अजूनकाही
कोणत्याही निकषावर मी काही गोविंदराव तळवलकर स्कूलचा विद्यार्थी नाही. त्यांच्या निकट वा दूरच्या गोटातीलही नाही. लहानपणी घरी रविवारी ‘मराठा’ आणि ‘लोकसत्ता’ येत, पण ते काही वाचायचं वय नव्हतं. वाचनाचा संस्कार झालेला तो आईकडून. वीरकरांची डिक्शनरी, रेन अँड मार्टिनचं व्याकरण कायम हाताशी असायचं. दररोज मराठी-इंग्रजी शुद्धलेखन केल्याशिवाय नाश्ता मिळत नसे. वृत्तपत्र वाचनाचा पहिला संस्कार झाला तो ‘मराठवाडा’ दैनिकाचा; म्हणजे अनंतराव भालेराव यांचा. तेव्हा आपण कधी पत्रकार होऊ अशी तमन्ना बाळगलेली नव्हती. पुढे वाचन वाढत गेलं. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या भाषेचा मोह पडला. नंतर पत्रकारितेत आलो. माधव गडकरी यांची ओळख झाली. तेव्हा मुंबईत माधव गडकरी, गोविंदराव तळवलकर यांचा बोलबाला होता, तरी आमच्यावर अनंतराव भालेराव यांची छाया गडद होती. पत्रकारीतेत रुळत गेलो तसा, गोविंदराव तळवलकर, माधव गडकरी, मा. गो. वैद्य, निशिकांत जोशी, मामासाहेब घुमरे, रंगा वैद्य आणि कुमार केतकर यांचा प्रभाव वाढत गेला. तरी लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये पत्रकारितेची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. कारण पार्श्वभूमी, इंग्रजीची बोंब असलेलं आणि जिल्हा परिषदेच्या शाळांतून झालेलं शिक्षण. खास मराठवाडी हेलाचं मराठी. त्यातच गोविंद तळवलकर नावाभोवती भलं मोठ्ठं वलय आणि त्यांचं वाचन, विद्वत्ता, करडी शिस्त, खडूसपणा वगैरेंविषयी प्रचलित असलेल्या अनेक दंतकथा मन दडपून टाकणाऱ्या होत्या.
याच दरम्यान चिपळूणहून नागपूरला ‘नागपूर पत्रिका’मध्ये शिफ्ट झालो. माधव गडकरी यांच्यामुळे राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आलो. माधव गडकरी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. महाराष्ट्रभर संचार सुरू झाला आणि हळूहळू लक्षात येत गेला तो गोविंदराव तळवलकर यांचा दबदबा. साहित्य-राजकारण-समाजकारण-प्रशासनात ‘गोविंदराव काय म्हणाले?’ अशी उत्सुकता किंवा ‘गोविंदराव काय म्हणतील?’ असा वचक जाणवायचा. नागपूर, मुंबईत वावरत असताना एकेक पत्रकाराच्या ‘स्व’कौतुक’ धन्यकथा ऐकत असताना जाणवलं की, महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाची दिशा ठरवणारा पत्रकारितेतला गोविंदराव तळवलकर हा ‘बाप’माणूस आहे, पण त्या ‘बाप’पणाचं तोरण न लावता हा माणूस आत्ममग्न वावरत असतो. हे बापपण किती उंचीचं तर, संपादक कसा असावा आणि पत्रकारिता कशी करावी याचे मापदंड गोविंदराव यांच्यापासून सुरू होत आणि ते संपादक असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’पाशी संपत. त्यांचा व्यासंग मूलभूत आणि व्यापक असायचा, त्यांची दृष्टी चौकस नितळ आणि भाषा त्यांच्यासमोर हात जोडून उभी. त्यामुळे त्यांचं लेखन धारदार असे, पण त्यात विखार नसे. संपादक म्हणून उदारमतवादी असल्यानं आपल्याला जे माहिती नाही ते अन्य कोणालाच माहिती नाही किंवा टोकाला जात ते तसं काही अस्तित्वातच नाही, अशी आजकाल वैपुल्यानं फोफावलेली तुच्छता म्हणा की, कर्कश्श वृत्ती तळवलकरांमध्ये नव्हती. म्हणूनच आमच्या पिढीवरचा त्यांचा हा प्रभाव कायम राहणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला ज्यांचा अभिमान वाटायचा, ते अनंतराव भालेराव हे तळवळकर यांचा वीक पॉइंट आहेत, हा अदृश्य समान धागा निर्माण झाला. अनंतरावांचे अग्रलेख गोविंदराव अनेकदा पुनर्मुद्रित करत. मनाचा असा संपादकीय मोकळेपणा दुर्मीळच.
याच काळात आणखी एक घटना घडली आणि गोविंदराव तळवलकर यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा मी ‘नागपूर पत्रिका’चा मुख्य वार्ताहर होतो. एक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला. मी तडकाफडकी राजीनामा दिला (वर्ष १९८४), तेव्हा लेक नुकतीच जन्माला आलेली होती. आणखी काही अडचणी समोर आss वासून उभ्या होत्या. मी चांगलाच अडचणीत सापडलेलो होतो. हे कळवल्यावर प्रख्यात साहित्यिक जयवंत दळवी आणि संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांनी मला नोकरी मिळावी यासाठी मुंबई-पुण्यात प्रयत्न सुरू केले. दळवी यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये रुजू व्हा असा गोविंदराव तळवलकर यांचा टेलिग्राम आला. नेमक्या त्याच वेळी पुण्याच्या ‘सकाळ’कडून नागपूरचा अर्धवेळ वार्ताहर म्हणून नियुक्त केल्याचं पत्र आलं आणि माधव गडकरी यांनी कळवलं की, मुंबई ‘लोकसत्ता’चा वार्ताहर म्हणून मी काम सुरू करावं. त्या मोबदल्यात मला ५०० रुपये दरमहा मिळणार होते. तत्पूर्वी ‘मुंबई सकाळ’मध्ये असताना माधव गडकरी यांनी माझी दरमहा ५०० रुपये मानधनावर वार्ताहर म्हणून नियुक्ती केलेली होती. ‘तरुण भारत’ या दैनिकातल्या सदराचे तीनेकशे रुपये मिळू लागलेले होते. पूर्ण वेळ श्रमिक पत्रकाराला वेतन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे मिळणाऱ्या वेतनापेक्षा ही एकूण रक्कम किती तरी जास्त होती. अर्थात यापेक्षा मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये अधिक पगार मिळाला असता, पण नागपूर लगेच सोडणं शक्य नव्हतं. ‘महाराष्ट्र टाइम्सला रुजू होऊ शकत नाही, हे तुम्हीच गोविंदरावांना सांगा’, असा जयवंत दळवी यांनी सांगितलं आणि मला प्रचंड टेंशन आलं.
रीतसर वेळ ठरवून मुंबईत तळवलकर यांना भेटलो. ही भेट फार तर आठ-नऊ मिनिटांची झाली असेल. माझा नकार त्यांना एव्हाना कळलेला आणि मुळीच रुचलेला नव्हता. हे जयवंत दळवी यांनी सांगितलेलं होतं. ते तळवलकर यांच्याकडून मिळालेल्या ट्रिटमेंटमधून लक्षात आलं. माझं म्हणणं त्यांनी नीट ऐकून घेतलं, पण उभं ठेवून आणि फक्त ‘हं’ असा एक अक्षरी प्रतिसाद देत! मी ‘सॉरी’ म्हणून उभा राहिलो तर त्यांनी ‘भेटत चला अधूनमधून’, असं म्हणत कटवलं. हा ‘अधूनमधून’ फारच रुक्ष आणि तीव्र नापसंतीचा होता. मात्र त्याचे कोणतेही पडसाद नंतर उमटले नाहीत. तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये राज्याच्या अन्य भागात प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रातील सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या उल्लेखनीय बातम्या आणि मजकुराची दाखल घेणारा एक स्तंभ होता. त्यात माझ्या बातम्या/लेखनाची दखल अनेकदा घेतली गेली, हे श्रेय तो स्तंभ लिहिणाऱ्याचं होतं तरी एकदा नाव आल्यावर ते नंतर टाळण्याची (आता अनेक संपादकांकडून दिली जाते, तशी आणि वारंवार अनुभवयास मिळणारी) सूचना तळवलकर देऊ शकले असते. पण संपादक म्हणून किरट्या विचाराचे आणि खुज्या उंचीचे ते नव्हते. दोन वेळा तर अग्रलेखातही बातम्यांचा उल्लेख आला. ते अग्रलेख खुद्द गोविंदराव तळवलकर यांनीच लिहिलेले आहेत, असं सांगण्यात आलं तेव्हा मी एकाच वेळी विस्मयचकित आणि त्यांच्यावर फिदाही झालो. असा उमदेपणा माधव गडकरी वगळता अन्य कोणत्या संपादकाकडून तोवर वाट्याला आलेला नव्हता.
नासिकराव तिरपुडे यांच्याशी गोविंदराव यांचा विशेष स्नेह होता. ते नागपूरला त्या काळात दोन-तीन वेळा आले, पण नासिकराव तिरपुडे वगळता कोणालाच भेटले नाहीत. गोविंदराव आल्याचं एकदा कळल्यावर फोन केला आणि भेटायला येऊ का, असं विचारल्यावर ते चक्क ‘नाही’ म्हणाले. वयाची पंचाहत्तरी गाठली तेव्हा नासिकराव तिरपुडे यांनी काही पुरस्कार सुरू केले. पत्रकारितेसाठीचा पहिला पुरस्कार मला मिळाला. तो गोविंदराव यांच्या हस्ते प्रदान होणार असल्याचं नासिकराव तिरपुडे यांनी सांगितल्यावर साहजिकच आनंद झाला. प्रत्यक्षात मात्र त्या कार्यक्रमाला मी हजर राहू शकलो नाही. नेमक्या त्याच काळात मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं केलेल्या नामविस्ताराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला. त्यामुळे मराठवाड्यात हिंसक प्रतिक्रिया उमटली. त्याचं वृत्तसंकलन करण्यासाठी मराठवाड्यात जावं लागलं. मग माझ्या कन्येनं तो पुरस्कार स्वीकारला. नागपूरला परतल्यावर गोविंदरावांना फोन करून दिलगिरी व्यक्त करताना गैरहजेरीचं कारण सांगितलं तर त्याकडे साफ दुर्लक्ष करून ते म्हणाले, ‘तुमची लेक गोड आहे, बरं का!’ आणि त्यांनी फोन बंद केला.
मग हळूहळू आमच्या भेटी होऊ लागल्या. महत्त्वाचं म्हणजे फारच अधूनमधूनच. धनंजय गोडबोले महाराष्ट्र टाइम्सचा प्रतिनिधी म्हणून नागपूरला आल्यावर यातला ‘फारच’ अंतर जरासं गळून पडलं. मग सोनेरी चष्म्याआडचे त्यांचे डोळे जरब न वाटता कुतूहलाने ओथंबलेले वाटू लागले. तरी गोविंदराव तळवलकर यांच्या ‘बाप’पणाचा धाक कायम मनावर असे. बहुतेकदा ते एकटेच बोलत असत आणि आम्ही अत्यंत भक्तीभावानं ते श्रवण करत असू. त्यांचा मूड चांगला आहे असं वाटलं तर त्यांच्याबाबत ऐकलेल्या काही दंतकथाविषयी नेमकं काय आहे ते आम्ही विचारत असू. त्यावर तळवलकर मग बोलत असत, पण त्यांचा सूर कधीच ‘कर्ता-करविता’चा नसे. गोविंदराव काही बैठकीतले नव्हते. खूप लोक असले तर ते फार खुलतही नसत. खरं तर अशा ठिकाणी ते जाणंच टाळत. नाईलाज म्हणून गेलेच अशा वेळी तर ते मोजकं पण नेमकं बोलत आणि आटोपतं घेत. मात्र धनंजय गोडबोलेमुळे खुललेले गोविंदराव अनुभवायला मिळाले. गप्पात अनेकदा समोरचा काय बोलतो हे ते लक्षपूर्वक श्रवण करत, पण त्यावर लगेच मतप्रदर्शन करत नसत.
कोणत्याशा कार्यक्रमासाठी एकदा गोविंदराव नागपूरला आले. धनंजय आणि मी त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेलो. कार्यक्रमाचे आयोजक बडे राजकारणी होते. त्यांची अलिशान वातानुकूलित कार गोविंदरावांच्या सेवेला होती. तेव्हा मी नुकतीच मारुती व्हॅन घेतलेली होती. त्यांच्या कारकडे जात असताना हा विषय निघाला आणि गोविंदराव लगेच व्हॅन पाहायला वळले. नुसतेच आले नाही तर माझ्याच व्हॅनमध्ये बसून पुढचे दोन दिवस ते फिरले. आयोजकांना त्यांना संस्थेत नेऊन बरंच मिरवायचं आहे, हे लक्षात आल्यावर ‘मला यांच्यासोबत जरा बाहेर जायचं आहे. आधीचंच ठरलेलं आहे ते’, असं म्हणून गोविंदरावांनी आम्हाला इशारा केला. कारमध्ये बसल्यावर पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आणि अखेर ‘नागपूर दर्शना’ची सैर ठरली. मग गोविंदराव पुढच्या सीटवर, शेजारी मी चालक आणि मागे धनंजय गोडबोले; असे आम्ही तिघं चार-साडेचार तास भंडारा नाका ते वानाडोंगरी आणि वाडी ते कामठी असं भटकलो. सदरमधलं अशोका हॉटेल बंद होईपर्यंत गप्पा मारत बसलो. नवीन संदर्भ आणि अनोळखी माहितीचे लक्ष-लक्ष दिवे गोविंदराव तळवलकर यांनी उजळवले आहेत, असा तो कायम स्मरणीय अनुभव होता. ‘लेखक म्हणून तुम्हाला बायस राहता येईल, संपादक म्हणून नाही. संपादक म्हणून तुम्हाला भूमिका घ्यावीच लागेल, बायस नाही राहता येणार, हे लक्षात ठेवा बर्दापूरकर...’ असं बरंच काही ते त्यावेळी म्हणाले. तेव्हा मी मुख्य वार्ताहर होतो आणि संपादक होण्याची कल्पनाही मनाला स्पर्श करूनही गेलेली नव्हती. मी ते बोलून दाखवलं तर गोविंदराव म्हणाले, ‘व्हाल हो एक दिवस संपादक तुम्हीही, त्यात काय!’. ते सगळं स्वप्नवतच वाटतंय अजूनही. लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचा संपादक म्हणून सूत्रं स्वीकारली तेव्हा गोविंदरावांची ती भविष्यवाणी आठवली. त्यांना ती आठवण करून देत मेल पाठवला तर त्यांचं उत्तर आलं, ‘ओके. ऑल द बेस्ट’. नंतर आमच्या दोन-तीनच भेटी झाल्या; त्याही ओझरत्या. क्वचितच फोनवर बोलणं होत असे.
ते सतत लिहिते राहिले. त्यांच्या लेखनातला गतकातर आठवणींच्या प्रदेशात रमणारा उबदार आशावाद खूपच भावत असे. नंतर त्यांचा मुक्काम अमेरिकेत हलल्यावर सहा-आठ महिन्यांतून एखादा मेल असा संपर्क राहिला. काहीही कारण नसताना वर्षातून एखाद वेळा मी त्यांना माझ्याविषयी अपडेट कळवत असे. बहुसंख्य मेलला त्यांचं, रिसीव्हड, थँक्स, ओके... असं कोरडं उत्तर येत असे. ‘लोकसत्ता’त ‘चार्ल्स डिकन्स कांड’ घडलं, तेव्हा माझ्यासाठी ‘लोकसत्ता हे ‘छोड आये हम वो गलियां’ होऊन बरेच महिने उलटले होते. पुण्यात असतानाच गोविंदराव यांचा लेख साधना साप्ताहिकात मी वाचलेला होता. नागपुरात परतल्यावर लोकसत्तातील मजकूर वाचनात आला आणि आश्चर्य वाटलं. त्याबद्दल पाठवलेल्या मेलला गोविंदरावांनी सविस्तर उत्तर पाठवलं. कार्यकारी संपादकांना त्यांनी लिहिलेलं (खरं तर, झापलेलं!) पत्रही पाठवलं. तो एकूणच सगळा उबग आणणारा आणि नॉनजर्नालिस्टीक प्रकार होता. तो पत्रव्यवहार जाहीर करू का, असं मी विचारलं तर गोविंदरावांचं उत्तर आलं ‘नो’. नंतर काही दिवसांनी त्यांनी एक मेलला उत्तर देताना तो संदर्भ देत लिहिलं, झालं तेवढं पुरे. पत्रकारितेची आपणच बदनामी कशाला करायची?’
प्रयोगशील आणि उदारमतवादी संपादक, अफाट वाचक, मराठी व इंग्रजीत लीलया वावरणारा तसंच कायम सोपं लिहिणारा लेखक, आचंबित करणारा व्यासंगी आणि विद्वान... अशा विविध पातळ्यावर गोविंदराव तळवलकर आम्हा अनेक पत्रकारांचे बाप होते. महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्त्वात लुब्ध करणारं विद्वत बहुपेडीपण असूनही त्यांच्यात पोझिंग नव्हतं, ढोंगीपणा नव्हता. अशा बापाच्या छायेत अत्यंत अल्प का होईन वावरता आलं, याचं समाधान घनगर्द आहे. अशी माणसं मराठी पत्रकारितेत आता तर भरदिवसा विजेरी घेऊन शोधली तरी सापडणं कठीण आहे!
गोविंदराव तळवलकर यांच्या निधनाची बातमी कळल्यावर धनंजय गोडबोले म्हणाला, ‘आमचा बाप गेला. आम्ही पोरके झालो...’ त्याच्या भावनांशी मी पूर्ण सहमत आहे.
लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nivedita Deo
Mon , 27 March 2017
ठीक आहे. स्वतः चंच कौतुक जरा जास्त केलं आहे.