‘आम्हा घरी धन’ आणि ‘देव तेथेचि जाणावा’ या मुलाखतींच्या दोन पुस्तकांचे संपादन ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले असून ही पुस्तकं नुकतीच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहेत. २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या साहित्य आणि समाजकार्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या ४७ मुलाखती या दोन भागांत वाचायला मिळतात. शेवटची मुलाखत ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे प्रवर्तक सुनील देशमुख यांच्या मुलाखतीचा ‘आम्हा घरी धन’ या पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला आहे. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वत:च्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेपआणि आजच्या समाजजीवनावर भाष्य, ही चतु:सूत्री समोर ठेवून या मुलाखती घेतलेल्या असल्यामुळे त्या वाचनीय आणि संग्राह्य झालेल्या आहेत. या पुस्तकांना संपादक शिरसाठ यांनी लिहिलेले हे मनोगत...
.................................................................................................................................................................
कमी वेळेत, कमी श्रमात, कमी खर्चात जास्तीत जास्त आशय उत्पन्न करणारा लेखन प्रकार म्हणून मुलाखत हा प्रकार अव्वल स्थानी येतो. मुलाखत देणारा म्हणतो, ‘मला काय फक्त बोलायचे आहे.’ मुलाखत घेणारा म्हणतो, ‘मला काय फक्त ऐकून/रेकॉर्ड करून लिहायचे आहे.’ त्यामुळे मुलाखत देणाराला फार तयारीची गरज नसते आणि मुलाखत घेणाराचे अल्पशा तयारीवर चालून जाते. शिवाय मुलाखत देताना कितीही पुढे-मागे जाता येते (उड्या मारता येतात), विषयांतर करता येते. वाचकांचीही त्यामुळे सोय होते. म्हणजे मुलाखत देणारा व घेणारा आणि वाचणारा या तिन्हींच्या दृष्टीने विचार करता मुलाखतीचा हा असा तिहेरी फायदा असतो.
मात्र अधिक चांगली मुलाखत घ्यायची असेल, तर मुलाखत देणारा व घेणारा या दोघांनीही थोडी अधिकची तयारी करणे आवश्यक असते. म्हणजे मुलाखतीचे औचित्य लक्षात घेऊन, तिचा केंद्रबिंदू निश्चित करून, ढोबळ रूपरेषा आखणे आवश्यक असते. एखाद्या प्रश्नाचे उत्तर जिथे संपते तिथून, किंवा त्या उत्तरातला एखादा बळकट धागा पकडून पुढे जाणारा प्रश्न विचारत जाणे, असे केले तर मुलाखत प्रवाही होते. शिवाय मुलाखत देणाराकडून जास्त चांगला मजकूर पुढे येतो आणि मग वाचकही त्यात अधिक गुंतून राहतो.
हे साधे तंत्र पाळले तरी दोन्ही बाजूंनी त्या त्या मुलाखतीचा परिप्रेक्ष्य (पर्पेक्टिव्ह) किंवा गाभा व आवाका पुढे येतोच येतो. पूर्वी मुलाखत देणाऱ्यांना व घेणाऱ्यांना प्रत्यक्ष भेटावे लागायचे आणि प्रश्न-उत्तरे लिहून काढावी लागायची, ते काम बरेचसे कष्टदायक आणि वेळखाऊ असायचे. नंतर बदलत्या तंत्रज्ञानामुळे आधी रेकॉर्डर उपलब्ध झाला आणि मग दूर अंतरावर राहूनही ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात मुलाखती घेणे सहज शक्य झाले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
शिवाय या मुलाखतींचे शब्दांकन थेट कम्प्युटरवर करता येणे सोपे झाले आणि आता तर व्हाईस टाईपिंग करण्याच्या तंत्रामुळे ते काम आणखी सोपे झाले. यापुढील काळात तर काय, अनुवादही बऱ्यापैकी अचूक होण्याच्या दिशेने आपले तंत्रज्ञान प्रगतीपथावर आहे.
सारांश, कधीही मिळण्याची शक्यता नसलेला मजकूर मुलाखत प्रकारामुळे किंवा कधीच भेटू न शकणाऱ्या व्यक्तींचा मजकूर अतिशय सुलभ व जलद पद्धतीने मिळू लागला आहे. विशेषतः अंतरे खूप जास्त असतात व भाषा वेगळ्या असतात तेव्हा तर मुलाखत हे तंत्र खूपच उपयुक्त ठरते.
मागील दशकभरात या सर्व अनुकूलतेचा फायदा ‘साधना’ साप्ताहिकाने आणि प्रकाशनाने जेवढा उचलला आहे, तेवढा मराठीत तरी अन्य कोणत्याही माध्यमाने उचललेला नसावा. ‘साधना’तून मागील दहा वर्षांत किमान ५०० दीर्घ मुलाखती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील काहींना पुस्तकरूप मिळाले आहे, आणखी काही पुस्तकरूपाने येत आहेत.
तर अशाच ४८ मुलाखतींचे दोन संग्रह आता प्रकाशित करत आहोत. या मुलाखती २०१५ ते १९ या पाच वर्षांतील आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांनी दिलेल्या ‘साहित्य’ व ‘समाजकार्य’ पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या या मुलाखती आहेत. या सर्व व्यक्ती नामवंत आहेत, सर्वांकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. २०१० ते १९ या दहा वर्षांत ‘साधना’ साप्ताहिकाने दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींवर विशेषांक प्रकाशित केले. आधीची पाच वर्षे पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा लेख व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या विचारकार्याशी परिचित व्यक्तीने लिहिलेला लेख अशी अंकांची रचना होती. नंतरची पाच वर्षे मात्र पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या फक्त मुलाखती अशी अंकांची रचना होती.
अर्थातच आधीच्या पाच वर्षांतील सर्व लेख चांगलेच असायचे, मात्र त्यात अनेक वेळा पुनरावृत्ती झालेली असायची, काही सांगायचे राहून गेलेले आहे असे वाटायचे. काहींनी थोडक्यात संपवलेले असायचे, काहींनी जरा जास्त विस्ताराने सांगितलेले असायचे. काहींनी प्रामुख्याने भाष्य केलेले असायचे, तर काहींनी प्रामुख्याने माहिती व तपशील देणाराच मजकूर दिलेला असायचा. काहींनी स्वतःविषयी व कामाविषयी माफक सांगितलेले असायचे, काहींनी समाजाविषयी सभोवतालाविषयी जास्त सांगितलेले असायचे. काहींच्या लेखांची लांबी जेमतेम एक दोन पाने एवढीच असायची, तर काहींच्या लेखांची लांबी पाच-सात पाने इतकी जास्त असासायची.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या त्रुटी दूर करण्यासाठी २०१५ ते १९ या पाच वर्षांत मुलाखतींचे अंक काढण्याचा निर्णय घेतला आणि तो भलताच यशस्वी झाला. त्याचे कारण, मुलाखतींचे प्रारूप निश्चित केले होते. प्रत्येक मुलाखतीसाठी मोजून अंकाची सहा पाने जागा ठेवलेली असायची. त्यात फोटो-लेआऊट यांचा विचार करून २५०० शब्दांचा मजकूर घेतलेला असायचा. त्यातही २०० ते ३०० शब्द मुलाखतकारांनी प्रास्ताविक लिहावे, त्यामध्ये माफक भाष्यही करावे आणि साधारणतः २२०० शब्द प्रत्यक्ष मुलाखत, अशी ती रचना होती. शिवाय मुलाखत घेणाऱ्याला आणि मुलाखत देणाऱ्यालाही एक चतुःसूत्री आम्ही सांगून ठेवलेली असायची. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतु:सूत्री त्या मुलाखतीच्या केंद्रस्थानी असावी. परिणामी त्या व्यक्तीचे विचार व कार्य अतिशय नेमकेपणाने त्यातून अधोरेखित होऊ शकत होते.
या मुलाखतींना विशिष्ट औचित्य असल्याने आणि एका विशेष अंकात अन्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्याबरोबर त्या छापल्या जाणार असल्याने, सर्वच पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी व त्यांच्या सुहृदांनी अतिशय उत्साहाने त्या चतुःसूत्रीभोवती मुलाखती दिल्या/ घेतल्या. शिवाय त्या मुलाखतीचा अंतिम मसुदा ‘साधना’कडे आल्यावर त्यात गरज पडली तर काही भाग वगळणे किंवा नव्याने समाविष्ट करणे, हे कामही त्या त्या दोघांकडून किंवा त्यांच्या संमतीने आम्ही करत होतो. त्यामुळे अतिशय शिस्तबद्ध अशा त्या मुलाखती आकाराला आल्या आणि कमालीच्या वाचनीय स्वरूपात त्या अंकांमध्ये प्रसिद्ध झाल्या.
तर अशा प्रकारे त्या पाच वर्षांत एकूण ४७ मुलाखती प्रसिद्ध झाल्या. कारण साहित्य व समाजकार्य मिळून तेवढे पुरस्कार दिले गेले. त्यात साहित्याचे २२ आणि समाजकार्याचे २५ पुरस्कार आहेत.
समाजकार्यामध्ये चार विभाग आहेत. पहिला विभाग, समाजकार्य जीवनगौरव- त्यात पुष्पा भावे, विद्या बाळ, हमीद दलवाई (मरणोत्तर), गंगाप्रसाद अग्रवाल, डॉ.विकास आमटे यांचा समावेश होता. दुसरा विभाग, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार - त्यात निखिल वागळे, उत्तम कांबळे, अतुल पेठे, अरविंद गुप्ता, राजेंद्र बदौठ यांचा समावेश होता. तिसरा विभाग, प्रबोधन व रचनात्मक कामासाठी कार्यकर्ता पुरस्कार- त्यामध्ये रमेश गावस, बिंदूमाधव खिरे, देवाजी तोफा, सुशीला नाईक, विजय दिवाण, चेतना गाला सिन्हा, निशा शिवूरकर, हरी नरके यांचा समावेश होता. चौथा विभाग कार्यकर्ता पुरस्कार, प्रामुख्याने संघर्ष व रचनात्मक काम- यामध्ये मनीषा तोकले, भीम रासकर, पल्लवी रेणके, कृष्णा चांदगुडे, रुबीना पटेल, अरुण जाधव, मतीन भोसले यांचा समावेश होता.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
साहित्य पुरस्कारांमध्ये असे चार विभाग आहेत. पहिला विभाग, साहित्य जीवनगौरव- त्यामध्ये श्याम मनोहर, सुरेश द्वादशीवार, अरुण साधू, अनिल अवचट आणि शांता गोखले यांचा समावेश होता. दुसरा विभाग, ललित ग्रंथ व वाड्मयप्रकार पुरस्कार- त्यामध्ये महाबळेश्वर सैल, किरण गुरव, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, अंजली जोशी, कल्पना दुधाळ, प्रवीण बांदेकर, सानिया यांचा समावेश होता. तिसरा विभाग, अपारंपारिक वा वैचारिक ग्रंथ पुरस्कार- त्यामध्ये अरुण खोपकर, नितीन दादरावाला, अरुण जाखडे, सई परांजपे, शरद बेडेकर यांचा समावेश होता. चौथा विभाग, रा. शं. दातार नाट्य लेखन पुरस्कार- त्यामध्ये हिमांशू स्मार्त, अजित देशमुख, अनिल साळवे, अजित दळवी, राजीव नाईक यांचा समावेश होता.
तर अशा प्रकारे या ४७ मुलाखती आहेत. शिवाय महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार प्रक्रियेला २५ वर्षे पूर्ण झाली, तेव्हा या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांची दीर्घ मुलाखत सदा डुम्बरे व विनोद शिरसाठ यांनी घेतली, मुलाखतीचे शब्दांकन करून साहित्य पुरस्काराच्या खंडामध्ये ती परिशिष्ट म्हणून समाविष्ट केली आहे. म्हणजे एकूण ४८ मुलाखतींचे हे दोन खंड आकाराला आले आहेत.
साहित्य पुरस्कार व समाजकार्य पुरस्कार यांच्या मुलाखतींची पुस्तके करताना, त्या पुस्तकांची शीर्षके काय द्यावीत हा एक प्रश्न मनात होता. तो शोध घेताना तुकोबा मदतीला धावून आले. ज्या तुकोबांच्या अभंगगाथेने मराठीतील अनेक पुस्तकांना, लेखांना, अग्रलेखांना शीर्षके पूरवली; त्याच तुकोबांचे दोन अभंग इथे उपयोगाला आले. ‘आम्हा घरी धन शब्दांचिच रत्ने, शब्दांचिच शस्त्रे यत्नं करू’ हा अभंग साहित्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या मुलाखतखंडाला लागू होतो. आणि ‘जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा,’ हा अभंग समाजकार्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखत खंडाला लागू होतो.
एवढेच नाही तर साहित्याच्या क्षेत्रातील लोक आणि समाजकार्याच्या क्षेत्रातील लोक ते ते अभंग अनेक लहान मोठ्या सभांमधून उद्धृत करण्याचे प्रमाण अगणित म्हणावे इतके आहे. म्हणून साहित्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या खंडांना ‘आम्हा घरी धन’ आणि समाजकार्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या खंडांना ‘देव तेथेचि जाणावा’ ही दोन शीर्षके निवडली आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या सर्व मुलाखती एकत्रित वाचल्यावर, त्यातील विषयांची विविधता आणि आशयाची गहनता तर स्पष्ट होईलच; पण ज्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत ती माणसे किती विविध कार्यक्षेत्रांतून आलेली आहेत, किती विविध प्रदेशातून आलेली आहेत, किती विविध सामाजिक पार्श्वभूमीतून आलेली आहेत आणि किती प्रवाहांतून आलेली आहेत हे लक्षात येईल. त्यामुळे कोणताही सुबुद्ध वाचक थक्क होईल. मात्र या सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कलाविषयक जाणीव, सामाजिक भान आणि वैचारिक निष्ठा, यांबाबत खूपच जास्त एकात्मता असल्याचेही लक्षात येईल. म्हणजे विविधतेत एकात्मता अशा प्रकारच्या या मुलाखती असल्याचे ध्यानी येईल. म्हणून या ४८ मुलाखती एकत्रित वाचायला हव्यात; अवर्णनीय बौद्धिक आनंद त्या देतील!
इथे हे कृतज्ज्ञतापूर्वक नमूद केले पाहिजे की, या सर्व मुलाखतीचे अंक संपादित करून प्रकाशित करताना प्रस्तुत संपादकाला खूपच जास्त अनुकूलता होती; ती अन्य कोणालाही मिळणे अशक्य होते. याचे कारण त्या पाच वर्षांत सर्व पुरस्कार निवडसमित्यांचा मुख्य समन्वयक असणे, पुरस्कार प्रक्रिया घडवून आणण्यासाठी प्रमुख कार्यवाह असणे आणि त्या पुरस्कार विशेष अंकाचा संपादक असणे, अशा तिहेरी नात्याने त्या मुलाखतींशी जोडला गेलो होतो. त्यामुळे ते काम तुलनेने बरेच सोपे आणि जास्त आनंददायक होत होते.
या सर्व अनुकूलतेसाठी महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रवर्तक सुनील देशमुख, महाराष्ट्र फाउंडेशनचे आजी-माजी अध्यक्ष आणि या पुरस्कार प्रक्रियेतील भारतातील संयोजक संस्था (केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि मासूम) या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. शिवाय, ते सर्व पाचही विशेष अंक तयार करत असताना, अवघ्या दोन आठवड्यांच्या काळात अंकाचे संपादन, अंतर्गत सजावट व अंक छापून घेणे, यासाठी ‘साधना’चे सर्व कार्यालयीन सहकारी विशेष उत्साहाने व सातत्याने सहभागी होत होते. त्यातही त्या अंकांच्या नियोजनात आणि प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेत आमचे आर्टिस्ट गिरीश सहस्रबुद्धे आणि आमचे प्रॉडक्शन विभागाचे प्रमुख सुरेश माने यांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. या सर्वांचे आभार कसे मानणार?
‘आम्हा घरी धन’ - संपादन - विनोद शिरसाठ | साधना प्रकाशन, पुणे | पाने - २३२ | मूल्य - ३०० रुपये.
‘देव तेथेचि जाणावा’ - संपादन - विनोद शिरसाठ | साधना प्रकाशन, पुणे | पाने - २४८ | मूल्य - ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment