अजूनकाही
अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या हिंडेनबर्ग अहवालावर ज्या काही नाट्यमय प्रतिक्रिया उमटल्या, त्यांचे मूळ या अहवालाच्या स्पष्टपणात होते. अहवालाचे शीर्षक बघा : ‘अदानी समूह : जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या धनाढ्य व्यक्तीने घडवलेला कॉर्पोरेट इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा’. हे खरे तर पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांमध्ये शिकवले गेले पाहिजे. याहून चांगले काही गळाला लागू शकेल, असे स्वप्न कोणत्याही वृत्तपत्राच्या संपादकीय विभागाने, बातमीसाठी गाळ उपसणाऱ्या कोणत्याही वार्ताहराने किंवा कोणत्याही अल्गोरिदमने बघितले नसेल.
अहवालाच्या सुरुवातीचे वाक्य बघा : ‘भारतातील १७.८ ट्रिलियन रुपये (२१८ अब्ज डॉलर) मूल्याचा अदानी समूह गेल्या अनेक दशकांपासून, कोणताही मुलाहिजा न बाळगता समभागांच्या फेरफारांत आणि लेखापालनाच्या घोटाळ्यांत गुंतलेला आहे, असे आमच्या दोन वर्षांच्या अन्वेषणातून पुढे आल्याचे आम्ही आज प्रसिद्ध करत आहोत.’
कदाचित हे सलामीचे वाक्य गॅब्रिएल गार्शिया मार्केझच्या ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ या कादंबरीतील ‘मेनी इयर्स लेटर्स, अॅज ही फेस्ड द फायरिंग’ या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या सलामीच्या वाक्याची जागा घेऊ शकणार नाही, पण त्यानेही अपेक्षित कामगिरी उत्तम प्रकारे बजावली आहे. भारतातील अवाढव्य उद्योगसमूहावर अत्यंत गोळीबंद स्वरूपात, शक्य तेवढ्या स्पष्टपणे आणि सार्वजनिक स्तरावर प्रतिक्रिया उमटण्याखेरीज गत्यंतरच उरणार नाही, अशा भाषेत आरोप करण्याचे काम या वाक्याने चोखपणे केले आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अहंकार आणि राष्ट्रवादाचे प्रच्छन्न दर्शन
या अहवालावर अदानी समूहाने दिलेली प्रतिक्रिया अर्थातच अहंकाराने ओतप्रोत भरलेली होती. खरे तर ही अहंकाराची विशेषत्वाने ‘देशी’ अभिव्यक्ती होती. अदानी एण्टरप्रायजेस म्हणजेच जसे काही भारताचेच दुसरे नाव, या टोकाच्या आत्मविश्वासातून ती आलेली होती. हिंडेनबर्गच्या आरोपपत्राच्या तुलनेत पाच पट लांबीच्या उत्तरात कंपनीने केलेला युक्तिवाद असा : ‘हा केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला अवांच्छित हल्ला नाही, तर हा भारतावर, भारताच्या स्वातंत्र्यावर एकात्मतेवर, भारतीय कंपन्यांच्या दर्जावर, देशाच्या यशोगाथेवर आणि महत्त्वाकांक्षेवर केलेला सुनियोजित हल्ला आहे.’
२०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी यांचे विमान वापरले तेव्हापासून, मोदी आणि त्यांच्या माध्यमातून भारत सरकारशी असलेली अदानी समूहाची जवळीक सर्वज्ञात आहे. भारतमातेच्या पदराखाली लपण्याचा अदानी समूहाचा हा प्रयत्न म्हणजे ‘मेरे पास माँ हैं’ या ‘दीवार’ चित्रपटातील बचावात्मक पवित्र्याचाच एक प्रकार आहे.
राष्ट्रवादाची शपथ वाहण्यात अदानी एंटरप्रायजेसचे सीएफओ जुगेनशिंदर सिंग यांनी एक पाऊल आणखी पुढे टाकले. हिंडेनबर्ग अहवालातील दावे फेटाळणाऱ्या निवेदनाचा व्हिडिओ त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाजवळ उभा राहून चित्रित केला. त्यावर वरताण म्हणजे, नंतर त्यांनी हिंडेनबर्गची तुलना ‘जालियनवाला बागे’त गोळीबाराचे आदेश देणाऱ्या जनरल डायरशी केली. भारतीय बाजारांनी हिंडेनबर्ग अहवालावर विश्वास का टाकला, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, ‘जालियनवाला बागेत एका इंग्रजाच्या आदेशावरून भारतीयांनी अन्य भारतीयांवर गोळीबार केला होता. त्यामुळे अन्य भारतीयांच्या वर्तनाचे आश्चर्य मला वाटत नाही.’
माध्यमांची अळीमिळी गुपचिळी
अदानी समूहाच्या भागधारकांची तुलना जालियनवाला बागेतील गोळीबाराला बळी पडलेल्या निष्पाप लोकांशी करण्यासाठी विशेष प्रकारचा मूर्खपणा अंगात असावा लागतो, हे तर झालेच, पण आणखी एका तथ्यामुळे हा देशप्रेमाचा उमाळा आणखी वेडगळ झाला आहे. हे तथ्य म्हणजे जुगेनशिंदर सिंग हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत! राष्ट्रध्वजापुढे उभे राहणे, इतिहासातील हौतात्म्याच्या प्रसंगांना हात घालणे, यांसारखा देशभक्तीचा निलाजरा वापर, हादेखील मोदी आणि त्यांच्या पक्षाने बहुमत प्राप्त करण्यासाठी निवडलेल्या वसाहतवादविरोधी राष्ट्रवादाचाच भाग आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
एफपीओ काढून घेण्याच्या निवेदनाच्या अखेरीस अदानी यांनी ‘जय हिंद’ असे लिहिले आहे. आता अदानी समूहाच्या अपयशी ठरलेल्या व्यावसायिक व्हेंचरशी ‘हिंद’चे काय देणेघेणे, हा प्रश्न आपल्याला पडल्याखेरीज राहत नाही. साहिर लुधियानवी यांनी ‘प्यासा’ चित्रपटातील पुढे अजरामर झालेल्या गीताद्वारे विचारले होते- ‘जिन्हें नाझ हैं हिंद पर वो कहाँ है?’ ‘हिंद’वर अभिमान असलेले जेथे कुठे असतील तेथे असू देत, पण भारताच्या मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये ते नक्कीच नाहीत.
‘फायनान्शिअल टाइम्स’मध्ये अदानी घोटाळ्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले होते- अदानी समूहाबाबतच्या अहवालांचे ‘शब्दांकन भारतात काळजीपूर्वक’ केले जाते, कारण वर्तमानपत्रांचे मालक- संपादक बड्या कॉर्पोरेट जाहिरातदारांवर अवलंबून असतात आणि सरकारला टीका फारशी सहन होत नाही. ‘काळजीपूर्वक केलेले शब्दांकन’ म्हणणे फारच सौम्य ठरेल. भारतातील उद्योगविषयक नियतकालिके गुलामाप्रमाणे ‘फायनान्शिअल टाइम्स’च्या प्रत्येक पानाची नक्कल करतात, पण अखेरीस उद्योगक्षेत्राच्या हिताची काळजी घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अंकित झालेल्या यंत्रणा आणि मोदी सरकारची मुखपत्रे म्हणूनच काम करतात.
उद्योगजगतातील या असंस्कृत समूहाची हिंडेनबर्गने खरडपट्टी काढल्यानंतर उद्योगविषयक दैनिकांमधील संपादकीय पानाशेजारील पानावर याबद्दलचे लेख प्रसिद्ध झाले खरे, पण त्यामध्ये अर्थजगतातील ढुढ्ढाचार्यांनी वाचकांना आधीपासून माहीत होते, तेच सांगितले होते.
गिरे तो भी टांग उपर....
एफपीओचे अपयश बॉक्सिंग कार्टूनच्या स्वरूपात दाखवायचे झाले, तर यात हिंडेनबर्गचे संस्थापक असलेले किरकोळ शरीरयष्टीचे नेट अँडरसन यांना ‘एव्हरलास्ट शॉर्ट्स व सिक्स्टीन ओझेड ग्लव्हज’ घालून, पालथ्या पडलेल्या महाकाय अदानीवर उभे राहिलेले दाखवता येईल. मोदी सरकारच्या कार्यकाळात माध्यमांनी चालवलेल्या खुशामतखोरीपासून दूर राहिलेली एकमेव माध्यमसंस्था एनडीटीव्ही अदानी समूहाने ताब्यात घेतल्यानंतर लगेचच ही दाणादाण उडणे, हा काही योगायोग नाही.
एनडीटीव्हीचे अधिग्रहण ही व्यावसायिक संधी नसून, कर्तव्य आहे, अशा स्वरूपाचे वक्तव्य अदानी यांनी ‘फायनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. भारतात ‘फायनान्शिअल टाइम्स’ किंवा ‘अल जझीरा’च्या तुलनेत उभी राहील, अशी एकही माध्यमसंस्था नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती.
स्वतंत्रपणे काम करून जागतिक क्षेत्रात ठसा उमटवू शकेल, अशा माध्यम कंपनीला आपण सहाय्य का करू नये, असा प्रश्न नव्यानेच माध्यम स्वातंत्र्याचा पुरस्कार करू लागलेल्या अदानी यांनी विचारला होता. अशी माध्यमसंस्था स्थापन करण्याचा खर्च अगदीच ‘नाममात्र’ असेल असेही ते म्हणाले. अदानी एनडीटीव्ही व मुख्य धारेतील माध्यमांच्या क्षेत्राकडे छंद म्हणून चाचपडून पाहण्याचा कोपरा म्हणून बघत असल्याचे यातून स्पष्ट होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हिंडेनबर्गद्वारे अत्यंत निंदा करणारा अहवाल प्रसिद्ध होऊन अदानी यांच्या अभेद्यतेचे वलय कायम होते. हा अहवाल प्रतिकूल असला तरीही अदानी समूह एफपीओ यशस्वी करून दाखवेल, कारण एवढा मोठा समूह अपयशी ठरूच शकत नाही, असे ठाम मत तज्ज्ञमंडळी व्यक्त करत होती. झैबात्सु आणि चाएबोलसारख्या पूर्व आशियातील २०व्या शतकातील उद्योगसमूहांप्रमाणे अदानी हा भारतातील निवडक उद्योगसमूहांपैकी एक आहे. हा समूह भारताच्या विकासासाठी निर्णायकदृष्ट्या महत्त्वाचा असल्यामुळे वेळ पडल्यास सरकार या समूहाला तारून नेईल, असे तज्ज्ञमंडळी बोलत होती. आणि ढोबळपणे बघितले, तर त्यांचा होरा बरोबर होता. एफपीओ पूर्णपणे सबस्क्राइब झाल्यानंतर जुनेजाणते ‘मी म्हटले नव्हते’ असा सूर लावून एकमेकांची पाठ थोपटत होते.
वरदहस्त सत्तेचा
उद्योगक्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांना कसे आपल्या बाजूने वळवण्यात आले असावे आणि एफपीओचा वाटा खरेदी करण्यासाठी दिग्गजांवर कसा दबाव आणला असावा, याबाबतच्या शंका वर्तमानपत्रांनी व्यक्त केल्या. रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग तुरळक असल्याचेही नोंदवले गेले, पण नंतर त्या क्षणाच्या अपरिहार्यतेत हा मुद्दा विस्मरणातही गेला. भारतासारख्या देशांमध्ये समभागधारकांची भांडवलशाही कशी परिणामकारक ठरू शकते, याचे हे अपवादात्मकरित्या पारदर्शक उदाहरण होते.
अदानी एंटरप्रायजेस आणि एलारा कॅपिटल यांच्या मंडळांवरील स्वतंत्र संचालक मान्यताप्राप्त आणि सखोल ज्ञान असलेले आहेत. त्यांना कॉर्पोरेट प्रशासनातील संभाव्य तफावतींची फारशी कल्पना दिलेली दिसत नाही. अदानी समूहाला आपल्या कंपन्यांच्या समभागांच्या किमतींमध्ये फेरफार करण्यात मदत केल्याचा आरोप एलारा कॅपिटल या भारतीय उपकंपनीवर झाल्यानंतर, बोरिस जॉन्सन यांचे बंधू जो जॉन्सन यांनी एलाराच्या संचालक मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्याला ‘या क्षेत्राचे ज्ञान’ पुरेसे नाही असे कारण त्यांनी दिले.
हे आरोप खरे असतील, तर चिंताजनक आहेत, असे मत एलाराच्या मंडळावरील आणखी एक संचालक लॉर्ड मेघनाद देसाई यांनी व्यक्त केले. एकंदर अदानी समूहाचे कळस गाठणे जवळपास निश्चित होते. त्यामुळे याची पडताळणी करणेच व्यर्थ होते.
भारत सरकारचा वरदहस्त लाभल्यामुळे स्वप्नातीत श्रीमंती प्राप्त झालेल्या अदानी यांना आपली प्रगती अपरिहार्य आहे, याचा अंदाज पूर्वीच आला होता. आपण ज्या कशाला स्पर्श करू त्याचे सोने होणार, हा आत्मविश्वास म्हणजे त्यांच्या गर्वाची व्याख्या ठरू शकेल. आपल्या राजकीय पाठीराख्यांची सत्ता राष्ट्राच्या सीमांपलीकडे चालत नाही आणि याच भागात एखादी अकल्पित पण अटळ शिक्षा किंवा एखादा गाळ उपसणारा शॉर्ट सेलर आपलं पितळ उघडं पाडण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत बसलेला असेल, याचाही कदाचित त्यांना विसर पडला होता.
मराठी अनुवाद - सायली परांजपे
‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या मार्च २०२३च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
५ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘दी टेलिग्राफ’ या इंग्रजी दैनिकात प्रकाशित लेखाचा हा अनुवाद आहे. मूळ लेखासाठी पहा –
https://www.telegraphindia.com/opinion/dented-hubris-on-the-hindenburg-adani-saga/cid/1914412
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment