औरंगजेब क्रूर होता. त्याने संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले. म्हणून ‘औरंगजेब’ हे नाव कोणी मुसलमान ठेवत नाही, असा एक युक्तिवाद एका पुढाऱ्याने नुकताच केला. संदर्भ होता ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर ‘औरंगाबाद’ शहराचे केल्यामुळे खासदार इम्तियाज जलील (एमआयएम) यांच्या नेतृत्वाखाली चक्री उपोषण सुरू झाले त्याचा. फेब्रुवारीत औरंगाबादचे नामांतर झाले अन् बिनबुडाच्या मुद्द्यांना बहरच आला. ‘औरंगजेब’ या शब्दाचा अर्थ समजला असता, तर तो मुद्दाच निघाला नसता. फारसी भाषेत ‘औरंगजेब’ म्हणजे ‘सिंहासनाचा अलंकार’. सिंहासनाचे आभूषण ठरावे इतकी महान व्यक्ती कोण, तर ती औरंगजेब. फारसी भाषा जिथे बोलली जाते, तिथे ते नाव कोणाचे तरी असणारच. त्या लोकांना मुघलांच्या इतिहासाशी काय देणे-घेणे?
औरंगजेबाचे उट्टे काढण्यासाठी संभाजी महाराजांचे नाव वापरले गेले. मग समजा असा प्रश्न केला की, जेव्हापासून शिवसेनेने औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ म्हणणे सुरू केले, तेव्हापासून किती शिवसैनिकांनी त्यांच्या मुलांची नावे ‘संभाजी’ अशी ठेवली? शौर्य, पराक्रम, विद्वता असे सर्व काही अंगी असणाऱ्या या छत्रपतीचे नाव गेल्या ३० वर्षांत किती जणांना मिळाले?
पंतप्रधान मोदी मागच्या महिन्यात लोकसभेत विचार होते की, हे गांधी घराणे नेहरू हे आडनाव का नाही लावून घेत? बाष्कळ अन् निरर्थक असाच हा प्रश्न होता. अमूक एक नाव का वापरता आणि दुसरे का नाही लावत, असा वावदूक प्रश्न पंतप्रधानच काय, कोणाही माणसाला शोभत नाही. मग हिंदुत्ववादी घरांत ‘नथुराम’ हे नाव नसते का लोकप्रिय झाले? मराठीत एक म्हण आहे – ‘शिवाजी जन्मावा, पण शेजाराच्या घरात!’
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
आणखी एक आचरट मुद्दा मांडला गेला. औरंगजेबाची खुलताबादेतली कबर हैदराबादेस न्यावी, म्हणजे खा. जलील यांचे नेते खा. असदुद्दीन ओवैसी यांना तिचे दर्शन रोज होत राहील! आमदार संजय शिरसाट यांची ही सूचना एकदा ओवैसी त्या कबरीचे दर्शन घ्यायला गेले होते, त्या अनुषंगाने केली. दौलताबाद-खुलताबाद पर्यटन करायला जाणारे बहुतेक जण ही कबर बघतात. त्यातल्या अनेकांना एका सम्राटाचे साधे स्मारक आश्चर्याचे ठरते.
औरंगाबाद शहर एके काळी ‘थडग्यांचे शहर’ म्हणून ओळखले जायचे. सूफी संत व राजघराण्याशी संबंधित अनेकांचे मृत्यू या शहरात झाले. मृत्युनंतर कोणाशी कसले आले वैर? वीस वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये वली दखनी अर्थात वली औरंगाबादी हा एक मोठा कवी असाच एका कबरीखाली चिरनिद्रा घेत असताना, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तो कोठे नाहीसा झाला, कोणाला कळलेही नाही. ना ती कबर कोठे हलवली गेली, ना पुन्हा ती दिसली. ते एका कवीचे स्मारक होते की, एका मुसलमानाचे?
द्वेषाचे राजकारण कोण कवी आहे की कलाकार हे पाहत नसते. अहमदाबादेत नाही का खासदार अहसान जाफरी यांना जमावाने ठार मारले? त्यांचे मारेकरी निर्दोष सुटलेदेखील. बिल्किस बानो या पीडितेचे अपराधीही तुरुंगामधून बाहेर आले अन् त्यांचा समाजात सन्मानपूर्वक प्रवेशही झाला.
मुसलमान म्हटल्याबरोबर इतिहास हिंदुत्ववाद्यांच्या डोक्यावर बसतो. मुसलमान काही शतके आपल्या देशावर राज्य केलेल्या तुर्की, अफगाणी, इराणी, मुघल राजेशाहीचे प्रतिनिधी कसे काय असू शकतात? आजवर किती मुसलमानांनी स्वत:ला त्या राज्यकर्त्यांचे वारस ठरवले आहे? ते तसे वागले आहेत का कधी?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
पण अशा प्रश्नांची उत्तरे कोणी हिंदुत्ववादी देऊ शकणार नाही. त्याला कारण तोच आहे. संघपरिवार आजही प्राचीन आणि मध्ययुगीन ब्राह्मणांचे गुणगान करत असतो. आता तर परशुराम या पौराणिक ऋषीचं नाव वापरून ब्राह्मणी राजकारण संघटना आणि प्रथा-परंपरा याद्वारे ठळक होऊ लागले आहे. पुराणकाळातल्या अनेक गोष्टी भाजपची सत्ता आल्यापासून उजळ माथ्याने वावरत असून, त्यांना राजमान्यता व समाजमान्यता मिळवून दिली जात आहे. म्हणजे आम्ही एकेकाळचे राज्यकर्ते विरुद्ध तुम्ही एकेकाळचे राज्यकर्ते, असा संघर्ष उभा करायचा खटाटोप चालला आहे का?
‘हा देश हिंदूंचा आहे’ असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो अन् त्यासाठी दाखले देतो, तो हिंदू असा उल्लेखही नसणाऱ्या पुराणांचा, काव्यग्रंथांचा, स्मृतींचा आणि उपनिषद व वेद यांचा. त्याच्या दृष्टीने ‘रामायण’, ‘महाभारत’ आदी ग्रंथांतले जे धार्मिक उल्लेख आहेत, ते सारे हिंदू आहेत.
आपली हिंदू संस्कृती व धर्म सनातन असल्याचा संघाचा दावा असतो. सनातन म्हणजे अखंड अपरिवर्तनीय. ‘भारताला इतिहास नाही’, असे ब्रिटिश म्हणत. कारण इतिहास म्हणून जे ग्रंथ वाचले जात, ते सारे महाकाव्याचे होते. उपनिषदे व शृती-स्मृती आणि वेद हेही त्यात आहेत. त्यामुळे इतिहासकार नसलेल्यांनी देशाचा इतिहास सांगण्याची जबाबदारी घेतली. लोकमान्य टिळक हे त्यातले एक. आर्य बाहेरून आल्याचा सिद्धान्त त्यांनी मांडला व सावरकर यांनी स्वत:ला इतिहासकार ठरवत तो मानला. गोळवलकर त्यातलेच एक असले तरी ते म्हणू लागले की, आर्य स्थानिकच होते. ज्यांनी आर्यसमाज स्थापन केला, त्यांचा दावा असा होता की, हिंदू धर्म, हा अध:पतीत आहे. म्हणून ते स्वत:ला आर्यच म्हणवत राहतात!
थोडक्यात, मुस्लीम धर्माचे राजे, सेनापती, व्यापारी आणि टोळीवाले भारतात येऊन राज्य करू लागले आणि संपत्ती लुटू लागले, तेव्हापासून जिवंत माणसाच्या नोंदी ठेवल्या जाऊ लागल्या आणि त्यालाच ‘इतिहास’ ठरवले जाऊ लागले. मग सातवाहन, चालुक्य, वाकाटक, मौर्य, यादव आदींचे काय? तो इतिहास नव्हे काय? म्हणून अवजारे, शस्त्र, भांडी, गावे, इमारती, चित्रे, नाणी, आज्ञा, शिल्पे आदींचे अवशेष सापडल्यावर त्यांची सांगड लिखित व चिन्हित पुराव्यांशी जुळली की, तो घडून गेलेला काळ खरा मानणे म्हणजे इतिहास ठरवणे होय. परंतु ‘रामायण’ व ‘महाभारत’ या ग्रंथातल्या घडामोडींशी जुळतील अशी ठोस पुरातत्त्वीय साक्ष अजून सापडत नसल्याने इतिहास या संज्ञेत त्याचा समावेश करता येत नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
त्यामुळे संस्कृती, सभ्यता, धर्म, परंपरा यांना इतिहास म्हणता येत नसताना त्यांचाच आग्रह धरला जातो व त्या आधारे राजकारण केले जाते. व्यक्तीचे जय-पराक्रम आणि वैयक्तिक प्राप्ती म्हणजे इतिहास असे मानणारा जुन्या वळणाचा एक वर्ग असतो. मग ती व्यक्ती दैवी बळ घेऊन आलेली आहे अथवा ती अलौकिक, अवतार आहे, असे अतर्क्य विधान करत जाणाऱ्यांचे फार फावते.
भारताचा इतिहास संस्कृत, पाली, मागधी, इंग्रजी, फारसी, फ्रेंच, पोर्तुगीज, अरबी अशा अनेक भाषांत विखुरलेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून फक्त संस्कृतमध्येच तो साठवलेला आहे, हे कोण मानेल? उत्खनन, निरीक्षण, श्रवण, साठवण, जतन, संशोधन असे मार्ग इतिहासाला पूर्णत्व देतात. फक्त ग्रंथांत सांगितले म्हणजे खरे असे मानणे, स्वत:ची फसवणूक करण्यासारखे असते. भर्तृहरीच्या सुभाषितांचा अभ्यास करणारे डी. डी. कोसंबी सांगतात की, जेमतेम ३०० कडव्यांसाठी त्यांना ४०० विविध संहिता तपासाव्या लागल्या. त्या साऱ्या सुभाषितांच्या होत्या. अडीच वर्षांनी त्यांना भर्तृहरीची रचना सुसूत्र पद्धतीने तयार करता आली. म्हणजे व्यक्ती तीच, मात्र तिचे काव्य, कर्तव्य, कार्य अनेकांनी आपापल्या मर्जीने अथवा समजुतीने लिहिलेले.
‘भारतशास्त्र’ नावाची जी शाखा आहे, ती अशी विविध मार्गांनी जन्माला आली आहे. एखादे पुस्तक किंवा वर्णन अधिकृत असेलच याची शाश्वती नाही. माणूस तऱ्हेवाईक असतो. म्हणून त्याचा इतिहास तऱ्हेतऱ्हेचा नसावा! नाही तर सामान्य माणसाची फजिती होते. गैरसमज, पूर्वग्रह तयार होतात. ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास अमूक प्रकारचा होता, म्हणून आम्ही तो ‘देशीवादी’ लिहून काढू असे म्हणणे म्हणजे नक्कीच काही अनैतिहासिकतेचे राजकारण करणे होय. पडताळणी व खातरजमा आणि शहानिशा व फेरतपासणी केल्याशिवाय इतिहास पक्का कसा होईल? जो दिसतो तेवढा इतिहास जरूर असतो, पण त्याहून खूप काही लपलेला, दडलेला, झाकलेलासुद्धा असतो. इतिहासाच्या पोटात लुप्त बरेच काही असते, ते खणून अथवा शोधून काढले, तरच जिज्ञासा पूर्ण होऊन सत्याचा संपर्क झाला, असे म्हणता येईल.
औरंगाबाद हे आमच्या गावाचे नाव कोणालाही अभिमानास्पद वाटत नव्हते आणि त्याने छळणुकीचा, पारतंत्र्याचा इतिहास जपून ठेवण्याचाही आनंद कोणी मानत नव्हते. ते एक वास्तव होते. तेवढाच त्याचा इतिहास होता. मुंबई, मावळ, हवेली, रायगड, मराठवाडा, विदर्भ ही काही गावे नाहीत की स्थळे. ती प्रत्यक्ष दाखवता येत नसतानाही आहेत. वास्तवात जे आहे ते लोक मानतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
तसे हे औरंगजेबाचे असू द्या की सम्राटाचे, त्याने काय फरक पडतो? महाराष्ट्रात छ. शिवाजी महाराजांच्या नावे एकही गाव नाही. परंतु जवळपास प्रत्येक गावात ‘शिवाजीनगर’ आहे. याबद्दल कोणी शिवसेनेला-भाजपला प्रश्न केला कधी? महाराज गावांच्या रूपे नसले तरी पराक्रम आणि कर्तबगारी यांच्या रूपे प्रत्येकाच्या मनात असतातच की! म्हणून सर्वोच्च न्यायालयाने अॅड. अश्विनी उपाध्याय यांची याचिका फेटाळताना इतिहास वर्तमानकाळाच्या मानगुटीवर बसला नाही पाहिजे, असे बजावले. उपाध्याय यांनी परकीय आक्रमकांची स्थळांना देण्यात आलेली नावे बदलून, ती आधीची दिली जावीत, असे त्यांच्या याचिकेत म्हटले होते. मानवी पिढ्या इतिहासाचे कैदी होऊ नयेत आणि राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतला बंधूभाव हे महान तत्त्व पाळावे, असे न्यायमूर्ती म्हणाले. हिंदू धर्म हटवादी अथवा कट्टर नाही, असेही ते म्हणाले.
संघपरिवार इतिहासाचा स्वार्थी आणि अप्पलपोटा वापर कसा करतो, तेही या निमित्ताने उघड केले पाहिजे. औरंगाबाद असे नाव असल्यापासून तो खडकी आणि देवगिरी अशी दोन नावे सरसकट आपल्या वापरात आणतो. शहराला तो ‘खडकी’ म्हणतो, तर त्याने ‘देवगिरी प्रांत’ असे नाव मराठवाडा प्रदेशाला दिलेले आहे. म्हणजे ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नावही त्याच्यासाठी तात्पुरते असून ‘खडकी’ नावाचा त्याचा आग्रह कायम असेल. देवगिरीचे स्वतंत्र अस्तित्व आजही आहे. याचा अर्थ यादवकुलाची सत्ता भोसलेकुळापेक्षा संघपरिवाराला प्रिय आहे काय?
इतिहास आपण शाळांमधून शिकतो. तो तसा अगदी प्राथमिक व एकतर्फी असतो. नंतर अशा इतिहासाची दुसरी, तिसरी बाजू आपण आवड असली की जाणून घेतो. तीही बहुतकरून कादंबऱ्या अथवा भाषमांमधून. त्यामुळे हुकूमशाही वृत्तीचे पक्ष, संघटना, व्यक्ती, संस्था इतिहासाचा कमालीचा विपर्यस्त व विकृत वापर करू शकतात. फॅसिस्टांना तर इतिहासावाचून काही उभेच करता येत नाही. त्यांच्यासाठी कोणी इतिहासतज्ज्ञ, विद्वान संशोधक वा अभ्यासक नसतो.
काय विसंगती आहे पाहा : इतिहासाचा असा नामांतरासाठी वापर-गैरवापर चालू असताना दुसरीकडे विद्यापीठांत व महाविद्यालयांत इतिहास विषयाला विद्यार्थी मिळणे दुष्कर होते आहे. इतिहासात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करून ना चटकन नोकरी मिळते, ना व्यवसाय.
उजव्या विचारांचे राजकारण गेली काही दशके अनेक देशांत सत्तेत आले आहे. उजव्यांना ‘भूतकाळ’ अत्यंत प्रिय. त्यांना इतिहासच भावनिक राजकारणासाठी मुद्दे देत असतो. सर्वच विद्यापीठांत राज्यशास्त्र व इतिहास हे विभाग शेजारी शेजारी असतात. त्यांच्यात तसे सख्यही असते. मात्र बाहेर इतिहास मोठ्या घडामोडींचे राजकारण खेळत असतो. तेव्हा हे विभाग ओस तरी असतात किंवा ‘पुढे काय?’च्या प्रश्नात विद्यार्थ्यांना लोटत तरी असतात.
१९५० साली भारत प्रजासत्ताक बनला, याचा अर्थ तेव्हापासून नवा इतिहास घडवायला सुरुवात झाली. ५० पूर्वीचा भारत कोणाचे साम्राज्य होता, तर कोणाची जहागीर. छोटे छोटे राजे आणि त्यांच्या राजेशाह्या किती तरी होत्या. त्यांचे राजकारणही फार दखलपात्र नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावावंवरून संघर्ष होत नाही. मुघलांच्या धर्माचे राजकारण करून भाजप-शिवसेना सत्तेत येत गेली. पण दोन्ही पक्ष जवळपास २५ वर्षे औरंगाबादचे राजकारण हाताळत होते, पण अजूनही पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, भटके प्राणी, गुन्हेगारी, औद्योगिकीकरण, मनोरंजन, पदपथ पार्किंग आदी प्रश्न तेवढेच उग्र आहेत. सम्राटाचे नाव जाऊन छत्रपतींचे नाव मिळाल्याचा आनंद कोणाला झाला नाही, त्याची कारणे वर दिलेलीच आहेत.
भारतीय इतिहासलेखनात डावे प्रभावी असल्याने ते नेहमी भारतीय परंपरा, धर्म, संस्कृती, व्यक्ती, संस्था यांची अवहेलना करतात व ब्रिटिशांची लेखनपद्धती अनुसरतात. तसेच मुसलमानादी बाहेरच्यांचे गुणगान करतात, असा आरोप संघपरिवार करत राहतो. जणू काही या डाव्यांनी भारतीयांची डोकी बिघडवली, असा त्यांचा सूर असतो, पण तसे काही नाही. उजव्यांना म्हणजे धर्म-संस्कृतीनिष्ठांना आवडणारेही लेखक खूप आहेत. त्यातले अग्रगण्य म्हणजे आर. सी. मजुमदार. ते हिंदू संस्कृतीचे मोठे प्रशंसक असून त्यांनी मुसलमान राजवटीला कमी लेखले. ते तटस्थ इतिहासकार नव्हते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
सर जदुनाथ सरकार यांनीही त्यांच्या ग्रंथांतून मुसलमानविरोध प्रकट केला. सबंध भारत मुघलांना ‘इस्लामी’ करायचा होता, असे त्यांनाही वाटे. आता तर भारतभर असंख्य इतिहासकार जन्मले असून त्यांना हा देश कधी एकदाचा ‘हिंदू राष्ट्र’ बनतो, असे झाले आहे.
पेशवे राजे होते. त्यांच्या राज्यात जातिभेद कसा माजला होता, याचा इतिहास मात्र कोणी उकरायचा नाही, बरे का! त्यांनी मराठ्यांची सत्ता कशी घालवली, हा इतिहासही कोणी उगाळायचा नाही, बरे का!
ज्यांचा मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यायला विरोध होता, तेच औरंगाबादच्या नामांतराचे पाठीराखे होते. आणखी एक ‘ऐतिहासिक’ सत्य. कडवे हिंदुत्ववादी म्हणून घेत शिवसैनिक सामान्य मुसलमानांच्या विरोधात उभे होते, तसे ते दलित जातींच्यासुद्धा विरोधात होते. संभाजीनगरातल्या अनेक सभांत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून नेते, उपनेते, शाखाप्रमुख असे कैक जण आंबेडकर यांच्या नावाला विरोध करायचे. याचा अर्थ जो सवर्ण हिंदू विद्यापीठाच्या नामांतरामुळे अस्वस्थ झालेला होता, तो औरंगाबादमुळेही चिडून होता. शिक्षण, सवलती, आरक्षण, राजकीय जागृती, बौद्ध धम्माचा स्वीकार, अशा कारणांनी सवर्ण हिंदू (खरे तर ‘दलितेतर जाती’ असे म्हणणे ठीक) खवळलेला होता. त्याचा संताप औरंगाबादमुळे वाढत होता, कारण मुसलमानांना त्यांच्या संख्याबळामुळे सत्तेची व बिगर सत्तेची राजकीय पदे मिळू लागली होती.
पण त्याने काय बिघडले? लोकशाहीत असे संख्येचे राजकारण चालतेच. परंपरेने हातात ज्ञान, नोकऱ्या, सत्ता, प्रतिष्ठा, संपत्ती, प्रसिद्धी दिली होती, त्यांना दलित व मुस्लीम यांच्या उत्कर्षामुळे मोठाचा शहच मिळाला होता. त्यांच्या मिळकतीत वाटेकरी वाढले होते. त्यांचा मक्ता मोडीत निघाला होता. त्यांची मुले-मुली बाजूला फेकली जात होती. काही वर्षांपूर्वी खुलताबाद येथे ‘अलिगड मुस्लीम विद्यापिठा’ची शाखा उघडण्याचे प्रयत्न, याच सेनेने व भाजपने उधळून लावले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. कुलगुरू म्हणून कमालीचे सुमार प्राध्यापक निवडले जात आहेत. ग्रंथ, नियतकालिके, संदर्भपुस्तके खरेदी करायला निधी मिळेनासा झाला आहे. विद्यार्थी वैतागले आहेत.
शहराबद्दल काय बोलावे? औरंगजेबही लाजेल असे क्रौर्य, कुटिलपणा, बेदरकारी, भ्रष्टाचार आणि चापलुसी आता छत्रपती ‘संभाजीनगर’ या डेटलायनीने जगापुढे येऊ लागली आहे. नागरिक वैतागलेलाच आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment