अजूनकाही
भाग पहिला
गोळ्यांचा आवाज कोणी ऐकला नव्हता. पिस्तुलाच्या नळीस ध्वनिरोधक बसवलेला होता. बापूंच्या तोंडी आधी ‘आ…’ असा आवाज निघाला. मग ते खाली पडले. सर्वांनी वर पाहिले. गोळ्या कोणीकडून आल्या असतील, याचा अंदाज त्यांनी घेतला. बापूंच्या रोजच्या प्रार्थनेच्या वाटेवर जी समीप क्षेत्रचित्रण करणारी उपकरणे बसवण्यात आली होती, त्यातील एका उपकरणाची जागा त्या भयंकर खुनी हत्याराने घेतल्याचे दिसले. कोणी तरी अत्यंत हुशार, चतुर, बुद्धिमान, चाणाक्ष व धाडसी आणि कल्पक व्यक्तीने उपकरणाच्या जागी दूरनियत्रंणाद्वारे झाडता येईल, असे एक पिस्तुल बसवलेले होते.
म्हणूनच कोणाला काही कळायच्या आत, आणि समोर कोणीही नसताना गोळ्या झाडल्या गेल्या व बापू कोसळले. आपला कोणाचाच हात या खुनात नाही, म्हणून जमलेल्या साऱ्यांना हायसे वाटले. सर्व जण त्या उंच जागी अजिबात संशय येणार नाही, अशा ठिकाणी जाऊन हत्यार ठेवणाऱ्याचे कौतुक करू लागले.
अशा प्रकारे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक बापू धारातीर्थी पडले. आपल्या हातून भारताचे राज्य हिसकावून घेणाऱ्या बापूंचा असा निकाल इंग्रजांशिवाय अजून कोण लावू शकले असते, अशी कुजबूज लगेच सुरू झाली. ब्रिटिश साम्राज्य असे दुष्ट आणि कावेबाज होते.
भाग दुसरा
धाकले महाराज यांना कैद कोणी केले? त्यांची जीभ कोणी कापली? त्यांचे डोळे कोणी फोडले? अखेरीस या शूर छत्रपतीच्या मृत्युस जबाबदार कोण होता?.... विद्यार्थ्यांनो, या प्रश्नांनी आमच्यासारखे इतिहासशिक्षक आजही बुचकळ्यात पडले आहेत. ते नक्कीच दरवडेखोर असतील. ठगसुद्धा असतील. कदाचित महाराज घुडसवारी करत असताना समोरील झाडेझुडपे त्यांना दिसली नसतील. कदाचित त्यांच्या समोरील घुडसवार आज अचानक ब्रेक लागल्यावर ट्रकवर मागून मोटारकार आदळते, तद्वत एकदम थांबला असेल आणि त्याच्या पाठीवरील भात्यातील तीर महाराजांच्या नेत्रांत घुसले असतील. त्या घुडसावर मावळ्याच्या पाठीवरील ढाल महाराजांच्या तोंडावर आपटली असेल. त्याने त्यांची जीभ कापली असेल.
कैदेत त्यांना ठेवायचा विचारही कोणी करू शकणार नाही, एवढी महाराजांची दहशत होती. त्यांना नक्कीच आज पक्षांतरामुळे होतो, तसा दगाफटका झालेला असणार. किंवा पुतीन त्यांच्या राजकीय विरोधकांचा जसा काटा काढतात, तसा एखादा ‘पुतीन’ महाराजांवर चाल करून गेला असेल.
काय सांगता येते का इतिहासाचे? इतिहासासारखी चंचल गोष्ट दुसरी कोणती नाही. आज इथे तर उद्या तिथे. विद्यार्थ्यांनो, ‘हलता इतिहास’, ‘सरकता इतिहास’ आणि ‘फिरता इतिहास’ आपल्याला चक्रावून सोडतो. त्यामुळे तुम्हाला जेवढे वर्गात शिकवले तेवढ्याचीच उत्तरे लिहा. तुम्हाला उत्तीर्ण केले जाईल.
भाग तिसरा
मुलांनो, आज मी तुम्हाला भारतीय चित्रपटांच्या इतिहासात महान कामगिरी बजावणाऱ्या एका चित्रपटाची माहिती देणार आहे. त्या थोर चित्रपटाचे नाव आहे- ‘चुगल-ए-आझम’! एका गावात एक मुलगा राहात होता. तो सारखा चहाड्या करी. चहाड्या म्हणजे हिंदीत ‘चुगली’. असा तो चुगलबहाद्दर होता. गावातल्या सर्वांच्या चुगल्या त्याने केलेल्या असल्याने त्याला ‘चुगल-ए-आझम’ असा किताब गावकऱ्यांनी दिलेला होता.
चुगलीखोर असला तरी हा मुलगा आजच्या भाजपच्या नेत्यांसारखा फार हुशार, सेवाभावी, राष्ट्रभक्त आणि शुद्ध चारित्र्याचा होता. त्याच्या बुद्धीवर आणि चुगली करण्याच्या धैर्यावर एक सुंदरी भाळली. ही सुंदरी गौतमीसारखी डान्स करून पोट भरी.
ती आपल्या मुलावर प्रेम करते, हे चुगलखोर सलीमच्या वडिलांना सहन होईना. त्यात सलीमही त्या नर्तकीच्या म्हणजे अनारकलीच्या प्रेमात पडला होता. या दोघांच्या प्रेमावर रचण्यात आलेले ‘जब प्यार किया तो, डरना क्या’ हे काव्य त्या काळी पंचक्रोशीत गाजू लागले होते. व्हायरल झाले होते, असेच म्हणा ना.
आज जशी एखादी व्हिडिओ क्लिप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये येऊन पडते, तशी सलीम व अनारकली यांची चोरटी भेट अवघ्या जनतेला आधीच माहीत होत असे. ही नाचरी मुलगी सलीमला त्याच्या वडिलोपार्जित धंद्यापासून दूर नेते आहे, असे वाटल्याने सलीमचे वडील अनारकलीस भिंतीत चिणून टाकतात.
त्या काळी लढायांमुळे कबरस्ताने गच्च भरल्याने, अशी उभी पुरण्याची नवी योजना सरकारने राबवायला सुरुवात केली होती. सलीम खूप रडला. त्यानेही ‘जिंदाबाद, जिंदाबाद, ये मुहब्बत जिंदाबाद’ असे करुण गीत गात प्राण सोडले.
अशा महान प्रेमकथेवरचा ‘चुगल-ए-आझम’ हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीत मानाचे स्थान टिकवून आहे. म्हणून मुलांनो, चुगली, चहाडी वाईट नसते. ते एक राष्ट्रकर्तव्य असून आजचे पत्रकार जसे भाजपचे काँग्रेसला व काँग्रेसचे भाजपला कळवतात, तसे तुम्ही करत राहिले पाहिजे.
भाग चौथा
हा पाहा मुलांनो, ‘बेबी का मकबरा’. रात्रीच्या वेळी किती छान दिसतो ना तो! त्या उंच मिनारांवर, त्या जाळीच्या खिडक्यांत कसे एलईडी चमकत आहेत… तर ही जी बेबी होती, ती म्हणजे आजची जी ‘बेटी बचाव, बेटी पढ़ाव’ योजना आहे, तशाच एका योजनेत शहीद झालेली बेबी. म्हणजे त्या काळी बायकांची फार वाईट स्थिती होती. युवक-युवती प्रेमात पडायचा तो काळ. विद्यार्थी परिषदेत जसे दादा व ताई यांचे नाते जपावे लागते, तसे त्या काळी सरकारने तमाम युवापिढीला राष्ट्रहितार्थ, राष्ट्ररक्षणार्थ भावनांच्या पाशात न अडकण्याचे आवाहन केलेले होते.
एकीकडून चीन, दुसरीकडून पाकिस्तान, तिसरीकडून ‘क्लायमेंट चेंज’ आणि चौथीकडून ‘दानीबानी’… असा आपला देश बेजार झालेला होता. सरकार म्हणत होते, ‘नोकऱ्यांची काळजी करू नका, बेकारीची भीती घेऊ नका… या… राष्ट्राच्या उभारणीसाठी सरकारचे हात बळकट करा. आधी लगीन ‘कोंडाळ्या’चे.’
त्याप्रमाणे सारी युवा पिढी राष्ट्रकार्यास लागली. नव्या राष्ट्रनिर्मितीस जुंपली. तरीही एक जोडपे कमी धीराचे निघाले. नवा देश जन्माला घालण्याऐवजी त्यांनी एका ‘बेबी’ला जन्म दिला. त्यांची सर्वांनी छी-थू केली. त्यांना प्रचंड पश्चात्ताप झाला.
अखेरीस त्या बेबीला त्यांचे दु:ख पाहावेना. ती स्वत:हून दूर निघून जाते म्हणाली आणि कंसमामाच्या तुरुंगात कृष्णाच्या बहिणी जशा अंतर्धान पावत, तशी ती झाली. तिच्या या त्यागाच्या स्मरणार्थ हा ‘बेबी का मकबरा’ तयार झाला.
बघा, किती त्यागी आहे आपला इतिहास!
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment