‘मोठी माणसे’ : पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळातील ही माणसे आहेत. त्यांच्या जीवननिष्ठेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी आणि दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे
ग्रंथनामा - झलक
नरेन्द्र चपळगावकर
  • ‘मोठी माणसे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 15 March 2023
  • ग्रंथनामा झलक मोठी माणसे Mothi Manse नरेन्द्र चपळगावकर Narendra Chapalgaonkar

ज्येष्ठ लेखक आणि ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेन्द्र चपळगावकर यांचा ‘मोठी माणसे’ हा व्यक्तिचित्रसंग्रह नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. यात आचार्य जावडेकर, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य भागवत, स्वामी रामानंद तीर्थ, एस.एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, मधू लिमये आणि गंगाप्रसाद अग्रवाल अशी बारा व्यक्तिचित्रे आहेत. या संग्रहाला चपळगावकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

ज्यांच्याबद्दल मला लिहावे वाटले व मी लिहिले, अशा बारा मोठ्या माणसांची व्यक्तिचित्रे या पुस्तकात एकत्र केली आहेत. साधारणतः १९२० ते १९७० अशा पन्नास वर्षांच्या काळात जे महाराष्ट्राच्या समाजजीवनात कार्यरत होते आणि ज्यांचे मोठेपण मला भावले, अशांची ही व्यक्तिचित्रे आहेत. एका दृष्टीने पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळातील ही माणसे आहेत. त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांची जीवननिष्ठा वेगवेगळी आहे, तरीही त्यांच्यात एक समान सूत्र आहे. त्यांच्या जीवननिष्ठेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी आणि दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे.

वेगवेगळ्या वेळी लिहिलेली ही व्यक्तिचित्रे मी एकत्रपणे वाचली, तेव्हा स्वाभाविकपणे मनात प्रश्न निर्माण झाला की, यांचे कोणते मोठेपण मला अधिक भावले? प्रथम जाणवले ते असे की, सत्तेसाठी वाटेल ते क्षम्य मानणारी नवी संस्कृती रुजत असताना राजकीय सत्तेपासून दूर राहिलेल्या या माणसांचे स्मरण फार महत्त्वाचे वाटले.

या व्यक्तिचित्रांमधील काकासाहेब गाडगीळांचा एक अपवाद वगळता इतर कोणीही कधीही सत्तेत नव्हते. सत्ता ही आपल्या आयुष्यभराच्या ठरवलेल्या कामासाठी एक पायाभूत आवश्यकता आहे, असे त्यांनी मानलेच नाही. सत्तेसाठी तडजोडी करणे तर सोडून द्या, पण सत्ता जवळ येत असतानाही तिचा अव्हेर केला. काकासाहेब गाडगीळांचा समावेश यात करण्याचे एक कारण आहे. सत्तेमध्ये राहूनसुद्धा ज्यांच्या अंगाला किंवा मनाला सत्ता चिकटलीच नाही, असे गाडगीळांचे व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मंत्रिपद गेल्यानंतर दिल्लीच्या रस्त्यावरून ते पायी चालत आणि राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यात आल्यावर बसच्या तिकिटासाठी रांगेत उभे राहत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

आज काही काळ किरकोळ सत्तेत राहिलेला माणूससुद्धा ती गेली म्हणजे बैचेन होतो. ती पुन्हा प्राप्त व्हावी म्हणून धडपडू लागतो. अशा काळात उदारमतवादी लोकशाही राजकारणी कसे हवेत याचा काकासाहेब गाडगीळ हा एक वस्तुपाठच होता.

गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीवेळी केवळ विद्यालयात शिक्षण घेणाऱ्यांचे नव्हे, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत असलेल्या सामान्य माणसांचेसुद्धा प्रबोधन करण्याची आवश्यकता ज्या आचार्यांना जाणवली, त्या आचार्य जावडेकर, आचार्य भागवत आणि शंकररावजी देव यांचा यात समावेश आहे. या सगळ्या व्यक्तींनी काही शाश्वत मूल्ये आपल्या मनाशी घट्ट बाळगली होती. व्यक्तिगत जीवनातील सर्व इच्छा-आकांक्षा आणि गरजा यांना बांध घालून समाजाचे ऋण फेडण्यासाठी, त्याच्या वैचारिक उन्नयनासाठी त्यांनी आपले कष्ट आणि बुद्धी वापरली.

शंकरराव देवांचे आयुष्य एखाद्या शोकांतिकेसारखे गेले; पण आयुष्याच्या शेवटच्या पर्वात त्यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधनासाठी संस्थात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना फारसे लावण्यात येत नसलेले ‘आचार्य’ हे उपपद या कामाने त्यांनी पुन्हा सार्थ केले.

आचार्य भागवतांनी आजाऱ्यांच्या सेवेसाठी स्वतःला तो आजार जडवून घेण्याचा धोका पत्करला. आपल्या जीवनपद्धतीच्या आग्रहाने इतरांना त्रास होऊ नये याची ते दक्षता घेत. गांधीवाद्यांतला स्वाभाविकपणे येणारा रुक्षपणा आचार्यांना व्यापत नव्हता. साहित्यातल्या निर्भय अभिव्यक्तीच्या समर्थनार्थ तेही निभर्यपणे उभे राहत. ही मंडळी नुसतीच कार्यकर्ती नव्हती, महाराष्ट्राच्या वैचरिक संचितात त्यांनी टाकलेली भर महत्त्वाची आहे.

कडव्या ब्राह्मणेतर चळवळीत सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ केलेले केशवराव जेधे गाडगीळांसारख्या मित्राविरुद्ध निवडणूक लढवावी लागल्यामुळे व्यथित होत आणि त्यांचे दुःख त्यांच्या डोळ्यांवाटे पाझरू लागे.

राष्ट्र ही संकल्पना श्रद्धा ठेवण्याचा विषय नाही, जागतिक स्तरावर साम्यवादाचा विचार करताना राष्ट्रहिताचे काहीच महत्त्व नाही, असे मानणाऱ्या कम्युनिस्ट चळवळीत ज्यांचे आयुष्य गेले, त्या श्रीपाद अमृत डांग्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागे होते, पक्षाची शिस्त सांभाळूनसुद्धा त्यांना ते टाकून द्यावेसे वाटत नव्हते. डांग्यांसारखी माणसे पोथीनिष्ठ पक्षाच्या चौकटीत मावत नसतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

समाजवाद आणि समता लोकशाही मार्गाने येऊ शकते, असे मानणाऱ्या कार्यकर्त्यांना आचार्य जावडेकर हा मोठाच आधार होता. महाविद्यालयीन शिक्षण फारसे न झालेल्या आचार्यांनी समकालीन राजकीय विचार करताना सैद्धांतिक विचारही केला आणि त्याला ग्रंथरूपही दिले. कोणताही प्रश्न आला म्हणजे सर्व समाजवादी मंडळी जावडेकरांचा सल्ला घेत. आपल्या आर्थिक आवाक्यात जेवढे शक्य आहेत तेवढेच उपचार माझ्या आजारावर मी घेईन, असे सांगणारे जावडेकर आज कुठे सापडतील? जावडेकरांनी सत्याग्रही समाजवाद सांगितला.

आज मोर्चे, निदर्शने आणि सत्याग्रह यांचे (अपवाद वगळता) गांभीर्यच उरलेले नाही. आचार्यांनी सांगितलेला सत्याग्रही समाजवाद आपल्या आचरणात उतरवणारी एस.एम. जोशी यांच्यासारखी माणसेसुद्धा त्या काळात होती. आपले तर्कशुद्ध विचार आणि कठोर बुद्धिनिष्ठा जपतानाही मनातल्या रसिकतेला आणि ऋजुतेला नानासाहेब गोऱ्यांनी अंतर दिले नाही.

काही ध्येयनिष्ठ माणसे आजूबाजूचे जग किती भोगवादी झाले आहे, याचा विचार न करता आपल्याला योग्य वाटणाऱ्या मार्गानेच जाऊ इच्छितात. त्यांची श्रद्धा नव्या बदलांच्या लाटांतसुद्धा अविचल असते. गांधींच्या मार्गानेच जग जाणार आहे आणि त्याचे काही प्रयोग जगात चालू आहेत, खेडी स्वयंपूर्ण होणार आहेत आणि माणसे अनावश्यक गरजांतून मुक्त होणार आहेत, असे गंगाप्रसाद अग्रवाल यांना खात्रीपूर्वक वाटत होते.

जग गांधीमार्गाकडे परत येणार आहे आणि जगभर त्या विचारांचा प्रसार होणार आहे, यावरची गंगाप्रसादजींची अविचल श्रद्धा पाहणे हासुद्धा एक सुंदर अनुभव होता. क्षणभर तर्काला बाजूला सारणारी ती श्रद्धा होती. त्यातले काही गांधीविचार आपल्या प्रयोगात त्यांनी प्रत्यक्षात आणलेही होते. ते तसे प्रत्यक्ष जगलेही होते. म्हणून असे स्वप्न पाहण्याचा त्यांना अधिकार होता.

ज्या काळात या व्यक्तींचे प्रत्यक्ष कार्य चालू होते, तो काळ स्वतःचा विचार सोडून देऊन समाजाचा विचार करणारा काळ होता. या पुस्तकात ज्यांची व्यक्तिचित्रे आहेत ती माणसे आपल्या थोडीफार स्मरणात तरी आहेत. गांधीजींच्या दांडीयात्रेत सामील झालेले, राष्ट्रीय शाळेत शिकवायचे म्हणून चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिलेले, स्वातंत्र्याच्या चळवळीत सर्वस्व सोडून सामील झालेले, पण स्वातंत्र्यानंतर तेच दारिद्र्य आणि समाजाकडून होणारी उपेक्षा भोगत राहिलेले, आज ना उद्या क्रांती होणार आहे, या श्रद्धेने अर्धपोटी राहत, सगळे तारुण्य वाळवत, पक्षाचे निष्ठावंत ‘फुलटायमर’ (पूर्णवेळ कार्यकर्ते) म्हणून जगलेले, आयुष्याची ससेहोलपट झालेले किती तरी कार्यकर्ते होऊन गेले.

स्वातंत्र्याच्या चळवळीने आणि स्वातंत्र्यानंतरच्या समाजव्यवस्थेने त्यांना काय दिले? मिळाले ते आपण आपली निष्ठा जपली, आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिलो, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपण सहभागी होतो याचे समाधान. या सगळ्यांची व्यक्तिचित्रे लिहिता येत नसतात. ज्यांची लिहिली आहेत, त्यात त्यांचेही स्मरण अंतर्भूत आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

आपल्याकडे राजकीय पक्षांचा संगतवार इतिहास फारसा लिहिला गेलेला नाही. लोकशाही समाजवादी चळवळीचा इतिहास लिहिण्याचे अनेक संकल्प झाले, पण त्यात काय असावे याचाच खल होण्यात काळ गेला. कम्युनिस्ट पक्षाच्या परंपरेमुळे व्यक्तिजीवनालासुद्धा ठरावांच्या, अहवालांच्या भाषेत जोखावे लागते. त्यातल्या माणसाला प्राधान्य देणारे कमी लिहिले गेले. ऊध्वरेष्यांचे ‘हरवलेले दिवस’, मोहित सेन यांचे ‘अ ट्रॅव्हलर अँड द रोड’ (अनु. पांथस्थ) यासारखे काही अपवाद.

यात ज्यांची व्यक्तिचित्रे आहेत ती सगळीच माणसे गांधीवादी नव्हती; परंतु ज्या कालखंडात त्यांची घडण होत होती, त्यात गांधीजींच्या व्यक्तित्वाचा आणि त्यांच्या विचारांचा कमी-अधिक परिणाम, यापैकी बहुतेकांवर होणे स्वाभाविक होते.

गांधीजींनी राजकारणसुद्धा शाश्वत मानवी मूल्यांशी सुसंगत असले पाहिजे, असा आग्रह धरला. तसा त्यांनी प्रयत्नही केला. गांधीजींमुळे राजकारणातही उदारता जपली पाहिजे असा संदेश गेला. स्वातंत्र्य, लोकशाही आणि बंधुत्व ही मूल्ये तर गांधीजी मानत होतेच; शिवाय राजकारणात लबाडी नसावी, ते खुले असावे, असा त्यांचा आग्रह असे.

आज स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे झाल्याचा समारंभ सरकारी पातळीवर साजरा होतो आहे, त्या वेळी ज्यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि भारताचे भविष्य आपल्या मनात सतत बाळगले अशा या मोठ्या माणसांचे स्मरण हा आपल्यासाठी या उत्सवात सामील होण्याचा योग्य मार्ग आहे.

‘मोठी माणसे’ – नरेन्द्र चपळगावकर | समकालीन प्रकाशन, पुणे | पाने - २२४ | मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......