अजूनकाही
इम्तियाज अलीचा लांबलचक मेल आयडी हा त्याच्यासारखाच रोचक आहे. सतत कशाची तरी वाट बघणारा माणूस अशा अर्थाचा हा मेल आयडी आहे. इम्तियाजच्या चित्रपटातली मुख्य पात्रं सतत अशा कोणाची तरी वाट बघत असतात, जे बहुतेक त्यांच्या आयुष्यात कधी येणारच नाही आहेत. 'रॉकस्टार'मधला बंडखोर जॉर्डन त्याला हव्या असणाऱ्या स्वातंत्र्याची वाट बघतो. 'तमाशा'मधला विझून गेलेला वेद आयुष्य खऱ्या अर्थानं जगणं सुरू करण्यासाठी एका योग्य वेळेची वाट बघतो, जी बहुतेक कधीच येणार नाहीये. 'जब वुई मेट'मधली गीत अंशुमनचं हृदय परिवर्तन कधी होईल याची वाट बघते. इम्तियाज एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता, ‘माझ्या बहुतेक पात्रांमध्ये माझा थोडा अंश असतोच.’
२००१ साली प्रदर्शित झालेल्या 'लगान' आणि 'दिल चाहता है' या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा लँडस्केप बदलून टाकला. हे बदल कथानक किंवा कथेच्या दृष्टिकोनातून होतेच, पण बऱ्याच प्रमाणात डेमोग्राफिकल होते. प्रेक्षकांचं सरासरी वय, मल्टिप्लेक्स, तिकिटांचे दर अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये या वर्षी बदल झाले. यापूर्वी प्रामुख्याने पिटातल्या प्रेक्षकाला डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. आता प्रचंड प्रमाणात क्रयशक्ती हातात असणारा मल्टिप्लेक्स प्रेक्षक नावाचा मार्केट फोर्स उदयाला आला. या प्रेक्षकांच्या जाणिवा पूर्णपणे शहरी होत्या. आपल्या जाणिवांचं प्रतिबिंब आता त्यांना सिनेमात बघायचं होतं. बी.ए. पास झाल्यावर आईच्या हातचा गाजर का हलवा खाणारा थोराड नायक आणि नायकाला लग्नापूर्वी स्पर्श न करू देणारी जून नायिका त्यांना बघायची नव्हती. प्रेक्षकांचा आय क्यू पाचवीच्या मुलांइतका असतो, अशी अगोदर एका मोठ्या दिग्दर्शकाने मांडलेली आणि ओल्ड स्कूल निर्माता-दिग्दर्शकांमध्ये सर्वमान्य झालेली थिअरी पूर्णपणे मोडीत निघण्याची प्रक्रिया सुरू झाली. इम्तियाजचा सिनेमा हे या बदलांचं अपत्य आहे. ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ बनले नसते तर इम्तियाजचा सिनेमाही कधीच बनला नसता.
इम्तियाज हा निव्वळ अपघातानं या क्षेत्रात आला. साधारणपणे बहुतेक दिग्दर्शक सहायक दिग्दर्शक म्हणून काम करून अनुभव जमा करतात आणि दिग्दर्शक म्हणून काम सुरू करतात. इम्तियाजने कधीच कुठल्याही दिग्दर्शकाला असिस्ट केलं नाही. त्यानं कुठल्याच फिल्म स्कूलमध्ये फिल्ममेकिंगचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही. त्याचे सिनेमे बघणाऱ्यांना हे पटणं जड जाईल. ओ. पी. नय्यरने शास्त्रीय संगीताचं शिक्षण न घेता अनेक चित्रपटांना संगीत दिलं आणि सुमधुर गाणी दिली. इम्तियाज हा नय्यरच्याच जातकुळीतला कलाकार आहे. जमशेदपूरला थिएटर केल्याची पुण्याई त्याला सुरुवातीच्या काळात पुरली. तो त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी गेलेल्या प्रत्येकाला त्याचं आवडतं विधान हमखास ऐकवतो, "If you want to learn film-making then make a film." तुमच्या डोळ्यांसमोर जर तुमची स्क्रिप्ट व्हिज्युअली दिसत असेल तरी तुम्ही फिल्म बनवू शकता. सिनेमाचं तांत्रिक ज्ञान हा फक्त बोनस आहे, अशी इम्तियाजची धारणा आहे. ती किती बरोबर आहे हे त्याने सिद्ध केलं आहेच. अर्थात स्वतःला सिनेमाचा आयुष्यभराचा विद्यार्थी मानणारा इम्तियाज सात चित्रपटानंतर आता तांत्रिकदृष्ट्याही तयारीचा झाला आहे.
इम्तियाजच्या चित्रपटांचं रॉकस्टार-पूर्व आणि रॉकस्टार-उत्तर असे दोन प्रवाह दिसतात. ‘सोचा न था’, ‘जब वुई मेट’ आणि ‘लव आज कल’ या चित्रपटांमध्ये आजच्या पिढीचा नातेसंबंधांमधला गोंधळ किंवा कमिटमेंटबद्दल असणारी अनाम भीती कथानकात दिसून येते. हा गोंधळ फक्त एकस्तरीय नाही, तर कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे त्याचे अनेक स्तर आहेत. ‘सोचा ना था’मधला विरेन हा एका मुलीच्या प्रेमात असतो, पण तिला आयुष्यभराची कमिटमेंट देण्यास घाबरत असतो. अरेंज मॅरेज हा खुळचट प्रकार आहे, असं मानणारा वीरेन घरच्यांच्या दबावामुळे एका साध्या सरळ मुलीला भेटायला जातो आणि पहिल्याच भेटीत तिच्याशी मैत्री करतो. इतकंच नाही तर पुढे जाऊन तिच्या प्रेमातही पडतो. ‘लव आज कल’मधली मीरा कुणाच्याही स्वप्नातला राजकुमार असू शकेल अशा माणसाशी लग्न करते आणि लग्नाच्या रात्री तिला साक्षात्कार होतो की, आपलं आपल्या नवऱ्यावर प्रेम नाहीये. ती त्याच रात्री त्याला तसं सांगते आणि आपल्या माजी प्रियकराकडे जायला निघते. तरुण पिढीच्या मनातला प्रेमाबाबतचा गोंधळ इतक्या बोल्डपणे पडद्यावर कुणीच आणला नव्हता. म्हणूनच त्याचे हे तिन्ही चित्रपट तरुणांनी उचलून धरले.
मग एकदा व्यवस्थित बस्तान बसल्यावर इम्तियाजने गियर बदलला. ‘रॉकस्टार’मधून स्वतःच्याच सिनेमाचं रूळलेलं व्याकरण त्यानं आमूलाग्र बदललं. मी मध्यंतरी पंढरीनाथ कोल्हापुरे यांचं त्यांनी कुमार गंधर्वांसोबत देवासला घालवलेल्या दिवसांवर लिहिलेलं एक सुंदर पुस्तक वाचलं. एका गंभीर आजारानंतर कुमार गंधर्व मुंबईचं वातावरण मानवत नाही म्हणून मध्य प्रदेशमधल्या देवास या निसर्गरम्य ठिकाणी राहायला गेले. तो कुमारांचा अज्ञातवासातला काळ मानला जातो. पण कोल्हापुरे कुमारांच्या सांगीतिक कारकिर्दीचं देवास-पूर्व आणि देवास-उत्तर असं विभाजन करतात. मैफली गाजवणारे कुमार गंधर्व आणि भारतीय संगीतामध्ये या अज्ञातवासानंतर अतिशय मूलभूत प्रयोग करणारे कुमार गंधर्व, हे सृजनशील व्यक्ती म्हणून पूर्णपणे वेगळे होते, असं निरीक्षण कोल्हापुरे नोंदवतात. ‘रॉकस्टार’च्या अगोदरचा इम्तियाज आणि ‘रॉकस्टार’पासूनचा कात टाकलेला इम्तियाज पूर्ण वेगळा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात दरम्यानच्या काळात सुरू झालेली वादळं बहुतेक त्याला कारणीभूत असावीत.
‘रॉकस्टार’पासून इम्तियाज स्टोरीटेलर म्हणून अजून क्लिष्ट होत गेलेला दिसतो. प्रेक्षकांना चमच्यानं काहीही भरवणं या नवीन इम्तियाजला मंजूर नाही. ‘रॉकस्टार’ आवडलाय असा दावा करणाऱ्या प्रत्येकाचं दिग्दर्शकाला चित्रपटातून नेमकं काय म्हणायचं आहे, याच स्वतःचं असं व्हर्जन आहे. काही जणांना ती एक अपयशी प्रेमकहाणी वाटते, तर काही जणांना एका कलाकाराचा rags to reaches असा प्रवास वाटतो. मला स्वतःला वाटतं की, ‘रॉकस्टार’ ही एखादी अशक्य गोष्ट किंवा व्यक्ती तीव्रतेनं हवी असणं (किंबहुना ती मिळणं शक्य नाही हे माहीत असूनही) आणि त्यातून मनाच्या होणाऱ्या असह्य तगमगीची गोष्ट आहे. 'हायवे' तितकासा क्लिष्ट म्हणता येत नाही, पण एक स्टोरीटेलर म्हणून इम्तियाजने दोन पाऊल इथं अजून पुढं टाकलेली दिसतात. दोन भिन्न भवतालातून आलेल्या लोकांची अधुरी प्रेमकहाणी असं एका ओळीत ‘हायवे’चं सार सांगणं इम्तियाजवर अन्याय करणारं ठरेल. बालपणी जवळच्या माणसांकडून झालेलं लैंगिक शोषण, एका वेळेनंतर नायिकेला आलेली स्वातंत्र्याची भावना या गोष्टी स्क्रिप्टमध्ये इम्तियाजने नजाकतीनं मांडल्या आहेत.
इम्तियाजच्या सर्वच चित्रपटांत महिला पात्रं कणखर, स्वतःचे निर्णय कुणाचीच तमा न बाळगता घेणारी असतात. ‘हायवे’मध्ये मात्र एका पौंगडावस्थेतील तरुणीच्या आत्मशोधाचा प्रवास इम्तियाजने दाखवला होता. 'तमाशा'मधून त्याने एक अजून वेगळा तराणा छेडला. आयुष्यातल्या स्थिरतेच्या मृगजळाचा पाठलाग करता करता स्वत्व विसरलेला वेद मला डेली बेसिसवर माझ्या आजूबाजूच्या वर्तुळात बघायला मिळतो. विझलेल्या वेदला पुन्हा आयुष्य जगताना बघून आनंदानं प्रत्यक्षात किंवा मनात टाळ्या न पिटणारा प्रेक्षक दुर्मीळच. 'तमाशा' हा दृश्यकलेच्या निकषांनी समजायला अतिशय अवघड होता. चित्रपटामध्ये येणारे पौराणिक, लोककलांचे संदर्भ हे चित्रपट संहिता लिहिणाऱ्या लोकांनी आवर्जून अभ्यासायला हवेत असे आहेत.
इम्तियाजच्या चित्रपटांची कल्पना संगीताशिवाय करताच येत नाही, इतकं संगीत त्याच्या चित्रपटात महत्त्वाचं असतं. गाण्यांचा वापर चित्रपटात इतक्या हुशारीनं करणारे दिग्दर्शक मोजकेच आहेत. माझे चित्रपट जितके माझे आहेत तितकेच प्रीतम, संदेश शांडिल्य आणि रहमानचे आहेत, अशी बिनदिक्कत कबुली मुलाखतीमध्ये देणारा इम्तियाज दुर्मीळ दिग्दर्शक आहे. आता त्याच्या पुढच्या चित्रपटात शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा आहेत. या चित्रपटातून तो कुठली अनवट तान छेडतो याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये आहे.
‘तमाशा’मध्ये पियुष मिश्रानं एक स्टोरीटेलर रंगवला आहे. लहानग्या वेदच्या मनात त्याने अनेक रंगीबेरंगी स्वप्नांची पेरणी केलेली असते. वेद तरुण होतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर पुन्हा स्वप्न का आयुष्य अशा धर्मसंकटात अडकतो. वेदला तो स्टोरीटेलर आठवतो. तो पुन्हा त्याच्याकडे जातो. स्टोरीटेलर आता व्यक्ती आणि वल्लीमधल्या हरितात्यांसारखा आंधळा झाला आहे. तो म्हातारा तिखट भाषेत वेदची हजेरी घेतो आणि ‘तुझी स्वप्न तू नाही पूर्ण करणार तर कोण करणार?’ असं सुनावतो. इम्तियाज अली हा असाच एक तरुण पिढीचा स्टोरीटेलर आहे आणि तुम्ही-आम्ही त्याचे वेद आहोत.
लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Shrikant Agawane
Sat , 25 March 2017
देव, अनुराग काश्यपचे रक्षण करो.