आम्ही छोटे-मोठे लेख वगैरे लिहीत असलो, तरी आम्ही ‘इंटलेक्च्युअल’ वगैरे काही नाही आहोत. या ‘इंटलेक्चुअल’ लोकांना लोकशाही वगैरे संकल्पना कळत असल्या त्यांना राजकरण कळत नाही, ही ‘फॅक्ट’ सर्वमान्य आहे. काही ‘इंटलेक्च्युअल’ लोकांनी आमच्यापाशी हे अत्यंत खाजगीत मान्य केले आहे. ‘आपल्याला राजकारण करता येत असले, तरी राजकीय संकल्पनांमधील ‘ओ’ की, ‘ठो’ कळत नाही’, हे काही राजकारणी लोकांनी आमच्यापाशी अत्यंत खासगीत मान्य केले आहे.
या सगळ्या ‘इंटलेक्च्युअल’ आणि ‘राजकारणी’ लोकांची नावे इथे सांगणे योग्य होणार नाही. तो आमच्या आणि त्यांच्या अत्यंत गहन अशा मैत्रीमधील मामला आहे. स्वतःला ब्रह्मांडनायक समजणारे आमचे एक राजकारणी मित्र आहेत. त्यांनीही ‘आपल्याला लोकशाही वगैरे संकल्पनांमधील काहीही कळत नाही’, हे आमच्याकडे अत्यंत खाजगीमध्ये मान्य केले आहे. लोकशाही म्हणजे लोक मते देऊन सरकार निवडतात वगैरे बेसिक गोष्टी त्यांना माहीत आहेत, पण लोकशाही ही एक ‘सुसंस्कृत जीवनदृष्टी’ कशी आहे, याविषयी त्यांना काहीही माहीत नाही.
आमच्या या राजकारणी मित्राबद्दल आम्ही कसलाही ‘क्लू’ देणार नाही. लोकांना यातून जो काही अर्थ काढायचा तो काढावा. कोणी काहीही अर्थ काढला आणि कोणी गालातल्या गालात हसायला लागले, तर त्यांनी तसे जरूर करावे, एवढेच आम्ही म्हणू. आम्ही कोणाकोणाच्या तोंडाला लागावे, याला मर्यादा आहेत!
काही माणसे राजकारणात खूप मोठी होतात, अगदी सर्वोच्च पदावर पोहोचतात, तरी त्यांना ‘लोकशाही’ वगैरे मूलभूत संकल्पना समजत नाहीत, अशी अनेक जीती-जागती उदाहरणे आपल्याला जगात सर्वत्र बघायला मिळतात. असो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आमच्या मते संकल्पना आणि राजकारण, या दोन्ही गोष्टींवर अतिशय मजबूत पकड असलेले शरद पवार हे एकच नेते आम्ही जवळून पाहिलेले आहेत. त्यामुळे अदानी यांना हिंडेनबर्गने ‘लक्ष्य’ केले आहे, असे साहेब म्हणाले, तेव्हा आम्हाला अजिबात आश्चर्य वाटले नाही.
साहेब याविषयी नक्की काय म्हणाले आहेत, हे आम्ही शांतपणे वाचत बसलो असताना आमच्या एका विद्वान मित्राचा फोन आला. त्यांनी साहेबांबद्दल नाराजी व्यक्त करायलाच फोन केला होता. आम्ही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
आम्ही - तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. संकल्पना आणि राजकारण यांच्यावर जबरदस्त पकड असलेले ते नेतृत्व आहे. फार विचार करून त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले असणार आहेत.
विद्वान - संकल्पना आणि तत्त्वे माहीत असली, तरी वेळ पडल्यावर पवारसाहेब राजकारणालाच महत्त्व देतात.
आम्ही - पण त्यांना संकल्पना आणि तत्त्वे अगदी मुळापासून माहीत असतात.
विद्वान (तडकून) - उपयोग काय मग त्या संकल्पना माहीत असण्याचा?
आम्ही - अहो, असे कसे म्हणता? आपल्या साहेबांनी अनेक वेळा सुंदर सुंदर तत्त्वांना आपल्या भाषणात स्थान दिले आहे. ‘टेलिप्रॉम्प्टर’ नव्हते, त्या काळापासून शक्य असेल, तेव्हा साहेब छान छान बोलतच आलेले आहेत.
समोरचे विद्वान तडकलेले होते, पण आम्ही शांत होतो. साहेबांचे आणि आमचे जमते, ते या आमच्या उपजत शांतपणामुळेच! उगीच तापातापी करून काही होत नाही, हे या विचारवंत लोकांना कळत नाही.
विद्वान - म्हणजे तुम्हाला सोयीची असेल, तेव्हाच तुम्ही तत्त्वे वापरणार का?
आम्ही - अर्थात!
त्यांना काही कळेना.
राजकारणाची बिर्याणी शिजवायची असेल, तर तत्त्वांचे पाणी बेताबतानेच टाकावे लागते, नाहीतर सगळा गिचका होतो, हे या विद्वानांना कसे कळावे?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
विद्वान - तत्त्व म्हणजे तत्त्व! महात्मा गांधींचा देश आहे हा!
आम्ही - आहेच! हा देश गांधीजींचाच देश आहे. जाहीरपणे बोलताना सगळेच मान्य करतात ते.
विद्वान – अहो, पण आतून तुम्ही काय करताय, हे महत्त्वाचे नाही का? आणि अशा लोकांना पवारांनी पाठिंबा द्यावा? मोदी सरकार पाडणे, हे प्रत्येक पुरोगामी नेत्याचे, कार्यकर्त्याचे आणि प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे, हे पवारांना कळत नाही का?
हा काय नवीन विषय या विद्वानांनी सुरू केला हे आम्हाला कळेना.
आम्ही - साहेबांनी मोदीजींना कुठे पाठिंबा दिला आहे?
विद्वान – अहो, सगळे विरोधक एकत्र येऊन अदानी यांच्या भ्रष्टाचारावर तीव्र प्रकाश झोत टाकायचा प्रयत्न करतायत आणि पवार सरळ सरळ त्यांना क्लीन चिट देतायत! काय चाललंय काय?
आम्ही शांतपणे हसलो.
विद्वान (चिडून) – अहो, हसताय काय?
आम्ही - एक लक्षात घ्या सर! साहेब नक्की काय म्हणाले आहेत, हे फार शांतपणे बघायला लागते. आपण एक एक करून बघू.
विद्वान - चला बघूच!
त्यांनी क्रीज सोडले आणि ते आमच्या अंगावर धावून आले, तेव्हाच साहेबांच्या पहिल्याच बॉलला यांचे स्टम्पिंग होणार, हे आम्ही ताडले.
विद्वान – ‘अदानी यांना लक्ष्य केले गेले आहे असे वाटते आहे’ असं पवारसाहेब म्हणाले आहेत.
आम्ही - त्यात काय चूक आहे? हिंडेनबर्गने अदानी यांना लक्ष्य केलेच आहे. त्यांना विनाकारण लक्ष्य केले आहे, असे साहेब कुठे म्हणाले आहेत?
विद्वानांना क्षणभर काय बोलावे तेच कळेना!
विद्वान – अहो, तुम्ही असं कसं बोलताय?
आम्ही अजून शांत झालो. आपले स्टम्पिंग झाले आहे, हे त्यांना कळले, पण त्यांनी क्रीज सोडले नाही. उदध्वस्त स्टम्प तसेच पडलेले असताना त्यांनी परत ‘स्टान्स’ घेतला.
विद्वान – अहो, ‘लक्ष्य केले आहे’ याचा अर्थ ‘विनाकारण लक्ष्य’ केले आहे, असाच होतो. तुम्ही ‘वेड घेऊन पेडगावला’ जाऊ नका.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आम्ही - साहेब पुढे काय म्हणाले, याचा आपण विचार करू!
विद्वान - काय म्हणाले, ते आम्हाला तरी कळू द्या!
आम्ही - ते म्हणाले, अदानी यांनी काही चुकीचे केले असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
विद्वान - एकदा म्हणायचे की, लक्ष्य केले आहे आणि पुढे म्हणायचे, चौकशी झाली पाहिजे. पण ‘हिंडेनबर्गने अदानी यांना लक्ष्य केले आहे’, एवढेच छापणार मीडियावाले! पुढचे वाक्य कोण छापतो?
आम्ही - त्याला साहेब काय करणार? चौकशी झाली पाहिजे, यावर का नाही भर दिला मीडियाने?
विद्वान - तुमचे साहेब एवढे निष्पाप नाहीत. त्यांना बरोबर कळते, आपल्या बोलण्यातले कुठले वाक्य मीडियावाले छापणार आणि कुठले छापणार नाहीत ते!
आम्ही - असं आपण गृहित धरू शकत नाही. चौकशी झाली पाहिजे, असं साहेब म्हणाले आहेत.
विद्वान – अहो, किती गोंधळ उडाला! पुरोगामी लोक निराश झाले. भक्त चेकाळले! सामान्य मतदाराला काही कळेना! का उडवताय तुम्ही इतका गोंधळ!
आम्ही - गोंधळ कोण उडवत नाही? राजकारणात काही करायचं, तर गोंधळ उडवता आला पाहिजे.
विद्वान - म्हणजे?
आम्ही - कात्रजला बैलांच्या शिंगांना पलिते बांधून पळवले गेले होते.
विद्वान - अहो मान्य, पण इथे पवार कुणाला फसवत आहेत, मोदींना की, विरोधकांना?
आम्ही - आपण कोणाला फसवायचे आहे, हे साहेब तो फसवायचा क्षण आल्याशिवाय ठरवत नाहीत. राजकारणात फसवायला लागते आणि आपण वेळ आली की, कुणाला तरी फसवायचे आहे, एवढेच त्यांनी ठरवलेले असते.
विद्वान मित्रवर्यांना काहीच कळलेले नाही, हे त्यांच्या शांततेवरून आम्हाला कळले. त्यामुळे ते म्हणाले -
विद्वान - तुम्ही काय बोलताय, हे तुम्हाला तरी कळते आहे का?
आम्ही - हे बघा, साहेबांनी आत्तापर्यंत कुणाकुणाला फसवलं आहे, हे आपण पाहू. म्हणजे मग मी काय म्हणतो आहे, हे तुम्हाला कळेल. १९७७-७८मधली गोष्ट. जनसंघ वगैरे पक्षांना घेऊन साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी काँग्रेसला फसवले. पुढे मग ते १९८५मध्ये परत काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा त्यांनी भाजपला फसवले. मग सोनिया गांधी यांचा ‘विदेशी’ असण्याचा मुद्दा त्यांनी १९९९ साली उपस्थित केला, तेव्हा त्यांनी काँग्रेसला परत एकदा फसवले. मग त्यांनी स्वतःची ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ स्थापन करून त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही फसवले. मग ते अचानक सोनिया मुद्दा सोडून काँग्रेस सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून सामील झाले, तेव्हा त्यांनी भाजपला परत एकदा फसवले. २०१४ साली काँग्रेस हरणार अशी चिन्हे दिसू लागली, तेव्हा साहेबांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचे समर्थन काढून घेतले आणि काँग्रेसला परत एकदा फसवले. मग पुढे २०१४मध्येच विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून ताण निर्माण झाला, तेव्हा साहेबांनी भाजपला समर्थन देण्याची हूल उठवली. त्यामुळे शिवसेनेची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी झाली. म्हणजे त्यांनी शिवसेनेला फसवले. पुढे मग २०१९ साली शिवसेना आणि भाजप असा मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला, तेव्हा ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ स्थापन करून भाजपला फसवले. आता २४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर ते नक्की कोणाला फसवतील, हे आताच सांगता येणार नाही.
विद्वान मित्रवर्यांनी आवंढा गिळल्याचे आम्हाला फोनमधून ऐकू आले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
विद्वान – ‘कात्रज घाटा’चे नाव बदलून ‘शरद पवार घाट’ असे करायला पाहिजे.
यावर आम्ही काहीच बोललो नाही. आम्ही ‘अन-प्रोफेशनल’ स्वरूपाचे काहीच बोलत नाही.
विद्वान - म्हणजे ‘महाविकास आघाडी’चे सरकार पाडून भाजपने साहेबांना फसवले आणि सूड घेतला, असे म्हणायचे की काय?
त्यावर आम्ही विषय बदलला.
आम्ही - साहेब पैसे खर्च करून काहीही करत नाहीत. सगळ्या चाली-प्रतिचाली आणि डाव-प्रतिडाव साहेब ‘क्लासिक’ राजकीय पद्धतीने करतात. पैसे खर्च करून साहेब काहीच करत नाहीत.
विद्वान - म्हणजे भाजपने साहेबांना पैसे खर्च करून फसवले, असे म्हणायचे आहे काय?
आम्ही - फोन करणे, प्रीती-भोजने करणे, अशा स्वरूपाचे खर्च झाले असणार, असे म्हणता येईल.
विद्वान - साहेब असे खर्च करत नाहीत?
आम्ही - नाही.
विद्वान - कसे शक्य आहे?
आम्ही - विरोधी पक्षातील लोकांना रात्री-अपरात्री भेटून जेवणे वगैरे करून खर्च करावा लागायला साहेब म्हणजे कोणी काल आलेले मुख्यमंत्री आहेत का?
विद्वान - म्हणजे ‘पन्नास खोक्यां’ची जी भाषा चालली आहे, त्याकडे तुम्हाला निर्देश करायचा आहे काय?
आम्ही - कसली ‘पन्नास खोक्यां’ची भाषा? मला काहीच माहीत नाही.
विद्वान – ‘पन्नास खोके एकदम ओके’ ही भाषा!
आम्ही - हे कसले वाक्य? अर्धे मराठी, अर्धे इंग्रजी! मी कधी ऐकलेले नाही!
विद्वान - तुम्ही पवारांचे शिष्य आहात का?
आम्ही - कुठे पवारसाहेब आणि कुठे मी!
विद्वान - तुम्ही लबाड आहात. ‘पन्नास खोके…’ कसले, हे मला माहीत आहे, असे तुम्ही म्हणालात, तर तुमच्यावर अब्रूनुकसानीची फिर्याद होऊ शकते.
आम्ही - तुम्ही काय म्हणताय ते मला अजिबात कळत नाहिये. कसले खोके? कसली अब्रू-नुकसानी?
विद्वान - तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही, टीव्ही बघत नाही?
आम्ही – वाचतो, बघतो की!
विद्वान - मग तुम्हाला ‘पन्नास खोके एकदम ओके’ माहीत नाही?
आम्ही - नाही.
विद्वान - हाऊ कुड यू मिस?
आम्ही - समहाऊ आय मिस्ड! वर्तमानपत्र वाचताना आणि टीव्ही बघताना माझ्या डोक्यात विचार असतात.
विद्वान - तुम्ही अब्रू-नुकसानीच्या दाव्याला घाबरत आहात.
आम्ही - तसं समजा. चर्चा पुढे जाण्यासाठी मान्य करतो मी ते! तुम्ही घाबरत नसाल, तर सांगा मला ‘पन्नास खोके एकदम ओके’ म्हणजे काय?
विद्वान गप्प बसले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आम्ही - आमचे पवारसाहेब कधी म्हणाले आहेत, हे वाक्य?
विद्वान - नाही.
आम्ही - जे कोर्टात ‘प्रूव्ह’ करता येत नाही, ते कशाला बोलायचे?
विद्वान - म्हणजे अदानी यांच्या विरुद्ध काही ‘प्रूव्ह’ होणारे नाही, असे म्हणायचे आहे का तुमच्या साहेबांना?
आम्ही – ‘काही चूक झाली असेल तर चौकशी झाली पाहिजे’, असे म्हणाले आहेत की साहेब.
विद्वान - पण ‘जॉइंट पार्लमेंटरी कमिटी’ (‘जेपीसी’) नको म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली आहे, तेवढी पुरे आहे असे म्हणाले.
आम्ही - साहेब बोलत आहेत त्यात अर्थ आहे.
विद्वान - (चिडून) खरा प्रश्न, २०१४ साली अठ्ठावीस हजार कोटी संपत्ती असलेले गौतम अदानी २०२३ साली दहा लाख कोटींवर कसे पोहोचले हा आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती काही बोलणार आहे का?
आम्ही - सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या ‘टर्म्स ऑफ रेफरन्स’मध्ये ते नाहीये. अदानी ग्रूपची चौकशी करायचे काम आहे समितीकडे.
विद्वान - (अजून चिडत) गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांनी विविध शेल कंपन्यांमधून भारतात जे पैसे आणले, ते पैसे कुठून आले, हा खरा प्रश्न आहे. ते नक्की कोणाचे पैसे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाची समिती शोधणार आहे का?
आम्ही - नाही.
विद्वान - त्यासाठी ‘जेपीसी’च हवी. ती तिला पाहिजे ती कागदपत्रे मागवू शकते. सीबीआय, ईडी यांना बोलावू शकते. आणि पवारसाहेब सरळ म्हणतायत की, जेपीसी नको?
आम्ही – ‘बोफोर्स’मध्ये जेपीसी नेमली गेली होती. काय साधले गेले त्यातून? टुजी घोटाळ्यावर जेपीसी नेमली गेली, काय साधले गेले?
विद्वान - चर्चा तर झाली. रोज जेपीसीच्या बातम्या तर आल्या, काँग्रेसची बदनामी तर झाली!
आम्ही - सिद्ध काय झाले?
विद्वान - सिद्ध काही झाले नाही, पण लोकांनी पाडले काँग्रेसला दोन्ही वेळी.
आम्ही - लोक तेव्हा जेपीसीचा रिपोर्ट वाचून गेले होते का मतदानाला?
विद्वान – नाही, पण ‘पब्लिक परसेप्शन’ तसे तयार झाले.
आम्ही - फक्त जेपीसीमुळे?
विद्वान - (गप्प)
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आम्ही - एक विचार करा. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला सांगायला लागणार आहे की, सेबीने तिचे काम नीट केले आहे की नाही!
विद्वान - हं!
आम्ही - ज्यांनी हिंडेनबर्ग रिपोर्ट नीट वाचला आहे, त्यांना अंदाज आलेला आहे की, सेबीकडून एकूण प्रकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची समिती काय म्हणते बघू.
विद्वानांच्या लक्षात हा तिढा आला नव्हता. ते विचारात पडले.
आम्ही – त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला दोन महिन्यात त्यांचा अहवाल द्यायला सांगितला आहे. म्हणजे आतापर्यंत जरी सेबीने चालढकल केली असेल, तर या वेळी सेबीला विनोद अदानी यांनी बेकायदा गुंतवणूक केली आहे का नाही, या विषयी नक्की काहीतरी सांगायला लागणार आहे.
विद्वान - त्याने काय होणार आहे?
आम्ही – अहो, सेबीने रिपोर्ट दिला, मग सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे प्रश्न निर्माण होईल की, विनोद अदानी यांनी बेकायदेशीरपणे अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेला पैसा कुणाचा आहे?
विद्वान - हं.
आम्ही - मग सीबीआय आणि ईडी वगैरे गोष्टी सुरू होऊ शकतात.
विद्वान - हूं!
आम्ही – आणि त्यानेही काय होणार आहे म्हणा? विनोद अदानी हा माणूस सायप्रस या देशाचा नागरिक आहे. तो राहतो सिंगापूरमध्ये. त्याच्या शेल कंपन्या आहेत मॉरिशसमध्ये.
विद्वान - बरोबर आहे.
आम्ही - सीबीआय आणि ईडी एका परदेशी नागरिकाचे काय करणार आहेत? इथे भारतात फ्रॉड करून भारतीय नागरिक भारताबाहेर पळाला, तरी त्याचे काही करता येत नाही. इथे तर परदेशी माणूस! तोसुद्धा ‘टॅक्स हेवन’ देशाचा नागरिक! हे देश म्हणजे ‘या रे या आमच्या देशात राहून फ्रॉड करा’ म्हणणारे देश!
विद्वान - खरं आहे.
आम्ही - शिवाय गौतम अदानी म्हणतील की, माझ्या भावाकडे कुठून पैसा आला, ते मला माहीत नाही.
विद्वान - हं!
आम्ही - फार अवघड आहे, यातील सत्य बाहेर येणे.
विद्वान - खरं आहे!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आम्ही - साहेब जेपीसीबद्दल योग्य तेच बोलत आहेत. त्यामध्ये एकवीसपैकी भाजपचे पंधरा सदस्य असणार. हे भाजपवाले लोकसभा नीट चालू देत नाहियेत. ते जेपीसीमध्ये नक्की गोंधळ घालणार, अडवा-अडवी करणार!
विद्वान - हं!
आम्ही - त्यामुळेच पवारसाहेब म्हणतायत की, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमुळे सत्य बाहेर यायची शक्यता सगळ्यात जास्त आहे.
विद्वान - पण मग सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने सेबीने तिचे काम योग्य पद्धतीने केले आहे, असं सांगितलं तर?
आम्ही - अहो तुम्ही भाजपचं प्राबल्य असलेल्या जेपीसीवर विश्वास ठेवायला तयार आहात आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीवर संशय घेता आहात.
विद्वान - आजकाल कुणाचीच खात्री वाटत नाहिये मला.
आम्ही – अहो, आपले न्या. सप्रे अध्यक्ष आहेत या समितीचे. नंदन नीलेकणी आहेत. सोमशेखर सुंदरेशनसारखा मोदी यांचा खंदा टीकाकार आहे या समितीमध्ये. के. व्ही. कामथ आहेत. या लोकांनी सगळे व्यवस्थित आहे, असे म्हटले, तर आपण अदानी यांची चौकशी हा विषय सोडून द्यायचा.
विद्वान - असा कसा सोडून द्यायचा?
आम्ही - राफेलमधील भ्रष्टाचाराचा विषय कसा सोडून दिला? तसाच हा विषयसुद्धा सोडून द्यायचा.
विद्वान - भयंकर बोलता आहात तुम्ही.
आम्ही – अहो, सर्वोच्च न्यायालयाची समिती काय म्हणते आहे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालय काय म्हणते आहे, याची वाट पाहू ना आपण!
विद्वान - मग आपण गप्प बसायचं काय?
आम्ही - आपण कशाला गप्प बसायचं? आपण बोलू की!
विद्वान - तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका माझ्या म्हणण्याचा.
आम्ही - हं!
विद्वान - (चिडून) मला माहिती आहे. अदानी निष्पाप आहे, असंच पवारसाहेबांना सुचवायचं होतं. सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे की, पवार हा लबाड माणूस आहे.
आम्ही - मग चांगलं आहे की. हा लबाड मनुष्य अदानीला निष्पाप म्हणतो आहे, म्हणजेच अदानी भ्रष्ट आहे, असा अर्थ जनता घेणार. निदान ग्रामीण महाराष्ट्रातली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
विद्वान - अहो, फक्त महाराष्ट्रातील जनतेला कळून काय उपयोग? भाजपला फक्त महाराष्ट्रात मतं कमी मिळतील. देशात पडायला हवे आहेत ते.
आम्ही – अहो, पवार अदानीविषयी काय म्हणाले हे ऐकून सगळ्या भारतातले लोक भाजपला मतं देतील असं का वाटतं आहे तुम्हाला?
विद्वान - पवारसाहेब चाणक्य आहेत. खूप सिनियर आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन सगळ्या विरोधी पक्षांची मोट बांधली पाहिजे.
आम्ही - त्यांना तशी ऑफर कुणी दिली आहे का?
विद्वान - ऑफर कशाला पाहिजे? तुम्ही पुढाकार घ्या ना!
आम्ही - असा कसा पुढाकार घेता येईल? पवारसाहेब विरोधक एकजुटीचे नेते झालेले काँग्रेसला कसे आवडेल? अखिलेशला कसं आवडेल? नीतीशबाबू काय म्हणतील? ममतादीदी काय म्हणतील? मायावती आहेत, के. चंद्रशेखर राव आहेत. सगळेच मोठे नेते आहेत. त्यांचा त्यांचा मान त्यांना द्यायला पाहिजे.
विद्वान - म्हणून असं करायचं? सगळे विरोधक अदानी प्रकरणावरून सरकारला घेरायचा प्रयत्न करत असताना आपण चालत्या सायकलच्या स्पोकमध्ये काठी घालायची? पवारसाहेब मोदीसाहेबांना आतून मिळालेले आहेत, असं माझं मत होत चाललं आहे.
यावर आम्हाला फार हसू आलं.
आम्ही - मला एक सांगा, मोदीसाहेबांना २०२४ साली पूर्ण बहुमत मिळालं तर पवारसाहेबांना काय फायदा होईल?
विद्वान -आम्हाला काय माहिती?
आम्ही - मोदीसाहेबांना बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्यांना पवारसाहेबांची मदत घ्यावी लागेल का मोदीसाहेबांना पूर्ण बहुमत मिळालं तर पवारसाहेबांची मदत घ्यावी लागेल?
विद्वान - मोदीजींना बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्यांना पवारसाहेबांची मदत घ्यावी लागेल.
आम्ही - मग मोदीजींना पूर्ण बहुमत मिळेल असं करून पवारसाहेब आपल्या पायावर धोंडा कशाला पाडून घेतील?
विद्वान - मग पवारसाहेब, मोदी आणि अदानी यांना फायद्याचं होईल असं का बोलत आहेत?
आम्ही - अदानी हा विषय जनतेला महत्त्वाचा वाटत नाही, असं पवारसाहेबांचं मत झालं असेल.
विद्वान - असं कसं?
आम्ही - १९ साली राफेलमधल्या भ्रष्टाचाराचा विषय इतकाच महत्त्वाचा होता. जनतेला तो तितका महत्वाचा वाटला नाही. तसंच कदाचित इथे होईल असं पवारसाहेबांना वाटत असेल.
विद्वान - असं कसं वाटू शकतं?
आम्ही - सगळे राजकारणी लोक सध्या स्वतःचे ‘ओपिनियन पोल्स’ घेत असतात. जनमताचा सततचा ‘ट्रॅक’ ठेवत असतात.
विद्वान - अदानी विषय महत्त्वाचा नाही, असं कसं वाटू शकतं जनतेला?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आम्ही - राफेल महत्त्वाचा नाही, असं कसं वाटलं जनतेला? अशा प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे की नाही, याबाबत मत बनवायला फायनान्स, आंतरराष्ट्रीय व्यापार, स्टॉक मार्केट अशा अनेक गोष्टींचं ज्ञान असायला लागतं.
विद्वान - मग बोफोर्सचं बरं ज्ञान झालं जनतेला!
आम्ही - तेव्हा मीडिया स्वतंत्र होता. सगळीकडे बोंबाबोंब व्हायची! आता ‘गोदी मीडिया’चा जमाना आहे.
विद्वान - मग काय साहेब शरण जाणार का मोदीसाहेबांना?
आम्ही - मोदी त्यांच्या ‘पॉवर’च्या शिखरावर असताना साहेबांनी महाविकास आघाडी बनवून फसवलं साहेबांना. ते कशाला शरण जातील?
विद्वान - मग नक्की काय चाललं आहे साहेबांचं?
आम्ही - तुम्हाला माहीतच आहे की, २०१४ सालच्या इलेक्शनच्या तोंडावर साहेबांनी पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.
विद्वान - हो
आम्ही - तेव्हा मोदी येणार असं वाटल्यानं त्यांनी तसं केलं.
विद्वान - म्हणजे या वेळीसुद्धा मोदी येणार असं साहेबांना वाटतं आहे का?
आम्ही - या वेळी मोदी येणार नाहीत, असं साहेबांना वाटत असावं.
विद्वान - मला काहीच कळलं नाही.
आम्ही - या वेळेस चार सीन होऊ शकतात. मोदीजींना ३२५ जागा मिळतील किंवा २४० ते २६० जागा मिळतील किंवा १८० ते २४० जागा मिळतील किंवा १८०- १६०च्या खाली जागा मिळतील.
विद्वान - मग?
आम्ही - मोदीजींना पूर्ण बहुमत मिळालं, तर मग पवारसाहेबांना काहीच करता येणार नाही. जसं पूर्वी दोन वेळा झालं.
विद्वान - बरं मग?
आम्ही - भाजपच्या पाठिंब्यावर सरकार बनू शकते आहे, पण मोदीजी पंतप्रधान बनू शकत नाहीत, असा सीन तयार झाला, तर आपले साहेब म्हणणार- ‘कॉम्प्रोमाइज कँडिडेट’ म्हणून मला पंतप्रधान करा.
विद्वान - मान्य करतील मोदी?
आम्ही - विरोधक सत्तेत आले तर राफेल आणि अदानी फाईल्स उघडल्या जाणार परत. सीबीआय वगैरे लचांडे सुरू होणार! त्यापेक्षा पवारसाहेब पंतप्रधान म्हणून परवडले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
विद्वान - ओह माय गॉड! म्हणजे मोदीजींचे कळसूत्री बाहुले म्हणून राहणार तुमचे साहेब?
आम्ही - माणूस एकदा पंतप्रधान झाला की, त्याच्याकडे खूप ताकद येते. काही दिवसांनी मोदीजी जड झाले की, पवारसाहेब विरोधकांना म्हणू शकतात की, आपण भ्रष्ट शक्तींना अद्दल घडवली पाहिजे. तुम्ही मला पाठिंबा दिला, तर आपण मोदीजींना अद्दल घडवू.
विद्वान - आणि विरोधक ऐकतील?
आम्ही - ईडी तेव्हा साहेबांकडे असेल! पंतप्रधानपद म्हणजे तुम्ही समजलात काय?
विद्वान - बाप रे!
आम्ही - आता आपण मोदीजींना २३०च्या आसपास जागा मिळाल्या तर काय हे बघू. मायावती, ममता आणि जगमोहन रेड्डी अशा सगळ्यांबरोबर पाठिंबा द्यायचा झाला, तर साहेब म्हणू शकतात की, माझे बारा खासदार आहेत. त्यातल्या प्रत्येक चार मागे एक मंत्रीपद आम्हाला हवे. मोदीजींना २००च्या आसपास जागा मिळाल्या, तर साहेब म्हणणार आमचा पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे. प्रत्येक खासदाराला त्याचे त्याचे मत आहे. ते सगळे म्हणताहेत की, आपल्याला सहा तरी मंत्रीपदे मिळाली पाहिजेत. नसतील मिळत, तर आपण पाठिंबा नको द्यायला.
विद्वान - आणि मोदींना १६० जागा मिळाल्या तर?
आम्ही - मग पवारसाहेब म्हणतील की, भ्रष्ट सरकारला लोकांनी धडा शिकवला आहे. तेव्हा त्यांची संपूर्ण चौकशी करणे योग्य होईल. आता जेपीसी नेमावीच लागेल.
विद्वान - भारी आहेत साहेब तुमचे.
आम्ही - म्हणून तर आदर वाटतो साहेबांबद्दल!
विद्वान - मोदींना १६० जागा मिळाल्या, तर साहेब अदानी यांच्याबद्दल काय म्हणतील?
आम्ही - ते म्हणतील की, अदानी हा माणूस कर्तबगार आहे, पण भ्रष्ट सत्तेच्या दबावामुळे त्याने काही चुका केल्या आहेत, तेव्हा त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.
विद्वान - म्हणजे साहेब शिक्षा करणार अदानीला?
आम्ही - शिक्षा करणारे साहेब कोण असणार आहेत? शिक्षा न्यायालय करते. ते अदानीला शिक्षा करेल तेव्हा करेल. मुलगा कर्तबगार आहे, पण दबावामुळे चुकला आहे, एवढं म्हणणार साहेब.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
विद्वान - कमाल आहे साहेबांची तुमच्या!
आम्ही- आमचे साहेब आहेतच तसे!
विद्वान - म्हणजे तत्त्वे सोडून सत्ता मिळवणे हे एकच ध्येय?
आम्ही - साहेब तत्त्वे कधीच सोडत नाहीत. ते ‘तत्त्वशून्य वातावरणा’त राहतात.
विद्वान - म्हणजे?
आम्ही - पवारसाहेब गांधीजींच्या काळात असते, तर त्यांनी त्यांची सगळी तत्त्वे पाळली असती आणि पंतप्रधानपदासाठी पंडित नेहरूंना ‘टफ कॉम्पिटिशन’ दिली असती!
विद्वान - धन्य आहे तुमची आणि तुमच्या साहेबांची! तत्त्वांच्या बाबतीत ते भाजपवाले परवडले.
आम्ही - असं कसं म्हणता येईल? भारतभर गोवंशहत्याबंदी लावून गोवा आणि नार्थ ईस्टमध्ये बीफ खाऊ देतातच ना भाजपवाले त्यांच्या लाडक्या मतदारांना? आणि, काँग्रेसने नाही का शाहबानो प्रकरणात तत्त्वे खुंटीला टांगली.
विद्वान - म्हणजे सत्तेसाठी काहीही!
आम्ही - तुम्हाला म्हणायचे तर तुम्ही तसे म्हणू शकता!
विद्वान - सत्तेसाठी काहीही! अगदी पैसासुद्धा!
आम्ही - सध्याचे वातावरण लक्षात घेतले, तर सत्ता म्हणजेच पैसा आणि पैसा म्हणजेच सत्ता! कुणाचाच अपवाद नाही!
विद्वान - म्हणजे सगळे पक्ष अनैतिक मार्गाने पैसा मिळवतात, असे म्हणायचे आहे काय तुम्हाला?
आम्ही - सत्तेमधून पैसा येतो आणि पैशामधून सत्ता येते एवढंच म्हणणं आहे माझं. त्यात अनैतिक काय आहे? तुम्ही सत्तेवर आलात की, लोक तुम्हाला जास्त देणग्या देतात आणि या साठलेल्या पैशातून तुम्हाला परत सत्ता मिळते, एवढंच म्हणायचं होतं मला!
विद्वान - साहेब अंगाला लावायचे तेलसुद्धा देतात का तुम्हाला?
आम्ही - एवढ्या छोट्या गोष्टीत साहेब कशाला लक्ष घालतील?
विद्वान - तुम्ही नको तेव्हा शब्दश: अर्थ घेता! तुम्ही आणि साहेब अंगाला तेल लावलेले पहिलवान आहात, असं म्हणायचं होतं मला.
आम्ही - मी आणि साहेब कधीही कुस्ती खेळलेलो नाही. सत्ता किंवा सत्य यापैकी काहीच हाताला लागणार नसताना उगीच कशाला दुसऱ्याला पाडायचे?
विद्वान - परत एकदा शब्दश:! तत्त्वभ्रष्ट!
आम्ही - तत्त्वशून्य आणि तत्त्वभ्रष्ट यात फरक आहे.
विद्वान - काय फरक आहे?
आम्ही - तत्त्वशून्य म्हणजे तत्त्वांना दूर ठेवणारा. तत्त्वभ्रष्ट म्हणजे तत्त्वे मोडणारा!
विद्वान - आता शब्दांचे खेळ करून तुम्ही गोंधळ माजवत आहात.
आम्ही - साहेब सत्तेसाठी आणि आम्ही लेखनात सत्य पकडण्यासाठी तत्त्वशून्यतेच्या विरल वातावरणात राहतो. आपण तत्त्वांच्या आहारी गेलो की, आपल्याला खरी परिस्थिती दिसत नाही.
विद्वान - शब्दांचे खेळ!
आम्ही - साहेबांनी कधी घटनाबाह्य भाषण आणि वर्तन केले आहे काय?
विद्वान - (आठवत) आठवत नाही.
आम्ही - त्यांच्याविषयी बोलायची कुणा पत्रकाराला कधी भीती वाटली आहे काय?
विद्वान - (विचार करत) नाही.
आम्ही - म्हणजे साहेब काही गोष्टी आजन्म पाळू शकतात.
विद्वान - हो.
आम्ही - म्हणजे जी तत्त्वे त्यांना गरजेची वाटतात, ते ती साहेब पाळू शकतात. तत्त्वभ्रष्ट माणूस असे नाही करू शकत. जो तत्त्वे पाळू शकतो, पण काळाची पावले ओळखून जो तत्त्वांना दूर ठेवू शकतो, तो तत्त्वशून्य! जो कोणतीच तत्त्वं कधीच पाळू शकत नाही, तो तत्त्वभ्रष्ट!
विद्वान – ‘गोंडस गोंडस’ काहीतरी बोलत राहायचे. बरे एक सांगा, पवारसाहेब तत्त्वशून्य आहेत, असे म्हणताना तुम्ही त्यांचे कौतुक करता आहात की, त्यांच्यावर टीका करता आहात.
आम्ही - साहेब तत्त्वशून्य आहेत, असे आम्ही कधीच म्हटलो नाही. साहेब तत्त्वे जाणतात, ठरवले तर साहेब तत्त्वे पाळू शकतात, पण सत्ता हे ध्येय असल्याने ते तत्त्वशून्य वातावरणात राहतात, असे आम्ही म्हणालो आहोत.
विद्वान - हे चांगले की, वाईट?
आम्ही - आम्ही स्वतःसुद्धा पवारसाहेबांच्याच पावलांवर पाऊल ठेवून चालतो आहोत. ते राजकारणात आहेत, आम्ही लेखनक्षेत्रात आहोत.
विद्वान - साहेबांचे तुमच्याबद्दल मत काय आहे?
आम्ही - साहेब म्हणतात पोरगा चांगला आहे. एका लेखकाला कळू शकते, तेवढे राजकारण याला कळते आहे!
विद्वान - हे तुमचे कौतुक समजायचे की, अपमान समजायचा?
आम्ही - आमचे शत्रू याला आमचा ‘अपमान’ समजतात आणि मित्र ‘कौतुक’ समजतात.
विद्वान - तुम्ही स्वतः काय समजता?
आम्ही - साहेब आमच्याबद्दल एक वाक्य का होईना बोलले, म्हणजे ते आम्हाला त्यांचे मित्र समजतात एवढेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. बाकी मैत्रीमध्ये अपमान किंवा कौतुक होतच राहते. आज अपमान झाला, तर उद्या कौतुक होते. आज कौतुक झाले, तर उद्या अपमान होतो. दुय्यम असतात या गोष्टी!
विद्वान - तुम्ही कधी तरी सरळ बोला हो!
आम्ही - आम्ही सरळच बोलतोय!
विद्वान - ठेवतो मी फोन!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आम्ही - एक मिनिट! तुम्हा पुरोगामी विद्वानांना आवडेल, अशी एक गोष्ट सांगू का?
विद्वान - सरळ भाषेत सांगणार असाल तर सांगा.
आम्ही - पवारसाहेब मोदीसाहेबांना पाडण्याचा नक्की प्रयत्न करणार. कारण मोदीसाहेबांच्या जागा कमी झाल्याशिवाय आपल्या साहेबांचे राजकारण सुरूच होत नाही.
विद्वान - धन्यवाद! हेच ऐकायचे होते मला! (क्षणभराने) हे नक्की समजू मी?
आम्ही - हो! पण हे लोकसभा निवडणुकीपर्यंत परिस्थिती अशीच राहिली तर हं! आता महाराष्ट्र सरकारबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातून येतो आहे. तो कसा येतो आहे, हे पाहायला लागेल. तो जर उलटा-पालटा आला, तर नवी परिस्थिती तयार होऊ शकते आणि लोकसभेच्या आधीच राजकारणाची संधी मिळू शकते. मग काही सांगता येत नाही.
विद्वान - म्हणजे पवारसाहेब आणि मोदीसाहेब एकत्र येऊ शकतात?
आम्ही - अगदी तसं म्हणता येणार नाही. पण हिंदुत्ववादी व हुकूमशाहीवादी शक्तींच्या नाकात सेक्युलर आणि लोकशाहीवादी पक्षाची वेसण बसली पाहिजे, म्हणून साहेब भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात. आणि अगदीच नाइलाज झाला, तर त्यांच्याबरोबर सरकारमध्ये सामीलही होऊ शकतात!
विद्वान - ओह माय गॉड!
आम्ही - पण असं झालं तरीही मोदीजींच्या लोकसभेच्या जागा कमी व्हाव्यात म्हणून पवारसाहेब अगदी मन लावून प्रयत्न करणार, हे तुम्ही नक्की समजा!
विद्वान - (फोन ठेवतात)
त्यांनी फोन बंद केला, तेव्हा आम्हाला समाधान वाटले. या सगळ्या संभाषणात कुठलेही आदर्शवादी तत्त्व आम्हाला स्पर्श करू शकले नाही, याचे सारे श्रेय आमच्या साहेबांनाच आहे. त्यांचा पुतळा करून आम्ही आमच्या बागेत ठेवला आहे. पवारसाहेबांना स्मरूनच आम्ही एकलव्य पद्धतीने लेखनकलेच्या कामठ्यावरच आमच्या लेखांचे तीर चालवणे शिकत आहोत.
या लेखात आम्ही पवारसाहेबांबद्दल चांगले बोलतो आहोत की, त्यांच्यावर टीका करतो आहोत, याविषयी तुमच्या मनात गोंधळ उडाला असेल, तर साहेबांचे राजकारण आमच्या थोडे का होईना लक्षात आले आहे, असे तुम्ही समजायला हरकत नाही.
..................................................................................................................................................................
अनुवादक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment