अजूनकाही
आजही द्रोणाचार्याचे भूत उच्च शिक्षण संस्थांच्या मानगुटीवर बसलेले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भारतातील विद्यापीठीय शिक्षण ही काही उच्चभ्रू जातींचीच मक्तेदारी असल्याचे दिसून येते. घटनात्मक तरतुदीमुळे दलित-आदिवासी विद्यार्थी उच्चभ्रू वर्गात दाखल झाले असले, तरी त्यांना समान वागणूक दिली जात नाही.
या संस्थांमध्ये समाजातील उच्चभ्रू प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा मोठा भरणा आहे आणि त्यांच्यात बंधुभावाचा आणि सामूहिक जीवनाचा अभाव आहे. दलित-आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून भेदभाव, छळ आणि हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याचे अनेक अभ्यास आणि आयोगाच्या अहवालातून दिसून आले आहे.
जातीच्या या जीवघेण्या आजारांचे निदान करण्यासाठी आणि या आजारावर प्रभावी औषधोपचार करण्यासाठी विद्यापीठांमध्ये पुरेशी कायदेशीर किंवा संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध नाही.
नुकत्याच झालेल्या आयआयटी मुंबईच्या प्रथम वर्षाच्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने, प्रतिष्ठित संस्थांमधील ब्राह्मणी मूल्यांचे खोलवर रुजलेले वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले आहे. दर्शनच्या उच्चवर्णीय वरिष्ठांनी आणि वर्गमित्रांनी त्याच्या सामाजिक अस्मितेची खिल्ली उडवली आणि त्याला अपमानास्पद वागणूक दिली. अशा अस्वस्थ सामाजिक वातावरणामुळे चिंता निर्माण होते आणि अनेकदा विद्यार्थ्यांना नैराश्यात ढकलले जाते.
रोजच्या छळाला आणि जातीय टोमण्यांना सामोरे गेल्यानंतर दर्शनला कदाचित प्रचंड ताण आणि आघात सहन करावा लागला. त्यामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला असावा. दलित-आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सौहार्दपूर्ण आणि समतावादी शिक्षणाची जागा निर्माण करण्याऐवजी, या संस्थांनी त्यांच्यासाठी गुदमरणारी परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे प्रतिभाशाली दलित आणि आदिवासी तरुणांच्या आत्महत्या होत आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अनेक शतकांपासून सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समाज, विशेषत: दलित आणि आदिवासींना शिक्षणाच्या क्षेत्रात हिंसक बहिष्काराला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: भारतात वसाहतवादी आधुनिकतेच्या आगमनानंतरच हे समूह शैक्षणिक आणि ज्ञाननिर्मितीच्या अवकाशात प्रवेश करत आहेत, ही अलीकडची घटना आहे.
आधुनिक घटनात्मक राज्य शैक्षणिक संस्थांना सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदायांची नोंदणी करण्यासाठी आणि शिक्षणासाठी लोकशाही आणि सर्वसमावेशक जागा तयार करण्याचे निर्देश देते. व्यावसायिक पदवी घेऊन दलित-आदिवासी समूह गतिशीलता प्राप्त करतील आणि आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनतील, अशी अपेक्षा होती. अशा धोरणात्मक चौकटीमुळे दलित आणि आदिवासी समूहांच्या एका छोट्या, पण लक्षणीय वर्गाला फायदा झाला असला, तरी त्यातील बरेच जण ब्राह्मणी जातीव्यवस्थेचे बळी ठरले.
विद्यापीठांचे सामाजिक जीवन दलित-आदिवासी विद्यार्थ्यांसाठी न्याय्य व स्वागतार्ह नाही. शैक्षणिक संस्थांचे सामान्य कामकाज सामाजिक अभिजनांच्या चिंता आणि त्यांच्या हितसंबंधांभोवती फिरते. सामाजिकदृष्ट्या उपेक्षित गटातील विद्यार्थ्यांची उपस्थिती, ही जणू काही त्या संस्थेच्या पारंपरिक संस्कृतीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना नोकरीच्या बाजारपेठेत प्रबळ सामाजिक अभिजनांकडून तिरस्काराची वागणूक दिली जाते.
विविध जाती-जमाती एकमेकांशी समतावादी अटींवर संवाद साधू शकतील, अशा सखोल एकसंध वातावरणाचा विद्यापीठात अभाव आहे. त्याऐवजी सामाजिक उच्चभ्रू वर्गातील विद्यार्थी आणि दलित-आदिवासी विद्यार्थी यांच्यात दुरावा दिसून येतो. दलित-आदिवासी विद्यार्थ्यांना अनेकदा सामाजिक-आर्थिक भांडवलाची कमतरता भासत असल्याने आणि संस्थात्मक वर्तुळात त्यांच्याकडे कोणत्याही ठोस पाठबळाची व्यवस्था नसल्यामुळे, ते सामाजिक अभिजनांच्या भेदभावपूर्ण नजरेखाली टिकून राहतात आणि जातीय अत्याचारांना बळी पडतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
विद्यापीठांमधील दलित-आदिवासी-बहुजन गटांसाठी राखीव कोटा पूर्ण भरण्यात प्रशासन रस दाखवत नाही. तेथील शिक्षक दलित-आदिवासी विद्यार्थ्यांना मौखिक परीक्षेत कमी गुण देतात आणि जातीनिहाय शिवीगाळही करतात. शिवाय जातीय भेदभाव आणि अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यास संस्था तयार नाहीत. त्यामुळे अनेक पीडित विद्यार्थ्यांना परावलंबीपणा आणि नैराश्यात जगणे भाग पडते. सर्वांसाठी सर्जनशील आणि बौद्धिक स्वातंत्र्याचे ठिकाण म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यात विद्यापीठे अपयशी ठरली असल्याचे दिसून येते.
उच्चवर्णीय ब्राह्मणी मानसिकतेमुळे विद्यापीठ परिसर दूषित होत असल्याने आधुनिक शिक्षणामुळे चांगले नागरिक तयार होतील, घटनात्मक कर्तव्यांची जबाबदारी असणारे आणि परिवर्तनवादी वर्ग म्हणून उदयास येतील, ही आशा फोल ठरली आहे. जातीय श्रेष्ठतेची भावना प्रबळ जातींना त्यांच्या सामाजिक हिताच्या पलीकडे जाऊन समता आणि बंधुता या तत्त्वांवर सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदायांशी संवाद साधू देत नाही.
काही वर्षांपूर्वी हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या हुशार विद्यार्थ्याने प्रशासनाच्या छळाला आणि दुर्लक्षाला कंटाळून आत्महत्या केली, तेव्हा राष्ट्रीय स्तरावर व्यापक सामाजिक आणि राजकीय आंदोलन उभे राहिले होते. त्यामुळे इथून पुढे तरी सत्ताधारी अशा प्रकरणांचा संवेदनशीलतेने तपास करतील, तरुण मनावरील अशा अत्याचारांना आळा घालण्यासाठी प्रभावी धोरणात्मक बदल आणि कायदेशीर तरतुदी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र एवढ्या वर्षांत फारसा बदल झालेला नाही.
विद्यापीठांच्या सामाजिक आणि शैक्षणिक जीवनात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित गटांच्या उन्नतीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याकरता सखोल विचार करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही परिस्थितीत या युगातील एकलव्याला द्रोणाचार्याच्या धूर्त ब्राह्मणी रचनेला अंगठा अर्पण करावा लागणार नाही, हे सत्ताधाऱ्यांनी पाहिले पाहिजे.
.................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख दै. ‘डेक्कन हेरॉल्ड’मध्ये २५ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
.................................................................................................................................................................
लेखक प्रा.डॉ. हरिष वानखेडे नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्यापन करतात.
अनुवादक प्रा. प्रियदर्शन भवरे जालना येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात समाजशास्त्राचे अध्यापन करतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment