कणाहीन सहकाऱ्यांच्या गोतावळ्यात झळकण्यात कुणाला आनंद असला, तर तो ‘महा-मोदी-विकार’च नव्हे काय?
पडघम - देशकारण
विनय हर्डीकर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Mon , 06 March 2023
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP पं. नेहरू Nehru इंदिरा गांधी Indira Gandhi अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee राहुल गांधी Rahul Gandhi भारत जोडो Bharat Jodo

“ढोंग, बडेजाव आणि ताठा, राग आणि निष्ठुरपणा, अविवेक, - हे गुण असतात, हे कुंतीपुत्रा, असुरांची प्रवृत्ती घेऊन आलेल्यांचे.” – ‘भगवद्गीता’, १६:४

“आज मी हे मिळवलं, (उद्या) हे मनोराज्य आटोक्यात आणीन, हे (तर हातात) आहेच, पण आणखी हेसुद्धा द्रव्य कमावीन.” – ‘भगवद्गीता’, १६:१३

“हा शत्रू मी ठार मारला, इतरांनाही ठार मारीन. मी सर्वसमर्थ आहे, मी चैन करीन, मी परिपूर्ण आहे, बलवान् आहे, सुखसंपन्न आहे.”  - ‘भगवद्गीता’, १६:१४

“...माझ्या बरोबरीचा दुसरा आहे कोण?...” – ‘भगवद्गीता’, १६:१५

मागच्या आठवड्यातल्या नमोंच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमधल्या त्वेषपूर्ण भाषणांच्या बातम्या आल्या, आणि वर उदधृत केलेल्या ‘भगवद्गीते’तल्या ‘आसुरी संपदे’ची आठवण झाली. नमो आणि त्यांची टोळी यांवर इतर कुठल्याच धर्मग्रंथाचा परिणाम व्हायची शक्यता नाही, म्हणून त्यांच्यासाठी आणि १४२ कोटींमधले जे कोणी निःसंदिग्धपणे आपल्या पाठीशी उभे आहेत, असं त्यांना वाटतं, त्यांच्यासाठी ही वरची उद्धरणं आहेत.

नमोंच्या वाणीतला हा त्वेष आजचा नाही. २०१४मध्ये निव्वळ परिस्थितीमुळे ते देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदावर स्थानापन्न झाल्यापासून हे असंच चालू आहे. ‘मौनी बाबा’ मनमोहन यांच्यानंतर नमोंची ही शैली हा स्वागतार्ह बदल वाटला होता, तेव्हा. भारतीयांना तीन प्रकारच्या पंतप्रधानांची सवय आहे - उत्कृष्ट वाक्पटू (नेहरू, वाजपेयी, चंद्रशेखर), वक्ते (इंदिरा, नरसिंह राव, विश्वनाथ प्रताप सिंग), आणि सौम्य भाषणं करणारे (लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन).

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

पंतप्रधानांनी उन्मत्त होऊन स्वतःबद्दलच इतकं बोलावं, अशी स्वतंत्र भारताच्या संसदेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असावी. नेहरू आणि वाजपेयी यांची भाषणं भावनेत तुडूंब बुडली, तरी त्यांची वैखरी स्वतःबद्दल बोलती होत नसे. त्यांची भावना आणि आवाहकता संपूर्ण सभागृहाला स्पर्श करत असे, आणि सर्वपक्षीय सांसदांमार्फत जनसामान्यांपर्यंत पोचवली जात असे. या दोघांवर आत्मप्रौढी किंवा आत्मरतीचा आरोपही होणं शक्य नव्हतं. इंदिरा गांधींनी कल्पित भयगंडातून भारतीयांना हे पुढचं आवाहन केलं होतं, पण ते संसदेच्या बाहेर – “विरोधी पक्ष म्हणतात- ‘इंदिरा हटाव’; इंदिरा म्हणते- ‘गरिबी हटाव’; आता आपणच ठरवा कुणाला हटवायचं ते.”

संसदेत त्या क्वचितच तळपल्या, आणि तरीही संसदेचा वापर त्यांनी कधी आपली स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी केला नाही. संसद या संस्थेचा दिमाख, प्रतिष्ठा आणि गांभीर्य यांना गालबोट लागेल, असं त्या कधी संसदेत वागल्या नाहीत. हे श्रेय त्यांना द्यावंच लागेल. “त्यांचे स्तुतिपाठक चमचे पुष्कळ होते, म्हणून त्यांना असलं काही करावं लागलं नाही”, असं त्यांच्या विरोधकांनी आणि अपकर्षकांनी जरूर म्हणावं. वस्तुस्थिती तरीही हीच राहते की, त्यांनी संसदेत आत्मप्रौढी मिरवली नाही.

आता काही उदाहरणं नमोंच्या कर्कश निंदाव्यंजक शैलीची :

“...संपूर्ण देश बघतोय की, एक माणूस किती जणांना पुरून उरलाय...”

“...हे लोक घोषणा पण आळीपाळीनं देतायत, पण मी भक्कम आहे...”

“...विरोधी पक्ष एकत्र जरी आले, तरी मी त्यांना पुरून उरेन…”

“... अपप्रचार आणि थापा यांमुळेसुद्धा १४२ कोटी भारतीयांची ढाल भंगणार नाही…”

या वृत्तीला आणि वागण्या-बोलण्याला ‘महा-मोदी-विकार’ म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं?

पंतप्रधानच आपल्या प्रतिमेत एवढे अडकलेले असताना लोकशाहीबद्दल बोलणंच फिजूल आहे.

पंतप्रधानांचा पक्ष कुठलाही असला तरी तत्त्वतः ते संपूर्ण सभागृहाचे नेते असतात, आणि म्हणून त्यांनी विरोधी पक्षांना वैयक्तिक शत्रू असल्यासारखं वागवू नये, हाही मुद्दा इथे निरर्थक ठरतो. नेहरू आणि वाजपेयींनी सर्व पक्षांचा जो विश्वास मिळवला आणि जपला, तो प्रत्येकच पंतप्रधानांनी मिळवायला आणि जपायला हवा, ही अपेक्षाही इथे फोल आहे.

याहून वाईट म्हणजे विरोधी नेत्यांना - म्हणजे जे सध्या आपल्या वाट्याला आले आहेत त्यांना - एकीकडे WWF मल्लाप्रमाणे आव्हान देताना, दुसरीकडे नमोंनी संसदेतल्या आपल्याच मंत्रीमंडळाचा साधा उल्लेखही केला नाही, पर्वा करणं तर दूरच.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कुठलेही पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळाशिवाय काही साधू शकत नाही, हे वास्तव आहे. कणभर का होईना श्रेय द्यावं, असा एकही सहकारी नमोंना आपल्या मंत्रीमंडळात सापडला नाही? जर विरोधक त्यांचे शत्रू, तर सहकारी त्यांचे बलुतेदार, आश्रित आणि हुजरे आहेत, असं समजायचं का?

यांपैकी एकानंही असं अनुल्लेखानं मारलं गेल्याबद्दल साधी खंतही व्यक्त केल्याचं ऐकिवात नाही. लोकशाहीची विटंबना आणखी काय असू शकते? बलदंड बाहुबली पंतप्रधान असला तर त्यांच्या संघातल्या सहकाऱ्यांना नेहमीच दुय्यम-तिय्यम साथीदाराची भूमिका असते हे खरं, पण इथं तर यांना एक टिपरी वाजवायची पण मुभा नाही. अशा कणाहीन सहकाऱ्यांच्या गोतावळ्यात झळकण्यात कुणाला आनंद असला, तर तो ‘महा-मोदी-विकार’च नव्हे काय?

नमोंचा वारू हा असा स्वतःबद्दल चौखूर उधळलेला असताना सभागृहाचं कामकाज बघणं, ही पण एक छळणूक होती. स्वतःबद्दल वल्गना; सत्ताधारी बाकांच्या समर्थनाच्या आरोळ्या; विरोधी बाकांची हुल्लड; काही सांसद आखाड्यात उतरल्यासारखे सभापतींसमोरच्या मधल्या गोलात; अध्यक्षांचा धाक (?) नसल्यामुळेच उल्लेखनीय.

एखादा नवथर हिरवट राजकारणी खेड्याच्या आठवडी बाजारात भाषण ठोकतोय आणि आजूबाजूच्या लोकांची आपापली लगबग चालू आहे, असं ते चित्र होतं. फरक एवढाच की, इथली लगबग दोन्ही बाजूंकडून पूर्वनियोजित होती. मधेच नमोंनी विरोधकांना ‘देश तुमच्याकडे बघतो आहे’ म्हणून दटावलं -- पण तोच देश, तेच १४२ कोटी त्यांना स्वतःला पण बघत आहेत, हे लक्षात न घेता.

ही दुहेरी विटंबना (irony) आहे. जसं सगळे १४२ कोटी काही मतदान करत नाहीत आणि मतदान केलेल्यांपैकी सुमारे ३८ टक्क्यांनीच नमोंना मत दिलं, तसं सर्व १४२ कोटी काही संसदेचा हा कारभार बघत नव्हते आणि माझ्यासारखे नमो आणि विरोधक या दोहोंबद्दल सारखाच उद्वेग वाटलेले काही मोजकेच असावेत.

या ‘महा-मोदी-विकारा’ची गरज काय कोणास ठाऊक. रालोआ आणि भाजप यांच्याच हातात देशाचं सुकाणू आहे आणि काही चमत्कार झाला नाही, तर तेच २०२४मध्ये सत्तेत परत येणार आहेत. अलीकडच्या एका स्वतंत्र (?) सर्वेक्षणाचं भाकीत असं आहे की, भाजपच्या किरकोळ वीस-एक जागा कमी झाल्या (काँग्रेसचा लाभ?), तरी भाजपलाच २०२४मध्ये बहुमत मिळेल.

अलीकडे संपलेल्या राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेची फलश्रुती काय असेल ती असेल, विरोधकांकडे नेतृत्व, दृष्टी आणि दिशा या तिन्हींची एकूणात चणचणच दिसते आहे. आणि तरीसुद्धा भाजपच्या सर्व निवडणुकांसाठी - स्थानिक, राज्य, आणि देश पातळीवरच्या - नमोंच्या मोहिमा जोरात चालू आहेत.

खेळांप्रमाणेच राजकारणातही रडीचे पराभूत असतात. विरोधक आपल्या पराभवाचं खापर नमो आणि त्यांचे डाव यांवर फोडत आहेत. खर्गे आणखी पुढे जाऊन म्हणतात, “आरोप करण्याआधी राजकारण्यांनी त्या त्या प्रश्नाचा सर्वांगीण अभ्यास करावा, ही अपेक्षाच चुकीची आहे!” नाकर्त्यांच्या असल्या मुक्ताफळांबद्दल न बोललेलंच बरं.

दुसरीकडे नमो पण रडीचे विजेता झाले आहेत. जसं तगड्या कप्तानाच्या नेतृत्वाखालचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ करतात --उदा., मॅच जिंकायची खात्री असतानासुद्धा इयान चॅपेलचा संघ दुसऱ्या संघातल्या खेळाडूंना शिवीगाळ करतो, आणि स्मिथ-वॉर्नरचा संघ मालिका जिंकायची खात्री असूनही बॉलची गडबड करून आपल्याच देशाला लाज आणतो - तसं.

महाकवी भर्तृहरीचा सल्ला आहे की, विजयात-वैभवात क्षमाशीलता-औदार्य आणि पराभवात धैर्य-शौर्य असावं. हे पारंपरिक शहाणपण नमोंपर्यंत पोचवू शकेल, असं कोणी सध्या तरी दिसत नाही. हा ‘नमो-महा-विकार’ देशाला लोकशाहीच्या राजमार्गानं हुकूमशाहीकडे नेऊ शकतो, ही शक्यता मी यापूर्वी फार गंभीरपणानं विचारात घेतली नव्हती; नमोंच्या मुक्ताफळांमुळे आता मला खात्री पटली आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

विचार आणि आचार दोन्ही बाबतीत नमोंकडे सूचकता या गुणाचा अभावच आहे. पण अपवाद म्हणून सूचकता दाखवून ते आपल्याच मातृसंस्थेला - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला - काही संदेश देत आहेत का? निर्णयप्रक्रियेत लोकांचा थेट सहभाग असणाऱ्या आधुनिक लोकशाहीशी संघाला फारसं देणंघेणं कधीच नव्हतं. तरीही एक मा. स. गोळवलकर - जे जवळपास ३२ वर्ष सरसंघचालक होते - गेल्यानंतर व्यक्तिपूजेला संघानं कधीच उत्तेजन दिलं नाही हेही खरं.

अधूनमधून संघ नमो आणि भाजप यांच्यापेक्षा वेगळ्या भूमिका घेताना दिसतो - जरी त्या बोलण्यापुरत्याच असल्या तरी. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत २०१४मध्ये म्हणाले होते की, नमो हे मातृभूमीचे प्रधानसेवक आहेत (आणि कोणी नाही?). अलीकडे ‘देशापेक्षा अधिक मोठं कोणीच असू शकत नाही’ असंही ते म्हणाले आहेत. म्हणजे नमोंचं खरं लक्ष्य थकले-भागलेले दिशाहीन विरोधक, हे नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते आहेत का?

एके काळी ‘वयाच्या सत्तरीनंतर अधिकारपद नाही’ असा भाजपमधला रिवाज होता. नमोंच्या उदयानंतर हीच वयोमर्यादा ७५ झाली. ७५ची आता ८० होईल का? उदा., २०२६पर्यंत जेव्हा संघ १०१ वर्षांचा झालेला असेल? काळच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल.

आपल्याला खंबीर पंतप्रधान हवा, पण बलदंड बाहुबली नको. आपल्याला बहुमत मिळवू शकणार पक्ष हवा, पण बलदंड बाहुबलीच्या पेंढाऱ्यांची/गुलामांची टोळी नको. आपल्याला आपली लोकशाही बळकट हवी - तीही एकमेकांप्रती सौजन्य आणि एकमेकांच्या मतांबद्दल आणि मार्गांबद्दल आदर राखणारी अशी -- पण हंटरनं काबूत ठेवलेल्या लोकप्रतिनिधींच्या कळपांची नको.

गीतेतल्या आणखी एका उद्धरणानं शेवट करतो – “पाहावं तिकडे अपशकूनच दिसतात, केशवा!” – ‘भगवद्गीता’, १:३१

(लेखात वापरलेली भगवद्गीतेतली सर्व उद्धरणं - एके ठिकाणी अन्वर्थक बदल करून : ‘गीतार्थदर्शन’, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर, आनंदाश्रम संस्था, पुणे, १९९४)

.................................................................................................................................................................

‘साधना’ साप्ताहिकाच्या ४ मार्च २०२३च्या अंकातून साभार

हा मूळ इंग्रजी लेख ‘कर्तव्य साधना’ या पोर्टलवर १६ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा-

https://kartavyasadhana.in/view-article/Megalo-Modia-Indias-Critical-Blight-by-Vinay-Hardikar

मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद – मिहिर अर्जुनवाडकर

mihir.arjunwadkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......