अजूनकाही
पुस्तकं लिहिणारा, पुस्तकं वाचणारा विद्वान वा सुशिक्षित का समजला जातो? किंवा लिहिता न येणारा, पुस्तकांचे वाचन न करणारा अज्ञानी वा अशिक्षित का मानला जातो? खरं तर लेखन-वाचन करता येणं, अज्ञानी वा अशिक्षित असणं या स्थितिदर्शक अवस्था काहीएक गृहितकांवरून अधोरेखित केलेल्या असतात. म्हणजे, इतरांना ज्याचं ज्ञान आहे, ते एखाद्याकडे नसणं म्हणजे तो अज्ञानी, अशिक्षित आहे, असं म्हणण्याची जगरित आहे.
वस्तुतः या अज्ञानी वा अशिक्षित माणसाकडे त्याच्या जगण्यातून आलेलं, परिसराला जोडणाऱ्या जैवसंस्थांतून स्फुरलेलं ज्याला ज्ञान म्हणावं, असं बरंच काही असतं, जे अनेकदा लिहिणाऱ्या वाचणाऱ्या ‘ज्ञानी’ माणसाकडेही नसतं. त्या अर्थानि ज्ञानी, अज्ञानी, अडाणी-अशिक्षित ही सोयीपुरती तेवढी लेबल ठरतात. अनेकदा त्यातून आमच्याकडे आहे, तेच ज्ञान आणि म्हणून आम्ही ज्ञानी, बाकी तुम्ही सारे अज्ञानी अशी गर्विष्टपणाची अदृश्य छटाही जाणवते. परंतु, जे सच्चे ज्ञानमार्गी असतात, त्यांच्या ठायी विनम्रता आणि कायम एक रितेपणाची भावना जागी असते. किंबहुना म्हणूनच त्यांच्यातली ज्ञानलालसाही तेवती राहत असते.
एक मात्र खरं, इतरांना न झालेलं मानवी समाजाचं, सृष्टीचं स्व-परिघापलीकडचं ज्ञान एखाद्याला होतं, त्यामुळे तो ज्ञानी वा सुशिक्षित (बुद्धिवाद वा विवेकशीलतेचं मोजमाप करण्याचे निकष आणखीनच निराळे) या संज्ञेस ढोबळपणानं पात्र ठरतो. म्हणूनच ते ज्ञान लेखन-वाचनातून आत्मसात करणाऱ्यांना प्रतिष्ठा आणि पत लाभते. अर्थात, जितकं ज्ञान पुस्तकांत साठलेलं असतं, त्याहून कितीतरी ते पुस्तकाबाहेरच्या जगात विहरत असतं. तरीही, याच टप्प्यावर ग्रंथ, ग्रंथसंग्रह आणि वाचनाचं महत्त्व ठळक होतं. किंबहुना हे असं महत्त्व जोखूनच दरवर्षी ‘जागतिक ग्रंथदिन’ (२३ एप्रिल) पाळला जातो. साजराही केला जातो. म्हणूनही संगणोत्तर काळातलं या दिवसाचं महत्त्व न दुर्लक्षण्यासारखं ठरत जातं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
लिहित्या-वाचत्या जगाचा संकोच
अर्थात, संगणकयुगाचा प्रारंभ हा ‘कट ऑफ पॉइंट’ मानला, तरी तो मागे पडून आता भारताच्या संदर्भाने ४०हून अधिकची वर्षं सरली आहेत. आताचा काळ ‘सुपरफास्ट’ इंटरनेटचा आणि त्या बळावर तितक्याच वेगाने अवघ्या जगावर स्वार झालेल्या मीडिया आणि सोशल मीडियाचा आहे. या काळात छापील पुस्तकांची जागा किंडल आणि इ-बुक्सने घेतली आहे नि वाचणाऱ्यापेक्षा ‘बघ्यां’ची संख्या कैकपटींनी वाढती राहिली आहे. तसं तर देश कोणताही असो, समाजसमूह कोणताही असो लेखनकला फुलू-बहरू लागल्यापासून आणि छापील ग्रंथाच्या जन्मापासून कोणत्याही काळात लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची संख्या तशी तुरळकच राहिली आहे. आताचा वर्तमानकाळ आणि या वर्तमानातला हा देश, हा मराठी समाजही त्याला अपवाद नाही.
आता सार्वजनिक जागी सर्वसाधारण वाचक वर्तमानपत्र वाचत असल्याचं दृश्य क्रमाक्रमाने दुर्मीळ होत चाललंय. अशात पुस्तक वाचताना कोणी नजरेस पडणं म्हणजे तर दुर्मिळातली दुर्मीळ घटना ठरू लागलीय. युगात उगवणारा सोन्याचा क्षणच जणू तो. आता शहरात धावणाऱ्या बसमध्ये, ट्रेन-लोकल ट्रेनमध्ये, विमानात, बोटीवर, फूटपाथवर शांत निवांत बाग-बगिचांमधल्या बाकांवर सगळे जण स्मार्टफोनमध्ये डोकं खूपसून, मान झुकलेल्या, खांदे पडलेल्या अवस्थेत बहुतांशी काहीबाही ऐकत बघत असतात. या पाताळधुंडी बघ्यांच्या दुनियेत कोणी तल्लीन होऊन पुस्तक वाचताना दिसला की, ते दृश्य सर्वोत्तम सुखचित्र होऊन बसतं.
सृजनाची अशीही तऱ्हा
सोशल मीडियावरच्या ट्विटर प्लॅटफॉर्मवर बाष्कळ गोष्टींबरोबरच सृजनाच्या पातळीवर बरंच काही घडत असतं. त्यातलाच हा एक दिल्लीकर सृजनशील कलंदर. त्याचं ट्विटर खात्यावरचं नाव ‘मयांक ऑस्टिन सूफी उर्फ दिल्लीवाला’.
‘काळाच्या रेट्यात गायब होऊ पाहणाऱ्या, भूतकाळाचं वैभव हरवू पाहणाऱ्या शहरांना टिपणारा लेखक छायाचित्रकार- कलावंत’, अशी याच्या सृजनकार्याची दखल थेट प्रतिष्ठित ‘दी न्यूयॉर्कर’ने घेतलेली. अरुंधती रॉयच्या ‘दी मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ या गाजलेल्या कादंबरीच्या मुखपृष्ठाचा रचनाकार, ही त्याची दुसरी ओळख.
हा गृहस्थ दिल्ली आणि परिसरात मनसोक्त भटकत असतो आणि नित्याच्या वाटेवरची, स्थळांवरची सामान्यांच्या नजरेस न पडणारी, परंतु गाढ जीवनार्थ साठलेली जिवंत दृश्यं आपल्या कॅमेरात टिपत असतो. मग ती चांदनी चौकातली एखादी गजबजलेली गल्ली असते किंवा निरव शांततेनं भरलेलं एखादं कबरस्थान.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अलीकडे स्थळांच्या विविध रंग-रूपातल्या माणसांच्या प्रेमात असलेल्या या कलावंत लेखकाने जागतिक ग्रंथ प्रदर्शनानिमित्ताने दिल्ली भेटीवर आलेल्या फ्रान्सच्या २०२२च्या नोबेल पुरस्कारविजेत्या लेखिका अॅनी अर्नो यांची सोबत केली. नुसती सोबत केली नाही, तर या महाशयांनी दिल्लीच्या मनाशी हितगुज करू पाहणाऱ्या अन यांच्या विविध स्थळांच्या पार्श्वभूमीवरच्या क्षणमग्र अर्थात ‘कैंडिड’ मुद्राही टिपल्या. त्यातली शायर मिर्झा गालिबच्या निझामुद्दीन परिसरातल्या मज़ारीजवळची (‘मज़ार ए मिर्ज़ा ग़ालिब’) तिची मुद्रा साहित्यप्रेमींना सुखावून गेली.
दिल्ली शहराच्या प्रेमात असाच एकटा भटकताना या ऑस्टिन सूफीने कधी तरी बुशशर्ट आणि पँट घातलेल्या फूटपाथवरच्या एका भाजीविक्रेत्याची पुस्तकवाचनात मग्न अशी मुद्रा टिपली होती. आसपास कांदा-बटाटा, टोमॅटे-मिरच्या-आल्याच्या टोपल्या, एका बाजूला वजनाचा काटा आणि मधोमध रितसर बैठक मारून पुस्तक वाचनात गढलेला, हा भाजीवाला ज्ञानाच्या वाटेवरचा सच्चा वारकरी शोभून दिसतो. त्याची वेषभूषा आणि चेहऱ्याची ठेवण तो करत असलेल्या व्यवसायाला विसंगत वाटणारी मात्र, त्याचे मळकट, कष्टकरी हात आणि पाय तो घेत असलेल्या मेहनतीची साक्ष देणारे आणि त्या हातात दिसणारे पुस्तक जागतिक ग्रंथदिनाचा खरा अर्थ पटवून देणारे ठरते...
‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या एप्रिल २०२३च्या अंकातून साभार.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment