अरविंद केजरीवालांचा ‘बेजबाबदार पोरकटपणा’ आणि भाजपवाल्यांचं ‘नाहक आकांडतांडव’!
पडघम - देशकारण
राम जगताप
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
  • Mon , 03 April 2023
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal भाजप BJP आप AAP

या वेळचा १ एप्रिल अर्थात ‘एप्रिल फूल’ जरा जास्तच गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबद्दलची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवली होती. ती देण्याचा आदेश एप्रिल २०१६मध्ये केंद्रीय माहिती आयोगाने गुजरात विद्यापीठाला दिला होता. पण ती न देता उलट त्या विरोधात गुजरात विद्यापीठ गुजरात उच्च न्यायालयात गेले. आणि अखेर ३१ मार्च रोजी न्यायालयाने केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश रद्दबातल ठरवला आणि या रिकामटेकड्या उठाठेवीमुळे केजरीवाल यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

हा निकाल नेमका ‘एप्रिल फूल दिना’च्या पूर्वसंध्येला लागल्यामुळे फेसबुकवासीयांच्या आनंदाला जणू उधाणच आले. त्यांनी १ एप्रिलच्या पहाटेपासून उपहासगर्भ पोस्ट, ट्रेंड आणि थ्रेड चालवायला सुरुवात केली. बिचाऱ्यांना काहीतरी सेलिब्रेट करायला हवेच असते. त्यात असे खमके निमित्त मिळाल्यानं त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही!

हा खटला न्यायालयात सुरू असताना कुणाचे तरी ‘बेजबाबदार, पोरकट कुतूहल’ ही जनहिताची बाब होऊ शकत नाही, असा युक्तिवाद गुजरात विद्यापीठाच्या वतीनं करण्यात आला होता. आणि ती खरीच गोष्ट होती. पंतप्रधान पदवीधर आहेत की नाहीत, याची उठाठेव करण्याची काहीही गरज नव्हती, नाही, असू नये. पण सतत पोरकटपणा करण्यातच माहीर असलेल्या केजरीवाल यांना हे कोण सांगणार? उलट न्यायालयाने निकाल दिल्यावर त्यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली की, ‘क्या देश को ये जानने का भी अधिकार नहीं है कि, उनके PM कितना पढ़े हैं? कोर्ट में इन्होंने डिग्री दिखाए जाने का ज़बरदस्त विरोध किया. क्यों? और उनकी डिग्री देखने की माँग करने वालों पर जुर्माना लगा दिया जायेगा? ये क्या हो रहा है? अनपढ़ या कम पढ़े लिखे PM देश के लिए बेहद ख़तरनाक हैं.’ तर अलीकडेच केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत म्हटलं होतं की, ‘मोदी आजवरचे सर्वांत कमी शिकलेले पंतप्रधान आहे. त्यांचं फक्त बारावीपर्यंतशिक्षण झालेलं आहे.’

हा केजरीवाल यांच्या पोरकटपणाचा दुसरा नमुना म्हणावा लागेल. त्यांची ही धारणा त्यांच्या फाजील अहंकारातून आली आहे की, तुच्छतेतून हे कळायला मार्ग नाही. कशातूनही आली असली तरी ती भंपक आहे, एवढं नक्की.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तिसरी गोष्ट म्हणजे केजरीवाल तर उच्चशिक्षित आहेत. त्यांना कुठे, कधी, केव्हा, काय, कसे आणि किती बोलावे, याचा धरबंद असतो का? सहसा नसतो. मग त्यांच्या उच्चशिक्षणाचा काय उपयोग? शिक्षणानं माणूस सुसंस्कृत, सभ्य आणि समंजस होतो, असं म्हणतात. यातलं एक तरी लक्षण केजरीवाल यांच्यात दिसतं का? बहुतेक वेळेला तरी नाही.

भारतात श्रद्धेसारखीच एक वाईटही खोड ‘पवित्र’ मानली जाते. ती म्हणजे जी व्यक्ती यशस्वी होते, काहीतरी कर्तबगारी दाखवते, तिचं सगळंच खरं मानलं जातं. त्यात दोन वेळा दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकल्यानं आणि अलीकडेच पंजाबमध्येही विधानसभा जिंकून सत्ता स्थापन केल्यानं, तर केजरीवालांकडे ‘भारतीय राजकारणाचा भावी चेहरा’ म्हणून पाहिलं जात आहे. त्यात ते सतत पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलत असतात, त्यामुळे पुरोगाम्यांना त्यांचं जरा जास्तच प्रेम असल्याचं दिसतं.

केजरीवाल सरकारचं दिल्लीतलं काम चांगलं आहे, विशेषत: मोहल्ला कमिटी आणि शाळांबाबतची त्यांची कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाखाणली गेली आहे. हे सगळं खरं असलं तरी आपण तितकेच पोरकटही आहेत, हे केजरीवाल सतत दाखवून देत असतात. किंबहुना ते त्यांचं सुरुवातीपासूनचंच व्यवच्छेदक लक्षण राहिलं आहे. दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही सत्ता मिळाल्यानं तर त्याला जरा जास्तच धुमारे फुटले आहेत.

केजरीवालांना पंतप्रधानांच्या पदवीबाबत इतकंच कुतूहल होतं, तर त्यांनी त्यासाठी थेट ‘केंद्रीय माहिती आयोगा’कडे जाण्याची काय गरज होती? ती माहिती त्यांना गुजरात विद्यापीठामधून हस्ते-परहस्तेही मिळवता आलीच असती की! इतकी सामान्य माहिती मिळवण्यासाठी एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री इतका ‘द्राविडी प्राणायाम’ करतो, याचा अर्थच असा होतो की, त्याचं कुतूहल हे ‘बेजबाबदार आणि पोरकट’पणाचंच आहे. मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीला कसं वागावं-बोलावं, याचं भान नसेल, तर मग ती व्यक्ती उच्चशिक्षित असली तरी ‘घातक’च मानली पाहिजे.

पण हे असे चुकीचे पायंडे पाडणारे लोकच सध्या भारतात मनोरंजन क्षेत्रापासून राजकारणापर्यंत सर्वत्र लोकप्रिय असलेले दिसतात. भारतीय वृत्तवाहिन्यांना तर असा निरुपयोगी कडबा चघळायला हवाच असतो. त्याशिवाय ‘ट्वेंटी फोर बाय सेवन’ हे त्यांचं ब्रीद सार्थ कसं होणार! आणि अशा गोष्टी घडल्याशिवाय समाजमाध्यमांवरच्या जित्राबाच्या प्रतिभेला तर स्फूरणच चढत नाही! असो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

जसं केजरीवालांच्या पोरकटपणाचं समर्थन करता येत नाही, तसंच गुजरात विद्यापीठानं माहिती न देता उच्च न्यायालयापर्यंत केलेल्या उद्योगाचंही. ही वस्तुस्थिती तर कुणाला नाकारता येणार नाही की, नरेंद्र मोदी गेली नऊ वर्षं या देशाचे पंतप्रधान आहेत, त्याआधी पंधराएक वर्षं गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचा एक कवितासंग्रहही प्रकाशित झालेला आहे. ‘नयन हे धन्य रे’ या नावानं त्याचा मराठी अनुवादही आलेला आहे. ‘एक्झाम वॉरिअर्स’ हे देशातल्या विद्यार्थी आणि पालक यांना प्रेरणा देणारं त्यांचं पुस्तक पेंग्विन या प्रख्यात प्रकाशनसंस्थेनं इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित केलेलं आहे. ‘मन की बात’ची पुस्तकंही इंग्रजी-हिंदीसह इतर भारतीय भाषांतही प्रकाशित होत आहेत. याशिवाय गेल्या नऊ वर्षांत मोदींवर लिहिल्या गेलेल्या इंग्रजी, हिंदी आणि इतर भारतीय भाषांतल्या पुस्तकांची संख्या हजाराच्या घरात भरेल.

यातलं केजरीवाल यांच्याकडे काय आहे? इतके उच्चशिक्षित असूनही ते केवळ दिल्लीसारख्या छोट्याशा केंद्रशासित प्रदेशाचेच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासह त्यांच्या सगळ्या मंत्रीमंडळाची सदस्यसंख्या पाचपर्यंत भरत नाही. खुद्द केजरीवालांनी आपण सत्तेत आल्यानंतर काय करू, याची मांडणी करणारं ‘स्वराज’ नावाचं छोटंसं चोपडं लिहिलेलं आहे. म. गांधींच्या ‘हिंदस्वराज’ या पुस्तकाच्या नावाशी त्याचं साम्य आहे, एवढंच काय ते त्याचं वेगळेपण. बाकी त्यात ‘तुम्ही माझ्या हाती सत्ता सोपवा, मी जादूची कांडी फिरवून सर्व काही बदलून दाखवेन’ असा गमजा मारला आहे. या त्यांच्या पुस्तकानं काही हळहळे-हुळहुळे पुरोगामी भारावून गेले होते, त्यांनी त्याचे आपापल्या प्रादेशिक भाषांत अनुवादही केले. मराठीत तर तीन-चार अनुवाद झाले आहेत. पण केजरीवालांचं हे पुस्तक त्यांच्या विरोधकांनी तर सोडाच, पण समर्थकांनीही वाचलेलं नसावं, अशी दाट शंका आहे. आणि ज्यांनी वाचलं असेल, त्यांचा केजरीवालांबाबत भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही, इतक्या ‘युटोपियन बढाया’ त्यांनी त्यात मारलेल्या आहेत.

त्यामुळे केजरीवालांनी विनाकारण उच्चशिक्षणाच्या बढाया मारू नयेत. कारण उच्चशिक्षित माणसांकडे फार शहाणपण असतं, समंजसपणा असतो किंवा दूरदृष्टी असतेच असं नाही. आणि याच लखलखीत उदाहरण म्हणून केजरीवालांकडेच बोट दाखवता येतं. शिवाय फेसबुक-ट्विटर या समाजमाध्यमांवर जी उच्चभ्रू, उच्चशिक्षित जमात आहे, ती इतकी तुच्छतावादी आहे की, यांच्यापेक्षा निरक्षर माणसं जास्त चांगली, असंच वाटतं. या जमातीला ज्ञानाची साधी एबीसीडीही धड माहीत नसते, पण त्यांचा आव अख्खा ज्ञानसागर कोळून प्यायल्यासारखा असतो.

त्यामुळे समजा मोदी नसतील पदवीधर, तर त्याने काही फरक पडत नाही. पण ते सत्तेत आल्यापासून या देशात जे काही घडतंय, त्यातून सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिणामी अनेक संस्था, व्यक्ती सत्य बोलायलाही घाबरू लागल्या आहेत. शेवटी सामान्य माणसांना त्यांची नोकरी, कामधंदा इतर कशाहीपेक्षा, अगदी सत्यापेक्षाही प्रिय असतो. त्यामुळे ‘नसती आफत’ कशाला ओढवून घ्या, या विचारानं गुजरात विद्यापीठाने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आणि स्वत:ची सुटका करून घेतली.

आणखी एक, मोदींच्या पदवीबाबत सत्ताधारी भाजपचे जे नेते, प्रवक्ते आक्रमक होऊन त्यांचा बचाव करत आहेत, त्यामुळे खरं म्हणजे संशयास्पदतेमध्ये भरच पडतेय. मोदींना त्यांनी ‘देवत्व’ बहाल केलेलं असल्यामुळे त्यांच्याबद्दलच्या कुठल्याही प्रश्नाला सरळ उत्तर देण्याऐवजी ते आक्रमक होतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, पाया नसलेल्या कुठल्याही गोष्टीवर इमारत उभी करता येत नाही. आणि केली, तरी तिचा ‘पत्त्यांचा बंगला’च होतो. मोदीजी गेली नऊ वर्षं देशाचे पंतप्रधान आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार या देशातली जनता त्यांना २०२४मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार आहे. त्यांनी तर २०१७मध्येच ‘भाजप २०५०पर्यंत सत्तेत राहणार’ असाही दावा केलेला आहे.

आता ही किमया ज्यांच्यामुळे घडली, ज्यांच्या नेतृत्वामुळे घडते आहे, त्यांच्याकडे पदवी असली काय अन नसली काय, काय फरक पडतो? त्यात इतकं आक्रमक होण्यासारखं काय आहे?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठीत अरुण शेवते यांनी संपादित केलेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘नापास मुलांची गोष्ट’ आणि ‘हाती ज्यांच्या शून्य होते’, अशी दोन मराठी पुस्तकं आहेत. शालेय पातळीवर अपयश आलेल्या व्यक्ती पुढे चालून कशा देदीप्यमान, कर्तबगार झाल्या आणि भविष्यात अतिशय मोठं कर्तृत्व मिळवलेल्या व्यक्तींचं बालपण कसं अतिसामान्य स्वरूपाचं होतं, याच्या कहाण्या सांगणारी ही पुस्तकं आहेत. त्यांची एकेक प्रत कुणीतरी भाजपवाल्यांना भेट म्हणून पाठवली पाहिजे, आणि सक्तीनं वाचायला लावली पाहिजे. म्हणजे त्यांना त्यांच्या ‘देवा’ची शैक्षणिक अर्हता अभिमानानं सांगताना घाबरायला होणार नाही.

अर्थात, या सगळ्याचा अर्थ जे लोक ‘मोदी आपली पदवी दाखवायला घाबरले’, असा लावत आहेत, ते मूर्खांच्या नंदनवनात आहेत, हे आता ‘एप्रिल फूल’ उलटून गेल्यानंतर सांगायला काहीच हरकत नाही!

.................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......