१.
इंदूरचे कवी, चित्रकार, संपादक श्रीकृष्ण बेडेकर यांचं ९ मार्च २०२३ रोजी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झालं. हल्ली मराठी वर्तमानपत्रं ‘सेलिब्रेटी ओरिएंटेड’ झाली आहेत. माणूस दिग्गज, पॉप्युलिस्ट, सेलिब्रेटी असेल - भलेही मग त्याचं योगदान यथातथा का असेना – तरच त्याची दखल मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. हल्ली मराठी वर्तमानपत्रं व्रतस्थपणे, निस्सीमतेनं आणि वर्षानुवर्षं सातत्यपूर्ण रितीनं काम करणाऱ्या माणसांची दखल ती व्यक्ती हयात असतानाही फारशी घेत नाहीत, आणि हयातीनंतरही. बेडेकर पहिल्या वर्गवारीत कुठेच बसणारे नव्हते, पण दुसऱ्यात त्यांची गणना नक्की होत होती. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या छोट्याशा बातम्या काही मराठी वर्तमानपत्रांमध्ये आल्या, काहींत आल्या नाहीत. दै. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने त्यांच्यावर ‘मराठी भाषेचा दूत’ (११ मार्च २०२३) या नावानं संपादकीय स्फूट लिहिलं, तर दै.‘सामना’ने ‘संतापकीय निमाले’ (१४ मार्च २०२३) हा सच्चिदानंद शेवडे यांचा छोटासा लेख छापला. हा लेख बेडेकरांचं निधन झाल्यावर शेवडे यांनी लगोलग फेसबुकवर टाकला होता. आणि तिथून तो हल्लीच्या भाषेत ज्याला ‘व्हायरल’ म्हणतात, तसा झाला होता.
…तर थोडक्यात सांगायचं असं की, यापलीकडे काही बेडेकरांची दखल मराठी वर्तमानपत्रांनी फारशी घेतली नाही.
२.
काही माणसं मोठी नादिष्ट-छांदिष्ट असतात! आपल्याला वाटतं ते करण्यात ते आपलं सबंध आयुष्य झोकून देतात. श्रीकृष्ण बेडेकर हे अशा नादिष्ट-छांदिष्टांपैकी एक. ते उत्तम चित्रकार होते, त्यांचा गळा गोड होता. संगीतातलेही ते मर्मज्ञ होते. ते कविता उत्तम प्रकारे गाऊन म्हणत असत. त्यांचं अक्षर मोत्यासारखं टपोरं आणि लोभस होतं. ते सुरेख रांगोळ्याही काढत आणि तेवढ्याच तन्मयतेनं ग़ज़ला आणि नाटकंही लिहीत.
बेडेकर महाराष्ट्राबाहेर, इंदुरात राहत असले तरी तनमनानं महाराष्ट्रीयच होते. महाराष्ट्राबाहेर राहून मराठीच्या जतन, संवर्धनासाठी ते गेली ३५-४० वर्षं एकलव्याच्या निष्ठेनं धडपडत राहिले, ते महाराष्ट्रातल्या उठसूठ मराठीच्या भवितव्याविषयी गळे काढणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरावं, एवढं स्पृहणीय नक्कीच होतं.
बेडेकर तसे मुंबईकर. त्यांचा जन्म गिरगावचा, ६ डिसेंबर १९४४चा. त्यांचं चौथीपर्यंतचं शिक्षणही तिथंच झालं. पण त्या काळी मुंबईपेक्षा होळकर रियासतीचा एक भाग असणाऱ्या इंदूरमध्ये बऱ्यापैकी स्वस्ताई असल्यानं आई-वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी इंदूरला पाठवलं. दुर्गाबाई भागवतांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यानं बेडेकरांवर साहित्याचा पहिला संस्कार करण्याचं श्रेय ओघानं दुर्गाबाईंकडे जातं. त्यांनी बेडेकरांची ‘बालमित्र’शी ओळख करून दिली अन् बेडेकर आपल्या स्वाभाविक वृत्तीनं आणि साहित्याच्या ओढीनं नादावत, रमत गेले. इंदूर तर त्यांना सर्वार्थानं फायदेशीर ठरलं. शालेय दिवसांत अनेक मराठी कविता त्यांना मुखोद्गत झाल्या. त्यांच्यातल्या सुप्त चित्रकाराचा कुंचलाही याच काळात बहरला. इतका की, वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी इंदिरा गांधींचं उत्तम पोर्ट्रेट बनवलं होतं. इंदिराबाई इंदूरला आल्या असताना बेडेकरांनी ते त्यांना दाखवलं. ते इंदिराबाईंना इतकं आवडलं की, त्यांनी ते स्वतःबरोबर नेण्याची इच्छा व्यक्त केली. पण या मानी चित्रकारानं त्यांना नम्रपणे नकार देऊन सांगितलं की, ‘माफ करा, हे चित्र मी तुम्हाला देऊ शकत नाही. कारण हे चित्र माझ्या घराची शोभा आहे.’
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
असं म्हणतात की, स्खलनशीलता ही माणूस असण्याची पहिली अट असते. याला जोडूनच असं म्हणता येईल की, अस्थिरता ही बहुधा बेडेकरांसारख्या माणसांची पूर्वअट असावी. त्यांनी अनेक व्यवसाय, नोकऱ्या केल्या, पण कुठेच ते फारसे रमले नाहीत. फक्त एकाच ठिकाणी रमले… आणि ते म्हणजे इंदूरच्या ‘नई दुनिया’ या हिन्दी वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात. तिथं त्यांनी तब्बल १६ वर्षं अक्षरांना वळणदार पैलू पाडण्याचं काम केलं.
रांगोळीकार ही बेडेकरांची आणखी एक ओळख. विशेषत: त्यांनी काढलेल्या धान्याच्या रांगोळ्या विशेष प्रसिद्ध झाल्या होत्या. १९६२मध्ये त्यांनी सर्वप्रथम इंदूरमधील चिमणबागेत भरलेल्या बालमेळाव्यात रांगोळ्यांतून अनेक चित्रं-व्यंग्यचित्रं काढली. १९७०पर्यंत त्यांनी आपल्या रांगोळी चित्रांची तीन प्रदर्शने भरवली. या आठ वर्षांच्या काळात त्यांनी काढलेल्या रांगोळी-चित्रांची, तसेच जलरंग, तैलरंग व कोलाज चित्रांची भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, राजा परांजपे, देव आनंद या मान्यवरांनी वाखाणणी केली.
बेडेकरांच्या सुंदर हस्ताक्षराचा महिमा तर महाराष्ट्रात साहित्य व पत्रकारितेच्या क्षेत्रांतल्या अनेकांपर्यंत पोहचलेला होता, अनेक मान्यवरांनी त्यांच्या हस्ताक्षराचं मुक्तकंठानं कौतुकही केलं होतं. ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ पु.ल. देशपांडे यांची ख्याती त्यांच्या दानशूरतेप्रमाणे कौतुक-प्रदानतेबाबतीतही होती. त्यांनी बेडेकरांच्या हस्ताक्षराबद्दल एकदा लिहिलं होतं, “तुमचे हस्ताक्षर म्हणजे लताच्या आवाजासारखा एक चमत्कार आहे.”
अर्थात हा महिमा झाला तो बेडेकर चालवत असलेल्या ‘पत्रसारांश’ या अभिनव अनियतकालिकामुळे. स्वतःच्या हस्ताक्षरात बेडेकर वाचकांचा नाव-पत्ता घालून आपलं हे अनियतकालिक महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर पाठवत असत. त्यांचा हा उद्योग १९८५ सालापासून एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत अव्याहत सुरू होता. मराठी भाषेच्या प्रेमापोटी बेडेकरांनी हे आंतरदेशीय पत्राच्या आकाराचं हे ‘पत्रसारांश’ नावाचं अनियतकालिक सुरू केलं होतं. त्याच्या पहिल्या अंकाच्या १००० प्रती त्यांनी साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना पाठवल्या होत्या. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील सर्वभाषिक शाळांमध्ये दहावीपर्यंत एकसारखा मराठी अभ्यासक्रम राबवला जावा, याविषयी आग्रह व्यक्त केला होता. त्यांच्या या मताला कुसुमाग्रज, बाबासाहेब पुरंदरे, रा. भि. जोशी आणि डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दुजोरा दिला. अखेर नऊ वर्षांनी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्व शाळांत मराठी अभ्यासक्रम राबवायला सुरुवात केली.
‘पत्रसारांश’चं ना. ग. गोरे, डॉ. वि. भि. कोलते, यदुनाथ थत्ते, वसंत देसाई, शिवाजी सावंत, गो. नी. दांडेकर, श्री. ज. जोशी, उमाकांत ठोमरे यांनी मनापासून कौतुक केलं आणि सभासदत्वही स्वीकारलं. आपलं म्हणणं कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त प्रभावीपणे सांगण्याच्या या उपक्रमाला बेडेकरांनी १९८५मध्ये केलेली सुरुवात पाहून असं वाटे की, ई-मेल आणि एसएमएस या ‘पत्रसारांश’च्या पुढील आवृत्त्या तर नाहीत! आजच्या धावपळीच्या काळात पूर्वीसारख्या अघळपघळ गप्पाटप्पा करायला वेळ नसला, तरी ‘शब्दसंवादा’ला पर्याय नाही, हेही तितकंच खरं. म्हणूनच बहुधा बेडेकरांनी आपल्या या अनियतकालिकाच्या माध्यमातून समाजाविषयी, शासनाविषयी ‘संताप’ व्यक्त करण्यात खंड पडू दिला नाही. या अंकात ते ‘संतापकीय’ या नावानं ‘संपादकीय’ लिहीत. साडेतीनशेच्यावर दिवाळी अंक प्रकाशित होणाऱ्या मराठी वाङ्मय व्यवहारात ‘पत्रसारांश’च्या दीड पानी दिवाळी अंकाचीही आवर्जून दखल घेतली जाई. १९९० साली तर ‘पत्रसारांश’ला ‘मौज’च्या बरोबरीनं उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कारही मिळाला होता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
पण बेडेकर एवढ्यावरच समाधान मानणारे नव्हते. एक मोठा दिवाळी अंक काढण्याचं त्यांचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. ते २००४ साली साकार झालं. ‘शब्द दर्वळ’ हा तब्बल सव्वाशे-दीडशे पानांचा दिवाळी अंक ते गेल्या वर्षीपर्यंत काढत होते. या अंकातून त्यांनी नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण साहित्य देण्याचा प्रयत्न केला. त्याची मांडणी ते स्वत: करत. आपल्या हस्ताक्षरात लेखांची शीर्षकं लिहीत. त्यामुळे ‘शब्ददर्वळ’चा अंक कायम आपलं वेगळेपण राखून राहिला.
३.
२००५ साली बेडेकरांना पुण्याच्या कॉसमॉस बँकेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या ‘कॉसमॉस पुरस्कारा’ने गौरवण्यात आलं. तेव्हा मी पुण्याच्या दै. ‘प्रभात’मध्ये रविवार पुरवणीचं काम पाहत होतो. संपादक होते महावीर जोंधळे. एके दिवशी संपादकांचे मित्र सुभाष नाईक यांनी बेडेकरांविषयीच्या कात्रणांची फाइल आणून दिली आणि या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांच्याविषयी काही लिहिण्याची विनंती केली. संपादकांनी ती माझ्याकडे देऊन त्यावरून मला एक लेख लिहायला सांगितला. तोवर मी काही बेडेकरांना भेटलो नव्हतो, पण त्यांच्या ‘पत्रसारांश’चे अंक पाहिले होते, दिवाळी अंकांतून त्यांच्या कविता वाचल्या होत्या, ‘शब्द दर्वळ’चा पहिलावहिला दिवाळी अंकही वाचला होता. २४-२५ हे तसं कुठल्याही गोष्टीनं भारावून जाण्याचंच वय. त्यामुळे मी बेडेकरांवर ‘कलंदर कलावंत, मनस्वी साहित्यिक’ हा दीडेक हजार शब्दांचा लेख लिहिला. तो ले-आउट केल्यानंतर अर्धा पान झाला. तो पाहून संपादक जोंधळे म्हणाले, चांगला झालाय, पण एवढा लेख छापण्याएवढे काही बेडेकर मोठे नाहीत. माणसाच्या लहान-मोठेपणानुसार लेख लिहिण्याची माहिती तोवर मला नव्हती. त्यामुळे तेव्हा मला त्यांचं म्हणणं कळलं नाही. पण आमचं ‘प्रभात’ हे दैनिकही एवढं कुठे मोठं होतं! पण नंतर संपादकच म्हणाले, लिहिलाय तर राहू दे. मग तो ३१ जुलै २००५च्या अंकात तसाच छापून आला. ३० जुलै रोजी बेडेकरांना कॉसमॉस पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला होता. त्यानंतर चार दिवसांनी बेडेकर ‘प्रभात’च्या ऑफिसमध्ये आले. त्यांच्यावर लेख लिहिणारी व्यक्ती कोण आहे हे पाहायला. नंतर ते मला पेरुगेटजवळच्या त्यांच्या स्नेह्याच्या घरी घेऊन गेले. चहा-पाणी झाल्यावर पेटी काढून त्यांनी त्यांच्या तीन-चार कविता आणि ग़ज़ला गाऊन दाखवल्या. माझ्यासाठी हा नवीनच अनुभव होता. लेख लिहिल्याबद्दल कुणी अशा प्रकारेही कौतुक करू शकतं, याची मी तोवर कल्पनाच केलेली नव्हती.
तेव्हापासून आमच्या गप्पांना सुरुवात झाली. अनेकदा ते फोन करत आणि म्हणत, ‘काही काम नाही, नुकतीच नवी कविता लिहिलीय. ती तुला ऐकवतो.’ आणि मग ती गाऊन दाखवत. ती झाली की, ‘कशी वाटली?’ असं विचारत आणि नंतर बोलू सविस्तर म्हणत फोन ठेवून देत. अशा त्यांच्या कितीतरी कविता\ग़ज़ला फोनवर मी १०-१५ वर्षांच्या काळात त्यांच्या सुरेल आवाजात ऐकल्या आहेत. अर्थात माझ्यासारखे महाराष्ट्रात बरेच लोक असतील, ज्यांना बेडेकरांनी अशाच प्रकारे कविता ऐकवल्या असतील.
बेडेकर तसे नितळ मनाचे आणि निरागस होते. त्यांच्याकडे राजकीय-जातीय-धार्मिक हेवेदावे नव्हते. ते राजकारणी तर बिलकूलच नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला आवडायचं. २००७ साली मी मुंबईला आलो. त्यानंतरही आमच्या फोनगप्पा अधूनमधून होत राहिल्या. दोन-चार वेळा भेटीही झाल्या.
त्यातून जाणवलं ते असं की, बेडेकरांचं मराठी साहित्यावर नितांत प्रेम होतं. अगदी पराकोटीचं म्हणावं असं. त्यांच्या बोलण्यात नेहमी मराठी साहित्यिक, साहित्य यांचेच संदर्भ असत. तनाने इंदुरात, धनाने व्यवसायात, तर मनाने महाराष्ट्रात, अशी त्यांची कायम त्रिस्थळी यात्रा चालू असे. परप्रांतात राहून मराठी भाषेविषयी त्यांना जे प्रेम, आस्था, ममत्व आणि काळजी होती, ती महाराष्ट्रातल्या अनेक वाचाळवीरांकडे नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
परप्रांतात मराठी भाषेला सापत्न भावाची वागणूक दिली जाते, असा आपला दृढ समज असला, तरी बेडेकरांचा अनुभव तसा नव्हता. उलट इंदूरकरांना त्यांच्यासारख्या कलंदर कलावंताचा आणि मनस्वी साहित्यिकाचा अभिमानच वाटला. त्यांचा योग्य तो आदर-सत्कार इंदूरकरांनी केला. इंदूरमध्ये जे दोन मराठी साहित्यिक ‘लोकप्रिय’ होते, त्यात बेडेकर आणि दिलीप चिंचाळकर यांचा(च) समावेश होता.
पण बेडेकर हे समाधानी व्यक्तिमत्त्व नव्हतं. त्यांची कशाबद्दल तरी तक्रार असेच, मात्र ती बहुतेकवेळेला विशिष्ट व्यक्तीबद्दल नसे, तर समष्टीबद्दलच असे. त्यामुळे त्यात हेवेदावे, रागलोभ या गोष्टी नसत. बेडेकर आपली नाराजी कधी लपवण्याचा प्रयत्न करत नसत. त्याची त्यांना गरजही वाटत नसे. त्यांच्याकडे बघितल्यावरच जाणवे की, ते तमाम दुनियेबद्दल नाराज आहेत. मराठीतील साहित्यसंस्था, पुरस्कारसंस्था, एकंदर व्यवस्था, समाज यांवर ते कायमच रुष्ट असत. त्यांच्यातला व्यंग्यचित्रकार त्यावर उपहास-उपरोधपूर्ण भाष्य करे. पण त्यातही एक अलवारपणा असे.
बेडेकरांशी बोलताना मला नेहमी महाराष्ट्र, मराठी माणसं आणि मराठी साहित्य यांचा ‘बिग बॉस’ शो झालेला आहे, असं वाटायचं. २००८-०९मधली गोष्ट असावी. एकदा प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन खान ‘आयबीएन-लोकमत’मध्ये आले होते. संपादक निखिल वागळे यांच्याशी बोलून ते त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. बाहेर एका टीव्ही वाहिनीवर ‘बिग बॉस’ चालू होतं. त्याच्याकडे पाहत वागळे खान यांना म्हणाले, ‘ही कशी भन्नाट आयडिया आहे! अशा काही भन्नाट कल्पना शोधल्या पाहिजेत मराठी साहित्यिकांनी.’ त्यावर खान म्हणाले, ‘पण ही साहित्यिकच आयडिया आहे!’ खरंच होतं ते!
२००६ साली भारतात, पहिल्यांदा हिंदीत सुरू झालेल्या या ‘रिअॅलिटी टेलिव्हिजन शो’नं अनेकांना आश्चर्यचकित केलं होतं. कारण या शोची कल्पनाच अभिनव होती. पण एखादी चांगली कल्पना (मग ती स्वतंत्रपणे सुचलेली असो की, पाश्चात्य कल्पनेची संस्कारित आवृत्ती असो) सुचली की, ती घासून घासून गुळगुळीत होईपर्यंत आपल्याकडे राबवली जाते. ‘बिग बॉस’चंही नंतर तेच झालं. त्यात नंतर नुसती माणसं बदलत राहिली आणि त्यातला चवचालपणाच प्राधान्यानं पुन्हा पुन्हा अधोरेखित केला गेला.
‘बिग बॉस’मध्ये बहुतेक स्त्री-पुरुष एकमेकांसोबत फ्लर्टिंग तरी करत असतात किंवा एकमेकांविरोधात काड्या तरी करत असतात. पण तरीही लोक ते पाहतात आणि त्यामुळे हा शो अजूनही चालू आहे. त्यातला तथाकथित सेलिब्रेटी लोकांचा थिल्लरपणा, सवंगपणा आणि लफडेबाजपणा चवीचवीनं पाहिला जातो. तसा तो पाहिला जातो म्हणून त्याची केवळ नग बदलून पुनरावृत्ती केली जाते. आणि या किरकोळ बदलाला भुलून लोकही त्याची मजा लुटत राहतात! मराठी साहित्य व्यवहाराचीही नेमकी अशीच ‘अवस्था’ आहे. आणि बेडेकरांना ती सहन होत नसे. मराठी माणसांची स्वभाषेबद्दलची अनास्था आणि मराठी साहित्यिकांचा पोकळ दंभ याने ते व्यथित होत, संतापून बोलत. त्यामुळेच त्यांची मित्रमंडळी त्यांना ‘इंदूरचे अल्बर्ट पिंटो’ म्हणत असे!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
बेडेकर हरहुन्नरी होते. कवी होते, ग़ज़लकार-व्यंग्यकार होते. चांगले संपादक होते. रांगोळीकार-चित्रकार होते. मराठीप्रमाणेच त्यांना हिंदी भाषाही उत्तम बोलता-लिहिता येत असे. ते पेटीही चांगली वाजवत आणि गातही छान. बेडेकरांच्या काही गेय कविता अनुराधा पौडवाल, अरुण दाते, राणी वर्मा यांनी गायल्या आहेत. त्यामुळे यांपैकी कशातही ते चांगलं करिअर करू शकले असते, पण ही सगळी ‘हुन्नर’ हा त्यांच्या कलासक्त व्यक्तिमत्त्वाचा पाया होता. त्या ‘पाया’वर ‘इमला’ बांधण्याच्या कल्पना त्यांना रुचल्या नाहीत, कदाचित सुचल्याही नाहीत किंवा जमल्या नाहीत. कारण त्यांचं सर्वाधिक प्रेम होतं, महाराष्ट्रावर, मराठी साहित्यावर.
मराठी भाषेवर त्यांची ‘अव्यभिचारी निष्ठा’ होती आणि मराठी साहित्याशी प्रचंड बांधीलकी होती. त्यामुळे लेखन, संपादन, प्रकाशन असे वेगवेगळे प्रयोग ते मन:पूत करत राहिले. यातल्या कशानेच त्यांना फारसा आर्थिक फायदा झाला नाही, पण त्याची त्यांना तमा नव्हती. त्यामुळे कधी कधी बेडेकर मला एकोणिसाव्या शतकातल्या हरहुन्नरी आणि बहुभाषिक महानुभावांसारखे वाटत. त्यांचे मोह अनावर होते, पण त्यातून माया जमवण्याच्या कल्पना सहसा त्यांना सुचत नसत. त्यामुळे त्यांची ‘एकांडी शिलेदारी’ कधी फारशी फलदायी ठरली नाही.
बेडेकरांसारखी माणसं ‘होमो सेपियन्स’ प्रजातीपैकी. ही प्रजातीच आता महाराष्ट्रातून नामशेष होत चालली आहे. त्यांच्या नावानं मराठी वाङ्मयाच्या इतिहासात फारशा मोठ्या नोंदी लिहिल्या जाणार नाहीत. पण हे तितकंच खरं की, बेडेकरांचा सहवास ज्यांना ज्यांना लाभला, त्या प्रत्येकाचं आयुष्य थोडंफार तरी प्रसन्न करण्याचं काम त्यांनी इमानेइतबारे केलं.
४.
अर्थात बेडेकर काही सर्वगुणसंपन्न नव्हते. त्यांच्यामध्ये काही दुर्गुणही होते. त्यांच्या स्वत:बद्दलच्या कल्पना जरा अवास्तव होत्या. खरं म्हणजे त्या नंतरच्या काळात अवास्तव होत गेल्या. आपल्या पात्रतेपेक्षा आपल्याला महाराष्ट्राकडून कमी आदरानं वागवलं जातं, आपली फारशी दखल घेतली जात नाही, आपल्याला पुरस्कार दिले जात नाहीत, अशी त्यांची सतत तक्रार असे. खरं तर त्यात फारसं तथ्य नव्हतं, नाही. त्यांचा त्यांच्या योगदानानुसार पुरेसा गौरव झाला, काही पुरस्कारही त्यांच्या वाट्याला आले. आणि त्यांची योग्य ती दखलही घेतली गेली. पण त्यांची अपेक्षा जरा अधिकची होती आणि ती पूर्ण होत नाही, हे पाहून ते ‘संतापत’. पण संतापल्यानं किंवा सतत कुणाजवळ तरी गाऱ्हाणी गात राहिल्यानं आपली गुणवत्ता वाढत नाही, तर ती सातत्यशील रितीनं चांगली निर्मिती करत राहिल्यानेच वाढते, हे कधी त्यांना समजलं नाही.
पाच दशकांहून अधिक काळ बेडेकरांनी ‘दीपावली’, ‘मौज’, ‘हंस’, ‘कालनिर्णय’, ‘किस्त्रीम’ यांसारख्या नामवंत दिवाळी अंकांतून कवितालेखन केलं. पण त्यांच्या नावावर ‘अंतर्याम’ आणि ‘आत्मनाद’ असे केवळ दोनच काव्यसंग्रह आहेत. शिवाय या दोन्ही संग्रहांची शीर्षकंच त्यांच्या काव्याची प्रकृती सांगतात. अशा प्रकारची आत्मनिष्ठ कविता लोकप्रिय होण्याला, वाखाणली जाण्याला मुळातच एक मर्यादा असते. शिवाय बेडेकरांची कविता गेयकाव्य प्रकारातली. हाही प्रकार मराठीत केव्हाच मागे पडून गेला होता, अ-लोकप्रिय झाला होता. मराठी कवितेला केशवसुत, मर्ढेकर, सुर्वे, ढसाळ, आरती प्रभू, ग्रेस, पाडगावकर, बोरकर, चित्रे, करंदीकर अशी अनेक शिखरं लाभली. त्यात बेडेकर पहिल्या फळीत कुठेच बसणारे नव्हते. पण तसं आत्मपरीक्षण करण्याऐवजी बेडेकरांना कशाचं भूषण वाटे, तर पुलंनी कशी माझ्या हस्ताक्षराची तुलना लताबाईंच्या आवाजाशी केली, पाडगावकरांनी कशी माझ्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली, रत्नाकर मतकरींनी कसा माझ्या पंचाहत्तरीच्या निमित्तानं लेख लिहिला, राम शेवाळकरांनी-इंदिरा संतांनी-कुसुमाग्रजांनी कशी मला शाबासकी दिली वगैरे वगैरे….
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मान्यवरांचे कृपाशिर्वाद हा काही ‘प्रस्थापित साहित्यिक’ होण्याचा परवाना नसतो. पण हे साधं भानही बेडेकरांना कधी आलं नाही. त्यामुळे साहजिकपणे वय होत गेलं, तसं त्यांचं ‘संतापकीय’ नुसतंच संतापत राहिलं. माझ्यासारख्या काही पत्रकारांकडे ते सतत आपली कथा-व्यथा बोलून दाखवत. हरहुन्नरी कलावंतांनी नवनव्या कल्पनांनी भारावून जायला पाहिजे, पण बेडेकर मात्र नव्या नव्या सत्कार-पुरस्काराच्या कल्पनेनं खंतावून जात राहिले. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं नंतर नंतर कंटाळवाणं होत गेलं. मला तर शेवटी नाईलाजाने त्यांचा मोबाईल नंबर ब्लॉक करावा लागला. एका मनस्वी कलावंताचं हे भरकटणं तसं क्लेशदायकच होतं. त्याचा त्रास माझ्यासारख्या त्यांच्या अनेक स्नेही, परिचितांनाही झाला असणार. पण आता आपण थांबायला हवं, हे काही बेडेकरांना शेवटपर्यंत उमगलं नाही.
आधी ‘पत्रसारांश’ आणि नंतर ‘शब्द दर्वळ’ची संपादकीये ते ‘संतापकीय’ या नावानं लिहीत खरे, पण त्यात साक्षेप, व्यासंग, विचार आणि तारतम्य यांपेक्षा भावनिकताच जास्त असे. महाराष्ट्राने आपली कदर केली नाही, आपली बूज राखली नाही, अशी भावना ते नेहमी बोलून दाखवत. खरं तर बेडेकर आपलं हरहुन्नरीपण आभूषणासारखं मिरवत. आणि मिरवावी अशी ती गोष्ट होतीच. त्यामुळे त्यांच्याशी आपली मैत्री आहे, याचं भूषण वाटायचं. पण हा समसमायोग शेवटी शेवटी राहिला नाही. उमेदीच्या काळात फार ठोस म्हणावी अशी कुठलीही कामगिरी न करताच उतारवयात महत्त्वाकांक्षेला पंख फुटू देणं, हे धाष्टर्याचंच होतं. पण त्याला बेडेकर पुष्कळच बळी पडले. त्यामुळे त्यांच्याशी सहमत होणं कठीण होत गेलं. त्याचा परिणाम त्यांच्याशी संवाद बंद होण्यात झाला. आता वाटतं, तसं करायला नको होतं. बेडेकरांना त्यांच्या नव्या रूपातही स्वीकारायला हवं होतं. त्यांच्याकडे उदारपणे पाहायला हवं होतं, पण ते निदान मला तरी जमलं नाही.
५.
बेडेकरांनी वयाची सत्तरी पूर्ण केली तेव्हा त्यांच्याविषयी वसंत कुंभोजकर यांनी दै. ‘दिव्य मराठी’मध्ये ‘एक आत्ममग्न कवी, चोखंदळ संपादक आणि बरेच काही…’ हा लेख लिहिला, तर ‘आडवळणांनी या वळणावर’ हा बेडेकर यांचा स्वत:च्या आयुष्याविषयीचा लेख दै. ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या रविवार पुरवणीत ७ डिसेंबर २०१४ रोजी प्रकाशित झाला.
६ डिसेंबर २०१८ रोजी बेडेकरांनी वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश केला. त्यानिमित्तानं डॉ. निरंजन माधव यांचा ‘अभिजात प्रतिभेचा अष्टपैलू हिरा’ हा लेख दै. ‘लोकमत’मध्ये (६ डिसेंबर २०१८) प्रकाशित झाला. त्याच दरम्यान ‘बहुआयामी’ या नावानं प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनीही एक लेख लिहिला होता. बेडेकरांनी पंचाहत्तरी पूर्ण केली, तेव्हा त्यांच्याविषयीचा ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचा ‘चैतन्याचा सारांश’ (२९ डिसेंबर २०१९) हा लेख दै. ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाला.
गेल्या वर्षी बेडेकरांविषयीचा ‘इत्थंभूत’ हा गौरवग्रंथ ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या हस्ते पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित झाला. त्या वेळी खरे म्हणाले की, “महाराष्ट्र चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात पटाईत आहे. जर श्रीकृष्ण बेडेकर महाराष्ट्रात असते, तर त्यांच्या गुणांचे चीज झाले असते अथवा नाही, याबाबत खात्रीलायक सांगता येणार नाही. मात्र बेडेकरांच्या मराठी भाषा संवर्धनाच्या कार्याकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केले.” याच कार्यक्रमात बेडेकर सत्कार समितीने खुलासा केला की, ‘बेडेकरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी गेल्या वर्षभरात आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं पाठवून केली, पण अद्यापपर्यंत काहीच निष्पन्न झालं नाही, तरीही आम्ही पाठपुरावा करत राहू.’ बेडेकरांवरील हा गौरवग्रंथ खरं तर त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होणार होता, पण करोनामुळे त्याचं प्रकाशन जरा लांबलं. या गौरवग्रंथातला एक लेख (‘गुणवैभव बेडेकर’ – मुकेश माचकर) साप्ताहिक ‘मार्मिक’च्या १५ डिसेंबर २०२०च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
या सगळ्या लेखांमध्ये थोडाफार फरक सोडला तर साधारणपणे बेडेकरांबद्दल एकसारखीच माहिती आहे.
या सगळ्यावरून काय निष्कर्ष निघतो : बेडेकरांचा इंदुरात राहून महाराष्ट्रातल्या साहित्य-व्यवहारातल्या आणि पत्रकारितेतल्या अनेकांशी चांगला संपर्क होता, जो एखाद्या महाराष्ट्रात राहणाऱ्याचाही नसेल. पण मोठ्यांची सर्टिफिकेटं गोळा करणं आणि स्नेह्यांजवळ त्याच्या आठवणी काढत राहणं, यातच बेडेकरांना खूप वेळ वाया घालवला. त्यापेक्षा त्यांनी अधिक साहित्यनिर्मिती किंवा कलानिर्मिती केली असती तर?
महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी माणसांना मातृभूमीची ओढ आणि साहित्याचं प्रेम इतकं भाबडं का करत असावं? कदाचित मराठी मानसिकतेमध्येच काहीतरी खोट असावी...
.................................................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment