अविनाश सप्रे : समाज आणि साहित्यातील आंतरसंबंध उलगडून दाखवणारे मर्मज्ञ समीक्षक
पडघम - साहित्यिक
रणधीर शिंदे
  • अविनाश सप्रे
  • Mon , 24 April 2023
  • पडघम साहित्यिक अविनाश सप्रे Avinash sapre

ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांचा स्नेहामृत सोहळा २२ एप्रिल २०२३ रोजी सांगलीत आयोजित करण्यात आला होता... नुकतीच सप्रे यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याच्या निमित्ताने. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख...

.................................................................................................................................................................

प्रा. अविनाश सप्रे यांनी २३ एप्रिल २०२३ रोजी शहात्तराव्या वर्षात पर्दापण केले. इंग्रजी भाषा साहित्याचे व्यासंगी प्राध्यापक आणि मराठीचे नामवंत समीक्षक, अशी सप्रे यांची ओळख आहे. राधानगरी तालुक्यातील कसबे तारळेसारख्या छोट्या खेडेगावात सप्रे यांचा जन्म झाला. तिथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी राजाराम महाविद्यालयातून बी.ए. आणि शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून एम.ए. पूर्ण झाले. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी चळवळीत तसेच वक्तृत्व स्पर्धेत त्यांचा सहभाग असे.

सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून त्यांनी दीर्घकाळ इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली आणि तेथूनच ते निवृत्त झाले. १९९७ ते २००० या काळात ते पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव होते.

सप्रे यांनी ‘चौकटीवर बसलेला कावळा : काही आत, थोडे बाहेर’ या शीर्षकाचा वैशिष्ट्यपूर्ण लेख लिहिला आहे. या लेखात त्यांच्या जीवनप्रवासाचे, विचारविश्वाचे व मनातील द्वंद्वांचे प्रांजळ असे निवेदन आहे. तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक जीवनातील ऱ्हासपर्वाच्या नोंदी आहेत. प्राचार्य अ.के. भागवत यांच्या ज्ञाननिष्ठेचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला.

तरुणपणी बंडखोरी आणि उदात्त जीवनाचे तसेच समाजवादी विचारांचे त्यांना आकर्षण होते. तत्त्व आणि प्रत्यक्ष व्यवहारातील विसंगती तसेच शुभाशुभाच्या झगड्यातून येणारी घुसमट त्यांनी अनुभवली. महाविद्यालयीन जीवनात वरिष्ठ महाविद्यालयातून ‘सरप्लस’ होऊन कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी करावी लागणे किंवा आरंभीच्या काळात ज्या महाविद्यालयात ते नोकरी करत होते, तेथील चर्चासत्रावर त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकात टोपणनावाने लिहिलेल्या लेखामुळे त्यांची नोकरीतून गच्छंती झाली. तसेच तरुणपणी ‘साधने’त लिहिलेल्या परखड लेखांमुळे ते टीकेचे धनी झाले. ‘आमची व्यवस्था आमच्या डोळ्यांवर झापड बांधते, आणि आम्ही हयातभर डोळे असून आंधळ्यासारखे वावरतो,’ असे त्यांना वाटत आले आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

ऐंशीचे दशक हे कोल्हापुरातील शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरणाचे गजबजले दशक होते. वाङ्मयाच्या क्षेत्रात नव्या गोष्टी घडत होत्या. त्यावेळी कोल्हापुरात आधुनिकतावादी जीवननिष्ठ वाङ्मयप्रेमी मंडळींचा गोतावळा जमला. याकडे नव्या तरुणांचे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक होते. या तरुणांमध्ये सप्रे एक होते. दिलीप धोंडो कुलकर्णी, चारू भागवत, शरद नावरे व कोल्हापुरातील अन्य लिहित्या तरुण वर्गाच्या गटात सप्रे होते.

या तरुणांनी काही लघुनियतकालिके काढली. त्या काळी सप्रे यांच्या काही कविताही प्रसिद्ध झाल्या. शिवाजी विद्यापीठातील इंग्रजी व मराठी विभागातील प्रा. शांतीनाथ देसाई, प्रा. गो. मा. पवार, प्रा. चंद्रशेखर जहागीरदार, प्रा.प्रकाश देशपांडे केजकर, प्रा.वसंत बिडवे, सांगलीतील प्राचार्य म. द. हातकणंगणेकर या मंडळीच्या वाङ्मयीन सहवासाचा लाभ सप्रे यांना झाला. स्वाभाविकच आधुनिकतावादी वाङ्मयीन पर्यावरणाशी त्यांचे आपसूक मैत्र जुळले. त्यामुळेच सप्रे यांनी पीएच. डी.साठी ‘इंग्रजी रोमँटिसिझमचा मराठी कवितेवरील प्रभाव’ असा तौलनिकदृष्टीचा अभ्यासविषय निवडला.

सप्रे हे गेले अर्धशतक मराठी मराठी वाङ्मयाच्या पर्यावरणात सक्रीय आहेत. विशेषतः समीक्षक म्हणून त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. विविध चर्चासत्रे व वाङ्मयीन उपक्रमात त्यांचा सहभाग कायम राहिला. मराठीतील प्रतिष्ठित नियतकांलिकामधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. परंतु त्यांच्या नावावर अद्यापि एकही ग्रंथ नाही. आळस व काहीशा संकोची स्वभावमुळेही असेल. किंवा ज्ञानावरील निष्ठा आणि जीवनातील स्वार्थी उपयुक्ततावाद, व्यवहारवाद यातील झगड्यामुळेही त्यांच्याकडून दीर्घ पल्ल्याचे लेखन झाले नसावे.

गेल्या चाळीस वर्षातील मराठी वाङ्मयविश्व तसेच अकादमिक चर्चाविश्वाच्या प्रतिसादातून सप्रे यांचे लेखनविश्व आकाराला आले आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनास प्रासंगिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आधुनिक साहित्याची समीक्षा हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा प्रांत. सप्रे यांच्या वाङ्मयाचे चिंतनाचा परीघ व्यापक आणि विस्तृत आहे. इंग्रजी वाङ्मयाच्या उत्तम अशा व्यासंगामुळे त्यांच्या समीक्षेस तौलनिक परिप्रेक्ष्य प्राप्त झाला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

गेल्या चाळीस वर्षातील मराठी समीक्षेकडे पाहिले असता एक चित्र असे दिसते की, मराठीत आस्वादपर समीक्षा आणि आशयलक्ष्यी समीक्षा मोठ्या प्रमाणात लिहिली जाते. साधारणतः १९७०नंतर साहित्याचा समाज, संस्कृती संदर्भात विचार केला जाऊ लागला आणि त्याचे पडसाद समीक्षेत दिसू लागले. त्या परंपरेत सप्रे यांनी वैशिष्ट्यपूर्ण समीक्षा लिहिली. कादंबरी साहित्यप्रकार आणि आधुनिक मराठी कादंबरी  हा त्यांच्या विशेष चिंतनाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी कादंबरीपरंपरा, तिची सामर्थ्यस्थाने, अभिरुची स्थित्यंतरे आणि मर्यादांचा साक्षेपी असा विचार त्यांच्या कादंबरी समीक्षेत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कादंबरीच्या प्रेरणा, प्रवृत्ती-प्रवाहांचा त्यांनी घेतलेला वेध मर्मज्ञ स्वरूपाचा आहे.

मराठीतील कादंबरी हे मराठी समाजाचे अपत्य आहे. आणि या समाजाच्या पालटल्या रंगभानाचा आविष्कार कादंबरीसारख्या वाङ्मय प्रकारात पहायला मिळतो. या दृष्टीने त्यांनी आधुनिक मराठी कादंबरीपरंपरेचा शोध घेतला. त्यांच्या कादंबरी मीमांसेत समाज संस्कृतीतील प्रभुत्व संबंधांबरोबर त्याच्यातील संवाद-विसंवाद आघातांची चिकित्सा आहे. त्यांनी ‘काल’च्या तसेच ‘आज’च्या कादंबरीची समीक्षा केली. भालचंद्र नेमाडे ते प्रवीण बांदेकर, मकरंद साठे यांच्यापर्यंतच्या कादंबरीची त्यांनी समीक्षा केली. त्यांनी मराठीतील ऐतिहासिक कादंबरी, प्रयोगशील कादंबरी, लोकप्रिय कादंबरी ते अनुवादित कादंबऱ्यांचे शोधलेले स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे.

आधुनिक मराठी कादंबरी परंपरेची चिकित्सा करत असताना त्यांनी लिहिलेली कादंबरी  परीक्षणे महत्त्वाची ठरतात. या दृष्टीने भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे यांच्या कादंबऱ्यांची सामर्थ्यस्थाने व वेगळेपण ते सतत मांडत आले आहेत. नेमाडे प्रभावातील कादंबरीपरंपरा त्यांनी शोधली. ‘अस्तित्वाच्या ओसपणाचे कोसच्या कोस चाललेली कुणाची एकाची भ्रमणगाथा’ ते व्यापक सांस्कृतिक पट मांडणाऱ्या नेमाडे यांच्या कादंबरीविश्वासंबंधींचा सखोल विचार त्यांनी मांडला.

त्यांनी नेमाडे यांच्या कादंबऱ्यांतील जीवनदर्शनाचे स्वरूप, अस्तित्ववादी दर्शने, निर्णायक नैतिक दृष्टी, संरचनाविशेषांचा शोध घेतला. नेमाडे यांच्या कादंबऱ्यांत नायकप्रधान कादंबऱ्यांबरोबर गाव आणि कुटुंब चित्रणातून सांस्कृतिक ओळखींचा शोध आहे असे त्यांचे म्हणणे आहे. नेमाडे यांच्या एकूण कादंबऱ्यांतील ‘भारताचा शोध’ त्यांनी साधार नोंदवला आहे. तर रंगनाथ पठारे यांच्या कादंबऱ्यांचा व्यूह ‘तात्त्विक कलात्मकते’त शोधला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्यांच्या कादंबरी समीक्षेचे एक वेगळेपण म्हणजे मराठी कादंबरीचे स्वरूप ते पाश्चात्य  कादंबरीच्या परिप्रेक्ष्यात पाहतात. त्यामुळे त्यास तौलनिक दृष्टी लाभते. अरुण साधू यांच्या ‘मुखवटा’ कादंबरीतील कथनाचा संबंध ते पाश्चात्य परंपरेतील ‘कुलगाथे’शी (saga) जोडतात. किंवा रंगनाथ पठारे यांच्या ‘सात पाटील कुलवृत्तांत’ कादंबरी वाचताना त्यांना अ‍ॅलेक्स हेरीच्या कांदबरीची आठवण होते. युरोपीय चर्चाविश्वातील आधुनिक वाङ्मयसंकल्पनांचा वापर त्यांच्या समीक्षेत आहे. देशोदेशीच्या कादंबरीकारांचे व विचारवंतांचे उल्लेख त्यांच्या कादंबरी समीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांच्या समीक्षेस काही नव्या मिती प्राप्त होतात. तसेच मराठी कादंबरीच्या संदर्भात ‘पण, परंतु’ची मांडणी आहे. विश्वकादंबरीत मराठी कादंबरीचे स्थान कुठे आहे, याची चिकित्सा आहे. मराठी कादंबरीबद्दलचे समाधान आणि असमाधानाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे.

वाङ्मयाचा व्यापक असा व्यासंग आणि आस्थादृष्टीमुळे परस्परभिन्न संवेदनशीलतेच्या लेखकांवर ते लिहू शकतात. तसेच त्यामध्ये वैविध्य आहे. त्यांच्या समीक्षेत लेखकाची वाङ्मयपरंपरेतील स्थाननिश्चिती आहे. जुन्या तसेच नव्या पिढीतील लेखकांवर त्यांनी मनःपूर्वक लिहिले. विजय तेंडुलकर, श्री. दा. पानवलकर,  त्र्यं. वि. सरदेशमुख, शरच्चंद्र मुक्तिबोध, वसंत कानेटकर, सतीश आळेकर, संजीव खांडेकर यांच्या वाङ्मयावर त्यांनी लिहिले. त्या त्या लेखकाच्या लेखनसंवेदनस्वभावाचा त्यांनी काही सूत्रप्रतिमांधून शोध घेतला. उदा. विजय तेंडुलकरांच्या लेखनाचा शोध त्यांनी ‘काया, छाया आणि माया यांचा खेळ’ या सूत्रप्रतिमेतून शोध घेतला.

१९९०नंतरच्या साहित्याचाही त्यांनी तितक्याच आस्थेने शोध घेतला. या टप्प्यावरील त्यांच्या समीक्षेत जागतिकीकरणाचा कालावकाश व आधुनिकोत्तरतेचे चर्चाविश्व प्रवेशित झालेले दिसते. समकालीन साहित्य पाहणीसाठी हे चर्चाविश्व त्यांना महत्त्वाचे वाटते. याबरोबरच आधुनिक समीक्षा हादेखील त्यांच्या चिंतनाचा विषय. मराठी समीक्षेबद्दल त्यांना विशेष आस्था आणि कुतूहल आहे. तसेच त्यांना मराठी समीक्षकांच्या कामगिरीचे अप्रूप आहे. यादृष्टीने त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी समीक्षेच्या वाटा आणि वळणांचा मोठ्या आस्थेने शोध घेतला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

१९५०नंतरच्या मराठीतील समीक्षेचे त्यांनी प्रमेयदर्शी, परिणामदर्शी, निर्माणक, तत्त्वदर्शी, आस्वादक व शास्त्रीय जीवनवादी समीक्षा या सूत्रांद्वारे समीक्षापट न्याहाळला. या लेखनाबरोबरच त्यांनी वेगळी अशी काही कामे केली आहेत. सप्रे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र लेखन प्रकल्पातील सहाव्या व सातव्या खंडाचे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे निर्माते या मालेअंतर्गत कवी कुसुमाग्रजांच्या मोनोग्रामचा (व्याप्ती लेखपुस्तिका) मराठी अनुवादही सप्रे यांनी केला. साहित्य अकादमीच्या ‘इंडियन लिटरेचर’ इंग्रजी खंडात मराठी लेखक व साहित्यकृतीवरील नोंदी प्रकाशित आहेत. ‘चतुरंग अन्वय’ (सांगली), ‘केल्याने भाषांतर’ या नियतकालिकांचे संपादन मंडळावर आहेत. साहित्य अकादमी भाषा सल्लागार मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ग्रंथ प्रकल्प समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. यू. आर. अनंतमूर्ती, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, श्रीराम लागू, निळू फुले, सुधीर रसाळ यांच्या प्रकट मुलाखती घेतल्या आहेत.

सप्रे यांच्या लेखन आळसामुळे व गप्पिष्ट स्वभावामुळे त्यांचे बरेचसे मित्र त्यांचा ‘मौखिक परंपरेतले समीक्षक’ असा गमतीने उल्लेख करतात. याचे कारण ‘स्वतःला मूल्यवान बनवण्याची आणि भोवतालाल जोडून घेण्याच्या’ धडपडीत बाहेरच्या व्यावहारिक जगाच्या रेट्यामुळेही त्यांच्याकडून ग्रंथस्वरूपाची कामे झाली नसावीत. मराठीतील आधुनिक साहित्य तसेच लेखक-कवींबद्दल त्यांना नेहमीच  आस्था वाटत आली आहे. दीर्घकाळ वाङ्मयीन पर्यावरणात असल्यामुळे त्यांचा अनेक लेखक-कवींशी जवळून संबंध आला.  जुन्या आणि नव्या पिढीतील लेखकाशी त्यांचे जवळचे स्नेहाचे संबंध राहिले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सप्रे यांची वाङ्मयीन संवेदनशीलता व अभिरुची सदैव काळसमांतर राहिली. त्यामुळे ‘आजच्या’ साहित्य जगाशी देखील तितकेच ते संवादी आहेत. नव्या साहित्याचे पुरस्कर्ते व समानधर्मी सहोदर म्हणून आधुनिक साहित्याचे सप्रे यांनी नेहमीच स्वागत केले आहे.

सप्रे यांच्या समीक्षेत ‘लेखकबिंदू’ (Sender Point) आणि ‘वाचकबिंदू’ (Receving Point) याच्यातील परस्परभान कायम नांदत आहे. एका लेखाचा शेवट करताना सप्रे यांनी वॉल्ट व्हिटमनच्या एका विधानाचा दाखला दिला आहे. तो असा, “To have great poets there must be great audience too.” त्याप्रमाणे समाज, संस्कृती आणि वाङ्मय यांच्यातील परस्परसंबंधांचे भान त्यांच्या समीक्षादृष्टीत आहे. पुढील काळात लवकरच त्यांचे समीक्षा ग्रंथ  प्रकाशित होतील, अशी आशा करूयात.

.................................................................................................................................................................

लेखक रणधीर शिंदे मराठी समीक्षक आहेत.

randhirshinde76@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......