अजूनकाही
असं उद्वेगाने म्हणायची वेळ गेल्या पंधरवड्यात आपल्यापैकी अनेकांवर आली असेल. निसर्गात ग्लोबल वॉर्मिंगने एक प्रकारचा दाह सर्वत्र पसरतोय. तसाच संयमाचा कडेलोट होण्याची उदाहरणं दिवसेंदिवस वाढत चाललीत. ‘कडेलोट’ या शब्दामागे काही वेळ, काही अंतर, अगदी निकरावर आल्यावर, असे संयमाचा संयम बघणारे अर्थ आहेत. पण निसर्गातल्या टेकड्या जशा भुईसपाट झाल्या, तसा कडेलोटासाठी तेवढा उंच कडा राहिला नाही. पुलंच्या भाषेत सांगायचं तर वर बघावे असे ‘कडे’ आता राहिले नाहीत. सबब कडेलोटाचा अवधी कमी झालाय. त्या अदभुत खेळातल्या वाक्यासारखा ‘आपका समय शुरू होता है अब!’ आणि समय म्हणजेच काळ ३० सेकंदात संपायचा. संयमाच्या कडेलोटाचं घड्याळ आता तास व मिनिट काटाविरहित सेकंद काट्यावर चालतं.
पेशंटच्या नातेवाईकांच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्यांनी शिकाऊ, निवासी डॉक्टरला एक डोळा गमवायला लागेल इतकं मारलं. मग शिकाऊ डॉक्टरांच्या मदतीला आधी सरकारी डॉक्टर, मग खाजगी डॉक्टरांनी मार खायचा संयम संपल्याने आंदोलन केलं. इस्पितळं, दवाखाने ठप्प झाले. पालिका व सरकारचा संयम सुटला. त्यांनी शिकाऊ डॉक्टरांना निलंबनाचा धडा शिकवला. मुख्यमंत्र्यांनी आधी विनवणी केली. मग तेही कारवाईवर उतरले. कदाचित शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न तूर्तास बाजूला पाडल्याबद्दल त्यांनी डॉक्टर व पेशंट दोन्हींचे मनोमन आभार मानले असतील. कुठल्याही व्यावसायिकाचं आंदोलन दोन-चार दिवसापलीकडे चालत नाही. कारण त्यांना व्यवसाय करायचा असतो. त्यामुळे शिकाऊ डॉक्टर, सरकारी डॉक्टर, पालिकेचे डॉक्टर, मार्ड, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, शिष्टमंडळ एक, शिष्टमंडळ दोन अशा गोंधळात कोण कुणाशी काय बोललं आणि काय तोडगा निघाला हे फारसं स्पष्ट न होता संप संपला.
याच दरम्यान शिवसेनेचे पेशाने प्राध्यापक खासदार रवींद्र गायकवाड सर यांचा संयम विमान प्रवासातील असुविधेनं संपला. मेंबर ऑफ पार्लमेंटला खुलासा करायला येत नाही म्हटल्यावर सरांचा संयम सुटला. नंतर त्यांनी त्याच किंवा त्याच्या वतीने आलेल्या अधिकाऱ्याला अक्षरक्ष: पायताणाने म्हणजे सँडलने तब्बल २५ का २७ वेळा मारलं. इतका त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. सँडल मारताना त्या टोकाच्या रागातसुद्धा दगडी चाळ फेम अंकुश चौधरी स्टाईल ‘गिनती शुरू कर’ म्हणत आपण किती वेळा हाणलं हे मोजून ठेवलं. चित्रविचित्र पराक्रमाची नोंद ठेवणाऱ्या गिनिज बुकने याची नोंद घ्यायला हवी.
या सर्व प्रकारात गायकवाड सरांनी आपल्या संयमाच्या कडेलोटाची जी दोन प्रमुख कारणं सांगितली, ती आम्हाला जास्त महत्त्वाची वाटतात. पैकी पहिलं - शांत बसायला मी काय भाजपचा खासदार आहे का? आणि दुसरं - तो अधिकारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अरे-तुरे म्हणाला. आता यातली विसंगती अशी की, सरांच्या म्हणण्यानुसार शांत बसायला ते भाजपचे नाहीत. मग अपमान झाल्यावरही ‘अरेला कारे’ न म्हणणाऱ्या भाजपचेच पंतप्रधान असलेल्या मोदींना कुणी अधिकारी अरे-तुरे म्हणाला तर हा सेनेचा मावळा का भडकला? का एक साधा भाजप आहे व दुसरा मोदींचा भाजप आहे?
शेवटी विमान कंपन्यांच्या संयमाचा शेवट झाला. त्यांनी गायकवाड सरांना कुठल्याच विमानात बसू न देण्याचा आदेश काढला. या आदेशाला मात्र गायकवाड सरांनी संयमानं उत्तर दिलं. त्यांनी कुठे कुठे रीतसर तक्रारी केल्या. देशभरच्या प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सरांनी ‘मी हवाई सुंदरी किंवा इतर विमान कर्मचाऱ्यांशी नीटच वागलोय याची नोंद घ्या’ असं सांगितलं. तर आता सेनेनं सरांची पाठराखण केलीय. संसद सभापती महाजन मॅडम आता काय मध्यस्थी करतात पाहू. यानिमित्ताने व्हीव्हीआयपी कल्चरवर नेहमीच्या अभिजनांनी आणि उठसूठ आरटीआयवाल्यांनी आणखी एखादी याचिका केली असावी.
दरम्यान ज्यांच्या नियुक्तीने अनेकांच्या संयमाचा कडेलोट झाला, अशा उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व सरकारी गाड्यांवरचे लाल दिवे काढून टाकले! त्यामुळे पहिल्यांदाच मंत्री झालेल्या अनेकांच्या मनातल्या मनात लाल दिवे पेटले असणार, पण मोदींच्या भीतीनं कडेलोट झाला नाही.
याच काळात प्राथमिक शाळेतला एक मुलगा जन्मत:च संयम नावाची भावना मनात रिफिल न करताच आला. आला तो आला, पुन्हा त्या लब्धप्रतिष्ठित शाळेत आला. तो विद्यार्थी, इतर पालक, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक यांच्या संयमाचा जवळपास रोजच कडेलोट करतो असं कारण देत त्या लहानग्याला या सगळ्या मोठ्ठ्यांनी थेट शाळेच्या बाहेरचा रस्ता दाखवला!
एकीकडे सरकार हळदी-कुंकू करून, सेल्फी काढून, चिक्की आणि खिचडी खायला घालून मुलांना शाळेकडे चला म्हणून साद घालतेय आणि ही लब्धप्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाची शाळा खाप पंचायतीप्रमाणे मुलावर बहिष्कार टाकते. लागलीच शिक्षण मंडळ व शिक्षणाधिकारी यांचा संयम सुटला, मुलगा पुन्हा हजेरीपटावर!
परिस्थिती निवळत असतानाच मंत्रालयात थेट सहाव्या मजल्यावर एक शेतकरी (रामेश्वर भुसारे) पोहचला. मंत्रालयाची वेळ संपली तरी हा बळीराजा मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय हलणार नाही म्हणाला. बंदोबस्ताच्या पोलिसांनी समजावणीच्या सुरात समजावून पाहिलं, पण साधारण गायकवाड सरांच्याच मार्गानं मुख्यमंत्री भेटीचा धोशा लावल्यावर पोलिसांच्या संयमाचा कडेलोट झाला. त्यांनी बळीराजाला पहिल्या दोन डिग्ऱ्या देत शेतमालासारखा जीपमध्ये टाकला आणि नेला चौकीत!
या छळवणुकीचा सुगावा लागताच प्रसारमाध्यमांचा संयम सुटला आणि ब्रेकिंग न्यूज झाली! सहावा मजला, गरीब बळीराजा, मुजोर पोलिस आणि पर्यायानं शासन म्हणजे आगीत तेल व तेलात फोडणी!
आता इथंच हे प्रकरण संपेल. संवेदनशील मुख्यमंत्री बळीराजाला वर्षावर नेऊन न्हाऊमाखू, खाऊपिऊ घालून, त्यातून तो विदर्भाचा असेल तर मुनगंटीवारांना त्याच्या विमान प्रवासाचे देयक तयार करायला सांगून प्रकरण आणि बळीराजा वाटेल लावतील, असं वाटलं होतं.
पण या प्रकरणाने संयम हाच ज्याचा पाया असा राष्ट्रवादी पक्ष आणि त्या पक्षातले संयमाचे मेरुमणी आदरणीय अजितदादा पवार, ठाण्यातले दही-हंडी भरभरून योग्य ठिकाणी पोहचवणारे जितेंद्र आव्हाड आणि अलीकडेच प्रवक्ते पदाच्या शाब्दिक चकमकी सोडून पिस्तुलाच्या चकमक चकमक खेळणारे नवाब मलिक यांच्या संयमाचा कडेलोट झाला आणि ते त्या बळीराजाच्या भेटीला थेट मरिन लाईन्स पोलिस चौकीत धडकले! सत्तेत असताना जी चौकी जाता-येता गाडीतून बघितल्या न बघितल्यासारखी केली, त्याच चौकीत गाडीतून पायउतार होत ही नेते मंडळी तिथं पोहचली, कारण संयमाचा कडेलोट.
हे सगळं वाचलं, पाहिलं आणि असं वाटायला लागलं की, जगभरच मानसिक संतुलन बिघडत चाललंय? ट्रम्प, पुतिन, इसिस, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, ब्रिटन, सगळीकडेच संयम संपल्यासारखे आणि रुग्णाईत असल्यासारखे लोक, नेते, प्रसारमाध्यमं… सगळेच मरीज असल्यासारखे वागताहेत.
बरं मरीजमध्ये दोन प्रकार असतात. एक मरीज, जो खरंज मरीज असतो आणि प्रतिकार शक्ती कमी होऊन निपचित पडलेला असतो. वेळच्या वेळी दिलं जाणारं औषधपाणी घेत, पथ्य पाळत उपचारांना योग्य तो प्रतिसाद देत असतो. अशा मरीजाची तब्येत सुधारण्याची लक्षणं पटकन दिसू लागतात आणि शरीर आतून स्वच्छ झाल्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावरच्या तजेल्यात व हास्यात दिसू लागतात.
पण दुसऱ्या प्रकारचा मरीज जो असतो, त्याला आपण मरीज आहोत हेच मुळात मान्य नसतं. त्यामुळे त्याला धरून, पकडून उपचारासाठी आणावं लागतं. तिथंही सतत त्याचं मला काय धाड भरलीय? वेडा समजता काय मला? माझ्या इतका शहाणा जगात सापडणार नाही. तुमच्या या उपचारांनी, औषधांनी मी बरा होणार नाहीए, तर मी आजारीच नसल्याने मी बराच असणार! डॉक्टर वगैरे लोकांनी मला सुधरवायची भाषा करू नये. तुमचं पोट आहे. त्यामुळे तुम्ही गोळ्या औषध द्या, इंजेक्शन मारा, पण ते सगळं तुमची प्रॅक्टिस चालावी म्हणून! मी खडखडीत बरा आहे. मी मरीज नाहीच आहे मुळी…साला हा सगळा समाज मरीज आहे.
हा दोन नंबरचा मरीज कधीच बरा होणारा नसतो. आणि सध्या सर्वत्र या दोन नंबरच्या मरिजांची संख्या वाढतेय. म्हणजे इतकी की सरकारी इस्पितळासारखी अवस्था. मरीज ज्यादा. डॉक्टर कम.
अशा वेळी आपण काय करायचं? तर आपण या दोन नंबरच्या मरिजामधले जेवढे एक नंबरच्या मरिजात आणता येतील तितके आणावे. दोन नंबरचे मरीज समाजात वाढून, त्यांचा प्रार्दूभाव वाढू नये म्हणून युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीत जसा सामान्य नागरिक प्रसंगी प्रथमोचारासह डॉक्टर बनतो, वेळीच धावून अग्निशामक किंवा पोलिस अथवा सैन्य दलाची जबाबदारी घेतो, तसं आपण आपल्या कोशातून बाहेर येऊन ही नवी रोगराई हा समाज गिळण्याआधी सुदृढ करायला हव
नुस्ती शेरेबाजी नाही, तर कृती करावी लागणार
डायग्नोस इट, प्रिस्क्राईब इट अँड स्टार्ट ट्रीटमेंट!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment