अजूनकाही
‘तीन संपादकांच्या मुलाखती’ हे ‘द हिंदू’चे माजी संपादक एन.राम, ‘द प्रिंट’चे संपादक शेखर गुप्ता आणि ‘स्क्रोल’चे संपादक नरेश फर्नांडिस या भारतातील तीन राष्ट्रीय पातळीवरील प्रभावशाली संपादकांच्या मुलाखतींचे पुस्तक नुकतेच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ‘साधना’ साप्ताहिक व ‘कर्तव्य साधना’ पोर्टल, यांचे संपादक विनोद शिरसाठ यांनी लिहिलेले हे प्रास्ताविक...
.................................................................................................................................................................
‘साधना’ साप्ताहिकाचा ७३वा वर्धापनदिन आणि ‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलचा पहिला वर्धापनदिन १५ ऑगस्ट २०२० रोजी येत होता. तेव्हा इंग्रजीतील तीन नामवंत संपादकांच्या मुलाखती घ्यायच्या आणि ‘कर्तव्य साधना’वर इंग्रजीतून, तर ‘साधना’ साप्ताहिकातून मराठीत विशेषांक रूपात प्रसिद्ध करायच्या, असे नियोजन केले होते. त्या प्रक्रियेतून आकाराला आलेल्या तीन संपादकांच्या मुलाखती आता अडीच वर्षांनंतर पुस्तक रूपातही येत आहेत.
या तीन मुलाखती इंग्रजीतून घेणे, त्यांचे शब्दांकन करणे आणि मग अनुवाद करणे, असे तीन टप्पे होते. हे सर्व काम चार तरुणांनी केले आहे. यातील एन.राम यांची प्रत्यक्ष भेटून पुणे शहरात मुलाखत घेणे (डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती कार्यक्रमाला ते २० ऑगस्ट २०१९ रोजी आले तेव्हा) आणि नरेश फर्नांडिस यांची मुलाखत फोनवरून घेणे आणि त्या दोन्ही मुलाखतींचे शब्दांकन करणे, हे सर्व काम संकल्प गुर्जर या तरुणाने केले. शेखर गुप्ता यांची मुलाखत व्हिडिओ कॉलद्वारे घेणे आणि तिचे शब्दांकन करणे, हे काम जायली वाव्हळ या तरुणीने केले. त्याचप्रमाणे एन.राम व शेखर गुप्ता यांच्या मुलाखतींचे अनुवाद प्रभाकर पानवलकर या तरुणाने केले, तर नरेश फर्नांडिस यांच्या मुलाखतीचा अनुवाद सुहास पाटील या तरुणाने केला आहे.
या मुलाखती घेण्याची संकल्पना व सर्वसाधारण रूपरेषा जरी आम्ही दिली असली तरी, सर्व प्रश्न तयार करणे आणि मुलाखतींची कार्यवाही संकल्प व जायली यांनीच पार पाडली आहे. त्याचप्रमाणे अनुवादाचे कामही प्रभाकर व सुहास यांनी केले आहे. हे सर्व ठळकपणे अधोरेखित करण्याचे कारण, हे तपशील सांगितले नाहीत, तर कोणाही प्रगल्भ वाचकांच्याही ते लक्षातही येणार नाही, इतके हे काम परिपक्व झाले आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एन.राम, शेखर गुप्ता आणि नरेश फर्नांडिस हे तीन संपादक मुलाखतींसाठी का निवडले आणि त्यांच्या मुलाखतींचा फोकस थोडा-थोडा वेगळा का ठरवला, याची चांगली कल्पना या मुलाखती वाचून येईलच. पण इथे आमचे मानस थोडक्यात स्पष्ट करणे आवश्यक वाटते. पहिला मुद्दा हा होता की, पत्रकारितेला असलेले वैश्विक परिमाण लक्षात घेता तिन्ही संपादक इंग्रजीतील घ्यावेत. दुसरा मुद्दा होता, तीन वेगवेगळ्या पिढ्यांचे म्हणता येतील असे घ्यावेत. तिसरा मुद्दा, तिघेही वेगवेगळ्या माध्यमांत काम केलेले असावेत. आणि चौथा मुद्दा होता, तिघांच्याही दृष्टिकोनांत काहीअंशी फरक असेल, मात्र ते प्रभावशाली असावेत आणि पत्रकारितेच्या नीतिमूल्यांशी त्यांची बांधीलकी पक्की असावी. त्यातून पटकन समोर आलेली ही तीन नावे आहेत.
एकूणात विचार करता, भारतातील सर्वोत्कृष्ट इंग्रजी वृत्तपत्र म्हणून १४५ वर्षांची परंपरा असलेल्या ‘द हिंदू’चा उल्लेख करावा लागेल, असे आम्हाला वाटते. म्हणून या वृत्तपत्राची मालकी ज्या अय्यंगार कुटुंबाकडे मागील ११५ वर्षांपासून आहे, त्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले एन.राम यांच्याच तोंडून त्या वृत्तपत्राची महती नेमकी कशात दडली आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
दुसरे, राजकीय भूमिका सातत्याने घेणे आणि त्याचा प्रभाव पडत राहणे या बाबतीत तरी ‘इंडियन एक्सप्रेस’ अव्वल नंबरवर आहे. तिथे शेखर गुप्ता तब्बल दोन दशके मुख्य संपादकाच्या भूमिकेत राहिले आहेत; शिवाय त्यांनी सुरुवातीच्या काळात दशकभर ‘इंडिया टुडे’ या पाक्षिकात व गेल्या चार वर्षांत ‘द प्रिंट’ या डिजिटल पोर्टलवर केलेले कामही लक्षणीयच आहे. त्यामुळे त्यांनी त्या तिन्ही टप्प्यांवर केलेली पत्रकारिता समजून घेणे, कमालीचे रोचक असणार हे उघड होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आणि डिजिटल पोर्टल हे माध्यम भारतात अद्याप बाल्यावस्थेत असले तरी, मागील साडेसहा वर्षे ‘स्क्रोल’ हे पोर्टल सर्व बाजूंनी क्रमाक्रमाने विकसित होत राहिले आहे. त्यामुळे त्याचे संपादक नरेश फर्नांडिस यांच्याकडून हे नवे माध्यम समजून घेणे आवश्यक वाटले.
एन. राम हे वयाच्या पंचाहत्तरीत आहेत, शेखर गुप्ता यांनी पासष्टी पार केलेली नाही आणि नरेश फर्नांडिस हे पन्नाशीच्या दरम्यान आहेत. म्हणजे मर्यादित अर्थाने का होईना तिघे तीन पिढ्यांचे आहेत. अनुक्रमे चेन्नई, दिल्ली, मुंबई या तीन महानगरांत त्या तिघांनी काम केले आहे, देशाच्या तीन टोकांवर असलेल्या या महानगरांतील वास्तव्याचा त्यांच्या जडण-घडणीवर व दृष्टिकोनांवर काहीएक परिणाम निश्चित झालेला असणार. मात्र तिघेही पुरोगामी व सेक्युलर आहेत आणि आपल्या विचारकार्यासाठी भारतीय संविधान प्रमाण मानतात. आणि म्हणून बरेच मंथन होईल, पण तिघांच्या मुलाखतीतून एकसंध व मूलभूत म्हणावे असे काही बाहेर येईल हे उघड होते.
आणि ते आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले आले आहे. इतके की, एकाच अवाढव्य व प्राचीन वृक्षाच्या तीन मोठ्या फांद्या आहेत, असे सुखद आश्चर्य या मुलाखती वाचून आम्हाला वाटले. मात्र खंत वाटावी असे आश्चर्य हे आहे की, या तिघांच्याही इतक्या दीर्घ व या प्रकारच्या मुलाखती इंग्रजीमध्ये अन्यत्र कुठेही प्रसिद्ध झालेल्या नाहीत, अन्य भाषांमध्येही झालेल्या असण्याची शक्यता कमी आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
भारतात इंग्रजी पत्रकारितेचा इतिहास सव्वादोनशे वर्षांचा आहे, आणि मराठी पत्रकारितेलाही आता १९० वर्षांची परंपरा आहे. १८३२मध्ये बाळशास्त्री जांभेकर या वीस वर्षांच्या तरुणाने ‘दर्पण’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरू केले. केवळ ३४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाळशास्त्री यांना मराठी पत्रकारितेचे जनक असे संबोधले जाते. त्यांनी ठेवलेली ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ ही नावे इतकी समर्पक आहेत की, कोणत्याही काळातील, कोणत्याही देशातील व कोणत्याही भाषेतील पत्रकारितेची मूलतत्त्वे याच दोन शब्दांत सांगता येतील.
आणि याच पार्श्वभूमीवर प्रस्तुत अंकातील तीन मुलाखतींकडे पाहिले, तर यामधून पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचे प्रतिबिंब निश्चित दिसेल. एवढेच नाही तर, एका मर्यादित अर्थाने हे पुस्तक म्हणजे एक छोटा आरसा आहे, असेही वाटू शकेल. अर्थातच, गांभीर्याने पत्रकारिता करू पाहणाऱ्या कोणालाही या मुलाखतींमधून ठोस दिशा सापडून किती दूरवरचे दिसेल, याबाबतचा दावा आम्ही करू इच्छित नाही, पण कोणत्या दिशेने जाऊ नये, हे यातून ठळकपणे पुढे आले आहे हे मात्र निश्चित!
‘तीन संपादकांच्या मुलाखती’ – संवादक - संकल्प गुर्जर, जायली वाव्हळ | अनुवाद प्रभाकर पानवलकर, सुहास पाटील | साधना प्रकाशन, पुणे | पाने – ७६ | मूल्य – ९० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment