अजूनकाही
टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार अंबरीश मिश्र हे माझ्यासकट अनेकांचे एक्स फ्रेंड. त्यांना नुकतीच साठ वर्षं पूर्ण झाली. त्यावेळी ते म्हणाले, ‘मी गेली दहा वर्षं लोकांना भेटत नाही. This society doesn’t deserve me.’ त्यामुळे ही काही त्यांच्यावरची टीका नव्हे. त्यांना साठ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत त्यांची मुलाखत झाली. ही मुलाखत अत्यंत आल्हाददायक, सुरेली होती. सहसा ते असे खुलून येत नाहीत. अनेकदा त्यांच्या कार्यक्रमापूर्वी ते उदास असतात. ते भयंकर मुडी आहेत. मात्र त्याचबरोबर हिंदी सिनेमातील गाणी, संगीतकार, अभिनेत्री, अभिनेते, चाळीस ते सत्तर कालावधीतील दिग्दर्शक, लेखक, कलावंत यांच्याबद्दलचा एक मोठा खजिना त्यांच्याकडे आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं विलक्षण लोकप्रिय आहेत. ‘शुभ्र काही जिवघेणे’, ‘गंगेमध्ये गगन वितळले’, ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ आणि ‘दरवळे इथे सुवास’ ही त्यांची चारच पुस्तकं. केवळ इतकं मोजकं लिहून स्वतःचा वाचक वर्ग मिळवणारा हा लेखक आहे. अर्थात मिश्र यांची शैली वाचकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पु. ल ते शिरीष कणेकर ते द्वारकानाथ संझगिरी अशी जी काही शैलीमध्ये मांडणारी मंडळी आहेत, त्यात माझ्या दृष्टीने मिश्रही मोडतात.
एकतर मिश्र यांना खुलायला वेळ लागतो. या मुलाखतीमध्ये ते फार कमी वेळात खुलून आले. रवींद्र मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली. मांजरेकर यांनी त्यांची पत्रकारीतेची कारकीर्द, बालपण, सिनेमा, संगीत अशा विषयांना धरून प्रश्न विचारले. एका प्रश्नाच्या वेळी मिश्र म्हणाले, ‘स्पेसिफिक विचारा.’ त्यामुळे प्रश्नं टोकदार होते आणि उत्तरं आटोपती होती. दीड तास ही मुलाखत चालली. यावेळी मिश्र यांनी बालपणीच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यांची आई नाटकात काम करत असे आणि वडील सिनेमाक्षेत्रात होते. मास्टर विनायक यांच्याबरोबर त्यांनी दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तीनएक सिनेमांचं काम केलं होतं. त्यामुळे त्यांचा सिनेमातील थोरामोठ्यांशी नेहमीच संवाद असे. ही मंडळी सतत घरी येत-जात असत. मिश्र यांनी एक आठवण अशी सांगितली की, एकदा ग.दि. माडगूळकर आईला भेटायला सेटवर आले. गिरगावातच नाटक असल्यामुळे त्याचे वडील आणि अंबरीश तिकडे होते. ते वडिलांना शोधत आले आणि गदिमांनी वडिलांना अक्षरशः उचलून घेतलं. ते म्हणाले, ‘मी कधीचा तुला शोधतोय.’ त्यानंतर दोन तास दोघांच्या जोरदार गप्पा झाल्या. त्यानंतर एक विलक्षण आठवण मिश्र यांनी सांगितली. ते म्हणाले की, ‘‘घरात तशी फारशी बंधनं नव्हती. मी मुंबईतल्या तीन उत्कृष्ट शाळांपैकी एका शाळेत होतो. वडील तसे ओरडत नसत. क्वचित त्यांनी एक-दोनदा मारलं असेल, पण ते खूप लाड करत. आई त्यांना म्हणाली, ‘अहो, त्याला गणित येत नाही, त्याला गणित शिकवा’. तर ते म्हणाले, ‘त्याला तबल्याचा क्लास लावा, ताल जमला की गणित जमायला लागेल.’ ” असं हे कलंदर कुटुंब.
मिश्र गिरगावात राहायचे. आजूबाजूच्या मंडळीना त्यांचं कोडं वाटायचं. त्यांना वाटायचं की, हे मुस्लीम आहोत. शाळेमध्ये शब्दांचे स्वरांचे कसे आग्रह असतात, हे सांगताना त्यांनी आपण क्वायर ग्रुपमध्ये होतो हे सांगितलं. चक्क गाऊनही दाखवलं. मिश्र यांचा सूरही चांगला आहे हे त्यावेळी लक्षात आलं. त्याचवेळी त्यांनी सांगितलं की, ‘‘Riverसारख्या शब्दात शेवटचा r सायलेंट असतो किवा Policeचा खरा उच्चार ‘पलीस’ असा आहे. हे शाळेत सांगत असत, मात्र आता उच्चारांचा आग्रह धरला जात नाही.’
मिश्र यांच्या मते चाळीस ते सत्तर हा हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ होता. त्या काळातल्या चित्रपटांनी समाजाला काही ना काही दिलं आहे. उदाहरणार्थ, राज कपूरच्या चित्रपटात एक संवाद आहे. ‘अनाडी’मध्ये फाटक्या कपड्यातल्या राज कपूरला एक पाकीट मिळतं. ते घेऊन तो पार्टीत पोहोचतो. तिथं सर्व श्रीमंत लोक असतात. तो चंदुलालला भेटतो आणि त्याला ते पाकीट देतो. तो त्याला म्हणतो की, ‘ये सब अमीर लोक देख रहे हो! इनको भी कभी ऐसा पाकीट मिला था मगर वो वापीस करना भूल गये’. अशा छोट्या मोठ्या गोष्टी सांगून ही मुलाखत रंगत गेली.
तेव्हाचे सगळेच संगीतकार स्वतःला मॅस्ट्रो (maestro) समजत आणि गायकांना कमी लेखत. त्यामुळे एकदा मदनमोहन एका चाली साठी अडले होते. गाणी तयार होती. लतादीदी स्टुडिओत ९:३० वाजता तयार होत्या. पण मदनमोहनची चाल काही ठरली नव्हती. ते सिगरेट मागून सिगरेट ओढत होते. स्टुडिओत धूर झाला होता. दीड तास काहीच झालं नाही. तेव्हा लतादीदी म्हणाल्या, ‘मी गाणं बघू का?’ मदनमोहन जरा किंचित त्रागा करून त्यांच्याकडे पाहिलं. म्हणाले, ‘म्हणजे आता तू पण गाणं बघणार का?’ त्या गाणं बघून म्हणाल्या, ‘माझ्या वडिलांनी मला काही शिकवलं होतं. गुणगुणून दाखवू का?’ त्यावर मदनमोहन आणखीनच रागावले. मनात म्हणाले असणार, ‘आता तू आम्हाला चालही सांगणार का?’ लतादीदींनी काहीतरी गुणगुणून दाखवलं. ते मिश्र यांनी गाऊन दाखवलं. ‘ल र ल ला ला’ ही त्या रागाची बंदिश होती. मदनमोहन म्हणाले, ‘तू, जा. अर्धा तास घरी जाऊन ये.’ नंतर मदनमोहन यांनी चाल लावली. ते गाणं होतं - तू जहाँ जहाँ भी हो तेरा साया’. या प्रकारे सिनेमात दंग असताना, गाणी गुणगुणत असताना मिश्र राजकारणावर आणि पत्रकारितेवर आले.
त्यांनी सांगितलं की, ‘मी पत्रकारिता करतो, पण मी कुणाच्याही बाजूने असत नाही. म्हणजे काँग्रेसनंच का नेहमी निवडून यावं, भाजपनं का नाही, असं मला वाटतं. आता जर तीस-चाळीस वर्षं भाजप टिकला आणि मी जिवंत असलो तर मी म्हणेन की, भाजपनेच का निवडून यावं?’ त्यानंतर त्यांना ‘झिम्मा’ या विजया मेहतांच्या पुस्तकाच्या शब्दांकनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, ‘‘त्याचं मी शब्दांकन केलेलं नाही. सर्व मजकूर बाईंनी लिहिला आहे. विजया मेहता दर आठवड्याला मला आत्मचरित्राचा भाग लिहून पाठवत. तो मी वाचून त्यांच्याशी चर्चा करत असे. बाईंनी नाटकात मोठी कामगिरी घडवली. अनेक प्रयोग केले. पण भाषेबद्दल मात्र त्या तशाच होत्या. त्या ‘तेथील’ असं लिहायच्या. मला एकदा म्हणाल्या, ‘तुम्ही ‘केलं’ वगैरे का म्हणता, ‘केले’ का नाही?’ तर मी त्यांना म्हणायचो की, ‘बाई हल्ली असंच लिहितात.’ अर्थात कुठलंही आत्मचरित्र १०० टक्के खरं नसतं. अनेक गोष्टी त्या मला सांगायच्या आणि म्हणायच्या की, हे लिहायचं नाही. मी म्हटलं, ओके. कारण आत्मचरित्रातून काहीतरी ठोस आलं पाहिजे. उदा. दुर्गा खोटेंचं आत्मचरित्र घ्या. ते अमुक अमुक पिस्त्याचं वरण करायचे वगैरे. या गोष्टी ठीक आहेत, पण तुम्हाला ठोसही मजकूर मिळाला पाहिजे.’’
त्याच प्रकारे त्यांनी शरद पवार यांच्या आत्मचरित्राबद्दलही सांगितलं. ते म्हणाले की, “पवारांचं पूर्ण आत्मचरित्र लिहून झाल्यानंतर सुप्रियाबाईंनी मला बोलवलं आणि म्हणाल्या, ‘तुम्ही काही करू शकता का? तुम्हाला काय शीर्षक सुचतंय.’ त्याच्या आधी कोणीतरी ‘ऐलतीर पैलतीर’ असं सुचवलं होतं. मी म्हटलं, ‘कुसुमाग्रजांची एक कविता आहे- ‘एकच तारा समोर आणि पायतळी अंगार’. त्यातलं 'पायतळी अंगार'. त्या म्हणाल्या, ‘हे आपण हाताशी ठेवू’. मग दत्ता बाळसराफ यांना त्यांनी विचारलं. तर ते म्हणाले ‘लोक माझे सांगाती’.” हे शब्द उच्चारून मिश्र यांनी टेबलावर थाप मारली. जणू त्या शीर्षकाला दिलेली दादच. ते म्हणाले, “हे शीर्षक अत्यंत योग्य आहे. याचं कारण पवारसाहेबांची इनिंग अजून चालू आहे. सतत लोक त्यांच्या मागे आहेत आणि सतत ते लोकांमध्ये राहिलेले आहेत. म्हणून हेच शीर्षक योग्य आहे.”
शेवटी थोडंसं रागानं मिश्र म्हणाले, “गेली दहा वर्षं मी सर्वांशी मोकळेपणाने बोलणं सोडलंय. त्याआधी मी खूप बोलत असे. माझ्या एक लक्षात आलं की, अनेक जणांचा गप्पांमधला रोल असा असे की, नळ वाहतोय तर बादली भरून घ्या. दुसर म्हणजे लोकांचा मी खूप वाईट अनुभव घेतलाय. मी मुलांना शिकवायचो. एक नवरा-बायको माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘आम्ही पिक्चरला चाललोय. तेवढ्या वेळात आमच्या मुलीला शिकवाल काय?’ I don’t think this society deserv me. मी खूप एकटा पण आनंदी आहे. शेजारची दोन वर्षांची छोटीशी मुलगी आहे. तिच्याबरोबर मी खूप रमतो.”
पुढे त्यांनी असं सांगितलं की, मुंबईच्या अंडरबेलीमध्ये मी काम करतो. भाजप सरकारबद्दल मला असं वाटतं की, हे सरकार कुठेतरी गहन झाल्याचं दिसतं. म्हणजे मोदी आणि नेहरूंमध्ये मला खूप साम्य वाटतं. नेहरू जरा अवस्थ झाले की, ते परदेशी जाऊन येत. मोदींचंही असंच झालं की, ते परदेशी जातात आणि तिथं ते फेमस होऊन येतात. आणखी एक म्हणजे समाजाचा मोठा भाग भरपूर गरीब आहे. आणखी एक म्हणजे, गेल्या काही वर्षांत बदल घडतोय, हे पत्रकारांच्या लक्षात आलं नाही. माझ्याही उशिरा लक्षात आलं. १९९४ नंतर गुजरात, उत्तर प्रदेश या सगळ्या नॉर्थ इंडियन भागात तरुण पिढी जन्मलेली आहे. तिला तुमची आयडियॉलॉजी किवा इतर कोणत्याही गोष्टीचं सोयर-सुतक नाही. तिला सबसिडी वगैरेत इंटरेस्ट नाही. त्यांचं म्हणणं असतं की, तुम्ही काहीही जुगाड करा, पण आपलं काम होऊ. द्या उत्तर प्रदेशात जर चार मुलं असली तरी एक भाजपमध्ये, एक काँग्रेसमध्ये, एक आपमध्ये असतो. ही जी जुगाड करणारी मुलं आहेत, ती फार धाडसी असतात.”
तर अशी ही मुलाखत, असे हे अंबरीश मिश्र!
लेखक पुस्तकविक्रेते आणि संग्राहक आहेत.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
manisha shinde
Wed , 30 November 2016
'धीस सोसायटी डझन्ट डिझर्व मी' ही फक्त आत्मप्रौढी आहे. याच समाजात किती व्यक्ती प्रामाणिकपणे, निष्ठेने, एकाकीपणे काम करतात, याची माहिती मुंबईत राहूनराहून मिश्र यांना नसावी. असो. असे मिश्र सूर उमटणे लोकांनाही ऐकायला आवडत असावे. काम करणारे त्यात्या वेळी असेल त्या समाजपरिस्थितीत काम करीत राहातात. काही हळवे लेख शैलीदारपणे लिहून स्वतःबद्दलची भाबडी प्रतिमा करण्यापेक्षा निष्ठेने काम करणारे लोक पुढे आणा. वाटले तरच करा, अन्यथा हे मुंबईचे मिश्र पैशाला पासरी सापडतील. डझन्ट डिझर्व म्हणे.
Manoj Kulkarni
Thu , 27 October 2016
अक्षरनामाचे आभार
Manoj Kulkarni
Thu , 27 October 2016
मस्त माणूस सोलापूरला आलेले झक्कास खुललेले आणि आम्ही सारे मंत्रमुग्ध. सर खूप खूप शुभेच्छा खूप