औरंगजेब धर्मांध नव्हे, विस्तारवादी सत्तांध होता. औरंगजेबाला समजून घेताना ठरवून दुर्लक्षित केली जातात, ती तथ्ये समोर आणली पाहिजेत
पडघम - राज्यकारण
प्रज्वला तट्टे
  • ऑद्री ट्रशके यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 01 April 2023
  • पडघम राज्यकारण औरंगजेब Aurangzeb औरंगाबाद Aurangabad संभाजीनगर Sambhaji Nagar ऑद्री ट्रशके Audrey Truschke

इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांचा दै. ‘पुढारी’ आणि दै. ‘एकमत’ या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेला औरंगजेबावरचा लेख (‘औरंगजेबाचे समर्थन होऊ शकते का?’, १२ मार्च २०२३) वाचला. त्यात त्यांनी औरंगजेब धर्मवेडा, धर्मांध, विध्वंसक, क्रूर आणि निर्दयी होता, असा ठाम निष्कर्ष काढलाय. आणि म्हणून ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ असे नामकरण होत असल्यास त्याला कुणी विरोध करू नये, असे म्हटले आहे.

तसेही सत्तेसमोर शहाणपण चालत नाहीच. त्यामुळे जो सत्तेत येईल, त्याने जर इतिहासावर आधारित राजकारणाची अफू प्रजेला चाटवायची, असेच ठरवले असेल, तर कुणी काही करू शकत नाही. पण अभ्यासकांना इतिहास किंवा ऐतिहासिक पात्रे बऱ्यापैकी गुंतागुंतीची असतात, याचे भान असते. त्यामुळे ते कोणत्याच निष्कर्षावर ठाम राहू शकत नाहीत, जितके त्या इतिहासाचे राजकारण करू पाहणारे असतात. धर्मांधता, पुरोगामीत्व वगैरे संकल्पना आजचे झबले आहे, जे आपण १७व्या शतकातल्या माणसाला घालू पाहू, तर बऱ्यापैकी घोळ होऊ शकतो.

ऑद्री ट्रशके (Audrey Truschke) यांच्या २०१७मध्ये प्रकाशित झालेल्या ‘Aurangzeb : The Man and the Myth’ या पुस्तकात औरंगजेबाच्या आतापर्यंतच्या ‘धर्मांध’ प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांच्या मते सर जदूनाथ सरकार यांचे लेखन बऱ्यापैकी इंग्रजांच्या ‘हिंदू मराठे विरुद्ध मुस्लीम मुघल’ या कथनाच्या प्रभावात लिहिले गेले आहे आणि भारतीय इतिहासलेखक सहसा त्यांचेच दाखले देतात. पण समकालीन साधनांशी ताडून पहिल्यास औरंगजेबाची प्रतिमा काही वेगळी दिसते. त्यावरून असे दिसते की, तो ‘सत्तांध विस्तारवादी’ होता, हे निश्चित… अर्थात त्याच्यासारखा वारसा मिळालेला कुणीही झाला नसता तरच नवल!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अकबराच्या वेळेपासून दख्खनेवर डोळा असलेल्या मुघलांच्या वंशात तो नाही, तर आणखी कुणी तसा प्रयत्न केलाच असता, पण औरंगजेब त्या नादापायी दिल्ली-आग्र्याचे सारे ऐश्वर्य - ते मोराचे सिंहासन वगैरे - सोडून लाल तंबुमध्ये आयुष्याची शेवटची २६ वर्षे घालवत बसला. सिंहासनासाठी त्याच्या पूर्वजांनी आणि त्याच्या बंधूंनी जे केले असते, तेच त्यानेही केले. पण बापाला कैदेत टाकून सत्ता काबीज करणे इस्लामला अमान्य होते, म्हणून शहाजहाँ जिवंत असेपर्यंत त्याला मक्का-मदिनेचा आशीर्वाद मिळाला नाही. साम्राज्याच्या मुख्य काज़ीने त्याला ‘बादशाह’ म्हणून मान्यता दिली नाही, पण म्हणून काही त्याने सत्ता सोडली नाही. यातून तो ‘धर्मांध’ नसून ‘सत्तांध’ होता, हेच सिद्ध होते.

औरंगजेबापेक्षा दारा शिकोह जास्त पुरोगामी होता, असा तर्क पुढे करून ‘देशभक्त मुसलमान विरुद्ध देशद्रोही मुसलमान’ या हिंदुत्ववादी कथनाला श्रीमंत कोकाटे बळकटी देताना दिसतात. दारा शिकोहला औरंगजेबाने हरवून कैद केले. त्याच्या एका मुलासह अंबारी नसलेल्या हत्तीवरून फाटक्या वस्त्रात त्याची दिल्लीच्या रस्त्यांवरून भर उन्हात धिंड काढली नि दुसऱ्या दिवशी त्याचे शरीर धडावेगळे केले. पण दीडच वर्षांपूर्वी आग्र्यात अशीच धिंड दाराने त्याचा एक भाऊ शाह शुजाची काढली होती.

शुजानेही शहाजहाँ खाटेला खिळल्याची बातमी ऐकताच ‘अबुल फौज नसरुद्दीन मुहम्मद तैमूर ३, सिकंदर २ शाह शुजा बहादूर गाज़ी’ अशी लांबलचक पदवी घेत स्वतःला ‘बादशाह’ म्हणून घोषित केले होतेच. दाराने बनारसजवळ शुजाची फौज दयामाया न दाखवता कापून काढली होती. त्याचे वर्णन ‘युद्धभूमी लाल ट्युलिपच्या बागेसारखी चमकत होती’ असं केलेलं आहे.

कैद केल्यावर औरंगजेबाने दाराला विचारले, “तुझ्या जागी मी असतो तर तू काय केलं असतंस?” त्याचे उत्तर होते, “तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्ली शहराच्या चार प्रवेशद्वारांवर लटकावून ठेवले असते.” औरंगजेबाने दाराला हुमायूच्या कबरीशेजारी दफन केले.

थोडक्यात, दारा शिकोह क्रूरपणात कमी नव्हता. शिवाय दाराने जो हिंदू आणि इस्लामच्या मूल्यांचा मिलाफ करणारा ‘समुद्रसंगम’ हा ग्रंथ लिहिला, त्याला आजचे हिंदुत्ववादी मान्यता देतील? ते तर सुफी संतांचेही नामोनिशाण मिटवू पाहतायेत. त्यांना ‘मोघल गार्डन’ हे इंग्रजांनी दिलेले नाव नकोसे झालेले आहे. उगीच आपले म्हणत राहायचे- ‘दारा पुरोगामी, दारा सहिष्णू!’ वगैरे…

पण हे सांगितले जात नाही की, औरंगजेब-दारा शिकोह लढाईत मराठा मनसबदार औरंगजेबाकडून लढले आणि राजपूत दाराकडून. १६७९ ते १७०७ या तीन दशकांत पूर्वीच्या कोणत्याही मुघल बादशाहपेक्षा त्याने उच्चपदी दुप्पट हिंदू नेमले, ज्यातले बहुतांश मराठे होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

औरंगजेबाने शीख जाट सतनामींचे बंड चिरडून टाकले, ते सत्ता टिकवण्यासाठी, धर्मासाठी नव्हे! मुघल काळात बहरलेल्या कारखानदारीला चालना देण्यासाठी भांडवलाची गरज होती, पण इस्लाममध्ये व्याज देण्या-घेण्याला मनाई असल्यामुळे मारवाडी, शीख सावकारांना अभय आणि संरक्षण देऊन मुघल शासकांनीच त्यांची सत्ता होती, तिथपर्यंतच्या कानाकोपऱ्यात जाण्यास स्थिरावण्यास त्यांना प्रोत्साहन दिले होते.

त्या काळात व्यापारात दगाबाजी झाली, तर उद्भवणारे भांडण निपटवण्यासाठी ‘इस्लामी कायदे’च अस्तित्वात होते आणि हिंदू राजेही स्वतःच्या राज्यात कारखानदारी, व्यापार सुरळीत चालावा म्हणून तंटे-बखेडे सोडवण्यासाठी ‘काज़ी’ नेमत.

औरंगजेबाने तेगबहादूरांना शिक्षा केली होती, ती धर्मासाठी नव्हे, तर कायदा मोडला म्हणून. त्या काळातल्या शिखांनी ते धर्मावरचे आक्रमण म्हणून बघितले असते, तर तेगबहादूर सिंहांची हत्या केली म्हणून औरंगजेबाचे ताजमहालच्या तोडीचे सुंदर व सर्वांत मोठे बांधकाम असलेली लाहोरची ‘बादशाही मशीद’ शीख सम्राज्याचे संस्थापक (एकोणविसावे शतक) रणजित सिंह यांनी उडवून दिली असती… आताच्या बाबरी मशिदीप्रमाणे. सतनामींचे बंडही त्याने सशस्त्र उठाव केला म्हणून संपवले. शीख आणि सतनामी जास्त पुरोगामी होते, तरी औरंगजेबाने त्यांना संपवले, हा कोकाटेंचा तर्क पटत असेल, तर आज चीन साम्यवादी आहे, जातपात पाळत नाही, म्हणून भारतानेही चीनच्या आक्रमणाला विरोध करायला नको, असे म्हणावे लागेल.

हिंदू राजेही एकमेकांच्या मुलुखात लुटीसाठी जात, तेव्हा मंदिरे तोडत, लुटत. ‘राजतरंगिणी’ या काश्मीरच्या राजांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात (मोघलपूर्व काळ) मंदिरांचा विध्वंस करण्यासाठी, लुटण्यासाठी एक वेगळे खाते आणि अधिकारी असल्याची नोंद आहे. पण औरंगजेबाने दक्षिणेला अंकित करण्यासाठी २६ वर्षे जंग जंग पछाडताना अशी किती मंदिरे तोडली? वेरूळच्या हिंदू, बौद्ध, जैन मंदिरांबद्दल तो लिहितो, “ही अप्रतीम कलाकारी जणू प्रत्यक्षात अल्लाहनेच घडवली आहे”. वेरूळला जाणारा रस्ता त्याने बनवून घेतला होता. मेवारच्या राणा राज सिंगला तो लिहितो की, “राजा हा पृथ्वीवर अल्लाहचा प्रतिनिधी असतो... कट्टर धर्मांध पक्षपाती राजा ईश्वर निर्मित दैवी पायावर उभी सृष्टी नष्ट करत असतो.”

त्याच्याशी दगाबाजी करणाऱ्या किल्लेदारांच्या मशिदीदेखील त्याने तोडल्या, तसेच बनारसच्या काही मंदिरांमधील ब्राह्मणांना त्रास देऊ नये, त्यांना संरक्षण द्यावे, असेही फर्मान काढले. त्याची मंदिरांना संरक्षण आणि संपत्ती देणारी अनेक फर्माने आहेत. ती सध्या बाजूला ठेवूयात, पण त्याने काही मंदिरे तोडण्याची फर्मानेही काढली, त्यामागे त्याने काय कारणे दिली, ते पाहू या.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिवाजी महाराजांना आश्रय देणारी मथुरेची, बनारसची मंदिरे त्याने तोडली. तसेच ज्या मंदिरांमध्ये ‘संस्कृत ग्रंथांचा चुकीचा अर्थ काढून बहुजनांना लुटले जात होते, भ्रष्ट-अनैतिक ज्ञान दिले जात होते, चमत्कारी वैदू, भोंदू, बुवाबाजीला उधाण आले होते. त्याला भुलून दूरदूरून हिंदूच नाही, तर मुस्लीम लोक तिथे येत होते’, अशा मंदिरांच्या पुरोहित-पालनकर्त्यांना धडा शिकवण्यासाठीही त्याने ही मंदिरे पाडण्याचे हुकूम दिले होते.

मथुरेचे केशवदास मंदिर त्यातलेच. तिथे जहांगीराच्या काळापासून मुस्लिमांचीही ये-जा होती. संस्कृत शिकण्याची बहुजन हिंदूंना परवानगी नसल्यामुळे त्यांना धर्मग्रंथांचा हवाला देऊन लुबाडले जात होते. हे अकबराच्याही लक्षात आले होते. अशा ब्राह्मणांना अकबरानेही शिक्षा केल्या होत्या. ‘वाराणशीच्या मंदिरांमध्ये ब्राह्मण खूप आहेत आणि सणासुदीला देवधर्माच्या नावावर ते खूप संपत्ती जमवतात’, असा उल्लेख एका तत्कालीन फ्रँसिसी या यात्रेकरूने केलेला आहे. संस्कृत ग्रंथांचा विपर्यास करून संस्कृत न जाणणाऱ्यांना लुबाडले जाते, म्हणून अकबर ‘रामायण’, ‘महाभारत’ व इतर संस्कृत ग्रंथांचे फारसीत भाषांतर करवून घेत होता. त्याच्या प्रति काढत होता.

बहुजनांना अर्थात फारसी शिकण्यास मनाई नव्हती. त्यांनी फारसीतून आपले धर्मग्रंथ वाचावे म्हणून औरंगजेबानेही त्यांचे अनुवाद करवले. त्यासाठी अमर सिंह, चंद्रमान सारखे कवी-लेखक पदरी बाळगले. पण काही मंदिरांमध्ये वारंवार हस्तक्षेप करूनही या कुकर्माला आळा बसत नव्हता, तेव्हा त्याने ती तोडण्याचे हुकूम दिले.

शिवाय खास बनारस शहरासाठी काढलेल्या एका फर्मानात तो नमूद करतो की, ‘शरीयतनुसार प्राचीन देवालाये तोडू नयेत, पण या शहरात नवीन देवालयं बंधू नयेत.’ त्याउपरही जी बांधली गेली, ती तोडण्याचे हुकूम त्याने काढले. दारा शिकोहने संरक्षण दिलेली विश्वनाथ मंदिर आणि केशवदेव मंदिर त्याने दाराची हत्या केल्यावर तोडले, तिथल्या दाराच्या सहानुभूतीदारांना दहशत बसावी म्हणून.

दाराशी सहानुभूती बाळगणाऱ्या जोधपूर खंडेला वगैरे मंदिरेही त्याने पाडली, कारण दाराच्या हत्येनंतर त्याच्याविरुद्ध उठाव करणाऱ्या जाटांचे ते आश्रयस्थान होते. श्रीमंत कोकाटे औरंगाजेबाने सोमनाथ मंदिर पाडण्याचा हुकूम दिला होता, असा जो उल्लेख करतात, तो हुकूम अंमलात आला, याचा पुरावा नाही. ती केवळ धमकी असावी.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

औरंगजेबाला कसा बादशाह व्हायचे होते, ते त्याने कैदेतल्या बापाला लिहिलेल्या पत्रावरून कळून येते. तो लिहितो, ‘मोठा भुभाग पदाक्रांत करणारे नेहमी चांगले राजे असतातच असे नाही. असभ्य असंस्कृतांनीही अनेक देशांना बरेचदा गुलाम केले आहे आणि नंतर लगेच त्यांचे साम्राज्य कोसळले. तोच राजा सर्वोत्तम असतो, जो आपल्या सर्व प्रजेला समानतेने वागवतो.’

भीमसेन सक्सेना हा एक मुघल अधिकारी लिहितो, ‘सत्य आणि ईश्वराला साक्षी ठेवून शाहजहाँ आठवड्यातून एकदा न्यायनिवाडा करायचा, पण लोकांना तक्रारी कराव्याश्या वाटायच्या नाही. आता औरंगाजेब दिवसातून दोनदा न्यायनिवाडा करतो आणि तक्रारी मात्र वाढतच चाललेल्या आहेत.’

न्याय मिळण्याची आशा बळावली असेल, तेव्हाच लोक तक्रारी करत असतील. राज्यात सगळीकडे कायद्याचं राज्य आहे की नाही, त्याचे अधिकारीदेखील ते पाळतात की नाही, हे माहीत करून घेण्यासाठी तो राज्याच्या कान्याकोपऱ्यांतून 'अखबारीं'मधून माहिती घ्यायचा. याच ‘अखबारीं’मधून ही माहितीही मिळते की, त्याच्या काळात इस्लाम स्वीकारणाऱ्यांची संख्या घटली होती. शहरं, रस्ते सुरक्षित असावेत, तिथे दरोडे पडू नयेत, म्हणून सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी आदेश देत होता. त्यात त्याला यश आलेच असे नाही.

औरंगजेबाच्या दरबारात हिंदू होते, म्हणून तो सहिष्णू ठरत नाही, त्याची ध्येयधोरणे बघावी, असे कोकाटे म्हणतात. त्यानुसार पाहू गेल्यास औरंगजेबाने शीख, मराठे, जाट या सर्वांना आपल्या साम्राज्यात सामील करून घेण्यासाठी सुरुवातीची दहा-पंधरा वर्षे मुत्सद्देगिरीचा, वाटाघाटीचा वापर केलेला दिसतो. जसे शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावून मनसबदारी देण्याचा प्रयत्न केला, संभाजी महाराजांनी तर ती काही काळ स्वीकारलीदेखील होती. पण ते प्रयत्न फसल्यावर उत्तरायुष्यात युद्ध करून विस्तार केला.

औरंगजेब धर्मांध असता, तर त्याने आधी मराठा राज्य हिसकावले असते, पण आधी त्याने कुतुबशाही-आदिलशाही गिळली, नंतर मराठेशाही. त्याच्या राज्यात पूर्वी कधी नव्हे, इतके मराठे अधिकारी, लढवय्ये सामील झाले होते.

औरंगजेबाने पूर्वीचे मुघल बादशाह पाळत असलेल्या हिंदू परंपरांना फाटा दिला, असा आरोप त्याच्यावर केला जातो, पण त्याने इस्लामी परंपरांनाही फाटा दिलेला होता. हिंदूंमध्ये असलेल्या झरोख्यातून प्रजेला दर्शन देण्याच्या प्रथेचे पालन त्याने काही वर्षे केले, पण नंतर थांबवले, ते या कारणासाठी की, कोणत्याही कारणाने बादशाह दर्शन देऊ शकला नाही, तर तो आजारी आहे किंवा काय, अशी शंका येऊन लगेच बादशाह विरुद्ध कटकारस्थानांना सुरुवात होऊन जाई, त्याला आळा बसावा म्हणून.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सौर आणि चांद्र पंचांगांप्रमाणे येणाऱ्या वाढदिवशी स्वतःची सुवर्ण व रौप्य तुला करवून घेणे, त्याने मध्यंतरी थांबवले असले, तरी नंतर पुन्हा सुरू केले. आपल्या एका मुलाला बिदर बख्तला तो लिहितो की, “असे सोने, चांदी, तांबे, धान्य, तेल वगैरेसोबत स्वतःला तोलून घेणे आपल्या पूर्वजांच्या देशात किंवा इथल्या मुसलमानांना मान्य नसले तरी गरिबांचा त्याला फायदा होतो.”

बख्तावर खान या इतिहासकाराने लिहिले आहे की, त्याला संगीताचे उत्तम ज्ञान होते. त्यापूर्वीच्या ५०० वर्षांत लिहिले गेले नाही, इतके लेख त्याच्या काळात संगीतावर लिहिले गेले. त्याने स्वतःच्या दरबारातून गाणी-बजावणी समारंभ साजरे करणे बंद केले, ते त्या गायक वादकांना अन्य कामावर नेमणूक करून, जास्त पगार देऊन. पण त्याच्या मुलांच्या दरबारात, अन्य अधिकारी मनसबदारांच्या दरबारात संगीत पूर्वीप्रमाणे सुरूच होते. ‘गायन वादनाला आश्रय देणे ही प्रथा मुघल शासकांनी पाळायला हवी’, असा सल्ला त्याने स्वतःच्या मुलांना दिलेला आहे. त्याच्या राज्यात संगीतावर बंदी नव्हती. त्याने आंब्यांच्या अनामिक जातींना ‘सुधारस’, ‘रसना बिलास’ अशी संस्कृत नावे दिली.

शाहू महाराज आणि येसूबाईंवर त्याने इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला आणि आपल्या दोन हिंदू पत्नींना हिंदूच कसे काय मरू दिले, असा प्रश्न पडतो. उदयपुरी या त्याच्या गायिका पत्नीबद्दल तो त्याच्या काम बक्ष या मुलाला शेवटच्या दिवसांमध्ये लिहितो, ‘तुझी आई सतत माझ्या सोबत असते. मी गेल्यावर माझ्यासोबत येण्याचा (सती जाण्याची उच्चजातीय हिंदूंमधली प्रथा) तिने निश्चय केला आहे.’

१७००मध्ये मोघलांनी सतारा किल्ला काबीज केल्यावर पकडल्या गेलेल्या हिंदू-मुस्लीम कैद्यांना ‘फतवा -इ-आलमगिरी’नुसार मुस्लिमांना तीन वर्षे शिक्षा व हिंदूंनी इस्लाम स्वीकारल्यास मुक्तता, असा न्याय सुनावला, तेव्हा औरंगाजेबाने त्यात हस्तक्षेप करत सर्व कैद्यांना देहदंड दिला. अर्थात त्याला इस्लाम वाढवण्यापेक्षा सत्ता मजबूत करणे महत्त्वाचे वाटत होते.

या सत्तांध बादशाहला आपल्या स्वतःची मुले आपल्या विरुद्ध बंड करतील, अशी भीती त्याला सतत वाटत राहिली. त्याने मुलांपेक्षा नातवंडांशी संधान साधले, मुलांपेक्षा आपल्या अधिकाऱ्यांवर, मनसबदारांवर अधिक विश्वास ठेवला, त्यांना झुकते माप दिले. संभाजी महाराजांनी आश्रय दिलेल्या त्याच्या बंडखोर मुलाला अकबराला, ज्याने स्वतःला ‘बादशाह’ घोषित केले होते, तिकडे पर्शियात जाऊन विपन्नावस्थेत मरावे लागले. काम बक्ष जिंजीत तळ ठोकून असलेल्या राजाराम महाराजांच्या संपर्कात होता, म्हणून अटक केली.

राजेशाही काळातल्या विस्तारवादी सत्तांध औरंगजेबाचा उपयोग करून आजच्या लोकशाही प्रणालीत एका धर्माला ‘देशद्रोही’ ठरण्याचे राजकारण केले जात आहे. त्याआडून दिल्लीच्या संघराज्ये गिळू पाहणाऱ्या केंद्रीकृत सत्तेचे मात्र फावते. यात हे विसरले जात आहे की, तोच धर्म पाळणाऱ्या बहामनी सुलतानांनी औरंगजेबासमोरच नव्हे, तर उत्तरेतल्या पूर्वीच्याही मुस्लीम आक्रमकांसमोर शरणागती पत्करली नव्हती. त्यामुळे औरंगजेबाला समजून घेताना ठरवून दुर्लक्षित केली जातात, ती तथ्ये समोर आणण्याचा हा प्रयत्न.

.................................................................................................................................................................

लेखिका प्रज्वला तट्टे सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘सर्वंकष’ या त्रैमासिकाच्या संपादक मंडळाच्या सदस्य आहेत.

prajwalat2@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......