‘दरम्यानचे प्रक्षोभ’ : सामान्य माणसाची संभ्रमावस्था, परिस्थितीशरणता आणि सामान्य माणसाच्या जगण्याची अजिबात चाड नसलेलं अनैतिक आचरण यांची अभिव्यक्ती
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • ‘दरम्यानचे प्रक्षोभ’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Thu , 23 March 2023
  • ग्रंथनामा शिफारस दरम्यानचे प्रक्षोभ Darmyanche Prakshobh विनायक येवले Vinayak Yewale

सद्यकाळात कोणत्याही भूप्रदेशात अनेकवार अनुभवास येणारा जात-धर्म-पंथ-लिंग आदी बाबींशी निगडित असलेला हिंसाचार, सामाजिक आणि व्यक्तिगत संबंधांतील अमानुष व्यवहार, सगळ्या गोष्टी स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी अवलंबण्यात येणारा स्वार्थीपणा, राजकीय स्तरावरील लोकांचं भ्रष्ट आणि सामान्य माणसाच्या जगण्याची अजिबात चाड नसलेलं अनैतिक आचरण, सामान्य माणसाची संभ्रमावस्था, परिस्थितीशरणता, यांची अभिव्यक्ती करणाऱ्या उत्तम कविता विनायक येवले यांच्या ‘दरम्यानचे प्रक्षोभ’ या संग्रहात वाचायला मिळतात.

त्यांनी व्यक्तिगत जीवनातील दुःख, पराकोटीचं वैफल्य यांविषयीही कविता लिहिल्या आहेत. अशा कवितांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कवितांतील व्यक्तिगत दुःखाला कवी व्यापक समूहाच्या दुःखाशी जोडून घेतो. उदाहरणार्थ, बेरोजगारीतून येणारी निराशा, चांगलं शिक्षण घेऊनही कुटुंबाची स्वप्नं पूर्ण करण्यातील असमर्थता, व्यवस्थेशी तडजोडी न करता जगण्याच्या निर्धारामुळे वाट्याला येणारी उपेक्षा… त्यांविषयी लिहिलेल्या ‘पंचांग’, ‘सुसाईड नोट’, ‘क्लॉक हावर...’, ‘एक्स्पायरी डेट...’, अशा काही कविता या निव्वळ व्यक्तिगत व्यथा सांगण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत. आपल्या वाट्यास येणाऱ्या या जगण्यास प्रस्थापित व्यवस्थेतील निरनिराळे घटक अनेक पातळ्यांवर कारणीभूत ठरतात, याची जाण कवीला आहे. ती या कवितांतून प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते.

कवी धर्म, जात, भाषा, प्रांत या सर्वसामान्य माणसांत फूट पाडणाऱ्या आणि माणसातलं माणूसपण हिरावून घेणाऱ्या बाबींवर अनेकदा टीका करतो. प्रतीकांच्या आहारी जाऊन समाजातले घटक आपापसांत झगडत राहतात, म्हणून कवीला ‘वर्तमान हा प्रतीकांच्या खुंटीला अडकून ठेवलाय’ असं वाटतं (‘सवयीचे गुलाम...’).

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या अस्मितांचे विषय केंद्रस्थानी आणून समाजात हुल्लडबाजी करण्याचं राजकारण खेळलं जात आहे. त्यातून घडणाऱ्या हिंसाचारात अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झालेली आहेत. माणसांच्या मनात इतरांविषयी कायमस्वरूपी टिकून राहतील, अशा संशयाच्या भिंती उभ्या केल्या गेल्या आहेत. या भिंती ढासळणार नाहीत, याची खबरदारी ही व्यवस्था घेत असते. त्यातून प्रस्थापित व्यवस्थेच्या धुरिणांना तात्कालिक लाभही मिळतात, पण या अस्मितांच्या बेचक्यात अडकल्यामुळे माणसांतील माणूसपण मात्र हरवत जातं. जनतेच्या डोळ्यांसमोर एखाद्याचा खून होत असतो, पण त्या माणसाला वाचवण्याऐवजी ‘व्हिडिओ’ क्लिप बनवण्याचा ‘फिवर’ १०४वर पोहोचलेला असतो (‘प्राक्तनाचे खिसे’).

आपल्यातील करुणा, मानवता शोषून घेणारं, अस्वस्थ करणारं हे वर्तमान कवीला विद्ध करतं. ‘नवी दवंडी’, ‘सद्भावनेचं गुणोत्तर’, ‘हिंसेने माखलेल्या...’, ‘आसक्तीची जळमटं...’, ‘काळाची घसरगुंडी’, ‘द्वेषाचं लाक्षागृह...’ अशा अनेक कवितांतून आजच्या हिंसक, अमानुष वर्तमानाची ओळख करून दिली जाते.

जिथे नवनिर्मिती होत असते, तिथेच आसपास कुठेतरी विनाशाची पावलंही दिसू शकतात, हे आजचं वास्तव कवी ‘ज्या डोंगराच्या पोटातून सूर्य उगवतो त्याच्या पायथ्याशीच बंदुकीच्या फैरी झडतायत’ असं लिहून अधोरेखित करतो (‘प्रतिध्वनी’). समाजात दंगली घडवून आणण्याची क्षमता असेल, तर धर्ममुखंड अशा लोकांच्या बाजूने उभं राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. इतकंच काय, राज्यकर्ते, शासनसंस्था आपली सगळी ताकद आणि यंत्रणा या गुन्हेगारांच्या बचावार्थ वापरत असल्याचंही आपण वारंवार पाहतो.

गेल्या काही वर्षांत आपण अशा गुन्हेगारांचा जाहीर सत्कारदेखील जनतेने निवडून दिलेल्या आणि धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व अंतर्भूत असलेल्या संविधानाची शपथ घेणाऱ्या प्रतिनिधींकडून झाल्याचं पाहतो आहोत. या गदारोळात कवी आपल्या आतली ‘रोज थोडी थोडी निरागसता मरत जाते’ आणि ‘आपण काय गमावतो आहोत याचाही अदमास येत नाही’, अशी संभ्रमावस्था निर्माण होत असल्याचं ‘समानार्थी शब्द’ या कवितेत लिहितो.

सर्वसामान्य माणसाची अशी स्थिती होत असताना ‘सत्ता’ मात्र दिवसेंदिवस निरंकुश होत चाललीय. आपल्या प्रचंड ताकदीच्या बळावर विरोधक, सर्वसामान्य जनता यांना चिरडून टाकण्याची तिची क्षमता दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चाललीय. म्हणून कवीला ‘सत्तेचा समानार्थी शब्द मृत्यू’ आहे, असं वाटतं. कोणत्याही देशातील सत्तेचं वैशिष्ट्य सांगताना तो ‘समानार्थी शब्द’ या कवितेत लिहितो की, ‘सत्तेकडे न्यायाच्या शिड्या नसतात आणि ती माणसांना हळूहळू मारून टाकते’. कवीचं हे निरीक्षण अगदी यथायोग्य आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘घोडेबाजार’ या कवितेत तो घोड्यांचं रूपक योजून पाच वर्षांत एकदाच उगवणाऱ्या भ्रष्ट राजकारण्यांवर उपहासात्मक पद्धतीने टीका करतो. कलावंतांवर येनकेनप्रकारे बंधनं आणण्याचं प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढलेलं आहे. तसं तर कोणत्याही काळात कलावंतांना अनिर्बंध स्वातंत्र्य अनुभवता आलेलं नाहीय, पण कलाकारांना, लेखकांना उघड धमक्या देणं, खोट्या प्रकरणांत अडकवून त्यांना अटक करणं, त्यांच्यावर हल्ले करणं, पाळत ठेवणं, हे प्रकार अलीकडे वाढलेले आहेत.

कवी ‘आता मात्र ते...’ या कवितेत ‘त्याने’ आणि ‘तिने’ मिळून काढलेल्या चित्रावर ‘त्यांनी’ आडव्या-तिडव्या रेषा ओढून ते बिघडवून टाकण्याच्या कृतीचा उल्लेख करून कलेच्या क्षेत्रात होणाऱ्या बाह्य हस्तक्षेपाकडे निर्देश करतो. असा हस्तक्षेप करणारे जेव्हा या कलाकारांचे हात कलम करतात, तेव्हाच निश्चिंत होतात, ‘दुसरे चित्र काढणारे हात सापडत नाहीत’ तोवर, असं लिहून कवी कलाकारांना धाकदपटशा दाखवणाऱ्यांत असणाऱ्या खुनशी वृत्तीकडे निर्देश करतो.

कलाकारांचं जगणं नियंत्रित करण्याचा प्रयत्न व्यवस्था करू पाहते. या वातावरणामुळे भयभीत झालेल्या कवीला वाटतं की, ‘माझा मेंदू सक्तीने कुठेतरी लिंक केला जाईल, विचारांचा पासवर्ड बनवण्याचा जीआर निघेल’ (‘सक्तीनं माझा...’).

कवी हे जे भविष्यभयाचं चित्र कल्पू शकतो त्यामागे वर्तमानात घडणाऱ्या घटनांची नेमकी समज कार्यरत आहे. आजूबाजूला घटित होणाऱ्या अन्यायपूर्ण घटनांविषयी कोणी बोलू पाहत असेल, तर फतवे काढून त्याचं बोलणं कायमचं बंद केलं जातं. त्याला विविध मार्गांनी त्रास दिला जातो. याविषयी कवी ‘जाहीर करून टाका’ या कवितेत उपरोधिकपणे लिहितो की, ‘लहान मुलांवर प्रतिज्ञेऐवजी मूकपणाचे संस्कार करायला हवेत, सक्तीनं बिंबवलं पाहिजे, शाळेच्या दाखल्यातच नमूद करायला हवं की ते मुके, बहिरे अन् आंधळे आहेत.’

कोणत्याही शासन व्यवस्थेला असेच नागरिक हवे असतात. दुर्दैवाने अशा नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. म्हणून कवीला हा 'वर्तमान काळा वाटतो' किंबहुना हा सबंध ‘काळही काळाच वाटतो’ (‘एक कविता...’).    

याच काळात ‘बाजार’ (market) या घटकाने आपल्या खाजगी जगात आक्रमकपणे शिरकाव करायला सुरुवात केली आणि आज त्याचे हात-पाय इतके पसरत चालले आहेत की, आपल्या नकळत आपण या बाजारातील वस्तूंचा उपभोग घेऊ लागतो. एकाच वस्तूचे भरमसाट ब्रॅण्ड्स मोठमोठ्या कंपन्यांकडून बाजारात आणले जातात. या वस्तूंच्या खरेदीच्या गजबजाटात आपण इतके हरवून आणि हरखून जातो की, इतर गोष्टी आपल्या नजरेसही पडत नाहीत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कवी ‘माझी नजर...’ या कवितेत आपली ‘नजर ब्रँडेड होऊन जाते’ असं लिहितो. म्हणजे आपल्या नजरेला ब्रँडेड वस्तूच पडतात. हे ब्रँडेड होणं इतक्या पराकोटीला जातं की, आपल्या आतड्याच्या माणसांची छोटी छोटी स्वप्नंही दिसेनाशी होतात. कवीची ही नेमकी निरीक्षणं नोंदवणारी नजर त्याला समाजातील विसंगती, विरोधाभास पाहायलाही साहाय्यकारी ठरते.

‘प्रतिध्वनी’ कवितेत तो अप्रत्यक्षपणे गरीब-श्रीमंत यांच्या जगण्यातली तफावत अधोरेखित करतो. या अनागोंदी निर्माण करणाऱ्या व्यवस्थेत भोवंडून जावं अशी त्याची स्थिती होते. ‘आपल्या भोवती निरर्थकाची पोकळी आकार घेतेय’ असं त्याला वाटू लागतं (‘अगणित स्वप्नं...’), सर्वत्र परकेपणाचा अनुभव येऊन ‘जे हवंय ते मिळत नाही आणि नको ते चुंबकासारखं चिकटत चाललंय’, अशी अवस्था होऊन जाते (‘सुतक पाळण्यातलं...’), गाव, माती, नदी, झाडं या कशावरच आपणाला लिहिता येणार नाही, कारण या प्रत्येक घटकाशी काही ना काही यातनासदृश तुकडा जोडलेला असतो अन् त्यातून विसंवाद आणि अंततः दुःखच निर्माण होतं, या जाणिवेने येणारी बेचैनी त्याचा छळ मांडते (‘बाहेर जोराचा...’).

या छळवाद मांडणाऱ्या वातावरणाचा प्रतिकार करण्यासाठी ‘फक्त विचार करून चालणार नाही’ असं तो ‘सक्तीनं माझा...’ या कवितेत लिहितो. ‘सगळेच फासे उलटे पडत असतील तर संघर्ष अटळ आहे’, असं त्याला वाटतं (‘प्रतिकाराचा एक तरी...’).

कवीचा सूर काही वेळेला अनावश्यकरित्या आक्रमक झाल्यासारखा वाटतो. या दृष्टीने ‘ऑडिट’ ही कविता वाचता येईल. ‘मला हात कलम करायचेत’ वा ‘कट उधळून लावायचेयत’ ही जी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या भाषणांतील, घोषणांतील वाक्यं आहेत, त्यामागे असणारा त्वेष, कळकळ या भावना कवितेत यायला हव्या पण ते त्या कवितेत येताना थेट घोषणांप्रमाणे येऊ नये, काव्यात्मक पद्धतीने यावं असं वाटतं.

कवी ‘तुमच्या भाषेचं...’ या कवितेत भाषेच्या अंगाने होणाऱ्या राजकारणावर हल्ला चढवताना लिहितो, ‘भाषेनं भडवेगिरी केली सनातन्यांची नि / अडकवून टाकलं दुबळ्यांच्या गळ्यात प्रारब्धाचं मडकं.’ तो वर्चस्ववाद्यांच्या ‘फितुरी भाषेचं बोचकं’ यापुढे वागवणार नाही, असा निर्धार व्यक्त करतो. भाषेचा विचार कवितेतून मांडतो, तसाच तो या भाषेचा आधार घेत कविता लिहिणाऱ्या कवींवरही कविता लिहितो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘ओढली नाही...’ ही कविता स्त्रीच्या दुःखावर आसवं ढाळत कविता लिहिणाऱ्या पण प्रत्यक्ष व्यवहारात तिची उपेक्षा करणाऱ्या कवींची दांभिक वृत्ती उजागर करते. कवितेच्या जिवावर ढोंगी, कृतक कवी मानसन्मान प्राप्त करतात, पण खरा कवी मात्र उपेक्षित राहतो, त्याच्यावर खटले दाखल होतात, हा विषण्ण करणारा अनुभव ‘कवितेला जीवे...’ या कवितेत उपहासात्मक पद्धतीने व्यक्त करतो. 

कवी प्रेमसंबंध विस्कटण्यातून येणाऱ्या वैफल्याची अभिव्यक्ती ‘डायरीतल्या नोंदी’, ‘काही खंडित तुकडे...’ अशा कवितांतून करतो. ‘पाल अन् बाई’ ही स्त्रीच्या जगण्यातील अंधार, वेदना प्रभावीपणे मुखर करणारी कविता आहे. पालीविषयीचे समज-गैरसमज, त्यातून निर्माण झालेल्या समजुती, या सगळ्याला बाईच्या जगण्यातील घटनांशी जोडत कवी बाईच्या सार्वकालिक दुःखांचा परिचय घडवून देतो. ‘रूढींच्या अस्तरातले...’ या कवितेत तरुण मुलीला ऋतुप्राप्ती होण्यापासून तिचं लग्न होऊन ती गर्भवती राहण्यापर्यंतचा प्रवास रेखाटला आहे. कवी या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला रूढी, परंपरा यांच्या नावाने सहन कराव्या लागणाऱ्या यातना आणि त्यातून तिचं ठामपणे उभं राहणं व्यक्त करतो.  

कवीला समाजात व्यक्तिकेंद्रित जगण्याला आलेलं महत्त्व अस्वस्थ करतं. या वृत्तीची तो अनेकदा कवितांतून ओळख करून देतो. असं असलं तरी माणसांतील चांगुलपणादेखील त्याला लुभावतो. ‘माणूसपणाचा कैवार...’ या कवितेत उफराट्या व्यवहारांच्या जगातही ‘चांगुलपणाचा तराजू हाती’ घेतलेल्या माणसाचं असणं आपल्याला आश्वासक वाटतं. तसेच ‘कधी कधी उगाच...’ या कवितेतील ‘सुखाचे जोडे सगळ्यांच्या पायाला फिट्ट बसतीलच असं नाही / दुःख चपलेच्या तुटलेल्या अंगठ्यागत परत परत सांधावं लागतं’, या दोन ओळींतून इतरांना समजून घेत त्यांच्याविषयी सहानुभाव बाळगण्याचं सुचवतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

युद्ध, हिंसाचार, अमानुष व्यवहार यांचा प्रतिकार करायचा असेल, तर ‘आसक्तीची जळमटं खरवडून काढावी लागतील, युद्धाकडे पाठ फिरवून बुद्धाच्या शोधात जावं लागेल’, असं ‘आसक्तीची जळमटं...’ या कवितेत लिहून आपली विचारपरंपरा कुठली आहे याचा परिचय करून देतो.

कवी व्यक्तिगत जीवनातील समस्या, त्यांना असलेले सामाजिक पदर आणि खिन्न करणारं सामाजिक-राजकीय वास्तव या सगळ्यामुळे अंततः कोणताही कडवटपणा स्वतःच्या स्वभावात शिरणार नाही, याची दक्षता घेत ‘या पृथ्वीचा पोत...’ या कवितेत लिहितो- ‘नव्या विचारांची पृथ्वी निर्मावी लागेल / ...जिथे फक्त करुणेचा डोळा असलेली / मायाळू पणती तेवत असेल.’ असं स्वप्न पाहणं आणि अशा समाजाची आस बाळगणं आज आपणा सर्वांची गरज आहे. 

‘दरम्यानचे प्रक्षोभ’ - विनायक येवले
कॉपर कॉईन पब्लिकेशन | पाने – ११६ | मूल्य – १८० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......