भारताचे विश्लेषण कुठल्या एका विचारसरणीच्या आधारे करणे अत्यंत कठीण आहे. किंबहुना असे म्हणता येईल की, असे करणे बहुतांशी अशक्यच आहे. कारण कालमानपरिस्थितिपरत्वे, तसेच हवामान, सांस्कृतिक जडणघडण आणि राजकीय वातावरणाच्या हिशोबानेदेखील हा देश अनेक वैविध्यांनी भरलेला आहे. या देशात अनेक विचारप्रवाह एकाच वेळी सोबतीने नांदत आले आहेत. त्यामुळे हा देश अनेक विविधतांना घेऊन विकसित होत गेला आहे. तसे पाहिले तर कदाचित जगातील सर्वच देश आणि समाज यांत सर्वच कालखंडात विरोधाभास अस्तित्वात असतात. मात्र भारतातील विविधता इतरत्र कुठेच सापडणार नाही, इतकी सखोल व व्यापक आहे. भारत हा एक रंगीबेरंगी फुलांचा सुंदरसा पुष्पगुच्छ आहे, ज्यात कुठलीही दोन फुले एकसारखी किंवा एकाच रंगाची नाहीत. परंतु असे असूनदेखील त्या गुच्छातील सौंदर्य आणि सामंजस्य चिरस्थायी राहिले आहेत.
मात्र आज आपला देश ज्या कसोटीच्या प्रसंगांतून जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र विचारसरणीच्या दृष्टीकोनातून पारखली जाऊ शकते, तसे पारखणे गरजेचेही आहे. ती म्हणजे भारताच्या दीर्घ इतिहासात भारतीय समाजाने सखोल गांभीर्याने केलेले चिंतन, त्यातून विकसित झालेली तार्किकता आणि तर्क करण्याची प्रवृत्ती. तिचा शोध घेतला तर आपल्याला भारत या बहुरूपी कोड्याचा अर्थ लागू शकेल, कारण येथील अनेक वैविध्यात टिकून राहिलेली गोष्ट म्हणजे येथील चिंतनप्रक्रिया व तार्किकता यांतून साकारलेला भारत हा विचार.
येथे आपण आधी तर्क आणि तार्किकता यांतील फरक समजून घेऊ. समाज नेहमीच अनेक तऱ्हांच्या भ्रमजालात गुंतत असतो आणि तो गुंता सोडवतही असतो. गुंता सोडवण्यासाठी, वास्तवाला समजून घेण्यासाठी तो विचारांच्या आधारावर अनेक युक्तिवाद करतो, ते असतात तर्क. तार्किकता म्हणजे अशा रीतीने मांडलेल्या विविध तर्कसंगतींना समग्रतेने आणि विश्वसनीयतेने समजून घेण्याची प्रवृत्ती. तर्क आणि विवाद या दोहोंत जे एक सूक्ष्म अंतर आहे, तसेच ते तर्क आणि तार्किकता या दोन्हीतही असते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
आज आपल्या समाजासमोरील विविध समस्यांच्या संदर्भात आपल्यासमोर येतात. ते असतात केवळ तर्क - मग ते धर्म किंवा सांप्रदायिकतेविषयी असतील, आर्थिक विषमतेच्या वाढत्या दरीबद्दल असतील, किंवा लैंगिक भेदभावाच्या किंवा जातीयवादाच्या समस्येविषयी असतील. या सर्वांना नीट समजून घेण्याचे प्रयत्न कमी-अधिक प्रमाणात एकांगी आणि एककल्ली होत चालले आहेत.
मांडले जाणारे बहुतेक तर्क औचित्यपूर्ण नाहीत. त्यांना तार्किकतेच्या कसोटीवर तपासून पाहूनच त्यांची सत्यता सिद्ध करायला हवी. सत्याला केवळ तर्कानेच नव्हे, तर त्यातील तार्किकतेच्या माध्यमानेच सिद्ध केले जाऊ शकते. तसे झाले नाही, तर केवळ परस्परविरोधी तर्कांचा आपसात संघर्ष होत राहतो व त्यातून कोणताही तत्त्वबोध होत नाही.
गेल्या दोन-अडीचशे वर्षांत तर्काकडून तार्किकतेकडे, त्यातून सत्याचा अधिक खोल शोध घेणाऱ्या चिंतनाकडे जाण्याच्या प्रक्रियेत नक्कीच कमतरता आली आहे. तरी पण त्याचसोबत याच काळात भारत हा भूभाग एक पारिभाषित देश म्हणून बलशाली होत गेला आहे व आजही होत आहे. मात्र वैचारिक पातळीवर मात्र भारताची परिपक्वता मात्र सातत्याने कमकुवत होत चालली आहे..
या दरम्यान ३०-३२ वर्षांचा एक कालखंड असाही आला होता, जेव्हा भारताचा वैचारिक दृष्टीकोन आभाळाची उंची गाठू लागला होता. हा गांधींचा काळ आहे, हाच भारत नावाच्या विचारसमृद्धतेच्या पुनर्जागरणाचाही काळ आहे. या काळात भारत पुन्हा एकदा शतकानुशतकांच्या भयगंडातून मुक्त झाला आणि त्याच्यात अभयवृत्तीचा संचार झाला. त्यानंतरची स्वातंत्र्याची ७५ वर्षे मात्र पुन्हा एकदा भारतातील या वैशिष्ट्यपूर्व चिंतनपद्धतीला व तार्किकतेला विसरण्याची, वितंडवादात सत्यशोध हरपण्याची, थोडक्यात, म्हणजे ‘भारत’ नावाच्या विचाराचा वारसा हरवण्याची वर्षे सिद्ध झाली आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘भारत’ नावाचा विचार काय आहे?
भारतावर सिकंदराने केलेल्या आक्रमणाच्या संदर्भात भारत नावाच्या विचाराला समजून घेणे सोपे होईल. तेव्हा बुद्ध आणि महावीराचा काळ संपला होता आणि अशोकाचा काळ अजून भविष्याच्या गर्भात होता. सिकंदर इ.स. पूर्वी ३२८ साली भारतात आला आणि १९-२० महिने येथे राहिला. तो जाईल तिथे विजयी होत, स्थानिक समाजाला पायदळी तुडवत राहिला. एव्हाना त्याने सिंध प्रांतावर विजय मिळवला होता. पण तेथील ब्राह्मणांनी स्थानिक पराजित जातींना बंडासाठी प्रेरित केले. त्यातील हजारो बंडखोर मारले गेले आणि सिकंदरने त्यांना प्रेरित करणाऱ्या दहा निवडक तत्त्ववेत्त्या ब्राह्मणांना मृत्युदंड देण्याचे ठरवले. तेव्हा त्याच्यासोबत आलेल्या ग्रीक तत्त्ववेत्यांनी त्यापूर्वी त्या भारतीय तत्त्ववेत्त्यांची मेधा आणि प्रतिभा तपासण्याची इच्छा व्यक्त केली. यात लक्षणीय बाब ही की, त्या काळीही तत्त्ववेत्ते, बुद्धिमंत यांना खतरनाक मानले जात असे आणि त्यांना मृत्यूच्या तोंडी दिले जात असे.
दुसरी लक्षणीय बाब म्हणजे त्या काळात सिकंदरच्या सेनेसोबत तत्त्ववेत्तेदेखील असत. त्यानुसार सिकंदर त्या भारतीय बुद्धिमंतांची परीक्षा घेण्यास तयार झाला. त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही दहा जण आहात. तुमच्यापैकीच एकाला परीक्षक नेमले जाईल. बाकीच्या नऊ जणांना मी प्रश्न विचारेन आणि उत्तरांच्या उत्तमतेच्या क्रमाने तुम्हाला मृत्युदंड दिला जाईल. अर्थात, ज्याचे उत्तर सर्वोत्तम त्याचा वध सर्वांत आधी केला जाईल. उत्तमतेचा क्रम तुमच्यापैकी जो परीक्षक असेल, तोच ठरवेल.”
आपण आता सिकंदरचे प्रश्न आणि त्याला येथील बुद्धिमंतांनी मरणाच्या दारात उभे तुमच्यापैकी राहून दिलेली उत्तरे पाहू या. ती आपल्याला महाभारतातील ‘यक्ष’ प्रश्नांची आठवण करून देतात. त्यांतून आपल्याला तात्कालीन भारतीय विचारकांची निर्भीडता, स्फटिकासारखी पारदर्शिकता आणि स्पष्टवादिता दिसते, जी भारताला एका देशातून एका विचारसमृद्धीत बदलते -
प्रश्न : जिवंत असलेल्यांची संख्या अधिक आहे, की मृतांची?
उत्तर : जिवंत असलेल्यांचीच. कारण मृतक मेल्यानंतर नसतात.
प्रश्न : प्राणी समुद्रात अधिक आहेत की भूपृष्ठावर?
उत्तर : भूपृष्ठावर, कारण समुद्र त्याचाच एक भाग आहे.
प्रश्न : जनावरांत सर्वांत बुद्धिमान कोण आहे?
उत्तर : ते जनावर, ज्याने माणसाला अद्याप आपला थांगपत्ता लागू दिलेला नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
प्रश्न : तुम्ही शंभूला बंड करण्यासाठी का उचकावले?
उत्तर : कारण माझ्या मते, जो जगावा तर मानाने, आणि मरावा तरी मानाने.
प्रश्न : दिवस आणि रात्र यांपैकी कोण आधी उदयास आले?
उत्तर : अर्थात दिवसच, कारण तो रात्रीसाठी एक दिवस आधीच जन्माला आला.
हे उत्तर ऐकून सिकंदर गडबडला. त्याला काहीच कळेनासे झाले. तेव्हा त्याने रागावून विचारले, ‘याचा अर्थ काय?’
उत्तर : अशक्य प्रश्नांची उत्तरेही अशक्यच असणार ना?
प्रश्न : जगात माणूस आवडता कशाने होतो?
उत्तर : अत्यंत बलशाली असूनही प्रजावत्सल झाल्याने, ज्याला प्रजा घाबरत नसावी.
प्रश्न : माणसाला देवत्व कसे प्राप्त होऊ शकते?
उत्तर : देवासारखे काम करून, जे माणसाला शक्य नाही.
प्रश्न: जीवन आणि मृत्यू यांत अधिक बलशाली कोण?
उत्तर : जीवनच, कारण ते अत्यंत भयानक कष्ट सोसू शकते.
प्रश्न : कोठवर जगणे हे मानाचे जगणे आहे?
उत्तर : जोवर माणसाला असे वाटत नाही की, आता जगण्यापेक्षा मरणेच श्रेयस्कर/अधिक चांगले आहे.
प्रश्नांची सरबत्ती संपताच सिकंदरने परीक्षकाकडे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “सर्वच उत्तरे एकापेक्षा एक सरस आहेत.” तेव्हा सिकंदर संतापून म्हणाला,
“मग तूच सर्वांत आधी मारायला तयार हो.” तेव्हा तो म्हणाला, “असे झाले तर तूच खोटा सिद्ध होशील.”
हे ऐकल्यावर सिकंदरने त्या सर्वांना मुक्त केले आणि तो तेथून निघून गेला.
हे वृत्त आम्हाला पाचव्या शतकातील ग्रीक इतिहासकार प्लेटोच्या जीवनवृत्तात मिळाले. तात्पर्य, देश, समाज किंवा व्यक्ती कोणत्याही एका विचारसरणीने संचालित होत असतात, असे नाही. तरीदेखील या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की, तत्कालीन भारतीय तत्त्वज्ञ असामान्यपणे धाडसी व निर्भीड वृत्तीचे होते. मृत्यू समोर उभा असतानाही त्यांची मेधा क्षणभरही विचलित झाली नाही. भारतीय विचारसरणीचे हेच मूळ वैशिष्ट्य आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
गांधीही कधी स्वतःच्या किंवा सत्याग्रहीच्या मृत्यूच्या कल्पनेने विचलित होत नसत. म्हणूनच त्यांनी साबरमतीच्या काठी एकीकडे स्मशान आणि दुसरीकडे तुरुंग, यांच्या मधोमध आपले व सत्याग्रहींचे घर आणि आश्रम बांधले. कारण सत्याग्रहींच्या आयुष्यात दोन गोष्टी नक्की आहेत- तुरुंग आणि अकाली मृत्यू. आता हेही तुम्ही स्वतःच जाणून-समजून घ्या आणि त्याचे विश्लेषण करा.
भारताच्या पराभवाची कारणे
आता प्रश्न असा उद्भवतो की, इतकी जबरदस्त मेधा आणि वैचारिक स्पष्टता असूनही भारत सतत पराभूत का होत राहिला? त्याचे कारण म्हणजे परस्परांविषयीचा कमालीचा द्वेष, निष्क्रियता, आळस किंवा ढिम्मपणा, तसेच कुठल्याही समस्येचे गांभीर्य व जटिलता जाणून घेण्याविषयीची अनिच्छा. त्याशिवाय भारतीय समाज असंख्य संघटनांत विभागला असून त्या विभाजनावर तो अवलंबून होता. तसेच विद्यमान वर्णव्यवस्था आणि चालीरीतीही भारताच्या या विलक्षण विचाराच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसत नाहीत.
भारताच्या पराभवाची दीर्घ मालिका हा एक अत्यंत कुतूहलाचा विषय आहे. या समाजप्रवाहातील विविध घटकांना जोपासण्याचा, त्यांचा परस्पर मिलाफ घडवण्याचा फारसा प्रयत्न झालेला दिसत नाही; उलट ह्या घटकांत परस्पर स्पर्धाच राहिली.
त्याच वेळी हेही सांगितले पाहिजे की, येथील मूळ प्रवृत्ती कधीच विस्तारवादी नव्हती. येथील नैसर्गिक समृद्धी व पोषक हवामान यांनी आळसाला खतपाणी घातले असावे. समाजात फोफावलेली वर्णव्यवस्थेची विषवल्ली हेदेखील समाजाच्या विखुरलेपणाचे व कमकुवतपणाचे महत्त्वाचे कारण आहे.
ज्या समाजात युद्धाचा अधिकार केवळ एका घटकाकडे आहे, तो बलशाली कसा होणार? जेथे शिक्षण आणि वैचारिक देवाणघेवाणीचा अधिकारही एकाच वर्णापुरता सीमित असेल, तिथे वैचारिक साचलेपण येणारच. तसेच व्यापारउदिमावर एकाच वर्गाची मक्तेदारी असेल तर काय होईल? सेवाकार्यही पिढीजात ठरत असेल, तर त्या वर्गात हीनतेची भावना नक्कीच येणार. या चारही वर्णांहून वेगळा असा पाचवा वर्णदेखील आहेच, ज्याला कधी येथील सामाजिक रचनेचा, आणि पर्यायाने भारताच्या संकल्पनेचा भाग मानले गेले नाही, किंबहुना त्याला कधी माणूस म्हणूनही गणले गेले नाही. शूद्र आणि दास यांचा उल्लेख ऋग्वेदातही येतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
भारताला विविधतेच्या संदर्भात जाणून घेताना हेही समजून घ्यावे लागेल की, हा जनजातीय समाज वर्णव्यवस्थेकडे कसा वळला? सांगितले तर असेही जाते की, शूद्रांची उत्पत्ती प्रजापित्याच्या पायापासून झाली. परंतु, त्यांच्यासाठी कोणतीही देवता निश्चित केलेली नाही; गृहस्वामी हेच त्यांचे देव. त्यांची पाद्यपूजा करूनच त्यांना आपले जीवन कंठायचे आहे (जैमिनीय ब्राह्मण: शूद्रो अनुष्टुपछंदा वेश्मपतिदेवस, तस्मात उपदांवनेज्यैनैव जिर्जिविषति).
असे असले तरी भारतात तत्त्वज्ञ आणि सहिष्णु यांचा एक मतप्रवाह नेहमीच प्रवाहित राहिला आहे. तो फारसा मजबूत नसला तरी त्याने विविध कालखंडांत सुधारणांचे आव्हान वेळोवेळी उभे केले आहे. ‘मनुस्मृती’ व तिच्यात सांगितलेला शूद्रधर्म आपल्याला माहीत आहेच. परंतु, गुप्तकाळात येता येता शिक्षित शूद्रांची उदाहरणे सापडू लागतात. याज्ञवल्क्य ऋषीच्या एका श्लोकात हे स्पष्ट होते की, तेव्हा भृतकां(पगारी/ निम्न जातीचा नोकर) साठीही अध्यापक असत. (याज्ञवल्क्य, १ : २३३ : भृतकाध्यापक).
त्याच काळात लिहिल्या गेलेल्या ‘मृच्छकटिक’ नाटकात शकारचा धिक्कार करताना न्यायाधीश म्हणतात, “अरे नीचा, तू वेदांविषयी बोलत आहेस आणि तरीदेखील तुझी जीभ झडली कशी नाही?” (‘मृच्छकटिक’, १X२१, वेदार्थान प्राकृतःत्वं वदसि, नच ते जिव्हा निपतिता?).
विद्वान शूद्रांविषयी वज्रसूचीतही उल्लेख आहेत. यात वेद, व्याकरण, मीमांसा, सांख्य, वैशेषिक, लग्न इत्यादी शास्त्रांचे ज्ञान असणाऱ्या शूद्रांची चर्चा आहे, पण त्यांच्या विद्वत्तेचे श्रेय मात्र त्यांना देण्यात आलेले नाही - शूद्रेच्या गर्भातून फेकलेले ब्राह्मणपुत्र होते. (जयस्वाल. मनू अँड याज्ञवल्क्य, पृ. २४१).
म्हणजेच शूद्राला मुळात प्रतिभासंपन्न म्हणून गणलेच जात नसे. तो शिकला तरी त्याला ब्राह्मणाची ‘अनौरस’ औलाद म्हणून हिणवले जात असे. खरे तर हा एक विस्तृत, व्यापक विषय आहे. आपण आता थोडक्यात इंग्रजांनी पादाक्रांत केलेल्या भारतात येऊ या.
काही समाजशास्त्रज्ञांच्या मते इंग्रजांच्या आगमनामुळे येथील वर्ण/जातिव्यवस्था कमकुवत झाली. पण वास्तव यापेक्षा काहीसे वेगळे आहे. १७७६ साली प्रकाशित झालेल्या ‘अ कोड ऑफ जेंटू’ या ग्रंथाच्या प्रास्ताविकात म्हटले आहे, “भारतात व्यापार उदीम आणि बंगाल प्रांतात स्थानिक सत्तास्थापनेचे लाभ तेव्हाच कायम राहतील, जेव्हा विजेत्यांच्या कायद्याआड न येणाऱ्या ह्या देशातील मौलिक व्यवस्थेचा स्वीकार केला जाईल.”
आधुनिक भारतविद्ये (Indology)चे जन्मदाते सर विलियम जोन्स १७९४मध्ये प्रकाशित ‘मनुस्मृती’च्या अनुवादाच्या प्रास्ताविकात म्हणतात, “जर ह्या धोरणाचे अनुसरण केले तर कोट्यवधी हिंदू प्रजेचे ‘सुनिर्दिष्ट श्रम’ ब्रिटनच्या श्रीवृद्धीत साह्यभूत ठरतील.” यावरून हे स्पष्ट होते की, इंग्रजांनी वर्णव्यवस्थेला धक्का देण्यासाठी किंवा तिला अनुचित ठरविण्यासाठी कोणताही ठोस प्रयत्न केला नाही. तसे न करणे हा त्यांच्या धोरणाचा भाग होता.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
दुसरी बाब आहे स्त्रियांची. नव्या किंवा जुन्या कोणत्याही व्यवस्थेचे गोडवे गाऊनही एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की, भारतात स्त्रियांची स्थिती नेहमीच दुय्यम दर्ज्याचीच होती. अगदी ‘वाल्मिक रामायणा’पासून हीच स्थिती आहे. लोहियांचे दोन मौलिक निबंध – ‘हिंदू बनाम हिंदू’ (हिंदू विरुद्ध हिंदू) आणि ‘जाती और योनी के दो कटघरे’ (जात आणि योनीचे दोन सापळे), हिंदू समाजातील स्त्रियांची दारुण स्थिती सत्यापित करतात. ही बाब अधिक स्पष्टतेने उलगडून पहायची असेल, तर हा लेखात आधी शूद्रांबद्दल जे लिहिले आहे, त्याचे पुनरावलोकन करावे. त्यावरून हे स्पष्ट होईल की, शूद्र पुरुष शिक्षित होऊ शकत होते, पण शूद्र स्त्रीला मात्र तो अधिकार नव्हता. एखादा अपवाद असेल, पण त्या आधारावर काही स्थापित करणे योग्य होणार नाही. स्त्रियांची स्थिती आता बदलत असली तरी आजवर ती अत्यंत दयनीय होती, यात शंका नाही.
असो, आता मूळ विषयाकडे वळू या. तर परिस्थिती थोडी बदलली आणि इ. पू. ३१७ सालापर्यंत चंद्रगुप्त मौर्याने सिकंदराच्या आक्रमणाच्या सर्व खुणा पुसून टाकल्या होत्या. त्यातही महत्त्वाचे असे की, तोपर्यंत या आक्रमणाचा तात्कालीन भारतीय समाजावर फारसा प्रभाव पडला नव्हता. चंद्रगुप्त आणि कौटिल्य या जोडगोळीच्या कूटनीतीमुळे भारतातील राज्यांची स्वायत्तता कमी-अधिक प्रमाणात नाहीशी झाली आणि लहानसहान गणतंत्रेदेखील नष्ट होत गेली. पण या सर्व प्रकारांती भारत हा एक विशाल सार्वभौम देश म्हणून घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. लहान गणराज्यांच्या स्वातंत्र्याला निर्दयतेने पायदळी तुडवल्यामुळे भारत हा एक विशाल व बलाढ्य देश म्हणून घडत गेला. सगळी राज्ये एकाच सूत्रात बांधली गेल्यामुळे कोणतेही बाह्य साम्राज्य भारताशी थेट भिडण्याचे धारिष्ट्य करेनासे झाले.
याचा मोठा पुरावा म्हणजे सेल्युकसचा पराभव. ही प्रक्रिया सुमारे ८२-८३ वर्षे, म्हणजे इ. स. पूर्वी २३७ सालापर्यंत (अशोक काळ) अव्याहतपणे चालत राहिली. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म हा आपला राजधर्म असल्याचे जाहीर केले. भारतासाठी ही एक विलक्षण अद्वितीय स्थिती होती. अशोकानंतर मात्र भारताचे पुन्हा विखंडन सुरू झाले. हे राजकीय-वैचारिक दुभंगणे आणि भौगोलिक पुनर्निर्धारण होते. एकीकडे अनेक विचारप्रवाह भारताला एकत्रपणे बांधून ठेवण्यासाठी धडपडत होते, तर दुसरीकडे त्याला विभाजित करणाऱ्या शक्ती सक्रिय होत होत्या. हा काळ अशा प्रकारे संमिश्र मतप्रवाहांचा काळ होता.
या आधारे आपण म्हणू शकतो की, भारताचा मूळ विचार हा या भूखंडातील विविधतेचा सन्मान करणारा विचार आहे. भारत मनाने नेहमीच सर्वसमावेशक राहिला आहे. सिकंदराच्या आक्रमणानंतर येथे तमाम विदेशी शक्ती - शक, कुशाण, हुण व मुस्लीम आले. मुस्लिमांची आणखी एक बिरादरी मोगलही - येथे आली. इतके सारे होऊनही येथील विविधता कायम राहिली; नव्हे, त्यामुळे देशात सर्वसमावेशकतेची क्षमता विकसित होत गेली.
त्यामुळे भारत हा देश युद्ध किंवा लढयांमध्ये पराजित का होत गेला, हा प्रश्नच येथे अप्रस्तुत ठरतो. शेवटी हेच वास्तव उरते की, या देशावर राज्य करण्याच्या हेतूने जे जे आले ते ते शेवटी येथलेच झाले; ते स्वतःच्या विशेषता आणि विशिष्टता यांसह ‘भारतीय’ झाले. ते भारताच्या विचारप्रवाहाशी समरस होत एकरूप झाले, भारतात सामावले गेले. यात अपवाद फक्त महमूद गजनी आणि नादिरशाह यांचा आहे. परंतु, ते या देशावर राज्य करण्यासाठी आले नव्हते, फक्त येथील लूट करण्यासाठी आले होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
म्हणजेच येथील विचारप्रवाहाला समजून घेण्याआधी येथील विविधतेला समजून घ्यावे लागेल. ही विविधता नाक-डोळ्यांची ठेवण, हवामान, भाषा-बोली, परिधान, आहार-विहार रितीभाती, भौगोलिक वैविध्य, कृषिकार्य, अशा तमाम साऱ्या परिस्थिती-मनःस्थितीजन्य बाबतीत आहे. यांपैकी कोणत्याही एकाच पैलूबद्दल आपण आपली रुची-अरुची दाखवू शकत नाही. त्याचा स्वीकार समग्रतेनेच करावा लागतो. कोणत्याही एका भूभागावरून सर्व भारताबद्दल सांगणे शक्य नाही.
स्वातंत्र्यानंतर भारताचा एक राजकीय नकाशा जरूर निर्माण झाला. फाळणीबद्दल आजही बरेच लोक प्रतिक्रिया व्यक्त करतात. तो एक अतिशय दुःखद प्रसंग होता हे खरे, पण तो आम्हाला असेही सांगतो की, विविधतेचा आदर करणारा समुदाय येथे मोठ्या प्रमाणावर आहे. विविधतेवर विश्वास नसणारा प्रवाह वेगळा झाल्यावरही येथील नेतृत्वाने आपल्या विविधतेची विशिष्टता कायम राखली. त्यामुळेच आजही भारत हा विचार ठाम आहे, त्यामुळेच भारताविषयी जगभर आकर्षण आहे. कारण इतकी विविधता जगात कोठेही नाही.
पाकिस्तानने शिकवलेला धडा
पाकिस्तानचे उदाहरण काहींना अप्रस्तुत वाटू शकते. पण खरे तर भारताच्या आजच्या परिस्थितीत तेच आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल. विविधता नाकारून एकारलेपणाकडे वाटचाल केली, तर देशाचे काय होते - आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, बौद्धिक - साऱ्या क्षेत्रांत कशी अधोगती होते, याचे पाकिस्तान हे जिवंत उदाहरण आहे.
‘लोकशाहीत अल्पसंख्याकांचे एवढे कौतुक कशाला?’ हा प्रश्न भारत व पाकिस्तानमधील धार्मिक अस्मितावादी नेहमी विचारत असतात. त्याचे उत्तर लुई फिशरशी झालेल्या गांधीजींच्या वार्तालापात सापडते. ते म्हणाले होते, “सभ्यतेविषयीचा निर्णय ह्यावर ठरतो की, तिची अल्पसंख्याकांशी वागणूक कशी आहे.” त्याच काळात ते असेही म्हणाले होते, “मी सामाजिक क्रांतीवादी आहे. असमानतेतून हिंसेची आणि समानतेतून अहिंसेची उत्पत्ति होते.”
पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही आपण त्याला आपल्यापासून मनाने वेगळे करू शकलो नाही. ‘हडप्पा संस्कृती’ला आम्ही आपलेच मानले. कारण एखादा प्रदेश वेगळा झाल्याने त्याची विविधता संपू शकत नाही. आपण विविधतेचे सूत्र स्वीकारून या सत्याला सामोरे गेलो. त्यामुळे आपण लोकशाही टिकवली, सर्वांगीण प्रगतीही केली. मात्र पाकिस्तानने स्वतःला एक धर्म-एक भाषा सूत्रात बांधून एकजिनसी स्वरूप देण्याचा जो प्रयत्न केला, त्यातून बांगला देशची निर्मिती झाली. हा जगातील भाषेच्या आधारावर निर्माण झालेला एकमेव देश आहे. एवढा मोठा आघात सोसूनही पाकिस्तान विविधता स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नाही. तो आताही आपल्या बहुसंख्याक सुन्नीप्रभुत्वाच्या गुर्मीत वाटचाल करत आहे. तेथील धार्मिक अल्पसंख्य, तसेच पंजाबव्यतिरिक्तचे अन्य प्रांत त्याचा त्रास भोगत असतात आणि त्यामुळे तेथे फुटीरतावाद वारंवार डोके वर काढत असतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी, १४ ऑगस्ट १९५५ला प्रख्यात उर्दू शायर फैझ अहमद फैझने लिहिलेली ही ग़ज़ल उर्दू साहित्यातील सर्वोत्तम कलाकृतीतील एक मानली जाते --
‘शहर में चाक-गरेबाँ हुए नापैद अब के
कोई करता ही नहीं जब्त की ताकीद अब के
लुत्फ़- कर ऐ निगह-ए-यार कि ग़म वालों ने
हसरत-ए-दिल की उठाई नहीं तम्हीद अब के
चाँद देखा तिरी आँखों में न होंटों पे शफ़क़
मिलती-जुलती है शब-ए-ग़म से तिरी दीद अब के
दिल दुखा है न वो पहला सा न जाँ तड़पी हैं
हम ही ग़ाफ़िल थे कि आई ही नहीं ईद अब के
फिर से बुझ जाएँगी शमाएँ जो हवा तेज़ चली
ला के रक्खो सर-ए-महफ़िल कोई ख़ुर्शीद अब के’
या श्रेष्ठ काव्याचा भावानुवाद करणेही कठीण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर अवघ्या सात वर्षांत तेथील परिस्थिती किती भयावह झाली, याचे त्यात अतिशय मार्मिक व कलात्मक वर्णन केले आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे आता पैदाच होत नाहीत. जुलमी सत्तेला त्यामुळे धमक्या देण्याचीही गरज भासत नाही. डोळ्यांतील चंद्र, ओठातील प्रभा लोपली आहे. ‘ती’चे दर्शनही विरहाव्याकूळ रात्रीसारखे दुःखदायक झाले आहे. हृदयातील तडप नष्ट झाल्यामुळे यंदा ईदही आलीच नाही. यंदा पुन्हा वादळ आले की, या दीपशिखा विझून जाणार आहेत. आता मैफिलीच्या उशाला सूर्य आणून ठेवल्याशिवाय प्रत्यवाय नाही, असा इशारा शायर या काव्यातून देतो. त्याने दिलेल्या इशाऱ्याचा उपयोग झाला नाही, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.
आज भारतही आपल्या मूळ विचारापासून फारकत घेऊन पाकिस्तानचे अनुकरण करू पाहत आहे. बहुसंख्याकवादी लोक एककल्ली अरेरावीने आपले विचार सर्वांवर लादू पाहत आहेत. इतिहासाची साक्ष आहे की, भारत उपखंडात असे प्रयत्न जेव्हा झाले, तेव्हा ‘भारत’ हा विचार संकटात सापडला. इंग्रजांच्या आधिपत्यापूर्वीही असे प्रयत्न करण्यात आले होते. आजकाल या संदर्भात मोगल बादशाह औरंगजेबाचे नाव वारंवार घेण्यात येते. त्याच वेळी त्याचा वारस असणाऱ्या बहादुरशहा जफरच्या बलिदानाबद्दल मात्र हेतुतः काही बोलले जात नाही. येथे आपण हीही बाब ध्यानात घेतली पाहिजे की, भारत हा हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख या जगातील चार महत्त्वाच्या धर्मांचा प्रवर्तक आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
...............................................................................................................................................................
याशिवाय पारशी, यहुदी, मुसलमान व ख्रिस्ती अनुयायी येथे कित्येक शतकांपासून राहत आले आहेत. ‘भारत’ या विचाराला आतापर्यंत यापैकी कोणापासूनही कधी ‘खतरा’ निर्माण झाला नाही. त्याचे कारण भारताचा आपल्या विविधतेवर असलेला गाढ विश्वास! हा देश कधी धर्मापासून होणारी बाधा किंवा संकुचित दृष्टीकोनाच्या भानगडीत पडला नाही. येथील संस्कृतीने फार पूर्वीच धर्मांची कुंपणे ओलांडली आहेत.
आज भारताला या विचारापासून दूर नेण्याचे संघटित व जाणीवपूर्वक प्रयत्न होत असले, तरी तसे करणे सोपे नाही. गेल्या २३०० वर्षांच्या आपल्या इतिहासात अशा अनिश्चितता व वैचारिक संघर्षांनी भरलेल्या अनेक कालखंडांचा समावेश आहे. पण आजवर या संघर्षात विविधतेवर आधारित ‘भारत’ या विचाराचाच विजय झाला आहे. येथे गुरु गोविंदसिंह यांनी लिहिलेल्या ‘जफरनामा’ या पुस्तकातील मार्मिक ओळींची आठवण येते. हे पुस्तक म्हणजे गुरु गोविंदसिंहांनी औरंगजेबाला, म्हणजे ‘भारत’ या विचाराने प्रेरित झालेल्या लढवय्या संताने एका परधर्मद्वेष्ट्या जुलमी बादशहाला पाठवलेले इशारेवजा पत्र आहे. त्यात ते म्हणतात -
‘जेव्हा कोण्या एकट्या माणसाविरुद्ध
हजारोंच्या संख्येने लोक उतरतात
तेव्हा सृष्टीचा रचयिता त्याचे रक्षण करतो
त्याला आपल्या स्वतःच्या हातांनी वाचवतो’
ईश्वराची संकल्पना हीदेखील अखेरीस एक विचारसरणीच आहे. एका विशिष्ट स्थितीला पोहचल्यावर वेगवेगळे विचार परस्परांची मदत करतात, आणि अखेरीस त्यांतील जे सर्वश्रेष्ठ ठरतात, तेच विचार शिल्लक राहतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘भारत’ हा विचारही अनेक शतके स्वतःला इतर द्वेषपूर्ण विचारांपासून वाचवत राहिला आहे. हा विविध फुलांचा गुच्छ अजूनही ताजातवाना राहिला आहे. गांधीजींबद्दल असे म्हटले जाते की, त्यांची साधना ‘अकर्मात् कर्म’ या दिशेने चालली होती. म्हणजे जीवनात एक अशी स्थिती येते, जेव्हा माणसाला आपल्या विचारांची जाहिरात किंवा प्रचार-प्रसार करावा लागत नाही, उलट त्याचे विचारच स्वतःहून कार्य करू लागतात. भारताच्या विचाराबद्दलही हे खरे आहे, कारण त्याने आधीच बहुसंख्य भारतीयांच्या मनात ठाण मांडले आहे. गांधींना प्रिय असणाऱ्या कवी ब्राउनिंगच्या ओळींनी या लेखनाचा समारोप करणे उचित ठरेल. तो म्हणतो-
‘अश्रूंना पुसण्यासाठी
पडलात तरी हसतच रहा
पुन्हा धडपडत उभे व्हा
आणि पुन्हा आरंभ करा.’
‘सर्वंकष’ या त्रैमासिकाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर २०२२च्या अंकातून साभार.
.................................................................................................................................................................
लेखक चिन्मय मिश्र हे ख्यातनाम हिंदी पत्रकार, संशोधक-लेखक आणि कार्यकर्ता-विचारक आहेत.
chinmay.saroj@gmail.com
अनुवाद – रवींद्र देवघरे
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ravi Go
Fri , 19 May 2023
विचार करायला लावणारा लेख (आत्मपरीक्षण झाले तर फारच उत्तम!). फैझ अहमद फैझ यांच्या कवितेप्रमाणेच 'जिन्हें नाझ (माज!) हैं 'हिंद'पर वो कहाँ हैं?' या साहिर लुधियानवी यांच्या सिनेगझलची आठवण झाली.
Girish Khare
Sat , 22 April 2023
का हो असले काही ऑटोमॅटिक होते की कुंथावे लागते?