‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : सर्वंकष आकलन’ हे डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित व संपादित पुस्तक नुकतेच अक्षर दालन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केले आहे. यात लवटे यांच्यासह डॉ. सदानंद मोरे, डॉ. राजा दीक्षित, डॉ. जर्नादन वाघमारे, किशोर बेडकिहाळ, डॉ. अशोक चौसाळकर यांच्या लेखांचा समावेश आहे. शेवटी तर्कतीर्थांचा जीवनपट व ग्रंथसूचीही दिली आहे. या संग्राह्य ग्रंथातील एका लेखाचा हा पूर्वार्ध…
.................................................................................................................................................................
थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राच्या विसाव्या शतकातील पहिल्या पूर्वार्धापासून ते अस्तापर्यंत आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये प्रचंड योगदान दिलं. इथल्या विचारवंतांना अभ्यासक्रीय दिशा दिली आणि ‘विश्वकोशा’च्या आधारे कामाचा डोंगर उभा केला. २०१९ साली त्यांना जाऊन २५ वर्षे झाली. १९९४ला ते गेले. या २५ वर्षांच्या काळात तर्कतीर्थांच्या काही लेखांच्या पुनर्प्रकाशनाशिवाय त्यांच्याविषयी काही घडलं नाही. ते गेल्यानंतर प्रसिद्ध झालेले काही लेख सोडले, तर या २५ वर्षांत त्या अर्थानं तर्कतीर्थांच्या वाङ्मयाची चिकित्सा म्हणा किंवा त्यांच्या ग्रंथांची चर्चा म्हणा, असं काहीच बौद्धिक विश्वामध्ये घडलं नाही.
याचा एक अर्थ असा की, आपण आपल्याला घडवलेल्या माणसांना किती पटकन विसरतो किंवा तसं नसेल समजा, तर मग आपली बौद्धिक आस्था कमी झाली आहे, असं तरी म्हणावं लागेल. वास्तव हे असं आहे. मध्यंतरी वाईला एक चर्चासत्र झाले, २०२०च्या काळात. त्यात तर्कतीर्थांच्या लेखनाची सर्वांगीण चिकित्सा करण्याचा प्रयत्न विविध अंगांनी झाला. विविध अंगांनी, असं म्हणायचं कारण की, ज्या प्रकारचे वैचारिक दृष्टीकोन ८०-९०पूर्वी वैचारिक चर्चेमध्ये नव्हते, असे अभ्यासातील नवे प्रवाह घेऊन तर्कतीर्थांच्या लेखनाची चिकित्सा करण्याचा प्रयत्न झाला.
उदाहरणार्थ, त्यांच्या काही पुस्तकांचं स्त्रीवादाच्या आधारे कसं वाचन करता येतं. आता प्रसिद्ध असणाऱ्या ज्या इतिहासमीमांसा आहेत, त्या अब्राह्मणी इतिहासमीमांसेतून शास्त्रीजींच्या लेखनाकडे पाहिलं, तर काय दिसतं? असे जे नव नवे ज्ञानशाखांचे प्रवाह आहेत, त्यांच्यामधून त्यांच्या चिकित्सेचा एक चांगला प्रयत्न झाला. तो सोडला तर मला वाटतं, मराठी विश्वामध्ये तर्कतीर्थांच्या मृत्यूनंतरही त्यांची चिकित्सा फारशी झाली नाही, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
शास्त्रीजींचा वैचारिक वकुब खूप प्रचंड होता. जवळजवळ एक शतक शास्त्रीजींनी पाहिलं. अलीकडे अभ्यासक असं म्हणतात की, एकोणिसावं शतक हे फार प्रदीर्घ शतक होतं. म्हणजे १८०१ ते १९१७ असं १९वं शतक सामान्यतः अभ्यासकांमध्ये धरलं जातं. विशेषतः पुरोगामी अभ्यासकांमध्ये विसावं शतक फार छोटं शतक आहे. याच्यामध्ये गृहीत हे आहे की, एकोणिसाव्या शतकामध्ये समाजवादाचा, राष्ट्रवादाचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार, लोकशाहीचा विचार जोरकसपणे चर्चेमध्ये आला. त्याच्या आधारे काही राष्ट्राची जडणघडण झाली. भारत हे राष्ट्र उभं राहिलं. विसाव्या शतकात सोव्हिएत रशियात १९१७ साली झालेल्या क्रांतीमुळे साधारणतः तिसऱ्या जगातल्या देशांना एक मोठा दिलासा मिळाला की, अशा तऱ्हेची न्यायावर आधारलेली समाजरचना क्रांतीच्या मार्गानं निर्माण होऊ शकते. म्हणून जगभराच्या श्रमिकांचं आशास्थान म्हणून सोव्हिएत रशियाकडे बोट दाखवलं गेलं.
१९९१ साली सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. क्रांती संपली. आणि रशियात असणारी जेवढी संघराज्यं होती, ती सगळी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आली. तिथं विसावं शतक संपतं.
म्हणजे अभ्यासकांच्या दृष्टीनं विसावं शतक १९१७ ते १९९० असं जर धरलं, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या काळामध्ये एक शतक जगले, असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांचा जन्म १९०१ चा. १९१४ साली ते वाईच्या प्राज्ञपाठशाळेत विद्यार्थी म्हणून दाखल झाले. तो सगळा जाणिवा येण्याचा, घट्ट होण्याचा काळ. १९१७च्या सोव्हिएत क्रांतीपासून ते सोव्हिएत क्रांतीचा पाडाव होईपर्यंत १९९०पर्यंत तर्कतीर्थांच्या जाणिवेतून समाज पाहण्याचं शतक ज्याला म्हणता येईल, असं शतक आहे. त्यांनी सोव्हिएत क्रांती वार्तांकनातून पाहिली असणार. दोन महायुद्धं झाली, स्वातंत्र्यविषयक अनेक परिषदा झाल्या, काही परिषदांमध्ये तेही उपस्थित होते.
स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यासाठी चाललेल्या इतर चळवळी पाहायला मिळाल्या. फॅसिझमचा उदय व अस्त पाहायला मिळाला. त्यानंतरचं शीतयुद्ध पाहायला मिळालं. सोव्हिएत रशियाचं विघटनही त्यांना पाहायला मिळालं. एवढं सगळं भरगच्च शतक पाहत असताना तर्कतीर्थांच्या एकूण विचारविश्वात आपल्याला अनेक प्रकारच्या घडामोडींचा एक मोठा पट दिसतो. परंपरेकडून आधुनिक होण्याच्या प्रक्रियेकडे जाणाऱ्या कालखंडाचे ते साक्षीदार होते व प्रतिनिधीही. या कालखंडात त्यांच्या विचारांची दिशा पुरोगामी राहिली. अभ्यासक, कृतिशील राजकीय कार्यकर्ते, विचारवंत व तत्त्वचिंतक ही सारी त्यांची रूपं होती. साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ या संस्थांचे दीर्घकाळ नेतृत्व करून त्यांनी मराठी विचारविश्वाचे नेतृत्व केलं.
आपल्याला त्यांची माहिती एक थोर तत्त्वचिंतक, एक धर्मशास्त्राचा अभ्यासक पंडित या अंगानं आहे. पण त्याच्या पलीकडे तर्कतीर्थांची विविध रूपं या कालखंडात दिसतात. एका बाजूला धर्मशास्त्राचा अभ्यासक, दुसऱ्या बाजूला समाजसुधारणांचा प्रयत्न करणारा समाजसुधारक, तिसऱ्या बाजूला महान विचारांनी भरलेला एक कार्यकर्ता, चौथ्या बाजूला रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आणि मार्क्सवादाच्या पलीकडे जाण्याची भूमिका घेतलेला विचारवंत... नंतरच्या काळात काँग्रेस पक्षाशी संबंधित राहून त्याला मार्गदर्शन करत आपली ज्ञानसाधना आणि लेखन चालू ठेवणारा असंही एक रूप आहे. आपण आता विचार करणार आहोत, तो त्यांच्या ‘पुरोगामी प्रबोधक’ या भूमिकेचा.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
प्रबोधकांची भूमिका काय असते, तर त्याला प्रचलित समाज व्यवस्थेमधील या ज्या ज्या त्रुटी जाणवत आहेत आणि ज्या मूल्यांचा आधार घेऊन समाजरचना उभी राहिली पाहिजे असं त्याला वाटतं, त्या मूल्याचा सतत प्रचार करत राहणं, ती मूल्य लोकांसमोर मांडत राहणं, त्यांची तर्कशुद्ध मांडणी करणं आणि ती लोकांना पाठवत राहणं. मग त्यासाठी व्याख्यानं असतील, लेखन असेल, मासिक काढणं असेल, विश्वकोशातील नोंदी असतील, साहित्य संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित झालेली पुस्तकं असतील, नवनवे उपक्रम असतील, साहित्यिक चर्चा असतील, हे सर्व या साधनांचा एक भाग म्हणता येईल.
त्यांनी स्वतः विश्वकोशात केलेलं लेखन, स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतर केलेलं लेखन, दिलेली व्याख्यानं, त्याची झालेली पुस्तकं ही सगळी त्यांची प्रबोधनाची साधनं आहेत असं मला वाटतं. या आधारे भक्कमपणे ते समाजसुधारणेची, प्रबोधनाची एक भूमिका मांडत राहिले, असं आपल्याला म्हणता येईल.
शास्त्रीजींच्या सामाजिकतेची सुरुवात प्राज्ञपाठशाळेत गेल्यानंतर झाली. पण १९२१च्या दरम्यान ते सामाजिक विचारविश्वामध्ये एका सामाजिक प्रवाहाचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. १९२१ला एक पार्श्वभूमी आहे. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत ते स्वामी केवलानंद सरस्वती यांचे शिष्य, विद्यार्थी होते. केवलानंदांनी १९२१च्या आसपास एका धर्मनिर्णय मंडळाची स्थापना केली. (भारताच्या प्रबोधनाची सुरुवातसुद्धा धर्मचिकित्सेपासूनच झालेली आहे).
महाराष्ट्रातील प्रबोधनावर म्हणजे एकोणिसाव्या व विसाव्या शतकावर नजर टाकली - फुले, आगरकर, रानडे आणि आंबेडकर घेतले - तर हे दिसतं की, धर्म प्राधान्यानं इथल्या प्रबोधनाच्या चिकित्सेचा विषय झालेला आहे. ही चिकित्सा कशासाठी, तर हिंदू धर्मामध्ये कालोचित बदल व्हायला हवेत, अशी केवलानंदांची भूमिका होती. ते काही मार्क्सवादी, समाजवादी किंवा आजच्या भाषेत विद्रोही गटातील नव्हते. ते पारंपरिक धर्मशास्त्र शिकलेले, तरी त्यांना असं वाटत होतं की, कालोचित बदल व्हायला पाहिजेत.
प्रबोधन म्हटलं की, या बदलाच्या मागची वैचारिक भूमिका कोणती, हा प्रश्न उपस्थित होतो. कुठल्या भूमिकेतून हे काम होतं? शास्त्रीजींच्या प्रबोधन विचारविश्वाचा धांडोळा घेतला, तर त्यांच्यामध्ये आपल्याला साधारणतः १९३२ पूर्वीचे शास्त्रीजी आणि १९३२नंतरचे तर्कतीर्थ आणि साधारणतः १९४८ नंतरचे शास्त्रीजी असा फरक करावा लागेल. १९३०-३२ पूर्वीचे जे शास्त्रीजी आहेत, त्याबाबत त्यांनी स्वतःच असं म्हटलं आहे की, या कालखंडात मी भौतिकवादी झालेलो नव्हतो, पण समाजसुधारक होतो. म्हणजे सुधारणांचा विचार मी केला, पण मी काही भौतिकवादाच्या दृष्टीतून त्याचा विचार केला नाही. १९३२नंतर धुळ्याच्या जेलमध्ये असताना किंवा विनोबांबरोबर असताना आचार्य जावडेकर वगैरे मंडळींबरोबर मार्क्सवादांचं अध्ययन करण्याची संधी त्यांना मिळाली. येथे मार्क्सच्या विचारांचा परिणाम त्यांच्या मनावर झाला. इथून पुढे ते भौतिकवादी झाले असं म्हणता येईल. मार्क्सची जी समाजपरिवर्तनाची कल्पना आहे किंवा समाजाकडे बघण्याची जी वर्गीय दृष्टी आहे, तिचा त्यांनी त्या काळात स्वीकारही केलेला दिसतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
१९३७ साली ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या सहवासात आले. ती त्यांची पहिली भेट. रॉय त्या काळात मार्क्सवादाच्या विचाराने भारलेले आणि क्रांतिकारक घडामोडींमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या हालचाली व धडपड चालू होती. भारतात आल्याबरोबर त्यांना अटक झाली, कारण त्या वेळेला ते कम्युनिस्ट होते. नंतरच्या काळामध्ये शास्त्रीजींची आणि त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये शास्त्रीजींबद्दल एक कुतूहल निर्माण झालं. ते असे म्हणायचे की, तर्कतीर्थ हे पूर्व आणि पश्चिमेचं संगम असणारं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व आहे. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही तत्त्वज्ञानाचा त्यांनी खोलवर जाऊन अभ्यास केलेला आहे. त्यांचं कुतूहल शेवटपर्यंत कायम राहिलं.
पुढे तर्कतीर्थ मार्क्सवादापासून दूर जायला लागले. १९४८ साली त्यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीचे जे शेवटचं अधिवेशन कलकत्त्याला झालं, त्याचे अध्यक्ष तर्कतीर्थ होते. त्यात (जो पक्ष रॉय यांनी काढलेला होता) मार्क्सपासून फारकत घेऊन मार्क्सच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे, अशी भूमिका रॉय यांनी मांडली होती. ती तर्कतीर्थांनाही मान्य होती. म्हणजे एकोणिसाव्या किंवा विसाव्या शतकात आम्हाला समाजवाद का हवा होता, मार्क्सवाद का हवा होता, तर व्यक्तीला समाजाच्या बंधनातून मुक्त करायचं होतं. आता आम्हाला मार्क्सवाद, समाजवादाच्या पलीकडे का जायचं आहे, तर आता आम्ही व्यक्ती पूर्णपणे स्वायत्त करू इच्छितो. व्यक्तीवर कुठल्याही विचारप्रणालीचं दडपण असता कामा नये, या अर्थानं एक मुक्त, सर्जनशील आणि स्वायत्त, अशा व्यक्तीची संकल्पना त्यांच्या शेवटच्या कालखंडात दिसते.
नवमानवतावादाचं साहित्य निर्माण झालं, त्याचाही त्यांच्यावर काही काळ प्रभाव पडला. भौतिकवादी नसण्यापासून भौतिकतावादी असण्यापर्यंत, भौतिकवादाकडून जडवादापर्यंत, जडवादापलीकडे जाऊन नागार्जुनापर्यंत आणि मार्क्सवादापलीकडे जाऊन मूलगामी मानवतावादापर्यंत होण्यामध्ये, असे शास्त्रीजींच्या वैचारिक प्रवासाचे टप्पे आपल्याला दाखवता येतात.
हे एवढ्यासाठी लक्षात घ्यायला हवं की, त्यांचं हिंदू धर्मातील सुधारणांचं काम साधारणतः १९३० पूर्वीचं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्यावर मार्क्सवादाचा, जडवादाचा पगडा नाही आणि धर्मसुधारणेची भूमिका घेत असल्यामुळे आस्तिक-नास्तिक या वादामध्ये ते फारसे दिसत नाहीत. जडवादावरचं त्यांचं पुस्तक त्यांनी १९४१ साली तीन व्याख्यानं दिली, त्यातून तयार झालं. त्या पुस्तकाचा खूप परिणाम महाराष्ट्रातील अभ्यासकांवर झाला. ते पुस्तक ‘वादविवेचन माले’ने प्रसिद्ध केलं. (नरहर कुरुंदकरांसारखा विचारवंत असं म्हणायचा की, मी जडवादी झालो, ते शास्त्रीजींच्या या पुस्तकाच्या वाचनामुळेच.)
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
तर्कतीर्थांकडे एक प्रबोधक म्हणून आपण पाहतो. त्यांच्या कालखंडात कोणत्या गोष्टी होऊन गेलेल्या होत्या पहा. १९३० पूर्वी आपल्याकडे धर्मामध्ये सुधारणेच्या अंगाने तीन प्रवाह निर्माण झालेले होते. एका बाजूला ब्राह्मो समाजाचा बंगालमधील प्रवाह होता, जो आपल्याकडे प्रार्थना समाजाच्या रूपानं अवतरला. आर्य समाजाचा एक प्रभाव होता आणि फुलांच्या सत्यशोधक समाजाचा एक प्रभाव. हे तीन प्रवाह एक वेगळी धर्मविषयक भूमिका घेऊन उभं राहताना दिसतात. यातील फुल्यांची भूमिका जास्त क्रांतिकारक आणि मूलगामी होती. याउलट रानड्यांची, प्रार्थना समाजाची भूमिका समन्वयाच्या अंगानं जाणारी आणि परंपरा व नवा विचार यांचा समन्वय कुठे होईल, हे शोधणारी होती. पण समाजाचं अधिष्ठान आधुनिकतेच्या अंगानंच आहे, पण तरीही परंपरा आणि समन्वय हे झालं तर अधिक टिकाऊ स्वरूपाचं परिवर्तन होईल, अशी रानड्यांची श्रद्धा होती. फुल्यांना मूलगामी परिवर्तन हवं होतं, म्हणून त्यांनी आधीची परंपरा पूर्णपणे नाकारली आणि नव्या एका परंपरेचा आरंभ करण्याचा प्रयत्न केला.
आर्य समाज हा हिंदूंचा वेदान्त अपौरुषत्व मान्य करणारा, पण जातीभेद अमान्य करत असणारा, शूद्रातिशूद्र यातील भेद अमान्य करणारा, संमिश्र विवाह करणारा, शूद्रांचा मौजीबंधन करणारा, असा मोठा हिंदू धर्मात सुरू झालेला. या तीन प्रवाहांपैकी फुले यांचा सत्यशोधक समाज राजकारणाच्या प्रवाहात गेल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतरीत झालेला दिसतो. आर्य समाजाचे संघटन व कार्य एका बाजूला त्यांच्या पद्धतीनं चालू होतं. आर्य समाजाच्या कडवेपणातून धारदार हिंदुत्व प्रवाहाची निर्मिती झाली. तो प्रवाह हिंदूअंतर्गत सर्वसमावेशक होता. त्या काळी सुधारकांनी किंवा प्रबोधकांनी आपण हिंदू असणं नाकारावं की स्वीकारावं हा मूलभूत प्रश्न होता.
त्याचं तर्कतीर्थांनी दिलेलं उत्तर असं आहे की, तुम्हाला धर्म नाकारायचं काही कारण नाही. तुम्ही ज्या धर्मात जन्माला आलेले आहात, तो धर्म तुमचा आहे आणि तुम्हाला सुधारणा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही हिंदू असल्यामुळे तुम्हाला हिंदू धर्मात सुधारणा सुचवता येतात, स्वीकारता येतात आणि हिंदू न राहूनही तुम्हाला हे काम करता येऊ शकतं.
पण त्या काळाची चौकट लक्षात घेता, शास्त्रीजींच्या कालखंड लक्षात घेता, ते हिंदू धर्माच्या चौकटीमध्ये शास्त्राचा सगळा विचार करताना दिसतात. त्यात त्यांची पोझिशन काय? १९३० पूर्वी शास्त्रीजी भौतिकवादी नाहीत आणि केवलानंदही. मग त्यांच्या सुधारणांच्या विचारांचं अधिष्ठान काय? कशासाठी धर्मसुधारणा? केवलानंदांचे उत्तर होतं, तेच शास्त्रीजींचं एका अंगानं उत्तर तयार होतं.
परंपरेच्या ओघामध्ये काळानुरूप जे बदल निर्माण होतात, पेच निर्माण होतात, त्या पेचांना उत्तरं त्या त्या कालखंडातल्या धुरिणांना शोधावी लागतात. ती उत्तरं शोधावी लागत असल्यामुळे नव्या प्रश्नांना भिडण्यासाठी जुन्या उत्तरांमध्ये काही बदल करावे लागतात. तेव्हा हा एका अर्थानं काळाचा महिमा आहे. काळाप्रमाणे बदलत जावं, ही साधी सरळ भूमिका आहे. त्यात भौतिकवादी आहे-नाही हा काही त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नव्हता. शास्त्रीजींच्या भूमिकेवरसुद्धा याचाच पगडा होता, पण त्यांनी ही भूमिका निरनिराळ्या पद्धतीनं त्यांच्या प्रबोधनाच्या कार्यात वापरलेली दिसते.
उदाहरणार्थ, धर्मनिर्णय मंडळ १९२१ साली स्थापन झालं. त्या मंडळापुढे हिंदू धर्मातील कोणत्या सुधारणांचे प्रश्न होते? बालविवाह, सजातीय-विजातीय विवाह यांना मान्यता, पोटजातींचे आपापसात होणारे विवाह, त्याला मान्यता द्यायची की नाही? स्त्रियांना असणारे अधिकार-हक्क, विविध जातींची असणारी सहभोजने, आंतरजातीय विवाह, विधवांचे पुनर्विवाह असे प्रश्न त्या काळात लोकांना भेडसावत होते. त्या प्रश्नांबद्दल एक अनुकूल मत निर्माण करणं, हे धर्मनिर्णय मंडळाने आपल्या समोरचं एक उद्दिष्ट ठरवलेलं. कारण या प्रश्नांना ही मंडळी भिडताना दिसतात.
हे करायचं तर त्यात मुख्य अडचण होती प्रचलित धर्मशास्त्राच्या आधारावर असणारी रूढी, पुराणं यांना पूर्णपणे अपौरुषेय मानणारा एक प्रवाह सनातन्यांमध्ये होता. त्यात काडीइतकाही बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बदल करायला आम्ही मान्यता देणार नाही, असं सनातनी पंडितांचं त्या वेळी म्हणणं होतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
शास्त्रीजी किंवा केवलानंद सांगत होते की, काळानुसार बदल करायला हवेत. त्या दृष्टीने चर्चा कोणाशी करायची? त्या कालखंडातील धर्मशास्त्रे आणि लोकांच्या धर्मश्रद्धा व धर्मपालन लक्षात घेतलं, तर थेट लोकांशी बोलणं हा काही मुद्दा नव्हता. धर्मशास्त्रामध्ये बदल अजिबात होता कामा नये, असे मानणारे आणि बदल व्हायला पाहिजेत असं मानणारे, अशा दोन प्रवाहांमध्ये चर्चेचा आखाडा तयार झालेला दिसतो. आणि इथून शास्त्रीजींच्या प्रबोधन कार्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली.
१९२३ला शास्त्रीजी आणि महादेवशास्त्री दिवेकर या प्राज्ञपाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी वाईमध्ये दोन दिवसांची एक परिषद भरवली. त्या वेळी १७ ब्राह्मणांचे गट-उपगट कार्यरत होते. एका अर्थानं सनातनी प्रवाह जो होता, त्याचं नेतृत्व वाईचे प्रसिद्ध काशीनाथशास्त्री लेले (हे गृहस्थ भाऊशास्त्री म्हणून प्रसिद्ध होते) यांच्याकडे होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की, शास्त्रांमध्ये वा पुराणांमध्ये एका अक्षराचा जरी बदल केला, तर आमची भूमिका त्याला विरोधाची राहील. त्यांचं असं मत होतं की, परंपरेनं वेदपठण चालत आलेलं आहे, पुराणं सांगितली जातात, प्रवचनं होतात, रूढी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, स्मृतिग्रंथ सगळीकडे प्रसिद्ध झालेले असतात, त्याच्या आधारावर जे काही लिहिलं गेलेलं आहे, ते सगळं अपौरुषेय अशा स्वरूपात असल्यामुळे त्याच्यात बदल करणं अजिबात योग्य नाही.
धर्मनिर्णय मंडळाच्या कामाचं अधिष्ठान झिडकारून टाकण्याची ही भूमिका होती. शास्त्रीजी काय सांगतात, तर कालक्रमानुसार बदल केले गेले असतील ते तुम्हाला माहीत नाही. वेदांच्या ऋचा, वेदांचे पठण हे पुढच्या पिढीपर्यंत पोचले कसे, तर ते पिढ्यानपिढ्या त्याचं पठण करून त्यांना ऐकवण्यात आलं आणि ऐकणाऱ्यांनी ते लिहून घेतलं, त्यांनी पुढे सांगत नेलं. त्यामुळे वेद लिहिले गेले नाहीत, फक्त ऐकवले जातात अशी परिस्थिती नव्हती. शास्त्रीजींच्या काळात वेदांचे ग्रंथ होते. याचा अर्थ शास्त्रीजींनी असा लावला आहे की, वेद पठण आणि वेद ऐकवणं या पिढ्यानपिढ्यांच्या गोष्टींमधून प्रत्येक पिढीत सांगणारी जी मंडळी असतात, ती आपापल्या दृष्टिकोनातून त्यात भर घालत असतात. त्यामुळे वेदातील मूळ ऋचा कोणती, याचा निर्णय करणं कठीण असतं. त्यामुळे त्या आधारे निष्कर्ष काढणं हे आणखी कठीण. तुम्हाला मूळ ऋचा ज्या काळात निर्माण झाली, त्या काळाची चौकट व संदर्भ पहावा लागतो आणि असं किती काळ तुम्ही करणार? कारण निर्माण झालेलं धार्मिक वाङ्मय हे पिढ्यानपिढ्या अशा पद्धतीनं पुढे गेलेलं असल्यामुळे, ते जसंच्या तसं अशा स्वरूपात पुढे जाणं शक्य नाही. त्या वेळचा संदर्भ आपल्याला माहिती नसतो आणि म्हणून आजच्या संदर्भात त्याच्याकडे पहावं लागतं. बदल यासाठी करावे लागतात की, हे सांगितलं एकानं, लिहिले दुसऱ्यानं, तर यांच्या चुका कुठे शोधायच्या? त्यांनी चूकच केली नाही, असं मानायचं? पण तसं म्हणता येत नाही. म्हणून त्या चुका प्रत्येक कालखंडामध्ये, बदलत्या काळामध्ये दुरुस्त्या कराव्या लागतात. त्यात तुम्ही धर्माच्या चौकटीत आखू नका.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
येथे शास्त्रीजींची भूमिका आहे की, जेव्हा आम्ही सुधारणा सुचवतो, तेव्हा त्यामागे असणाऱ्या धर्मप्रेरणा तुम्ही लक्षात घ्या. धर्मवचनांचा अर्थ लावताना, धर्माची प्रेरणा काय आहे, या धर्तीवर आपण गांधींच्या धर्मविचारांचा अभ्यास करू, तेव्हा असं दिसतं की, गांधींनीसुद्धा ही फारकत केलेली आहे. ‘स्पिरिट ऑफ रिलिजन’ वेगळं आणि ‘टेक्स्ट ऑफ द रिलिजन’ वेगळं. ‘टेक्स्ट ऑफ रिलिजन’ हे माणसांकडून लिहिलेलं असल्यामुळे अपूर्ण आहे, सदोष आहे. ते काळानुसार बदलावं लागतं. ते बदलण्याचं अधिष्ठान ‘स्पिरीट ऑफ रिलिजन’शी सुसंगत करावं लागतं. म्हणजे धर्मप्रेरणेशी सुसंगत करण्यासाठी तुम्हाला बदल करावे लागतात. तसे बदल तुम्हाला धार्मिक चौकटीतही करता येतात. याच्यासाठी धर्म सोडण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं काही नाही. म्हणून ‘रिलिजन ॲज अ रिलिजन’ आणि ‘रिलिजन ॲज ए कोड ऑफ कंडक्ट’ अशी विभागणी करून शास्त्रीजींनी आपल्या धार्मिक प्रबोधनाच्या भूमिकेचा विचार केलेला दिसतो.
स्मृतीवर आधारित जे लिखाण आहे, पुराणं, परंपरेनं चालत आलेलं वेदपठण, ते सतत बदलत गेलं आहे. नुसते बदल झालेले नाहीत, तर शतकानुशतकं धर्मग्रंथांचं लेखन भारतात चालत आलेलं आहे. आता आपण जी भांडारकर प्रत महाभारताची अधिकृत म्हणून मानतो, ती सिद्ध करण्यासाठी काय काय दिव्यं करावी लागली भांडारकर संस्थेला. कोणत्या कोणत्या शतकातील पोथ्या पाहाव्या लागल्या, कथा पाहाव्या लागल्या, कारण महाभारताचं लेखन हे अनेक पिढ्या चालत आलेलं लेखन आहे. अनेक ऋषी-मुनींनी त्यात योगदान दिलेलं आहे.
म्हणजे मूळ कथा जर व्हॅल्यूच्या अंगानं ‘अनलोडेड’ आहे असं मांडलं, तर पुढे ती नेत असताना प्रत्येक माणसाने त्याच्यामध्ये जी भर घातली, त्याच्यामुळे ‘नाऊ इट इज लोडेड’. तुमच्यासमोर जे महाभारत आज दिसतं, ते अशा अनेक बदलांमधून पुढे आलेलं महाभारत आहे.
दुर्दैवानं धर्मालाच मूळ धर्म समजण्याची चूक आजच्या उन्मादी धर्मकारणांनी केलेली आहे. त्याचे परिणाम आपण सर्व जण दंगे आणि दंगलींच्या रूपाने भोगतो. पण एखाद्या कसोटीच्या काळामध्ये नाइलाज म्हणून आपदधर्म हा - जसं विश्वामित्राने कच्चा मांस खाल्लं वगैरे - हा बाहेर जाण्याचा धर्माचाच भाग होता. म्हणून शास्त्रीजींचं म्हणणं असं की, साधारण धर्म जो आहे - ‘वे ऑफ लाइफ’ म्हणून लोक त्याच्याकडे पाहतात - त्याच्यामध्ये कालांतराने पेच उपस्थित होतात. उदा. व्यक्ती मेल्यानंतर पंधरा दिवस पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याची क्रियाकर्मं केली पाहिजेत. तसं करणारे काही लोक आधी आहेत, पण त्या कालखंडात माणसांना स्वास्थ्य होतं, शेतीप्रधान समाज होता, त्या काळात या गोष्टी शक्य होत्या. आज आयटीप्रधान असणाऱ्या समाजात पंधरा दिवस देणं शक्य आहे का? जर शक्य नसेल तर, त्यांना काहीतरी दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यायला पाहिजे.
हा डिबेट त्या वेळी चाललेली होती. त्याच्यातून मार्ग काढायचा म्हणजे धर्मामध्ये कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने हस्तक्षेप करायचा, असा त्याचा एक अर्थ सरळ सरळ होतो. शास्त्रीजी आणि केवलानंदांची जी परंपरा आहे ती धार्मिक चौकट न सोडणारी, कालानुरूप होणाऱ्या बदलांचा स्वीकार करणारी. उत्क्रांत होत जाणाऱ्या पद्धतीवर त्यांचा विश्वास आहे, म्हणून शास्त्रीजींच्या काळातील प्रबोधनामध्ये संवाद आणि वाद-विवाद यांचं चित्र दिसतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
१९२३नंतर आपल्याला असं दिसतं की अकोले, धुळे आणि सुरत या ठिकाणी ब्राह्मण परिषदा झालेल्या आहेत. या परिषदांमध्ये वादविवाद झाले आणि त्यात वल्लभपंतांचे आचार्य, शारदापीठाचे शंकराचार्य, अनंत कृष्णशास्त्री यासारखे कलकत्त्यातील विद्वान, काशीहून आलेले राजेश्वरशास्त्री द्रविड आणि त्यांची मंडळी हजर असत. त्यांची कशा पद्धतीने वाद-विवाद करायचा याची एक पद्धत होती. त्याचे समयबंध नावाचे ‘अॅग्रीमेंट’ असायचे. ते दोन्ही पक्षांना मान्य केले की, मग पूर्वपक्ष, उत्तरपक्ष या स्वरूपात वाद-विवाद होत. तर्कतीर्थांचं म्हणणं असं होतं की, या सगळ्या परिषदांमध्ये सनातनी मंडळी येत आणि सुधारणांच्या बाजूने कोण असत, तर तर्कतीर्थ, केवलानंद सरस्वती, पाठकशास्त्री आणि काही वेळेला तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे दप्तरी, पां. वा. काणे इत्यादी. या वादविवादात सनातन्यांनी बाजू जुनीच होती, पण ते नव्या नव्या युक्तिवादाद्वारा आपला मुद्दा सतत मांडायचे.
उदा. शास्त्रीजींनी असा एक प्रश्न उपस्थित केला होता की, उपनिषद असं सांगतात की, सर्व माणसं एकच आहेत. म्हणजे ते ब्राह्मण आहेत. मग सगळ्या माणसांना ब्राह्मण म्हणायचे की नाही, हा धर्मशास्त्रातील वादविवादाचा प्रश्न आला. शास्त्रीजींचा याचा आधार काय होता? एक, भृगू आणि भारद्वाज यांच्या संवादाचा. तिथं शंकराचार्यांचा दाखला होता, ज्या गोष्टी अपौरुषेय आहेत, त्यांची चर्चाच नाही. ‘तर्कोअप्रतिष्ठानम्’ असं शंकराचार्यांचं वचन आहे.
एका टप्प्यानंतर तर्काचा उपयोग करायचा नाही. मग कशाचा उपयोग करायचा? जे अपौरुषेय आहे, त्याला मान्यता द्यायची, त्याच्यात बदल करायचा नाही. शंकराचार्यांचा मुद्दा हा या सगळ्या चर्चांमध्ये शेवटचा म्हणून सनातन्यांकडून वापरला जायचा. शंकराचार्यांच्या शब्दाला जे पावित्र्य आहे, जी मान्यता आहे, ती कुठेही बाधित होता कामा नये, अशी भूमिका सनातनी मंडळी मांडत असत. एका चर्चेमध्ये अशाच पद्धतीची चर्चा सुरू झाल्यावर शास्त्रीजींनी पहिल्यांदा असं मांडलं की, शास्त्रांच्या रचना या दीर्घकाळ चालू असणाऱ्या रचना आहेत. कोणाही एका व्यक्तीने संपूर्ण धर्मशास्त्र लिहिलेलं नाही. अनेक शतकं धर्मशास्त्राचं काम चालत आलेलं आहे. अनेक विद्वान पंडित, शास्त्री हे सगळे त्याच्यात सहभागी होते आणि आपापली भर घालत असताना त्यांनी त्यांचे दृष्टिकोन त्याच्यामध्ये आणलेले होते. म्हणून तुम्हाला सत्याच्या शोधासाठी तीन गोष्टींची गरज लागणार आहे - ‘राईट व्हिजन’, ‘राईट नॉलेज’ आणि ‘राईट कण्डक्ट’. तुम्हाला चिकित्सा करूनच निर्णय घ्यावा लागेल. चिकित्सेचा आधार बदललेले कालमान, नवे प्रश्न हाच असेल. सर्व माणसं ब्राह्मण आहेत. त्यांनी ब्राह्मणांच्या प्रकारांचं उदाहरण घेतलेलं आहे. चार प्रकारचे ब्राह्मण - सारस्वत, मैथिली, उत्कल ब्राह्मण, कोकणस्थ ब्राह्मण. ब्राह्मणांचे आणखी प्रकार आहेत, तो भाग वेगळा. पण हे विचारासाठी घेतले.
शास्त्रीजींचं म्हणणं होतं की, सरस्वती नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना सारस्वत म्हणतात. मिथिली नगरीच्या आसपास राहणारे म्हणून मैथिली, कोकण परिसरात राहणारे ते कोकणस्थ, उत्कल देशांमध्ये राहणारे ते उत्कल. पण ते ब्राह्मणच आहेत. त्यामुळे सगळे ब्राह्मण आहेत.
दुसऱ्या बाजूने वर्ण आणि कर्म याची फारकत शास्त्रीजींनी सुचवली. वर्ण आणि कर्म का वेगळे आहेत? तर शास्त्रीजींचे म्हणणं असं आहे की, कर्मानं वर्ण ठरतो. त्यांच्या सुधारणेमधला जो सगळा वाद-विवाद आहे, तो याच्यावर जोडलेला आहे. तो गांधींशी केलेल्या अस्पृश्यतेच्या संदर्भात असो, राजगोपालाचारी आणि गांधी यांच्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने केलेला विचार असो, मुद्दा कर्म आणि वर्ण यांच्या फारकतीशी जोडलेला आहे. एका चर्चेत हे मांडल्यानंतर शास्त्रीजी असे म्हणाले की, शंकराचार्यांचा मुद्दा असला, तरी शंकराचार्य हे तुमच्या आमच्यासारखेच मर्त्य गृहस्थ होते.
शास्त्रीजींच्या या विधानाने ती सभा प्रचंड तापली. शंकराचार्यांना मर्त्य मानव म्हणणारा हा कोण? अशा तऱ्हेचा एक पेच त्या सभेत निर्माण झाला. सभा उधळली जाणार की काय? सनातनी मंडळी बाहेर पडण्याच्या मूडमध्ये होती, पण केवलानंदांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं, तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. लक्ष्मणशास्त्रींनी पूर्वपक्ष मांडला आहे. उत्तर पक्ष मांडण्याची तुम्हाला संधी आहे. पण ते काही त्या मंडळींना नीटपणे जमलं नाही. जुने धर्मशास्त्री पंडित जुन्याच अपौरुषेय युक्तिवाद मांडत होते. तिथं शास्त्रीजींनी परिवर्तनवादाची नवी भूमिका प्रविष्ट केली, असं आपल्याला म्हणता येईल. शास्त्रीबुवा त्या अर्थानं परिवर्तनवादी आहेत.
अशा परिषदा करत करत तर्कतीर्थांनी बनारसला एक सात दिवसांची अखिल भारतीय ब्राह्मण परिषद भरवली. त्या परिषदेला सातशे ब्राह्मण पंडित आले होते. बहुतांश सगळे अव्वल सनातनी. सर्व धर्मवाङ्मय अपौरुषेय आहे, कोणताही बदल आम्ही स्वीकारणार नाही, अशा तऱ्हेची भूमिका घेणारे. त्या परिषदेमध्ये ‘रिफॉर्म’ची भूमिका मांडणारे चौघेच होते- तर्कतीर्थ, धर्मरहस्यकार के. एल. दप्तरी, पाठकशास्त्री. त्या काळात परिषद सुरू होण्यापूर्वी ज्या विषयावर चर्चा घडायच्या, त्याच्यासाठी ‘समयबंध’ नावाची एक पद्धत अवलंबण्यात यायची. त्याचा मसुदा दोन्ही पक्षांनी एकमेकांना द्यायचा आणि त्याच्यावर एकमत झाले, तर तो वाद-विवाद पुढे जाणार. हे समयबंध काही ठिकाणी जमले नाहीत. सनातन्यांनी त्यात मुद्दाम खोडे घातले आणि काही ठिकाणी वेगळ्या भूमिका घेतल्या. त्यामुळे नाशिकच्या परिषदेत समयबंधामध्ये दुरुस्ती सुचवल्यामुळे तर्कतीर्थांबरोबरच्या तिन्ही सहकाऱ्यांना सभेतून हद्दपार केलं. शास्त्रीबुवांनी एकट्याने किल्ला लढवला. धर्मशास्त्राचं सगळं अवगाहन करून त्यांना सगळं मांडावं लागलं. भौतिकवादी नसतानाही धर्मसुधारणा कशा प्रकारे करता येईल, हे आव्हान शास्त्रीजींनी या पद्धतीनं पेललं, असं आपल्याला म्हणता येईल.
‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : सर्वंकष आकलन’ – लेखक\संपादक – डॉ. सुनीलकुमार लवटे
अक्षर दालन, कोल्हापूर | पाने – ३२६ | मूल्य – ५०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment