अजूनकाही
१. अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी शिवस्मारक समितीने केली आहे. सध्याच्या आराखड्यानुसार पुतळ्याची उंची १९२ मीटर इतकी आहे. मात्र, हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरावा यासाठी ही उंची २१० मीटर इतकी करण्यात यावी, अशी शिवप्रेमींची भावना असल्याचे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले. सध्या चीनमध्ये असणारा बुद्धांचा पुतळा हा जगातील सर्वांत उंच पुतळा आहे.
मध्ये दोनपाच बैठका होतील. एखादी फाइल पुढे सरकेल. एखादी मंजुरी मिळेल, तोवर आणखी कुठेतरी कोणीतरी आणखी उंच पुतळा उभा करेल. मग समिती पुन्हा भावनिक होईल. पुन्हा प्रस्ताव पुढे जाईल. समिती राहिली, भत्ते मिळत राहिले, राजकीय सोय झाली, म्हणजे पुष्कळ. शिवाय काहीतरी महान घडणार आहे, असं भासवलं की त्याची वाट पाहण्यातच सामान्य जनतेला आनंद असतो. तोही मन:पूत मिळत राहील.
......................................................................
२. नवी मुंबईतील भूमाफिया, नियम वाकविण्यात वाकबगार असलेले बिल्डर, राजकीय नेते, ठेकेदार आणि महापालिकेतील ठराविक अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीला धडाकेबाज कामगिरीने गेले वर्षभर सळो की पळो करून सोडणारे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना अनधिकृत बांधकामांबाबत सरकारच्या धोरणाशी घेतलेला आक्रमक विरोधी पवित्रा महागात पडला आहे. अवैध बांधकामाना संरक्षण देण्यास नाकारणाऱ्या मुंढे यांच्या भूमिकेला उच्च न्यायालयाने गौरवल्याला २४ तास उलटायच्या आत सरकाने शुक्रवारी त्यांची महापालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी केली. मुंढे यांच्या जागी मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्वच्छ आणि पारदर्शक सरकारच्या बातांवर विश्वास ठेवलेल्यांसाठी ही बातमी कुत्र्याच्या गळ्यातल्या हाडकासारखी आहे... गिळताही येत नाही आणि ओकून काढताही येत नाही. सामान्य जनतेला वाटतं की कसला डॅशिंग आणि धडाडीचा अधिकारी आणलेला आहे, केवढं हे जबरदस्त सरकार. प्रत्यक्षात ती एक तात्पुरती राजकीय सोय असते. कुणालातरी चेक दिला की प्यादं हलवलं जातं.
......................................................................
३. पंजाबमधील अटारी सीमेवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत उंच तिरंग्याला खराब हवामानाचा फटका बसला आहे. १२०x८० फुटांचा हा तिरंगा उभारण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांत येथील प्रतिकूल हवामानामुळे या तिरंग्याच्या देखभालीची मोठी समस्या जाणवू लागली आहे. पाच मार्चला हा तिरंगा फडकवण्यात आला होता. तेव्हापासून याठिकाणी दोन आठवड्यात दोनदा नवीन राष्ट्रध्वज लावावा लागला. या एका राष्ट्रध्वजाची किंमत एक लाख रुपये इतकी आहे. खूप उंचीवर असल्याने जोरदार वाऱ्यांमुळे तिरंग्याचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रध्वजाची देखभाल करण्यात येणाऱ्या ट्रस्टकडे आता केवळ १२ राष्ट्रध्वजच उरले आहेत.
थिएटरमध्ये राष्ट्रगीताला उभे न राहणाऱ्या देशद्रोह्यांकडून राष्ट्रध्वज दंड गोळा केला, तर हे काम सोपं होईल का? लोकांनाही चॉइस मिळेल आणि आठवड्याला काय, दिवसाला दोन ध्वज बदलता येतील. कुठूनतरी पाकिस्तानचं नाक कापल्याचा काल्पनिक का होईना आनंद मिळत राहायला हवा. देश मोठा करण्याच्या किचकट भानगडीत पडण्यापेक्षा सगळा खेळ प्रतिमा-प्रतीकांचा करायचा. काम सोपं.
......................................................................
४. येत्या पंधरा वर्षांत यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालीमुळे इंग्लंडमधील एक कोटी नोकऱ्यांना संभाव्य धोका निर्माण झाला असल्याची माहिती एका अहवालाने शुक्रवारी दिली. पीडब्लूसी या लेखापरीक्षण करणाऱ्या संस्थेने केलेल्या अभ्यासात स्वयंचलन तंत्रज्ञानामुळे येत्या १५ वर्षांत अमेरिकेत ३८ टक्के, जर्मनीत ३५ टक्के नोकऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर जपानमध्ये हे प्रमाण २१ टक्के इतके असणार आहे.
हे तंत्रज्ञान अमेरिकेतही जाईलच. तेव्हा ट्रम्पतात्यांना विलक्षण आनंद होईल. सगळ्या मुस्लिम देशांतून आलेल्यांना आणि भारतीयांना वगैरे हुसकावता येईल त्यांना. एकच प्रॉब्लेम आहे. ट्रम्पतात्यांचा साबण स्लो असला तरी कधी ना कधी त्यांच्या लक्षात येईलच की हे यंत्रमानव आपल्या गोऱ्या भूमिपुत्रांच्या (शतकातला सर्वोत्तम विनोद) नोकऱ्या बळकावतायत. मग ते यंत्रमानवांना कोणत्या देशात परत पाठवतील? मॅन्युफॅक्चरिंगच्या?
......................................................................
५. बेकायदा कत्तलखान्यांवर बंदी घालण्यात येत असल्यामुळे उत्तर प्रदेशात मांसाचा तुटवडा पडला असून उत्तर प्रदेशातील वाघ-सिंहांवर उपासमारीची वेळ आली आहे. गोवंश हत्याबंदीमुळे म्हशीच्या मांसाची विक्री आणि बेकायदा कत्तलखान्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावरच्या कारवाईमुळे प्राणीसंग्रहालयातल्या वाघ आणि सिंहांना म्हशीच्या मांसाऐवजी चिकन दिले जात आहे. या प्राण्यांनी चिकनला तोंड लावायला नकार दिला आहे. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी हा मुद्दा संसदेमध्ये मांडताना प्रश्न केला की, निसर्गाने प्रत्येकाला त्याच्या गुणधर्मानुसार आहार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, ते या नव्या धोरणांमुळे हिरावले जात आहे. वाघ-सिंह मांस खाणार नाहीत, तर मग काय पालक पनीर खातील का?
चांगली आयडिया आहे ही. (बाघ-सिंहों को) उत्तर प्रदेश मे रहना होगा, तो पालक पनीर खाना होगा, अशी घोषणा देत काही गोरक्षक कार्यकर्त्यांना फलक घेऊन या वन्यप्राण्यांच्या आवासात थोडा वेळ सोडायला हवं त्यांच्या मनधरणीसाठी. मांसभक्षण किती वाईट आहे आणि माणसाचीही माता असलेली गाय आणि तिचा वंश केवढा अनमोल आहे, हे त्यांना पटवून दिलं तर तेही पालक पनीर खाऊ लागतीलच की! स्वयंसेवक जमवायला घ्या. यापुढे वाघसिंह जंगलातही बहुतेक गोमातेचा घास करण्याऐवजी गोमातेला घास भरवताना दिसतील. किंबहुना तशी एखादी कहाणी तिथल्या शालेय पुस्तकात छापलीही जात असेल आत्ताच.
......................................................................
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment