतवणूक कमी केली तर जगभरात तेलाची टंचाई निर्माण होईल आणि तेलाच्या किंमतीही वाढतील, असा इशारा या कंपनीचे अधिकारी वारंवार देत असतात.
असं असलं तरी सौदी अरेबियाला मात्र आता तेलउद्योगाकडून पर्यटनासारख्या उद्योगाकडे वळायचं आहे. २०३०पर्यंत १० कोटी पर्यटकांना सौदीकडे आकर्षित करून या उद्योगातून आपला जीडीपी वाढवण्याचं नियोजन या देशाने केलं आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तेलाकडून पर्यायी ऊर्जेकडे
फ्रान्स, जर्मनी यासारख्या प्रगत देशांनी त्यांच्याकडच्या रिफायनरी बंद करून पर्यायी ऊर्जेकडे वळण्याचा ध्यास घेतला आहे. अमेरिका, जपान यासारख्या देशांनी त्यांच्याकडे असलेली तेलशुद्धीकरणाची क्षमता पूर्णपणे वापरलेलीही नाही.
उद्योगांसाठी, अर्थव्यवस्थेसाठी तेल तर हवं पण हवामान बदलाच्या या युगात पर्यावरण रक्षणासाठीची धोरणंही तेवढीच महत्त्वाची आहेत. यातून मार्ग कसा काढायचा हा पेच भारतासमोरच नाही तर सगळ्या जगासमोरच आहे.
COP-27सारख्या परिषदांमध्ये भारताने कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्यायी ऊर्जेकडे वळण्याचा निर्धार केला आहे. इलेक्ट्रिक वाहनं, हायड्रोजन प्लँट, सौरऊर्जा प्रकल्प यात मोठी गुंतवणूक करण्याचं सरकारचं धोरण आहे.
गिर्येचा पवनचक्की प्रकल्प
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातल्या गिर्ये गावाचं उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. या गिर्ये गावाची जमीन आधी औष्णिक प्रकल्पासाठी आणि नंतर रिफायनरीसाठी घेण्यात येणार होती. पण गावकरी याविरुद्ध एकवटले आणि त्यांनी जमीन द्यायला विरोध केला. याच गिर्येच्या समुद्रकिनाऱ्यावर गावकऱ्यांच्या सहमतीने एक पवनचक्की प्रकल्प उभारण्यात आला आहे.
कोकणातले गावकरी त्यांनी आतापर्यंत जपलेला निसर्ग आणखी जपण्यासाठी प्राणपणाने लढा देतायत. त्याचवेळी सरकारने रिफायनरी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘वर्षानुवर्षं एका प्रकल्पाच्या विरोधात आणि तेही सरकारच्या विरोधात लढावं लागतं तेव्हा तुम्ही थकत नाही का? तुमच्यावर तडीपारीच्या नोटीसा लावल्या जातात तेव्हा तुम्ही उद्विग्न होत नाही का?’ मी सत्यजित चव्हाण यांनी विचारलं... ते म्हणाले, ‘नाही. मी ओशोंचा फॉलोअर आहे!.’
बारसू सोलगाव रिफायनरीच्या या पेटलेल्या संघर्षाच्या काळात मला त्यांचं हे वाक्य आठवलं आणि मी ओशोंचे विचार वाचून पाहिले.
ओशो म्हणतात, ‘एकतर्फी स्वगतांनी फार काही साध्य होत नाही. माणसांमाणसांत प्रेम जागृत करायचं असेल तर दोन्ही बाजूंनी संवाद हवा.’ बारसू सोलगाव रिफायनरीच्या आंदोलकांनी आणि हा प्रकल्प पूर्ण करू पाहणाऱ्या सरकारने असा दोन्ही बाजूंनी संवाद केला तर आणि तरच या धगधगत्या संघर्षावर काही उपाय निघू शकेल, असं मला वाटलं.
..................................................................................................................................................................
लेखिका आरती कुलकर्णी मुक्त पत्रकार आहेत.
artikulkarni262020@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment