सध्या अभ्यासक्रमांतून वेगवेगळ्या गोष्टींची हकालपट्टी होते आहे. आधी मोगल गेले, आता डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा नंबर लागलाय. ‘माझे पूर्वज माकड नव्हते’ असे हास्यास्पद दावे ज्या सरकारचे मंत्री करू शकतात, त्यांच्याकडून फारशी काही वेगळी अपेक्षाही करता येत नाही. प्रस्तुत लेखक दहा वर्षांपूर्वी ‘नॅशनल जिओग्राफिक’तर्फे आयोजित ‘जिनोग्राफिक सर्व्हे’मध्ये सहभाग झाले होते. त्यात त्यांच्या डीएनएची चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांच्या पूर्वजांच्या आफ्रिकेतून स्थलांतराची, उत्क्रांतीची गोष्ट पुढे आली. तो अनुभव लेखकाच्याच शब्दांत…
..............................................................................................................................................................
ही कथा आहे प्राचीन काळात माझ्या पूर्वजांनी केलेल्या स्थलांतराची. माझ्या पूर्वजांच्या प्रवासाची कथा असली तरी ती वैयक्तिक मात्र नाही.
आपल्यापैकी बहुतांश लोकांना पूर्वजांच्या चार-पाच पिढ्यांची माहिती असते. काही लोकांना कदाचित मागल्या आठ-दहा पिढ्या माहीत असतील. मात्र एका मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही. जरी आपल्याला त्यांचे नाव माहीत नाही, तरीही इतिहासाच्या प्रवासातील प्रत्येक वळणावरून आपल्या पूर्वजांनी प्रवास केला आहे- शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, वास्को-दा-गामाचे भारतातील पहिले आगमन, मुहम्मद पैगंबर, गौतम बुद्धाचा पृथ्वीतलावरील वावर, अजिंठा-वेरूळच्या लेण्यांची रचना, पिरेमिड्सचे बांधकाम, शेतीचा, अग्नीचा शोध, या घटना ज्या ज्या काळात घडल्या, त्या त्या काळात आपल्या सगळ्यांचे पूर्वज अस्तित्वात होते.
आज जे लोक जिवंत आहेत, त्यांच्या पूर्वजांनी पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उगमापासून तो आजपर्यंतच्या ३५०-४०० कोटी वर्षांत, एका प्रजातीपासून ते दुसऱ्या प्रजातीपर्यंत वाहणाऱ्या उत्क्रांतीच्या प्रवाहातून, पाच मोठ्या व असंख्य छोट्या विनाशांतून (mass-extinctions) आणि भूखंड अपवहनामुळे (continental drift) सतत बदलणाऱ्या भूतलाच्या रंगामंचावरून धैर्याने प्रवास केला आहे. ६६ कोटी वर्षांपूर्वी जो उल्काखंड पृथ्वीवर कोसळून डायनासोरसारखे शक्तिशाली जीव नष्ट झाले, तिथे आपले पूर्वज मात्र वाचले. किंबहुना आज आपण जिवंत आहोत, याचाच अर्थ असा की, आजापावतो झालेल्या अनेक विनाशांमध्ये ९८-९९ टक्के प्रजाती नष्ट होऊनही, ज्या एक-दोन टक्के प्रजाती शिल्ल्क राहिल्या, त्यांत आपला समावेश होतो. अर्थात या उत्क्रांतीच्या प्रवासात, वेगवेगळ्या काळात आपले पूर्वज वेगवेगळ्या प्रजातींमध्ये समाविष्ट होते. येथे आपल्या पूर्वजांनी किती प्रजाती बदलल्या, याला फारसे महत्त्व नाही. जीवसृष्टीचा उत्क्रांतिप्रवास हा सलग असतो. त्यात एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीकडे अशा तुटक पायऱ्या नसतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
ज्याला आपण मनुष्यप्रजाती म्हणतो तिचा उगम आफ्रिका खंडात झाला. आफ्रिका खंड हे माकडाच्या वेगवेगळ्या प्रजातींचे उगमस्थान आहे. आपली मनुष्यजातही इथेच जन्माला आली आणि विकसित झाली. उत्पत्तीनंतर बहुतांश काळ ती आफ्रिकेतच निवासाला होती.
नंतरच्या काळात बदलते हवामान, त्याचा समुद्रपातळीवरचा प्रभाव, आपण ज्या प्राण्यांची अन्नासाठी शिकार करत असू, त्यांचे बदलत्या हवामानानुळे झालेले स्थलांतर व त्यांचा पाठलाग करताना माणसाचे स्थलांतर, अशा अनेक कारणांमुळे मनुष्यप्राणी आफ्रिकेतून हळूहळू बाहेर पडून इतर खंडांवर पसरू लागला. बघता बघता पृथ्वीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत माणसाने आपले पाय रोवले. (यानंतर कोणी तुम्हाला ‘तुमचे पूर्वज कुठे राहत होते?’ असा प्रश्न विचारल्यास त्यांना बिनधोक ‘आफ्रिकेत’ असे उत्तर द्यावे, कारण भूतकाळाकडे जाणारे सर्व रस्ते आफ्रिकेत मिळतात.)
प्राचीन काळात मनुष्यप्राण्याची जी स्थलांतरे झाली, त्यांची चिन्हे आपण आज शोधू शकतो का? असा प्रश्न मला नेहमी सतावत असे. त्याचे उत्तर शोधत असताना मला ‘नॅशनल जिओग्राफिक’तर्फे मोठ्या स्तरावर केल्या जाणाऱ्या एका प्रयोगाबद्दल माहिती मिळाली. त्यामध्ये एखाद्या माणसाचे मूळ व त्यानंतरचा त्याच्या पूर्वजांचा प्रवास यांचा जननशास्त्राच्या (population genetics) मदतीने शोध घेतला जात होता. कुतूहलापोटी मी या प्रयोगात सहभागी व्हायचे ठरवले. या संशोधनाचा भाग म्हणून माझ्या डीएनएच्या नमुन्याचे परीक्षण करण्यात आले. त्यातूनच माझ्या पूर्वजांनी गेल्या ६०-७० हजार वर्षांत केलेल्या भम्रतीची गोष्ट पुढे आली.
या लेखात तीच गोष्ट थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या गालाच्या आतल्या भागातून, कापसाने झाकलेल्या, कान कोरायला वापरतात तशा काडीच्या मदतीने घेतलेला डीएनएचा नमुना हजारो वर्षांचा इतिहास उलगडून दाखवतो, हे विस्मयकारीच नव्हे काय! तर त्यामागील विज्ञान आधी थोडक्यात समजून घेऊ या.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आपल्याला साधारण निरीक्षणातून असे दिसून येते की, अनेक पिढ्यांपासून एकाच प्रदेशात राहणारे लोक हे दुसऱ्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांशी तुलना करता ढोबळमानाने बरेचसे सारखे दिसतात. उदाहरणार्थ, दक्षिण भारतात राहणारे लोक हे उत्तर-पूर्वेकडे राहणाऱ्या लोकांपेक्षा वेगळे दिसतात. आपले दिसणे आणि इतर अनेक गुणधर्म, हे डीएनएवर अवलंबून असतात. एका भागात राहणाऱ्या लोकांमध्ये त्याच भागातील लोकांशी लग्न होण्याची शक्यता जास्त असते आणि ठरावीक प्रदेशातील लोकांचे शारीरिक गुणधर्म, हे डीएनएमधील विशिष्ट खुणांवर अवलंबून असतात. डीएनएमधील या खुणा आनुवंशिकतेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला मिळतात.
डीएनए हे पाककृतीच्या पुस्तकासारखे असते. पुस्तकात एखादी पाककृती करण्यासाठी लागणाऱ्या सूचनांची यादी असावी, तशीच डीएनएमध्ये आपल्या जडण-घडणीसाठी आवश्यक असणाऱ्या आणि आपले गुणधर्म निश्चित करणाऱ्या सूचनांची यादी असते. प्रत्येक नव्या पिढीनुरूप या यादीची नक्कल केली जाते. डीएनएमधील सूचनांची क्लिष्टता लक्षात घेता, ही विलक्षण प्रभावी नक्कल असते. पण ती १०० टक्के मात्र असू शकत नाही. प्रत्येक नव्या पिढीबरोबर, अगदी किरकोळ परंतु मोजता येण्याइतपत चुका या प्रक्रियेत होतात. (ढोबळमानाने एका जनुकामध्ये, एका पिढीत १०० चुका होतात). या चुका उत्क्रांतीचे गाडे चालण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.
अर्थात सगळ्याच चुका उपयुक्त असतात असेही नाही. काही चुका तर हानिकारक वा निरुपयोगीही असू शकतात. आपल्या पूर्वजांची पाळेमुळे शोधताना या चुकांची मदत घेतली जाते. दोन माणसांच्या डीएनएमध्ये जर अगदी एकसारख्याच चुका आढळून आल्या, तर त्यांचे पूर्वज एकच होते, असा निष्कर्ष काढता येतो. (इथे मला माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या वेळेची आठवण येते. सत्र संपण्यापूर्वी होणाऱ्या सबमिशनच्या वेळी मुले एखाद्या ठिकाणी जमून प्रयोगांच्या लेखनाची नक्कल करायची. एकीकडे रेडिओवर गाणी चालू असायची, तर दुसरीकडे ही नक्कल. अशा वेळेला मूळ लिखाणात एखादी चूक असल्यास तीच सर्वांच्या वह्यांमध्ये तशीच्या तशी यायची. ती पाहून त्या मुलांच्या चुकांचे मूळ कोणते व ते कोठून आलेले आहे, हे चाणाक्ष प्राध्यापकांच्या लगेच लक्षात येत असे.)
त्याच धर्तीवर, डीएनएमधील चुकांचा सखोल अभ्यास केल्यास त्यांच्या मदतीने मानवजातीचा वंशवृक्ष बनवता येतो. वेगवेगळ्या प्रदेशातील माणसे ही वरवरच्या निरीक्षणातून फार वेगळी भासतात. चीनमधली महिला ही एखाद्या एस्किमो महिलेपेक्षा अगदी वेगळी दिसते, परंतु डीएनएच्या स्तरावर माणसामाणसांतले हे बदल फारच नगण्य होत. मनुष्यजातीचे ९९.९९ टक्के डीएनए एकसारखे आहेत. डीएनएमधील ही समानता विलक्षण आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
उत्क्रांतीमधील आपले नातलग असलेल्या चिम्पान्झी, ओरांगउटांग व गोरिला वानरांमध्ये माणसाच्या तुलनेत ४ ते १० पट विविधता आढळून येते. मग माणसांमध्ये इतकी समानता कशी? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भूतकाळातील एका विनाशाची चित्रे लपलेली आहेत. एका सिद्धान्तानुसार, अंदाजे ७०,००० वर्षांआधी माणसांची संख्या ही केवळ काही हजार इतक्या धोकादायक पातळीपर्यंत घसरली होती. येणाऱ्या काळात माणसांची संख्या वाढली आणि आपली प्रजाती नष्ट होणाच्या धोक्यापासून वाचली. आपल्या डीएनएमधील समानतेमध्ये या संकटाचीच छाया दिसते. मनुष्यवंश शोधण्याच्या वडिलांकडून येणारे गुणसूत्र (Y Chromosome) व आईकडून मिळणाऱ्या डीएनए (Mitochondrial DN) यांचा अभ्यास केला जातो. याद्वारे वडिलांच्या बाजूचे पूर्वज आणि आईच्या बाजूचे पूर्वज, अशा दोन्हींचा अभ्यास होतो. माझ्या डीएनए अभ्यासातून पुढे आलेल्या ठळक घटना
अशा आईकडील बाजू -
१) जगातल्या सर्व महिलांचे मूळ हे पूर्व आफ्रिकेत अंदाजे १८०,००० वर्षांपूर्वी राहणाऱ्या आद्य स्त्रीमध्ये शोधता येते. तिला ‘जननशास्त्रीय ईव’ म्हणता येईल (Mitochondrial Eve).
२) आईकडच्या पूर्वजांचे आफ्रिकेतून स्थलांतर हे अंदाजे ६७,००० वर्षांपूर्वी सुरू झाले.
३) त्या पूर्वजांचा एक भाग अंदाजे ६०,००० वर्षांपूर्वी सिनाई द्वीपकल्पाजवळ पोचला.
४) दुसरा एक भाग अंदाजे ५५,००० वर्षांपूर्वी पश्चिम आशिया व अनातोलिया भागात पोचला.
५) एक भाग ४७,००० वर्षांपूर्वी पश्चिम आशियामध्ये वसला.
६) त्यांचे अंदाजे ३८,००० वर्षांपूर्वी दक्षिण आशिया व भारताकडे आगमन झाले.
या पूर्वजांनी मध्य व दक्षिण आशियामध्ये वास्तव्य केले. सुरुवातीच्या काळात इथे राहणारे पूर्वज हे शिकार करून पोट भरायचे. प्रचंड केसाळ हत्ती (Wooly Mammoth) व अशा अनेक मोठ्या प्रजातींच्या शिकार करण्यात या पूर्वजांचा सहभाग होता. येणाऱ्या काळात हा आशियाचा भाग व्यापाराच्या व नवीन स्थलांतराच्या जाळ्याचा एक महत्त्वाचा भाग बनला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
वडिलांकडील बाजू
१) जगातील सर्व पुरुषांचे मूळ हे अंदाजे १४०,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहणाऱ्या आद्य पुरुषात शोधता येते. या पुरुषाला ‘जननशास्त्रीय आदम’ म्हणता येईल (Y- Chromosome dam).
२) अंदाजे ७०,००० वर्षांपूर्वी वडिलांकडील पूर्वजांचे आफ्रिकेतून बाहेर स्थलांतर सुरू झाले.
३) अंदाजे ५०,००० वर्षांपूर्वी स्थलांतरितांचा एक भाग मध्य-पूर्व आशियामध्ये पोचला.
४) अंदाजे ३०,००० वर्षांपूर्वी एक भाग दक्षिण आशियाकडे वळला.
५) अंदाजे २५,००० वर्षांपूर्वी वडिलांकडील पूर्वज दक्षिण आशियामध्ये वसले.
माझे वडिलांच्या बाजूचे पूर्वज हे दक्षिण आशियात व मुख्यत्वाने भारतीय उपखंडात वास्तव्याला आलेल्या सर्वांत जुन्या समूहाचा भाग होते. माझ्या जननशास्त्रीय नातलगांमध्ये नेपाळच्या थरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमातीचा समावेश होतो, जे मर्यादित प्रमाणात शेती व वनक्षेत्रातील संसाधनावर गुजराण करतात. रोमानी लोकही माझ्या जननशास्त्रीय नातलगांमध्ये समाविष्ट आहेत व त्यांच्याशी माझे पूर्वज
बोलीभाषेच्या परंपरेनेही जोडले गेले होते.
माझ्या डीएनए अभ्यासावरून माझ्यातील गुणधर्म खालीलप्रमाणे मांडता येतात-
५६ टक्के नैर्ऋत्य आशियाचे गुणधर्म,
२६ टक्के आग्नेय आशियाचे गुणधर्म,
१२ टक्के भूमध्य भागाचे गुणधर्म,
६ टक्के उत्तर युरोपचे गुणधर्म
माझ्या जननशास्त्रीय अभ्यासातून आणखी एक विस्मयकारक माहिती मिळते. ती म्हणजे माझ्यामध्ये निएन्दरथल (Neanderthal) व देनिसोवान (Denisovan) या आता नष्ट झालेल्या प्रजातीचेही अंश आहे. आज जरी या प्रजाती अस्तित्वात नसल्या, तरीही ६०,००० वर्षांपूर्वी जेव्हा मनुष्यप्राणी आफ्रिकेतून बाहेर पडला, तेव्हा मनुष्यसदृश अशा अनेक प्रजाती युरोप आशिया खंडांमध्ये वास्तव्याला होत्या. माणसांनी त्यांची केलेली कत्तल, माणसांचे अधिक संख्याबळ व माणसांमुळे वाढलेली शिकारीची स्पर्धा, ही या प्रजातीच्या नष्ट होण्याची कारणे मानली जातात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
माझ्या जननशास्त्रीय अभ्यासातून असेही पुढे येते की, माझ्यामध्ये अंदाजे ३.४ टक्के निएन्दरथल व ४ टक्के देनिसोवान गुणधर्म आहेत. सर्वसाधारणपणे माणसांमध्ये १ टक्के ते ४ टक्के निएन्दरथल अंश आढळून येतो. याचा अर्थ आपण या प्रजातींबरोबर कायम लढत होतो किंवा प्रतिस्पर्धा करत होतो, असा नसून, या दोन प्रजातींचे काही धीट लोक दुसऱ्या प्रजातींमधल्या जोडीदाराच्या प्रेमात पडून आपले वंश वाढवत होते, असे आहे. आपल्या सगळ्यांमध्ये या प्रजांतीचा अंश सापडतो. त्याअर्थाने त्या प्रजाती अद्याप पूर्णपणे नष्ट झालेल्याच नाहीत. त्या आपल्या डीएनएमध्ये अजूनही जिवंत आहेत.
अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, लोकांचा वर्णभेद व वर्णवर्चस्वाच्या संकल्पनांवर विश्वास होता. डीएनएच्या अभ्यासातून मात्र या समजुतीतील फोलपणा लक्षात येण्यास हरकत नसावी. तसेच जननशास्त्रीय चाचणीत वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्येदेखील काही फरक आढळून येत नाही. हेही माणसाच्या जितक्या लवकर लक्षात येईल तितके चांगले.
मानवजात ही हजारो वर्षांच्या, अनेक खंडांना पालथे घालून केलेल्या प्रवासातून व धैर्याने व चिकाटीने अनेक संकटांचा सामना करून आज इथे पोचली आहे. आपण पृथ्वीवरच्या अत्यंत दुर्गम भागातही आपले घर वसवले आहे. आजही माणसाच्या प्रवासाचा अंत आला आहे? येणारा काळ माणसाला कुठे घेऊन जाईल? या प्रश्नांचे उत्तर अत्यंत कठीण आहे. येणारा काळच वे देऊ शकेल.
भौतिकशास्त्रज्ञ कार्ल सगान यांनी एकदा असे म्हटले होते की – ‘जर माणसाने स्वतःचा नाश ओढवून घेतला नाही, तर एक दिवस आपण ब्रह्मांडातल्या दुसऱ्या ताऱ्यांकडे आगेकूच करू’. हा अत्यंत भाबडा आशावाद असला तरीही मनाला तर वाटते की, असे खरेच घडावे. कोण जाणे एक दिवस कदाचित आपले भावी वंशज माणसाच्या दुसऱ्या ताऱ्यांवरील प्रवासाबद्दल वाचतील!
‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या ऑक्टोबर २०१४च्या अंकातून साभार.
..................................................................................................................................................................
सुकल्प कारंजेकर
sukalp.karanjekar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment