अजूनकाही
१९९०-९१ची गोष्ट. मी सहावीत असेन. मामाच्या गावी शिकत होतो. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडेगाव... हिरव्यागार शेतांनी डवरलेलं आणि हिरव्यागार झाडांनी बहरलेलं. शहरीकरणाचा कुठलाही स्पर्श नसलेलं टुमदार गाव. पण काही दिवसांनी अंबड-परतूर या दोन तालुक्यांना जोडणारा डांबरी रस्ता या गावाहून गेला आणि त्यात थोडासा बदल झाला. बसस्टँड गावाबाहेर झालं होतं. मग हळूहळू त्याच्या आसपास वस्ती वसायला सुरुवात झाली. त्यामुळे गावाचे दोन भाग झाले. गावाचे पुढारी चांगले असावेत, कारण बसस्टँडपासून गावात आतपर्यंतही डांबरी रस्ता झाला. आम्ही नव्या वस्तीत राहत होतो. जिल्हा परिषदेची शाळाही या नव्या वस्तीतच सुरू झाली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रही. पण बाकी बऱ्याच गोष्टी गावातच होत्या.
त्यापैकीच एक म्हणजे दुमजली सभामंडप असलेलं आणि अतिशय नक्षीदार घुमट असलेलं मारुतीचं मंदिर. त्याच्या गाभाऱ्यासमोरची घंटा हे आम्हा मुलांसाठी मोठं आकर्षण असायचं. ती वाजवली की, कितीतरी वेळ सभामंडपात आवाज घुमत राहायचा. त्याचे पडसाद गाभाऱ्यातूनही ऐकायला येत. ग्रामीण भागातल्या सगळ्याच मंदिरांना देतात, तसे गडद रंग याही मंदिराच्या उंच घुमटाला दिलेले होते. त्यावर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. त्या सगळ्यांना असेच गडद रंग देऊन ठसठशीत केलेलं होतं. त्या मूर्ती आम्ही येता-जाता माना उंचावून पाहत असू.
तर या मंदिरात विविध कार्यक्रम होत. पण सकाळी सकाळी होणारे दोन कार्यक्रम जास्त आवडायचे. हनुमान जयंती आणि रामनवमी. दोन्ही दिवशी आजी भल्या सकाळी उठवायची. आंघोळ करून मंदिरात पाठवायची. डांबरी रस्त्यानं भल्या सकाळी चालताना आम्हा मुलांना फार मज्जा यायची. नुकताच उगवलेला दिवस अत्तराचा फाया मारून आल्यासारखा सुगंधानं आसमंतात दरवळत असायचा.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
जिल्हा परिषदेची शाळा ओलांडली की, दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं लागायची. डाव्या बाजूला डांबरी रस्त्याला लागूनच मोठी पांदी होती. भली मोठी आणि खोल. तिच्यात डोकावून पाहायचीही आम्हाला भीती वाटायची. पण मनातून पाहावंसंही वाटायचं. म्हणजे एखाद्या परिकथेतल्या गोष्टीसारखं ते दृश्य वाटायचं. असं वाटायचं की, हा रस्ता कधी संपूच नये. पण पूर्वी टीव्हीत येई, तशी थोडीशी खरखर यावी, तशी डाव्या बाजूला गाववस्ती लागायची, उजव्या बाजूला मात्र शेतंच. या परिकथेसारख्या रस्त्यावरून चालत असताना क्षणभर हे वास्तवाचं दर्शन होतं न होतं, तोच पुन्हा मंदिरात प्रवेश होई. पुन्हा दुसऱ्या परिकथेत प्रवेश केल्यासारखं वाटायचं.
आई-वडिलांनी काय विचार करून माझं नाव ‘राम’ ठेवलं माहीत नाही. पण आपलं नाव ज्याच्या नावावरून ठेवलंय, त्याचा जन्म असा उत्साहानं, भल्या सकाळी साजरा केला जातो, याचा आनंद व्हायचा. गावात, त्यातही कृषीपरंपरेत जन्मदिवस वगैरे साजरं करण्याचं ‘कल्चर’ तेव्हा तरी शिरलेलं नव्हतं. त्यामुळे आपल्या नावाच्या एका चांगल्या देवाचा गावकरी उत्साहानं ‘जन्म’दिवस साजरा करतात, याचा आनंदच व्हायचा.
वर्गातल्या काही मुला-मुलींच्या जन्मदिवसाच्या तारखा वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्या दिवशी इतर कुणाकुणा महापुरुषांचे, समाजकार्यकर्त्यांचे, साधुसंतांचे जन्म झालेले होते. माझ्या जन्मदिवशी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी असं काही नव्हतं, निदान तेव्हा तरी ते कुणी सांगितलं नव्हतं, खरं तर आजही. त्यामुळे त्यातल्या त्यात दिलासा मिळायचा, तो ‘रामनवमी’लाच.
रामाच्या गोष्टी आजी-आजोबांकडून ऐकत ऐकत मोठा होत गेलो. १९९२ साली अयोध्येत रामाचा, राममंदिराचा जयघोष करत बाबरी मशिद पाडली गेली, तेव्हा मी जेमतेम १२ वर्षांचा होतो. आमच्या गावात काही अनुचित प्रकार घडल्याचं आता तरी आठवत नाही. पुढे शिक्षणासाठी पुण्यात आलो. मूळ ‘रामायण’ वाचलं. त्याची स्त्रीवादी दृष्टीकोनापासून अब्राह्मणी दृष्टीकोनापर्यंत अनेक पद्धतीची चिकित्सा वाचली. तरीही बालपणातली ती रामाची ‘फँटसी’ काही कमी झाली नाही.
लहानपणी आजीच्या तोंडून ‘राम म्हणू राम, नाही सीतेच्या तोलाचा, हिरकणी सीतामाई, राम हलक्या दिलाचा’ असं एक लोकगीत ऐकायला मिळायचं. त्यात रामाबद्दल तक्रार होती, पण तीही लाडिकपणे केल्यासारखी वाटायची. सीतेच्या हट्टापायी धोका असूनही मृगयाच्या मागे जाणारा, सीतेचं अपहरण झाल्यानंतर वेडापिसा झालेला, ती आणण्यासाठी युद्ध करणारा, नंतर तिला वनवासात पाठवणारा आणि नंतर धरणीमातेच्या उदरात गडप व्हायला भाग पाडणाराही रामच होता. तरीही त्याचं ‘मर्यादा पुरुषोत्तम’ असणं भावत राहिलं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
२००३-०४ साली लक्ष्मीनारायण बोल्ली यांचं ‘दक्षिण भाषेतील रामायणे’ ही पुस्तक वाचलं, तेव्हा लक्षात आलं की, मौखिक परंपरेतून चालत आलेल्या ‘रामायणा’ची लोकपरंपरेत हेतुपुरस्सर, सोयीस्कर, अनावधानानं आणि काळानुसार वेगवेगळी संस्करणं होत आली आहेत. त्यामुळेच भारतातल्या प्रत्येक राज्यांत, भाषेत ‘रामायणा’च्या लोककथेत फरक असलेला दिसतो.
पण तरीही कधी त्यातला राम परका, अनोळखी वाटला नाही. तो कायम ‘आपला’च वाटत राहिला. पण हल्ली तसं वाटत नाही. गेल्या काही वर्षांत रामनवमीच्या निमित्तानं शहरात ठिकठिकाणी रामाची मोठमोठी बॅनर्स लागतात. त्यांच्याकडे पाहून वाटतं- हा आपण ज्या गोष्टी लहानपणापासून ऐकत आलोय, त्या ‘रामायणा’तला हा राम आहे? ‘सियावर रामचंद्र की जय’ असा आपण जयघोष करत असू, तो हा राम आहे? या बॅनरवरच्या रामात कुठलीच ओळखीची खूण दिसत नाही, तो भलताच कुणीतरी वाटतो.
मधल्या काळात हिंदी सिनेमातले सगळेच हिरो जम्बो, रॅम्बो आणि मस्क्युलर दिसत. हल्ली बॅनरवर दिसणारा राम मला तसाच जम्बो, रॅम्बो आणि मस्क्युलर वाटतो. या महाकाय, शक्तिशाली, बलदंड आणि एखाद्या शिल्पासारख्या दिसणाऱ्या रामाबद्दल ‘आपले’पणा वाटत नाही. याचं आणि आपलं नातं नाही, ओळखही नाही, असंच वाटत राहतं.
इतकंच कशाला, जी आपल्या जवळची, ओळखीची माणसं आहेत, ज्यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो, ती कालपर्यंत ‘द स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाईड’मधल्या डॉ. जेकिलसारखी वाटायची. पण हल्ली ती डॉ. जेकिल कमी आणि मि. हाईडच जास्त वाटू लागली आहेत. जणू या मि. हाईडनी सगळ्या डॉ. जेकिलना मारून टाकलंय, आणि ती आता डॉ. जेकिल म्हणून उजळ माथ्यानं वावरताहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात प्रचंड संशयास्पदता भरलेली असते. विचारांत आक्रमकता असते आणि इतरांबद्दल कमालीची तुच्छता. त्यामुळे ही कुठली तरी वेगळीच माणसं आहेत, आपल्या माणसांसारखी दिसणारी, पण प्रत्यक्षात तशी नसलेली, असंच वाटत राहतं.
यश, कर्तृत्व, महत्त्वाकांक्षा, स्वार्थ, अपघात अशा अनेक गोष्टींमुळे माणसं बदलतात, पण देवांचं तसं नसतं. ते वर्षानुवर्षं आहे तसेच असतात, राहतात, असं लहानपणापासून आजी-आजोबा-आई-वडील-नातेवाईक यांच्याकडून ऐकलेलं. त्याचे पुरावे दिले जात, त्यामुळे ते खरंही वाटे. पण याही आता ‘इतिहासजमा’ समजुती झाल्या आहेत. आणि राम हे त्याचं सर्वांत प्रखर उदाहरण आहे.
वास्तव ‘फिक्शन’ म्हणून सादर केलं जातं, हे आपण ललितसाहित्यात, सिनेमा-नाटक, शिल्पकला-चित्रकला यांसारख्या ललितकलांमध्ये पाहतो. रामाची हल्लीची जम्बो, रॅम्बो आणि मस्क्युलर प्रतिमा पाहिली की, फिक्शनच वास्तव म्हणून सादर केलं जात असल्यासारखं वाटतं. या उलटापालटीतून वास्तवाचं विकृतीकरण आणि फिक्शनचं बटबटीकरण होतं असल्याचंच दिसत राहतं.
हल्ली एआय (Artificial intelligence), एआर (Augmented reality), ट्रोल्स (Trolls), बॉट (Bot), अल्गोरिदम (Algorithm), चॅट-जीपीटी (ChatGPT) या गोष्टींबद्दल खूप बोललं जातंय. वेगवेगळ्या स्तरांत, वेगवेगळ्या सुरात आणि वेगवेगळ्या स्वरात त्यांबद्दल चर्चा होतेय. पण हे सगळं ‘व्हर्च्युअल वर्ल्ड’मध्ये घडतंय, वास्तव जगात नाही, असंही सांगितलं जातं, पण तसं नाहीये. कारण या सगळ्यांचे वापरकर्ते तुम्हीआम्हीआपणसगळेच असल्यानं या गोष्टी झपाट्यानं ‘व्हर्च्युअल वर्ल्ड’मधून ‘वास्तव परिस्थिती’त उतरत आहेत. कुठल्या तरी अज्ञात ग्रहावरच्या एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी लष्करी शिस्तीत पॅराजम्पिंग करावं, तशा त्या आपल्या वास्तव जगामध्ये एकामागून एक उतरताहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
खरं तर त्यांची उतरण्याची ठिकाणं काही अज्ञात, दुर्गम नाहीत. तरीही आपल्यापैकी बहुतेकांना त्याची खबरबात नसते. अशा घडामोडींची बित्तंबातमी हल्लीच्या प्रसारमाध्यमांमध्येही वाचायला मिळत नाही. दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे अक्राळविक्राळ एलियन्स आपल्या जगात मिसळून जात आहेत, आणि तरीही आपल्याला त्याचा थांगपत्ता लागत नाही.
कारण ते स्वतंत्र अस्तित्व घेऊन येत नाहीत, तर आपल्यापैकी अनेकांच्या शरीरात छुप्या मार्गानं घुसखोरी करून अवघा शरीरप्रदेश-मेंदूप्रवेश काबीज करत आहेत. त्यामुळे नक्की मूळ माणसं कोणती आणि एलियन्सनी परकायाप्रवेश केलेली माणसं कोणती, यातला फरक सहजासहजी ओळखू येईनासा झालाय.
त्यामुळे आपण ज्या वास्तव जगात वावरतो, त्यातल्या आपल्या ओळखीच्या सगळ्याच खाणाखुणा नाहीशा होऊ लागल्या आहेत. लहानपणी ऐकलेल्या लोककथा, परिकथा यांच्या आता ‘भयकथा’ होऊ लागल्या आहेत. यापुढच्या काळात बहुधा आपल्याला आपल्या अस्तित्वाचे पुरावे, संदर्भ देण्यासाठी इतिहासाची दप्तरं उपसावी लागतील… अर्थात तीही शिल्लक राहिली तरच.
माणसांचे मुखवटे पांघरलेली भलतीच कुठली तरी जमात, माणसांना माणसांतूनच हद्दपार करत आहे. केवळ माणसांनाच नाही, तर त्यांचा वर्तमान, इतिहास आणि भविष्यकाळही…
.............................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment