‘अरविंद केजरीवाल : कार्यक्षम, महत्त्वाकांक्षी, वादग्रस्त, अनाकलनीय’ हे ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांचं नवं पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झालं आहे. भारतीय राजकारणात एखाद्या धमूकेतूसारख्या उगवलेल्या केजरीवाल यांचं राजकारण अजूनही अनेकांना, अगदी राजकीय अभ्यासकांनाही बुचकळ्यात, कोड्यात पाडतं. दिल्ली, पंजाब या दोन ठिकाणचं त्यांचं घवघवीत यश आणि मोदी-शहा यांच्या राजकीय धोरणांना सातत्यानं विरोध करणारा बेडर राजकारणी असलेल्या केजरीवालांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या राजकारणाचा उलगडा या पुस्तकातून दामले यांनी केला आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेलं हे प्रास्ताविक...
.................................................................................................................................................................
या पुस्तकाचा विषय आहे, अरविंद केजरीवाल.
अरविंद केजरीवाल हा भारतीय राजकारणातला एक उगवता तारा आहे. नरेंद्र मोदींच्या तुलनेत हा तारा फार मोठा दिसत नसेल, तितका तेजस्वी दिसत नसेल; पण आपल्या परीनं स्वतंत्रपणे लुकलुकू लागला आहे.
२०१४ सालापर्यंत अरविंद केजरीवाल भारताच्या राजकीय पटलावर उगवलेले नव्हते. अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल आंदोलना’मधून ते देशासमोर आले. अण्णांचं आंदोलन लोकांच्या नजरेत भरलं होतं, त्यातून केजरीवाल यांचीही एक प्रतिमा तयार झाली होती. काँग्रेस पक्षाचा पराभव करून ते लोकसभेत भरपूर जागा मिळवतील, असं काही लोक म्हणू लागले होते.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत केजरीवालांनी सपाटून मार खाल्ला. त्यांचं हसं झालं. मुरब्बी राजकारणी म्हणाले की, त्यांना निवडणुकीचं किंवा एकूणच ‘प्रॅक्टिकल’ राजकारण जमत नाहीये. राजकारणात राजकीय पक्षांकडे जे जे हवं असतं, ते ते केजरीवाल यांच्याकडे नाहीये, असं विश्लेषण पत्रकार आणि अभ्यासक करत होते. केजरीवाल हा एक अगदीच तुटपुंजं तेल असलेला दिवा होता, तो विझला, असंही लोक म्हणाले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
२०१५ साल उजाडलं. केजरीवाल राजकीय पटलावर जोरात उगवले. दिल्ली राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. त्यांनी खासदार, आमदार, मंत्री इत्यादींची फौज दिल्लीत केजरीवाल यांच्या विरोधात उतरवली होती. केजरीवालांनी भाजप आणि काँग्रेस दोघांचाही दणदणीत पराजय केला. ७० जागांच्या विधानसभेत त्यांनी ६७ जागा मिळवल्या.
दिल्ली हे अगदीच लहान राज्य, एक महानगर म्हणा ना. पण तिथे ऐन भरात असलेल्या भाजपला हरवून दाखवल्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या. तरीही लोक म्हणाले की, एखाद्या वेळेस अशी अनपेक्षित घटना घडू शकते, केजरीवाल भाजपसमोर टिकणार नाहीत. मतदारांनी एका नव्या खेळाडूला संधी दिलीय, असं लोक म्हणाले.
२०१९मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक आली. आता केजरीवाल हा नवा खेळाडू नव्हता. पाच वर्षांत केलेल्या कामगिरीचा विचार मतदार करणार होते. पुन्हा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचा पक्ष प्रचंड ताकद लावून दिल्लीच्या निवडणुकीत उतरले. त्यांचा धुव्वा उडवत २०१९ साली केजरीवाल यांनी ७० पैकी ६२ जागा जिंकल्या.
निरीक्षक म्हणू लागले की ठीक आहे, दिल्लीसारख्या महापालिकेत निवडणूक जिंकणं, यात काही मोठंसं नाही, मोठ्या राज्यात निवडणूक जिंकली तर खरं.
२०२२ साली पंजाब विधानसभेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस, अकाली दल आणि भाजप असे तीनही पक्ष मैदानात होते. केजरीवालांनी ११७ सदस्यांच्या विधानसभेत ७२ जागा मिळवल्या.
केजरीवाल लोकांच्या नजरेत भरले.
लोक केजरीवालांना विचारू लागले की, तुम्ही नरेंद्र मोदींची जागा घेणार काय? खरं म्हणजे केजरीवालांचा पक्ष अगदीच लहान, त्यांचा इतर राज्यांमधील प्रसारही मर्यादित. केवळ २०१४ साली त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीत निवडणूक लढवली होती, म्हणून त्यांना मोदींचा पर्याय मानणं जरा अतीच होतं. कदाचित मौज म्हणून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल चलाखीनं म्हणाले की, ‘ते मोदी वा भाजपच्या विरोधात निवडणूक लढवत नसतात, ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवतात.’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
निवडणुका जिंकायच्या, तर अनेक घटक हाताशी असावे लागतात नेता, संघटना, लोकप्रियता, पैसा, आकर्षक कार्यक्रम. हे घटक काँग्रेस पक्षाच्या हाती बराच काळ होते. भाजपनं ते कमावले आणि काँग्रेसला हरवून भाजप सत्ताधारी झाला. हे घटक केजरीवाल यांच्याकडे कितपत आहेत, याची चौकशी अभ्यासक, पत्रकार, निरीक्षक करू लागले.
निवडणूक जिंकायची असेल, तर माणूस मतदारांच्या नजरेसमोर सतत असायला हवा. कसंही का होईना, नाव असावं लागतं, असं राजकारणातली माणसं म्हणतात. बदनामीसुद्धा नामी असते, असं त्यांचं म्हणणं असतं. सतत लोकांच्या डोळ्यांसमोर असण्यासाठी फार पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात. ते येरागबाळ्याचं काम नाही.
अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात केजरीवाल देशाला माहीत झाले. तिथून पुढे ते सतत प्रसिद्धीच्या झोतात राहू लागले. प्रसिद्धीचं तंत्र त्यांना जमलंय, केजरीवाल संधीसाधू आहेत, केजरीवाल पोकळ आहेत, केजरीवाल हा एकखांबी तंबू आहे, केजरीवालांना आयडियॉलॉजी नाही, ते सत्तालोलुप आहेत, सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही नाटकं करायला तयार असतात, ते हुकूमशहा आहेत, ते हिंदुत्ववादी आहेत, ते भाजपची ‘बी टीम’ आहेत - किती, किती आरोप! शेवटी बेडूक फुगून फुगून केवढा होणार, असं लोक, राजकीय पक्ष केजरीवाल यांच्याबाबत सतत म्हणत राहिले.
म्हणजे केजरीवाल यांची दखल लोक घेत होते.
पंजाब जिंकल्यानंतर केजरीवाल गुजरात, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यं जिंकण्याच्या गोष्टी करत आहेत. लोकसभेत सर्वांत जास्त खासदार असलेला पक्ष असं स्थान मिळालं तरी पुरे, त्या जोरावर दिल्लीत राज्य करता येईल, असा डाव केजरीवाल यांच्या मनात असू शकेल. त्यासाठी छोटी छोटी राज्यं परडीत पाडायची, असं केजरीवालांनी योजलं असेल. तसं ते बोलत नाहीत. पण कोण माणूस आपले डाव सुरुवातीलाच उघड करतो? जे घडत जाईल, त्यावरून नेत्याचं मोल मोजावं लागतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
राजकारणात उतरणारा माणूस कधी ना कधीतरी देशातलं सर्वोच्च पद आपल्याला मिळालं पाहिजे, अशी इच्छा बाळगून असतो. ते त्याचं स्वप्न असतं. त्याच दिशेनं तो एकेक पाऊल टाकत असतो. पण अशी महत्त्वाकांक्षा असणारा तो एकटाच माणूस नसतो. विशाल देशात, अनेक पक्षांत, अनेक राज्यांत अशी अनेक माणसं ते स्वप्न पाहत असतात. अशा सर्वांशी झटापट करून प्रत्येकाला सत्तेचं सर्वोच्च पद मिळवायचं असतं.
मामला कठीण आहे, हे केजरीवालांनाही समजतं. भाजप आणि काँग्रेस हे देशपातळीवरचे पक्ष आपल्याला हरवतील, राज्यांतही स्थानिक पक्ष आपल्याला स्थान देणार नाहीत; हेही त्यांना समजत असणार. ते योग्य संधीची वाट पाहत, योग्य ती संधी निर्माण करत पुढे सरकत आहेत.
नरेंद्र मोदींनी म्हणे केजरीवालांना आव्हान दिलं की, “माझ्या क्रिकेटच्या मैदानात या आणि मला हरवून दाखवा.” केजरीवाल म्हणाले, “मला मुळात क्रिकेटच खेळायचं नाही. मी माझ्या मैदानात फुटबॉल खेळणार आहे, मोदींनी तिथे येऊन माझ्याशी खेळावं.”
केजरीवाल हा विकसित होत गेलेला, घडत गेलेला माणूस आहे, अजूनही घडतोच आहे.
समाजात लाटा येत असतात. लाटेवर कोणता ओंडका वर जातो, हे कधी सांगता येत नसतं. राजकारणातही ते खरं आहे.
काय होईल?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नरेंद्र मोदी आणि भाजप हे आजचं आव्हान किती वर्षं टिकेल? प्रत्येक पक्षाला उदय आणि अस्त असतो. तो प्रत्येक नेत्यालाही असतो. काही वर्षांनी कदाचित भाजप/मोदी हे पटावर नसतील, भाजप असेल पण मोदी नसतील, भाजपही नसेल, अनेक पक्षांचं कडबोळं सत्तेत असेल. तो क्षण येईस्तोवर केजरीवाल तग धरून असतील, कारण ते तरुण आहेत. त्या वेळी राजकारण कसं असेल, ते आत्ताच सांगणं शक्य नाही. तो क्षण केजरीवालांना गाठावा लागेल, तोवर त्यांना टिकावं लागेल, तोवर त्यांना आपली ताकद वाढवत न्यावी लागेल. केजरीवाल यांच्या हिशोबात २०२४ किंवा २०२९ ही वर्षं तयारीची असतील, रियाजाची असतील. काय माहीत!
काय होणार असेल ते होवो, पण माणूस इंटरेस्टिंग आहे हे खरं. त्यांचा उदय आणि विकास भारतात अनेक शक्यता निर्माण करताना दिसतोय. या माणसाकडे पाहायला हरकत नाही, या विचारानं या पुस्तकाचा खटाटोप मी केला आहे.
भारतीय राजकारणातले नेते आणि पक्ष यांचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर आहे. नेते आणि पक्ष कसे जन्मले आणि वाढले, हे आपण पाहिलं आहे. केजरीवाल आणि त्यांचा ‘आप’ हा पक्ष त्या नेपथ्यावर खूपच वेगळा आहे. राज्यशास्त्रीय चौकटीत ते बसत नाहीत. आट्यापाट्याच्या खेळात ते पुढे सरकताना दिसतात; पण त्यांच्या चाली कोणत्या आहेत, याचं गणित मांडता येत नाही.
अरविंद केजरीवाल यांना समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे. केजरीवाल कसकसे घडत गेले, याचा धांडोळा घेत असतानाच त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व कसं घडत गेलं, ते अभ्यासण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. या लेखनासाठी पुस्तकं, वर्तमानपत्रांची कात्रणं, वर्तमानपत्रांतले लेख, यू-ट्यूबवरच्या क्लिप्स यांचा आधार घेतला आहे.
केजरीवाल यांच्या घडणीतला एक महत्त्वाचा घटक म्हणजे अण्णा हजारे. अण्णा हजारे यांचा अभ्यास मी १९७४ सालापासून करत होतो. राळेगण सिद्धी हे गाव त्यांनी दुष्काळातून बाहेर काढलं होतं. आधीच्या तीन वर्षांच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हजारे यांचं काम आदर्श वाटणारं झालं होतं, लोकांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं होतं. मी हजारेंना भेटलो, राळेगण सिद्धीत मुक्काम केला, त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोललो.
विकासाचं विधायक काम करत असतानाच अण्णा भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात उतरले. भ्रष्टाचार दूर करायचा असेल, तर माहितीचा अधिकार नागरिकाला असला पाहिजे, असं हजारे म्हणू लागले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्याच वेळी देशात इतर ठिकाणीही तोच विचार काही सेवाभावी संघटना आणि नेते करत होते. त्यांच्यातलं एक ठळक नाव अरुणा रॉय. मी त्या आंदोलनाचा अभ्यास करत होतो. अविनाश धर्माधिकारी, कुमार सप्तर्षी हे ताज्या दमाचे लोक त्या आंदोलनात आपलं करिअर करण्याच्या खटपटीत होते. केजरीवाल त्या काळात सामाजिक कार्यात उतरलेले नव्हते. रॉय, अण्णा या लोकांशी बोलताना केजरीवाल यांचं नाव कानावर आल्याचं मला स्मरत नाही.
२०११ सालच्या अण्णांच्या आंदोलनात केजरीवाल माझ्या रडारवर ठळक झाले. २०१४ सालच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी केजरीवाल यांचा अभ्यास आरंभला. आम आदमी पार्टी आणि केजरीवाल या दोन गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून मी मुंबईत कार्यकर्ते, पत्रकार इत्यादींच्या भेटी घेतल्या. केजरीवाल यांच्या कामात उत्साहानं सामील झालेली अनेक माणसं मला खूप पूर्वीपासून माहीत होती, त्यांच्यापैकी अनेक जण माझे मित्र होते. त्यामुळे केजरीवालांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणं मला सोपं गेलं.
२०१४च्या निवडणुकीच्या निमित्तानं मी वडोदरा आणि वाराणसी या दोन ठिकाणी फिरलो. केजरीवालांचं कार्यक्षेत्र असलेल्या दिल्लीतल्या सुंदरनगरी विभागात मुक्काम केला. केजरीवाल कसं काम करतात, त्यांचा पक्ष आहे तरी काय, ते पाहण्यासाठी उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगर या मतदारसंघात फिरलो. त्या वेळची माझी निरीक्षणं ‘मौजे’च्या दिवाळी अंकात लिहिली होती. या पुस्तकात त्या निरीक्षणांचा काही भाग घेतला आहे.
‘अरविंद केजरीवाल : कार्यक्षम, महत्त्वाकांक्षी, वादग्रस्त, अनाकलनीय’ – निळू दामले
राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – १५८ | मूल्य – २२५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment