‘पोस्ट-ट्रुथ’, ‘फेक न्यूज’, ‘ट्रोलिंग’ हे हल्ली परवलीचे शब्द झाले आहेत. ‘पोस्ट-ट्रुथ’ ही तर एकविसाव्या शतकाची ओळखच होऊ पाहत आहे. या शब्दाचा पहिला जाहीर आणि अभ्यासकीय वापर २०१६च्या आधी झाला. पण तो इतका झाला की, ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’ने त्याला २०१६मध्ये ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून जाहीर केलं. या शब्दाला सार्थ करण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच्या कार्यकाळात केलं. त्यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळाली असती, तर त्यांनी ‘पोस्ट-ट्रुथ’ या शब्दाला त्याचा ‘अमृतकाळ’ही दाखवला असता कदाचित. ट्रम्पनंतर या शब्दाच्या लौकिकात भर घालण्याचं काम रशियाचे अध्यक्ष पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक प्रमाणात केलं, असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. ट्रम्पप्रमाणेच ‘पोस्ट-ट्रुथ पॉलिटिक्स’ ही या तिघांची खासीयत राहिली आहे.
त्यानंतर नंबर लागतो ‘फेक न्यूज’चा. यातही ट्रम्प, पुतीन, जिनपिंग आणि मोदी महाशय मागे नाहीत. पुतीन आणि जिनपिंग यांच्या देशात पत्रकारांकडून फेक न्यूजची किती प्रमाणात शहानिशा होते, याची फारशी माहिती नाही. पण अमेरिकेत ट्रम्प यांच्या कार्यशाळात त्यांच्या रोजच्या विधानांतल्या फेक न्यूजचा पर्दाफाश अमेरिकी प्रसारमाध्यमं इमाने-इतबारे करत होती. भारतातही पंतप्रधान मोदी यांच्या विधानांतील ‘फेक न्यूज’चा भांडाफोड करण्याचं काम काही मोजकी प्रसारमाध्यमं व पत्रकार करत असतात, पण त्यांचा तेवढा गाजावाजा होत नाही, होऊ दिला जात नाही. शिवाय मोदी सरकारची ट्रोलिंगची, फेक न्यूज ‘व्हायरल’ करण्याची स्वत:चीच यंत्रणा इतकी पॉवरफुल आहे की, त्यापुढे सत्याची चार-दोन पानं वावटळीत पालापाचोळा उडून जातो, तशी सहज उडवून लावली जातात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आता ‘ट्रोलिंग’. पोस्ट-ट्रुथ पॉलिटिक्स आणि फेक न्यूज यांची गाजावाजा करायचा असेल तर तुमचा आवाज मोठा हवा. त्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज काढणाऱ्यांचं, बोलणाऱ्यांचं ‘ट्रोलिंग’ केलं जातं. आपली रेषा मोठी करण्यासाठी इतरांची छोटी करण्याचं, पसंत नसलेला आवाज दाबण्यासाठी त्याची मानहानी, चारित्र्यहनन करण्याचं तथाकथित भारतीयांचं कौशल्य इतकं वादातीत आहे की, त्याला बहुधा जगभरात कुठेच तोड सापडणार नाही.
या तिन्ही आधुनिक क्षेपणास्त्रांनी लोकशाही, अभिव्यक्ती-स्वातंत्र्य, माध्यम-स्वातंत्र्य, स्त्रीहक्क व सन्मान यांच्यापुढे मोठं आव्हान निर्माण केलं आहे. एकविसाव्या शतकानं आतापर्यंत निर्माण केलेलं, हेच सर्वांत मोठं आव्हान आहे. आणि या आव्हानाची - अमेरिका असो की, भारत - कर्तीधर्ती असते सत्ताधारी जमात. सत्ता हवी तशी राबवता येते आणि सत्तेपुढे कुणालाही वाकवता येतं, याचा मूर्तीमंत आविष्कार घडवण्याचं काम सत्ताधाऱ्यांशिवाय इतर कुणाला जमत नाही.
फेसबुक, यू-ट्युब, ट्विटर, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाच्या व्यासपीठांचा उदय होत होता, त्या प्रत्येक वेळी अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे मोठमोठ्याने नगारे वाजवले गेले. पण आजघडीला दिसतं असं की, या व्यासपीठांचे मालक अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कमी आणि जास्तीत जास्त नफा मिळवणारे भांडवलदारच जास्त आहेत. त्यांचं सारं लक्ष बाजारपेठेवर असतं. त्यासाठी ते त्या त्या देशांतल्या सरकारच्या हुकमानुसार इमाने-इतबारे वागतात. सरकारने थोडेसे डोळे वटारले की, ते लगेच कान पाडून, शिंगं मोडून पांदीचा रस्ता धरतात.
त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून आपण आपल्या स्वातंत्र्याबाबत सजग होण्याची कधी नव्हे इतकी गरज आता निर्माण झाली आहे. त्याबाबतची जाणीव-जागृती करण्यासाठी २०१७पासून २ एप्रिल हा दिवस ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’ (‘आंतरराष्ट्रीय सत्य-पडताळणी दिन’) म्हणून साजरा केला जातो आहे. ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क’ ही संस्था जगभरातल्या अजून काही फॅक्ट चेकिंग संस्थांच्या सहकार्यानं २ एप्रिल हा ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’ म्हणून साजरा करत आहे. २ एप्रिलच का, तर १ एप्रिल म्हणजे ‘एप्रिल फूल’नंतरचा दिवस म्हणून. ‘असत्य विरुद्ध सत्य’ हे अधोरेखित करण्यासाठी, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये २०१४मध्ये पत्रकार आणि व्यावसायिक फॅक्ट-चेकर्ससाठी एक परिषद भरवण्यात आली होती. त्यात अशी चर्चा झाली की, राजकीयदृष्ट्या चुकीची माहिती पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. २०१६च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. त्यामुळे या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यामुळे ‘इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग डे’ या दिवसाची कल्पना पुढे आली.
गुगल, फेसबुक, ट्विटर, यु-ट्युब, व्हॉटसअप आणि पोर्टल्स, ब्लॉग, अप ही प्रचंड माहितीचे विराट कारखाने झालेले आहेत. वर्तमानपत्रांत, वृत्तवाहिन्यांत, नियतकालिकांत आणि प्रकाशनसंस्थांमध्ये मजकूर आणि व्हिडिओ संपादनाची किमान एक यंत्रणा असते. तसं काहीच ऑनलाईन माहिती वा व्हिडिओ अपलोड करताना करावं लागत नाही. त्यामुळे रोजच्या रोज सोशल मीडियावर अपलोड होणाऱ्या माहितीची शहानिशा केली जात नाही, जाऊही शकत नाही. पण या माहितीचं ‘घटना’ (Fact), ‘वास्तव’ (Reality) आणि ‘सत्य’ (Truth) या निकषानुसार विश्लेषण करण्याचं काम करणारी अनेक संकेतस्थळं आता उपलब्ध झालेली आहेत. त्यावर जाऊन आपण आपण वाचलेली माहिती आणि पाहिलेली व्हिडिओ पडताळून पाहू शकतो.
‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क’तर्फे https://factcheckingday.com आणि https://www.poynter.org अशा दोन वेबसाईटही चालवल्या जातात. पहिलीवर ‘फॅक्ट-चेकिंग डे’चा इतिहास, फॅक्ट-चेकिंगविषयीचे विविध विषयांवरील लेख, प्रश्नमंजुषा अशी भरपूर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर https://www.poynter.orgवरही जगभरातल्या विविध देशांतल्या फेक-न्यूजबाबत लेख, बातम्या वाचायला मिळतात. या वेबसाईट अधूनमधून पाहिल्या, त्यावरील लेख, बातम्या वाचल्या तरी आपल्या ‘फॅक्ट-चेकिंग’ची सवय लागू शकते.
‘ग्लोबल इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम नेटवर्क’च्या https://gijn.org/fact-checking-verification-hindi या पोर्टलवरही फॅक्ट-चेंकिगविषयी विविध प्रकारचे लेख, पुस्तिका, व्हिडिओ उपलब्ध आहेत. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट’च्या https://www.ifj.org या पोर्टलवर ‘मॅनेजिंग मिस-इन्फॉर्मेशन इफेक्ट : द स्टेट ऑफ फॅक्ट चेंकिंग इन एशिया’ हा महत्त्वपूर्ण अहवाल पीडीएफच्या स्वरूपात उपलब्ध आहे. तो इथून डाऊनलोड करता येईल. यात बांग्लादेश, भारत, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका या देशांमधील फॅक्ट-चेंकिगच्या प्रयत्नांचा थोडक्यात आढावा दिलेला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आपल्या मराठीत नाही एक म्हण आहे की, ‘मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही.’ त्यात आजच्या काळानुसार बदल करण्याची गरज आहे. ही म्हण आता ‘आपल्याला फॉरवर्ड करणाऱ्याचा हात धरता येत नाही, पण आपण फॉरवर्ड करताना हात आखडता घेऊ शकतो.’ कारण ‘फॅक्ट-चेकिंग’साठी फार वेळ लागत नाही, अगदी दोन मिनिटांच्या आत हे काम होतं.
छायाचित्रांद्वारे सर्वाधिक प्रमाणात ‘फेक न्यूज’ पसरवल्या जातात. छायाचित्रं सोयीस्कररित्या कापून किंवा फोटोशॉप करून त्यांचा वापर केला जातो. मात्र गुगलवर कुठलीही छायाचित्रं अगदी सहजपणे तपासून पाहता येतात. त्यासाठी गुगलने ‘रिव्हर्स इमेज’ ही मोफत सेवा दिलेली आहे. गुगलवर उघडलेलं कुठलंही छायाचित्र तपासून पाहण्यासाठी तुम्ही माउसचं उजवीकडचं बटन क्लिक केलं तर तळाशी ‘सर्च इमेज विथ गुगल’ असा पर्याय येतो. त्यावर क्लिक करून तुम्ही ते छायाचित्र तपासू शकता. किंवा सर्वांत वर, जिथं आपण सर्च करण्यासाठी मजकूर टाइप करतो, त्या बारमध्ये उजवीकडे चौकोनी आयकॉन असतो. त्यावर क्लिक करून, त्यात छायाचित्र टाकून किंवा अपलोड करूनही तपासू शकता. https://www.invid-project.eu या वेबसाईटवर तुम्ही व्हिडिओही तपासून पाहू शकता.
कुठल्याही बातमीची शहानिशा करायची असेल, तर ती बातमी गुगल सर्चमध्ये टाकून पाहावी किंवा आघाडीच्या, नामांकित प्रसारमाध्यमांच्या पोर्टलवर जाऊन तपासून पाहावी. तुम्ही गुगल सर्चमध्ये व्हिडिओ आणि बातम्याही पाहू-वाचू शकता. त्यामुळे ‘फेक न्यूज’पासून लांब राहू शकता.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘Use fact-checking tools’ ही गुगलची सेवा वापरून तुम्ही कुठलीही माहिती तपासून पाहू शकता. व्हॉटसअॅपवर येणारी फॉरवर्डस तपासून पाहण्यासाठी हा पर्याय सर्वाधिक चांगला आहे. संशयास्पद बातमी जेव्हा एखाद्या विशिष्ट भागाबद्दल, मॉलबद्दल, प्रसिद्ध वास्तूबद्दल किंवा भौगोलिक ठिकाणाबद्दल असेल, तेव्हा तुम्ही ‘Use Google Earth’चा वापर करून वस्तुस्थिती जाणून घेऊ शकता.
https://www.altnews.in ही भारतातील सर्वाधिक आघाडीची, लोकप्रिय वेबसाईट आहे. प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबैर या दोघांनी सुरू केलेली ही वेबसाईट इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये आहे. या बेवसाईटवर अतिशय अभ्यासपूर्ण रितीनं ‘फेक न्यूज’चा पर्दाफाश केला जातो.
मराठीमध्ये https://newschecker.in आणि https://checkpostmarathi.com ही दोन पोर्टल्स समाजमाध्यमांवरील बातम्यांची शहानिशा करण्याचे काम करतात. त्यांना तुम्ही तुमच्याकडे आलेल्या संशयास्पद बातम्या फॅक्ट-चेकसाठी पाठवू शकता.
हल्ली अमूक डे, तमूक डे असा सुळसुळाट खूप झालेला असला तरी, ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’चं आजच्या काळातलं महत्त्व गांभीर्यानं समजून घेतलं पाहिजे. या निमित्तानं शाळा-महाविद्यालयांत, प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांत विविध उपक्रम राबवले जायला हवेत. त्यात फेक न्यूज कशा ओळखायच्या याचं प्रशिक्षण देता येईल. त्यामुळे सर्वांना आपल्यावर येऊन आदळणाऱ्या माहितीची शहानिशा करणं सोयीचं जाईल आणि संबंधितांना जाब विचारता येईल, वेळ-प्रसंगी खडसावताही येईल. एक सजग नागरिक म्हणून आपण तेवढं केलं, तरी जागतिक पातळीवर ‘फॅक्ट-चेंकिंग’साठी जे प्रयत्न केले जात आहेत, त्याला आपण हातभार लावूच, पण आपल्या देशाप्रती, देशातल्या नागरिकांसाठीप्रतीही एक उत्तम जबाबदारी पाडू.
.................................................................................................................................................................
It’s International Fact-Checking Day : how to read the news like a fact-checker
.................................................................................................................................................................
How to fact-check hoaxes on WhatsApp
.................................................................................................................................................................
Fight the Infodemic: Get the #VaccineFacts (v1)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment