‘राजारामशास्त्री भागवत यांचा भाषाविचार’ : राजारामशास्त्री भागवत यांच्या विचारांची मुख्य चौकट ‘महाराष्ट्रवाद’ व ‘देशीवाद’ ही आहे. ते ‘महाराष्ट्रवादा’पासून सुरुवात करतात आणि ‘देशीवादा’वर जाऊन स्थिरावतात
ग्रंथनामा - झलक
प्रकाश पवार
  • ‘राजारामशास्त्री भागवत यांचा भाषाविचार’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 15 March 2023
  • ग्रंथनामा झलक राजारामशास्त्री भागवत यांचा भाषाविचार मनीषा खैरे Manisha Khaire राजारामशास्त्री भागवत Rajaramshastri Bhagwat

राजारामशास्त्री भागवत हे मराठीतील एक विचक्षण पण काहीसे दुर्लक्षित अभ्यासक. धर्म, भाषा, इतिहास, समाजशास्त्र आदि विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. पण तरीही त्यांच्या साहित्याचा फारसा अभ्यास मराठीत झालेला नाही. दुर्गाबाई भागवत यांच्याव्यतिरिक्त त्यांची कुणी विशेष दखल घेतलेली नाही. प्रा. डॉ. मनीषा खैरे या तरुण लेखिकेचे ‘राजारामशास्त्री भागवत यांचा भाषाविचार’ हे पुस्तक नुकतेच अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक प्रकाश पवार यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

‘राजारामशास्त्री भागवत यांचा भाषाविचार’ हा मनीषा खैरे यांचा ग्रंथ राजारामशास्त्री भागवत यांच्या विचारांचे विवेचन करणारा आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात विविध विचार मांडले गेले. त्या काळात भागवत यांनीदेखील स्वतंत्रपणे विचार मांडले. परंतु त्यांची विचार-मांडणी इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यांच्या विचारांची मुख्य चौकट ‘महाराष्ट्रवाद’ व ‘देशीवाद’ ही आहे. भागवत महाराष्ट्रवादापासून सुरुवात करतात आणि देशीवादामध्ये जाऊन स्थिरस्थावर होतात. ‘महाराष्ट्रवाद ते देशीवाद’ असा त्यांचा जीवनभराचा वैचारिक प्रवास झालेला दिसतो. अर्थातच ‘देशीवाद’ हा विचार भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेला आहे. नेमाडे यांच्या विचारांचे पूर्वसुरी भागवत आहेत. या गोष्टीचे आत्मभान एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा अभ्यास करणाऱ्या विचक्षण विचारवंतांना अजून आलेले दिसत नाही. खरे तर भागवत आणि नेमाडे यांच्या देशीवादाचे तुलनात्मक संशोधन झाले पाहिजे. मुख्य मुद्दा म्हणजे भागवत यांच्या विचारांची एक चौकट ‘देशीवाद’ ही होती. या चौकटीत मनीषा खैरे यांनी भागवत यांचे विवेचन केलेले आहे.

या ग्रंथात भागवत यांचे विचार मुख्यतः तीन भागांत मांडलेले आहेत. संस्कृत-मराठी जन्य-जनक संबंधांवर प्रश्नचिन्ह, मराठी भाषा उत्पत्तीविचार, व्युत्पत्तीविचार, पौराणिक व्युत्पत्तींचे पुनर्वाचन, शिक्षणविचार, विद्यापीठ स्तरावरील मराठी भाषाविचार, जातविचार, स्त्रीविचार या आठ विषयांवर मांडणी केलेली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या आठ प्रकरणांमध्ये ‘देशीवादा’ची चौकट अधोरेखित झालेली आहे. भागवत यांनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या आरंभी लेखन केलेले होते. यामुळे भागवत यांचे लेखन आणि मनीषा खैरे यांनी भागवत यांच्यावर लिहिलेले लेखन यांमध्ये जवळपास एका शतकाचे अंतर आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

भागवत यांच्या काळात आजच्यासारखा भाषाविज्ञानाचा फार विकास झालेला नव्हता. त्यामुळे नव्या संदर्भात खैरे यांनी लेखन केलेले आहे. विशेषतः, आजचा काळ हा आधुनिकतेचा अंत झालेला काळ आहे. परंतु तरीही खैरे यांनी आधुनिकतेच्या चौकटीत भागवत यांचे विवेचन-विश्लेषण केलेले आहे. त्यांच्या एकूण लिखाणाला आधुनिकतेची चौकट आहे, हे या पुस्तकाचे दुसरे वैशिष्ट्य आहे.

भागवत यांनी देशीवादाच्या चौकटीत त्यांचे संपूर्ण लेखन केलेले असल्याने, ते देशीवादाचा विचार मांडणारे एक महत्त्वाचे विचारवंत होते. त्यांनी देशीवादाचा विचार भाषा, जात, शिक्षण, धर्म, स्त्री-मुक्ती, इतिहास-दृष्टी, सामाजिक न्याय अशा विविध स्तरांवर मांडला. त्यामुळे भागवत हे देशीवादाचे विविध पदर आणि त्यांच्यातील आंतरसंबंध एकाच वेळी स्पष्ट करणारे विचक्षण विचारवंत व लेखकही होते. त्यांनी या चौकटीत त्यांचे समाजशास्त्र, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहासशास्त्र, सत्ताशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र, अर्थनिर्णयशास्त्र मांडले आहे. या गोष्टीचे आत्मभान खैरे यांना आहे. त्यांनी भागवत यांची देशीवादाची चौकट अप्रत्यक्षपणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळे हा ग्रंथ नवीन विवेचन करणारा आहे.

खैरे यांनी भागवत यांच्यावर समग्र संशोधन केले आहे. त्यांनी मुख्यतः ‘मुराळी’ या नियतकालिकात लेखन केले. त्यानंतर हा ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. अर्थातच त्यांचे लेखन इतरांपेक्षा वेगळे आणि भागवत यांच्या व्यापक विचारांचा आढावा घेणारे आहे. भागवत हे संस्कृत पंडित होते. ब्राह्मणेतर चळवळीकडे त्यांचा कल झुकलेला होता. त्यांनी एक वैचारिक भूमिका घेऊन केलेले लेखन महत्त्वाचे असल्यामुळे, काही निवडक लेखकांनी त्यांच्यावर लेखन केले. उदा. रा. ना. चव्हाण. त्यांनी भागवत यांच्यावर काही लेख लिहिले होते. त्या लेखांचे संपा. रमेश चव्हाण यांनी ग्रंथात रूपांतर केले.

दत्तात्रय पुंडे आणि यशवंत सुमंत यांनी जातिसंस्थेवर ग्रंथ संपादित केला. त्या ग्रंथात लोणकर यांनी भागवत यांच्या जातसंस्थाविषयक विचारांवर लेख लिहिला आहे. भागवत यांचे साहित्य दुर्गा भागवत यांनी संपादित केले. दुर्गा भागवत व अशोक चौसाळकर यांनी भागवतांवर चरित्रे लिहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भागवत यांच्यावर संशोधन झाले. ‘राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय’ या ग्रंथात भागवत यांच्यावर लेख प्रकाशित झालेला आहे. परंतु या लिखाणात देशीवादाची चौकट दिसत नाही.

डॉ. सदानंद मोरे यांनी ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये भागवत यांच्या विचारांवर लेख लिहिले. त्यात त्यांनी देशीवादाची चौकट मांडली आहे. मात्र यापेक्षा जास्त व्यापक दृष्टी ठेवून खैरे यांनी देशीवादाच्या चौकटीत विवेचन आणि विश्लेषण केलेले दिसते. तसेच जन, भाषा, स्त्री, जात अशा विविध गोष्टींचा एकत्रित अभ्यास करणारे हे आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे विवेचन आहे. या अर्थाने हा ग्रंथ जास्त महत्त्वाचा आणि व्यापक विवेचन करणारा आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

मनीषा खैरे यांनी संस्कृत-मराठी जन्य-जनक संबंधांवर प्रश्नचिन्ह, मराठी भाषा उत्पत्तीविचार, व्युत्पत्तीविचार, विद्यापीठ स्तरावरील मराठी भाषाविचार या प्रकरणांमधून मराठी भाषेबद्दलचा विचार समग्रपणे मांडलेला आहे. समाजाच्या गरजांमधून जनांची भाषा विकसित होत गेली. समाज ज्या प्रकारचा होता, त्याच प्रकारची त्यांची भाषाही होती. अतिप्राचीन काळी समाज स्त्री-प्रधान होता; तेव्हाची भाषा त्या सामाजिक पर्यावरणात विकसित होत गेली. मध्ययुगातील समाजात सामाजिक संघर्ष होता; त्या समाजात सामाजिक सलोख्याने भाषा विकसित झाली.

भागवत यांनी मराठी भाषा हा देशी भाषांचा एक मुख्य प्रवाह मांडला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीपासूनच देशी भाषा आणि विदेशी भाषा असा एक तणाव निर्माण झाला होता. देशी भाषांच्या विकासाला फार वाव मिळत नव्हता. ईस्ट इंडिया कंपनीचे आणि पुढे वसाहतवादी राजवटीचे धोरण सकृत्दर्शनी देशी भाषांना पाठिंबा देणारे वाटत राहिले. परंतु त्यांचे मुख्य धोरण देशी भाषांपेक्षा इंग्रजी भाषेला अग्रक्रम देणारे होते. यामुळे सरकारचा पाठिंबा देशी भाषांना मिळाला नाही.

देशी भाषांचा विकास झाला पाहिजे, हा भागवत यांचा विचार यामुळे सरकारविरोधी होता. अर्थात तसेही भागवत ब्रिटिश राजवटीविरोधी होते. त्यामुळे त्यांच्या देशी भाषाविचारात आणि ब्रिटिश सरकारविरोधी भूमिकेत एक प्रकारचा देशीवाद सुस्पष्टपणे अभिव्यक्त होत होता. देशी भाषांवरील प्रेम म्हणजेच देशी राष्ट्रवादाची संकल्पना होय. देशी भाषांचा विकास म्हणजे देशी राष्ट्रवादाचा विकास होय. भागवत यांच्या विचारांमध्ये देशी भाषा आणि देशी राष्ट्रवाद यांचे सूत्र या पद्धतीने जुळलेले दिसते.

‘देशी भाषा’ आणि ‘देशी राष्ट्रवाद’ ही दोन जुळी अपत्ये भागवत यांच्या विचारातून जन्मास येतात. या गोष्टींचा तपशील या ग्रंथामध्ये सुस्पष्टपणे दिसतो. तसेच ‘पौराणिक व्युत्पत्तीं’चे पुनर्वाचन हे प्रकरण पुराण साहित्याची चर्चा करणारे आहे. या प्रकरणात पुराणांची दैवी उत्पत्ती स्पष्ट केलेली आहे. पुराणांमध्ये संहिता असल्या तरी काळाच्या ओघात बदलत गेल्या. पुराण हे नीतीबद्दलचा विचार मांडण्यासाठी रचण्यात आले होते. बहुजनांना समजेल अशा लोकसाहित्याच्या स्वरूपात त्याची मांडणी केली गेली. यासंदर्भातील काही पौराणिक गोष्टींची चर्चा या ग्रंथात केली आहे. उदा. आयुस, सर्पसत्र, असुररूपी वृत्र, कालियादमन, नरहरी अवतार, कालयवन, माधव अशा गोष्टी या देशी प्रकारच्या आहेत. या पौराणिक साहित्यावरून कोणत्या प्रकारचा अर्थबोध होतो, याविषयीचे विवेचनदेखील भागवत यांनी केले आहे.

भागवत यांनी स्वतंत्रपणे शिक्षणाचा विचार मांडला होता. त्यांनी आपल्या शिक्षणविषयक विचारातून ‘शिक्षण आणि देशीवाद’ यांचा सांधा जोडलेला होता; हे त्यांच्या विचारांचे एक वैशिष्ट्य होते, हे या पुस्तकात अधोरेखित झाले आहे. ब्रिटिशांचे शिक्षणविषयक धोरण गुलामगिरीप्रधान होते, तर भागवत यांचे शिक्षणविषयक विचार स्वतंत्र सर्जनशीलतेला वाव देणारे होते. भागवत यांनी यासाठी शिक्षणसंस्थेची स्थापना केली. त्यांनी शाळेमध्ये सर्जनशील शिक्षणाचे प्रयोग केले. नवीन चरित्रे लिहिली. जिजाबाई, शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर अशा प्रकारची चरित्रे लिहून एका अर्थाने त्यांनी राष्ट्रीय चारित्र्य आणि राष्ट्रीय नीतिमूल्य यांची नवीन चौकट अधोरेखित केली. ही चौकट शिक्षण आणि राष्ट्रवाद, शिक्षण आणि नीतिमूल्य यांचा संबंध देशीवादाशी जोडणारी होती. याबद्दलची तपशीलवार मांडणी खैरे यांनी केली आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

महाराष्ट्रात जातसंस्थाविषयक विचारांवर संशोधन व लेखन सखोलपणे झालेले आहे. भागवत यांनी जातसंस्थाविषयक विचार मांडून या विचारांच्या प्रवाहात मोठी भर घातलेली आहे. त्यांनी मांडलेला जातिसंस्थाविषयक विचार हा महाराष्ट्रवादाचा व देशीवादाचा एक वेगळा नमुना दिसतो. भागवत यांनी ‘महाराष्ट्रदेश’ अशी मूळ संकल्पना मांडलेली आहे. महाराष्ट्रदेशातील अतिप्राचीन समाजव्यवस्था त्यांनी स्पष्ट केली. त्यांनी अतिप्राचीन महाराष्ट्रदेशाचे मूळ रहिवासी गोप, गवळी, कोळी असे जन कल्पिले आहेत. त्याकाळी महाराष्ट्र जातविरहित होता, असा त्यांचा सिद्धात आहे.

महाराष्ट्रदेशात यादव कुळाबरोबरच वड्डर, महार, मांग, भंडारी, लंबाण हे जन पूर्वीपासून होते. हे मूळ महाराष्ट्राचे लोक होते. त्यानंतर महाराष्ट्रदेशातील लोक हे जातीनुसार विभागले गेले. महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रातील मराठे गेले. आर्यवर्त आणि द्रविड देश येथून महाराष्ट्रात ब्राह्मण आले, असा दुसरा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून ब्राह्मण व क्षत्रिय अशा दोन जाती होत्या. कुळकरण आणि परबू अशा आणखी दोन जाती होत्या. लढाऊ क्षत्रिय मराठा होते. ते ‘सिंह’ किंवा ‘राव’ असे विशेषण लावत असत.

त्यांच्याकडे लढण्यासाठी पदरी जे लोक होते, तो समाज बेरगी किंवा बारगिरी किंवा शिलेदार म्हणून ओळखला जात होता. हा समाजातील एक स्तर होता. शेतीशी संबंधित अलुतेदार आणि बलुतेदार अशी समाजाची रचना उदयास आली होती. महाराष्ट्रमंडळात वाणी ही जात वैश्य नव्हती. जात आणि व्यवसाय तसेच जात आणि पदरचना यांचेदेखील सहसंबंध राजारामशास्त्री भागवत यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील मांडणीचे सविस्तर विवेचन खैरे यांनी केलेले आहे.

लेखन करणारा मूळ समूह परबू होता. लेखन करणारा दुसरा समूह महाराष्ट्रात ब्राह्मण आला. ब्राह्मण समूहाचे ‘पंत’ आणि ‘भट’ असे दोन वर्ग होते. ‘पंत’ हा आकरगुण गुणवाचक शब्द आहे, तर ‘भट’ हा शब्द वैदिक काळातील आहे. या प्रक्रियेतून एक समाजरचना अस्तित्वात आली. जात आणि धर्म यांच्यातील सहसंबंध भागवत यांनी स्पष्ट केले आहेत. महाराष्ट्राच्या सभोवतालच्या भागातून ब्राह्मण समाज महाराष्ट्रात आला. त्याबरोबर ब्राह्मण धर्म आला. महाराष्ट्राचा मूळ धर्म शैव होता. त्यामुळे महाराष्ट्रात धर्माची सरमिसळ होत गेली.

महाराष्ट्रवाद आणि देशीवाद यांचा संबंध त्यांनी जातिसंस्थेच्या आणि धर्मसंस्थेच्या अंगाने संमिश्र समाजव्यवस्थेशी जोडलेला दिसतो. संमिश्र समाजव्यवस्थेची बहुविधतेला स्वीकारणारी संकल्पना त्यांनी मांडली आहे. त्यामुळे भागवत यांचे जातिसंस्थाविषयक विचार हे परंपरागत पद्धतीचे नाहीत, तर ते देशी आधुनिकता स्वीकारणारे होते, असे या ग्रंथाच्या आधारे दिसते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भारतातील स्त्रीवाद पाश्चिमात्य स्त्रीवादापेक्षा वेगळा आहे. भारतातील स्त्री-मुक्तीचा विचार हा पाश्चिमात्य स्त्रियांच्या स्वातंत्र्यापेक्षा वेगळा आहे. यामुळे भागवत हेदेखील स्वातंत्र्यापेक्षा जास्त व्यापक होऊन स्त्रीमुक्तीच्या चौकटीत विचार मांडतात. सत्तरीच्या दशकात स्त्रीवादविषयक विचार जागतिक पातळीवर मांडला जाऊ लागला. भारतात महिलामुक्तीचा विचार मांडण्याची परंपरा सत्तरीच्या दशकापासून पुढे जवळपास पन्नास वर्षांची आहे.

त्याआधी महात्मा फुले, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख यांनी महिलांविषयक विचार मांडले होते. या विचारांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न सत्तरीनंतर झाला. परंतु भागवत यांच्या महिलांविषयक विचारांची पुनमांडणी झाली नव्हती. खैरे यांनी भागवत यांच्या महिलांविषयक विचारांवर या ग्रंथात लक्ष केंद्रित केलेले दिसते. भागवत यांचा स्त्रियांविषयीचा विचार सातत्याने विकसित होत गेलेला दिसतो.

ते सुरुवातीला पारंपरिक दृष्टीकोनातून महिलांचे विवेचन करत होते; तरीही पारंपरिक भूमिका दोन गोष्टींवर आधारलेली होती. एक, महिलांनी त्याग करावा. त्यागाच्या भूमिकेमध्ये त्यांनी गुणवाचक गोष्टींना अग्रक्रम दिला होता. सौंदर्यापेक्षा गुण महत्त्वाचे आहेत असे त्यांचे आकलन होते. दोन, महिलांनी पुनर्विवाह, विवाहबाह्य संबंध, काडीमोड, सौंदर्य, शृंगार अशा गोष्टींशी फार संबंध ठेवू नये, असे त्यांचे विचार होते. त्यामुळे त्यांनी विधवाविवाह अशास्त्र आहे, अशी प्रतिकूल भूमिका घेतली होती (१८८६).

त्यांच्या या विचारांना सुधारक मंडळींनी विरोध केला होता. हा मुद्दा या ग्रंथात नोंदवला आहे. पुढे भागवत यांच्या पारंपरिक समाजाबद्दलच्या भूमिकेत बदल होत गेला. पारंपरिक समाजातून त्यांनी परिवर्तनाचा विचार मांडला. भास्कर हरी भागवत, न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणे भागवत पारंपरिक समाजात बदल करण्याचा विचार मांडत होते. हा त्यांच्या विचारातील दुसरा टप्पा सुरू झाला.

भागवत यांच्या विचारातून ‘अतिप्राचीन समाज स्त्री-प्रधान होता’, असा एक सिद्धान्त उदयास आला. साहित्यामध्ये त्यांना अतिप्राचीन काळात स्त्रीप्रधान समाजव्यवस्था सुस्पष्टपणे दिसते. अतिप्राचीन काळातील समाजाची भाषा स्त्री-वाचक होती. राजारामशास्त्री भागवत यांनी विविध शब्दांचे अर्थ स्त्रीलिंगी असल्याचे स्पष्ट केले आहे. याबद्दलची विविध उदाहरणे खैरे यांनी नोंदवली आहेत.

यामधून अतिप्राचीन समाज स्त्री-प्रधान होता, असा सिद्धान्त भागवत मांडतात असे स्पष्ट होते; हा मुद्दा खैरे यांनी अधोरेखित केलेला आहे. अतिप्राचीन समाजानंतर समाजात प्रतिक्रांती झाली. समाजामध्ये महिलांना दुय्यमत्वाला सामोरे जावे लागले. यामुळे अतिप्राचीन काळानंतरचा समाज पुरुष-वर्चस्वाचा आणि महिलांच्या दुय्यमत्वाचा होता. या प्रक्रियेमुळे महिलांचे बंदिस्तीकरण झाले, असाही युक्तिवाद खैरे यांनी केला आहे.

भागवत यांनी महिलांच्या स्वातंत्र्य व समतेचा पुरस्कार केला होता; याबद्दलची त्यांच्या लेखनातील काही उदाहरणे दिली आहेत. शिव आणि पार्वती यांचे अर्धनटेश्वराचे प्रतीक त्यांना समता आणि स्वातंत्र्याचे वाटते, तर विष्णू आणि लक्ष्मी यांचे प्रतीक त्यांना पुरुषप्रधानतेचे वाटते. तसेच भागवत यांनी सामाजिक सुधारणांचा विचार म्हणून स्त्रियांच्या मुंजीचा क्रांतिकारी विचार मांडला होता. याशिवाय त्यांनी कलावंतीणीकडे पाहाण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रबोधन केले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

भागवत यांनी भक्ती चळवळ आणि मराठा राज्यसंस्थेची चळवळ या दोन चळवळींच्या अंगाने महिलांच्या कर्तृत्वाचा आणि शौर्याचा इतिहास लिहिला आहे. इतिहासामध्ये महिलांचे कर्तृत्व आणि शौर्य लुप्त झालेले होते. अतिप्राचीन समाजात आणि मध्ययुगातील समाजात महिलांकडे कर्तृत्व, शौर्य आणि वैचारिक योगदान करण्याची क्षमता होती; याबद्दलची भागवत यांची उदाहरणे मनीषा खैरे यांनी या ग्रंथात एकत्रितपणे नोंदवली आहेत. त्यामुळे हा ग्रंथ महिलांच्या इतिहासाची दखल घेणारादेखील ठरला आहे.

भागवत यांनी समता आणि स्वातंत्र्य तसेच कर्तृत्व, शौर्य, वैचारिक योगदान या गोष्टींचे विवेचन अतिप्राचीन आणि मध्ययुगीन समाजाच्या संदर्भात केले आहे. त्यामुळे एका अर्थाने भागवत हे स्वातंत्र्य, समता, कर्तृत्व, शौर्य व वैचारिक योगदान ही मूल्ये देशी आहेत, असाच युक्तिवाद करतात. म्हणूनच त्यांच्याकडे आधुनिक काळातील देशीवादाचे जनकत्व जाते. या गोष्टीदेखील या ग्रंथामुळे अधोरेखित होतात. थोडक्यात, भागवत पाश्चात्त्य विचारप्रवाहातील अतिरेक टाळत होते.

भागवत यांनी या ग्रंथाच्या संदर्भात देशीवादाची चौकट पुढील पाच मुद्यांच्या संदर्भात व्यापक केलेली दिसते.

१) राजारामशास्त्री भागवत यांनी देशीवाद आणि देशी शिक्षणपद्धती यांचा मेळ आधुनिकतेच्या संदर्भात घातलेला दिसतो.

२) देशीवाद आणि देशी नीतिमूल्ये यांची सांधेजोड केली.

३) आधुनिक राष्ट्रवाद आणि देशीवाद यांच्यामध्ये देखील एक नवीन संवादाचा पूल बांधला.

४) भाषा हे शिक्षण, नीती, राष्ट्रवाद, धर्म, जात यांच्याबरोबर विकसित होणारे एक महत्त्वाचे तत्त्व आहे, हे मांडले. यामुळे भारतातील देशी संकल्पना आणि भाषेचा विकास यांचीदेखील सांधेजोड ते करतात.

५) अतिप्राचीन काळातील भारत, मध्ययुगातील भारत आणि आधुनिक काळातील भारत यांचे एकत्रित चित्र उभे केलेले दिसते. त्यामुळे त्यांनी संस्कृत साहित्य, पौराणिक साहित्य, लोकसाहित्य अशा सर्वच साहित्याचा एकत्रितपणे अभ्यास करून मराठी भाषाविज्ञानाची एक नवीन चौकट मांडलेली दिसते.

भाषा ही समाजाच्या समाजविज्ञानातून आणि समाजविकासातून घडत जाते. भाषेला समाजाचे सर्व गुणधर्म लागू होतात. त्यामुळे भाषेचे खरे स्वरूप आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे असते. भाषा ही काळानुसार बदलते, म्हणजेच समाजाच्या गरजांनुसार बदलते. समाजाच्या गरजा भाषेला आकार देतात, या गोष्टीची मांडणी राजारामशास्त्री भागवत यांच्या विचारांच्या आधारे खैरे यांनी केलेली आहे. त्यामुळे त्यांचा हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. भागवत यांचे विचार समाजामध्ये दूरपर्यंत पसरवण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल…

‘राजारामशास्त्री भागवत यांचा भाषाविचार’ – मनीषा खैरे | अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे | पाने – २९६ | मूल्य – ४०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......