“Whenever politics and business interests intersect, there is a danger that political influence will be used for business purposes. It is a well-established tradition that elected respresentatives should look out for the interests of their elctorate. But where to draw line between what is legitimate and what is not? The prominence given to business interests – and the self-interest of politicians – has pushed the line beyond the point that must voters consider acceptable; hence the disillusionment and disaffection.”
– George Soros, ‘The Crisis of Global Captalism (Open Society Endangered)’, Public Affairs, New York, Page 204.)
सुमारे २५ वर्षांपूर्वी जी व्यक्ती आपल्या पुस्तकात उद्योगपती आणि राजकारणी यांच्या हितसंबंधांच्या युतीबद्दल वाचकांना इशारा देते, ती गौतम अदानी व नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीबद्दल काही बोलली, तर त्याचा एवढा गहजब का करायचा? त्यांनी लोकशाही आणि व्यक्तीचा स्वार्थ, यावर काही भाष्य केले, तर ते भारतावरचे आक्रमण आहे, असा कांगावा करण्याचे कारण काय? वरील परिच्छेदावरून सोरोस अशा युतीचा एक दाखला देतात. ते सांगतात- “फ्रेंचांना राजकीय पुढाऱ्यांचा वापर करून व्यापारी हितसंबंध रेटायची परंपराच आहे. एक युरोपीय राष्ट्रपती म्हणाले की, एका बैठकीत फ्रेंच राष्ट्रपती जॅक शिराक एका खाजगी विक्रीसाठी त्याच्या फ्रेंच खरेदीदाराच्या वतीने दबाव टाकत होते. त्याचा मला धक्काच बसला. शस्त्रास्त्रविक्रीबाबत तर बोलणेच नको.’’
सोरोस पुढे लिहितात, “भ्रष्टाचार होत होताच, पण जुन्या काळी त्याची लोकांना शरम वाटे आणि तो लपवायचा ते प्रयत्न करत. आता नफा मिळवणे जणू काही नैतिक तत्त्व असल्यासारखे प्रचारले जाते. काही देशांतले राजकारणी आपण आपल्या पदाचा वापर केला नाही, तर शरमिंदे वाटून घेतात. माझी संस्था ज्या ज्या देशांत आहे, तेथे मी स्वत: हे अनुभवले आहे. युक्रेनने विशेषत: भ्रष्टाचारात कळस गाठला आहे. काही आफ्रिकन देशांचा मी अभ्यास केला. मला त्यात आढळले की, नैसर्गिक संपत्ती भरपूर असलेल्या अन् ती नसलेल्या देशांचे नागरिक सारखेच गरीब असतात. फरक इतकाच की, अशी संपत्ती भरपूर असलेल्या देशांची सरकारे अधिक भ्रष्ट असतात.”
सोरोस हे उद्योगपती नाहीत, ते एक बडे गुंतवणूकदार आहेत. म्हणजे भांडवली बाजारात पैसा ओतून नफा मिळवणाऱ्या कंपन्यांद्वारे आणखी नफा मिळवायचा. ‘निधी व्यवस्थापन’ असे त्यांच्या व्यवसायाचे नाव आहे. जगातले एक यशस्वी व्यावसायिक म्हणून ते नावाजलेले असून, त्यांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’मार्फत काही सार्वजनिक कार्य आरंभलेले आहे. सोरोस यांच्यावर कार्ल पॉपर या तत्त्वज्ञ अर्थशास्त्रज्ञाचा प्रभाव आहे. ज्या खुल्या समाजाचा सोरोस पुरस्कार करतात, ती कल्पना त्यांनी पॉपर यांच्या पुस्तकाच्या नावातूनच घेतली आहे. जागतिक भांडवलशाहीवरील संकटांचा विचार करताना सोरोस यांनी प्रातिनिधिक लोकशाही, अर्थशास्त्र, स्वार्थ, सत्य-असत्य, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वित्तीय बाजार, अशा अनेक विषयांचा उहापोह केलेला आहे. बाजार आणि लोकशाही यांचा परस्परांना आधार हवा आणि दोन्हींचा कारभार निर्धोक व्हावा, अशी त्यांची इच्छा या पुस्तकातून वारंवार व्यक्त होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘Laissex-Fair’ असा एक फ्रेंच शब्द आहे. ‘लैसे फेअर’ असा त्याचा उच्चार असून ‘बंधनमुक्त व्यापार’ असा त्याचा अर्थ आहे. त्यावर सोरोस यांचा असा आक्षेप आहे की, फ्रेंच असल्याने तो फार थोड्या लोकांना कळतो. त्याऐवजी ‘Market Fundamentalism’ हा शब्द योजला तर, तो सर्वांना समजेल. बाजाराचा मूलतत्त्ववाद व मुक्त व्यापार व्यवस्था सारखीच असून या दोन्ही तत्त्वांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत घुसखोरी करून कबजा मिळवला आहे. त्यामुळे माणूस व त्याच्या हातातली व्यवस्था अन्यायी बनल्याने, लोकशाही तसेच खुला समाज या तत्त्वाचा आग्रह आपण धरायला हवा, असे सोरोस मानतात.
कोणत्याही सर्वंकषवादी विचारधारेपेक्षा ही बाजार मूलतत्त्ववादाची विचारधारा अधिक धोकेबाज आहे, असे त्यांच्या पुस्तकाचे सार आहे. बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था कशी काम करते, याबाबतचे वर्णन बाजार मूलतत्त्ववाद अशा तऱ्हेने करतो की, त्याचे स्वरूप भव्यदिव्य वाटून समाजाच्या अनेक स्वातंत्र्याची आवश्यकता वाटेनाशी होते. बाजार अस्थिर असतो आणि तो सदैव संतुलन साधत राहतो, असा जो सिद्धान्त आहे, तो धोक्याचा आहे, असे सोरोस सांगतात.
बाजार असे आत्मसंतुलन करत नसतो, म्हणून त्यावर काही नियंत्रण असले पाहिजे आणि ते लोकशाही व्यवस्थेचे असावे, असे ते म्हणतात. स्वत:चे तत्त्व सांगताना सोरोस म्हणतात की, “बाजारातला एक सहभागी या नात्याने मी माझा नफा वाढेल कसा ते पाहीन. मात्र एक नागरिक म्हणून मी सामाजिक मूल्यांचे पालन करेन. ती शांती, न्याय, स्वातंत्र्य वा कोणतीही असतील.”
पुस्तकाच्या प्रस्तावनेतच सोरोस बऱ्याच मुद्द्यांची उकल करतात. ती वाचली की, भारताच्या राजकारणात केवढी उतमात चालू आहे, याची कल्पना येते. ते लिहितात की, “नियम तयार करणे व नियमानुसार चालणे, यांत आपण फरक करणे जाणले पाहिजे. नियमांची निर्मिती ही सामूहिक निर्णयाचा म्हणजे राजकारणाचा भाग आहे. नियमानुसार चालणे, हा वैयक्तिक निर्णयाचा भाग आहे. म्हणजे ते बाजारवर्तन आहे. लोक बऱ्याचदा त्यांच्या खिशाच्या कलाने मतदान करतात आणि व्यक्तिगत स्वार्थ पुरवणाऱ्या कायद्यांची पाठराखण करतात. वाईट म्हणजे निवडून आलेले प्रतिनिधीही सार्वत्रिक हितापेक्षा स्वहिताकडे जास्त लक्ष देतात. काही विशिष्ट मूल्यांसाठी उभा आहे, असे ठरवण्याऐवजी काहीही करून निवडणूक जिंकण्याची इच्छा बाळगतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्या नेत्यांची ही वाट्टेल त्या स्थितीत जिंकण्याची महत्त्वाकांक्षा प्रचलित बाजार मूलतत्त्ववादाच्या किंवा असीमित व्यक्तिवादाच्या प्रभावामुळे नैसर्गिक, वास्तविक आणि कदाचित अनुकरणीय भासू लागते. राजकारणाबद्दलचा असा दृष्टीकोन ज्या तत्त्वांवर प्रातिनिधिक लोकशाही उभी असते, त्याला तडे पोचवणारा आहे. स्वहित व लोकहित यांमधील विरोधाभास तसा जुनाच आहे. मात्र अलीकडच्या पैशाने यश मोजण्याच्या प्रवृत्तीने प्रामाणिकपणासारख्या मूल्यावर केलेली ही मात आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. एक नीतीतत्त्व म्हणून स्वहिताचे रक्षण राजकारण भ्रष्ट करून सोडते. त्यातून बाजाराला मोकळे रान करवून देण्याची बाजूच बळकट होत जाते.”
सोरोस वित्तीय बाजारातले एक निष्णात खेळाडू आहेत. त्यांच्याविषयी अनेकांचे चांगले मत आहे. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ जोसेफ स्टिगलीझ त्यांच्या ‘द प्राईस ऑफ इनइक्वॉलिटी’ या पुस्तकात म्हणतात- “अर्थशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्रांतले सत्य व ठोस शास्त्रीय सत्य यांत फरक असतो. अणू हालचाल कशी करतात, या बद्दलच्या समजुतींचा प्रभाव अणूंच्या खऱ्याखुऱ्या हालचालींवर काही परिणाम करत नसतो. मात्र अर्थव्यवस्था कशी कार्य करते, याबद्दलच्या समजुती तिच्या हालचालींवर प्रत्यक्ष परिणाम करत असतात. जॉर्ज सोरोस हा थोर वित्तपुरवठादार या प्रक्रियेचे वर्णन ‘reflexivity’ म्हणजे प्रतिक्षेप अथवा प्रतिवर्त असे करतो. त्यामुळेच त्यांना इतके यश मिळालेले दिसते. क्वीन्स हे केवळ अर्थशास्त्री म्हणून ओळखले जात नसत, तर ते एक महान गुंतवणूकदारही होते. ते म्हणत की, बाजार म्हणजे एक सौंदर्यस्पर्धा असून ती जिंकणारी व्यक्ती अन्य परीक्षकांच्या मनात सौंदर्याच्या कल्पना काय ते बरोबर जोखणारी परीक्षकच असते.”
भांडवली बाजार आणि लोकशाही यांच्यात सत्य व असत्य यांचा वावर कसा असावा, याचाही विचार सोरोस या पुस्तकात करतात. ते काही तत्त्वज्ञ नाहीत. शिवाय जो व्यवहार ‘राजकीय अर्थशास्त्र’ म्हणजे ‘political economy’ असा प्रसिद्ध आहे, त्याबाबतीत ते कमालीचा नैतिक आग्रह धरताना दिसतात. त्यांनी केलेला जो ‘reflexivity’चा म्हणजे प्रतिक्षेपाचा सिद्धान्त आहे, तो ते विचारांच्या इतिहासात समाविष्ट करून बघतात. त्याविषयी लिहिताना सोरोस खरे-खोटे बोलणे कसे ओळखावे, यावरही मते मांडतात.
प्रातिनिधिक लोकशाहीवर त्यांनी मांडलेली मते अशी आहेत – “मतदारांना जे ऐकावेसे वाटते, तेवढेच बोलल्यावर आपण जिंकू शकतो, असा शोध उमेदवारांना फार पूर्वीच लागल्याने आपले चिंतन काय आहे, त्याचा उच्चार उमेदवार कधीच करणार नाहीत. हा दोष फार मोठा नाही, कारण व्यवस्थेने तो स्वीकारला आहे. म्हणून उमेदवार जर त्याची आश्वासने पाळू शकला नाही, तर पुढच्या निवडणुकीत तो पडेल. याचा अर्थ समतोल साधला गेल्यासारखी परिस्थिती उदभवली. मतदारांनाही त्यांना अपेक्षित असलेला प्रतिनिधी मिळत नसतो. मतदारांच्या अपेक्षानुरूप उमेदवार खरे तर हवा, पण तसे कधीच घडत नसते. उमेदवार आपली आश्वासने व कृती यांमधले अंतर भरून काढण्यासाठी काही तंत्रे योजतात. त्यासाठी म्हणजे मतदारांना काय ऐकावेसे वाटते, त्यासाठी सर्वेक्षणे आणि गटवार बैठका घेतात. त्यामुळे उमेदवार जे म्हणेल, तीच लोकेच्छा आहे असे समजले जाते. लोकांना हवे आहे, त्याप्रमाणे वागणारा प्रतिनिधी मिळतच नाही. परिणामत: लोकांचा या निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास घटतो. येथे मतदारांनी आपले संकुचित स्वार्थ लोकहिताऐवजी पुढे दामटले म्हणून गडबड झाली. उमेदवारही याच संकुचित स्वार्थी अपेक्षांना हवा देत राहतात. कारण सर्वांची अपेक्षा ते पूर्ण करूच शकत नाहीत. पुढे होते असे की, उमेदवार फसवतोय की खोटं बोलतोय, याची चिंता करणे मतदार सोडून देतात अन् ही प्रक्रिया आणखी ढासळते. अशा वेळी पैसा मध्ये आला की, भ्रष्टाचार पूर्ण झालाच. अमेरिकेत तरी जे उमेदवार विशिष्ट हितसंबंधांशी आपली तडजोड करतात, त्यांना निवडून येण्यासाठी लागणारा पैसा सहज मिळतो. मग असे होते की, संतुलन साधण्याचा सिद्धान्त मागे जाऊन निवडून येण्याची क्षमता मतदार बघतात व उमेदवाराचा प्रामाणिकपणा दुर्लक्षितात. टीव्ही या उमेदवारांची अशी जाहिरात करतो की, आपोआपच सचोटी बाजूला पडून पैशाचे महत्त्व ठसते. अखेर या जाहिराती पैशावरच केल्या जातात…”
सोरोस यांचे हे निदान आपल्याला अनुभवता आले आहे. जनतेच्या मागण्या, अपेक्षा, इच्छा, सूचना खरोखर हवा, पाणी, रस्ते, स्वस्ताई, योग्य औषधोपचार, रोजगार, उत्तम शिक्षण, शांतता, रास्तभाव वगैरेपुरत्या असतात. नवे संसदभवन, पटेलांचा पुतळा, जोशीमठावरचे पर्यटन, विमानतळांचे खाजगीकरण, बंदरांचे खाजगीकरण अशा प्रकारच्या नसतात. पण खाजगीकरणात निर्णयाधिकार एकहाती असतो, तिथे भ्रष्टाचार नसतो, झटपट कामे होतात, ती चांगली असतात, अशा प्रकारचा नेत्यांचा समज मग लोकशाही प्रक्रिया आणखी दुर्बल करून टाकतो.
सोरोस असेही लिहितात की, रोजगार वाढवण्यासाठी कंपन्या काम करत नसतात. कमीत कमी व स्वस्तातली माणसं नेमून त्यांना फक्त नफा मिळवायचा असतो. आरोग्याची देखभाल करणाऱ्या कंपन्या माणसांचे प्राण वाचवायला धंद्यात उतरत नसतात. आरोग्याची देखभाल नफ्यासाठी असते. तेल कंपन्यांचा हेतू पर्यावरण रक्षण असा नसतो. नाममात्र नियम पालन व प्रतिमा संवर्धन यांसाठी त्या तत्पर असतात. संपूर्ण रोजगार, परवडणारी औषधे आणि निरोगी पर्यावरण या गोष्टी बाजार व्यवस्थेच्या उपांगांत मोडतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एवढे सांगून सोरोस आपले खरे रूप प्रकट करतात. ते म्हणतात, “सध्या राजकारणाविषयी जो तिटकारा दिसतो, तसा मलाही तो वाटतो. मी बाजाराचा माणूस असून मला बाजार जे स्वातंत्र्य व संधी देतो, ते मी आनंदाने स्वीकारतो. बाजारात मला माझे निर्णय एकट्याला घेता येतात आणि माझ्या चुकांमधून मला सुधारता येते.”
याचा अर्थ असा की, सोरोस लोकशाहीमधल्या सामूहिक निर्णयशक्तीच्या किंवा निर्णयप्रक्रियेचा एकप्रकारे अव्हेर करत आहेत. ते स्वत: असे मानतात की, “वित्तीय बाजार अनैतिक नसतो, तर न-नैतिक असतो. याउलट सामूहिक निर्णयप्रक्रिया भल्याबुऱ्याचा विचार केल्याशिवाय पूर्ण होत नसते. योग्य-अयोग्य काय हे पक्के ठाऊक नसेल, तरी आपल्याला त्याचा अंदाज आलेला असतो. त्याशिवाय प्रातिनिधिक लोकशाही कामच करू शकत नाही. नफ्याचा हेतू भल्याबुऱ्याची जाण देणारा अंत:प्रकाश मंद करतो. तात्कालिकता व तातडीतून येणारे हितसंबंध नैतिक मूल्यांवर मात करतात. म्हणून खुला समाज पाहिजे. तो सुधारणेला भरपूर वाव देतो. प्रतिक्षेपामुळे खुला समाज दुरुस्त होऊ शकतो.”
बाजार मूलतत्त्ववाद, भू-राजकीय वास्तववाद आणि बटबटीत सामाजिक डार्विनवाद, यांच्यात एक समान दोष आहे. तो म्हणजे त्यांना दातृत्व आणि सहकार्य यांविषयी असलेला दु:स्वास, असा एक निष्कर्षही सोरोस आपल्याला काढून देतात. एकंदर वैश्विक भांडवलशाहीपुढील संकटांची उजळणी करताना सोरोस उलटसुलट मांडणी करत राहतात. त्यांची अजून काही पुस्तके असून त्यातही ‘ओपन सोसायटी’चाच मुद्दा ते रेटताना दिसतात.
कामगारांचे हक्क, श्रमाचे मूल्य, श्रमाची चोरी, कामगारांची पिळवणूक आदी विषय ना त्यांच्या डोक्यात, ना त्यांच्या विवेचनात सापडतात. समाजवाद, समता, सामाजिक न्याय, विशेष संधी, दुबळ्यांचे अधिकार आदी विषय त्यांच्या गावीही नाहीत. अफाट संपत्ती मिळवणारी यशस्वी व्यक्ती म्हणून त्यांच्या शब्दाला मान आहे. अशी वैचारिकतेचा आव आणणारी पुस्तके लिहून ते आपली मते जगापुढे आणतात, यातच त्यांचे कौतुक. कसलेले अर्थशास्त्रज्ञ किंवा सच्चे लोकशाहीवादी कार्येकर्ते त्यांची दखल घेत नाहीत.
ढोबळमानाने उद्योगपती व पुढारी यांच्या संगनमतातून कोणते धोके उदभवू शकतात, याविषयी त्यांनी इशारे दिल्याने ते चर्चेत आले. भाजपने तर ते जणू डावे, समाजवादी, क्रांतिकारक असल्यासारखी त्यांची हेटाळणी केली. सोरोस मोदीविरोधक दिसतात, म्हणून डाव्यांनी त्यांना डोक्यावर घेतलेले नाही.
प्रचंड संपत्ती कमावली म्हणून तिचा सन्मार्गासाठी विनियोग करणारा एक दानशूर नेमकी काय मांडणी करू पाहतो, याचा हा थोडक्यात मागोवा.
विरोधाभासाचे एक चमकदार प्रतीक एवढाच त्याचा निष्कर्ष.
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment