अजूनकाही
‘चिंतन न्यूज सर्व्हिस’नं पाठवलेली सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अजित वर्टी यांच्या निधनाची बातमी बघितली आणि उदासीचं गडद मळभ दाटून आलं.
अजित वर्टी आणि माझं सख्य जुळावं असं खरं तर आमच्यात काहीच समान नव्हतं, पण ते नुसतंच नाही, घट्ट जुळलं. ते वयानं ज्येष्ठ, अस्सल मुंबईकर, तर तेव्हा मी नागपूरकर होतो. आमची ओळख झाली, तेव्हा ते मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि मी नागपुरात एका छोट्या दैनिकात पत्रकार होतो. तसंच मुंबईतल्या काही वृत्तपत्रांसाठी स्ट्रिंजर म्हणूनही काम करत होतो. वृत्तपत्रं वगळता अनेक प्रकाशनांसाठी लिहीत होतो. मुंबईत मंत्रालय आणि राजकीय वर्तुळात तेव्हा माझा वावर नुकताच वाढला होता.
वर्टींची ओळख झाली, तेव्हा त्यांची पटकन प्रतिक्रिया होती- ‘तुझं लेखन वाचतो रे मी. कालच ‘राजधानी’त (तेव्हा हे एक साप्ताहिक होतं.) तुझा लेख वाचलाय’. तेव्हापासून वर्टी माझे ‘मेंटॉर’ झाले; खरं तर ते माझ्यासाठी कायमच थोरल्या पातीच्या भूमिकेत राहिले.
पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळातच अजित वर्टी आणि अरुण बोंगीरवार या दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा विशेष लोभ मला लाभला. दोघंही मला ‘अरे-तुरे’ करत. अगदी बोट धरून त्यांनी मला मंत्रालय समजावलं. सरकार आणि प्रशासन मूलभूतपणे स्वतंत्र तरी परस्परपूरक कसे आहेत आणि त्यांचं कामकाज कसं चालतं, हे या दोघांमुळेच मला समजलं. सरकारमधले लोक निवडलेले असतात, तर प्रशासनातले नियुक्त असतात. प्रशासनाची रचना (structure), सेवाज्येष्ठता, उतरंड, त्यांच्यातला ज्येष्ठ-कनिष्ठतेचा क्रम (hierarchy), घटना-कायदे-नियम यातील भेद, प्रशासकीय भाषा (आदेश-निर्देश, मार्गदर्शक सूचना, पत्रक, वटहुकूम, अध्यादेश परिपत्रक यातील फरक) इत्यादी, वर्टी यांनी अतिशय सूक्ष्मपणे शिकवलं. त्यामुळे साहजिकच माझ्या बातम्या आणि अन्य लेखनात अचूकपणा येत गेला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
मैत्रीचा एक धागा पोटातून जोडला जातो असं म्हणतात. तेही आमच्या बाबतीत घडलं. आमची ओळख झाल्यावर अडीच-तीन वर्षांतच ते नागपूरचे विभागीय आयुक्त म्हणून बदलून आले. पहिल्यांदा स्मिता वहिनी आणि वर्टी जेवायला घरी आले, तेव्हा बेगम मंगलाच्या हातचं अवीट चवीचं जेवल्यावर आमच्यातला स्नेह तृप्ततेनं बहरतच गेला. वडा-भात, गोळा-भात, वऱ्हाडी मांसाहार अशा अनेक डिशेसची फर्माईश ते करत. त्यांच्या किंवा आमच्या घरी त्या काळात आणि नंतरही मंतरलेल्या सोनेरी पाण्यासोबत किती बैठका झाल्या असतील, त्याची गणतीच नाही. वर्टी नागपूरहून बदलून गेले, तरी आमच्यातला मैत्रीचा झरा खळाखळतच राहिला.
त्यानंतर वर्टी ज्या ठिकाणी नियुक्त झाले, त्या प्रत्येक कार्यालयात माझं जाणं झालं. ते म्हाडाचे उपाध्यक्ष होते, तेव्हाचा एक अनुभव ‘डायरी’ या माझ्या पुस्तकात (‘खोटा ठरलेला मराठी टक्का’, पृष्ठ १६) आहे. अभूतपूर्व पुरामुळे नागपूर जिल्ह्यातलं मोवाड हे गाव मोडून पडलं. मोवाडच्या पुनर्वसनाचं काम मराठी तरुणांना देण्याचं तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ठरवलं, तेव्हा म्हाडाचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी म्हणून त्यातील सर्व किचकट तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची उकल वर्टी यांनी किती कौशल्यानं केली, याचा मी साक्षीदार आहे.
लष्करात ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ बजावून वर्टी भारतीय सनदी सेवेत आले. (तेव्हा माझं वय फार फार तर १३ वर्षांचं होतं!) वर्टींच्या कामात आणि वागण्यातही तो लष्करी खाक्या सतत डोकवायचा. ते स्वत: अतिशय टापटिपीनं राहत आणि सहकाऱ्यांनीही तसंच राहिलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. बिना इस्त्रीचे किंवा चुरगाळले-मुरगाळलेले वस्त्र परिधान करून प्रशासनातील कुणी आला की, त्यांच्या कपाळावर आठ्या चढत. अतिशय त्रासिक कटाक्ष टाकत वर्टी नाराजी व्यक्त करत असत. वेळ पाळण्याच्या बाबतीत घड्याळानंही त्यांच्या जाण्या-येण्यावर वेळ लावून घ्यावी, असा शिस्तशीरपणा त्यांच्यात होता!
मध्यम उंची, किंचित स्थूल देहयष्टी, गौर वर्ण, भालप्रदेशावर केसांचा दुष्काळ, सदैव उत्सुकतेनं भरलेले डोळे, थोडं सस्मित, साधी तरीही ऐटीतली राहणी, भराभरा चालणं आणि फास्ट बोलणं, असं वर्टीं यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या बोलण्याचा वेग इतका जास्त असे की, प्रशासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना फारच दक्ष राहावं लागे. कडक शिस्तीचे वर्टी मनानं मात्र कनवाळू होते. त्यांच्यातली रसिकता अभिजात होती. त्यांच्या वागण्यात ज्येष्ठ-कनिष्ठ असा भेद नसे. एखाद्या अधिकारी, कर्मचाऱ्याचा चेहरा मलूल दिसला, तर आस्थेनं त्याच्या तब्येत किंवा विवंचनेची चौकशी करण्याचं अगत्य वर्टी यांच्यात होतं. त्यांचा एकूणच वावर सळसळता आणि चैतन्यदायी होता, यात मुळीच शंका नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
प्रशासकीय अधिकारी म्हणून वर्टी यांचं आकलन तीक्ष्ण होतं. समोरचा विषय त्यांच्या लवकर लक्षात येत असे (हा गुण नंतरच्या पिढीत जयंत कावळे आणि आनंद कुळकर्णी या दोन सनदी अधिकाऱ्यातही मला आढळला.) म्हणून त्यांच्या टेबलवर फाईल्सचा ढिगारा साठला आहे, असं चित्र कधी दिसलं नाही. अधिकारी आणि माणूस म्हणूनही एका शब्दात सांगायचं तर, वर्टी यांचा स्वभाव अतिशय ‘उमदा’ होता. त्यांच्या कामाची शैली मला जवळून पाहता आली. प्रत्येक खात्यात ते त्यांच्या लष्करी खात्याच्या कडक शिस्तीत वागले आणि वावरलेही, पण त्यांनी कधी कुणावर अन्याय केला नाही की, पदाचा गैरवापर कसा केला नाही, हे मला अनुभवता आलं.
राज्याचे परिवहन आयुक्त असताना वर्टी यांनी कुणालाही न सांगता चक्क बसनं प्रवास करून सहकुटुंब गोवा पर्यटन केल्याचं मला ठाऊक आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर खिशातून रोख किंवा क्रेडिट कार्ड काढून बिल देताना मी त्यांना अनेकदा पाहिलं आहे. चूक झाल्यावर कडक शब्दांत झापणारे वर्टी, जर आणीबाणीचा प्रसंग आला, तर कनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत. त्यामुळे जिथं जिथं काम केलं, त्या सर्व खात्यांत कडक स्वभावावर मात करत ते लोकप्रिय झाले. अशा अनेक आठवणी माझ्या पोतडीत आहेत.
नोकरीत काही वेळा डावललं जाण्याचे प्रसंग आलेच, पण ते वर्टी यांनी ‘पार्ट ऑफ द गेम’ असं म्हणून खिलाडूपणे स्वीकारले. खरं तर अतिरिक्त मुख्य सचिव पदापर्यंत पोहोचल्यावर राज्याच्या मुख्य सचिवपदावर त्यांचा क्लेम होताच, त्यांचं नावही चर्चेत होतं, पण तत्कालीन सरकारच्या सोयीच्या अधिकाऱ्यासाठी वर्टींना डावलण्यात आलं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हा ‘बरं झालं नोकरीत दोन वर्षं मुदतवाढ मिळाली’, असा सकारात्मक दृष्टीकोन त्यांनी स्वीकारला. त्या प्रकरणाचा मी साक्षीदार आहे.
प्रत्येक मुंबई चकरेत वर्टींच्या कार्यालयातली माझी एक हजेरी पुढे पक्की झाली. माझी मुंबईत बदली झाल्यावर, तर त्यांचं पोस्टिंग कुठेही असो, त्यांच्याकडे एक दिवसाआड तरी माझी एक फेरी ठरलेलीच असायची. तेव्हा मी मुंबईत एकटा होतो, ते आवर्जून लक्षात ठेवून दुपारची जेवणाची वेळ असेल, तर त्यांच्या डब्यातले चार घास खाल्ल्याशिवाय माझी कधी सुटकाच झाली नाही. वरळीतल्या त्यांच्या घरीही काही वेळा जाणं झालं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
काही वेळा मुंबईच्या वेगवेगळ्या क्लबमध्ये ते मला जेवायला घेऊन गेले. (वर्टी यांनी मला कोणत्याही जेवणाचं बिल कधीच देऊ दिलं नाही. ‘तू लहान आहेस आहेस माझ्यापेक्षा’ या शब्दांत ते माझी बोळवण करत.) मुंबईच्या गर्दीत कार चालवण्याची संधी आणि धैर्यही त्यांनीच मला दिलं. एकदा तर ते का कोण जाणे, माहिममध्ये राहणाऱ्या त्यांच्या आईकडेही, ‘चल, तुझी माझ्या आईशी भेट करून देतो’ असं म्हणून घेऊन गेले. अन्य कोणत्याही वयानं ज्येष्ठ असणाऱ्या सनदी अधिकाऱ्याचा असा लोभ माझ्या वाट्याला आला नाही.
वर्टी यांच्यासारखे ज्येष्ठ मित्र भेटले आणि त्यांच्या कार्यशैली, राहणी, वक्तृत्वाचा परिणाम माझ्यावर होत गेला. मी हिंदी आणि इंग्रजीतही लिहावं असा त्यांचा आग्रह असे. हिंदी-इंग्रजीतलं लेखन राष्ट्रीय स्तरावर पोहोचतं, असं त्याचं म्हणणं असायचं. मी मात्र ‘लोकसत्ता’तील लेखन इंग्रजी, हिंदीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, असा दावा करत राहिलो. (‘लोकसत्ता’ तेव्हा मराठीतलं सर्वाधिक खपाचं दैनिक होतं, गेले ते दिन गेले...) पुढे मी इंग्रजी-हिंदीकडे वळल्यावर त्यांना अर्थातच आनंद झाला.
माझ्या धूम्रपानाबद्दल त्यांची तीव्र नाराजी असायची. ‘नको पिऊ रे मेल्या, सिगारेटी’ असं ते अधून-मधून न विसरता नियमितपणे ओरडायचे, पण विरोधाभास असा की, देश किंवा परदेशात दौऱ्यावर गेल्यावर माझ्यासाठी आवर्जून सिगरेट पेटवण्याचा सुंदरसा लायटर ते आणत असत.
अगदी अलीकडच्या सहा-आठ महिन्यापूर्वीपर्यंत आम्ही नियमित संपर्कामध्ये होतो. मध्यंतरी माझ्या बेगमच्या आजारपणाबद्दल समजल्यावर वर्टी अतिशय हळहळले. त्या दिवशी सेलफोनवर आम्ही जवळजवळ पाऊण तास गप्पा मारल्या. त्या गप्पांचा सूर थोरल्या पातीनं धाकट्या पातीला धीर देण्याऱ्या खंबीर आधाराचा होता. मात्र त्यांच्या पत्नी स्मिता यांच्या आजारपणाविषयी ते तेव्हा काहीच बोलले नाही. नंतर ते समजल्यावर मलाच संकोच वाटला. ते मी बोलून दाखवल्यावर ‘आयुष्य म्हटलं की, चढ-उतार येणारच. तू सांभाळ स्वत:ला’ असं म्हणून त्यांनी तो विषय बदलला.
मृत्यू अपरिहार्य आहे, हे वयाच्या या टप्प्यावर उमजलं असलं, तरी वर्टी यांच्या मृत्यूच्या बातमीनं मन उदास झालं; मेंटर गमावल्याची भावना तीव्र झाली. माझ्या आयुष्यातलं त्यांचं स्थान चंदनाच्या नक्षीदार कुपीत जपून ठेवलेल्या अत्तरासारखं आहे...
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment