२३ मार्च १९३१ आणि १९ एप्रिल १९१० या तारखांमध्ये एक विलक्षण साम्य आहे. या दोन्ही दिवशी इंग्रजांनी तीन-तीन क्रांतिकारकांना फासावर चढवले. दोन्ही त्रिमूर्तींनी एकेका इंग्रजाची हत्या केली. परंतु भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांची फाशी देशभर ‘शहीद दिन’ म्हणून पाळली जाते, मात्र कृष्णाजी कर्वे-अनंत कान्हेरे-विनायक देशपांडे यांची फाशी विस्मरणात गेली आहे. नाशिकचे हे तिघे ठाण्याच्या तुरुंगात फासावर गेले. त्यांच्यावर नाशिकचा जिल्हाधिकारी आर्थर मेसन टिपेट्स जॅक्सन याला गोळ्या झाडून मारल्याचा गुन्हा होता.
२१ डिसेंबर १९०९ रोजी ‘शारदा’ नावाचे नाटक पाहायला आलेल्या जॅक्सनला ‘विजयानंद’ नामक नाट्यगृहात समोरून गोळ्या झाडून ठार करणारा एकच क्रांतिकारक होता, तो म्हणजे अनंत कान्हेरे. तो हा खून करून स्वत:लाही संपवणार होता. कारण मग या खुनाच्या कटात आणखी कोण कोण सामील होते, याचे रहस्य त्याच्यासोबतच जाणार होते, पण तो पकडला गेला. आणि हळूहळू इंग्रज पोलिसांनी या कटाचा छडा लावला. महत्त्वाचे म्हणजे जॅक्सनचा खूनच बॅरिस्टर सावरकर यांना पकडून भारतात आणणारा ठरला. खुदिराम बोस व मदनलाल धिंग्रा यांच्यानंतर कान्हेरे-कर्वे-देशपांडे या क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान केले. तिघेही मराठी तरुण. सावरकर बंधूंचे अनुयायी. सशस्त्र क्रांतिशिवाय भारत स्वतंत्र होऊ शकणार नाही, या ठाम विचाराचे.
जॅक्सनचा खून आणि त्यामुळे झालेली शिक्षा सावरकरांना भारताचा एक ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून ओळखू लागली. कारण परदेशातून भारतात आणतेवेळी त्यांनी जहाजातून मारलेली उडी, त्यांचा शिक्षेविरुद्धचा युक्तीवाद, त्यांच्यावर झालेले कटाचे आरोप, यांचा भारतभर परिचय झाला. तरीही त्यांच्या तीन अनुयायांची साधी आठवण का ठेवली जात नाही? त्या तिघांची फाशी महाराष्ट्र ‘हुतात्मा स्मृतिदिन’ म्हणून पाळत का नाही? एरवी ‘सावरकर सावरकर’ म्हणून टाहो फोडणारे हिंदुत्ववादी कर्वे-कान्हेरे-देशपांडे यांचे स्मरण तितक्याच जोशाने का करत नाहीत? ‘माफीवीर’ म्हणून हिणवणाऱ्यांना या तिघांच्या बलिदानाची आठवण का करून दिली जात नाही?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
किंबहुना हिंदुत्ववाद्यांची सरकारे केंद्रात व राज्यात असते वेळी तरी याचा तुकडा पाडायचा, पण नाही. शिवसेना मागणी करते की, सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या, तेव्हा तिच्याकडे कानाडोळा केला जातो. तद्वत या तीन नाशिककरांना सावरकरांच्या स्मृतीसोबतच कर्वे-कान्हेरे-देशपांडे यांचीही ‘याद’ राहावी, अशी व्यवस्था करायला हवी होती. तेही घडलेले नाही. कान्हेरेंच्या नावाने नाशकात काय उद्यान आहे की, व्याख्यानमाला, धड काही कळत नाही. ग्रंथालय वा वाचनालय एवढीच स्मृती एका क्रांतिकारकाची असावी?
नाही म्हणायला आम्ही छत्रपती संभाजीनगरकर त्यातल्या त्यात जागरूक. आमच्या गावात सिटी चौकातच अनंत कान्हेरे यांचा अर्धपुतळा अनेक वर्षांपासून उभा आहे. कान्हेरे औरंगाबादेत शिकायला आला होता. नाशकातच त्याचा सावरकरवाद्यांशी संबंध आलेला होता. त्याने जॅक्सनचा खून केला, त्या वेळी त्याचे वय १७ होते. १८५७च्या बंडानंतर १९०९ साली मराठवाड्याचा असा स्वातंत्र्यचळवळीशी संबंध आला.
चापेकर बंधूंनी केलेल्या रँडच्या खुनानंतर इंग्रज इतके सावध झाले की, त्यांनी पिस्तुले, बंदुका, दारूगोळा, रसायने व त्याचे कारखाने आदी गोष्टींवर कठोर नियंत्रणे आणली. क्रांतिकारकांची धारणा अशी होती की, एकेका इंग्रज अधिकाऱ्याला टिपत जायचे आणि देशभर अराजक उत्पन्न करायचे. अधिकारी मारला की, त्याच्या खालचे कर्मचारी आपोआपच घाबरतील. मग दहशत पसरेल, त्यामुळे इंग्रज पळून जातील. क्रांतिकारक अशा परिस्थितीत फार धाडसाने आणि गुप्ततेने आपले कार्य करत. कित्येकदा चुकत. भलतेच लोक ठार करत. तरीही क्रांतिकारक अखेरपर्यंत मूठभरच राहत. त्यांची एकी तुटे आणि ते पोलिसांच्या स्वाधीन होत.
‘अभिनव भारत’ या सावरकरांच्या संघटनेत थोडेफार असेच झाले. डॉ. विष्णू महादेव भट यांनी या संघटनेत काम केले होते. त्या अनुभवावर त्यांनी १९५० साली ‘अभिनव भारत अथवा सावरकरांची क्रांतिकारक गुप्त संस्था’ (ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई, पृष्ठे - २२४, मूल्य - चार रुपये.) असे पुस्तक लिहिले. त्यातले ‘ज्याक्सन वध’ या शीर्षकाचे नववे प्रकरण सुमारे २० पृष्ठांचे आहे. डॉ. भट यांचा निष्कर्ष असा की, जॅक्सनचा खून योजनाबद्ध रितीनं करता आला असता, पण तसा तो झाला नाही. कान्हेरेने घाई केली. त्याने खुनाचा बेत अचानक आखला आणि पूर्ण तयारीअभावी एकेक करून सारे कटवाले पोलिसांना सापडले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
भट त्यांच्या पुस्तकात सांगतात की, “ ‘अभिनव भारत’च्या मुख्य शाखेपासून कृष्णाजी गोपाळ कर्वे हे मतभेदामुळे फुटून निघाल्यावर त्यांनी आपली एक स्वतंत्र गुप्त संस्था काढली. प्रथमत: ते ‘मित्र समाज’ या संस्थेचे सभासद होते. हा ‘मित्र समाज’ही तात्कालीन हायस्कुलातील २०० विद्यार्थ्यांची ‘अभिनव भारत’ची एक शाखा होती. राज्यक्रांतीचे काम गुप्तपणे झाले पाहिजे… आणि अशा गुप्त कार्याशी सार्वजनिक प्रसिद्ध झालेल्या लोकांचा कोणत्याही प्रकारे काहीही संबंध ठेवावयाचा नाही, ही त्यांच्या गुप्त संघटनेची पहिली अट होती. कर्व्यांच्या या संस्थेत रा. विनायक नारायण देशपांडे, वामन नारायण जोशी, शंकर रामचंद्र सोमण हे प्रारंभी सभासद होते. त्यानंतर आमच्या ‘अभिनव भारत’पैकी दामोदर महादेव चंद्रात्रे, गायधनी व विष्णू गणेश केळकरशास्त्री हेही त्यात ओढले. शंकरराव सोमणांनी गोपाळराव धारपांना त्या संस्थेच्या दुसऱ्या गटात शपथबद्ध करून घेतले आणि धारपांनी नंतर गणू वैद्य, पुरुषोत्तम लक्ष्मण दांडेकर, सदाशिव श्रीधर दांडेकर, रामचंद्र आबाजी काथे, रघुनाथ चिंतामण अंबडेकर, विनायक वासुदेव मनोहर, बा.ज. मराठे. ना.कृ. जोशी यांची एक गुप्त संस्था स्थापन केली. सर्वांचे उद्देश ‘अभिनव भारत’प्रमाणेच होते, पण या धारप गटापैकी गणू वैद्य हा कर्वे गटात फार खोल शिरला आणि शस्त्रास्त्रे, पैसे वगैरेचा पुढे कोठीवालाही झाला. कर्व्यांच्या या गटांनी आमच्याकडून व इतरांकडून पिस्तुले जमवली होती व नेमबाजीचे शिक्षण ते घेत… या गुप्त संस्थांतून साप्ताहिक बैठकी किंवा वादविवाद, विवेचन, पठण, अभ्यास वगैरे काही होत नसे. त्यामुळे अडीअडचणीतून कसे पार पडावे, इतर देशांचे क्रांतिकारक त्या प्रसंगी कसे वागत, या ज्ञानाच्या, बुद्धीच्या संस्कारात ही मंडळी अगदी कोरी करकरीत व नवखी होती आणि ही या गटांनी मनाच्या बुद्धीच्या तयारीची, ज्ञानाची केलेली हेळसांड हीच त्यांना व त्यांच्यामुळे शेकडो लोकांना फार भोवली.” (पृष्ठ १३२-३३)
या कथनाचे सार असे निघते की, ज्यांनी जॅक्सनचा खून केला, ते जरी सावरकर बंधूंचे अनुयायी होते, तरी त्यांची जडणघडण अयोग्य झाली होती. नाहक साहस करण्याच्या नादात त्यांनी स्वत:सकट आपल्या नेत्यांनाही ओढले. म्हणूनच इंग्रजांनी हा खून-खटला इतक्या तातडीने चालवला की, अवघ्या चार महिन्यांत कर्वे-कान्हेरे-देशपांडे या तिघांना फासावर चढवले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मतभेदांचे मुद्दे काय होते, याचीही एक झलक आपल्याला मिळते. कर्व्यांचा गट अती गुप्ततावादी होता. म्हणून त्याने तोवर सुप्रसिद्ध झालेल्या सावरकर बंधूंच्या वर्तनामुळे आपले नाते ‘अभिनव भारत’पासून तोडले व स्वतंत्र गट उभारला, असे म्हणता येते. म्हणजेच जॅक्सन वध करणारे तसे सावरकरनिष्ठ नव्हते आणि त्यांचे गट स्वतंत्र झाल्याने त्यांचे कृत्य निष्कारण मूळच्या क्रांतिकारक गटावर उलटले, असा डॉ. भट यांचा रोख दिसतो.
आणखी या स्वतंत्र गटाचे कार्य म्हणजे होते काय? जे होते, त्यात प्रत्यक्ष सावरकर यांच्यावरच बेतलेले होते. डॉ. भट लिहितात, “कृ.गो. उर्फे बाबूराव खरे हे आमच्या बरोबरच फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते… फर्ग्युसनमध्ये ते कै. हरिभाऊ भागवत व नगरचे वेदमणी यांचा एक निराळाच गट होता. ते गंभीर, अबोल व किंचित उग्र दिसत. आणि एखाद्या तपस्व्याप्रमाणे एकांतप्रिय असत. आमच्या पुण्याच्या शाखेत ते नसले, तरी त्यांचे गुप्त राज्यक्रांतीचे यत्न चालूच होते. सावरकरांच्या प्रकट-गुप्त अशा विरोधी कार्यपद्धतीबद्दल अण्णा कर्व्यांप्रमाणे त्यांचाही आक्षेप होता. शिवाय सावरकर नुसते व्याख्यानबाजी करतात, प्रत्यक्ष कार्य काही करीत नाहीत, हाही त्यांच्या विरोधाचा एक मुद्दा होता.” (उक्त, पृष्ठ ७२)
राजकीय कार्य भरपूर असलेल्या सावरकरांच्या नावावर राजकीय कृती कोणती, असा प्रश्न वरील ओळी वाचल्यावर पडतो. फर्ग्युसनमध्ये शिकतेवळी १९०५ साली लोकमान्यांच्या उपस्थितीत परदेशी कपड्यांची होळी, या ठळक कृतीव्यतिरिक्त बॅ. सावरकर किती राजकीय कृत्यांचे धनी आहेत, ते समजत नाही. सत्याग्रह, मोर्चे, धरणे, बंद, निदर्शने, हरताळ, अशा किती राजकीय कृती त्यांनी केल्या व त्यात भाग घेतला, याची नोंद सावरकरवाद्यांनी केली आहे का, कल्पना नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
एक निष्ठावान सावरकरवादी श्री. पु. गोखले यांनी त्यांच्या ‘सावरकरांशी सुखसंवाद’ (मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई, १९८३) या पुस्तकात ‘सत्याग्रह की नि:शस्त्र प्रतिकार’ या प्रकरणात बॅरिस्टर कसे सशस्त्र क्रांतीवरच भरवसा ठेवणारे आहेत, ते त्यांच्याच तोंडून व्यक्त करवून सांगितले आहे. “हा गोव्यातील सत्याग्रह मला मुळीच मान्य नाही”, “तुमच्या या सत्याग्रहाने काही होणार नाही”, “त्यामुळे असल्या सत्याग्रहाचे यशही शत्रूच्या हातात”, “सत्याग्रह केव्हा होतो? त्या सत्याच्या प्राप्तीनंतर का? मुळीच नाही” अशी सत्याग्रह या संकल्पनेची टर सावरकर उडवताना दिसतात.
निजामाविरुद्ध हिंदू महासभेने जी चळवळ केली, ती सत्याग्रही पद्धतीनेच केली, मात्र तिचे नाव ‘नि:शस्त्र प्रतिकार’ ठेवून केली, अशी एक सारवसारव सावरकर अखेरीस गोखल्यांच्या प्रश्नानंतर करतात. महत्त्वाचे म्हणजे हैदराबाद (‘भागानगर’ असे हिंदुत्ववाद्यांचे नाव) संस्थानात या राजकीय कार्यासाठी सेनापती बापट येऊन गेले. सावरकरांनी फक्त घोषणा केली. पुढे हिंदू महासभाही माघारली आणि हैदराबादचा मुक्ती लढा काँग्रेस, कम्युनिस्ट यांनी यशस्वी केला. सत्याग्रह व अहिंसक प्रतिकार यांना निजाम जुमानेना, हे पाहिल्यावर त्यांनी सशस्त्र व हिंसक लढा उभा केला. त्याची अखेर लष्करी कारवाईने भारत सरकारने केली.
‘जॅक्सन-वधाचे परिणाम’ असे शीर्षक असलेले सहावे प्रकरण दुसरे सावरकरनिष्ठ ज.द. जोगळेकर यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर - वादळी जीवन’ या पुस्तकात (उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २०२१) आहे. त्यात त्यांनी जॅक्सन खून खटल्यात सावरकरांना एकट्याला स्वतंत्रपणे गोवण्यात आले होते, असे सांगितले आहे. कर्वे-कान्हेरे-देशपांडे यांना फाशी देण्यात आल्यावर सावरकरांनी पॅरिसमधून निघणाऱ्या ‘तलवार’ या वृत्तपत्रात ‘नाशिकचे हुतात्मे’ असा लेख लिहिला होता, याचा उल्लेख जोगळेकर करतात. (पृ.९३)
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
जॅक्सनच्या खुनाचा खटला मुंबई उच्च न्यायालयात चालला. त्याविषयी जोगळेकर लिहितात, “सावरकरांवर आरोप ठेवल्यावर त्यांनी आपले म्हणणे मांडावे असे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा आपण फ्रेंच राष्ट्राच्या अधिकाराखाली असल्याने या खटल्यातही भाग घेऊ इच्छित नाही, असे सावरकरांनी न्यायालयाला सांगितले… जॅक्सनच्या खुनाशी माझा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कसलाच संबंध नाही, असे मी अजूनही म्हणतो… माझा पाटणकरांशी संबंध जोडणारा किंवा पाटणकर नि कर्वे यांच्यामधील संबंध दाखविणारा कोणताचा पुरावा कोर्टापुढे आलेला नाही. मी खुनाला प्रोत्साहन दिले, असे म्हणण्याला उपयुक्त पुरावा म्हणजे चंजेरी रामरावजवळ सापडलेले ‘वंदे मातरम’ चोपडे. पण या पुराव्याचाही संबंध जॅक्सनच्या खुनाशी जोडता येणार नाही, कारण ते चोपडे जॅक्सनच्या खुनानंतर धाडले गेले, असे साक्षी-पुराव्यात निष्पन्न झाले आहे. दिनांक ३० जानेवारी १९११ या दिवशी न्यायालयाने निर्णय दिला की, आरोपीने जॅक्सनच्या खुनाला साहाय्य केले, हा आरोप सिद्ध झाला असल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात येत आहे.” (उक्त, पृष्ठ १०१)
या खटल्यात गणू वैद्य या कार्यकर्त्याची साक्ष माफीचा साक्षीदार म्हणून महत्त्वाची ठरली. त्याने नाशिकच्या सर्व क्रांतिकारक गटांची माहिती तर दिलीच; खेरीज शस्त्रे, पैसे कसे जमवले, तेही सांगून टाकले. गणू वैद्यला जन्मठेपेची शिक्षा मिळाली.
असे दिसते की, कर्वे-कान्हेरे-देशपांडे यांना एकाच वेळी दिलेली फाशी सावरकरांच्या या खटल्यामुळे मागे पडली, विस्मरणात गेली आणि जणू या तिन्ही क्रांतिकारकांचे बलिदान व्यर्थ गेले. कार्यकर्त्यांच्या जिवापेक्षा नेत्याचा जीव आणि त्याचे भविष्य महत्त्वाचे ठरले. या तीन क्रांतिकारकांच्या मृत्युचा दिवस ‘क्रांति दिन’ अथवा ‘बलिदान दिन’ म्हणून पाळला जावा, अशी सूचना सावरकर बंधू असोत वा अन्य नेते, कोणीच केलेली आढळत नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
या प्रकरणाला दुसरी एक बाजू आहे. डॉ. भट त्यांच्या पुस्तकात जॅक्सनची गुणवैशिष्ट्ये सांगतात. त्यानुसार तो एक संस्कृततज्ज्ञ, विद्वान, स्वभावाने नरम व लोकप्रिय इंग्रज अधिकारी होता. कर्वे गटाने तरीही त्याला मारायचे ठरवले, कारण त्याने बाबा सावरकरांना पकडून त्यांच्यावर खटला भरला होता. तसेच सभाबंदीचे हुकूम राबवले आणि बाबासाहेब खरे यांचा मोकासा जप्त करणे आदी कृत्ये केली होती.
भट लिहितात, “या बाबतीत नंतर अनंताचा व त्यांचा (म्हणजे कर्वे यांचा - लेखक) मतभेद झाला, असे अनंताच्या उदगारावरून म्हणावे लागते”. “एका चांगल्या माणसास मारले याबद्दल मला वाईट वाटते”, “ज्याक्सनसाहेबास मारले याबद्दल मला पश्चात्ताप वाटतो”, असे खुद्द अनंतानेच आपल्या शेवटच्या १-२-१०च्या जबाबात म्हटले आहे. “पण कर्व्यांची विद्वता व न्यायबुद्धी यावर त्याचा पूर्ण भरवसा होता व म्हणून तो ज्याक्सनला मारण्यास कबूल झाला… आम्हा अभिनव भारताच्या सदस्यांना किंवा कर्व्यांशी संलग्न असलेल्या मुंबई-पुण्याच्या सभासदांना हे माहीतही नव्हते.” (भट, पृष्ठ १३७)
यावरून तर्क असा काढता येतो की, सावरकरांहून खूप वेगळी भूमिका घेऊन खुनासारखी कृती करणारा एक गटच फाशीमुळे नाहीसा होणे, ही घटना मूळच्या ‘अभिनव भारत’च्या सदस्यांच्या फायद्याची ठरली. त्यांनी हे उघड उघड सावरकर यांच्या आदेशांविरुद्ध केलेले बंड होते, असे मानले आणि कर्वे-कान्हेरे-देशपांडे यांची उपेक्षा केली.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
भटांकडून जॅक्सन यांची बरीच पाठराखणही झालेली आहे या पुस्तकात. त्यामुळे जॅक्सन चांगला की वाईट, दुष्ट की सज्जन, या वादात न पडता तो एका साम्राज्यशाहीचा व भारताला गुलाम करणाऱ्यांचा अधिकारी असल्याने त्याची हत्या करणे उचित आहे, असा ठाम समज कर्वे गटाचा झाला असल्यास ते चूक नाही.
पुढे भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्याकडून जेम्स स्कॉटऐवजी जॉन साँडर्स मारला गेला, तरीही त्यांना फाशी झाली आणि त्यांचे हे कृत्य स्वातंत्र्य चळवळीचा एक हिस्साच मानले गेले. तेव्हा कोणी साँडर्स किती भला माणूस होता वगैरे गळा काढला नव्हता. त्याचबरोबर माणसे ठार करून आपले उद्दिष्ट साधणे याबाबतही भगतसिंग बदलला होता. मग कर्वे-कान्हेरे-देशपांडे यांची स्मृती ‘शहीद दिना’ने पाळण्यात अडचण कसली आली? कोणाला ती तशी वाटत होती का? कोण होते ते?
आता या चुकीचे परिमार्जन करून ‘१९ एप्रिल’ हा महाराष्ट्राचा ‘हुतात्मा स्मरण दिन’ नाही का, ठरवता येणार?
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment