‘लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज’ हा लेखसंग्रह ‘साप्ताहिक विवेक’ने प्रकाशित केला आहे. रमेश पतंगे, दीपक हनुमंत जेवणे, निमेश वहाळकर यांनी या संग्रहाचे साक्षेपी संपादन केले आहे. लोकमान्यांच्या कार्य-कर्तृत्वाची मांडणी या पुस्तकात अतिशय निगुतीने केली आहे. त्यामुळे यात समग्र टिळक भेटतात, आणि तेदेखील आजच्या संदर्भांसोबत.
‘भूमिके’सह ४१ लेखांचा या संग्रहात समावेश करण्यात आला आहे. ‘समन्वयवादी लोकमान्य!’ या योगी अरविंदांच्या लेखात आलेला पुढील परिच्छेद महत्त्वाचा आहे, “लोकमान्य टिळकांमध्ये अनेक दैवी गुण होते. त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांत त्यांनी आगळेवेगळे आणि शाश्वत असे स्थान मिळवले. टिळकांना कायद्याचे सखोल ज्ञान होते. त्यांनी वकिली व्यवसाय केला असता, तर पैसा आणि प्रतिष्ठा या गोष्टींनी त्यांच्या पायाशी लोळण घेतली असती. ते संस्कृत भाषेचे विद्वान, प्रभावी लेखक आणि मर्मज्ञ विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध होते. टिळकांच्या ‘ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ या ग्रंथांनी आशियाई संशोधन क्षेत्रात मानाचे स्थान मिळवल्यामुळे त्यांच्या संशोधनाला जागतिक स्तरावरही मान्यता मिळाली. त्यांचे ‘भगवद्वीते’वरील भाष्य हे केवळ भाष्य नाही; त्याला स्वतंत्र तत्त्वज्ञानाचा, एका उत्तम नीतिशास्त्राचा दर्जा देता येईल. टिळकांचे लेखन म्हणजे उत्कृष्ट गद्यलेखनाचा आदर्श नमुना आहे. या लेखनाच्या श्रेष्ठतेची तुलना कशाशीही होऊ शकणार नाही. मराठी वाङ्मयात स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची साहित्यिक क्षमता असूनही त्यांनी त्यांच्या सगळ्या क्षमता पत्रकारितेवर केंद्रित केल्या. कारण ईश्वराने आपली निवड राष्ट्रहिताचे कार्य करण्यासाठी केली आहे अशी त्यांची मनोमन श्रद्धा होती.... या सर्व गुणांचा विचार केला तरी टिळकांना ‘क्रांतिकारक’ म्हणता येणार नाही. मुळात भावनाप्रधान बंगाली माणसांचा अपवाद वगळता कोणाही भारतीयाचा मूळ स्वभाव क्रांतिकारक नसतो... म्हणूनच त्यांचे वर्णन ‘क्रांतिकारक नेते’ असे करण्यापेक्षा ‘समन्वयवादी नेते’ असे करणे जास्त योग्य होईल.”
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
‘आधुनिक राष्ट्रवादाला टिळकांचे योगदान’ या यांच्या लेखात दिलीप करंबेळकर यांनी लिहिले आहे - “फार कमी अभ्यासकांना ही माहिती आहे की भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा, ‘कॉन्स्टिट्यूशन इंडिया बिल १८९५’ हा भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बावन्न वर्षांपूर्वीच तयार झाला होता व तो बनविण्यात लोकमान्य टिळकांचा सिंहाचा वाटा होता... संसद, न्यायव्यवस्था व प्रशासन यंत्रणा या तीन शाखांत राज्यकारभाराची विभागणी केली असून आजच्याप्रमाणेच कायदा करणे, त्याचा अर्थ लावणे व त्याची अंमलबजावणी करणे हे या तीन शाखांचे काम असेल, हे त्यात स्पष्ट केले आहे.” याचा पुढे दीर्घ आढावा दीपक हनुमंत जेवणे यांनी ‘लोकमान्य आणि भारतीय संविधान’ या लेखात घेतला आहे.
‘सामाजिक सुधारणेच्या संदर्भात लोकमान्य आणि आगरकर’ या लेखात डॉ. ईश्वर नंदपुरे यांनी ग. प्र. प्रधान यांचे मत दिले आहे. ते लिहितात- “ज्या काळात पारतंत्र्यामुळे लोकांचा बौद्धिक आणि नैतिक अधःपात झालेला होता, त्या काळात देशभक्तीची ज्योत सर्वसामान्य माणसांच्या अंतःकरणात प्रज्ज्वलित करण्याचे कार्य टिळकांनी केले. त्यांनी लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केला. ‘स्वदेशी’, ‘बहिष्कार’, ‘राष्ट्रीय शिक्षण’, ‘स्वराज्य’ ही चतुःसूत्री लोकांपुढे ठेवून देशाला चळवळीत सहभागी करून घेतले. टिळकांनी दूरदृष्टीने लोकक्षोभाला योग्य वळण दिले.”चिरोलने त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले ते उगाच नाही.”
‘गीतारहस्य : टिळकांचे शाश्वत स्मारक’ या लेखात डॉ. कल्याणी नामजोशी यांनी गांधीजींचे मत उदधृत केले आहे- “गीतेवरील टिळकांची टीका हेच त्यांचे शाश्वत स्मारक होय.” टिळकांच्या निष्काम कर्मयोगासंबंधी त्यांनी फार छान उदाहरण दिले आहे. “धर्मराजाला (युधिष्ठिराला) द्रौपदी प्रश्न विचारते, राज्यत्यागापासून अज्ञातवासापर्यंतच्या आपदा आपल्याला भोगाव्या लागताहेत, तुम्ही निष्ठावान धर्मपालनकर्ते आहात. धर्माने तुम्हाला काय दिले? युधिष्ठिराने उत्तर दिले, “द्रौपदी, तुला कुणी सांगितले धर्माने मला काही द्यावे म्हणून मी धर्माचरण करतो? अगं! माझी धर्मावर निस्सीम निष्ठा आहे आणि तो श्रेयस्कर आहे, म्हणून मी धर्माचरण करतो. कोणत्या फलाच्या अपेक्षेने नाही. तो योग्य आणि चांगलेच सांगतो म्हणून.” येथे लोकमान्यांची कर्मामागची भूमिका लक्षात येते. त्यांनी केलेले कर्मयोगाचे विश्लेषण येथे उमगते. या उदाहरणात धर्माचे यथार्थ ज्ञान युधिष्ठिराला आहे, हे कर्माच्या मागील ‘ज्ञानमूलकत्व’, ज्ञान कोरडे नाही, त्या ज्ञानावर अपार निष्ठा आहे, ही त्यामागील ‘भक्तिप्रधानता’ आणि त्या कर्मापासून फलापेक्षा नाही, हे तर धर्म्यकर्म आहे, मग ते माझ्या लाभाचे की, तोट्याचे हा प्रश्नच उद्भवत नाही. कर्तव्याकरिता कर्म ही एवढी एकच भूमिका आहे. हाच ‘निष्काम कर्मयोग’ होतो. हेच स्वधर्माचरण होते आणि मोक्षाचा पंथराजही तोच होतो. त्यासाठी संन्यास नको, रोजचा प्रपंचच मोक्षमार्ग होतो. जीवन सार्थक करतो. लोकमान्यांच्या चरित्राकडे या दृष्टिकोनातून पाहू गेले, तर त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटनेमागे दिव्यभाव, निर्मळ कर्तव्यनिष्ठा आम्हाला आजही प्रेरणादायकच आहे, नित्यनूतनतेने बोधकारक आहे.”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
कधी असं वाटतं की, आपण टिळकांकडे पूर्वग्रहविरहित दृष्टीतून पाहत नाही. त्यामुळे ‘परमेश्वर अस्पृश्यता मानत असेल तर मी त्या परमेश्वराला मानत नाही’, असे म्हणणारे टिळक आपल्याला शिकवले जात नाहीत. ते डॉ. सुवर्णा रावळ यांच्या ‘लोकमान्य आणि विवेकानंद : आजच्या संदर्भात’ या लेखातून भेटतात.
‘लोकमान्य आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ हा वासुदेव कुलकर्णी यांचा दीर्घ लेख या दोघांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारा आहे. ‘वेदोक्त’, आणि ‘ताई महाराज दत्तक खटला’ या दोन्ही प्रकरणांचा त्यांनी चांगला आढावा घेतला आहे, तो मुळातून वाचण्यासारखा आहे. टिळकांच्या निधनाची तार मिळताच शाहू महाराज म्हणाले, “मास्तर मर्दानी माणूस गेला. माझा थोर शत्रू नाहीसा झाला. आता आपण कोणाशी लढा देणार? त्याच्या मागे सगळा पोरकटांचा बाजार. त्यांचा माझा मतभेद असला तरी ते थोर देशभक्त होते, हे मी मानतो.” तसेच या लेखात ‘लोकमान्यांच्या समग्र कार्याच्या संशोधनासाठी अध्यासन स्थापन झालेले नाही’, अशी खंतही व्यक्त केली आहे.
‘कर्मयोगी लोकमान्य आणि अध्यात्मयोगी अरविंद’ हा पार्थ बावस्कर यांचा लेख या दोघांच्या चरित्राचा संक्षिप्त आढावा घेणारा आहे.
‘लोकमान्यांनी गौरविलेले पाश्चात्य चिंतक’, या लेखात प्रा. डॉ. अशोक मोडक यांनी टिळकांनी अरिस्टॉटल, ऑगस्टस कॉम्ट, शॉपेनहोएर, मिल व स्पेन्सर, कान्ट, ग्रीन, नित्शे, पॉल डायसेन, मॅक्सम्युलर यांच्याविषयी लिहिले आहे, असे म्हटले आहे.
‘लोकमान्यांची राष्ट्रजागृती’ या डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांच्या लेखात लोकमान्यांवर लिहिल्या गेलेल्या काही पुस्तकांबद्दल माहिती आहे. गंगाधर गाडगीळांची ‘दुर्दम्य’ ही कादंबरी, धनंजय कीर यांनी लिहिलेले ‘भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ हे चरित्र, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेला ‘लोकमान्य टिळक संग्रह’, न. र. फाटक यांनी लिहिलेले ‘लोकमान्य’ हे चरित्र’, न. चिं. केळकर यांनी लिहिलेले तीन खंडी टिळक चरित्र इ.
त्यानंतर ‘महामानवाचे जीवनदर्शन’ या लेखात मोहन शेटे यांनी कैक पुस्तकांचा उल्लेख केला आहे. अरविंद गोखले यांचे ‘मंडालेचा राजबंदी’, ‘लोकमान्य ते महात्मा’ हा डॉ. सदानंद मोरे यांचा महाग्रंथ, भा. द. खेर, ना. सी. फडके, गोविंद तळवलकर, ग. प्र. प्रधान, कृष्णाजी फाटक, ह. त्र्यं. देसाई, प्रताप वेलकर, शि. ल. करंदीकर, माधव अणे, ल. रा. पांगारकर, दामले यांच्या पुस्तकांचाही उल्लेख आहे.
‘अर्थकारणी लोकमान्य’ हा नवा पैलू चंद्रशेखर टिळक यांनी प्रकाशात आणला आहे. ‘फेमीन कोड’चे त्यांनी मराठी भाषांतर केले होते, शेतकरी-कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आणले होते, ते ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ झाले होते.
टिळक मंडालेहून सुटून आले, तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या कार्याची फारशी माहिती आपल्या परिचित इतिहासात नसते. तो अवघा कालखंड ‘विश्वरत्न लोकमान्य’ या लेखातून अरविंद गोखले यांनी उभा केला आहे. इंग्लंडमध्ये राहून भारतीय स्वराज्याच्या चळवळीला पेलून धरणारे मुत्सद्दी टिळक यातून समोर येतात. त्या काळात त्यांनी जागतिक घडामोडींचा मागोवा घेतला आहे. त्याचा स्वराज्य प्राप्तीसाठी कसा उपयोग करून घेता येईल, यावर आपल्या सहकाऱ्यांसोबत विचार-विनिमय-कार्य केले आहे. मानहानी करणाऱ्या ‘चिरोल’वर इंग्लंडमध्ये खटला चालवला आहे. ‘मजूर पक्षा’ला आपलेसे करण्यासाठी देणगी दिली आहे; भारत विरोधी मते मांडल्याबद्दल ‘राष्ट्रीय काँग्रेस’च्या ब्रिटनमधील एकमेव, ‘इंडिया’ या वृत्तपत्राच्या संपादकाला, हेन्री एस. एल. पोलाक यांना कामावरून कमी करून नवीन संपादकाची नियुक्ती केली आहे.
भारताबद्दल खोटे वृत्त छापणाऱ्या स्थानिक वर्तमानपत्रांना आपल्या भाषणांद्वारे आणि लिखाणाद्वारे सत्य परिस्थितीची ओळख करून दिली आहे. इंग्रजांच्या दडपशाहीला आणि कायद्याच्या दट्ट्याला कायदेशीर मार्गाने अथक उत्तर देणारे मुत्सद्दी आणि बॅरिस्टर टिळक या लेखात भेटतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
टिळकांनी क्रांतिकारकांनादेखील छुपे सहकार्य केले, या काही क्रांतिकारकांच्या कार्यावर या पुस्तकात प्रकाश पडला आहे. वासुदेव बळवंत फडके, अनंत कान्हेरे, चापेकर बंधू, सेनापती बापट, पांडुरंग खानखोजे, सार्वजनिक काका इ. ‘टिळक आणि क्रांतिकारक’ या प्रा. डॉ. गणेश द. राऊत यांच्या लेखात आलेले वि. दा. सावरकरांचे विधान हा आयाम स्पष्ट करते- ‘‘ते (लोकमान्य) खड्गाची मूठ होते. आम्ही क्रांतिकारक त्याचे पाते होतो. खड्गाची मूठ हे जरी पाते होऊ शकत नाही, तरी पाते हे मुठीच्याच आधारे रणकंदनी लवलवते. पाते हे मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडीत असते.’’
मल्हार कृष्ण गोखले यांनी ‘लोकमान्यांचे सहकारी’ या लेखात चिदंबरम पिल्लै, दादासाहेब खापर्डे, दाजीसाहेब खरे, काका बॅप्टिस्टा, काकासाहेब खाडिलकर, न. चिं. केळकर या बहिश्चर प्राणांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. पण पतंगे यांनी आधी म्हटल्याप्रमाणे ‘‘लो. टिळकांना आपले वारस निर्माण करता आले नाहीत. लोकमान्य गेले आणि टिळक युगाचा अंत झाला. महात्मा गांधींची विचारसरणी टिळकांचा विचार पुढे नेणारी नव्हती.’’
‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि ते मी मिळवणारच’ या उद्घोषणेतील ‘ते’ ‘तो’ नव्हे, हे या पुस्तकात जागोजागी अधोरेखित केले आहे. रमेश पतंगे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. तो असा, “त्यांनी (टिळकांनी) गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. परक्यांच्या झारीने ज्ञान पिणारे आमचे विद्वान म्हणतात की, त्यांनी धर्म राजकारणात आणला. या लोकांनी युरोप, फ्रान्स आणि अमेरिकेचा इतिहास वाचला पाहिजे. या तिन्ही देशांत धर्म आणि राजकारणाची फारकत करताच येत नाही... धर्म भारताचा आत्मा आहे. तो जर आपण सोडला तर भारताचे अस्तित्व संपून जाते. लोकमान्य टिळकांचे समकालीन स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांनी ही गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगितलेली आहे... लो. टिळकांना अभिप्रेत असलेला धर्म निवृत्तिप्रधान नाही, तो कर्मप्रधान आहे. केवळ हरी हरी केल्याने, भजन-संकीर्तन केल्याने, पूजापाठ केल्याने कसलाच उद्धार होणार नाही. टिळकांचा आग्रह होता की, प्रत्येकाने समाजहिताचे काही ना काही कर्म केलेच पाहिजे. कर्माशिवाय माणूस राहू शकत नाही. स्वतःसाठी केलेले कर्म 'स्वार्थमूलक' असते आणि समाजासाठी केलेलं कर्म ‘परार्थमूलक’ असते. या कर्माची श्रेष्ठता अधिक… लोकमान्य टिळकांनीच काँग्रेसला लोकचळवळीचे रूप प्राप्त करून दिले. त्यांनीच ‘काँग्रेस’ हे नाव खेडोपाडी नेले.”
एकूण खूप चांगले लेख या पुस्तकात असताना १० टक्के लेख अगदीच उथळ वाटतात. ते घेतले नसते तरी चालण्यासारखे होते. काही लेखकांची छायाचित्रे का छापली आहेत, हे कळत नाही. तसेच करायचे होते, तर सगळ्यांचीच छायाचित्रे घ्यायला हवी होती. मराठी शुद्धलेखन जाणीवपूर्वक नवीन नियमांना धरून केले आहे. मात्र ‘खातरी’, ‘सररास’, ‘विसकळीत’ इ. मुद्रणदोष राहिले आहेत. इंग्रजी शब्दांतही काही ठिकाणी मुद्रणदोष आहेत. अशा बारीकसारीक चुका सोडल्या तर हे पुस्तक काही अंशी परिचित आणि बव्हंशी अपरिचित टिळक आपल्यापर्यंत समर्थपणे पोचवते.
‘लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज’ | संकल्पना : रमेश पतंगे | संपादक : दीपक हनुमंत जेवणे आणि निमेश वहाळकर
प्रकाशक : साप्ताहिक विवेक, मुंबई | मुखपृष्ठ : सुहास बहुळकर | पाने : २७८ | मूल्य : ३५० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment