अजूनकाही
प्रसिद्ध पर्यावरण-अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचं ‘निसर्गकल्लोळ’ हे नवं पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांनी बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम, अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम, अशा विविध समस्यांचा आढावा घेतला आहे. मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या... या निसर्गभान जागवणाऱ्या पुस्तकाला देऊळगावकरांनी लिहिलेलं हे मनोगत...
.................................................................................................................................................................
सध्या अरण्यांची बारमाही होळी चालू आहे. या शतकाच्या अखेरीस जगातील सदाहरित अरण्याच्या खुणासुद्धा शिल्लकच राहणार नाहीत, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आपण क्षणिक अस्वस्थ होऊन पुढच्या क्षणी तो विनाश विसरून जातो. पण अरण्यज्वाळांत जळणारे पक्षी व प्राणी पाहून पोरवयातील ग्रेटा विषण्ण होते. स्वीडन, फिनलंड, नॉर्वे यांसारख्या काही देशांमधील मुले हळहळून तो संहार मनाला लावून घेतात. ते वेगवेगळ्या पद्धतींनी व्यक्तही करतात. गप्पांच्या ओघात हे सगळे महेश एलकुंचवारसरांना सांगत होतो, तेव्हा त्यांनी अरुण कोलटकरांच्या ‘सर्पसत्र’ला भिडवले.
महाभारत काळी खांडववनाची राखरांगोळी करून इंद्रप्रस्थ नगरी वसवली गेली. ही कल्पना कोलटकरांच्या उरी घाव करून गेली. हे क्रौर्य उलगडून दाखवताना ते म्हणतात, ‘‘काही कारण नसताना अर्जुन व कृष्णाने हे अरण्यकांड का घडवून आणले असेल? हातात आलेल्या दिव्य शस्त्रांची ताकद अजमावून पाहण्यासाठी की, अनिर्वेधपणे राज्य करता यावे म्हणून, त्यांना मोकळे रान हवे होते? त्यासाठी चिटपाखरूसुद्धा शिल्लक ठेवले नाही.’’ त्यांनी वर्णिलेली खांडववनातील जीवसृष्टीची होरपळ आपल्याला व्याकूळ करून टाकते. प्राचीन काळातील ते सर्पसत्र तेव्हापासून आजतागायत अथक चालूच आहे. आजच्या निसर्गविनाशसत्राचे आदिबंध त्या सर्पसत्राशी कसे जोडले आहेत, याचे भान हे प्रतिभावंत कवी आपल्याला आणून देतात.
तहानेने व्याकूळ झालेल्या गाढवास कावडीतील गंगेचे पाणी पाजणारे एकनाथ, शिदोरीतील भाकरी घेऊन जाणाऱ्या भुकेल्या श्वानामागे तुपाची वाटी घेऊन धावणारे नामदेव आणि ‘सर्पसत्रा’ने घायाळ होणारे कोलटकर, ही ‘कळवळ्यांची जाती’ कशी घडत असेल? मग आपणच असे कोरडे पाषाण का आहोत? असे प्रश्न छळत होते. त्याची लाजही वाटत होती.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पं.कुमार गंधर्वांचे ‘ऋतुसंगीत’ ऐकताना हे निसर्गसौंदर्य आपल्याला दिसत नसल्याचा त्रास होतो. दुर्गाबाई भागवतांचे ‘ऋतुचक्र’ असेच न्यूनगंड निर्माण करते.
आता तर सगळे ऋतुरंगच बदलून जात आहेत. सध्याची परिस्थिती व्यक्त करण्यासाठी हवामान बदल, हवामान संकट, हवामान आणीबाणी या संज्ञा तोकड्या वाटाव्यात, असा हा ‘हवामानकल्लोळ’ चालू आहे. हवामान बदलाच्या आपत्तींमुळे कधीही भरून निघणार नाही, अशी आर्थिक हानी होत आहे. तसेच जैवविविधता व सांस्कृतिक वारसा यांचाही विनाश होत आहे.
पर्यावरणीय तत्त्वज्ञ पॉल शेफर्ड म्हणतात, “शहरीकरणाचा वेग वाढत गेल्यानंतर शहरवासियांची बाल्यावस्थेतच निसर्गापासून फारकत होत गेली. बालपणापासूनच आत्मकेंद्रितता वाढत, स्व-पलीकडील जग आकसत गेले. अस्सल व आतून येणारे निसर्गप्रेम आटत जाऊन निसर्गाविषयी दुरावा निर्माण होत गेला. त्यामुळे निसर्ग हा अडथळा वाटू लागला.”
मानवाचे निसर्गाशीच युद्ध हे अटळपणे स्वतःच्याच विरोधातील असताना, मानसशास्त्राने त्याची योग्य वेळी दखल घेतली नाही. डॉ. थिओडोर रोझॅक म्हणतात, “आधुनिक मानसशास्त्राने मन आणि निसर्ग यांचा एकत्र विचार न करण्याचा मोठा गुन्हा केला आहे. पर्यावरण व मानसशास्त्र यांना एकमेकांची गरज आहे.” त्यांनी फ्रॉईड यांचे अबोध मन व कार्ल गुस्ताव्ह युंग यांच्या सामूहिक अबोध मन या संकल्पनांचा विशाल विस्तार करून पर्यावरणीय अबोध मनाची (इकॉलॉजिकल अनकॉन्शस माईंड) महती सांगितली आहे.
आता, परिसंस्थामानसशास्त्र (इकोसायकॉलॉजी) पर्यावरणाचा माणसावर होणाऱ्या परिणामांचा विचार करत आहे. अनेक विद्वान ‘सध्या मानवजातीला मानसोपचार नव्हे, तर परिसरोपचाराची (इकोथेरपी) आवश्यकता आहे, बालकांच्या वाढीसाठी निसर्गसान्निध्याचे न जीवनसत्त्व गरजेचे आहे’, असे सांगत आहेत. युरोपीय देशांत मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी परिसरोपचार, निसर्गोपचार, अरण्यस्नान अशा उपचारांमध्ये निसर्गाचा सहवास वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
हवामान बदलामुळे मानवजातीचे व जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एकानंतर एक येत जाणाऱ्या आपत्ती जगातील तरुणांमध्ये सर्वाधिक ताण निर्माण करत आहेत. पुढच्या पिढ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. कित्येक तरुण पुढची पिढी जन्माला येऊ न देण्याचा निर्णय घेत आहेत. या विनाशपर्वाच्या चक्रव्यूहाचा अन्वय लावून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी विज्ञान तसेच कला शाखांचे वैज्ञानिक व कलावंत एकत्र येऊन विचार आणि प्रयत्न करत आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शेतीचा शोध लागल्यापासून आजपर्यंत (सुमारे १२,००० वर्षे) निसर्गात बदल घडवणाऱ्या काळाला ‘मानवनिर्मित युग’ (आंन्थ्रोपोसिन) म्हटले जाते. त्याच रितीने हवामान संकटाला हेदेखील मानवकेंद्री आहे, असे म्हणण्याचा प्रघात आहे. करोनामुळे लादलेल्या गृहबंदीकाळात जगातील कर्बउत्सर्जन हे केवळ ४ ते ७ टक्क्यांनी कमी होताच, शुद्ध हवा-पाणी व नयनमनोहर निसर्गाची झलक पाहण्याचा लाभ झाला होता. (आता त्याचा पूर्ण विसर पडला आहे.) २०३०पर्यंत कर्बउत्सर्जन ५० टक्क्यांनी कमी होऊ शकले तर... आणि ते २०५० पर्यंत शून्य झाले तर... कलाकलाने निसर्ग प्रसन्न होत जाईल. परंतु ते जवळजवळ अशक्य आहे. संपूर्ण जग हे धनाढ्य टोळीसत्तेच्या ताब्यात आहे. जगातील प्रदूषणाला व निसर्गविनाशाला मोजक्या कॉर्पोरेट कंपन्या जबाबदार आहेत, सर्वसामान्य माणूस नाही. ‘हवामान आणीबाणीला जबाबदार भांडवलशाहीकेंद्री रचना बदलणे अनिवार्य आहे’, असे तत्त्वज्ञ ब्रुनो लतॉर म्हणतात. त्यातून हवामान बदलामागील नेमकी कारणमीमांसा लक्षात येते.
थोडक्यात, जगावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जगात अनेक मूलभूत बदल घडवले जात आहेत. त्यात युरोपीय देशांनी आघाडी घेतली आहे. तिकडे जीवनातील सर्व क्षेत्रांनी निसर्गापासून केलेला दुरावा मिटवण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन बदलले जात आहेत. बालवाडीपासूनच माणूस व निसर्गाचा आदर करण्याचे संस्कार (बदनाम झालेली संज्ञा) केले जातात. मजकूर अत्यल्प, मात्र भरपूर चित्रे देणारी प्रसन्न पुस्तके उपलब्ध होत आहेत. मोटरकेंद्री शहरांचा उर्मट तोंडवळा पालटून टाकला जातोय.
माणूसकेंद्री चैतन्याने सळसळलेली उबदार शहरे तयार होत आहेत. हीच शहरे हवामान बदलाच्या आपत्तींची जोखीम कमी करत आहेत. निसर्गातील अनेक गूढ तत्त्वांची उकल करून वास्तुकलेला नवीन वळण दिले जात आहे. दृश्यकला व संगीतातूनही ‘निसर्ग व जग समजून घ्या’ असेच भाव व्यक्त होत आहेत. एकाच वेळी बुद्धी व भावना दोन्हींना आवाहन केले जात आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एकविसाव्या शतकात वर्ग, वर्ण व लिंग यांत समानता आणण्यासाठी, युद्ध रोखण्यासाठी, पर्यायी संस्कृती निर्माण करण्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी अनेक चळवळी झाल्या. प्रत्येक चळवळीचा पाया विस्तारण्यात दृश्यकला व संगीत यांचा वाटा मोठा होता. जॉनी मिचेल, मायकेल जॅक्सन आदींच्या संगीतामुळे लाखो तरुणांचे मतपरिवर्तन झाले आहे. यातून पुढची पिढी समृद्ध होऊन ती निसर्गाशी नाते जोडण्यासाठी नव्या जोमाने कार्यरत व्हावी. त्यांनी वैयक्तिक जीवनशैली व सभोवताल बदलण्यासाठी झटावे, ही आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. त्यासाठीच हा अट्टहास!
कुठेही अडल्यास, कोणत्याही संदर्भांच्या खोलात जायचे असल्यास, कधीही धुके दूर करून देणाऱ्या ज्ञानीयांची संगत आपसूकच वाटा दाखवत जाते. महेश एलकुंचवार, नंदा खरे, कुमार केतकर, सुलक्षणा महाजन, माधुरी पुरंदरे व समर नखाते यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून प्रत्येक विषयाच्या नवीन मिती समजून येतात. त्याचा लाभ ह्या पुस्तकालाही झाला. (दरम्यान ‘हॅलो, मी नंदा बोलतोय’, असे म्हणत नंतर होणाऱ्या विश्वभ्रंमतीला मी मुकलो.) सुनिता नारायण, बीबी व्हॅन डर झी, रितु भारद्वाज, केया आचार्य, गोपी वॉरियर, जोयदीप गुप्ता व हरजितसिंग यांच्यामुळे पर्यावरणाच्या समस्या व हवामान परिषदांचे वेगळे पैलू लक्षात येतात.
गिरीश कुबेर, विनोद शिरसाठ, शेखर देशमुख, श्रीराम पवार, आदिनाथ चव्हाण, मनोहर सोनवणे व राम शेवडीकर ह्या मित्रांमुळे ‘दै. लोकसत्ता’, ‘दै. सकाळ’, ‘दै. ॲग्रोवन’, ‘साप्ताहिक साधना’, ‘मुक्त संवाद’, ‘अक्षरलिपी’ व ‘उद्याचा मराठवाडा’ या नियतकालिकांमधून लिखाण होत गेले. शेखर देशमुख, शंकर झुल्फे, प्रसाद कुमठेकर, वृंदा भार्गवे, सुकल्प कारंजेकर, विवेक कुडु, अनिल जोशी व अजिंक्य कुलकर्णी हे प्रत्येक टप्प्यात सहभागी होते. वेळ काढून त्याबद्दल बोलत होते. त्यानुसार पुस्तक घडत गेले.
कलापिनी कोमकली यांनी पं. कुमार गंधर्व यांच्या ऋतुसंगीताच्या पुस्तिका उपलब्ध करून दिल्या. करुणा गोखले यांनी पुस्तकात अनेक ‘जागा’ दाखवल्यामुळे त्यांचा विस्तार करता आला. त्यांची संपादकीय दृष्टी आणि दिलीप माजगावकर यांचे सल्ले, यांमुळे पुस्तकाला आकार आला.
चंद्रमोहन कुलकर्णीला सवड काढता येणे हेच कठीण. त्याच्या ‘पुस्तक हे लेखकाइतकेच चित्रकाराचेही असते’, या उक्तीची नेहमीच प्रचिती येत असते.
अनेकांच्या सहकार्यामुळे पुस्तक आपल्यापर्यंत येत आहे.
‘निसर्गकल्लोळ’ – अतुल देऊळगावकर
राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – २०२ | मूल्य – २८० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment