काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंधळ्या धृतराष्ट्रासारखा नुसताच निर्भयपणा, कणखरपणा दाखवून उपयोगाचा नाही. त्यांनी सावरकरांविषयीच्या कद्रूपणातूनही बाहेर पडण्याची तितकीच गरज आहे
पडघम - देशकारण
राम जगताप
  • काँग्रेस नेते राहुल गांधी
  • Fri , 31 March 2023
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress सावरकर Savarkar भारत जोडो Bharat Jodo

एकेकाळी महेश भूपती आणि लिएँडर पेस ही टेनिसपटूंची जोडी आपल्या खेळांची सुरुवात जोशात करायची. त्यांचा खेळ पाहून प्रेक्षकांच्या आशा प्रफुल्लित व्हायच्या. हा सामना आपण जिंकणार असं वाटायचं, पण खेळ जसजसा पुढे जायचा, तसतसा त्यांचा जोश ओसरत शेवटी भुईसपाट व्हायचा. तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये बहुतेकदा ‘सुरुवात जोशात, शेवटाला गुल’ अशा आशयाच्या बातम्या यायच्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबतीत हे अनेकदा होताना दिसते. त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ पदयात्रा काढली. त्या काळात त्यांनी अतिशय समंजसपणे, प्रगल्भतेने आणि सहजतेने जनसामान्यांशी संवाद केला. रोज संध्याकाळच्या सभेतही त्यांनी फार वादग्रस्त, वावदूक विधाने केली नाहीत. पण ही पदयात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी विनाकारण सावरकरांवर टीका करून तिला गालबोट लावले. पण तरी एकंदरीत या पदयात्रेने त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये आणि त्यांच्याविषयी ‘सावध’ भूमिका असलेल्यांमध्येदेखील बरीचशी अनुकूलता निर्माण केली.

गेल्या आठ-नऊ वर्षांत इतक्या सामान्य पातळीवर उतरून जनसामान्यांशी संवाद साधण्याची राहुल गांधींची ही तशी पहिलीच वेळ. त्यामुळे या पदयात्रेने त्यांच्या लोकप्रियतेत खऱ्या अर्थाने मौलिक भर घालण्याचे काम केले, असेच म्हणावे लागेल. तो ‘टेम्पो’ वाढवत नेण्याची गरज होती, आहे. विशेषत: २०२४ची लोकसभा निवडणूक लक्षात घेता, तर खूपच. तशा संधीही राहुल गांधींना मिळत आहेत. पण त्यांचा प्रवास अजूनही एखादी मुसंडी मारून पुढे जातो आणि मग समोरच्या लाटांना धडकून मागे येत राहतो. आपल्या प्रवासाला एक निश्चित, स्थिर आणि लक्ष्यवेधी वेग द्यायला अजूनही त्यांना जमताना दिसत नाही. खरे म्हणजे एव्हाना त्यांची सुकाणूवर पकड असायला हवी.

जानेवारी २०२३च्या शेवटच्या आठवड्यात ‘हिंडेनबर्ग रीसर्च’ या अमेरिकेतील रीसर्च आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीने भारतातील अदानी उद्योग समूहावर एक अहवाल प्रकाशित करून खळबळ उडवून दिली. तो अहवाल इतका प्रभावशाली होता की, देशातल्या ‘गोदी मीडिया’लाही त्याची दखल घेणे भाग पडले. परिणामी देशभर मोदी सरकारच्या अदानी समूहाशी असलेल्या ‘मधुर संबंधां’ची चर्चा सुरू झाली, आणि जगभर झाली ती वेगळी!. तेव्हा खासदार राहुल गांधींनी लोकसभेत जोरदार भाषण करून मोदी-अदानी यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांचे मुद्दे, युक्तिवाद आणि प्रश्न अतिशय नेमके होते. तो हल्ला इतका प्रखर होता की, त्याला प्रत्युत्तर देताना दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी यांचीही तारांबळ उडाली. त्यांनी त्यांच्या भाषणात राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, इतकेच काय पण सबंध भाषणात अदानी यांचाही नामोल्लेखदेखील केला नाही... केवळ काँग्रेस घराणे आणि त्यांच्या गडबडी यांवरच आगपाखड केली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की, मोदी याचा ‘हिशेब’ नक्की वसूल करणार. आणि हे तेव्हाच राहुल गांधींनाही कळायला हवे होते. राजकारणात, त्यातही तुम्ही साक्षात सत्ताधारी पक्षालाच नामोहरम करता, तेव्हा संधी मिळताच तो पक्ष त्याची भरपाई करायचा प्रयत्न करतो, हे आता कुणी राहुल गांधींना सांगण्याची गरज नसावी.

पण दुर्दैवाने ते सावध झाले नाहीत, असेच दिसते. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात भारतातील सद्य राजकीय स्थितीवर आणि मोदी सरकारच्या दडपशाहीवर पुन्हा जोरदार टीका करणारे भाषण केले. त्यावर सत्ताधारी भाजपने ‘राहुल गांधींनी परदेशात भारताची बदनामी केली’ असा कांगावा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून फार काही साध्य होत नाही, हे लक्षात आल्यानंतर संसदेच्या अधिवेशनात राहुल गांधींनी देशाचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागावी, अशी रणनीती आखून संसदेचे कामकाज चालू दिले नाही.

कारण उघडे होते, राहुल गांधींना घेरून अदानी प्रकरणावरचे प्रसारमाध्यमांचे आणि देशातल्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे. पण अदानी प्रकरणाचा पुरेसा गवगवा झाल्याने राहुल गांधींची पुरती कोंडी केल्याशिवाय आपला उद्देश साध्य होणार नाही, हेही सत्ताधारी भाजपला कळून चुकले होते. त्यामुळे त्याने राहुल गांधींना कुठे खिंडीत गाठता येते का, याचा विविध पातळ्यांवर शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा सुरतमधला सत्र न्यायालयातला खटला उपयोगी पडला. २०१९मध्ये कर्नाटकात राहुल गांधींनी ‘मोदी’ आडनावाबाबत केलेल्या टीकेवरून त्यांच्यावर या न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यात राहुल गांधी दोषी ठरून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली. खरे म्हणजे सुरतच्या न्यायालयाने स्वत:च या शिक्षेला दोन महिने स्थगिती देत, राहुल गांधींची जामिनावर सुटका करत, त्यांना वरिष्ठ न्यायालयात जाण्यासाठी महिनाभराचा कालावधी दिला आहे. म्हणजे ही शिक्षा अजून कायम झालेली नाही. राहुल गांधी त्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतात.

तरीही सत्ताधारी भाजपने द्रूत वेगाने हालचाली करून राहुल गांधींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ही शिक्षा जाहीर होताच, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी कायदेशीर तरतुदींचा आधार घेत राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द केले. त्याशिवाय त्यांना सरकारी निवासस्थान सोडायला सांगितले. त्यावर बोलण्यासाठी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एका भाजपसमर्थक पत्रकाराला ‘तुम्ही भाजपचा बिल्ला लावून का येत नाही?’ असे खडसावले, तर एका पत्रकाराच्या तिरकस प्रश्नाला ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. आणि गांधी कुणाची माफी मागत नाहीत’, असे दर्पोक्तीपूर्ण, संदर्भहीन उत्तर दिले. त्याची खरंच काही गरज नव्हती. उलट त्यांनी त्या पत्रकाराच्या खवचट प्रश्नाला आपण मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेला नेमका कुठला, कसा संदर्भ होता, त्याकडे कसे पाहायला हवे, अशा आशयाचे उत्तर द्यायला हवे होते. पण तसे काही न करता त्यांनी विनाकारण सावरकरांना मध्ये ओढून विषयाचे गांभीर्य तर घालवलेच, पण सत्ताधारी भाजप आणि मोदी सरकारला आयतेच नवे कोलित दिले.

केंद्र सरकारने सावरकरांबाबतच्या राहुल गांधींच्या विधानाचे अजून तरी फार भांडवल केलेले दिसत नाही, पण प्रसारमाध्यमांना चघळायला विषय मिळाला. त्यातून भाजप सरकार अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना बळच मिळाले. महाराष्ट्रात तर रणकंदन माजले. राज्य सरकारने, सावरकर भक्तांनी, सावरकरांच्या नातेवाईकांनी राहुल गांधींवर टीका केली. राज्य सरकारने राज्यभर ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्याचा निर्धार केला. महाराष्ट्र भाजपप्रमाणे शिवसेनेचाही सावरकर हा प्रेमाचा, श्रद्धेचा विषय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही मालेगावच्या सभेत राहुल गांधींवर टीका केली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

त्यामुळे मराष्ट्रातल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-सेना या युतीपुढे पेचप्रसंग निर्माण झाला. तेव्हा शरद पवारांनी ‘आपल्याला मोदींविरोधात लढायचे आहे की, सावरकरांविरोधात?’ असा प्रश्न करत आघाडीच्या आणि विरोधकांच्या एकीसाठी राहुल गांधींनी सावरकरांवर यापुढे टीका करू नये, असे सुचवले. सोमवारी (२७ मार्च) पवारांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला सोनिया-राहुल गांधी उपस्थित राहिले, पण ठाकरे गटांचे सदस्य अनुपस्थित राहिले. या बैठकीतही पवारांनी सावरकरांवरून आपल्यात फूट पडू शकते, हे सोनिया-राहुल गांधी यांना सांगितले. थेट पवारांनीच कान टोचल्यावर राहुल गांधींनी यापुढे आपण सावरकरांवर टीका करणार नाही, असा आता शब्द दिला. पण सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करू, असा इशारा दिलाच आहे.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी (२८ मार्च) मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी ‘मुंबई सर्वोदय मंडळा’ने आायोजित केलेल्या भाषणातही गाफीलपणामुळे राहुल गांधींना वेगवेगळ्या परिणामांचा सामना करावा लागत आहे, असे मत मांडले. राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या टीकेबाबत ते म्हणाले, “एखाद्या मृत व्यक्तीच्या, विशेषत: स्वातंत्र्यलढ्यात विशेष योगदान असलेल्या व्यक्तीबाबत वारंवार विधाने करणे योग्य नाही. महाराष्ट्रात येऊन राहुल यांनी तेच केले. एखादा मृत पुढारी अथवा देशभक्ताबाबत बोलताना भान ठेवून बोलावे. अभ्यास अथवा योग्य संदर्भ न लावता त्यांच्यावर ‘पळपुटा’, ‘माफी मागण्याची सवय’ असल्याची वक्तव्य करू नयेत.” आणि ते यथायोग्यच आहे.

दरम्यान मोदी सरकारला राहुल गांधींना घेरण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. म्हणजे जी तडाखेबंद सुरुवात राहुल गांधींनी केली होती, त्यात त्यांनी सावरकरांना विनाकारण ओढून स्वत:च तिच्यावर पाणी ओतले!

राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आणि लोकसभा सभापतींनी तातडीने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर समाजमाध्यमांवर चरणाऱ्या पुरोगामी जित्राबाला भरपूर कडबा मिळाला. न्यायालयाच्या पक्षपातीपणापासून लोकशाहीच्या धोक्यापर्यंत त्यांनी बऱ्याच कोकरउड्या मारल्या. मोदी सरकार हुकूमशहासारखे वागतेय, या देशातल्या लोकशाहीचा गळा आवळला जातोय, न्यायालये सत्ताधाऱ्यांची अंकित झाली आहेत, अशी नेहमीप्रमाणे बरीच चर्चा झाली. पण त्यातून मनोरंजन-मूल्यापलीकडे काहीही साध्य होत नाही.

थोडक्यात, राहुल गांधींच्या सावरकरांवरील टीकेने मोदी सरकारला फारसा काही फरक पडला नाही. आणि तसा पडणार नव्हताच. मोदी सरकारला सावरकरांचे तसे फार प्रेम आहे, असे गेल्या आठ-नऊ वर्षांत फारसे दिसलेले नाही. असते, तर सावरकरांना ‘भारतरत्न’ या भारतातल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने मरणोत्तर सन्मानित करून भाजपला एव्हाना चांगलीच शेखी मिरवता आली असती! पण तसे काहीही अजून तरी मोदी सरकारने केलेले नाही, हे काय राहुल गांधींना दिसत नाही?

दुसरी गोष्ट. अदान प्रकरणाबाबत राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना मोदी सरकारने अजून उत्तर दिलेले नाही. त्यामुळे तेच प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित करून त्यांची उत्तरे मागत राहण्याचे आणि या विषयावरचा ‘फोकस’ दुसरीकडे वळणार नाही, याची काळजी घेण्याचे भान राहुल गांधींना दाखवता आलेले नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मोदी सरकारविरोधात सातत्याने शड्डू ठोकून उभे राहणारे एकटे राहुल गांधीच आहेत, हे आता भारतीय जनतेलाही कळून चुकले आहे. त्यामुळे ते निर्भय आहेत, हे त्यांना पटले आहे. मोदी सरकारने त्यांची ‘पप्पू’, ‘शहजादे’, ‘माँ-बेटे की सरकार’ म्हणून संभावना केली. इतर विविध प्रकारे त्यांची बदनामी केली. विविध आरोप केले. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणावरून त्यांची चार-पाच वेळा ईडी कार्यालयात बोलावून चांगली दहा-दहा तास चौकशी केली. तरी राहुल गांधी डगमगले नाहीत. त्यांच्यावरच्या मानहानीकारक टीकेनेही ते कधी फार व्यथित झाल्याचे दिसले नाही. पण केवळ निर्भयता एवढ्याच एका गुणाच्या जोरावर तुम्ही सदासर्वदा बाजी मारू शकत नाही, ‘बाजीगर’ होऊ शकत नाही.

अनेकदा राहुल गांधी आपल्याकडचे हत्तीचे बळ आंधळ्या धृतराष्ट्रासारखे विनाकारण वाया घालवतात, असेच दिसते. सुरतच्या न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आपण उच्च न्यायालयात दाद मागू असे त्यांनी निदान जाहीरपणे तरी म्हटले नाही आणि मोदी आडनावांवर केलेल्या टीकेमागची पार्श्वभूमी, संदर्भही सांगितले नाहीत. उलट तुम्ही काहीही करा, मला तुरुंगात टाका, मारा, मी माघार घेणार नाही, अशी विधाने केली. ती खरे तर बेजबाबदारच ठरतात. प्रसंग काय आणि तुम्ही बोलताय काय? हा सगळा प्रकार हिंदी सिनेमातल्या सर्वगुणसंपन्न, सर्वशक्तिशाली हिरोसारखाच झाला! माफी न मागताही आपली भूमिका स्पष्ट करता येतेच की! 

अजून एक म्हणजे, सतत सावरकरांच्या माफीनाम्यांची चर्चा करायला, ते तुम्ही आज शोधून काढले आहेत का? ते काम ऐंशीच्या दशकातच य. दि. फडक्यांसारख्या अभ्यासकांनी करून ठेवलेय. आणि त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सावरकर आणि त्यांचे माफीनामे ही स्वातंत्र्यपूर्वकाळातली घडामोड आहे. आता तो केवळ इतिहासाचा भाग म्हणूनच शिल्लक आहे. मग सद्य वर्तमानात त्याची सतत आळवणी कशासाठी? त्यातून काय साध्य होणार? त्यामुळे आजचे भारतीय राजकारणासमोरचे, लोकशाहीसमोरचे प्रश्न सुटणार आहेत?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आजवर हिंदुत्ववाद्यांनी महात्मा गांधींची बदनामी केली, त्यामुळे आता आम्ही सावरकरांच्या माफीनाम्यांची चर्चा केली, तर काय बिघडले, असा पुरोगाम्यांसारखा भंपक युक्तिवाद तुम्हीही करणार असाल, तर मग तुमच्यात आणि हिंदुत्ववाद्यांत फरक तो काय? ते तर बोलून-चालून महात्मा गांधींचा द्वेषच करतात, पण तुम्ही तर महात्मा गांधींचे पूजक, प्रशंसक आहात ना? मग तुम्ही महात्मा गांधींप्रमाणे ‘क्षमाशील’ का होत नाही? तुम्ही आणि तुमची बहीण प्रियंका, वडिलांच्या खुन्यांबाबत उदारता दाखवू शकता, त्यांची भेटही घेऊ शकता, तर मग सावरकरांबाबत इतके उग्र, आक्रमक का होत आहात? त्यांचे माफीनामे हा काही आता ‘राजकारण’ करत राहावा, असा मुद्दा आहे का?

इतिहासातली मढी उकरून वर्तमान प्रश्नांना दुय्यम करू पाहणाऱ्या राजकारण्यांकडे कितीही निर्भयता असली तरी ते सवंगताप्रियच असतात. आणि अशा नेत्यांची निर्भयता एखाद-दुसऱ्या सवंगपणामुळेही मातीमोल होऊ शकते, हे राहुल गांधींना कळत नाही? नसेल कळत समजा, तर त्यांच्या पक्षात हे कळण्याइतका दुसरा कुठलाच नेता नाही?

म. गांधींचा आदर्श जाऊ द्या, किमान आई सोनिया गांधी यांचा तरी आदर्श राहुल गांधींनी घ्यायला काय हरकत आहे? त्यांनी युपीए एक आणि दोनच्या सत्ताकाळात आक्रताळ्या डाव्यांपासून विविध पक्षांची यशस्वीपणे मोट बांधली होती. आता तर तुम्ही सत्तेत नाही, त्यामुळे तुम्हाला सर्व विरोधी पक्षांना कसे बरोबर घेता येईल, एकत्र आणता येईल, याचा जास्त विचार करायला हवा. पण राहुल गांधी ‘एकला चलो रे’छाप बाणा दाखवत राहत आहेत. ते ममताबॅनर्जी यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत कुठल्याच विरोधी पक्षनेत्याला एकत्र आणण्यासाठी, ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत. नुसते स्वत:च ‘हिरो’ होण्याचा प्रयत्न करत राहताना दिसतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्यामुळे राहुल गांधींबद्दल हल्ली जरा शंकाच वाटू लागली आहे. उद्या सुरत न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाकडून आणि सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती नाही मिळाली तर? त्यांची खासदारकी जाऊ शकते, ते तुरुंगात जाऊ शकतात आणि वायनाडमध्ये खासदारकीची पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते! थोडक्यात, काट्याचा नायटा होऊ शकतो.

२०२४ची लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे मोदी सरकार आणि भाजप-संघ राहुल गांधींना शक्य तितके नामोहरम करण्याचा, कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारच आहेत. त्यामुळे त्यांनी केवळ निर्भयपणा, कणखरपणा दाखवून उपयोगाचा नाही. उलट अधिक हुशारीने, चतुरपणे आणि प्रसंगी धूर्तपणेही वागले-बोलले पाहिजे. मुख्य म्हणजे इतकी वर्षं हिंदुत्ववाद्यांनी म. गांधींना ‘खलनायक’ केले, म्हणून आता मी सावरकरांना ‘खलनायक’ म्हणून रंगवत राहतो, या कद्रूपणातून बाहेर पडण्याची गरज आहे.

.................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Parag Jagtap

Sat , 01 April 2023

This is cowardice masquerading as journalism. Instead of calling out the mockery of justice in the court order you are blaming Rahul Gandhi for telling the truth?

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......