अजूनकाही
१. भारताच्या परंपरा, रीतीरिवाज आणि संस्कृतीनेच हा देश टिकवून ठेवला आहे. उगाडी म्हणजे तेलुगु नववर्षानिमित्त शुभेच्छा देऊन ते म्हणाले की, भारतीय परंपरा विविधतेने नटलेली आहे आणि त्याच परंपरांनी देशातील सर्वांना एकत्र बांधण्याचे काम केलं आहे. हे वैविध्य आपण जपलं पाहिजे. तसंच दुसऱ्या राज्यातील संस्कृती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. : पंतप्रधान नरेंद्र मोदी
अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय विचार. या देशात विविध धर्म, जाती, पंथ, प्रांतांच्या वेगवेगळ्या खानपान परंपरा आहेत. त्यांचा आदर केला पाहिजे. आपली परंपराच श्रेष्ठ म्हणून इतरांवर लादता कामा नये. आपल्याच धर्मातल्या इतर बांधवांच्या खानपान परंपरांमध्ये खूप वेगळेपणा आहे, हे लक्षात घेऊन त्याचा आदर केला पाहिजे. आपल्या लाडक्या समजुती आपल्यापुरत्याच ठेवल्या पाहिजेत. हे सगळं पंतप्रधान म्हणाले नसले म्हणून काय झालं; त्यांचा भावार्थ तोच आहे.
.......................................................................................................
२. मुंबईतील मलबार हिलमधील जिना हाऊस तोडून त्या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. जिना हाऊसमध्येच फाळणीचा कट आखला गेला असून ही वास्तू पाडलीच पाहिजे, असे लोढा म्हणालेत. शत्रू संपत्ती विधेयक राज्यसभेत नुकतेच मंजूर झाले आहे. शत्रू संपत्तीला वारसा कायदा लागू होणार नाही आणि त्याचे हस्तांतर ताबेदाराकडून शत्रूकडे किंवा संबंधितांकडे होणार नाही, अशी तरतूद या कायद्यात आहे. या कायद्यानुसार आमदार लोढा यांनी जिना हाऊस पाडण्याची मागणी केली आहे.
आमदार लोढा हे मुंबईतले एक धनदांडगे बिल्डर आहेत, बांधकाम हाच त्यांचा व्यवसाय आहे आणि जिना हाऊस ही त्यांच्या मतदारसंघातली, मुंबईच्या अतिश्रीमंत वस्तीतली एक अतिप्राइम प्रॉपर्टी आहे, हे निव्वळ योगायोग. आपल्या सोयीचाच इतिहास जतन करायचा, इतिहासातल्या आपल्याला कटु वाटणाऱ्या गोष्टींचे संदर्भ नष्ट करायचे, ही बमियान बुद्ध ध्वस्त करणाऱ्यांची परंपरा त्यांनी आत्मसात केली आहे, यातही काही आश्चर्य नाही. जिना पाकिस्तानचे निर्माते असले, तरी या देशाचे, त्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या स्मृतीचा आदर राखल्याने उगाच आपल्यावर समंजस सहिष्णुतेचा डाग लागेल, अशी भीती लोढांना वाटत असणार.
.......................................................................................................
३. उत्तर प्रदेशात अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना भाजप आमदार विक्रम सैनी यांनी नवा वाद निर्माण केला आहे. गोहत्या करणाऱ्यांचे हात-पाय तोडायला लावेन, अशी सैनी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री सुरेश राणा यांच्या सत्कार समारंभातच सैनी यांनी हे चिथावणीखोर विधान केले आहे.
ज्यांची जागा खरं तर गोठ्यातच आहे, त्यांना एकदम वेगळ्या जागी नेलं की, थोडे घोळ होतात. वेळ लागतो अॅडजस्ट व्हायला. जमेल हळूहळू. थोडा वेळ द्या. लवकरच ते शिरच्छेदाची भाषा बोलू लागतील, तेव्हा खरे रुळले म्हणायचे.
.......................................................................................................
४. ‘टाइम्स नाऊ’ सोडण्याच्या दोन दिवस आधीपासून आपल्याला स्टुडिओमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. मला त्या वेळी खूप वाईट वाटलं. अरविंद केजरीवाल यांनी जंतरमंतर इथे नोटाबंदीवर आंदोलन करण्याची नौटंकी बंद करावी, असं मी म्हटलं होतं. त्यानंतर मला स्टुडिओमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मी बनावट माध्यम सोडून दिले आणि माझ्या स्वातंत्र्याची घोषणा केली. : अर्णब गोस्वामी
अतिरंजित, एकांगी मतं खूप लोक मांडतात. त्यांना ‘सत्य’ म्हणून ढोल वाजवून वाजवून खपवण्याची कला एखाददुसऱ्या ‘गोस्वामीं’नाच साधते. अर्णबला आपल्या रोजच्या नौटंकीतून दुसऱ्या कोणाची नौटंकी समजू शकली, हेच फार मोठं आश्चर्य! त्याला आसपासच्या इतर नौटंक्या कधी दिसल्या नाहीत, हे मात्र आश्चर्यकारक नाही. ती कमावलेली दृष्टी आहे.
.......................................................................................................
५. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर राज्यात ‘योगीराज’ सुरू झाले असून, त्यांनी ‘आदेशां’चा धडाका लावला आहे. यानंतर ‘यादव पोलीस कर्मचाऱ्यांना हटवण्याचा घाट’ अशा आशयाचे ट्विट करणारे आयपीएस अधिकारी हिमांशू कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या सत्ताकाळात या हिमांशू कुमारांनी खूप फायदे उपभोगले आहेत, स्वातंत्र्य उपभोगलं आहे. आधीच्या सरकारच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांचे पंख नंतरचं सरकार कापतंच. आपण एकाच्या ताटाखालचं मांजर बनायचं स्वीकारतो, तेव्हा ताट बदलल्यावर उघडे पडू, हेही स्वीकारायला हवं. उगाच ट्विट ट्विटरूपी म्याँव म्याँव कशाला?
.......................................................................................................
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment