महात्मा गांधी आणि महर्षी शिंदे ही दोन माणसं एकच कालखंड जगली. शिंद्यांचा जन्म १८७३चा, गांधींचा जन्म १८६९चा. शिंद्यांचा मृत्यू १९४४चा आणि गांधींचा मृत्यू १९४८ सालचा. म्हणजे, गांधी तीन वर्षं आधी जन्माला आले आणि चार वर्षं उशिरा गेले. हा तीन-चार वर्षांचा मुद्दा जर सोडला, तर जवळपास भारतीय राजकारणामध्ये संपूर्ण समकाल ज्यांनी एकत्रित एका कालखंडात काम केलेलं आहे, असं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य या दोघांच्या संदर्भात दाखवता येतं. त्यामुळे अस्पृश्यता निवारणाचं काम असेल, सक्रिय राजकारण असेल, इतर प्रश्नांवरच्या भूमिका असतील, या प्रत्येक क्षेत्रातील कामांबद्दल दोघंही सतत प्रतिसाद देत राहिले आणि हस्तक्षेपही करत राहिले, असं आपल्याला दिसतं.
‘समकालीन’ असणाऱ्या अशा दोन व्यक्तिमत्त्वांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न. ‘समकालीन’ याचा अर्थ ‘पूर्णतः समकालीन’. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अंगाने. महर्षींची खूप उपेक्षा झाली. ‘सर्वोत्तम उपेक्षित’ असा शब्द एन. डी. पाटील सरांनी या उपेक्षेसंदर्भात वापरला, तो अगदी खरा आहे. ती उपेक्षा सर्वांगीण विचार करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची झाली, हे त्याहून वाईट आहे.
शिंद्यांनी आयुष्य जर एखाद्याच क्षेत्राशी जखडून ठेवलं असतं, तर निदान त्या क्षेत्राबाहेरच्यांनी उपेक्षा करणं समजू शकतो; पण अस्पृश्यता निर्मूलन असेल, धर्मकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, राजकारणातील महत्त्वाचा बहुजनवादाचा विचार असेल, मराठी भाषेबद्दलचं लेखन असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे ज्या माणसाने काम करून आपला स्वतःचा ठसा उमटवला, अशा माणसाची ती उपेक्षा आहे.
मराठ्यांनी त्यांना नाकारलं हे सर्वांनाच माहीत आहे. ज्या पूर्वास्पृश्य वर्गासाठी त्यांनी शेवटपर्यंत काम केलं; वेदना सोसल्या, त्याही अनुयायांनी त्यांना अंतिम काळात ‘आपलं’ म्हटलेलं नाही. काँग्रेसला लोकचळवळीचं रूप देण्यासाठी बहुजन समाजाचा काँग्रेसप्रवेश होणं गरजेचं आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. महाराष्ट्रातील काँग्रेसला बहुजनांचा एक फार मोठा आधार देण्याची किमया त्यांच्या मार्गदर्शनाने साधली गेली. त्या काँग्रेसनेही नंतरच्या काळामध्ये त्यांची उपेक्षा केली, असं आपल्याला दिसतं.
टिळकांना, त्यांच्या राष्ट्रीय भूमिकेला, त्यांनी खूप मतभेदासाकट मान दिला, पण टिळकांच्या जहाल पक्षाच्या लोकांनीसुद्धा ‘सुधारक’ म्हणूनच त्यांची कुचेष्टा केली. जे सुधारक होते, त्यांनाही शिंद्यांच्या कामाचं पुरेसं महत्त्व उमगलं नाही. ज्या ज्या संस्था त्यांनी स्थापन केल्या, त्या त्या संस्थांमधून त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणानं बाहेर पडावं लागलं. अशी सगळ्या बाजूंनी ज्याच्या वाट्याला उपेक्षा आली, असं ते व्यक्तिमत्त्व आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
एका अर्थानं गांधींशी याचं साम्यपण आहे. गांधींची शिंद्यांसारखी उपेक्षा झाली नाही आणि होणारही नाही. पण शिंद्यांच्या वाट्याला ‘उपेक्षा’ आली, गांधींच्या वाट्याला ‘विकृतीकरण’ आलं. स्वातंत्र्योत्तर काळात गांधीवादाचा विचार हा एका बाजूला कालबाह्य झाला आहे, असं मानणाऱ्या पुरोगामी आणि प्रतिगामी, अशा दोन्ही तऱ्हेच्या शक्ती होत्या. गांधींचं या देशाला काही योगदानच नाही, त्यांनी फाळणी केली, इथपासून गांधींमुळे किती प्रश्न या देशात निर्माण झाले इथपर्यंत सांगणारे हिंदुत्ववादी सत्ताधारीही निर्माण झाले. आजही ते सत्ताधारी अस्तित्वात आहेत. त्या अर्थानं त्यांचं ‘विकृतीकरण’ झालं.
महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य मला असं दिसतं की, महाराष्ट्र अभ्यासू आहे, बुद्धिवादी आहे, हे सगळं जरी खरं मानलं, तरी मतभेदांना प्रगल्भपणे पाहण्याची दृष्टी महाराष्ट्राकडे नाही. ती शिंद्यांच्या काळातही दिसली नाही. पण त्या काळी वादविवादांना मोठ्या प्रमाणावर निदान वैचारिक चौकट तरी असे. आता हे मतभेद अशा पातळीवर आलेले आहेत की, एखाद्या क्षेत्रात जरी एखाद्या माणसाशी मतभेद झाले, तरी तो माणूस संपूर्ण हद्दपार करायचा, म्हणजे पूर्णपणे आमचा तरी असला पाहिजे किंवा पूर्णपणे त्यांचा तरी असला पाहिजे, या भूमिकेवर आज महाराष्ट्र आलेला दिसतो.
मतभेदांची प्रगल्भता व्यक्त करण्याची क्षमता नसल्यामुळे शिंद्यांना दलितांमधून अनुयायी मिळाले नाहीत, त्यांनी कायमच शिंद्यांना बाजूला सारलं. आंबेडकरांच्या अनुयायांनी गांधींना कायमचं बाजूला सारलं आणि गांधींच्या अनुयायांनीसुद्धा आंबेडकरांना बाजूला टाकलं, असं आपल्याला दिसतं. त्यामुळे ही सगळी व्यक्तिमत्त्वं सुटी सुटी पाहिली गेली आणि त्यांच्यातील आंतरिक सुसंगतीकडे दुर्लक्ष झालं, असं मला वाटतं.
गांधींना तरी महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्गाने मनापासून स्वीकारलं होतं का? नाही स्वीकारलं. बहुजन समाज गांधींच्या मागे गेला हे खरं आहे; पण इथल्या बुद्धिजीवी वर्गाला गांधी ‘आपले’ वाटले नाहीत, याचं कारण गांधींनी सत्याग्रहाचा विचार सांगितला, क्लेश सोसण्याची भूमिका घेतली. ‘एकादश व्रतं’ सांगितली. व्यक्तीला स्वतः काहीतरी बदल करण्यासाठी श्रम करून जगलं पाहिजे, या पद्धतीची भूमिका मांडली. ती एका अर्थाने आधुनिकतेच्या विरोधी जाण्याची भूमिका होती. त्यामुळे हा समाजव्यवस्थेतील ‘अपरायझिंग क्लास’- ज्याला आपण ‘बुद्धिजीवी वर्ग’ म्हणतो, त्याचे हितसंबंध एका अंगाने ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या संस्था, लोकशाहीचा विचार आणि त्यातून निर्माण होणारा भविष्यातील भारत, याच्याशी जोडलेले होते. अशा बुद्धिजीवी वर्गाला गांधींचं आकर्षण वाटण्याचं काही कारण नव्हतं.
त्यामुळे एकाच्या वाट्याला उपेक्षा आली, एकाच्या वाट्याला विकृतीकरण जास्त आलं, अनुल्लेखानं मारणं आलं. महाराष्ट्रापुरतं जरी बघायचं झालं, तरी महाराष्ट्राच्या समताविषयक चर्चाविश्वात शिंद्यांची उपेक्षा विद्वानांकडून झाली आणि गांधींचीही दखल अलीकडे घेतली जात नाही. समतेच्या विचारामध्ये या दोघांचं अतिशय मौलिक योगदान होतं; पण समतेच्या विश्वातून आपण दोघांनाही हद्दपार करून टाकलं आहे, हा एक उभयतांमधील शोकात्म साम्याचा भाग आहे.
दुसरं एक महत्त्वाचं साम्य मला दिसतं, ते ‘धर्मवृत्ती’मध्ये दोघांच्यामध्ये समान असणारी ही गोष्ट होती. ‘धर्मवृत्ती’ हा शब्द मी मुद्दाम वापरतो. ‘धार्मिकता’ हा शब्द वापरत नाही. ‘धार्मिकता’ ही बदनाम झालेली गोष्ट आहे. पण उभयतांमध्ये धर्मवृत्ती होती आणि ‘आजच्या राजकारणाचा पाया धर्मापासून दूर गेलेला आहे,’ असं शिंदेही म्हणाले होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गांधींनी लिहिलेलं आहे की, मला राजकारणामध्ये धर्म हवा आहे; कारण राजकारण धर्मापासून दूर गेल्यामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित झाले आहेत, विग्रह उपस्थित झाले आहेत. शिंदे असं म्हणायचे की, आता दिसणारे जे धर्म आहेत, ते खरे नाहीत, खरं तर ते पंथ आहेत आणि पंथापंथातील भांडण आपण धर्मातील भांडण म्हणून पाहतो आणि त्याच्यामुळे बरेचसे विग्रह उपस्थित झालेले आहेत. गांधींची भूमिका थोडीशी वेगळी आहे; पण यापेक्षा फार मूलगामीरित्या वेगळी आहे, असं नाही.
शिंद्यांनी धर्माकडे ज्या दृष्टीनं पाहिलं, ती दृष्टी आणि गांधींनी धर्माकडे ज्या दृष्टीनं पाहिलं, ती दृष्टी, यांमध्ये मात्र फरक आहे. दोघांमध्ये ‘धर्मवृत्ती’ समान आहे; पण धर्माविषयी विचार करण्याची जी पद्धती आहे, ती दोघांची वेगळी आहे. उभयतांच्या अस्पृश्यतेच्या भूमिकेवरून ते स्पष्ट होते. पण दोहोंमधला एक समान भाग असा आहे की, धर्माचा निषेध करून उपयोग नाही, धर्म टाळूनही उपयोग नाही आणि धार्मिक नसण्याने काही साध्य होणार नाही, म्हणजे धर्मवृत्ती न बाळगण्याने काही साध्य होणार नाही, असेच उभयतांना वाटत होते.
महाराष्ट्रातील समाजसुधारकांबद्दल शिंद्यांनी म्हटलं आहे की, ही मंडळी धर्मविशिष्ट प्रश्नांना हात घालणं आणि त्याची सोडवणूक करणं, यालाच ‘सुधारणा’ मानतात. शिंद्यांना सुधारकांची ही भूमिका मान्य नाही आणि गांधीसुद्धा धर्मविशिष्ट प्रश्न घेऊन सुधारणेचा विचार करतात, असं दिसत नाही. गांधींची धर्मविचारांची प्रेरणा थोडीशी वेगळी आहे.
शिंद्यांनी असं म्हटलं आहे की, सगळे सुधारक हे आधुनिक आहेत, ही गोष्ट खरी असली तरी अंधश्रद्धा, समाजातील रूढी, रिवाज यांचा निषेध करणं आणि त्याची मांडणी करणं (त्याला एका अर्थानं ‘सकारात्मक विवेकवाद’ आपण म्हणू शकतो) या पद्धतीने सगळे सुधारक जात असल्यामुळे वा मागासलेल्या सगळ्या समाजाला हवं असणारं, जे भौतिक सुधारणांचं जीवन आहे, त्या भौतिक सुधारणांची चळवळ या सुधारणा चळवळीमध्ये अंतर्भूत झालेली नाही आणि हेच त्यांच्या अपयशाचंसुद्धा कारण आहे.
दुसऱ्या बाजूला शिंदे जसं म्हणाले, त्यावरून त्यांच्या अपयशाचं कारण, इतरांच्या प्रश्नांबद्दल इथल्या सुशिक्षितांना अनास्थाच आहे आणि त्या अनास्थेमधून बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. मग सोपं काय असतं, तर हे असतं की, सरकारने कायदा करावा असं म्हटलं की झालं!
इथे पुन्हा शिंदे आणि गांधींमध्ये साम्य दिसतं. कायदा नको आहे, अशी दोघांची भूमिका नाही; पण कायद्यावर भर नाही. भर नसल्याचं कारण काय दिलं आहे शिंद्यांनी? असं दिलं की, एकदा कायदा केला की, एखाद्या रूढीविषयी, एखाद्या अमानुष प्रथेविषयी, एखाद्या अंधश्रद्धेविषयी जो सल माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊन त्याच्याकडे पाहायला पाहिजे, तो निघून जातो.
शिंद्यांचं कुठेतरी गृहीत हे आहे की, जोपर्यंत एखाद्या वाईट प्रथेविषयीचा सल आपल्या मनामध्ये शिल्लक राहतो, तोपर्यंत माणूस स्वतः कृतिप्रवण होण्याची शक्यता असते. एकदा कायदा झाला की, हा सल संपला आणि अंमलबजावणीची जबाबदारी तत्त्वतः कोणावरही नसते. ती कायद्यावर ढकलली जाते आणि मग कायदा राबवणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्यांची जेवढी सामाजिक जाणीव असेल, त्यांच्या जेवढ्या संवेदनशीलता असतील, तेवढ्याच चौकटीमध्ये या गोष्टी पाहिल्या जातात आणि हळूहळू चळवळीचं महत्त्व समाप्त होत जातं, पण प्रश्न मात्र तसेच राहतात.
गांधींनी याच पद्धतीने विचार केलेला आहे. कायदा जेव्हा व्हायचा तेव्हा होईल, पण त्यासाठी थांबायची गरज नाही. गो-हत्येसंबंधातील एक उदाहरण घेता येईल. कायदा जेव्हा होईल, तेव्हा गो-हत्या थांबेल न थांबेल; पण गायींची हत्या थांबावी, ही जर हिंदूंची श्रद्धा असेल आणि धारणा असेल, तर त्यांच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी हिंदू समाजाने स्वतः उचलली पाहिजे, सरकारचा त्याच्याशी संबंध असता कामा नये.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
हे आजच्या संदर्भात तर महत्त्वाचं आहेच; पण त्या काळीही गांधींची ही भूमिका होती की, सरकारचा काय संबंध याच्याशी? मला गाईचं महत्त्व वाटतं, मी गाय पाळावी, तिचं संवर्धन करावं, अशी स्वच्छ भूमिका गांधींनी घेतलेली आहे. म्हणून त्यांनी गो-हत्येबद्दलच्या कायद्याचासुद्धा विरोध नोंदवलेला आहे- तो दोन कारणांनी. एक कारण ही भूमिका आहे आणि दुसरं, मला जरी गाय प्रिय असली, तरी गाय हे काही समुदायांचं अन्न आहे. त्यामुळे त्या अन्नावरचा त्यांचा अधिकार आपण नाकारू शकत नाही, ही भूमिका गांधींनी त्या वेळी घेतली होती.
म्हणून समान गोष्ट काय दिसते, तर कायद्यावर भर नाहीच असं नाही, कायदा हा झाला तर हवाच आहे; पण कायदा होण्यानेच सगळे प्रश्न सुटतील आणि त्याच्यामधली सल नाहीशी होईल, ही शक्यता जवळपास नाही.
दुसरा एक प्रश्न दोहोंमध्ये समान काय दिसतो; तर शिंद्यांच्या काळातमध्येसुद्धा, म्हणजे १९२०नंतर गांधींनी काँग्रेस ताब्यात घेतली. १९२०नंतरचा कालखंड जर आपण बघितला, तर महाराष्ट्रामध्ये दोन नव्या वर्गीय शक्तींचा जन्म झालेला आहे- एक कामगार वर्ग आणि दुसरा शेतकरी वर्ग. या दोन नव्या वर्गीय शक्ती १९२०नंतरच्या राजकारणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. या शक्तींचं अधिष्ठान समाजवादाचा विचार, मार्क्सवादाचा विचार आणि या सगळ्यांच्या बुडाशी आधुनिकता नावाचं एक सूत्र आहे. त्याचा एक परिणाम म्हणून बुद्धिवादाला अवास्तव महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दोघांनीही बुद्धी नाकारलेली नाही; पण निव्वळ बुद्धी सुधारणांना पुरेशी नाही, म्हणून शिंद्यांनी बुद्धीच्या जोडीला विश्वास ठेवलेला आहे आणि गांधींनी बुद्धीच्या जोडीला श्रद्धा ठेवलेली आहे. बुद्धी की श्रद्धा, बुद्धी की विश्वास या द्वैतात हे दोघंही अडकलेले नाहीत.
गांधींचं एक उदाहरण सांगता येतं. त्यांना ‘बुद्धी की श्रद्धा?’ असा जेव्हा पेच आला, तेव्हा त्याचा खुलासा करताना गांधी असं म्हणाले की, मला जर असा कुणी प्रश्न विचारला की, पाच लाख मीटर कापड विणून मला तुम्ही किती दिवसांत द्याल, तर त्याचा मी हिशोब करीन, किती कापूस लागेल, कामगार किती लागतील, वेळ किती लागेल आणि काय काय लागेल, हे काम बुद्धीनं होण्यासारखं आहे. तेव्हा मी इथे बुद्धीचा वापर करेन; श्रद्धेचा वापर करणार नाही.
पण गांधी पुढे असं म्हणतात की, दुसऱ्या बाजूला किमान त्या काळातील पाच सनातनी ब्राह्मणांच्या मनातील अस्पृश्यता घालवून दाखवायला किती वेळ लागेल, असं जर मला विचारलं, तर मी तिथं बुद्धीपेक्षा श्रद्धेचा वापर करीन. कारण त्यासाठी त्याच्या मनामध्ये गेलं पाहिजे.
शिंदे बुद्धी आणि विश्वास अशी जोडी करतात, गांधी बुद्धी आणि श्रद्धा अशा तऱ्हेची जोडी करतात. दोघांनीही प्रचलित धर्माला अध्यात्म मानलेलं नाही. ‘अध्यात्म’ नावाची आणखी काहीतरी वेगळीच गोष्ट आहे. पण शिंद्यांच्या आणि गांधींच्या विचारपद्धतीत मूलभूत फरक आहे. गांधींच्या सगळ्या विचारपद्धतीचं अधिष्ठान नैतिक भूमिका आणि ईश्वराच्या अधिक जवळ जाण्यासाठी सबंध जगण्याचा प्रयत्न, त्यातून निर्माण झालेल्या या सगळ्या चळवळी या अंगानं ते त्याच्याकडे पाहतात.
शिंद्यांमध्ये एक अव्वल दर्जाचा समाजशास्त्रज्ञ होता. तो काही एक मीमांसा करतो आणि काही एक निर्णय देतो, हा त्यांच्या विचारपद्धतीमधला एका अंगानं फरक आहे, असं मला वाटतं. त्यामुळे शिंदे असं म्हणतात की, धर्माची शुष्क हाडं घेण्यापेक्षा धर्मामध्ये असणारे जे रसपूर्ण जीवन, ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं; तर गांधी दुसऱ्या बाजूला असं म्हणतात की, खरा धर्म जो आहे, तो जर आपल्याला नीट समजायचा असेल, तर मला इतर सगळ्याच धर्मांबरोबर माझं सहजीवन जगता आलं पाहिजे आणि मला त्यांच्याबरोबर काम करता यायला पाहिजे.
दोघांनाही धर्मामध्ये पारमार्थिकता अपेक्षित नाही. परलोक नावाची कुठली तरी गोष्ट आहे आणि तिथं सगळ्यांना जाब द्यायचा आहे, या प्रकारची भूमिका दोघांनीही घेतलेली नाही. स्वर्ग-नरकाच्या वा पाप- पुण्याच्या घोळाशिवाय दोघंही अध्यात्माची चर्चा करतात.
धर्माचा विचार करताना धर्माबद्दलची भूमिका शिंद्यांनी रास्तपणे सांगितली. शिंदे भागवतधर्माचा विचार महाराष्ट्राच्या संदर्भात जास्त करतात, बौद्ध आणि जैन या सगळ्या धर्मांशी असणारा भागवतधर्माचा संबंध ते उलगडून दाखवतात. १२व्या शतकानंतर बौद्धांमध्ये झालेली परिवर्तनं, प्रतिक्रांतीतून आलेले काही प्रश्न आणि धर्मातरं, त्यांचे झालेले छळ याच्यातून अस्पृश्यता कशी निर्माण झाली, याची एक मीमांसा ते याच्याशीसुद्धा जोडतात. पण श्रेष्ठ आहे तो ‘भागवतधर्म’ आणि तो राजवाडे किंवा रामदास यांनी जो ‘महाराष्ट्रधर्म’ मांडला, तो नव्हे.
प्रसंगी शिंद्यांनी रानड्यांशीसुद्धा मतभेद व्यक्त केलेले आहेत की, शिवाजींच्या राज्यस्थापनेशी भागवतधर्माचा संबंध जोडणं त्यांना सरसकट मंजूर होतं, असाही काही भाग नाही. त्यामुळे ते धर्माचा विचार करताना अधिक समाजशास्त्रीय अंगानं करतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गांधींनी धर्मविषयक वाङ्मय पुष्कळ वाचलेलं आहे. विशेषतः विलायतेत असताना ‘बायबल’, ‘कुराण’ वाचलेलं आहे. अनेकांशी चर्चा केलेल्या आहेत. गांधींवर असलेले जे प्रभाव आहेत, त्यात रायचंदभाई जैन, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, टॉलस्टाय, रस्किन आहेत. त्या सगळ्यांचा प्रभाव गांधींवर आहे.
त्याउलट शिंद्यांनी तौलनिक धर्मशास्त्राचं अध्ययन अधिक केलेलं आहे. तौलनिक धर्मशास्त्राकडून ते उदार धर्माच्या स्वरूपाकडे अधिकाधिक येतात आणि गांधी त्यांच्यावर असलेल्या प्रभावांकडून धर्माच्या उदार स्वरूपाकडे येतात. ते येतात एकाच ठिकाणी, फक्त दोन भिन्न मार्गांनी, हा त्यांच्यातील एक फरक आहे.
गांधींवरचा परमहंसांचा प्रभाव नुसता वरवरचा प्रभाव आहे, अशातला भाग नाही. परमहंसांकडे सर्व धर्माच्या साधनेची जी तंत्रं किंवा अंगं आहेत, त्याचा वापर करून साधना करता येते का, ते पाहणं हेसुद्धा गांधींना महत्त्वाचं वाटतं. म्हणून गांधी एकाच वेळेला ‘मी चांगला हिंदू असेन, तर मी चांगला मुसलमान असलो पाहिजे, चांगला पारशी असलो पाहिजे, चांगला ख्रिस्ती असलो पाहिजे’, अशा प्रकारची भूमिका घेतात. गांधींची सर्वधर्मीय प्रार्थना हा याचाच आविष्कार. शिंदे या प्रकारच्या भूमिका न घेता धर्माचं सगळं रहस्य समाजशास्त्राच्या अंगानं उलगडत जाताना दिसतात.
आता पुढचा प्रश्न हा अस्पृश्यतेच्या संदर्भातील आहे. अस्पृश्यतेच्या संदर्भामध्ये पाहिले, तर शिंद्यांनी १९०१ सालीच या गोष्टीला सुरुवात केली. त्यांच्या कार्यात संस्थात्मक कामं आपल्याला दिसतात. ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’, अनेक शाळा उघडणं असेल, मुंबईत रविवारच्या शाळा असतील, औद्योगिक शाळा असतील, पूर्वास्पृश्य वर्गाला कौशल्य शिक्षण देणाऱ्या शाळा उघडणं असेल, हे सगळं शिंद्यांच्या संस्थात्मक कामाचा एका बाजूचा भाग आहे.
गांधी भारतातच १९१५मध्ये आले. त्यामुळे भारतातील त्यांचं जे अस्पृश्यतेचं काम आहे, ते शिद्यांनंतर सुरू झालेलं होतं, हे जरी खरं असलं, तरी दक्षिण आफ्रिकेच्या कालखंडामध्येसुद्धा गांधींच्या मनामध्ये अस्पृश्यांबद्दलच्या भूमिका व विचार सातत्यानं येताना आपल्याला दिसतात. या कार्यासंदर्भातील दोघांमधला एक समान धागा असा आहे की, दोघंही ते मनात असलेली जी मूल्यं आहेत, त्यांच्या बाबतीत अत्यंत कठोर आहेत. व्यक्तिगत जीवनात यातलं कुठलंही मूल्य मी हद्दपार करू देणार नाही, ही दोघांचीही भूमिका आहे.
शिंद्याचं सुदैव असं की, त्यांचं सबंध कुटुंबच त्यांच्या कार्यामध्ये सहभागी झालेलं होतं. गांधींना थोडासा दक्षिण आफ्रिकेच्या काळात स्वकियांशी संघर्ष करावा लागला. पत्नीशीसुद्धा करावा लागला. याच मुद्द्यावरून एकदा मध्यरात्री पत्नीला घराबाहेर काढण्याची भूमिका घेण्यापर्यंत गांधींची मजल गेली होती.
दोघांमध्येही कठोर मूल्याचरण दिसतं. व्यक्तिगत जीवनात मूल्यांची तडजोड नाही; पण सामाजिक जीवनामध्ये गांधी एक पाऊल पुढे जायला तयार होते. कारण बाकीचा समुदाय हा सगळ्या त्या भूमिकेमुळे माझ्या पाठीशी येईल असं नाही. तो जेवढा पुढे येईल तेवढ्याचं मी स्वागत करेन, अशी गांधींची सार्वजनिक जीवनाबद्दलची भूमिका आहे. शिंद्यांनी सार्वजनिक जीवनातही जवळपास त्याच मूल्यांचा आग्रह वारंवार धरलेला आहे, असं दिसतं. उदा., अस्पृश्यता निर्मूलनाच्या पत्रकावर टिळकांनी सही केली नाही, म्हणून शिंद्यांनी टिळकांना मानपत्र द्यायला केलेला विरोध.
अस्पृश्यतेच्या मीमांसेमध्ये त्या दोघांच्या दृष्टीकोनात काय फरक आहे? शिंद्यांनी ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा अतिशय महत्त्वाचा प्रबंध लिहिला आणि अस्पृश्यतेची मूळ कशात आहेत, ते त्यांनी समाजशास्त्रीय अंगाने शोधण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न करताना त्यांना काय काय आढळलं? ग्रामसंस्था आणि ती फुटलेली अस्पृश्यतेची नांगी असा शब्दप्रयोग शिंद्यांच्या वाङमयामध्ये दिसतो. तिथे शिंदे नेमकं काय म्हणतात? वर्णव्यवस्थेतून अस्पृश्यता आली की नाही? पण शिंद्यांनी असं म्हटलं आहे की, वर्णव्यवस्थेलाही प्राचीन असणारी आणि वर्णव्यवस्थेची आजी शोभेल अशा प्रकारची ग्रामसंस्था इथं नांदत होती आणि ती ग्रामसंस्था निव्वळ वर्णभेद किंवा वर्णाच्या सोयी लावणं, एवढ्यावर आधारलेली नव्हती; तर ती लोकांच्या गरजांवर आधारलेली होती.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
शिंद्यांच्या विधानाला पुष्टी द्यायची, तर एका ऐतिहासिक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ती म्हणजे जवळपास ब्रिटिश भारतामध्ये येईपर्यंत ग्रामसंस्थेमध्ये फाटाफूट झालेली दिसत नाही. इतक्या राजवटी आल्या-गेल्या, बौद्धांच्या झाल्या, जैनांच्या झाल्या, बंडं झाली, मुस्लीम आले, इस्लामी आक्रमणं झाली; पण गावगाड्याचं महत्त्व कमी झाल्याचं दिसत नाही आणि गावगाड्याची रचनाही मोडलेली दिसत नाही. कारण ती एका बाजूला सेवा करणाऱ्या जाती आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन करणाऱ्या जाती, यांवर आधारित होती. म्हणजे शिंदे म्हणतात, तसं माणसांच्या गरजांच्या समन्वयावर आधारलेली ती संस्था होती, त्यामुळे ती दृढ अशी संस्था होती व तिचं अधिष्ठान लोकसत्तात्मक होतं.
इंग्रजांनी धूर्तपणे पहिल्यांदा काय केलं असेल, तर गावगाड्याच्या उत्पादन व्यवस्थेवर आघात केला आणि ती उत्पादन व्यवस्था जशी त्यांना मोडण्यात यश यायला लागलं, तसं इथे आधुनिकतेचा शिरकाव व्हायला मदत झाली. जर गावगाडा मोडला नसता, तर आधुनिकतेचा शिरकाव ग्रामीण भागामध्ये शक्य झाला असता की नाही, याच्याबद्दल शंकेला जागा आहे.
एकदा उत्पादन व्यवस्था मोडल्यानंतर आणि उत्पादन व्यवस्था ब्रिटिश अर्थव्यवस्थेशी जोडल्यानंतर हळूहळू त्याचे परिणाम दिसायला लागले. गावगाड्यात बेकारी निर्माण व्हायला लागली. शेतकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न निर्माण झाले. ज्या जमिनी विक्रीची वस्तू नव्हती, त्यांना ब्रिटिशकाळामध्ये ‘कमोडीटी’चं स्वरूप आलं, त्याचे कज्जे दलाली सुरू झाली, कोर्ट-कचेऱ्या आल्या. या सगळ्यांमुळे जी ग्रामीण संरचना निर्माण झालेली होती; ती पूर्णपणे जरी मोडली नाही, तरी खिळखिळी झालेली दिसते.
माझं म्हणणं असं आहे की, ती खिळखिळी होण्यामध्ये महाराष्ट्रीय प्रबोधनाची बीजं आहेत, नाहीतर ती बीजं आधुनिकतेच्या रूपानं पुढे आली नसती. आता ही ग्रामसंस्था भारताची प्राचीन असल्यामुळे भारताची पुनर्रचना करायची झाली, तर जो आधार आहे, तो ग्रामसंस्थेचाच असं शिंदेही सांगतात. फक्त ग्रामसंस्थेचं त्या काळातील स्वरूप आणि यांच्या काळातील स्वरूप याच्याबद्दल त्यांनी भेद केलेला आहे.
शिंद्यांच्या लेखनात असं दिसतं की, त्या काळातल्या ग्रामसंस्थेमध्ये बाकी काही घडलं असेल, तरीसुद्धा त्याचा पाया बराचसा लोकसत्तात्मक होता.
गांधींची भारताच्या पारतंत्र्याची मीमांसा (किंवा टागोरांची काय) या अंगानं मीमांसा झालेली आहे की, आम्हीच आमच्या सगळ्या संस्था मोडल्या, त्या इंग्रजांना दिल्या आणि आता पुन्हा त्यांच्याकडून काही गोष्टी आमच्या आम्ही परत मागतोय. म्हणून ‘हिंद स्वराज’चं एका बाजूला वाचन केलं आणि दुसऱ्या बाजूला शिंद्यांच्या ग्रामसंस्थेचं अवलोकन केलं, तर आपल्याला काही समान मुद्दे सापडायला मदत होईल.
या अस्पृश्यतेची नांगी ग्रामसंस्थेमध्ये निर्माण झालेली आहे, हे एका बाजूला; दुसऱ्या बाजूला शिंदे अस्पृश्यांच्या संदर्भात असं म्हणतात की, हे अस्पृश्य हे मुळात ‘हिंदू’ नाहीच आहेत. त्यांचे देव, रितीरिवाज, रूढी यांचा कुठेही हिंदूंशी संबंध नाही आणि त्यांच्या हिंदूंच्या देवळांमध्ये यांना कुठेही जागा नाही. यांची मरीआई वेगळी आहे आणि यांचे सगळे देव वेगळे आहेत. त्यामुळे शिंदे अस्पृश्यांना इतर हिंदूंसारखे ‘हिंदू’ मानत नाहीत. ते हिंदू नाहीत, अशा धारणेतून शिंदे मीमांसा करतात.
म्हणून ते म्हणतात की, पूर्वास्पृश्य हिंदू नसल्यामुळे अस्पृश्यांचा उद्वार ही संकल्पना मला मान्य नाही. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, हिंदू असणं आणि अस्पृश्यांचा उद्धार, जे हिंदू आहेत आणि ज्यांना अस्पृश्यता मान्य नाही, ते त्यांच्या उद्धाराची भूमिका घेऊ शकतात; पण ‘जे हिंदूच नाहीत, पण हिंदूधर्मीय आहेत’ असं समजून हिंदू धर्मानं ज्यांचा छळ केलेला आहे, त्यांना तळामध्ये डांबून ठेवलं आहे, त्यांची सुटका करायची झाली, तर हा प्रश्न उद्धाराचा नसून मानवी हक्काचा आणि न्यायाचा आहे, ही शिंद्यांची मांडणी.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गांधी याच मांडणीकडे येतात, पण वेगळ्या भूमिकेतून येतात. म्हणून शिंदे अस्पृश्यतेचं मूळ समाजशास्त्रीय अंगानं शोधतात. एका बाजूला ग्रामसंस्थेला फुटलेली अस्पृश्यतेची नांगी असेल, भागवतधर्माच्या विवेचनातून १२व्या शतकानंतर जी काही धर्मांतरं घडली, त्याचा दाखला देऊन शिंदे पुढे असंही म्हणतात की, धर्मांतरित बौद्ध मोठ्या संख्येनं बौद्धांतले बहुजन होते. बौद्धांतले जे ब्राह्मण होते, त्यांना हिंदूंनी आपलंसं केलं आणि जे ब्राह्मण नव्हते, ते पुढे अस्पृश्यांमध्ये रूपांतरित झाले.
मराठा समाज आणि अस्पृश्य यांच्याबद्दलसुद्धा एक मीमांसा शिंद्यांनी मांडली आहे. अस्पृश्य पूर्वाश्रमीचे राज्यकर्ते होते आणि त्यांना हे अवनत स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ही गोष्ट कुठेतरी आंबेडकरांच्या भूमिकेशीसुद्धा मेळ खाणारी आहे. ही शिंद्यांची अस्पृश्यतेकडे पाहण्याची दृष्टी आहे. म्हणून ते असं म्हणतात की, सामाजिक न्याय आणि मानवी हक्क या भूमिकेतून अस्पृश्यतेचं निवारण ही माझी भूमिका आहे. त्याच्यासाठी माणसांच्या मनामधल्या श्रद्धा आणि जळमटं, नाहीशी व्हायला पाहिजेत. म्हणून शिंद्यांचे उपक्रम पूर्वास्पृश्य वर्गाला जागे करण्याचे आहेत. त्यासाठी शाळा असतील, रविवारच्या उद्योगशाळा असतील, ‘डिप्रेस्ड क्लासेस’सारखी संस्था असेल, अशा निरनिराळ्या संस्था शिंद्यांनी उभ्या केल्या आणि या सगळ्या कामाला त्यांनी एक संस्थात्मक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला.
गांधींनीपण अस्पृश्यता निर्मूलनाच्या कामाला संस्थात्मक अधिष्ठान दिलं. १९३४ साली त्यांनी ‘मी एक वर्ष अस्पृश्यता निवारणासाठी देणार आहे’ असं जाहीर केलं आणि जवळपास सर्व भारतभर त्यांनी प्रवास केला. त्यातून जो निधी गोळा झाला, त्याचा उपयोग अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिक्षणसंस्था, बोडिंग शाळा, साक्षरतेचे वर्ग, शिष्यवृत्ती या अंगानं त्याचा उपयोग झालेला दिसतो.
यातूनच ‘हरिजन सेवक संघा’ची स्थापना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अगदी सुरुवातीला या संघात होते. मतभेदामुळे ते नंतर बाजूला झाले. म्हणजे संस्थात्मक कार्याच्या उभयतांच्या साम्याचा मुद्दाही सांगता येईल. पण अस्पृश्य हिंदू आहेत की नाहीत, या वादात गांधी गेलेले नाहीत. ज्या पद्धतीनं शिंद्यांची मीमांसा आहे, तशी मीमांसा गांधींनी केलेली नाही. गांधींनी त्यांना हिंदू धर्माचा भागच मानलं.
दोघांमधील एक साम्य असं आहे की, दोघांनीही धर्माचा अर्थ लावण्याची भूमिका त्या-त्या धर्मातील व्यक्तीकडे आहे, अशी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे, जो धर्माचा अनुयायी आहे, त्याला धर्माचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे, ही भूमिका शिद्यांची आणि गांधींची आहे. पण गांधींच्या भूमिकेत दुसरं वेगळेपण आहे. ते असं मानतात की, मी धर्माची प्रेरणा म्हणजे ‘स्पिरीट ऑफ द रिलिजन’ आणि धर्मग्रंथ म्हणजे ‘टेक्स्ट ऑफ द रिलिजन’ या दोन गोष्टी वेगळ्या पाहतो. का तर, सगळे धर्म ईश्वराने निर्माण केलेत, हे त्यांना मान्य आहे; पण धर्मग्रंथ ईश्वराने निर्माण केलेले नाहीत. माणूस अपूर्ण आहे. अपूर्ण माणसाने लिहिलेले धर्मग्रंथ पूर्ण असणारच नाहीत. त्यामुळे ते पूर्ण करून ईश्वराच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी आपल्याला सतत त्या धर्मग्रंथामधला नको तो भाग काढून टाकायला पाहिजे आणि तो काढताना कसोटी कोणती लावायची तर बुद्धी, काळ आणि अनुभव या तीन कसोट्या गांधींनी सांगितल्या आहेत.
या तीन कसोट्यांवर जे टिकेल, ते धर्मग्रंथात टिकेल, जे नाही टिकणार ते नाही. त्यामुळे ‘स्पिरिट ऑफ द रिलिजन’ वेगळं आणि ‘टेक्स्ट ऑफ द रिलिजन’ वेगळं या भूमिकेत गांधींच्या समाजसुधारणेची बीजं आपल्याला पाहता येतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
शिंद्यांनी या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलेलं नाही. त्यांनी समाजशास्त्रीय अंगानं पाहिलं आणि म्हणून जितक्या प्रमाणामध्ये धर्मग्रंथांना आपण मानवी मानू, तितक्या प्रमाणात त्यांच्या शुद्धीकरणाची गरज गांधींना सतत दिसते. जेवढं शुद्धीकरण काळ, बुद्धी आणि अनुभवाच्या कसोटीवर टिकेल, तेवढं आपण जर करत गेलो, तर आपण खऱ्या ईश्वराच्या धर्माच्या जवळ जाऊ, अशी गांधींची धारणा आहे.
गांधींनी मोक्षाची कल्पना केलेली आहे- शुद्धी, मोक्ष अस्पृश्यतेच्या संदर्भात असेल, सत्याग्रहाच्या संदर्भात असेल, तो काही फारसा ‘रेलेव्हंट’ भाग शिंद्यांच्या लेखनात दिसत नाही. त्यांचं लक्ष आणखी काही प्रश्नांकडे आहे.
शिंदे हा अस्पृश्यतेचा प्रश्न राष्ट्रीय राजकारणाच्या व्यासपीठावर नेऊ पाहतात आणि त्यांनी तो नेला. १९१७मध्ये अॅनी बेझंटच्या काळात त्यांनी तो ठराव मंजूर करवून घेतला. टिळकांनी सही नाकारल्यावर, त्यांना मानपत्र देण्याची जी महापालिकेची योजना होती, त्या पत्रकावर त्यांनी सही केली नाही. त्यांनी निषेध केला की, टिळकांना मानपत्र देऊ नका. इथपर्यंत शिंदे सक्रियतेच्या अंगानं पुढे गेलेले दिसतात.
त्यांनी टिळकांचा स्वातंत्र्यलढ्याचा धागा मात्र सोडला नाही; पण इथं त्यांनी टिळकांच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते. गांधी या प्रकारच्या ‘पॉलिटिक्स’मध्ये पडले नाहीत. मला काय करायचं आहे आणि मी काय करतो, याचं गांधींच्या दृष्टीनं अधिक महत्त्व होतं. शिंद्यांनी प्रश्न राष्ट्रीय व्यासपीठावर नेला, हे त्यांचं श्रेय आहेच; पण प्रश्न नुसता नेला नाही, तर पुढे गांधींना त्यांच्या कार्यक्रमात त्याची दखल घ्यावी लागली. हेही श्रेय शिंदे यांचंच. त्यामुळे काँग्रेसच्या एकूण अजेंड्यामध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न राष्ट्रीय अजेंड्यात जाऊन बसला. इथपर्यंत राष्ट्रीय चळवळीवर दबाव आणण्याचं काम शिंद्यांनी केलं होतं.
पण अस्पृश्यतेच्या प्रश्नावर भारतीय राजकारणामध्ये काही त्रिकोण आहेत. एका बाजूला गांधी आहेत, त्यात एका बाजूला शिंदे आहेत आणि एका बाजूला आंबेडकर आहेत. राष्ट्रीय राजकारणातले जे त्रिकोण आहेत, त्यात एका बाजूला गांधी आहेत, एका बाजूला सावरकर आहेत, एका बाजूला जीना आहेत. यांच्याशिवायचा जो त्रिकोण आहे, तो राष्ट्रीय चळवळीच्या पूर्णपणे विरोधात वावरलेला आहे. त्या त्रिकोणात जीना व सावरकर आहेत आणि काही अंशी सोयीचं राजकारण करून राष्ट्रीय चळवळीवरचा दबाव वाढवण्यासाठी आंबेडकरही दिसतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हा जो त्रिकोण आहे; गांधी-शिंदे-आंबेडकर यांच्यामध्ये गांधी-आंबेडकरांमध्ये तर द्वंद्व पाहिलं गेलंच, पण शिंदे आणि आंबेडकरांमध्येही द्वंद्व पाहिलं गेलं. अनुयायांनी हे द्वंद्व पाहिलं; पण अनुयायांनी कोणत्याही भूमिकेची नीट चिकित्सा केली नाही. हे कशामुळे झालं असेल? आंबेडकर आणि शिंदे यांच्यात दुरावा कशामुळे आला असेल? ‘साऊथ ब्युरो कमिशन’च्या साक्षीमध्ये जशी आंबेडकरांनी भूमिका घेतली, तशी शिंद्यांनीही भूमिका घेतलेली दिसेल- द्या त्यांना मतदारसंघ. १९३२चा ‘येरवडा करार’ होण्याच्या प्रक्रियेत गांधींच्या बाजूने शिंदे होते. ही बाबही बाबासाहेबांनी नजरेआड केली नसणार, असं वाटतं. जरी करार झाला, तरी गांधी-आंबेडकर यांची अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होतीच. १९३२च्या कराराला शिंद्यांनी पाठिंबा दिला, उपोषण सुरू झाल्यानंतर ते पाठिंब्यासाठी हजर होते. अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी उत्पन्नाचा निकष लावावा की लावू नये, तसंच निवडणुकीऐवजी को-ऑप्शन असावे, अशा मुद्द्यांवरून शिंद्यांनी प्रतिनिधित्वाला विरोध केला, असं कागदोपत्री दिसत नाही.
पण मग हे द्वंद्व कशातून निर्माण झालं, हे न कळणारं कोडं आहे. त्याचा परिणाम म्हणून शेवटी शिंद्यांचं नाव अस्पृश्यतेच्या कार्यातून हळूहळू बाजूला झालं. शिंद्यांचा आणि आमचा संबंध नाही, अशी भूमिका घेऊन आंबेडकर हे भारतातील दलितांचे एकमेव नेते आहेत, ही गोष्ट पुढे आणली गेली. आंबेडकरांनासुद्धा दलित प्रश्नाचं राजकारण करायचं होतं; पण शिंदे ज्या राष्ट्रीय चौकटीच्या राजकारणामध्ये हा प्रश्न नेऊ इच्छित होते, त्यामध्ये आंबेडकर हा प्रश्न नेऊ इच्छित नव्हते. ते दबाव वाढवणं, ब्रिटिशांकडून काहीतरी पदरात पाडून घेणं, या अंगानं दलित चळवळीचा विचार करत होते. दलितांचं राजकारण नावाची वेगळी गोष्ट करून राष्ट्रीय राजकारणाला प्रसंगी शह देणं, प्रसंगी मात करणं, प्रसंगी तडजोड करून पदरात पाडून घेणं, हे आंबेडकरांच्या राजकारणाचं सूत्र होतं. १९३२चा ‘येरवडा करार’ होईपर्यंत व नंतरही संविधान निर्माण होईपर्यंत बाबासाहेबांची हीच भूमिका दिसते.
गांधी अस्पृश्यांच्या राखीव जागांना विरोध करत नाहीत; पण त्या हिंदू म्हणून मिळाल्या पाहिजेत, यावर त्यांचा भर आहे. म्हणजे, शिंदे ‘ते हिंदू नाहीत’ असं म्हणतात; तर गांधी ते हिंदू असल्यामुळे, अस्पृश्यता हे हिंदूंचं पाप असल्याने अस्पृश्यतेचं निर्मूलन करणं, ही त्यांची जबाबदारी आहे, म्हणून सवर्ण हिंदूंच्या विवेकाला सतत टोचणी लावण्याचं काम करतात.
त्यामुळे गांधींच्या विरोधात सवर्ण वर्गातील लोक येणं स्वाभाविक आहे. शिंद्यांच्या विरोधात त्यांच्या जातीचे लोक येणं स्वाभाविक आहे. कारण पुढे जे ब्राह्मणेतर राजकारण घडलं, त्या ब्राह्मणेतर राजकारणातील जो ‘डॉमिनंट क्लास’ आहे, तो वरिष्ठ आहे, वतनदारी वर्ग आहे आणि त्याला दलित वर्गातील लोकांबद्दल फारशी आस्था नाही. त्यामुळे शिंद्यांना जातीचा विरोध सहन करावा लागला; पण गांधींना सगळ्या सवर्ण समुदायांचा विरोध सहन करावा लागला.
गांधीवर झालेल्या हल्ल्याचे जे ‘रेकॉर्ड’ आपण पाहतो, त्याच्यामध्येही याची कल्पना येते. देवळं मुक्त होणं ही गांधींसाठी मोहीम होती, वायकोमसारखा सत्याग्रह करणं किंवा काही ठिकाणी सत्याग्रहाला पाठिंबा देणं, हे शिंद्यांनीदेखील केलेलं काम आहे, हे साम्य मर्यादित आहे.
पण मुख्यतः अस्पृश्य हिंदू असल्यामुळे त्यांना हव्या तेवढ्या जागा द्या; पण हिंदू समाजापासून त्यांना तोडू नका, अशी गांधींची भूमिका आहे. त्या भूमिकेला शिंद्यांनी ‘स्ट्रॅटेजी’ म्हणून पाठिंबा दिला की, मनापासून दिला, याबद्दल मी वाद घालणार नाही. कारण गांधींच्या उपोषणाच्या वेळी पाठिंब्यासाठी शिंदे तिथं हजर होते. आणि बाबासाहेबांनी १९३२च्या करारावर सह्या झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळीच मुंबईमध्ये घेतलेल्या सभेत गांधींचं जे कौतुक केलेलं आहे - ‘गांधींमुळे मी याच्यातून बाहेर आलो, गांधींनी मला या सगळ्या तणावातून सोडवलं’ वगैरे जी स्तुतिसुमनं बाबासाहेबांनी वाहिलेली आहेत, ती पुढच्या काही काळानंतर गायब होताना दिसतात.
या सगळ्याचं कारण ‘पुणे करारा’च्या राजकारणावर फोडलं गेलेलं दिसतं आणि पुढे जे दलित राजकारण झालं, विशेषतः कांशीरामाच्या काळात, त्याच्यामध्ये तर याच्यावर शिक्कामोर्तब करून हा करार जाळून टाकण्याच्या लायकीचा आहे, इथपर्यंत अनुयायी पुढे गेलेले दिसतात.
एकंदरच राजकारणाच्या धकाधकीत आंबेडकरपूर्व कालातील अस्पृश्यता निर्मूलन कार्यातील शिंद्यांचं नाव व श्रेय बाजूला केलं गेलं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
बाबासाहेब अखिल भारतीय दलितांचे नेते होते. त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं; पण प्रत्यक्ष निवडणुकीचा आखाडा जो आहे, त्यात मुंबई प्रांतात जे यश १९३७ साली मिळालं, तेवढं उत्तरेकडे मिळालेलं नाही. उत्तरेकडच्या सगळ्या दलितांमध्ये गांधींविषयी आदरही आहे आणि गांधींच्या पाठिंब्यानं काँग्रेस उमेदवारांचा विजयही झालेला आहे. त्यामुळे हा करार होऊनही जर आपलं नेतृत्व प्रस्थापित होत नसेल, तर या करारात गफलत आहे की काय, अशा प्रकारची एक समजूत झाली असण्याची शक्यता आहे, असं मला वाटतं.
म्हणून ‘गांधी-आंबेडकर विसंवाद’ आणि ‘शिंदे-आंबेडकर विसंवाद’ या दोन्ही विसंवादांमध्ये दोन्हीकडच्या अनुयायांनी संकुचित भूमिका घेतल्याचं दिसतं. शिंद्यांना फारसे अनुयायीच नव्हते. त्यामुळे ते सुदैवी आहेत. कुठल्या अर्थानं, तर अनुयायांनी पराभव केलेला नेता, असं काही त्यांचं स्वरूप झालं नाही. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी गांधींनाही आपलं मानलं नाही, शिंद्यांनाही आपलं मानलं नाही. म्हणून मग आंबेडकर याच प्रतिमेभोवती सगळं राजकारण केंद्रित झालं. त्याला जो विरोध करेल, तो आपला नाही, या प्रकारच्या भूमिका प्रस्थापित झालेल्या दिसतात. त्यामुळे अस्पृश्यता जावी की जाऊ नये, हा मुद्दाच नव्हता. ती कशी जावी, हाही फारसा वादाचा मुद्दा नव्हता; पण अस्पृश्यतेचं जे राजकारण आहे, त्याची चौकट काय असावी, इथं शिंद्यांची विशिष्ट भूमिका होती आणि गांधींची विशिष्ट भूमिका होती. आणि तिसऱ्या बाजूला आंबेडकरांची विशिष्ट भूमिका होती.
राष्ट्रीय राजकारणाच्या चौकटीमध्ये जेव्हा अस्पृश्यतेचा प्रश्न बसवायची पाळी आली, तेव्हा इतर प्रश्नांबरोबरच एक प्रश्न असं त्याचं स्वरूप झालं आणि अस्पृश्यतेच्या मुद्द्याला अधिकाधिक प्राधान्य मिळालं पाहिजे, अशी भूमिका शिंदे सतत मांडत राहिले.
गांधींना हा प्रश्न विचारला गेला होता की, तुम्ही अजेंड्यावर ‘अस्पृश्यता निर्मूलन’ आणलं हे ठीक आहे, तुम्ही काँग्रेसच्या सभासदत्वाची चरखा चालवणं ही मूलभूत अट केली आहे. तेपण ठीक आहे; पण अस्पृश्यतेचं मी पालन करणार नाही, ही तुम्ही अट का ठेवत नाही? गांधींनी त्याला सरळ उत्तर दिलं होतं की, हे काळाच्या आजच्या टप्प्यावर शक्य आहे, असं मला वाटत नाही.
शिंद्यांनाही वाटत होतं की, काँग्रेसने अधिकाधिक खाली जाऊन अस्पृश्यता निर्मूलनाची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती; पण काँग्रेसचे खालच्या पातळीवर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, जिल्हा, तालुका, राज्य पातळीवरचे त्यांच्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची तळमळ दिसत नाही. त्यामुळे गांधींचं हे ‘फॅड’ आहे, अशी धारणा होऊ शकते. ही तळमळ नसल्यामुळे अस्पृश्यांचा प्रश्न जोरकसपणे मांडण्याला एक मर्यादाही आहे. त्यात एक धोकाही होता- ब्रिटिश राज्यकर्त्यांना तुमच्या मधल्या फुटी बळकट करायला मदत होईल. म्हणून ब्रिटिशांची मदत न घेता राष्ट्रीय राजकारणामधून अस्पृश्यतेचा प्रश्न कसा सोडवायचा, याचं सतत चिंतन शिंद्यांच्या विचारामध्ये दिसतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गांधीच्या विचारामध्ये कुणी काही म्हणो; ते हिंदू असल्यामुळे त्या पद्धतीनं राजकारण गेलं पाहिजे आणि हिंदू समाजात फाटाफूट होता कामा नये. आंबेडकरांना जर ग्रामीण भारत कळलेला असेल, तर ते स्वतंत्र मतदार संघ मागणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका कुठेतरी गांधींच्या मनात होती. याचा अर्थ काय? गांधींनी त्याचा अर्थ असा लावलेला दिसतो किंवा त्यांच्या लेखनातून मला सुचतो तो हा की, ग्रामीण भागामध्ये असणारा अस्पृश्य समाज आणि सवर्ण हिंदू यांचे जे संबंध आहेत, त्या संबंधांमध्ये एकदा हा समाज हिंदू नाही, आपला नाही म्हटल्यानंतर आधीच चालू असलेले अत्याचार अधिक अनन्वित पद्धतीनं होतील. आपले नाहीत म्हटल्यावर त्यांची नाडवणूक पदोपदी होईल आणि हा सगळा समाज अलग पडेल आणि त्याला वाली उरणार नाही.
हे चित्र गांधींच्या मनामध्ये जास्त भयावह पद्धतीनं उभं राहिलेलं दिसतं आणि म्हणून गांधी प्रतिनिधित्वाबाबत कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. ते यासाठी झाले की, मला शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये ही फूट नको आहे, कारण तिथंच खरी अस्पृश्य आणि सवर्णांच्या संघर्षाची केंद्रं आहेत. शहरात हा संघर्ष त्या अर्थानं ज्याला आपण ‘कृतक’ म्हणू अशा अर्थाचा आहे- प्रासंगिक असतील, पुन्हा थांबतील; पण ग्रामीण भागामध्ये जर हे संघर्ष सुरू झाले व त्याला कायमचं स्थान मिळालं, तर अस्पृश्यांचे हाल अत्यंत वाईट होतील, ही गांधींना वाटणारी भीती होती. म्हणून ते हिंदू समाजाचा भाग असणं गांधींसाठी महत्त्वाचं होतं.
दुसरं, समाजशास्त्रीय पद्धतीनं जसा शिंदे विचार करत होते, तसा धर्माचा अर्थ लावण्याची भूमिका गांधींनी घेतली; पण त्यांनी शिद्यांच्या पद्धतीची चिकित्सा न करता धर्मशास्त्राची चिकित्सा धर्मशास्त्रातील तज्ज्ञांकडून करून घेण्याचा प्रयत्न केला. ‘येरवडा करार’ झाल्यानंतर येरवडा जेलमध्ये लगेचच ८-१५ दिवसांत गांधींनी वाईच्या केवलानंद सरस्वती यांना निरोप पाठवला की, ‘मला तुमच्याशी धर्मशास्त्राबद्दलची चर्चा करायची आहे. तुम्ही येरवडा तुरुंगामध्ये या.’ केवलानंद तिथं गेले. आपल्याबरोबर ते एक तरुण विद्वान घेऊन गेले. तो विद्वान म्हणजे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. ते त्या काळात केवलानंदांचे शिष्य होते आणि प्राज्ञपाठशाळेचे विद्यार्थीपण.
गांधींनी चर्चा उपस्थित केली की, हिंदू धर्मशास्त्रामध्ये अस्पृश्यतेला थारा आहे का? किंवा तिचं समर्थन आहे का? लक्ष्मणशास्त्रींनी विस्तारानं भूमिका मांडली. त्यांनी गांधींना असं सांगितलं की, हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यतेला थारा नाही. धर्मरहस्यकार दप्तरींना काही शंका होत्या, त्या शंकांचं निरसन फक्त केवलानंदांनी केलं. नंतर ‘हिंदू धर्मशास्त्रामध्ये अस्पृश्यतेला स्थान नाही’ या प्रकारचं एक पत्रक तयार केलं गेलं. त्याच्यावर केवलानंद, गांधी आणि इतर ९ विद्वानांच्या सह्या आहेत. ते पत्रक प्रसिद्धीला देण्यात आलं.
जे धर्मातील विद्वान आहेत, ते धर्मशास्त्राचा अर्थ कसा लावतात, कारण सामान्य माणसासाठी धर्म महत्त्वाचा असेल, धर्मशास्त्र महत्त्वाचं असेल, तर त्यांच्या मुखातून अशी चिकित्सा आणणं, हे गांधींना महत्त्वाचं वाटत होतं.
शिंद्यांनी या प्रकारचे प्रयत्न केले नाहीत. ते स्वतःच समाजशास्त्रज्ञ असल्यामुळे त्याची मीमांसा त्यांना स्पष्ट होती. गांधींनी नंतर एक विधान केलेलं आपल्याला दिसतं, यात जर कुणी असं म्हणत असेल की, धर्मशास्त्रात तरीदेखील अस्पृश्यतेला स्थान आहे; तर मग माझ्या लेखी धर्मशास्त्राला किंमत नाही. मी त्याच्यावर पाय ठेवून पुढे जाईन. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अस्पृश्यता मला मान्यच नाही, धर्मशास्त्राने मान्य करो अथवा न करो, पण सामान्य माणसासाठी धर्मशास्त्र महत्त्वाचं असेल, तर तो एक प्रयत्न मी करून बघणार… आणि गांधींनी तो प्रयत्न करून बघितला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
अस्पृश्यतेच्या संदर्भातील गांधींचा दुसरा प्रयत्न असा की, सवर्णांना जी कर्मं प्राप्त झालेली आहेत, त्यांपासून त्यांनी बाजूला येणं आणि त्यांनी खालची कामं स्वीकारणं. अप्पासाहेब पटवर्धनांचं उदाहरण आपणास माहिती आहे. त्यांना अटक झाल्यानंतर तुरुंगात त्यांनी जाणीवपूर्वक असं सांगितलं की, मला भंगीकाम द्या. जो ब्रिटिश माणूस जेलचा तुरुंगाधिकारी होता, त्याला माहीत होतं पटवर्धन ब्राह्मण आहेत. ब्राह्मणांना आम्ही भंगीकाम देणार नाही, ही भूमिका त्याने घेतली. पटवर्धन उपवास करीन म्हणाले. नंतर मग शेवटी ते काम त्यांना द्यावं लागलं. म्हणजे, एका बाजूनं आपली जात आणि आपला धर्म विशेषतः जात, यापासून तुम्ही ‘डी-कास्ट’ होण्याची भूमिका घेणं, हे गांधीच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
सुटाबुटातील बॅरिस्टर पंचावर भारतात आला, हा जो सगळा परिवर्तनाचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये ‘डी- कास्ट’ होणं, स्वतःचं राहणीमान अधिकाधिक त्यांना अनुकूल करत जाणं, गरजा कमी करत जाणं, हे गांधींमध्ये दिसतं. शिंद्यांकडे त्यांनी स्वीकारलेलं स्वेच्छा-दारिद्र्य आहे. त्यांनीही अस्पृश्यवस्तीत सहकुटुंब राहण्याची भूमिका घेऊन ‘डी-कास्ट’ होण्याच्या प्रक्रियेचा आरंभ केला होता.
गांधींनी हेच स्वीकारलेलं आहे; पण त्यांचा तो एक वेगळा प्रवास आहे. शिंद्यांनी स्वेच्छा-दारिद्र्यसुद्धा याच ध्येयवादी भूमिकेतून स्वीकारलेलं आहे. म्हणून पुढे आपल्याला दिसतं की, गांधींचे अनेक अनुयायी आहेत. विनोबा वर्ध्यामध्ये अस्पृश्य वस्तीत राहायला गेले. नुसते राहायला गेले नाहीत, तर मला तुमची कौशल्ये शिकवा, म्हणून विनोबा स्वतः मेलेली गुरं फाडायला शिकले आणि त्याच्यातून जवळपास १००- १५० तरुण मंडळी विनोबांनी गुरं फाडणारी तयार केली. विजय दिवाण म्हणून सर्वोदयी कार्यकर्त आहेत ते तर स्वतः गुरं उत्तम फाडतात. त्यांचे वडील विनोबांचे शिष्य होते. त्यांनाही हे काम येत होतं. असे अनेक तरुण त्यांनी त्या काळात उभे केले.
म्हणजे, अस्पृश्यता खऱ्या अर्थानं मोडायची असेल, तर वरच्या वर्णांना प्राप्त झालेली जी कामं व उच्चाधिकार आहेत, ते तुम्ही सोडणार आहात की नाही आणि ते सोडणं हे अस्पृश्यता घालवण्याच्या मार्गातील एक महत्त्वाचं पाऊल आहे, अशी गांधींची धारणा दिसते. त्यामुळे दोघांच्या अस्पृश्यताविषयक कार्यामध्ये मतभेद जवळपास कमी आहेत. समाजशास्त्रीय पद्धतीनं मीमांसा करणं आणि दुसऱ्या पद्धतीनं मीमांसा करणं हा भेद आहे; पण दोघांमध्ये अस्पृश्य समाजाच्या हिताबद्दल, मानवी हक्कांबद्दल, न्यायावद्दल एक विलक्षण सुसंगती आपल्याला दिसते. दोघांनाही सुदृढ नागरी समाजाची निर्मिती हवी होती, ज्याचा पाया सामाजिक न्याय व मानवी हक्कांचा आदर हा होता.
म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की, हे दोघं जण समकाल पूर्णतः एकाच कालखंडात जगले, याचा अर्थ काय असू शकतो, तर समकालातील संवेदना जर समान असतील, तर त्यांचे निष्कर्ष या प्रकारे समान दाखवता येतात.
‘नवभारत’ या त्रैमासिकाच्या एप्रिल-मे-जून २०२२च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment